रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 39 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 39

अध्याय 39

वानर-राक्षसांना आनंद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम सच्चिदानंदघन । लीलावतार परम पावन ।
खेळ खेळे विचित्र विंदान । विधात्या महिमान न कळे ज्याचें ॥१॥
ऐसा तो रघुपती । भद्रासनीं अयोध्येप्रती ।
बैसला जैसा नक्षत्रें भोवतीं । मध्यें चंद्र विराजे ॥२॥
भोवतें राजे तपोधन । तेणें सभा प्रसन्नवदन ।
बंदीजन करिती गुणवर्धन । गंधर्व गायन करिताती ॥३॥
तदनंतर पूर्वी भरतें । राजे बोलाविले होते रणसाह्यार्थे ।
ते विनविते झाले रघुपतीतें । स्वदेशातें जावया ॥४॥
श्रीराम म्हणे रायांसी । तुम्हांसि भरतें रणसाह्यासी ।
पाचारिलें परी तुमच्या प्रसादेंसी । आधींच रावण मारिला ॥५॥
तरी आतां स्वदेशा जावें । मज मनीं आठवावें ।
म्हणोनि प्रीतिपूर्वक गौरवें । राजयांची पूजा केली ॥६॥
ऐशी करोनियां पूजा । तृपां श्रीराम बोले वोजा ।
तरी आतां शीघ्र स्वदेशा जा । आनंदनिर्भर होवोनी ॥७॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । समस्तीं राजीं मिळोन ।
श्रीरघुपतीस करोनि वाम प्रदक्षिण । स्वराष्ट्रातें निघाले ॥८॥
मार्गी करिती अनुवादातें । म्हणती व्यर्थ बोलाविलें भरतें ।
पूर्वी कार्य केलें श्रीरघुनाथें । मग अयोध्येतें आम्ही गेलों ॥९॥
भरत आम्ही सहपरिवारीं । पुढे जावें लंकेवरी ।
तंव श्रीराम-लक्ष्मण मारोनि वैरी । अयोध्येभीतरीं पैं आले ॥१०॥
आमुचें आगमन वृथा झालें । परी रघुनाथें आम्हा सन्मानिलें ।
ऐसे म्हणत म्हाणतां पावले । आपुल्याला नगरांतें ॥११॥
तंव येरीकडे भरतलक्ष्मण । रायां बोळवोनि स्वस्थानीं जाण ।
मग प्रवेशते झाले अयोध्याभवन । बहुविध धन आणोनी ॥१२॥

भरत-लक्ष्मणानी आणलेले धन रामांनी
वानर-राक्षसांना वाटून त्यांना संतुष्ट केले :

रायीं श्रीरामाकारणें । पाठविलीं नानापरींचीं भूषणें ।
अश्व रथ गज गोधनें । नाना उष्ट्रें पाठविलीं ॥१३॥
शेळियांचें उदंड कळप । नाना व्याघ्र हरिणें सर्प ।
नाना जातींचे पक्षी अमूप । श्रीराम सुखरुप व्हावया ॥१४॥
चंदन पारिजात केशरपरिमळ । नानापरींचीं परिमळें बहळ ।
दिव्य वस्त्रें सुपरिमळ । श्रीरामासी दिधलीं ॥१५॥
ऐसें रायाचें बळिदान । घेवोनि आले भरत लक्ष्मण ।
प्रवेशले अयोध्याभवन । जेथें परब्रह्म आपण असे ॥१६॥
श्रीरामा जाणविली मात । स्वामी आले लक्ष्मणभरत ।
राजयांचे भेटींसहित । तुमच्या दर्शना येताती ॥१७॥
इतुकें बोलता ते समयीं । रत्नाभरणेंसीं ते सभाठायीं ।
आले दोघे बंधु पाहीं । श्रीरामासी भेटले ॥१८॥
श्रीरामें देवोनि आलिंगन । पुढे ठेविलें राजयांचें धन ।
तें श्रीरामें समस्त देखोन । वांटिता झाला ते समयीं ॥१९॥
सुग्रीवादि करोनि वानर । बिभीषणासहित निशाचर ।
श्रीरामें केले अभर । रत्नालंकार देवोनी ॥२०॥
दिधलीं समस्तां ऋक्षांप्रती । संतुष्ट केल्या वानरपंक्तीं ।
एकीं आभरणें बांधोनी हातीं । एकीं गळां बांधिलीं ॥२१॥
एक मस्तकीं हिरे खोंवती । एक करीं मुद्रा घालिती ।
एक ते दिव्याभरणें वेढिती । एक गाती नाचती श्रीरामापुढें ॥२२॥
एक श्रीरामापुढें पिलंगती । एक श्रीरामा वाकुल्या दाविती ।
एक ते कुसी खांजविती । दंत विचकती श्रीरामापुढें ॥२३॥
ऐसें संतुष्ट ऋक्ष वानर । श्रीरामापुढें करिती गजर ।
तें देखोनि श्रीरामचंद्र । आनंदें थोर डुलतसे ॥२४॥
एकें परिमळद्रव्य घेवोनि हातीं । एकमेकांतें लाविती ।
भोक्ता श्रीराम एक म्हणती । ग्रासोग्रासीं वानर ॥२५।
ऐसे एक मासपर्यंत । सुखें वसते झाले अयोध्येआंत ।
युग घटिकेसमान जात । श्रीरघुनाथासन्निध ॥२६॥
ऐसा क्रमला प्रथम मास । दुसरा मास प्रवर्तला वानरांस ।
दिवसेंदिवस अति उल्हास । श्रीरामभक्तांस जातसे ॥२७॥
हृष्ट पुष्ट ऋक्ष वानर । आणि बिभीषणाचे रजनीचर ।
मागील विसरले गृह पुत्र दार । श्रीरघुवीर सेवितां ॥२८॥
एका जनार्दना शरण । वानरेंशीं श्रीरघुनंदन ।
अयोध्येसीं सुखसंपन्न । विराजमान पैं असे ॥२९॥
पुढील कथा अति रसाळ जाण । वानरां-राक्षसांलागून ।
आज्ञा देईल रघुनंदन । स्वभवना जावया ॥३०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वानरराक्षससुखसंपनातानाम एकोनचत्वारिंशोध्यायः ॥३९॥ ओंव्या ॥३०॥