Ramayan - Chapter 7- Part 63 books and stories free download online pdf in Marathi

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 63

अध्याय 63

वृत्रासुरवधाची कथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ऋषीची संज्ञा जाणोन । श्रीरामें स्नानसंध्या सारुन ।
नंतर करावया भोजन । ऋषि राम प्रवर्तले ॥१॥
श्रीरामभोजनाकारणें । नानापरींचीं फळें तेणें ।
उत्तम शाका अगस्तीनें । श्रीरामालागीं आणिल्या ॥२॥
उत्तम फळें रुचकर । भोजनीं प्रवर्तला राजेश्वर ।
भोजन करोनि श्रीरघुवीर । निजासनीं बैसला ॥३॥
तृणपर्णकुटिकेमाझारी । श्रीरामें निद्रा करोनि तमारी ।
उदय होतां नृपकेसरी । स्नानसंध्या संपादिली ॥४॥
ऋषींस करोनि नमस्कार । हात जोडोनि श्रीरघुवीर ।
म्हणता झाला आजि भाग्य अपार । चरण तुमचे देखिले ॥५॥
आजि धन्य माझें कुळ । धन्य माझें भाग्य सफळ ।
जन्मोजन्मींचें तपाचें फळ । चरणयुगुल देखिलें ॥६॥
आतां निजनगरा जावयासी । आज्ञा दिधली पाहिजे ऋषी ।
ऐसें श्रीराममधुरवचनासी । ऐकोनि कुंभोद्भव बोलिला ॥७॥
आचमनीं प्राशिला अपांपती । विंध्याद्रि निजविला क्षिती ।
ऐसा कुंभोद्भव रामाप्रती । काया बोलिला जाहला ॥८॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । तुवां वधोनि दुष्टात्मा ।
सुखसंतोष दिधला आम्हां । पावन अवनीं तुवां केली ॥९॥
सर्व भूतांचें दुःखकंद । जयांचे बंदीं सुर पावले बंध ।
ऐसा रावणकुंभकर्णांचा कुळासह वध । करोनि अमर सोडविले ॥१०॥
तुझा उपकार महापुरुषा । सहसा वर्णवेना शेषा ।
साही दर्शनां विवाद आपैसा । अद्यापि तुटला पैं नाहीं ॥११॥
ऐकोनि अगस्तीचें स्तवन । संतोषला धरणिजारमण ।
ऋषीस करोनि नमन । विमानारुढ पैं झाला ॥१२॥
हेममय पुष्पकविमानीं । आरुढोनि श्रीराम गगनीं ।
आज्ञा करितां पुष्पक अवनीं । अयोध्येचे उतरले ॥१३॥
ज्ञानकर्मेंद्रियांचा नाथ । तयाचा वेग राहिला तेथ ।
अंजनीभ्रतार लज्जान्वित । पुष्पकापुढें होवोनि ठेला ॥१४॥
श्रीराम आरुढोनि विमानीं । माधान्ह होतां अयोध्याभुवनीं ।
प्रवेशतां पुष्पका आज्ञापोनी । निजस्थानीं पाठविलें ॥१५॥
श्रीराम येवोनि सदना उजु । बैसोनि पाचारिले अनुजु ।
भरतलक्ष्मण आनंदभोजु । अग्रजासी भेटले ॥१६॥
अग्रजानुजां झाली भेटी । स्वानंदें हेलावली सृष्टी ।
मग श्रीरामें बंधूंप्रति गोष्टी । सांगितली स्वकृत ते ॥१७॥
शूद्रजातीचा तापस । दक्षिणदिशे करी धूम्रपानास ।
तयातें वधोनि ब्राह्मणा संतोष । बाळ वांचवोनि दीधला ॥१८॥
आतां पुढील कर्तव्यता । ते तुम्ही ऐका एकाग्रचित्ता ।
आम्हीं केलें राक्षसांच्या घाता । हत्या बहुत घडल्या आम्हां ॥१९॥
करावया पातकाचें निर्दळण । करुं धर्माचें संरक्षण ।
आतां करुं अश्वमेधयज्ञ । राज्यरक्षण करावया ॥२०॥
ऋषिजनसुखसंतोषार्थ । मी अश्वमेधयज्ञ करीन येथ ।
ऐसें श्रीरामाचें मनोगत । जाणोनि भरत बोलता झाला ॥२१॥
भरत म्हणे श्रीरामासी । पूर्वी कोणें केलें यज्ञासी ।
तें मजप्रति सांगिजे विस्तारेंसीं । फलश्रुतीसीं रघुवीरा ॥२२॥
ऐकोनि कनिष्ठ बंधूचे वचन । बोलता झाला श्रीरघुनंदन ।
पूर्वी मित्रें राजसूय यज्ञ करुन । वरुणलोक पावला ॥२३॥
चंद्रें करोनि राजसूय यज्ञ । त्रैलोक्यींचें उत्तम स्थान ।
तें पावला शाश्वत स्थान । यालागीं कीं धर्मपालन करावें ॥२४॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । भरतें उपक्रम करुन ।
बोलता झाला स्वयें आपण । निजलक्षण धर्माचें ॥२५॥
भरत बोले श्रीरामासी । तूं त्रैलोक्याचा ईश होसी ।
स्वधर्मा प्रतिपाळ करावयासी । तुजहून आन पैं नाहीं ॥२६॥
ब्रह्मा तुझे पोटींचें बाळ । इंद्रादि किंकरें प्रबळ ।
तुझी आज्ञा वंदी काळ । तूं दीनदयाळ श्रीरामा ॥२७॥
करितोसी अश्वमेध यज्ञ । यदर्थी अशक्य नाहीं जाण ।
परी विचारिजे कार्यकारण । जीवा पीडण होय बहुत ॥२८॥
पृथ्वीतळींचे नृपवर । तयांसीं संग्राम करितां घोर ।
जीवमात्राची हिंसा अपार । यज्ञ करितां होईल ॥२९॥
अमृतोपम भरताचें वचन । ऐकोनियां धरणिजारमण ।
हांसोनि बोलता झाला आपण । स्वधर्मपाळण उत्तम जें ॥३०॥
भला भला राया भरता । तुजहूनि आन न देखें ज्ञाता ।
अश्वमेश करणें सर्वथा । माझ्या चित्ता गमतसे ॥३१॥
दंडकारण्यीं लंकाभवनीं । अगणित राक्षस पडिले रणीं ।
तया पापाची करावया खंडणी । अश्वमेध यज्ञीं प्रवर्तावें ॥३२॥
पूर्वी देवेंद्र वृत्रासुर मारिला । ब्रह्महत्येचा डाग बैसला ।
अश्वमेध यज्ञ करिता झाला । पवित्र इंद्र तिहीं लोकीं ॥३३॥
श्रीरामभरतांचें वचन । ऐकोनियां लक्ष्मण ।
बोलता झाला सुखसंपन्न । वृत्राख्यान सविस्तर ॥३४॥
लक्ष्मण म्हणे बंधूंसी । पूर्वील इतिहास तुम्हांपासीं ।
सांगतसें विस्तारेसीं । निजधर्मासी संरक्षण ॥३५॥

वृत्रासुराची कथा :

वृत्रासुर यातीचा ब्राह्मण । तीन शत योजनें शरीर उंच जाण ।
आडवें शतयोजन प्रमाण । लंबायमान दीर्घ जें ॥३६॥
ऐसा वृत्रासुर दीर्घशरीरी । परी स्वधर्में प्रजापाळण करी ।
अधर्म नाहीं राज्याभीतरीं । दीना कैवारी कृपाळु ॥३७॥
यथाकाळीं वर्षे पर्जन्य । पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण ।
उदक सरोवरीं निर्मळ जाण । न आटे कदाकल्पांतीं ॥३८॥
राज्य करितां वृत्रासुरासी । कोणे एके काळीं अनुताप त्यासी ।
उपजोनियां निजराज्यासीं । पुत्र अधिकारी पैं केला ॥३९॥
तया पुत्राचें नाम मधुरेश्वर । अत्यंत तपी सज्ञान धर्मिष्ठ चतुर ।
राज्यीं स्थापोन तो निजकुमार । आपण तपा निघाला ॥४०॥
उत्तम तप करुन । जिंतीन मी देवसदन ।
ऐसें कल्पोनियां वना प्रयाण । करिता झाला वृत्रासुर ॥४१॥
वनीं करोनि उग्र तपासी । हाहाभूत इंद्र अमरगणेंसीं ।
चिंतातुर होवोनि मानसीं । काय करिता पैं झाला ॥४२॥
सकळ सुरांसहित । इंद्र आला विष्णू जेथ ।
तयासि करोनि दंडवत । हात जोडोनि उभा ठेला ॥४३॥
इंद्र म्हणे विष्णूसी । कृपाळुवा वाक्य परियेसीं ।
वृत्रासुर दैत्यवंशीं । उग्र तप करितसे ॥४४॥
तयाचे तपेंकरुन । हाहाभूत अमरगण ।
तेणें वश केले भूमंडळींचे जन । स्वर्गलोक घेऊं पाहतो ॥४५॥
तप करोनि उत्कृष्ट । प्राणिजना होताती कष्ट ।
मजहि पडलें भयसंकट । निवारिता श्रेष्ठ आहेसि तूं ॥४६॥
संसारभवगजापासून । सोडविता तूं जनार्दन ।
आणि उच्चारितां नामस्मरण । पातक भग्न होतसे ॥४७॥
तुझ्या भृकुटीचेनि प्रभावें । उत्पत्ति स्थिती होय स्वभावें ।
त्रैलोक्य उदरीं धरिलें देवें । थोर उदर करोनी ॥४८॥
तूं निर्गुण निराकार । निष्कर्म निरुपचार ।
अज अव्यय अक्षर । श्रुतीसी पार न कळे तुझा ॥४९॥
या भूतसृष्टीची चिंता । तुजचि असे गा जगन्नाथा ।
आम्हां देवां तूंचि स्थापिता । उच्छेदितां तूंचि पैं ॥५०॥
वृत्रवधाचिया कारणें । तुवां साह्य व्हावें जनार्दनें ।
ऐसीं करुणेचीं ऐकोनि वचनें । करुणाघनें पाहिलें ॥५१॥
सकळ देवांसहवर्तमान । इंद्राप्रति श्रीनारायण ।
बोलता झाला मधुर वचन । सावधान अवधारा ॥५२॥
विष्णू म्हणे देवांसी । माझा भक्त वृत्रासूर निश्चयेसीं ।
माझे हस्तें मृत्यु नाहीं जाण त्यासी । परी उपायासी सांगेन ॥५३॥
इंद्रहस्तें होय मृत्यु । ऐसा उपाय करीन सत्य ।
माझें सामर्थ्य जें गुणातीत । त्याचा त्रिधा भाग करिन ॥५४॥
एक अंश शरीरीं । दुसरा अंश वज्राभीतरीं ।
तीसरा अंश पृथ्वीवरी । ये प्रकारीं विभागीन शक्ति ॥५५॥
वृत्रवधालागून । मी त्रिधा होतों जाण ।
परी इंद्राचे हातें पावेंल मरण । मी न मारींच तयातें ॥५६॥

इंद्र-वृत्राचे युद्ध :

ऐसें ऐकोनि विष्णूचें वचन । वृत्रवधालागीं सिद्ध सुरगण ।
सकळांसहित इंद्र आपण । युद्धालागून प्रवर्तला ॥५७॥
पर्वतारीनें वज्र घेवोनि करीं । जेथें वृत्र तप करी तेथवरी ।
येवोनि युद्धा पाचारिला वैरी । येरू गजरीं निघाला ॥५८॥
इंद्र आणि वृत्रासुर । युद्ध करिती घोरंदर ।
स्वर्गीं सकळ सुरवर । कौतुक पाहती दोघांचें ॥५९॥
दोघें झुंजती उसण्याघायीं । एक्मेकांसी लोटती पाहीं ।
इंद्र वज्र घेवोनि ते समयीं । शिर दैत्याचें तोडिलें ॥६०॥
दैत्य पडोनि धरणीवरी । जैसा स्वर्गीचा कोसळला गिरी ।
रुधिर वाहे प्रवाह भारी । नदीसारिखा लोटला ॥६१॥
ऐसा होतां वृत्रासुरवध । झाला सकळांसी आनंद ।
परी इंद्रासी ब्रह्महत्येचा बाध । अति विरुद्ध लागला ॥६२॥
हीन दीन गेली कळा । मुकला वीर्यशौर्यमहाबळा ।
म्हणे ब्रह्महत्या आली माझिये कपाळा । थोर अवकळा इंद्रासी ॥६३॥
देशींचा गेला पर्जन्य । बहुकाळ पडिलें अवर्षण ।
भूतगणांसी न मिळे अन्न । प्राणिगण मरतें झाले ॥६४॥
इंद्र चंद्र पदापासून । च्यवोनि झाले अति दीन ।
सकळही सुरवर मिळोन । श्रीजनार्दन प्रार्थिला ॥६५॥
देव म्हणती पुरुषोत्तमा । तुझेनि वरदें वधिलें अधमा ।
परी ब्रह्महत्या लागली न सोडी कर्मा । इंद्रालागीं स्वामिया ॥६६॥
इंद्र तंव निमित्तधारी । सृष्टींचा प्रतिपाळ तुझा तूंचि करीं ।
तूंचि एक चराचरीं । त्रैलोक्यासी आधार ॥६७॥
इंद्र ब्रह्महत्येपासून । सोडवावा कृपा करुन ।
ऐसें देवांचें ऐकोनि वचन । काय करिता जाहला विष्णु ॥६८॥

ब्रह्महत्यादोषनिवारणार्थ अश्वमेध :

विष्णु म्हणे देवांसी । ब्रह्महत्या नासे त्या उपायासी ।
इंद्रें करावें अश्वमेधासी । मजप्रीत्यर्थ जाण पां ॥६९॥
मजप्रीत्यर्थ करील यज्ञ । तरी पावेल निजस्थान ।
ब्रह्महत्येचें होईल दहन । पुण्यवान तिहीं लोकीं ॥७०॥
ऐकोनियां विष्णूचें वचन । सकळ सुरवर मिळोन ।
जेथें इंद्र होता आपण । तया वना पातले ॥७१॥
देवीं शचीपति देखिला कैसा । हीन दीन पिशाच जैसा ।
इंरा सावध करोनि सहसा । अमरावतीये आणिला ॥७२॥
इंद्र आणोनि अमरावतीसी । देवीं करोनि अश्वमेधासी ।
यज्ञ संपविलिया समयासी । ब्रह्महत्या पुढें उभी राहिली ॥७३॥
ब्रह्महत्या म्हणे देव हो । मज कोठें वस्तीसी नेमिला ठावो ।
मीं इंद्रा सोडूनि कोठें राहों । कोणकोणत्या स्थळाप्रती ॥७४॥
देव म्हणती ब्रह्महत्येसी । तुवां व्हावें चतुर्भागेंसीं ।
मग विभागिते झाले देव ऋषी । तें सर्वही अवधारा ॥७५॥
चतुर्मासीं पडे पर्जन्य । तेणें नदी उंचबळे पूर्ण ।
तें जाण तुझें राहतें स्थान । दुसरें स्थळ अवधारीं ॥७६॥
तारुण्ययौवनें मुसमुसीं कांता । तेथें त्वां रहावें दिनत्रय सर्वथा ।
रजोदर्शनीं ब्रह्महत्या । दुसरा ठाव हा तुझा ॥७७॥
तुसरे वस्तीचें स्थान । भूमीवरी उखिरडीं राहून ।
सर्वकाळीं सर्वदेशीं जाण । भूमि सोडून नव जावें ॥७८॥
चवथी वस्ती पापिष्ठांचें ठायीं । जे कां विमुख नामीं पाहीं ।
नरदेहा येवोनि भुललें विषयीं । सर्व काळ वस्ती तेथें तुझी ॥७९॥
ऐसी ब्रह्महत्या चहूं प्रकारीं । वांटोनियां सुरवरीं ।
इंद्रासि करोनि राज्याधिकारी । अमरावतीसी स्थापिला ॥८०॥
शैलारी अमरपदीं विराजमान । राज्य करी सुखसंपन्न ।
पुढे वर्तलें तें कथानुसंधान । श्रोते जन अवधारा ॥८१॥
एका जनार्दना शरण । इंद्रासी देवोनि इंद्रासन ।
देव झाले स्वानंदें पूर्ण । पुढील चरित्र गोड असे ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वृत्रासुरवधो नाम त्रिषष्टितमोऽध्यायः ॥६३॥ ओंव्या ॥८२॥

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED