अध्याय 75
लक्ष्मणाचे पाताललोकी गमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
निजपुत्रांसि स्थापोनि सिंधुप्रदेशीं । भरत निघाला श्रीरामभेटीसी ।
येवोनियां अयोध्येसी । अग्रजासी वंदिलें ॥१॥
सांगितला सविस्तर वृत्तांत । एइकोनि संतोषला श्रीरघुनाथ ।
चंद्रा देखोनि उचंबळत । क्षीरार्णव जैसा हा ॥२॥
उदित होतां दिनकर । कुमुदिनी उल्हासे थोर ।
भरत भेटलिया श्रीरघुवीर । आनंदातें पावला ॥३॥
अरुणानुजें अमरावतिये । अमृतहरणीं पावला जय ।
तेणें वंदिली विनता माय । तैसा भरत भेटला ॥४॥
याउपरी काय वर्तलें । तें श्रोतीं पाहिजे परिसिलें ।
तेंचि आतां वक्तियां वहिलें । सांगों आदरिलें श्रीरामकथे ॥५॥
उभौ कुमारौ सौमित्रे तव धर्मविशारदौ ।
अंगदश्चंद्रकेतुश्च समर्थौ दृढध्न्विनौ ॥१॥
इमौ राज्येऽभिषेक्ष्यामि देशः साधु विधीयताम् ।
रमणीयो ह्यसंबाधो रमेतां यत्र धन्विनौ ॥२॥
न राज्ञां यत्र पीडा स्यात् न चैवाश्रमवासिनाम् ।
स देशो दृश्यतां सौम्य नापराध्यामहे यथा ॥३॥
लक्ष्मणपुत्रांना राज्य देण्याची रामांची सूचना :
श्रीराम म्हणे ते काळीं । हे सुमित्रात्मज आतुर्बळी ।
धार्मिक सुशीलता आगळी । धनुर्विद्या पै यांची ॥६॥
नामें अंगद चंद्रकेत । पितयासारिखा पुरुषार्थ ।
अति समर्थ बळवंत । दोघे अश्विनीकुमार जैसे ॥७॥
यांतें उत्तम देश पाहूनी । दोघे स्थापावे दों स्थानीं ।
माझे दृष्टीपुढें अभिषिंचूनी । राज्य दोघां पैं द्यावें ॥८॥
उत्तम देश उत्तम स्थानीं । थरत लक्ष्मण हो स्थापा दोनी ।
जेथें सुभिक्षं सुकाळ अनुदिनीं । ज्या प्रांतीं मुनि सिद्ध असती ॥९॥
ऐसें उत्तम राष्ट्र पाहोन । तेथे स्थापावे सौमित्रनंदन ।
ऐसे बोलिला श्रीरघुनंदन । तें भरतें परिसिलें हो ॥१०॥
हो जी म्हणोनि दयाळा । कैकेयीकुमर तये वेळां ।
बोलता झाला तया काळा । तें परिसावें सावधानें ॥११॥
तथोक्तवति रामे तु भरतः प्रत्युवाच ह ।
अयं कारुपथोद्देशे रमणीयो निरामयः ॥४॥
निवेश्यतां तत्र प्रं अंगदस्य महात्मनः ।
चंद्रकेतोश्च सुदिरं चंद्रकांतं निरामयम् ॥५॥
तद्वाक्यं भरतेनोक्तं प्रतिजग्राह राघव ।
तंच कृत्वा वशे देशं अंगदस्य न्येवेशयत् ॥६॥
अंगदीया पुरी रम्यां ह्यंगदस्य निवेशिता ।
रमणीया सुगुप्ता च रामेणाकिष्टकर्मणा ॥७॥
चंद्रकेतोश्च मल्लस्य मल्लभूम्यां निवेशिता ।
चंद्रकांतेति विख्याता दिव्या स्वर्गपुरी यथा ॥८॥
अंगदपुरी व चंद्रावतीची स्थापना :
ऐसें श्रीराम बोलिल्यावरी । भरत म्हणेतें अवसरीं ।
उत्तम देश उत्तरेच्या पारीं । विचारिलासें राजेंद्रा ॥१२॥
ज्वालामुखी नगरकोट । चीन महाचीन भोट ।
आणि मानससरोवताचें तट । समीप असे राजेंद्रा ॥१४॥
तया देशाचे ठायीं । उत्तम नदी गंगादि ।
आणिकही शरयू मंदाकिनीही । तेचि प्रांतीं आहेत जी ॥१५॥
तेथें स्थापावा अंगदकुमर । त्याचेनि नामें वसवूं नगर ।
हे एकोनि श्रीरघुवीर । म्हणे भलें विचारिलें भरता ॥१६॥
जें भरता तुवां विचारिलें चित्तीं । तेंचि करीं मांड्वीपती ।
अंगदपुत्रातें अंगदपुप्रती । अभिषिंचून स्थापावें ॥१७॥
चंद्रकेत ऊर्मित्लाकुमर । जो कां बलाढ्य महावीर ।
चंद्रावती नामें नगर । वासवोनि त्यातें राज्य घ्यावें ॥१८॥
चंद्रावतीनामें नगरी । वसवीं जैसी अमरपुरी ।
ऐसी आज्ञा भरतें शिरीं । सौमित्रासहित वंदिली ॥१९॥
दोघां पुत्रां अभिषिंचून । सवें घेवोनि अनेक सौन्य ।
अंगद पुढारां करून । लक्ष्मण वीर निघाला ॥२०॥
चंद्रकेतूसी धरोनि करीं । भरत निघे ते अवसरीं ।
चंद्रावतीनामें पुरी । उत्तरदिशे वसविली ॥२१॥
तेथीं स्थपोनि चंकेत । वर्षपर्यंत रहिला भरत ।
रजे करोनि आज्ञांकित ।सुनिश्चित राज्य केलें ॥२२॥
सबळ देखोनि चंद्रकेत । श्रीरामभेटी निघला भरत ।
अभिषिक्त सुमित्रासुत । तेथें स्थापिता झाला ॥२३॥
अंगद नामें वसवोनि पुर । तेथे स्थपिला अंगद वीर् ।
लक्ष्मण राहोनि एक संवत्सर । पुत्राचिया पै राज्यी ॥२४॥
अंगद देखोनि प्रतापें पुरा । संतोष झाला लक्ष्मणावीरा ।
तेथोनि चालिला श्रीरघुवीरा । भेटावयाकारणें ॥२५॥
लक्ष्मण भेटला श्रीरामासी । निरूपिलें सर्व वृत्तांतासी ।
सवेंचि भरतें अग्रजासी । येवोनियां नमस्करिलें ॥२६॥
जाणविला सर्व वृत्तांत । ऐकोनि तोषला श्रीरघुनाथ ।
दोघां बंधूंसी आलिंगित । उल्हस चिंत्ती न समाये ॥२७॥
भरत आणि लक्ष्मण । श्रीरामसेवें सुखसंपन्न ।
असतां कित्येक वर्षे क्रमोन । बहुकाळ लोटला ॥२८॥
चौघे बंधु अति प्रीती । स्वधर्मे करती राजनीती ।
अधर्म व्दंव्द देशाप्रती । जन नेणती स्वप्नींही ॥२९॥
घरोघरी नित्य नवा सोहळा । दरिद्र नेणतीकोण काळा ।
सुखस्वानंद लोकां सकळां । राज्यीं असतां श्रीराम ॥३०॥
ततः काले तु कस्मिश्चित् रामे धर्पमरे स्थिते ।
कालस्तापसरूपेना रामं द्रष्टुमुपागतः ॥९॥
सोऽब्रवील्लक्ष्मणं वाक्यं धृतिमंतं मनस्विनम् ।
निवेदयस्व रामाय संप्राप्तं कार्यगौरवात् ॥१०॥
दूतो ह्यतिबलस्याह्ं महर्षेरमितौजसः ।
दिक्षुरागतो रामं त्वरितं मां निवेदय ॥११॥
तस्य तदचनं श्रुत्वा सौमित्रिस्त्वरयान्वितः ।
आचचक्षे स रामाय तं संप्राप्तं तपोधनम् ॥१२॥
रामदर्शनार्थ दूताचे आगमन :
श्रीराम स्वधर्मस्थिती । रत असतां व्दारीं लक्ष्मणाप्रती ।
दूत येवोनि निजस्थिती । सांगता झाला ते समयीं ॥३१॥
श्रीरामदर्शनालागून । येथें झालें माझें आगमन ।
आणिक असे कार्याकारण । मी बळवान पैं आलों ॥३२॥
मी तापसी बुध्दिमंत । श्रीरामभेटीचें परम आर्त ।
लक्ष्मणा जाणवावी मात । श्रीरघूत्तमरायासी ॥३३॥
मी आलों असे कार्याथीं । लक्ष्मणा जाण निश्चितीं ।
मात जाणवीं श्रीरघुपती । जेथें असेल तेथें जाईं ॥३४॥
ऐसें मुनीचेनि मुखनिळें । वचन परिसोनि सुमित्राबाळें ।
शीघ्रवत चालिला जेथें भूपाळें । श्रीरामचंद्रें असिजे ॥३५॥
प्रणिपात करोनि श्रीरघुपतीसी । जाणविले सर्व वृत्तांतासी ।
व्दारीं दूत तुमचे भेटीसी । तिष्ठतसे राजेंद्रा ॥३६॥
धरोनियां मुनीचा वेष । व्दारीं तिष्ठतसे तापस ।
तुमच्या दर्शनाची आस । पहातसे श्रीरामा ॥३७॥
सौमित्र ऐसें बोलिल्यावरी । ऐकोनि श्रीराम आज्ञा करी ।
म्हणे जावोनि झडकरी । दूत पाचारीं भेटीसी ॥३८॥
अग्रमुखींचें होता वचन । परिसोनि सुमित्रानंदन ।
वेगीं व्दारासी येऊन । भीतरीं दूतासि पैं नेलें ॥३९॥
तेजसा तपसा चैव ज्वलंतमिव पावकम् ।
सोऽभिगम्य नरश्रेष्ठं दीप्यमानं स्वतेजसा ॥१३॥
तो दूत म्हणजे साक्षात काळच होता :
तो दूत म्हणाला कैसा । कीं तेजाचा सूर्य जैसा ।
कीं तापसांमाजी सहसा । अग्नीसारिखा भासतसे ॥४०॥
आपुलिया प्रभेकरून । पुढें न्यून झाला तपन ।
ऐसा श्रीरामासंमुख येऊन ।श्रीरामें देखिलें तयातें ॥४१॥
परस्परें देवोनि आलिंगन । कुशल उभयतां पुसोन ।
श्रीराम करिता झाला प्रश्र । कोठोनि येणें मुनिराजा ॥४२॥
कोणे कार्यालागूनि मुनी ।आलेति मज कृपा करोनी ।
जीवींचें सांगावें वचनीं । आलेति कोठोनि द्विजवर्या ॥४३॥
मृदु मंजुळ श्रीरामवाणी । परिसोनि बोलता झाला मुनी ।
म्हणे राया ज्या कर्यालागूनी । आलों असें महापुरुषा ॥४४॥
तें गुह्य आहे कथन । एकांतीं करावें श्रवण ।
ऐसें ऐकोनि रघुनंदन । सौमित्रा आज्ञापिता जाहला ॥४५॥
द्वारे तिष्ठ महाबाहो प्रतिहारं विसर्जय ।
स मे वध्यः खलु भवेदाच्यं वां शृणुयाच्च यः ॥१४॥
द्वाररक्षक म्हणून लक्ष्मणाची योजना :
द्वारीं बैसोनि लक्ष्मणा । पुरुषांमाजी पंचानना ।
द्वरपाळां आज्ञापोनि सुजाणा । आपण तेथें बैसावें ॥४६॥
भीतरीं न येवों घ्यावें कोणी । आपण सावध बैसोनी ।
जंवपर्यंत हा मुनी । मजसीं संवाद करितसे ॥४७॥
मुनीची आज्ञा संवादकथा । एकांतीं बैसोनि करुं वार्ता ।
तंवपर्यंत सुमित्रासुता । कोणा भीतरीं येवों नेदीं ॥४८॥
द्वारीं बैसवोनि लक्ष्मण । मुनि आणि श्रीरधुनंदन ।
कथिते झाले पूर्वकथन । सावधानेंकरोनी ॥४९॥
शृणु राजन्यथा सत्यं यदर्थमहमागतः ।
अहं हि पूर्वके भावे पुत्रस्तव परंतप ।
पितामहेन देवेन प्रेषितोऽस्मि तवांतिकम् ॥१५॥
अहं हि पूर्वके भावो पुत्रस्तवः परंतप ।
मायासंभावितो वीरः कालः सर्वहर : परः ॥१६॥
पितामहस्त्वां भगवानाह लोकपतिः प्रभुः ।
समर्थस्ते महाराज लोकान्स परिरक्षितुम् ॥१७॥
काळाने ब्रह्मदेवाचा संदेश रामांना सांगितला :
सौमित्र बैसोनि महाद्वारीं । श्रीराम आणि मुनि भीतरीं ।
विचार करिते झाले ते अवसरीं । शैलारि गुरुसीं जैसा ॥५०॥
काळपुरुष म्हणे राजचूडामणी । भी आलों ज्या कार्यालागूनि ।
तें सत्य जाणा आपुलें मनीं । विचारोनी विवेकें ॥५१॥
त्रैलोक्यपिता चतुरानन । मज पाठविलें तेणें जाण ।
तुजपासीं तव्दचन । निवेदीन राजेंद्रा ॥५२॥
पूर्वीं मी तुझा पुत्र । महाराजा जाण सत्य ।
माझा पराक्रम अद्भुत । सावचित्त अवधारीं ।५३॥
काळ ऐसें माझें अभिधान । तूं काळात्मा जाण सनातन ।
काळानुसारें जैं प्राणिजन । तयांचा संहारकर्ता मी असें ॥५४॥
मी सूर्याचा निजकुमर । तूं सूर्यवंशींचा नृपवर ।
आणि सकळ सृष्टीचा ईश्वर । सर्जन पाळण संहार तूं कर्ता ॥५४॥
पितामह जो विधाता । तुज पूजितो श्रीरधुनाथा ।
आणि देवगुरुजी समर्था । ध्येय तूं म्हणोनियां ॥५६॥
ब्रह्मादिकांचा जो ईश । तो तूं श्रीराम परमपुरुष ।
तुझिये मायेचा विलास । अनंत ब्रह्मांडें घडीमोडी ॥५७॥
जैसा ऊर्णाचा सूक्ष्मतंत । तया क्रीडे स्वेच्छभूत ।
खेळ सरलिया ग्रासित । तंतूतें पैं जैसा ॥५८॥
तैसा तुझे मायेची अपूर्वता । ब्रह्मांडादि रची भूतां ।
संहारकाळीं समर्था । तुजमाजी सामावे जग ॥५९॥
जैसा रवि जीमूतद्वारें । वार्षिकीं अपार वर्षे नीरें ।
ग्रीष्मीं शोषी किरणें थोरें । पसरोनियां पृथ्वीवरी ॥६०॥
तैसा अनंत ब्रह्मांडांचा ईश्वर । लीलेनें धरिला रामावतार ।
फ़ेडोनियां पृथ्वीचा भार । रावणादिक वधोनी ॥६१।
यापूर्वी मधकैटभासुर । शुंभ निशुंभ कोल्हासुर ।
लवणासुरादि थोर थोर । मारोनि सुर सुखी केलें ॥६२॥
अकरा सहस्र वर्षेपर्यंत । राज्य केलें स्वस्थचित्त ।
आतां समयीं वाट पाहत । स्वर्गी देव असती जी ॥६३॥
तुमच्या दर्शनाची उत्कंठा । थोर लागली नीळकंठा ।
चतुर्मुख जो स्रष्टा । तोही वाट पाहतसे ॥ ६४॥
इंद्रादि देव सुरगण । सिद्ध गंधर्व विद्याधर चारण ।
समस्त सुर मिळोन । विवंचना करिती भेटीची ॥६५॥
जरी राज्याची इच्छा असेल मनीं । तरी सुखें रहावें कोंदंडपाणी ।
स्वर्गीचे देव तुजवांचोनी । शोभत नाहींत महाराजा ॥६६॥
हा काळपर्यंत राजेश्वरा । हे पतिपाळिली वसुंधरा ।
आता स्वर्गी येवोनि किंकरां । निजदासातें तारावें ॥६७॥
सुरवरांच्या कार्यालागून । तुझे येथें झालें आगमन ।
ऐसें बोलोनि चतुरानन । विवंचन करीतसे ॥६८॥
ब्रह्मलोकी येण्याचे रामांचे काळाला आश्वासन :
ऐसें काळमुखींचें उत्तर । परिसोनियां श्रीरघुवीर ।
हास्य करोनियां स्थिर । दूतासि बोलता झाला ॥६९॥
श्रीराम म्हणे गा रविसुता । पराक्रमिया गुणवंता ।
तुवां जावोनियां विधाता । बरवेपरी बोधावा ॥७०॥
त्वरित जावें ब्रह्मलोकासी । ऐसें वसे माझे मानसीं ।
किंचित कार्यकर्तव्यासी । करणें आहे मजलागीं ॥७१॥
तें कार्य सेंपोदोनि जाण । अवश्य स्वर्गासि येईन ।
मी देवांचा आज्ञाधारक पूर्ण । चित्तासारिखा वर्तें ॥७२॥
रामदशनार्थ दुर्वासांचे आगमन, लक्ष्मणाचा प्रतिबंध, दुर्वास क्रोधाविष्ट :
तंव येरीकडे दुर्वासमुनी । महा व्दाराजवळी येऊनी ।
जेथें लक्ष्मण होता त्याप्रति वचनीं । बोलता झाला ते समयीं ॥७३॥
श्रीरामदर्शनालागून । सौमित्रा मी आलों जाण ।
वेगीं जाणीव जावोन । रघुनंदन जे स्थानीं ॥७४॥
दुर्वास एसें बोलिल्यावरी । लक्ष्मण म्हणे स्वामी क्षणभरी ।
स्थिर व्हावें रावणारी । भेटी येईल तुमचिये ॥७५॥
अवसर नाहीं श्रीरघुवीरा । एकांतीं करिती विचारा ।
तुम्ही बैसोनि क्षणैक धीर धरा । कृपा करा मजवरी ॥७६॥
एकांतीं श्रीराम आणि ऋषी । संवाद करिती परस्परेंंसीं ।
तेथें मज जातां कोप रामासी । क्षणामाजी येईल ॥७७॥
तुम्हीं नावेक स्वस्थ चित्त कीजे । उपरी भेटी देइजेल रघुराजें ।
ऐसे ऐकोनि अत्रितनुज । लक्ष्मणासी क्रोधें वदे ॥७८॥
तं श्रुत्वा मुनिशार्दूलः क्रोधेन कलुषीकृतः ।
उवाच लक्ष्मणं वाक्यं निर्दहन्निव चक्षुषा ॥१८॥
अस्मिन्क्षणे तु सौमित्रे रामं मा दर्शयिष्यसि ।
विषयं च पुरं चैतहहिष्ये राघवं तथा ॥१९॥
भरतं वा च सौमित्रें युष्माकं चैव संततिम् ॥२०॥
लक्ष्मणाचें वचन परिसोनी । उद्विग्न झाला दुर्वासमुनी ।
क्रोधें थरथरां कांपें मेदिनी । भरतें आलें तमाचें ॥७९॥
नेत्र करोनि आरक्त । हातें हात असे घांसित ।
दंतें ओष्ठ वाचित । गात्रें कांपत सक्रोध ॥८०॥
ऐकें सुमित्रानंदना । येच क्षणीं भेटवीं श्रीरघुनंदना ।
नाहीं तरी अयोध्याभुवना । क्षणामाजि जाळीन ॥८१॥
तदनंतर श्रीरघुनाथ । जाळीन तुजहीसमवेत ।
आणिकही शत्रुघ्न भरत । हेही दाहीन निमीषर्धें ॥८२॥
करीन ब्रह्मांडाची होळी । सूर्यवंश मेळवीन धुळी ।
पुत्रपौत्रांसहित ये काळीं । भस्म करीन श्रीरामा ॥८३॥
ऐसें दुर्वास बोलिल्यावरी । लक्ष्मण दीर्घ चिंता करी ।
म्हणे मरण दोहींपरी । मजलागीं ओढवलें ॥८४॥
येरीकडे अग्निमहाप्रळय । उभा एकीकडे शार्दूळ ।
तैसे मज झालें केवळ । ऋषि कोपें उभा असे ॥८५॥
श्रीरामा न जाणवितां मात । ऋषि करील भस्मीभूत ।
सूर्यवंश होईल शांत । ऐसा अनर्थ ओढवला ॥८६॥
गेलिया श्रीरामाजवळी । क्रोधें श्रीराम करील होळी ।
तरी मी एकलाचि महीतळीं । त्यागोनि स्वर्गा जाईन ॥८७॥
चुकलें सर्वांचें महाविघ्न । मी एकाकी पावेन मरण ।
ऐसा निश्चय करोनि नंदन । सुमित्रेचा निघाला ॥८८॥
लक्ष्मणाचे वृत्तनिवेदन व दुर्वासांचा सत्कार :
येवोनियां श्रीरामाजवळी । प्रणिपात करोनि बध्दांजळीं ।
जोडोनि कर ते काळीं । श्रीरामासि विनविता झाला ॥८५॥
लक्ष्मण म्हणे जी भूपाळा । व्दारीं दूर्वास तिष्ठत या काळा ।
तुमचे भेटी लागीं दयाळा । येवोनियां उभा असे ॥९०॥
अत्रिपुत्र दुर्वासमुनी । तिष्ठत दर्शनालागूनी ।
मज पाठविलें त्वरें करोनी । तुम्हां श्रुत करावया ॥९१॥
लक्ष्मण ऐसें बोलिल्यानंतरें । काळासि विसर्जोनि रघुवीरें ।
अर्ध्यपात्र घेवोनि करें । व्दाराजवळीं पै आला ॥९२॥
ऋषीस श्रीरामा झाली भेटी । आनंद न समाये सृष्टीं ।
मग पूजा करोनि जगजेठी । ऋषी भवनासी आणिले ॥९३॥
देवोनियां वरासन । श्रीराम करिता झाला विनवण ।
म्हणे स्वमी कृपा करुन । कोणीकडे आलेती ॥९४॥
काय अपूर्व वाटलें चित्ता । म्हणोनि आलेति ऋषिसमर्था ।
तें आज्ञापिजे मज रघुनाथा । कृपा करोनि मुनिराया ॥९५॥
दाशरथीचें ऐसें उत्तर । अमृताहूनि अधिक मधुर ।
एकोनि दुर्वास ऋषीश्र्वर । संतोष थोर पावला ॥९६॥
म्हणे श्रीरघुनंदना । धन्य रविवंशीं कुळभूषणा ।
मी मागों आलों भोजना । क्षुधातुर हावोनी ॥९७॥
क्षुधा बाधीत मज भारी । ऐसे जाण तूं नृपकेसरी ।
तंव श्रीराम म्हणे स्नान झडकरी । सारोनि भोजन करावें ॥९८॥
झालासे मध्यान्हसमयो । मग स्नान करोनि महाबाहो ।
संध्या करोनि वैश्वदेवो । देवपूजा संपादिली ॥९९॥
पंत्त्की दुर्वास बैसवोनी । भोजन सारिलें चौंघा जणीं ।
तांबूल देवोनि नाना आभरणीं । ऋषीश्वर पूजिला ॥१००॥
ऋषीश्वराचें झालें भोजन । वस्त्रें अलंकार भूषण ।
समर्पोनि श्रीरघुनंदनें । सुखासनीं बैसविला ॥१॥
श्रीराम सचिंत :
अवतारसमाप्तीचें कथनचरित्र । आठवोनि श्रीरघुनाथ ।
मुनि आज्ञापोनि त्वरित । चिंतातुर पैं झाला ॥२॥
हीन दीन गेली कळा । ह्रुदयीं बंधुवियोग आगळा ।
कांही न स्मरे तया वेळा । तेणें संतप्त मानस ॥३॥
जेवीं अमावास्येचें दिनीं । कळे तुटे चंद्र गगनीं ।
तैसा रामु शरासनपाणी । निवांत राहिला ते समयीं ॥४॥
जेंवी ग्रीष्मऋतूच्या आगमनीं । सरिता शोषे आटे पणि ।
तैसा श्रीराम चिंतातुर मनीं । अधोदृष्टी राहिला ॥५॥
ऐसा देखोनि श्रीरघुनाथ । पुढें उभा ठाकला सुमित्रासुत ।
बोलता झाला स्वामि किमार्थ । चिंतातुर तुम्ही असां ॥६॥
किमर्थ चिंतातुर तुम्ही । तेणें उव्दिग्न होतो आम्ही ।
जो जो अवतार जे जे कामीं । तें तें कार्य संपादित ॥७॥
जेंवी बहुरूपी सोंग संपदी । हावभाव नाना विनोदीं ।
रंजवोनि जनांची मांदी । आपण वेगळा पैं असे ॥८॥
तैसा तूं योगियांचा ईश्वरू । त्रैलोक्याचा आदिगुरू ।
तूं कर्य कर्ता लीलावतारू । सुरकार्यालागीं वरिसी ॥९॥
घेवोनी मायेचें पांधरूण । दाविसी या लोकांलागून ।
परी तूं सत्य श्रीरघुनंदन । मायें खेद करितोसी ॥११०॥
सत्यप्रतिज्ञ म्हणवितां । अंतर पडलें या वचनार्था ।
ऐसें जाणोनि श्रीरघुनाथा । शंका चित्ता स्पर्शो नेदीं ॥११॥
प्रारब्धाधीन वर्ते प्राणी । तयाचें कर्तॄत्व मिथ्या मानीं ।
आणि जें वदला वाल्मीकमुनी । तया वचना नुल्लंघीं ॥१२॥
जननीचिया जठरीं । जो जन्मला देहधारी ।
तो काळाधीन वर्ते उपरी । कार्यकर्तृत्व त्या मायेचें ॥१३॥
यालागीं श्रीरामा । अवतारपुरुषा गुणधमा ।
आज्ञा देवोनी कांही आम्हां । कार्या निवेदन करावें ॥१४॥
मज स्वामी आज्ञा दीजे । प्रतिज्ञा आपुली सत्य कीजे ।
आपुले पूर्णपण प्रकटिजे । उव्देगरहित होवोनी ॥१५॥
लक्ष्मणेनैवमुत्कस्तु रामः प्रचलितेंद्रियः ।
मंत्रिणः समुपानीय वसिष्ठं च पुरोहितम् ॥२१॥
वसिष्ठांना पाचारण :
ऐसें लक्ष्मण बोलिल्यावरी । ऐकोनि श्रीराम ते अवसरीं ।
चिंतातुर व्याकुळ भारी । अंग कांपें थरथरां ॥१६॥
नेत्रें अश्रु लोटत । अंगीं बाष्प कंठ सद्गदित ।
बोलतां वाचा वळत । प्रधानांसी आज्ञा देता झाला ॥१७॥
अगा सुमंत प्रधाना । जावोनि श्रीगुरूच्या भवना ।
निवेदावें माझिया वचना । श्रीरामचंद्रें बोलाविलें ॥१८॥
राघवाज्ञा वंदोनि शिरीं । सुमंतें जावोनि झडकरी ।
वसिष्ठासी नमस्कारोनि राजेश्वरीं । भेटीलागीं पाचारिले सांगे ॥१९॥
प्रधान ऐसें बोलिल्यानंतरें । खुणे पावोनि ऋषीश्वरें ।
तत्काळ येवोनियां चतुरें । श्रीरामासि देखिलें ॥१२०॥
दाशरथीं देखिला कैसा । दुःखाचा ओंतीव मेरु जैसा ।
कां चिंतेचा चितारिला ठसा तैसा । नयनीं भासला ऋषिवर्या ॥२१॥
बाह्य देखिला ऐसिये दृष्टी । अंतरींची देखणी परिपाठी ।
श्रीरामें पूर्ण कोंदली सृष्टी । तेजें जगजेठी हेलावत ॥२२॥
बाह्य नेत्रीं अश्रूंचा पूर । अंतरीं आनंदाचा निर्भर ।
बाह्यबुद्धी वियोगशर । भेदले दिसती सर्वांगीं ॥२३॥
अंतरीं राम दिसे कर्ता । बाह्य दाखवी चरित्रा ।
ऐसें देखोनि वसिष्ठ चित्ता । आश्चर्यता वाटली ॥२४॥
वसिष्ठांचा रामांना उपदेश :
वसिष्ठ म्हणे श्रीरघुनंदना । आठवीं आठवीं आपुली पूर्वप्रतिज्ञा ।
अवताराचे आधींची संज्ञा । विसरलासी दिसतसे ॥२५॥
संसार म्हणजे गंधर्वजाळ । विचारितां दिसे मृगजळ ।
जैसें का वंध्येचें बाळ । काय कोठे भेटलें ॥२६॥
यदर्थीं एक ऐक कथा । सांगतो या संसारदृष्टांता ।
बागूलगृहीं गर्भिणीं पोसितां । वंध्या नामें पैं होती ॥२७॥
तियेचे उदरीं जन्मला पुत्र । अतिलक्षणिक गुणवंत ।
पितयासारिखा पराक्रमी बहुत । दिवसेंदिवस वाढला ॥२८॥
शुक्तीच्या रजताचीं भूषणें । गगनींची कमळमाळा तेणें ।
घालोनि गळां अति सत्राणें । जननीतें श्रमविलें ॥२९॥
घेवोनि मातेच्या आज्ञेतें । पारधी निघाला वनातें ।
तंव सशाचें शिंग तयातें । प्राप्त झालें श्रीरामा ॥१३०॥
तेंचि शस्त्र घेवोनि करीं । पुढें येतां ते अवसरीं ।
मृगजळाचे सरोवरीं । पारधीलागून गुंतला ॥३१॥
ऊर्णतंतूचें जाळे घेवोनि करीं । रिघाला तया सरोवरीं ।
मीन धरोनि नानापरी । बाहेर येता पैं होता ॥३२॥
तंव तेथें झाले विपरीत । सुसरीनें गिळिला वांझेचा सुत ।
तयाचे जे पुत्रपौत्र । शुद्धि लागीं निघाले ॥३३॥
आले तया सरोवरासी । पुढे देखिलें दिगंबरआश्रमासी ।
शुद्धि पुसते झाले त्यासी । एकोनि मुनि कोपला ॥३४॥
परस्परें झाला संग्राम । भिडते झाले क्रोधें परम ।
घायीं पडले पावोनि श्रम । गतप्राण पैं झाले ॥३५॥
तयांचे वांझेसि झालें दुःख । रुदन करी दीर्घ शोक ।
तैसा हा संसार मायिक । काय सत्य मानिजे ॥३६॥
यालागीं जी रघुनाथा । बंधुवियोगाची न करीं चिंता ।
सत्यप्रतिज्ञ या वचनार्था । मन दीजे राजेंद्रा ॥३७॥
ऐकोनि श्रीगुरूची गोष्टी । श्रीरामा सुख झालें पोटीं ।
भ्रूलतासंकेतें धूर्जटी । लक्ष्मणासी आज्ञा देता झाला ॥३८॥
आज्ञाभंग झाल्यामुळे रामांकडून लक्ष्मणाला देहांताची शिक्षा :
श्रीराम म्हणे लक्ष्मणा । वधायोग्य देखिलें अवगुणा ।
तरी वधूं नये बंधुजना । धर्म शास्त्र पैं असे ॥३९॥
माझी अवज्ञा करुन । भीतरीं आलासि दुर्वास आला म्हणोन ।
ऐसिया अपराधातें द्यावा जी प्राण । मुख मज न दाखवीं ॥१४०॥
भ्रूलतासंज्ञेची जाणोनि खूण । काय करिता झाला लक्ष्मण ।
श्रीरामासी नमस्कारून । प्रदक्षिणा पैं केली ॥४१॥
नमन करोनि श्रीगुरूसी । आज्ञा पुसोनि समस्तांसी ।
येवोनि शरयूचे तीरासी । स्नानसंध्या सारिली ॥४२॥
लक्ष्मणाचे देहविसर्जन व पाताळात प्रवेश :
घालोनियां पद्मासन । हृदयीं धरोनि श्रीरघुनंदन ।
आकर्षोनी पंचप्राण । निजदेह विसर्जिला ॥४३॥
जैसें कवच सांडी भुजंग । कीं हंस त्यजी निजदेहो ।
तैसा सुमित्रेचा गर्भ लिंग । जैसें त्यागितां पैं झाला ॥४४॥
सौमित्र त्यजी निजदेहो ।गेला पाताळासी पहा हो ।
तेथें कद्रुसुतांचा समुदावो । तया लोका पावला ॥४५॥
लक्ष्मण केवळ शेषावतार । श्रीरामाच्या कार्या तत्पर ।
होवोनियां लीला थोर । समस्तांसी दाविली ॥४६॥
जैसी स्वामीची आज्ञा लाहोनी । भृत्य प्रवेशे निजभवनीं ।
तैसा सौमित्र निजस्थानीं । श्रीरामवचनें पैं गेला ॥४७॥
एका जनार्दना शरण । पाताळीं प्रवेशला लक्ष्मण ।
पुढील अवतारसमाप्तीचें कथन । सादर श्रवण करावें ॥४८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणपातालगमनं नाम पंचसप्ततितमोऽध्यायः ॥७५॥
ओंव्या ॥१४८॥ श्लोक ॥२१॥ एवं ॥१६९॥