अध्याय 19
अनरण्य स्वर्गात गेला
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
पृथ्वीवरील अनेक राजांकडून अजिंक्यपत्रे
स्वीकारीत रावण विजयोन्मादाने अयोध्येस आला :
मागील प्रसंग संपतेअंतीं । मरुत्ताते जिंकोन लंकापती ।
पुढें येतां अनेक भूपती । पृथ्वीचे जिंतित ॥१॥
दृष्टात्मा तो रावण । जिंतित निघाला आपण ।
इंद्रासारिखी जयांची आंगवण । तयां रायांप्रति येता झाला ॥२॥
रावण क्रोधें म्हणे तयांसी । मी मागतों संग्रामासी ।
जरी बळ असेल तुम्हांसी । तरी युद्धासी पैं यावें ॥३॥
नाहीं तरी पराभविलें म्हणोन । वदावें मजप्रति वचन ।
वृथा बोलाल गा झणें । सुटका नाहीं तुम्हांसी ॥४॥
लंकेश्वराचें ऐकोनि वचन । राजे मनांत जाणोन ।
म्हणती यासी सदाशिव प्रसन्न । दिधलें वरदान जिंतावे ना ॥५॥
ऐसा करोनि विचार । मग बोलते झाले नृपवर ।
ते कोण कोण तरी साचार । रोतीं सादर परिसावें ॥६॥
नामें सांगतां अपार । कथा वाढेल विस्तार ।
म्हणोनि संकळित नृपवर । ऐका सादर सांगेन ॥७॥
दृष्कृत आणि सुरथ । तिसरा गाधी चवथा जय तेथ ।
पांचवा पुरुरवा निश्चित । इतुके रघुनाथा बोलते झाले ॥८॥
हे सर्वही मिळोन । रावणाप्रति मधुर वचनें ।
म्हणती आम्ही अशक्त दीन । तुजसमान नाहीं योद्धा ॥९॥
ऐकोनि तयांच्या वचनासी । रावण संतोषोनि मानसीं ।
म्हणे आपणासमान पृथ्वीसीं । योद्धा नाहीं निश्चित ॥१०॥
ऐसें जानोनि दशानन । पुष्पकीं आरिढोनि पर्यटन ।
करिता झाला तंव अयोध्याभवन । दूरोनियां देखिलें ॥११॥
वैभवशाली अयोध्येचे वर्णन :
सुवर्णकळसांचिया हारी । तेणें शोभली अयोध्यानगरी ।
रत्नदीप घरोघरीं । उत्तम मध्यम पुरुषांचें ॥१२॥
अयोधेमाजी घरें । तिख्णीं पांचखणी निर्धारें ।
दुखणी सहस्त्र प्रकारें । पाहतां पाहतां नयनीं दिसेना ॥१३॥
हाटवटिया चौबारें । तोरणें नवरत्नांचीं मंदिरें ।
दोहीं भागीं चांदवे बिचित्राकारें । नाना चित्रें त्यामाजी ॥१४॥
घरोघरीं वेदपठन । ब्राह्मण करिती अग्निहोत्र यज्ञ ।
कोणासि नाहीं दुःखदैन्य । स्वानंदें पूर्ण विचरती ॥१५॥
ऐसिये अयोध्येप्रती । देखा झाला लंकाप्रती ।
वनश्री जैसी इंद्राची अमरावती । त्याहुनि अधिक गती इयेची ॥१६॥
ऐसिये अयोध्येप्रति जाण । राज्य करी पुरुषपंचानन ।
बळॆं शक्र किंचित न्यून । त्याहूनियां अधिक पैं ॥१७॥
अयोध्याधिपती अनरण्य राजाला रावणाचे युद्धार्थ आव्हान :
यांचे नाम अवधारिजे । यासि अनरण्य बोलिजे ।
तयाप्रति येवोनि विंशतिभुजें । संग्रामातें मागितलें ॥१८॥
तो सूर्यवंशी भूपती । अति उदार अगाधकीर्ती ।
तयातें म्हणे लंकापती । संग्रामातें मज दीजे ॥१९॥
ऐकोनि रावणाचें वचन । राजा झाला क्रोधायमान ।
म्हणे रावण स्थिर मजसीं रण । करावया तूं अशक्त ॥२०॥
तथापि संग्रामाच्या ठायीं । आम्हीं तुम्ही भिडूं उसण्याघायीं ।
म्हणोनि राजा सैनिका पाहीं । आज्ञापिता पैं झाला ॥२१॥
अनरण्याचे सैन्य सिद्ध, रावणाने त्या सैन्याचा संहार केला :
सैन्य पालाणा रे पालाणा । करा वेगीं सिद्ध सेना ।
रथ कुंजर अश्व जाणा । क्षणामाजि सज्जिले ॥२२॥
गजदळतें नहीं मिती । घेडे कोण कोण किती ।
रथांची संख्या अयुतायुतीं । केली निगुतीं नवजाय ॥२३॥
सैन्य न माय भूमंडळीं । वीर सिंहनादें करिती आरोळी ।
ऐसे येते झाले रणभूताळीं । ते रावणें देखिले ॥२४॥
सैन्यातें देखिलें । रावणें बाण सोडिले ।
एक एक मारिले । कोण उरले पैं नाहीं ॥२५॥
जैसें वैश्वानर मुखीं । पडिलें ते सर्वही भक्षी ।
तैसें अनरण्यसैन्य रावणमुखीं । बाणीं निःशेष निवटिलें ॥२६॥
जैशा नद्या समुद्राप्रती । मिळालिया समुद्र होती ।
तैसे सैन्य रावणाचे हातीं । सांपडलें तें भंगलें ॥२७॥
अनरण्याचे बाण विफल :
सैन्य भंगलें देखोन । अनरण्य कोपायमान ।
रागें धनुष्या वाहिला गुण । शरसंधान तेणें केलें ॥२८॥
रावणमस्तकावरी बाण । पडतां नव्हेचि पैं भग्न ।
जैसा पर्वतीं वर्षे पर्जन्य । तैसें संधान पैं झालें ॥२९॥
रावणातें न रुपती शर । छिन्न छिन्न नव्हे शरीर ।
देखोनि अनरण्य चिंतातुर । म्हणे वरदबळ यासी भय नाही ॥३०॥
तदनंतरे श्रीरघुपती । सावधान करोनि वृत्ती ।
पुढें काय वर्तलें तुजप्रती । यथानिगुतीं सांगतसें ॥३१॥
रावणाने अनरण्याला घायाळ केले :
मग तो राक्षस लंकापती । अनरण्यातें लक्षोनि निगुतीं ।
चडकणा हाणोनियां क्षिती । वरी पाडिला लोळत ॥३२॥
अनरण्य राजा पडिला मेदिनीं । विकळ अंग कंपायमान हो उनी ।
जैसा अग्निदग्ध साळ वनीं । उन्मळोनी पडे तैसा ॥३३॥
पडिला ऐकोनि अनरण्य भूपती । हांसोनि लंकेश तयाप्रती ।
म्हणे तुज काय झाली प्राप्ती । मजसीं युद्ध करितां राया ॥३४॥
स्वर्गमृत्युपाताळीं । युद्ध करी मजसीं ऐसा नाहीं बळी ।
राया विषयभोगें जीं लुब्धलीं । नेणती माझा पराक्रम ॥३५॥
अनरण्याने वर्णिलेला कालमहिमा :
रावणाचें ऐकोनि वचन । बोलता झाला अनरण्य ।
म्हणे राक्षसा मज कोण अशक्यपण । तुजसीं संग्राम पैं करितां ॥३६॥
परी हा काल विपरीत । तुज यश अपेश प्राप्त ।
मज काळें जिंतिलें येथ । तूं निमित्तमात्र झालासी ॥३७॥
मजसारिखे राजे रणीं । तुवां जिंतिले रणमेदिनीं ।
काळसाह्याची ऐसी करणी । काळाधीन प्राणी पैं असे ॥३८॥
काळपाशीं त्रिजगती । बांधिली लंकेशा निश्चितीं ।
हरि हर ब्रह्मा आणि सुरपती । ते प्रारब्धें वर्तती राक्षसा ॥३९॥
सर्वजण प्रारब्धधीन आहेत :
हरि वृंदेच्या श्मशानीं । बैसता झाला तीलागूनी ।
सदाशिव जो शूळपाणी । त्याची करणी अवधारीं ॥४०॥
मोहिनीनें मोहिला । लाज सांडोनि पाठीं लागला ।
सवेंचि वीर्यातें द्रवला । मोहिनीरुप देखोनि ॥४१॥
महेशासि लिंगपतन । इंद्र भगांकित होऊन ।
चंद्रातें लांछन झाले जाण । गुरुतल्पगाचें ॥४२॥
प्रारब्ध विधात्याचे गाढें । जन सृजी कोण्या चाडे ।
पडिलासे तो घडामोडें । थोर कष्ट पावत ॥४३॥
जैसें कुलाल चक्रवरी । एक मोडी एक नवें करी ।
थापटोनि आकारीं । बरव्यापरी आणितसे ॥४४॥
यालागीं जन प्रारब्धधीन । प्रारब्ध बळवंत पूर्ण ।
तयातें घालितो लोटांगण । जेणें व्यसन पावलों ॥४५॥
अनरण्याचे भविष्यकथन व शापवाणी :
आतां रावणा अवधारीं । जरी म्यां आधारिला असेल हरी ।
भगवद्भावें द्विज जरी । पुजोनि भोजन दिधलें असेल ॥४६॥
वापी कूप आराम । श्रीहरिप्रीत्यर्थ दानहोम ।
जरी केला असेल तरी पुरुषोत्तम । माझे वाक्य सत्य करो ॥४७॥
प्रजापालन बरव्यापरी । गाई ब्राह्मणां दया भारी ।
केली असेल तरी श्रीहरी । माझिये वंशी जन्मेल ॥४८॥
श्रीगुरु तो परब्रह्म । ऐसा म्यां केला असेल नेम ।
तरी माझे वंशीं पुरुषोत्तम । आत्माराम अवतरेल ॥४९॥
म्हणवील इक्ष्वाकुनंदन । तो लंकेशा तुझ्या वधार्थ जाण ।
अवतरेल श्रीजनर्दन । अयोनिज पूर्ण राघव ॥५०॥
चरणीं उद्धरील शिळा । पर्णील जनकाची बाळा ।
सोडवील देवां सकळां । तुज वधोनि रावणा ॥५१॥
ऐसें रावणा शापिलें । ऐकोनि स्वर्गी देव आनंदले ।
दुंदुभिवाद्ये वाजविते झाले । देव पुष्पें वर्षती ॥५२॥
तदनंतरे तो नृपती । देह त्यागोनि स्वर्गाप्रती ।
जाता झाला मग लंकापती । तेथोनि पुढती निघाला ॥५३॥
एका जनार्दना शरण । रावणा अर्जुना युद्ध दारुण ।
तेचि कथा परम पावन । सावधान अवधारिजे ॥५४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
अनरण्यनृपस्वर्गगमनं नाम एकोनविंशतितमोऽध्यायः ॥१९॥ ओंव्या ॥५४॥