सावध प्रकरण १८
दुसऱ्या दिवशी तारकर थेट पाणिनीच्या केबिन मधे घुसला आणि थेट विषयाला हात घातला.
“ माझा साक्षीदार रुद्रांश गडकरी ने तुला ओळखलं तुला माहिती असेलच. ”
“ खरचं की काय?” पाणिनी ने विचारलं.
“ काल रात्री त्याने तुला उभं राहिलेलं आणि चालताना पाहिलं आणि ओळखलं.”
“ कुणी सांगितलं तुला हे?”
“ होळकर म्हणाला मला.” –तारकर उत्तरला.
“ मी काल रात्री कुठे होतो हे त्याला कसं समजलं?”
“ जनसत्ता मधे तू पत्रकारांना मुलाखत देताना आणि दारात उभा असतांना चे फोटो आलेत पाणिनी. होळकर ने सांगितलेल्या हकीगतीत एक खटकणारी गोष्ट आहे की तिथे फक्त फोटोग्राफर होते,वार्ताहार नव्हते.आणि ही बातमी फक्त जनसत्ता मध्ये आल्ये. इतर पेपरात का नाही आली? ”
“ तुला त्याचा स्वभाव माहिती आहे ना तारकर, तो मनाशी आधी एखादी कल्पना ठरवतो मग वस्तुस्थितीला त्यात बसवायचा प्रयत्न करतो. ” पाणिनी म्हणाला
“ त्यांनी मायरा कपाडिया वर आरोप निश्चित केलाय आणि लौकरात लौकर ते प्राथमिक सुनावणी चालू करतील.तुला मी वाचवू शकेनच याची खात्री देऊ शकत नाही.”
“ मला तर वाटलं तू मला पकडून न्यायलाच आलायस ” पाणिनी म्हणाला
“ हिराळकर चा अजून छडा लागला नाही. आमचं नशीब की च्या गाडीचा तपास लागला.नाहीतर ती कित्येक महिने तिथेच पडून राहिली असती. ” तारकर म्हणाला.
“ दुग्गल चं काय?” पाणिनी ने विचारलं.
“ आम्ही त्याला शोधतोय हे त्याला कळल्यावर त्याने स्वतःहून फोन केला आम्हाला. त्याने सरळसोट हकीगत सांगितली आम्हाला, कुठे आहे, का गेला या बद्दल.त्यामुळे हिराळकर बद्दल चं रहस्य वाढलंय.तो आणि हिराळकर एकत्रच जाणार होते, सोमवारी पण त्याला अगदी शेवटच्या मिनिटाला प्लान बदलायला लागला.त्याने चैत्रपूर ला जायचं ठरवलं.याची कल्पना त्याने हिराळकर ला दिली होती आणि हिराळकर ने त्याला पावणे पाच ला फोन केला असं तो म्हणाला.आम्ही ते रेकोर्ड तपासलंय.ते बरोबर आहे. दुग्गल म्हणतो की हिराळकर त्याला म्हणाला की तासाभरातच तो चैत्रपूर ला जायला निघणार आहे.” तारकर ने सांगितलं.
“ हिराळकर च्या त्या दुपारच्या हालचाली बद्दल आणखी काय?” पाणिनी ने विचारलं.
सोमवारी साडेचार ला जेव्हा त्यांची कामवाली बाई निघाली तेव्हा हिराळकर निघायच्या तयारीतच होता.गाडी अगदी तयार ठेवली होती त्याने.तिला सांगितलं त्याने की साडेसहा ही अगदी शेवटची वेळ होती.”
“ ही कामवाली बाई कशी आहे?”
“ठीक आहे.चाळीशीची आहे.ती म्हणाली की हिराळकर आणि त्या बयेचं म्हणजे मायरा चं लफडं आहे.”
“ तिला मायरा आवडत नाहीसं दिसतंय.” पाणिनी म्हणाला
“ नाहीच आवडत. ”
“ कठड्याला धडक दिली गाडीने तेव्हा गाडी कुठल्या दिशेने होती,तारकर?”
“ टायरचे ठसे स्पष्ट नाहीयेत त्यामुळे तसा अंदाज येत नाही तरीपण माझा कयास आहे की चैत्रपूरवरून आली असावी.”
“ काहीतरी फेकून देण्याजोगी वस्तू गाडीत ठेवली असेल आणि त्या वस्तू सह गाडी सुध्दा, तर चैत्रपूरवरूनच गाडी आली असावी कारण तिकडून येतांनाच हवा तसा उताराचा रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला मोकळी जागा अशी स्थिती आहे. ” पाणिनी म्हणाला
तारकर ने डोळे बंद करून विचार केला आणि अचानक उठला., “ मी निघतो.”
तारकर गेल्यावर सौम्या म्हणाली, “ होळकर ने रुद्रांश गडकरी ला तुम्हाला ओळखायला लावण्यात चूक केली असावी असं तुम्ही बरोब्बर तारकरच्या मनात ठसवलत सर ! ”
तेवढ्यात कनक चा फोन आला. “ पाणिनी, हिराळकर चं प्रेत सापडलं त्याना.” तो म्हणाला.
“ कुठे?” पाणिनी ने विचारलं.
“ त्यांची गाडी मिळाली त्या जागेपासून दीड किलोमीटर वर.त्याच्याही डोक्यात गोळी घातली गेली होती पण पॉईंट ४५ च्या रिव्हॉल्व्हर ने. लगेचच मृत्यू आला त्याला.दरीतून खाली ढकलण्यात आलं होतं प्रेत. त्याच्यावर माती टाकली गेली होती.थोडक्यात ते पुरायचा घाईघाईत प्रयत्न केला गेला होता.” कनक म्हणाला.
“ मी एक महत्वाचं विचारतोय, त्याच्या शरीरिक स्थितीबाबत काही खटकणारी गोष्ट आढळली?”
“ तरटाच्या पोत्यात त्याचं प्रेत भरलं होतं आणि गुढगे दुमडून छाती जवळ बांधले होते.” कनक म्हणाला.
“ मृत्यूच्या वेळेबाबत काय?” पाणिनी ने विचारलं.
“ ते ऐकण्यासारखं आहे. हिराळकर च्या मनगटावरचे घड्याळ ५.५५ ला बंद पडलंय आणि गाडीतलं घड्याळ ६.२१ ला.पोलिसांचा कयास आहे की कोणीतरी हिराळकर कडे लिफ्ट मागितली असावी.त्याला गोळी घालून मारलं असावं,त्याच्या खिशातले सगळे पैसे काढून,त्याचं गाठोडं वळून खाली ढकलून दिलं असावं.त्या नंतर साधारण वीस पंचवीस मिनिटानंतर गाडी सुध्दा उतारावरून सोडून दिली असावी. त्याच्या ओळखीच्या माणसंच म्हणणं आहे की त्याला आपल्या खिशात मोठी रोख रक्कम बाळगण्याची सवय होती. पण प्रेताच्या अंगातल्या कपड्यात एक छदामही पोलिसांना मिळाला नाही. मायरा वर त्यांना संशय आहे पण ज्या पद्धतीने त्याचं गाठोडं वळलं गेलंय त्यावरून ते मायरा ला कसं जमलं याचं त्यांना आश्चर्य वाटतंय.” कनक म्हणाला.
“ थोडक्यात ते गोंधळले आहेत.” पाणिनी म्हणाला
“ बरोबर.पण पाणिनी, पोलिसांना प्रेत सापडलं कसं या बद्दल तुला संशय नाही आला?” कनक नं विचारलं.
“ तारकर हुशार आहे. कसा शोध घ्यायचा या गोष्टीचा त्याला अंदाज आला असेल.”
“ त्याला अंदाज आला असेल की कोणी टिप दिली असेल?” पाणिनीच्या डोळ्यात बघत कनक ने विचारलं.
“ गाडीत किंवा प्रेताच्या आसपास आणखी काय सापडलं?” पाणिनी ने विचारलं.
“ काही नाही.”
“ असं नाही होणार कनक. हिराळकर ने जर बऱ्याच दिवसासाठी बाहेरगावी राहायचा विचार केलं असेल तर सामानाची बॅग असलीच पाहिजे. ” पाणिनी म्हणाला
“ मला मिळालेल्या माहितीनुसार नाही.”-कनक
“ ठीक आहे.मला नाही वाटत मायरा विरुद्धचा खटला सुरु होण्यापूर्वी ते आणखी कोणाला अटक करतील म्हणून.” पाणिनी म्हणाला
( प्रकरण १८ समाप्त.)