Ved Lavi Jiva - 3 books and stories free download online pdf in Marathi

वेड लावी जीवा - भाग ३ - महत्त्वाचं बोलायचंय...

'ही हे सगळं मुद्दाम मला त्रास द्यायला करतेय. गौरी विरकर तुझा हा निर्णय खूप महागात पडणारे तुला'- वरद स्वतःशीच पुटपुटला आणि त्याने रागाने आपली मूठ आवळली.

फोनवर बोलून झाल्यावर प्रतापराव खूपच खुश दिसत होते. भाग्यश्री ताईंना सुद्धा आनंद झाला होता. फक्त गौरीचा चेहरा उदास झाला होता.

"काय मग बेटा आता तर होकार आला आहे तिथून. आता तर लग्न करायला तयार आहेस ना? नाही म्हणजे तस वचन दिलं आहेस तू मला!"- प्रताप

गौरीच्या चेहऱ्यावर कसलेच हवं भाव दिसत नाही. ती काहीच बोलत नाही फक्त शांत उभी राहते. प्रतापराव आत त्यांच्या खोलीत निघून जातात.

"बाळा तुला आनंद नाही का झाला?"- भाग्यश्री

"इथे माझ्या आयुष्याची वाट लावली जातेय आणि मी आनंदी होऊ आई?"- गौरी

"अग पण तूच म्हणाली होतीस की समोरून होकार आला तर मी गपचूप लग्नाला तयार होईन म्हणून"- भाग्यश्री

"छान शब्दात पकडलं तुम्ही सगळ्यांनी मला. तेव्हा मी रागात होते म्हणून बोलले"- गौरी

"मला एक सांग खरं खरं की तुला का लग्न नाही करायचंय त्याच्यासोबत?"- भाग्यश्री

"आई मी तुला एवढंच सांगेन की तो मुलगा चांगला नाहीये"- गौरी

"पण मला तर काही वाईट नाही वाटलं त्याच्यात. उलट घरचे पण सगळे चांगले आहेत. तुला तो काही बोलला का?"- भाग्यश्री

"नाही ग आई"- गौरी

"मग त्याच्या घरचे कोणी काही बोललं का तुला?"- भाग्यश्री

"अग ते कशाला मला काही बोलतील. खूप चांगली माणसं आहेत ती."- गौरी

"अग अशी काय तू? आत्ता म्हणालीस चांगला नाहीये तो आता म्हणतेय घरचे चांगलेत. त्याच्यात आणि घरच्यांमध्ये काय फरक आहे? तो मुलगा तर बिचारा मला साधा वाटला"- भाग्यश्री

"आता कसं सांगू तुला दिसतं तस नसतं ग आई. तू सांग ना बाबांना मला हे लग्न नाही करायचंय"- गौरी

"कोणाला काय सांगायचंय मला?"- प्रतापराव बाहेर येत बोलतात.

"अहो ते.."- भाग्यश्री ताई बोलत असतांना प्रतापराव त्यांना अडवतात.

"माहितीये मला ऐकलंय मी. आता मला कळणार नाही का माझ्या मुलीचं चांगलं वाईट कशात आहे ते? लहानपणा पासून तिचे सगळे हट्ट पुरवलेत मी आता बापाचा एक हट्ट नाही पुरवणार का तू?"- प्रताप

"अग बाळा विश्वास ठेव आमच्यावर तुझं वाईट होईल असं काहीच नाही करणार आम्ही. आम्हाला काळजी नाहीये का तुझी?"- भाग्यश्री

"हो खूप जास्त काळजी आहे, दिसतेय ती मला."- गौरी चिडून तिच्या खोलीत निघून जाते.


इथे वरदची सुद्धा चिड-चिड होत असते. रागात तो पंचिंग बॅग वर जोरजोरात पंच मारतो. अनुष्का त्याच्या रूम मध्ये येते.

"दादा"- अनुष्का हळूच वरदला आवाज देते.

वरदच तिच्याकडे लक्ष नसतं. तो त्याचा सगळा राग त्या पंचिंग बॅग वर काढत असतो.

"दादा!"- अनुष्का जोरात ओरडते. वरद शांत होतो तिला बघून.

"काय ग काय झालं?"- वरद

"मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे आज"- अनुष्का

"का काय झालं? आज पुन्हा करपलेली चपाती बनवलीस का?"- वरद

"दादा! जा ना. मी खरच खुश आहे आज तुझ्यामुळे"- अनुष्का

"मी काय केलं"- वरद

"तू लग्नाला तयार झालास म्हणून"- अनुष्का

"अनु हा विषय काढू नको नाहीतर मी चिडेल तुझ्यावर"- वरद

"अरे दादा ऐकून तर घे माझं. तू तयार झालास तर घरी सगळे खूप खुश आहेत. आणि सगळ्यात जास्त खूश आहेत ते म्हणजे आपले बाबा. आज किती तरी दिवसांनी त्यांना असं हसताना बघितलं आधीसारखं, म्हणून खूप आनंद झाला मला"- अनुष्का

"बाबा खुश आहेत ह्याचा आनंद तर मला सुद्धा आहे ग पण.."- वरद

"पण काय?"- अनुष्का

"काही नाही सोड"- वरद

'इथे सगळ्यांना आनंद झालाय फक्त मला सोडून. हे सगळं त्या गौरी मुळे होतंय. तिने हा निर्णय का घेतला हे कळायला हवंय मला. आता नाईलाजाने तिला भेटून बोलावंच लागेल तिच्याशी"- वरद मनात विचार करत बसतो.

दोन-तीन दिवस उलटून जातात. वरदच्या घरी नुस्ता गोंधळ चालू असतो. सगळे लग्न कसं करायचं काय काय तयारी करायची ह्याची चर्चा करत बसलेले असतात.

"आजी तू मस्त पैठणी नेस लग्नात"- अनुष्का आजीला मोबाईल मध्ये साडीचे फोटो दाखवते

"चल ग बाई काही पण बोलतेस माझं लग्न आहे का"- सुलभा आजी

"अग तुझ्या नातवाच लग्न आहे ना मग त्याची एवढी भारी आजी अजून सुंदर दिसायला नको का?"- अनुष्का

"बरं आई मी काय म्हणतेय आपण सगळी तयारी लवकर करायला हवी नंतर लग्नाच्या वेळेस घाई गडबड नको व्हायला. आपण आधी पासूनच तयार असलेलं बरं"- मयुरी वहिनी

"इथे अजून लग्नाची तारीख काढली नाही. ते जाऊदे साखरपुडा झाला नाही आणि तुम्ही लग्नापर्यंत पण पोहोचलात"- कैवल्य

"तुम्ही गप्प बसा हो तुम्हाला काही नाही कळत नाही. लग्नात फक्त चांगले कपडे घालून मिरवणार तुम्ही पण आमचं तसं नसतं खूप कामं असतात. म्हणून आत्ता पासून तयारी करतोय."- मयुरी वहिनी

"म्हणजे मी काही काम करत नाही सगळं तूच करतेस का ग"- कैवल्य हळूच मयुरीचे केस ओढत बोलतो. मयुरी त्याला एक फटका मारते. अनुष्का त्यांचा व्हिडिओ काढत असते.

"अरे तुम्ही दोघे काय आता भांडत बसलाय लहान पोरांसारखे. ती अनु बघा तुमचा व्हिडिओ काढतेय"- स्वाती ताई हसत बोलल्या.

कैवल्य उठून अनुच्या दिशेने जातो. ती उठून घर भर पळू लागते. कैवल्य तिच्या मागे पळतो पकडायला तिला.

"ए अनु थांब इकडे दाखव फोन बघतोच तुला"- कैवल्य

"जा रे दादा पकडुन दाखव आधी मला"- अनुष्का

अनुष्का पळता पळता वरदला धडकते आणि त्याच्या मागे लपते.

"शांत व्हा काय दंगा लावलाय तुम्ही"- वरद ओरडतो तसे दोघेही गप होतात.

"काय रे मूड का खराब आहे तुझा"- कैवल्य

"काही नाही. आई मी जरा बाहेर जाऊन येतो ग"- वरद

"अरे कुठे जातोय ते तरी सांगून जा"- स्वाती ताई

"जात असेल वहिनीला भेटायला"- अनुष्का त्याला चिडवते.

"अनु मार खाशील हा"- वरद

"अरे मला तरी सांग कुठे जातोय तू ते?"- स्वाती ताई

"कर्जतला जातोय"- वरद थोडा गंभीर होऊन बोलतो

"बघ आई मी बोललेली ना हा वहिनीला भेटायला जातोय"- अनुष्का टाळ्या वाजवत बोलली. सगळे हसायला लागतात.

"कर्जतला दुसरं काम आहे माझं"- वरद

"हो जा जाऊन ये तू"- स्वाती

वरद जातो घरा बाहेर. तसे सगळे पुन्हा हसायला लागतात आणि आपल्या कामाला लागतात.


इथे गौरीचा चेहरा पूर्ण उतरलेला असतो. ती नीट जेवत सुद्धा नसते.

"गौरी बाळा काहीतरी खाऊन घे चल. दुपारी पण तू जेवली नाहीस"- भाग्यश्री

"भूक नाहीये मला."- गौरी

"असं करून कसं चालेल? थोडं तरी खाऊन घे"- भाग्यश्री

"आई नको ग मला खरंच. माझा मूड नाहीये मला थोड्यावेळ एकटीला शांत बसुदे ना ग"- गौरी

"मग बाहेर जाऊन ये जरा बरं वाटेल"- भाग्यश्री

"हा तेच करते जरा बाहेर जाते. तिथे तरी मला शांतता भेटेल."- गौरी

वरद ने तिला भेट महत्त्वाचं बोलायचय असं मेसेज केला असतो ती जाऊ की नको ह्या संभ्रमात असते 'काय करू जाऊ की नको. जाऊदे जाते म्हणजे मला त्याला विचारता येईल लग्नाला होकार देण्याचा मूर्खपणा का केला ते' गौरी विचार करते आणि बाहेर जायची तयारी करते. ती काळ्या रंगाचा ड्रेस घालते.
बाहेर आल्यावर तिला जरा बरं वाटतं. ती एका तलावा जवळ येऊन बसते. संध्याकाळची वेळ असल्याने हवेत गारवा पसरला होता. वाऱ्याची मंद झुळूक तिच्या केसांसोबत खेळ करत होती. गौरी शांत बसून होती एकटीच एका कठड्यावर. मनात असंख्य विचार चालू होते. तिने डोळे मिटले आणि तिला तो दिवस आठवला जेव्हा ती वरदला पहिल्यांदा भेटली होती...

क्रमशः

©ChinmayiDeshpande


इथून पुढचे भाग तुम्हाला लवकरात लवकर वाचायचे असल्यास खालील लिंक वर जा. तिथे कथेचे पुढील बरेच भाग प्रकाशित केले आहेत. https://pratilipi.page.link/AaT1SyrmwV59hY1z5

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED