रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 27 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 27

अध्याय 27

रावणाचे मुंडन करुन विटंबना

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पूर्वकथानुसंधान । धर्मराजा शीघ्र स्वर्गगमन ।
समागमें नारद भगवान । देवसदन पावला ॥१॥
येरीकडे पुरंदरारिजनक । राक्षासांमाजि श्रेष्ठ नायक ।
पुष्पकीं आरुढोन लोकालोक । क्रमूनि रमातळा येता झाला ॥२॥
घायीं राक्षस जर्जरीभूत । मार्गी एकमेकां उपचारित ।
देवांमाजि बळी प्रेतनाथ । जिंतोनि त्यातें चालिला ॥३॥
सवें प्रधान शुकसारण । मारीच अकंपन प्रहस्त जाण ।
आणिकही बळियाढे गहन । देवदर्पहरण राक्षस ॥४॥

रावणाचे पाताळांतील भोगावती नगरीला आगमन :

ऐसे प्रधानांसहित । पुष्पकारुढ लंकानाथ ।
तंव पुढें रसातळ लोकांतें । देखते झाले राक्षस ॥५॥
तया रसातळामाझारीं । वरुण नाग सहपरिवारीं ।
आणिक दैत्य नानापरी । वसती तया नगरीं हो ॥६॥
तया नगरीचें अभिधान । भोगावती नामें गहन ।
अति रम्य विश्रांति स्थान । ऋषि मुनिगण वसती जेथें ॥७॥
सुवर्णभित्ति आणि मंदिरें । सुवर्णांच्या आटोळ्या गोपुरें ।
सर्व नरां सुवर्णांची घरें । तोरणें मखरें घरोघरीं ॥८॥
हाट हटवटिया चौबारें । तेथें नांदिजे धनवत्तरें ।
घरोघरीं मंगळतुरें । नाना वाद्यें वाजती ॥९॥
ऐसिया नगराप्रती । येता झाला लंकापती ।
सवें प्रधान भद्रजातीं । दृष्टीं नाणिती कळातें ॥१०॥

निवातकवचाशी रावणाचे युद्ध :

तयां नगरींचे वीर । निवातकवचनामें दुर्धर ।
जयांचा धाक वाहे सुरेंद्र । सामन्य इतर कोणीकडे ॥११॥
ऐसिया वीरांप्रती । समरांगणीं राक्षस भिडती ।
उभयतां शस्त्रें वर्षती । एकमेकां लक्षून ॥१२॥
एकमेकांवरी वर्षती बाण । एकमेकांवरी सांडिती पाषाण ।
एक तें शस्त्रें नाना दारुण । वैरी लक्षोन विंधिती ॥१३॥
ऐसें करिती घोरांदर । राक्षस आणि ते विखार ।
समरांगणीं समान वीर । हार जित न घेती ॥१४॥
एक संवत्सरपर्यंत वीर । युद्ध करिती अति दुर्धर ।
शिणले नाहींत परस्पर । जयो इच्छिती आपणिया ॥१५॥

ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरुन निवातकवचांनी रावणाशी मैत्री केली :

निवातकवच आणी रजनीचर । युद्ध करिताती घोरांदर ।
तें निवारावया सावित्रीवर । ऐकोनि येता जाहला ॥१६॥
विमानारुढ सावित्रीरमण । त्रैलोक्याचा स्वामी आपण ।
जेथें राक्षसां विखारां समरांगण । तेथें येता झाला प्रजापति ॥१७॥
विधाता म्हणे तयांसी । तुम्ही युद्धीं अशक्त राक्षसांसी ।
समरांगणीं भिडतां तुम्हांसी । राक्षस मारिती निजबळें ॥१८॥
वरदबळें हे रजनीचर । उन्मत्त झाले महाथोर ।
इहीं जिंतोनि सुरासुर । निधडे वीर मारिले ॥१९॥
रावणेंसीं मैत्री कीजे । माझिया बोला मान दीजे ।
तरीच तुम्ही कल्याण पाविजे । नातरी जाइजे मरणमार्गे ॥२०॥
ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । निवातकवच वीर मिळोन ।
रावणासीं मैत्री जाण । न लागतां क्षण पैं केली ॥२१॥
साक्षी अग्नि ब्राह्मण । सुर असुर देवगण ।
राक्षस विखार एक होऊन । सुखसंपन्न राहिले ॥२२॥
तदनंतर पुलस्तिसुत । पूजा तयांची घेवोनि तेथ ।
राहिला एक वर्षपर्यंत । सुखें स्वस्थ होऊनी ॥२३॥
माया कपटविद्या पूर्ण । जारण मारण मोहन स्तंभन ।
उच्चाटन वशीकरण ।
अतर्क्य कपटमंत्र दारुण । एक शत अभ्यास करी ॥२४॥

रावणाचे वरुणाच्या अश्मपुरीला आगमन :

मग तो राक्षसचूडामणी । चालिला पातळ शोधोनी ।
तंव पुढें देखिलें नयनीं । वरुणाचें निजनगर ॥२५॥
अतिरम्य महा सुंदर । सुवर्णाचें ते नगर ।
तया नाम अश्मपुर । विखार नांदति तेथें ॥२६॥
काळ्याचे ते जाती । विखार आपुलेनि बळें नांदती ।
तयांतें मरोनि लम्कापती । पुढें चालिला सत्वर ॥२७॥
तयावरी शूर्पणखेचा भ्रतार । तयासीं युद्ध केलें थोर ।
तयातें मारोनि सत्वर । मग पुढारां चालिला ॥२८॥
तेथें खळ आणि बळवंत । तिसरा विद्युज्जिव्ह चवथा बळोत्कट ।
आणिकही बलाढ्य चार शत । दैत्य तेथ मारिले ॥२९॥
तदनंतर पौलस्ती । पुढें चालिला तंव शुभ्रदीप्ती ।
कैलासासम श्वेतज्योती । वरुणालय देखिलें ॥३०॥
तया मंदिरासि उपमा पूर्ण । द्यावयासि एक कैलास समान ।
अति दिव्य शोभे गहन । वरून आपण नांदे तेथें ॥३१॥
तया वरुणाचे मंदिरीं । कामधेनु बांधिली स्रवें क्षीरीं ।
तया क्षीराच प्रवाह सागरीं । म्हणोनि क्षिरसागर बोलिजे ॥३२॥

वरुणाच्या कामधेनुला पाहून रावण प्रसन्न :

त्या धेनूचें स्रवतां क्षीर । तयाचा झाला क्षीरसागर ।
धेनु देखोनि आनंद थोर । लंकेश्वरा जाहला ॥३३॥
जया धेनूचें वाहतां क्षीर । तयाचा झाला क्षीरसग्र ।
तेथें जन्मला हिमकर । आर्त चकोरां निववीत ॥३४॥
तेथेनि जन्मलें अमृत । तेणें सुरवर तृप्त ।
म्हणोनि सुरभि ऐसें म्हणत । ज्ञाते पंडित तियेसी ॥३५॥
कामिचाचे कां म्हणती । ऐसें आक्षेपिजेल श्रोतीं ।
तरी आयका तेचिं अर्थीं । सावधान श्रोतीं होईजे ॥३६॥
कामिकाचे पुरवी काम । तियेचेनि देवा तृप्ति परम ।
म्हनोनि कामधेनु ऐसें नाम । तियेसीच पैं राजे ॥३७॥
सकळ देव जिचेनि जिती । सकळांचें जीवन जे निश्चितीं ।
म्हणोनि कामधेनु ऐसें बोलती । याचि कारणालगुनी ॥३८॥
ऐसिये धेनूतें देखोनी । रावणें प्रदक्षिणा करोनी ।
साष्टांग नमनें अभिवंदोनी । पृच्छ नेत्रीं लाविलें ॥३९॥
पुढें तो मंदोदरीकांत । चालिलासे त्वरान्वित ।
वरुणाचें गृह सुशोभित । वीर बळवंत देखिले तेथें ॥४०॥
तयांतें गांजोनि म्हणे रावण । जा रे सांगा वरुणाप्रती जाऊन ।
अजित वीर दशानन । युद्धालागून आलासे ॥४१॥
तयासीं युद्ध कीजे । नाहीं तरी हरविलें म्हणिजे ।
ऐसें सांगोनि राक्षसराजें । वरुणाच्या दूतां पाठविलें ॥४२॥
दूत आला वरुणपुत्रापासीं । म्हणे गांजिलें राया राक्षसीं ।
युद्धा पाचारितो तुम्हासीं । शीघ्रतेसीं जाइजे ॥४३॥

वरुणाचें रावणाशीं युद्ध :

दूताचें ऐकोनि वचन । कोपा चढला वरुणनंदन ।
म्हणता झाला पालाणा रे सैन्य । युद्धा रावण आलासे ॥४४॥
मग त्या वरुणाचे पुत्र पौत्र । तिहीं पालाणिले आपुले रथ ।
एक वृषभीं आरुढ होत । एक चालत पैं पायीं ॥४५॥
वरुणसैन्य समस्त मिळोन । करितें झालें घोर रण ।
रावणें रमस्तां त्रासून । बळक्षीण पैं केलें ॥४६॥
रावणाचे प्रधानीं तिहीं । संग्राम केला तिये ठायीं ।
वरुणसैन्य त्रासिलें पाहीं । समरांगणामाझारीं ॥४७॥
सलिलेंद्रसैन्य विकळ पडिलें । रथेसीं आकाशांत पळतें झालें ।
तेथेओनि संग्राम करुं लागलें । रावणावरी शस्त्रवृष्टीं ॥४८॥
रावणाच्या रथावरी । शस्त्रवृष्टी झाली भारी ।
जैशा अंबुधारा शैलावरी । तैसा राक्षस वेढिला ॥४९॥
जैशा बहुत मिळती पिपीलिका । वेढिती उरगनायका ।
तैसें तोयेंद्रसैनिकीं दशमुखा । रथेसहित वेढिलें ॥५०॥

महादराकडून वरुणसैन्याचा पराभव :

देती हाका करिती गर्जन । म्हणती जिंतिला दशानन ।
हें देखोनि महोदरें जाण । काय केलें ते समयीं ॥५१॥
तया महोदरें ते समयीं । गदा घेतली काळतुल्य पाहीं ।
मिसळला संग्रामाच्या ठायीं । वरुणसैन्य मारित ॥५२॥
वरुणसैन्य पाडोनि रणीं । सिंहनाद करी गर्जोनी ।
वैरी विरथ पाडिले मेदिनी । अशुद्ध वाहे भडभडां ॥५३॥
असो अद् भुत संग्राम झाला । वीरें वीर रणा आला ।
सर्व संपत्तीतें मुकला । जयो पावला महोदर ॥५४॥
मग त्या वरुणाचे पुत्र । आकाशींहूनि पाहत ।
सैन्य देखोनि हताहत । मग तवका चढले हो ॥५५॥
अनेकशस्त्रसंभार । टाकिते झाले लक्षोनि निशाचर ।
मग कोपला राक्षसेंद्र । शर अपर वर्षला ॥५६॥
न माती आकाशपृथ्वीवरी । ऐसे शर वर्षला वैश्रवणारी ।
वर्म लक्षोनियां वैरी । भूमीवरी पाडिले ॥५७॥
कित्येक मुसळेंकरुन । कित्येक पट्टिशें जाण ।
कित्येक शक्ती सोडोन । वरुणनंदन मारिले ॥५८॥
मारोनियां वरुणपुत्रांतें । विजयी झाला रावण तेथें ।
प्रधान करिती सिंहनादातें । जैसा प्रळयीं मेघ हो ॥५९॥
तदनंतर दशानन । वरुणालयाप्रति जाण ।
येवोनि बोलता झाला आपण । सावधान अवधारा ॥६०॥
रावण वरुणप्रधानासी । म्हणे सांग प्रहासा वरुणापासीं ।
राक्षसेंद्रें मारिलें तुझ्या पुत्रासीं । आता तुजसीं युद्ध करुं पाहे ॥६१॥
तंव तो प्रहास प्रधान । ऐकोनि रावणाचें वचन ।
म्हणता झाला तेथें नाहीं वरुण । ब्रह्मलोका गेलासे ॥६२॥
जळेश्वर ब्रह्मलोकाप्रती । गेलासे जाण निश्चितीं ।
बलिष्ठ हाते ते समाप्तीसी । तुझेनि हातें पावले ॥६३॥
प्रहास प्रधान मधुर वाचा । बोधविला तेणें राजा लंकेचा ।
पुढील अन्वय कथेचा । सावधान ऐकिजे ॥६४॥
ऐकोनि प्रहासाचें वचन । मग तो पौलस्तिनंदन ।
पुष्पकीं आरुढोन जाण । बळिभुवना जाता झाला ॥६५॥

राम – अगस्ती संवाद :

श्रीदाशरथी म्हणे महामुनी । तुमचे प्रसदें पुण्यपावनी ।
कथा ऐकिली रामायणी । भवतारणी निजगंगा ॥६६॥
जैसें गौतमाचेनि प्रसादें । त्रैलोक्यें भोगिजे सायुज्यपद ।
जेंवी शिबीचे पुण्य अगाध । ग्रामस्थांसी उत्तम गति ॥६७॥
जेंवी समर्थाचेनि लग्नीं । मिष्टान्न अकिंचनीं ।
तेंवी तुमचे वचनीं । माधुर्यता कय सांगूं ॥६८॥
पुढील कथानुसंधान । काय करिता झाला रावण ।
तें मजप्रती समूळ कथन । सांग संपूर्ण निवेदिजे ॥६९॥
ऐसीं श्रीरामाचीं शब्दकुसुमें । श्रवणीं लेवोनि द्विजसत्तमें ।
आनंदें उल्लसोनी परम । काय वचन बोलिला ॥७०॥
कुंभोद्भव म्हणे अवनिजापती । तूं देवाधिदेव वर्णिला श्रुतीं ।
अष्टादश पुराणें तुज नेणती । तेथें मी किती बापुडें ॥७१॥
जननीवोसंगा बाळक वाढे । तेणें मातेचा महिमा नेणिजे मूढें ।
तैसे आम्ही ब्राह्मण वेडे । तुज मानव म्हणतसों ॥७२॥
पद्मिनीसन्निध बिढार । घेवोनि राहिला दर्दुर ।
सुवास नेणेचि पामर । भोक्ता मधुकर तेथींचा ॥७३॥
अंधागृहीं लाविल्या दीपकोटी । नपुंसका पद्मिनी गोमटी ।
नारी जोडली तरी शेवटीं । उपयोगासीं पैं नव्हे ॥७४॥
तैसें श्रीरामा तुझें चरित्र । नेणेती मतिमंद अपवित्र ।
तो तूं आम्हापुढें विचित्र । कथा पुससी राजेंद्रा ॥७५॥

रावणाचे बळिच्या नगरीला आगमन व त्या नगरीचे वर्णन :

तरी अवधारीं गुणसंपन्ना । रावण जिंतोनियां वरुण ।
प्रवेशला पाताळभुवना । प्रहस्त प्रधानासमवेत ॥७६॥
सुतळीं रावण प्रधानासहित । चालिला पुढें अपूर्व अद् भुत ।
नगर देखोनियां विस्मित । प्रधानासी बोलिला ॥७७॥
जेवीं देवेंद्र गुरूप्रती । प्रश्न करी एकांतीं ।
तेवीं रावण प्रधानासीं युद्धीं । बोलता झाला ते समयीं ॥७८॥
रावण म्हणे गा प्रधाना । देखोनि नगरीची रचना ।
अपूर्व वाटलें माझिया मना । येथील राजा कोण असे ॥७९॥
देखोनि नगरीची रचना । उणें आणिलें शचीपति-भवना ।
सत्यलोक ईपुढें ठेंगणा । माझिया दृष्टीसी कल्पत ॥८०॥
अलका आणि द्वारका । पाहतां इच्या न ये तुका ।
जेथें वास कैलासनायका । त्याहूनहि अपूर्व ॥८१॥
नगरी परिवेष्टित सप्तयोजनें । कल्प तरुंची उद्यानें वनें ।
सरोवरगणना करील कोणे । देउळांतें मिती नाहीं ॥८२॥
ठायीं ठायीं आम्रवनें । स्थळोस्थळीं शिवस्थानें ।
नानापरींच्या वाटिका सुमनें । मार्गस्थांतें सुवास देती ॥८३॥
जैसी यौवनें सुंदरी । तरुणपणें न माय अंबरीं ।
तैशा वल्ली नानापरी । दिव्यौषधींच्या शोभती ॥८४॥
रत्नकळस विराजमान । ठायीं ठायीं पताका गहन ।
नगरीं लोक पुण्यपावन । धार्मिक जन वसती तेथें ॥८५॥

रावण चौकशीसाठी प्रहस्ताला नगरीत पाठवितो :

हें कोणें पाळिली नगरी । प्रहस्तां आंत जावोनि झडकरी ।
अभिप्राव मनामाझारी । आणोनियां मज सांगें ॥८६॥
त्र्यंबक जेंवी तारकारीप्रती । सांगे महत्प्रयोजनाची वदंती ।
तेंवी ते समयी मंदोदरीपती । आज्ञापित प्रधाना ॥८७॥
रावणाचें प्रत्युत्तरवचन । ऐकोनि प्रहस्त प्रधान ।
नगरामाजि प्रवेशतां गर्जन । निजानंदें पैं केलें ॥८८॥

प्रहस्ताची दारातच तेजःपुंज वामनाची भेट व त्याला प्रश्न :

प्रधान प्रवेशतां नगरीं । प्रथमद्वारीं ब्रह्मचारी ।
देखिला वामन सालंकारी । सुवर्णमाळा कंठीं असे ॥८९॥
श्यामसुंदर विराजमान । माथां मुकुट तेज गहन ।
तयाचें दीप्ती पाताळभुवन । प्रकाशपूर्ण भासत ॥९०॥
भाळीं मृगनाभि ललाटीं । मलयजचंदनांची शोभे उटी ।
आजानुबाहु जगजेठी । कुंडलें गोमटीं झळकती तेजें ॥९१॥
शोभे पीतांबर वसन । दक्षिणागीं द्विजचरण ।
सकलालंकारांचें मंडण । ऋषि मुनि वंदिती ज्यातें ॥९२॥
ऐसा पुरुष प्रथमद्वारीं । प्रहस्त देखोनि प्रश्न करी ।
म्हणे हे कोणी पाळिली नगरी । येथील राजा कोण असे ॥९३॥
सांगा तयाचें अभिधान । ऐसें प्रहस्तीमुखींचें वचन ।
ऐकोनि बोलिला श्रीवामन । सावधान निजवृत्ती ॥९४॥

वामनाने सांगितलेली बळीराजाची माहिती
प्रहस्ताकडून कळताच रावण त्याच्या भेटीला गेला :

वामन म्हणे गा रजनीचरा । ऐकें सावधान चतुरा ।
ये सुतळीं वास दैत्येश्वरा । अभिधान राजा बळि असे ॥९५॥
तेथें वसती धार्मिक जन । येथील राजा बळि बळवान ।
जयासि भीती सुरासुरगण । द्वारीं भगवान जयाच्या ॥९६॥
महापुरुषाची ऐकोनि मात । धावोनियां प्रधान प्रहस्त ।
जेथें होता लंकानाथ । तया वृत्तांत जाणविला ॥९७॥
अपूर्व प्रधानमुखींची उत्तरें । परिसोनियां लंकेश्वरें ।
हात जोडून पुढारें । प्रथमद्वारा पैं आला ॥९८॥
जेंवी निधानासन्निध विवसी । मांत्रिकापुढें भूतें जैसीं ।
तैसा रावण प्रधानेंसीं । वामनापासीं पैं आला ॥९९॥

द्वाररक्षक वामनाला नमस्कार न करताच त्याला
युद्धाचे आव्हान कळविण्यास रावणाने सांगितले :

राक्षसें देखोनि वामन । न करीं प्रणिपात नमन ।
जैसा दरिद्री निधान । डावलोनि जातसे ॥१००॥
जयविजय सनत्कुमारांसी । नोळखतां झाले परम क्लेशी ।
च्यवोनियां दैत्ययोनीसीं । जन्मोनि मरणासी पावले ॥१॥
तैसें रावण ते समयीं । प्रणिपात न करोनि कांहीं ।
बोलता झाला युद्धालागीं पाहीं । त्रैलोक्य जिंतोनि मी आलों ॥२॥
द्वारीं उभा असें तिष्ठत । बळिस वेगीं जाणवीं मात ।
युद्धा पाचारितों त्वरित । ऐसा वृत्तांत जाणवीं ॥३॥
वामन म्हणे रावणासी । तुम्हींच जावें बळीपासीं ।
हे वार्ता जाणवा तयासी । निजमुखेंकरोनियां ॥४॥
मी असें तयाचा द्वारपाळ । येथें बैसोनियां सकळ ।
रक्षितों क्षितीमंडळ । आज्ञाधारक मी त्याचा ॥५॥

वामनाच्या अनुज्ञेने रावण स्वतःच बळीजवळ गेला :

वामनमुखींचें ऐकोनि वचन । भीतरीं प्रवेशला दशानन ।
सप्तद्वारें उल्लंघोन । राजद्वारा पैं आला ॥६॥
भद्रासनीं बळि भूपती । अर्धांगी संध्यावळी सती ।
परिवेष्टित सेनासंपात्ती । तंव रावणातें देखिलें ॥७॥
देखोनि रावण दशमुखांचा । समस्त अवलोकन बोलती वाचा ।
म्हणती हा बहु आननांचा । कोठोनि कैंचा येथें आला ॥८॥
कीं हे दशमुखांचे किडें । कीं हे दशानन श्वापद गाढें ।
कीं हें दशग्रीवांचें पक्षी चोखडें । राजभेटी आणिलें कोणीं ॥९॥
ऐसे तर्क नानापरी । करितां जनीं ते अवसरीं ।
पुढें तो रावण राजसदनाभीतरीं । येता झाला तत्काळ ॥११०॥
येवोनि बळिरायासमीप । उभा रावण धरोनि कोप ।
मनीं विचारी बळीचा गर्वदर्प । झाडणी करीन समस्तांदेखतां ॥११॥
मज नेदीच मान्यता मान । न बोलावें ऐसें बोले वचन ।
याचे अंगीं बलाभिमान । मजकडे नयनें न पाहे ॥१२॥
ऐसी रावणहृदयींची व्यवस्था । कळों सरली सुतळनाथा ।
सरिसाच राजा बोलता । झाला तया राक्षसासी ॥१३॥

बळीच्या प्रश्नावरून रावण स्वमहिमान सांगून युद्धाचे निमित्त सांगतो :

बैसा अहो जी राक्षसेश्वरा । तुम्ही कोण कोणाचे समाचारा ।
येथें यावयाचे कारणविस्तारा । मजप्रति सांगावें ॥१४॥
रावण म्हणे मी पौलस्तिकुळदीपक । सकळ राक्षसांचा नायक ।
जिंतोनिया तिन्ही लोक । येथें युद्धासि देखा पैं आलों ॥१५॥
मजसीं करावा संग्राम । म्यां जिंतिले सुरासुर परम ।
शचीपतीचें हरोनि धाम । राक्षसांसी दिधलें ॥१६॥
बळि म्हणे राक्षसनाथा । परिस माझी राज्यकथा ।
मजसीं युद्ध न घडे सर्वथा । पर उपाय आतां सांगतों ॥१७॥

द्वाररक्षक वामनाशी युद्ध करण्यास
बळी सांगतो, रावणाला आश्चर्य वाटते ? :

प्रथमद्वारीं पुरुष पंचानन । तयासीं युद्ध करावें आपण ।
येरु म्हणे द्वारपाळ दीन । तयासी युद्ध काय करुं ॥१८॥
जेथें पंचाननाचें गर्जन । तेथें ऐरावतीचे फडफडती कान ।
कोणे उपमे योग्य कोण । नेमितोसि अरे राया ॥१९॥
जी गर्दभ उन्मत्त बहुसाळ । तरी काय युद्धीं शार्दूळ ।
जिंतील हा विपरीत काळ । कैसा घडेल राजेंद्रा ॥१२०॥
कमळकोशींचा षट् पद । काय उपडील मेरुचा कंद ।
ऊर्णनाभितंतुरुद्ध । गज काय गुंतोनि राहिल ॥२१॥
जरी झाला मशक थोर । तरी काय ग्रासील वैश्वानर ।
पिपीलिकेनें गिरिवर । केवीं माथां धरवेल ॥२२॥
अंधाचा महा अंध सुत । स्वयें अडखळोनि कूपीं पडत ।
तेणें धरोनि मार्गस्थाचा हात । पंथीं लावील निजनेटें ॥२३॥
हें केवीं घडे जें न घडे । मशकपांखीं मेरु उडे ।
दानवें उभारोनि फडे । शेषासी वाद करूं आलें ॥२४॥
तें द्वारपाळ बापुडें दीन । मी लंकेचा राजा रावण ।
बधिलिया पराक्रम कोण । माझा होईल बळिराजा ॥२५॥
ऐसें हें कैसें घडेल राया । मजसीं युद्धा द्वारपाळा तया ।
प्रेरितोस हा विचार वांया । साच कैसा घडेल ॥२६॥

रावणाची हास्यास्पद गर्वोक्ती ऐकून
बळीने वामनाची महती रावणाला सांगितली :

दशमुखींची वचनावळी । ऐकोनियां राजा बळी ।
बोलता झाला तये काळीं । मूर्खाप्रति सुबुद्धि जैसा ॥२७॥
ऐक वत्सा दशानना । तूं नेणसी त्याच्या महिमाना ।
ऐकसी तरी सावधमना । मसूळ कथना सांगतों मी ॥२८॥
तयाचिया सत्तामात्रें । सृजती अंडज जारजादि भूतें ।
सृष्टिकर्ता विधाता त्यातें । पुत्र केला पोटींचा ॥२९॥
सकळ सृष्टीचा जो कर्ता । तो आत्मज त्याचा विधाता ।
तो अवतारपुरुष तत्वतां । सत्य लंकानाथा मानावें ॥१३०॥
चतुर्दशभुवनांचा ईश्वर । कर्ता संहर्ता सर्वेश्वर ।
तेणें मानवरुपें अवतार । धरिला असे गा पौलस्त्या ॥३१॥
धरा भारें पीडोनी । शरण गेली त्यालागोनी ।
मग तो आपण शाड्.र्गपाणी । अवतार धरिता पैं झाला ॥३२॥
वेदानिमित्त विधात्यानें । प्रार्थना केली दीनवदनें ।
मग मत्स्यावतार धरोनि तेंणें । शंखासुर निर्दळिला ॥३३॥
दैत्यें पृथ्वी नेली पाताळा । तैं सुरीं प्रर्थिलें घननीळा ।
तिच्या कैवारा अवतरला । कूर्मरुपें जनार्दन ॥३४॥
पृथ्वी धरी पृष्ठीवरी । म्हणोनि कूर्म म्हणती अद्यापवरी ।
सर्वेचि वराहरुपें श्रीहरी । हरिण्याक्षा मर्दिलें ॥३५॥
दैत्यें गांजिलें पुत्रातें । त्याच्या कैवारा अवतरला तेथें ।
स्तंभ भेदोनि हिरण्यकशिपूतें । विदारिलें जानूंवरी ॥३६॥
माझ्या अभिमानें मज केवळ । नाडिलें गा करोनि छळ ।
दातेपणाच्या थोरीनें प्रबळ । न मायेचि तिहीं लोकीं ॥३७॥
माझ्या अभिमानाची देखोनि थोरी । मग हा वामनरुपें झाला हरी ।
छळणा करोनि कपटकरी । यज्ञद्वारा पैं आला ॥३८॥
बटुवेष धरोनि जाण । मग मागितली भूमि पाद तीन ।
पाठीवरी देवोनि चरण । पाताळभुवनीं लोटिलें ॥३९॥
कपट त्याचें त्यास फळलें । माझें घरीं द्वारपाळ झालें ।
गळा बांधोनियां राहिलें । अद्यापवरी द्वारासीं ॥१४०॥
पुढील त्याचा कैसा पवाडा । कामधेनूनिमित्त केला झाडा ।
सहस्त्रार्जुनाचे बाहूंचा सडा । रणांगणीं घातला तेणें ॥४१॥
तोचि पुरुष सूर्यवंशीं । अवतरेल राक्षसकुळांत करावयासी ।
पौलस्तीचे कुळवल्लीसी । भस्म करावयालागून ॥४२॥
तोचि अवतरोनि गवळ्याघरीं । पूताना शोषोनि काक बक मारी ।
रिठासुरासी दाढेभीतरी । चघळिलें पूगीफळ जैसें ॥४३॥
तेणें दावाग्नि प्राशिला । धेनुक वत्स उपटिला ।
विमलार्जुन उन्मळिला । रांगत रांगत बाळरुपें ॥४४॥
जरासंध काळयवन । दंतवक्त्रशिशुपाळादि जाण ।
मुष्टिक चाणूर मल्ल मर्दून । कंसनिर्दाळण मामाचें ॥४५॥
यम कुबेर वायु ईशान । हे त्याचे वंदिती चरण ।
तो हा आदिपुरुष नारायण । द्वार रक्षोन बैसलासे ॥४६॥
काळासी जयाचा महाधाक । जयाचे तेजें सूर्यशशांक ।
अष्ट दिक्पाळ सेवक । सेवन करिती जयाचें ॥४७॥
त्यासीं युद्ध जाय करी । बळीनें अज्ञापिलें ते अवसरीं ।
हे ऐकोनि तो सुरारी । काय बोलता जाहला ॥४८॥

रावणाच्या गर्वोक्तीची बळीकडून उपेक्षा :

जो हा काळरुप यम जाण । दंडें त्रैलोक्या करी दमन ।
त्यासीं युद्ध आपण । अवश्यमेव करावें ॥४९॥
निजदंडें पातक्या दंडी । तयावरी म्यां घातली धाडी ।
राज्यासहित देशोधडी । म्यां केला बळिराया ॥१५०॥
ऐसी रावणाची वचनावळी । ऐकोनियां राया बळी ।
उपेक्षा करोनि तयेकाळीं । सारिपाट आणविला ॥५१॥
रत्नमंचकावरी जाण । विंध्यावळी राजा दोघे जाण ।
सारिपाट खेळती पार्श्वभागीं रावण । परम कोपें खवळला ॥५२॥
बळी न मानीच तयासीं । जेंवी ज्ञाता पाखांडियासी ।
रवि जेंवी शर्वरीसी । तैसे झाले रावणा ॥५३॥
राजहंस नातळे शेणा । तापसी न पाहे स्त्रीरत्ना ।
निष्कामासी धनतृणा । तेंवी उपेक्षा रायें केली ॥५४॥
गंगेनें त्यजिलें पाप । ज्ञाता सांडी हृदयकोप ।
निष्पत्र जाणोनियां पादप । पक्षियें वर्जिला पैं जैसा ॥५५॥
साधु जेंवीं त्यजिती निंदा । ब्रह्मचारी नातळे प्रमदा ।
ब्रह्मनिष्ठ हर्षविषादा । न येतीच कल्पांतीं ॥५६॥
चातक नातळे आणिक जीवन । चकोर न सेवी अमृतावांचून ।
दुर्भिक्षें पीडिला शार्दूळ तृण । न सेवी हो देहत्यागें ॥५७॥
ऐसियापरी दैत्यनाथें । उपेक्षोनियां रावणातें ।
खेळतां स्तब्ध झाला चित्तें । देहभावर्थ विसरोनी ॥५८॥

खेळातील निसटलेला फासा आणावयास बळीने रावणाला सांगितले :

सारीपाट खेळतां दोघां जणां । फांसा निसटला तो आणीं रावणा ।
ऐसें ऐकोनि दशानना । कोप परम उद्भवला ॥५९॥
म्यां जिंतिले सुर समस्त । बाहूनें आंदोळिला कैलास पर्वत ।
त्या मज बळी फांसा मागत । अपूर्व येथ देखिलें ॥१६०॥
फांसा देईन ये काळीं । मग यातें मुष्टिघातातळीं ।
मारोनियां नेईन धुळी । ऐसा आंवाका धरियेला ॥६१॥

कपटी रावणास फासा उचलेना; त्याची फजिती :

ऐसें भाकोनि लंकानाथें । फांसा उचलितां दोहीं हातें ।
नुचलेचि तो मग विसां भुजातें । पसरिता झाला ते समयीं ॥६२॥
फांसा धरितां विसां हातीं । नुचले रावणा क्षीण शक्ती ।
प्रयासें उचलिता तंव प्रारब्धगती । भूमीं पडिला रावण ॥६३॥
फांसा लोटला कपाळावरी । पडोनि अशुद्ध ते अवसरीं ।
वाहूं लागलें तंव राजनारी । न्या दूरी म्हणतसे ॥६४॥
दशमुख आणि विंशती कर । करंटें कोणें आणिलें समोर ।
याचे अशुद्ध देखों नये सत्वर । काढा काढा लवकरी ॥६५॥

रावणाला बाहेर घालवून देऊन त्याचे वस्त्रहरण :

बहुतां मुखाचें अपवित्रा । शृंगारिलें जैसें कां प्रेत ।
त्याचें देखों नये रक्त । म्हणोनि दूर घातला ॥६६॥
बाहेर येवोनि रावण । चिंतातुर परम दीन ।
म्हणे नगराप्रति करूं गमन । येथें धडगती पैं नाहीं ॥६७॥
तंव वेढिला दैत्यगणीं । मुकुट हिरोनि नग्न करोनि ।
करिते झाले वस्त्रहरणी । नागवोनि सोडिला ॥६८॥
रावण कुंथत अति बळेंसीं । आलों होतों युद्धासी ।
पुरुषार्थी निवडिला गति ऐसी । आतां विटंबनेसी अवधारा ॥६९॥
रावणा नग्नीकरण होत । ऐसा झाला पैं वृत्तांत ।
म्हणे आतां लंका प्राप्त । कोणे काळीं होईल ॥१७०॥
ऐसें विचारोनि रावण । नगरद्वारा आला जाण ।
तव पुढें देखिला वामन । देदीप्यमान तेजस्वी ॥७१॥

नगराबाहेर जाण्यास वामनाकडून प्रतिबंध :

रावणासी म्हणे वामन । बाहेर नको करुं गमन ।
राजाज्ञा अति दारुण । मज असे रे राक्षसा ॥७२॥
मी रायाचा आज्ञाधारी । राजाज्ञेविण न सोडीं बाहेरी ।
रावणें ऐकोनि ते अवसरीं । चिंतातुर पैं झाला ॥७३॥
क्षुधेनें पीडिला लंकानाथ । घरोघरीं भीक मागत ।
वामनें जठराग्नी चेतविला तेथ । पोट न धात कणवेपरी ॥७४॥
मागेंपुढें नाहीं सुटका । अवदशेनें वरिलें लंकानाथा ।
दावीं लिंग नगरींच्या लोकां । संपत्ति देखा दावित ॥७५॥

रावणाची दुर्दशा :

मग काय करी लंकापती । जावोनि अश्वशाळे करी विनंती ।
मुष्टि मुष्टि चणे द्या मजप्रती । क्षुधानिवृत्ती करावया ॥७६॥
अश्ववाहक म्हणती लंकानाथ । लिदीच्या पाट्या घेईं माथां ।
बाहेर सांडूं नये तत्वतां । मग चणे क्षुधार्थीं देऊं तुज ॥७७॥
दहा मुकुटीं जडित दहा माथे । लिदीच्या पांट्या ठेवोनि तेथें ।
पोट न भरे विसां हातें । चणे खांता रावणा ॥७८॥
ऐसा कोंडला रावण । कांही युक्ती न चले जाण ।
चित्तीं पाहे विचारोन । सुटिका पूर्ण नव्हेचि ॥७९॥
वामनें पुरविली पाठी । लंके जावयाची खुंटली गोष्टी ।
उबगोनि दशानन शेवटीं । राहतां तेथें पैं झाला ॥१८०॥
ठकवोनियां दाशरथी । हारून नेईल सीता सती ।
येणें क्रोधें कश्यपी मूर्ती । थोर विपत्ति भोगावी ॥८१॥

रावणाचा पाठलाग :

वामनातें ठकवोन । अदृश्यगती करी गमन ।
पळोन जातां दशानन । पुढें वामन देखिला ॥८२॥
भेणें पळे लंकापती । सवेंचि चाले पाताळगती ।
धराधारक खुजट मूर्ती । देखोनि परती करितसे ॥८३॥
रावण म्हणे जी वामना । मज सोडोनि द्यावें जीवदाना ।
येरुं म्हणे राजाज्ञा । वीण रावरंका निर्गम नाहीं ॥८४॥
पळों जातां दशदिशी । तेथेंही व्यापकत्व वामनासी ।
देखोनि रावण अति भयेंसीं । खेचरगतीसींही चालेना ॥८५॥
जैसा दरिद्रियाचा उदीम । फळ नेदी क्लेश परम ।
पापियामुखीं श्रीराम । न ये जैसा कल्पांतीं ॥८६॥
अशुचिया जैसा जप । कुलहीना जैसें तप ।
निंदकासि जैसें पाप । फळ नेदी पुण्याचें ॥८७॥
तैसें झाले दशानना । सायास वृथा गेले जाणा ।
पुढें क्षुधेनें केला दीनवाणा । भीक रावणा लाविली ॥८८॥
नगर स्त्रियांसि करी विनंती । मी सूत कांतीन बहुतां हस्तीं ।
दहा रहाट दहा पंक्तीं । अन्ननिश्चिंती करावी ॥८९॥
कापूस वेढिता दशानन । तोंडघसीं पडला जाण ।
मुखीं सरक्या भरोन । अति लज्जा पावला ॥१९०॥
चुकोनियां मुळींचा तंतु । कांतूं बैसला लम्कानाथु ।
निजधर्माचा मोडे चातु । स्त्रिया मारित टोले वरी ॥९१॥
पुढें खंडेरायाच्या होवोनि श्वान । भुंकों लागला मागे अन्न ।
परिवेष्टित लहान सहान । मुलीं वेढोन घेतला ॥९२॥
कोणी टाकिती खापरें । म्हणती कोणी मर मरें ।
एक म्हणती मागें सरें । आपदा थोर पावला ॥९३॥
पोटालागीं नाचे दारोदारीं । वीस हात नाचवी नानापरी ।
जंबुकगर्दभस्वरेंकरीं । तुकडॆ घरोघरीं मागत ॥९४॥

रावणाचा पिता बळीकडे येतो :

ऐसी दशा रावणासी । हाक गेली पौलस्तीपासीं ।
तेणें येऊनि वेगेंसीं । पुत्रशुद्धी केली ॥९५॥
सोडवावया निजपुत्रासी । सुतळीं प्रवेशे पौलस्ति ऋषी ।
येवोनि बळीच्या नगरासी । पुत्रशुद्धीसी करितसे ॥९६॥
तंव देखिला दुरोनि दशानन । खंडेरायाचा होवोनि श्वान ।
भिक्षा मागे पोटांलागून । ऋषि लज्जा पावला ॥९७॥
ऋषि जात बळीपासीं । अति सन्मानें पूजोनि त्यासी ।
पुसता झाला कोणीकडे ऋषी । आगमन झालें तुमचें ॥९८॥
सांभाळावया चकोरासी । निजमंडळ सांडी शशी ।
तैसें तुमचें आगमन ऋषी । दीनजनांसी उद्धारावया ॥९९॥
आळसियावरी अनुग्रहार्थ । उद्धरावया शिवजटेचें तीर्थ ।
तैसें तुमचें आगमन येथ । कृपायुक्त आलेती ॥२००॥
कोणे कार्यालागीं ऋषी । तुम्ही आलेति या ठायासी ।
येरु म्हणे त्वां रावणासी । कोंडोनि कां राखिलें ॥१॥
सुतळादिपातीनें वाहिली आण । म्हणे माझ्या नगरीं बंदिवान ।
नाहीं रोग उपद्रव जाण । दरिद्रपण असेना ॥२॥
कोणे ठायीं कोणें नगरीं । कोणें राखिला दशशिरी ।
शोधोनि आणा ये अवसरीं । सन्मानेंकरी सोडीन ॥३॥
पाहूं जातां पौलस्तिमुनी । लिदीच्या पांट्या माथा घेवोनि ।
तुकडे खात चाले मेदिनीं । येतां दुरोनी देखिला ॥४॥
पौलस्ति देखतां पौलस्तिनंदन । भुकिन्नला होवोनि श्वान ।
पुढें चाले तंव दर्शन । पितया देखोन लाजला ॥५॥
ब्रह्मसुत म्हणे निजतनया । एवढ्या आपदा भोगावया ।
राखिलें असे काय राया । जावों नेदी बळिराज ॥६॥
कोंडोनि राखिलें वामनें । ऐसें बोलतां दशाननें ।
मग काय केलें पौलस्तीनें । सावधान मनें अवधारा ॥७॥
करीं धरोनि दशशिर । पौलस्ति येवोनि वामनासमोर ।
आज्ञा द्यावी हा लंकेश्वर । निजराज्यास जाईल ॥८॥
पौलस्ति देखोनि वामन । घातलें साष्टांग लोटांगण ।
मस्तकीं वंदोनियां चरण । धर्मवचन अनुवादे ॥९॥
बळिरायाचा मी सेवक । द्वारपाळ द्वाररक्षक ।
आज्ञेवेगळे राव रंक । एकाएक जाऊं नेदीं ॥२१०॥
राजाज्ञा घेतल्यावरी । अवश्य न्यावा जी बाहेरी ।
रोकडे सुटकेची ऐका परी । निर्गमन व्हावया ॥११॥

रावणाचे वपन व मुंडण करण्याची वामनाची आज्ञा :

मुनि म्हणे कैसे चिन्हा । आनंदें सांगावें वामना ।
पंचकद्वयशिरां वपना । आणि मुंडणा खांडमिशा ॥१२॥
श्याम करोनियां वदन । दशनासिकीं कवड्या बांधून ।
मुखीं श्वेत पीत लेपन । ये चिन्हें निर्गमन मुनिराजा ॥१३॥
स्वयंभूतनय म्हणे निजपुत्रासी । तुज नेईन रायापासीं ।
सन्मान देईल मुद्रिकेसीं । जावयासी रावणा ॥१४॥
येरु म्हणे अहो जी ताता । मुख न दाखवीं बळीस आतां ।
रायसि फांसा आणून देतां । दांतघासीं पडलों मी ॥१५॥
युद्धा आलों अति सत्राणें । मज झालें लाजिरवाणें ।
येथेंचि आतां प्राण देणें । परी नाहीं येणें बळीपासीं ॥१६॥
ऋषि म्हणे निषिद्ध राजवपन । येरु म्हणे कैंचें राजलक्षण ।
सुडका लागला अति दीन । मुंडन केलिया भय काय ॥१७॥
जे जे होती बंदिनिर्मुक्त । त्यांसी पाहिजे प्रायश्चित ।
मज आजीच आला सिंहस्थ । निषेधार्थ न वदावा ॥१८॥
वामनापासीं निर्मुक्ती । कदा नव्हे कल्पांतीं ।
माझेनि भाग्यें वपनाकृती । बोलिला निर्मुक्ती वामन ॥१९॥

मुंडण केल्यावर रावणाची सुटका :

ऐसें बोलोनि दशवदन । खांडमिधा मस्तकवपन ।
काळें करोनियां वदन । आला आपण अति शीघ्र ॥२२०॥
देखोनि रावणाचें चिन्ह । लाजवित सकळ जन ।
गोमयपिंडीं अभिषेकून । दिधला सोडून वामनें ॥२१॥
याउपरी पौलस्तिनंदन । पुष्पकविमानीं आरुढोन ।
आक्रमिता झाला गगन । लंके उजू चालिला ॥२२॥
एक जनार्दना शरण । अगस्ति सांगे बळीचें कथन ।
आतां पुढिले प्रसंगीं जाण । सांगेल आपण घटोद्भव ॥२३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
प्रेतराजदशाननयुद्धबळिराजनगरे रावणवपनविटंबनं नाम सप्तविंशतितमोऽध्यायः ॥२७॥ ओंव्या ॥२२३॥