रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 67 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 67

अध्याय 67

भरत-शत्रुघ्न

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लहूला पकडून नेल्यामुळे जानकीचा खेद :

शत्रुघ्न घेवोनि गेला लहुया । बांधोनि जानकीच्या कनिष्ठ तनया ।
ऐसें ऐकोनि जनकतनया । शोकार्णवीं बुडाली ॥१॥
ऋषिकुमर सांगती सीते । लहूनें युद्ध केलें पुरुषार्थे ।
संतोषविलें पितृव्यातें । आपुलेनि भुजबळें ॥२॥
शेवटीं बंधन पावूनी । आम्हांदेखता रथीं वाहूनी ।
पुत्र नेला वो सुलक्षणी । ऐकोनि विकळ सुंदरी ॥३॥
मूर्च्छा सांवरोनि ते अवसरीं । जानकी शोकातें आदरी ।
कपाळ पिटी निजकरीं । धावें त्रिपुरारी आकांतीं ये ॥४॥
धरणिजा म्हणे ऋषि ताता । मी काय करुं जी आतां ।
वेगीं सोडवा माझ्या सुता । पुत्रदानता करावी ॥५॥
माझा वनवासींचा सांगती । याचेनि होतें वनाप्रती ।
काय कोपला शैलजापती । आतां सांगू कणवातें ॥६॥
येरे माझ्या लहुवा बाळा । गोजिरिया रे वेल्हाळा ।
सुंदरा डोळसा कुशळा । परदेशींचिया सांगात्या ॥७॥
सहोदर सोडोनि आपुला । खेळावया लहु कोठें गेला ।
अथवा संग्राम करितां एकला । तुज वैरियें साधिलें ॥८॥
पाठीसी न देखतां सहोदर । तुज कोप आला थोर ।
तेणें वैरियासी मारितां मार । भागलासी पुत्रराया ॥९॥
आतां मेळवा माझें वासरूं । तयावीण न धरवे धीरू ।
ऐकोनि वाल्मीकासी गहिंवरू । ऋषिभार्या गजबजिल्या ॥१०॥
इतुकें बोलतां रावणारीची पत्नी । तेणें दुःखें फुटों पाहे अवनी ।
ऐसें ऐकोनि ऋषि मुनी । थोर दुःखा पावले ॥११॥

मुनींचे सीतेला आश्वासन :

मुनी म्हणे रघुराज कांते । सर्वथा भय नाहीं त्यातें ।
कुश येवोनि त्या सैन्यातें । जिंकोनि बंधु सोडवील ॥१२॥
पितृव्यातें बांधोन । तुझे लहुकुश येतील जाण ।
आणि समस्त रायां गळबंधन । करितील जाण पुत्र तुझे ॥१३॥
पूर्वी मी वदलों भविष्य । मानीं माझ्या शब्दाचा विश्वास ।
हे निधडे जाण पुरुष । बाळक यातें म्हणो नये ॥१४॥
सत्य जाण दूषणारिप्रिये । सूर्यवंशींचे निधडे वीर हे ।
यांचिये पुरुषार्थाची उपमा नये । आणिकसी देतां हो ॥१५॥

कुशाचे आगमन व त्याची प्रतिज्ञा :

इतुकें बोलतां वाल्मीकी । तंव कुश आला आश्रमाचें तटाकीं ।
त्यातें देखोनियां जानकी । दुर्घट दुःख सांगत ॥१६॥
अरे कुश लहुवातें । बांधोनि नेले शत्रुघ्नभरतें ।
रथीं वाहोनियां अयोध्यापथें । गमन केलें दोघीं जणीं ॥१७॥
कुशा आतां काय करुं । कोण सोडवील माझें वासरूं ।
केव्हा देखोन निज कुमरू । रणरंगधीर संग्रामीचा ॥१८॥
ऐकोनि लहुवाचे हरण । तेव्हांच माझा त्यासवें प्राण ।
गेला कुशा सत्य जाण । नाहीं अनमान येविषयीं ॥१९॥
करुन ऐओकोनि मातेची । कुशें गुढी उभविली प्रतापाची ।
म्हणे माते चिंते लहुवाची । तुजकारणें पैं नलगे ॥२०॥
पाताळा नेला असेल बाळू । तरी सोडवीन शेषाची मर्दोनि टाळू ।
नाहीं तरी हा अवघा भूगोळू । पालथा करीन जननिये ॥२१॥
शोषीन अब्धीचें पाणी । आकाश पाडीन खोंचोनी ।
नातरी प्रयळकाळींचा वन्हीं । शीतळ करीन क्षणार्धे ॥२२॥
मेरु उपडीन भुजबळें । शोधीन सप्त द्वीप कुळाचळें ।
घरधांडोळी घेवोनि पाताळें । नागकुळें मारीन ॥२३॥
वैकुंठ कैलास सत्यलोक । भूमंडळ शोधीन सम्यक ।
दिक्पालादि स्वर्ग लोक । दमीन त्रैलोक्य निमेषार्धें ॥२४॥
घेवोनि येईन तुझा कुमरु । तरीच मी सूर्यवंशींचा वीरु ।
सत्य असेल श्रीगुरु । माझिया मस्तकावरी ॥२५॥
तेथें कायसें रावणारीचें सैन्य । एके बाण सर्व खिळीन ।
जीत बांधोनि भरतशत्रुघ्न । सहलक्ष्मण हनुमंतेसीं ॥२६॥
म्हणोनि वंदिले मातेचे चरण । श्रीगुरुसी करोनि साष्टांग नमन ।
मग प्रदक्षिणा दोघां करुन । आज्ञा मातेसी पुसतसे ॥२७॥
जनकजा म्हणे कुशासी । जीवें न मारावें रामसैन्याचे वीरांसी ।
धरुन आणावें थोरथोरांसी । वारुवापासीं बांधावें ॥२८॥

मातेला वंदन करुन कुश युद्धार्थ निघाला :

आशीर्वाद घेवोनि निघाला । सिंहनादें गर्जिन्नला ।
बाण धनुष्यीं चढविला । अंगीं बाणला पुरुषार्थ ॥२९॥
चालतां पुढारां पाउलें । शीघ्र रणभूमीसी गांठिलें ।
तंव एके रथीं बंधूसी देखिलें । भरत शत्रुघ्नेंसीं ॥३०॥
तेचि रथीं लहु वीर । कुशास देखोनि आनंद थोर ।
म्हणे सोंडवूं आला दादोजी सत्वर । हर्ष न माये पृथ्वीवरी ॥३१॥
कुशें लहुवा बंधनेंसीं । देखियेला पितृव्याचे रथासीं ।
क्रोधें भडका उठला मानसीं । सृष्टि निर्दाळीन म्हणे आतांचि ॥३२॥
क्रोध कुशाचा देखोन । भेणें कांपे त्रिनयन ।
भयभीत श्रीजनार्दन । ब्रह्मादि देवगणां चळकांप ॥३३॥
कीं गजावरी केसरी । कीं तमावरी जैसा तमारी ।
कीं स्तंभीं प्रकटे हरिण्यकश्यापारी । तयेपरी कुश शोभे ॥३४॥
कीं आकाशसुत मेघपटळा । कीं दितिसुतावरी मेघ सांवळा ।
कीं कद्रुसुतावरी प्रताप आगळा । मिरवी जैसा विनताबाळ ॥३५॥
कीं प्रळयकाळीं दक्षजामात । सृष्टीचा संहार करीत ।
तैसा शक्राजितारिअग्रजाचा सुत । वेगवंत रणमंडळीं ॥३६॥
हातीं घेवोनि धनुष्यबाण । जैसा चाले पंचानन ।
हृदयीं श्रीगुरु स्मरोन । मग शत्रुघ्न पाचारिला ॥३७॥

शत्रुघ्नाला आव्हान :

अरे कैकेयीच्या लघु बाळा । प्रताप दावोनि आगळा ।
संतोषविलें अग्रजा आणि दळा । आतां मजसीं कुशळ युद्ध करीं ॥३८॥
बांधोनि माझा सहोदर । तुज झाला जैतबडिवार ।
तुमचा पूर्वापार विचार । तुम्हीं नाहीं आयकिला ॥३९॥
श्रीरामाकारणें झालेति योगी । श्रीरामालागीं झालेति वीतरागी ।
आतां आलेति युद्धालगीं । हें अपूर्व वाटतें ॥४०॥
तुम्हीं करावें अनुष्ठान । तुम्हीं करावें तपःसाधन ।
आतां धरोनि आंगवण । युद्ध दारुण करुं आलेती ॥४१॥
श्रीरामाकारणें सोडूनि राज्यभोग । तुम्हीं नंदिग्रामीं साधिला योग ।
मस्तकीं जटा धरोनि ऋषिमार्ग । आश्रयोनि होतेती ॥४२॥
आतां संग्रामाच्या चाडा । युद्ध करूं आलेति पुढां ।
श्रीरामकटकीं दुकाळ गाढा । महावीरांचा पडिला हो ॥४३॥
कोणी न दिसे वीर झुंझार । तुम्ही नावानिगे परम शूर ।
म्हनोनि धाडी श्रीरामचंद्र । युद्धाकरणे तुम्हांतें ॥४४॥
जानकीचा ज्येष्ठ कुमर । शत्रुघ्नासी होवोनि समोर ।
काय बोलतसे उत्तर । सावधान अवधारा ॥४५॥
उणें आलें तुझिया नामासीं । तुवां संग्राम केला कोणासीं ।
आतां साहें माझ्या बाणासी । म्हणोनि शरासी सोडिलें ॥४६॥

लवकुशांनीं भरत-शत्रुघ्नांना पकडून नेले :

नारायणास्त्र जानकीकुमरें । बीजाक्षरें जपोनि सोडिलें त्वरें ।
सर्व सैन्यीं नारायण अवतरे । दशदिशां भरे चतुर्भुज ॥४७॥
नारायण धरित्रीं पाताळीं । नारायण आकाशीं अंतराळीं ।
नारायण नभोमंडळीं । कुळाचळीं नारायण ॥४८॥
सैन्य अवघें नारायणें । व्यापिलें देखोनि शत्रुघ्नें ।
गजबजोनियां मनें । संग्राम करुं विसरला ॥४९॥
जैसा एकादा प्राणी । स्वप्नीं तस्कर देखे नयनीं ।
जागृत जंव होय उठोनी । तंव घरभरी तस्कर देखिजे ॥५०॥
तैसें झालें शत्रुघ्ना । नारायणरुप देखोनि मना ।
विस्मयो झाला अंतःकरणा । संग्राम करुं विसरला ॥५१॥
सवेंचि कुशें परम सत्वर । बाणीं विंधोनि पाडिला कैकेसीकुमर ।
चरणीं धरोनि बांधिला वीर । रथातळीं उतरविला ॥५२॥
रथ मोडिला चपेटघातें । लहुवा सोडोनि घेतला तेथें ।
सवेंचि पाचारिलें भरतातें । तुम्हीं यावें संग्रामा ॥५३॥
कुश म्हणे भरतातें । तुम्हीं पादुका पूजाव्या घरातें ।
अथवा परभारें नंदीग्रामतें । अनुष्ठानालागीं जावें ॥५४॥
वचन ऐकोनि भरतें तेच क्षणीं । क्रोधें प्रज्वळिला जैसा वन्ही ।
म्हणे बाळका समरांगणीं । माझा शर साहें रे ॥५५॥
तूं तरी बाळकाकार । माथेचा वाळला नाहीं जार ।
आतां साहें माझा शर । नाहीं तरी ऋषीस शरण जावें ॥५६॥
मग टाकिला काळदंड । एकचि बाण परी झाले उदंड ।
रावणारिकुमर साधक वितंड । वरच्यावरी तोडिले ॥५७॥
लहुवाअग्रजें वीरें कुशें । घातले शरांचे फांसे ।
रामानुज कासाविसें । संग्राम करुं विसरला ॥५८॥
भरत भुलला रणीं । मागेपुढें पाठीराखा न दिसे कोणी ।
तंव अवचितें कुशें बांधोनी । रथातळीं पडिला ॥५९॥
दोघे बांधोनियां रणीं । परतला निजाश्रमालागोनी ।
भरत शत्रुघ्न एकत्र दोन्ही । ऐसे आणिले ऋषिआश्रमा ॥६०॥
बांधोनि खरदूषणारीचे अनुज । मातेची सत्य करोनि पैज ।
दोघे संतोषें रामात्मज । आश्रमा उजू पैं आले ॥६१॥
सवें दोघे भरत शत्रुघ्न । एके रथीं बांधिले जाण ।
सीतेनें दुरोन देखोन । ऋषीप्रति बोलाली ॥६२॥
धरणिजा म्हणो अहो ऋषी । दोघे नाणावे माझ्या दृष्टीसीं ।
मज देखोनि लाजें प्राणांसी । त्याग करितील निश्चयें ॥६३॥
मग ऋषीनें शिष्या खुणविले । कर्दळीवनासी पाठविले ।
जेथें असे अश्व बांधले । तेथें दोघें राखावे ॥६४॥
जानकीकुमर विजयीं रणीं । दोघे आले गुरुदर्शनीं ।
साष्टांगें नमस्कारुनि मुनी । मग मातेसी वंदिलें ॥६५॥
मातेनें करोनि निंबलोण । धन धान्य ओंवाळून ।
दोघां हृदयीं आलिंगून । समाधान पावली ॥६६॥
पुढील कथा अति रसाळ । श्रवण करितां मुखा येतसे लाळ ।
मनाची जिव्हा करी तळमळ । युद्ध तुंबळ करुं इच्छी ॥६७॥
पुढें पित्यापुत्रां होईल रण । असंभाव्य अति दारुण ।
तेथे श्रोते हो व्हावें सावधान । रामायण अति गोड ॥६८॥
वाल्मीकाचीं वाग्रत्नें । तीं प्राप्त केलीं जनार्दनें ।
एक जनार्दनाचें तान्हें । संतांचें पोसणें म्हणोनी ॥६९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
भरतशत्रुघ्नबंधनं नाम सप्तषष्टितमोऽध्यायः ॥६७॥ ओंव्या ॥६९॥