सावध - प्रकरण 25 - शेवटचे प्रकरण Abhay Bapat द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सावध - प्रकरण 25 - शेवटचे प्रकरण


सावध

प्रकरण २५

कीर्तीकर पिंजऱ्यात येऊन उभा राहिला.

“ हिराळकर, दुग्गल आणि तू असे एकत्र व्यवसाय करत होता?”

“ नाही ” कीर्तीकर म्हणाला.

“ तुम्ही एकमेकांना ओळखत होतात?” पाणिनी म्हणाला.

“ हो.”

“ तुमची ओळख कुठली?”

“ आम्ही एकाच क्लब चे मेंबर आहोत.बऱ्याच वेळा आम्ही संध्याकाळी पत्ते खेळायला एकत्र बसतो. ”

“ तुम्ही तिघे स्टोन क्रशिंग च्या आणि बांधकाम व्यवसायात एकत्र भागीदार आहात ही वस्तुस्थिती आहे की नाही?”

“ बिलकुल नाही.”

“ माझ्याकडे आर्थिक बँकेचे खाते उतारे आणि तुमच्या भागीदारीची कागदपत्रे आहेत.पुरावा म्हणून मी ती कालच कोर्टात सदर केली आहेत.”

“ तुम्ही माझीच उलट तपासणी का घेताय पटवर्धन? आदित्य ला दोषी ठरवण्यासाठी तुम्ही माझी साक्ष घेणार होतात ना? ”

“ त्याच दिशेने जातोय मी.” पाणिनी म्हणाला

“ ठीक आहे. आहोत आम्ही भागीदार.”

“ तुमच्या तिघात हिराळकर हा प्रमुख होता?त्यानेच भांडवल पुरवले होते?”

“ हो.”

“ आदित्य हा तुमचा अलिखित भागीदार होता?” पाणिनी म्हणाला.

“ नाही.”

“ त्याला हिराळकर त्याच्या संशोधनासाठी पैसे देणार होता हे तुला माहीत होतं?”

“ ऑब्जेक्शन.” खांडेकर म्हणाले.

“ मी प्रश्न बदलतो.” न्यायाधीशांनी निर्णय देण्यापूर्वी पाणिनी म्हणाला “त्याला हिराळकर त्याच्या संशोधनासाठी पैसे देणार होता हे तुला हिराळकर ने सांगितलं होतं? ”

“ नाही.”

“ तुमच्यामध्ये म्हणजे हिराळकर आणि तू व दुग्गल मधे पैशावरून कुरबुरी सुरु होत्या आणि तू आणि दुग्गल ने एकत्र येऊन धंद्यातून मोठी रक्कम बाहेर काढली.खरं की नाही?”

“ धादांत खोटं आहे हे.”

“ हिराळकर ने बँकेला दिलेल्या पत्रात माझ्या सही शिवाय कोणतीही रक्कम कीर्तीकर आणि दुग्गल ला काढू देऊ नये असा उल्लेख आहे.” पाणिनी म्हणाला

कीर्तीकर गप्प राहिला.

हिराळकर ने तुम्हा दोघांना सोमवारी तीन तारखेला चैत्रपूरमधील त्याच्या घरी तातडीने भेटायला बोलावलं.तुम्ही दोघे नाईलाजानेच त्याच्याकडे गेलात.” पाणिनी म्हणाला

“ सगळं खोटं आहे,काल्पनिक आहे.” कीर्तीकर म्हणाला.

“दुग्गल ला माहीत होतं की हिराळकर ला आपला संशय आलाय. तशी वेळ आली तर हिराळकर ला उडवायची तयारी त्याने ठेवली होती. पोईंट ४५ चं रिव्हॉल्व्हर आपल्या खिशात तयार ठेवलं. खुनाच्या वेळी आपण दुसरीकडे होतो असं वाटावं म्हणून त्याने त्याच्या नावाने होळीगड चे विमानाचे तिकीट काढले पण स्वतः न जाता परब ला पाठवलं. आणि अॅलिबी निर्माण केली. त्यासाठी बनावट आय डी प्रूफ तयार केली. तिकडे गेल्यावर त्याच्या अपेक्षेनुसार हिराळकर ने तुम्हा दोघांना आपल्या कृत्याचा जाब विचारला. दुग्गल ने त्याला रिव्हॉल्व्हर ने उत्तर दिलं”

“ हे सर्व मी केलंय याचा काय पुरावा आहे?”

“ तू हिराळकर ला मारलं नाहीस, दुग्गल ने त्याला मारलंय.” पाणिनी म्हणाला

“दुग्गल असं काही करेल याची तुला कल्पनाच नव्हती.दुग्गल ने स्वतःपुरती अॅलिबी तयार केली होती पण तुझ्याकडे ती नव्हती.दुग्गल ने त्याच्या गाडीतून मोठ पोत काढून आणायला तुला सांगितलं.दोघांनी मिळून त्याचं प्रेत त्यात गुंडाळल आणि हिराळकर च्या गाडीत, डिकीत टाकलं.नंतर तुम्ही दोघांनी, तुझी गाडी आणि हिराळकर ची गाडी घाटात दरीच्या बाजूला आणली.दुग्गल ने तुला सुचवलं असावं की क्लब मधे जाऊन बस,आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदव.म्हणजे तुला कोणी घाटात बघितलं तरी अडचण येऊ नये.नंतर तुम्ही हिराळकर चं घड्याळ आपटून ते ५.५५ ला बंद पाडलं आणि गाडीतील घड्याळ ६.२१ वाजता बंद पाडलं.नंतर हिराळकर ची गाडी वळवून लावली.त्याचं प्रेत दरीच्या काठावरून खाली ढकलून दिलं,त्यावर माती ढकलली.हिराळकर ची गाडी तीव्र उतारावर सोडून दिली आणि चैत्रपूरला हिराळकर च्या घरी परतलात.नंतर तू इकडे परत आलास.परब ही विमानाने परतला.दुग्गल,विमानाने माल्हेरला गेला.परब ने त्याच्यासाठी ठेवलेलं तिकीट त्याने आपल्या ताब्यात घेतलं आणि होळीगड ला गेला. ”

“ हे सर्व मी केलंय याचा काय पुरावा आहे? मी पुन्हा विचारतोय.” कीर्तीकर म्हणाला.

पाणिनीने शांतपणे कनक ने दिलेलं पाकीट उघडलं आणि त्यातून कागद बाहेर काढला आणि न्यायाधीशांना म्हणाला, “ युअर ऑनर, एक गाडी दुपारी साडेचार ते पाच च्या सुमारास घाट ओलांडून चैत्रपूरला गेली. तिथे टोल नका आहे.तीच गाडी पावणे सहा ते सव्वा सहा ला पुन्हा टोल नाका ओलांडून पुन्हा घाटात शिरली आणि पावणे सात ते सव्वा सातला टोल वरून पुन्हा चैत्रपूरगावात शिरली. तिथून पुन्हा रात्री आठ च्या सुमारास टोल वरून चैत्रपूरमधून बाहेर पडली. या सर्व वेळेशी जुळणारी एकच गाडी आहे आणि ती कीर्तीकर च्या मालकीची आहे.टोल नाक्याचे हे रेकोर्ड आमचा पुरावा म्हणून घ्यावे.”

“ ओह ! युअर ऑनर, खटला चाललाय कुठला आणि पटवर्धन कुठल्या खुनाबद्दल बोलताहेत?” खांडेकर म्हणाले. “ मगाच पासून ते फक्त म्हणताहेत की मी हिराळकर चा खून आणि परब चा खून याचा संबंध जोडून दाखवतो,अजून तरी त्यांनी ते काही केलं नाही.ते स्वतःच एवढे गोंधळून गेलेत की एकदा ते म्हणतात की आदित्य कोळवणकर ने खून केलाय आणि ते कीर्तीकर च्या साक्षीतून सिध्द होईल.कीर्तीकर ची साक्ष ते स्वतःच्याच साक्षीदाराची उलट तपासणी घ्यावी तशी घेताहेत.”

“ मला वाटत मिस्टर पटवर्धन, खांडेकर म्हणताहेत ते चूक नाहीये.तुम्ही अजूनही दोन खुनातील समाईक धागा स्पष्ट केलेला नाही.” न्यायाधीश म्हणाले.

“ येस युअर ऑनर. दुग्गल आणि कीर्तीकर हे दोघे आपला वापर करून अॅलिबी निर्माण करतायत हे परब ला समजलं आणि त्याने त्यांचे रहस्य शोधायला सुरवात केली. परब मुळात ब्लॅकमेलर.त्याने कीर्तीकर ला ब्लॅकमेल करायला सुरवात केली.इतकी की त्याला ठार मारण्यावाचून कीर्तीकर पुढे पर्याय राहिला नाही. क्लब वर पोचल्यावर त्याने गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली पण त्याच्याच लक्षात आलं की ती फारच तकलादू अॅलिबी आहे ही.त्याच्या नशिबाने त्याला मी दिलेली अपघाताची जाहिरात दिसली.अपघाताची तारीख,वेळ, आणि हिराळकर च्या खुनाची तारीख आणि वेळ त्याच्या सुदैवाने इतके जुळून आलं होतं की खुनाच्या वेळीच आपल्या हातून तो अपघात झाला असं दाखवण्याची संधी त्याला मिळाली.मायराच्या घरात जुना टाइप रायटर आहे.त्यावर मला उद्देशून एक पत्र लिहिलं की मायराच्या घरातल्या एका टेबलाच्या खणात एका छोट्या डायरीत अपघातातल्या गाडीचा नंबर आहे.आणि तो नंबर स्वत:च्याच गाडीचा दिला. हे पत्र त्यानेच लिहिलं हे मी सिध्द करू शकतो कारण प्रत्येकाची की बोर्ड वर दाब द्यायची स्वतःची पद्धत असते.त्यामुळे एखादे अक्षर ठळक किंवा अस्पष्ट उमटते. हे जुन्या टाइप रायटर वरच शक्य असते.मायरा ला जुन्या ,अँटिक वस्तूंची आवड असल्याने तिच्याकडे जुना टाइप रायटर होता. असो तर सांगायचा मुद्दा म्हणजे, द्वीप कुंड चौक आणि भीष्म चौकच्या रस्त्यावर तो ३ तारखेला संध्याकाळी ५ वाजता असेल तर त्याच वेळेला तो चैत्रपूरला खुनाच्या ठिकाणी असूच शकत नव्हता. त्या आधी साडेचार वाजे पर्यंत हिराळकर जीवंत होता, त्याने त्याच्या मोलकरणीला सांगितलं होतं की तो एका मीटिंग ला जातोय आणि नंतर परगावी जातोय ऑफिस च्या कामाला. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की परगावी जायचं तर सामान घेतलं नव्हतं गाडीत.थोडक्यात विमा कंपनीच्या खर्चात त्याला अॅलिबी ‘खरेदी’ करायची संधी मिळाली. हिराळकर च्या प्रेताची तपासणी करतांना त्याला मायरा च्या अपार्टमेंट ची किल्ली मिळाली. त्याने आधी मायरा च्या अपार्टमेंटमध्ये जाऊन तपासणी केली त्याच्या नशिबाने त्याला ड्रॉवर मधे तिचे रिव्हॉल्व्हर सापडले. एका पत्राबरोबर त्याने ती किल्ली मला पाठवली.त्याला माहिती होतं की यामुळे कोणीतरी त्याच्याशी बोलायला येईलच.त्याच्या अंदाजानुसार मी त्याच्याशी बोलायला आणि गाडीची तपासणी करायला त्याच्याकडे गेलो. त्याने आपल्या गाडीला अपघात झालाय असं भासवण्यासाठी गाडीचं उजव्या बाजूचं मागचं चाक बदलून घेतलं.गाडीला पोचे पाडले.त्यावर रंग लावून घेतला. आता त्यांची हिराळकर च्या खुनाची अॅलिबी पूर्ण झाली होती, परब त्याला ब्लॅकमेल करत होता आणि त्याला शांतपणे आणि पद्धतशीर पणे ठार करायचं त्यांने ठरवल होत. त्यासाठी सुध्दा त्याला अॅलिबी आवश्यक होती.”

“ मिस्टर पटवर्धन, परब चा खून जेव्हा झाला असं तुमचं म्हणणं आहे तेव्हा मी तुमच्या ऑफिसात होतो.” कीर्तीकर म्हणाला.

“ तो तुझ्या अॅलिबी चा भाग होता.” पाणिनी म्हणाला “ पाच तारखेला तू ड्रायव्हर पुरवणाऱ्या एजन्सीकडे गेलास.एक ड्रायव्हर मिळवलास,तू त्याला सांगितलस की संध्याकाळी ५ च्या आत त्याने कामावर हजर व्हावे. त्याची नवीन गाडी आणण्यासाठी त्याने बस ने बाहेरगावी जावे व येताना गाडी घेऊन यावी.यामुळे झालं काय की या नवीन ड्रायव्हर ला स्थानिक पेपर वाचायला संधीच मिळाली नाही आणि त्यामुळे त्याला परब च्या खुनाबद्दलची बातमी कळलीच नाही.तुला माहीत होतं की शोफर च्या वेषात,गाडीत बसलेला ड्रायव्हर म्हणजे स्वाभाविक पणेच परब आहे असेच सर्वच गृहित धरतील. परब चा स्वभाव बघता, माझा अंदाज असा आहे की हिराळकर च्या खुनाच्या आधीपासूनच तो तुला ब्लॅकमेल करत असावा. मायरा चं परब शी लग्न झाल्याचं आणि आता ती हिराळकर शी लग्न करणार असल्याचं तुला समजलं होतं.रोज २ ते ५ या वेळेत मायरा आपल्या घराबाहेर असते हे तुला माहीत होतं.तिच्या अपार्टमेंटची किल्ली मिळताच तू परब ला मारायचं ठरवलंस.परब ला काहीतरी कारण दाखवून मायरा च्या गॅरेज पाशी नेलंस. परब ला तेव्हा सुध्दा माहिती नव्हतं मायरा कुठे राहते ते.त्याला एवढंच माहीत होतं की ती या शहरात राहते.तू मायरा च्या ड्रॉवर मधून घेतलेल्या रिव्हॉल्व्हर ने परब ला गोळी मारलीस.मायरा च्या गाडीत बसलास आणि गाडी बाहेर काढून फूटपाथ जवळ लावलीस.गाडीच्या किल्ल्या गाडीतच ठेवल्यास.रिव्हॉल्व्हर मध्ये नवीन काडतुसे भरून मायरा च्या अपार्टमेण्ट मध्ये जाऊन ड्रॉवर मध्ये रिव्हॉल्व्हर जगाच्या जागी ठेवलंस.एवढ झाल्यावर आपल्या गाडीत बसून नवीन ड्रायव्हर ला घ्यायला एजन्सीच्या ऑफिसात आलास.ड्रायव्हर ला गाडी चालवायला सांगून आमच्या ऑफिसच्या इमारतीबाहेर गाडी थांबवून वाट बघत बसलास.चौकातल्या पानाच्या टपरीवाल्याकडून सिगारेट घेतानाच मुद्दामूनच गाडी पार्क करायला कुठे जागा मिळेल असे त्याला विचारलंस.तेवढ्यात सौम्या बाहेरून आली. आणि तिने तुझी गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही पाहिलं.ला. साहजिक शोफर च्या वेषातला तो तिला परब वाटला. मी ऑफिसात नाही म्हंटल्यावर मुद्दाम वाट बघत थांबलास.. तिथून खाली जाऊन ड्रायव्हर ला घरी जायला सांगण्यासाठी खाली गेलास.तिथून विमा कंपनीच्या माणसाला बोलावून घेतलं.त्याला घेऊन पेंढारकर ला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेलास..तिथे विमा कंपनी ने देऊ केलेल्या रकमेहून पेंढारकर ला स्वतः चे पदरची जास्त रक्कम देऊ केलीस.”

“युअर ऑनर,” न्यायाधिशांना उद्देशून पाणिनी म्हणाला. “त्याचा अॅलिबी चा प्लान फुल प्रूफ झाला तो आपल्या जाहिरातीमुळे. कुंडलिनी गुप्ता मधे उपटली नसती आणि तिने तोंडवळकर चं नाव सांगितलं नसतं तर मला ”कीर्तीकर चा संशयच नसता आला. मी ५ तारखेला जेव्हा कीर्तीकर शी बोललो तेव्हा त्याने असं भासवलं की त्याच्या ज्या गाडीला अपघात झाला ती गाडी तोच चालवत होता.त्या दृष्टीने म्हणजे तो अपराधी आहे हे भासवणारे सर्व पुरावे त्याने दाखवले.आणि ते, तो तसे दाखवत राहिला. पण जेव्हा त्याला समजलं की खरा अपघात तोंडवळकर च्या हातून झालाय आणि ते मला समजलंय, तेव्हा त्याने आपला ड्रायव्हर दोषी आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला.” पाणिनी म्हणाला

“जेव्हा मायरा ने परब चं प्रेत आपल्या गॅरेज मधे बघितलं असेल, तेव्हा नक्कीच तिला संशय आला असेल की आपली रिव्हॉल्व्हर कुणीतरी खुनासाठी वापरली आहे म्हणून. कैवल्य ने तिला सुचवलं की परब ने आत्महत्या केली असं वाटावं म्हणून त्याच्या प्रेताजवळ रिव्हॉल्व्हर ठेवावं. मी तिच्या रिव्हॉल्व्हर मधील काडतुसे काढून टाकली होती.त्यांने ती परत घातली, एक गोळी हवेत मारली, आणि रिव्हॉल्व्हर प्रेताजवळ ठेवलं.”

“ थोडक्यात युअर ऑनर, हिराळकर च्या खुनात दुग्गल चा तो साथीदार होता, त्याच्या अॅलिबी साठी त्याने मी दिलेल्या जाहिरातीचा वापर केला.त्यासाठी विमा कंपनीच्या पैशांचा वापर केला शिवाय स्वतःच्या पदरची रक्कम घातली. परब च्या खुनासाठी अॅलिबी म्हणून त्याने एजन्सीचा ड्रायव्हर परब चा डुप्लीकेट म्हणून वापरला. आणि खुनाच्या वेळेला आपण पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसात असल्याचा बनव रचला.” पाणिनी म्हणाला

“अत्यंत तर्कशुद्ध पण काल्पनिक कथा. ” खांडेकर म्हणाले.

“ मी आता हे सर्व सिध्द करण्यासाठी परब चा डुप्लीकेट म्हणून जो बदली माणूस ड्रायव्हर एजन्सी तर्फे आणला होता त्याला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावू इच्छितो.” पाणिनी म्हणाला

खांडेकर काहीतरी बोलायला उभे राहिले पण तेवढ्यात कीर्तीकर जोरात ओरडला, “ थांबा ! कोणालाही बोलवायची गरज नाही. मी गुन्हा कबूल करतो.”

कोर्टात एकदम सन्नाटा.न्यायाधीशांसहित सगळे अचंबित!

“ पटवर्धन, तुम्हाला परब चा खुनी म्हणून आदित्य वर संशय होता ना? कीर्तीकर ची साक्ष ही तुमच्या संशयाला बळकटी आणण्यासाठी तुम्ही पुढे चालू ठेवलीत ना? मग हे अचानक काय झालं? ” न्यायाधीशांनी विचारलं.

“ ती माझी एक खेळी होती युअर ऑनर.” पाणिनी म्हणाला

“ कसली खेळी?” खांडेकरांनी

“ कीर्तीकर ला बेसावध ठेवण्यासाठी.काल कीर्तीकर ची साक्ष संपली तेव्हा मी एक यादी त्याला दाखवली होती त्यापैकी कोणाला तो ओळखतो का हे त्याला विचारलं होतं.त्या यादीत एक नाव परब च्या बदली एजन्सी कडून घेतलेल्या ड्रायव्हर चं होतं.ते नाव दिसताच कीर्तीकर ला कळलं की मला नेमक काय झालं असावं ते समजलंय म्हणून.त्यामुळे वेळ मारून नेण्यासाठी त्याने खंडेकराना सांगून कोर्टाकडून दुसऱ्या दिवसा पर्यंत मुदत मागीतली.या दिवसाचा ‘सदुपयोग’ तो त्या ड्रायव्हर ला गायब करण्यासाठी म्हणजे त्याने कोर्टात साक्ष देण्यासाठी येऊ नये या साठी करणार होता.मला ते माहीत होतं म्हणून मी कनक ओजस च्या माणसांना त्या ड्रायव्हर वर नजर ठेवायला आणि त्याला संरक्षण द्यायला सांगितलं. ”

“ पण आदित्य कोळवणकर वर तुम्ही खुनाचा आरोप सिध्द करायचा प्रयत्न केलात ते का ?” खांडेकर म्हणाले.

“ ते कीर्तीकर ला बेसावध करण्यासाठी. मी मुद्दामच कोर्टात जाहीर केलं की मला कीर्तीकर वर संशय नाहीये पण खरा खुनी अडकण्यासाठी मला कीर्तीकर ची साक्ष पुढे घ्यायची आहे.ही बातमी त्याच्या कानावर पोचली आणि तो निश्चिंत झाला.मुका मार लागल्याच्या नावाखाली तो एक दिवस आला नाही पण दुसऱ्या दिवशी लगेच आला.अन्यथा बदली ड्रायव्हर चा बंदोबस्त करून स्वतः पळून गेला असता.”

“ पण पटवर्धन, तुम्ही आदित्य ची साक्ष एवढी मोठी म्हणजे बराच वेळ का घेतलीत? ” न्यायाधीश म्हणाले.

“ कनक ओजस ला टोल नाक्याचे रेकॉर्ड मिळवण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून.तसंच गरज वाटल्यास बदली ड्रायव्हर वर समन्स बजावण्यासाठी आणि त्याला कोर्टात आणायला वेळ मिळावा म्हणून.” पाणिनी म्हणाला

“ मुळात तुम्हाला कीर्तीकर चा संशय का आला? कधी आला?” न्यायाधीश म्हणाले.

“ अपघाताची माहिती देणाऱ्यांना आम्ही बक्षीस जाहीर केलं होतं, ते घेण्यासाठी एका मुलीने आमच्याशी संपर्क साधला. त्यातून तोंडवळकर चं नाव समजलं.त्याच्याही गाडीची मी तपासणी केली तेव्हा मला त्यात तथ्य आढळलं.शिवाय पेंढारकर ला भेटायला तो जाऊन आला.म्हणजे एकच अपघात आणि तो केल्याचं कबूल करणारे दोन जण अशी स्थिती उद्भवली.अधिक माहिती गोळा करता करता कीर्तीकर खोटं बोलत असल्याचं लक्षात आलं.”

“ पण काय झालं असावं चैत्रपूर इथे हे एवढं अचूक कसं समजलं तुम्हाला?” न्यायाधीशांनी विचारलं.

“ ते माझं तर्कशास्त्र होतं. साधारण काय घडलं असावा याचा तो अंदाज होता.तुम्ही दुग्गल ला अटक केली तर तो त्यावर प्रकाश पडू शकेल.”

“ कीर्तीकर ला जाळ्यात अडकवून तुम्ही मायरा वरचा संशय नक्कीच दूर केलाय पटवर्धन.आता मी पोलिसांना आदेश देतो की परब च्या खुनासाठी आणि हिराळकर च्या खुनात साथीदार म्हणून कीर्तीकर आणि हिराळकर च्या खुनासाठी दुग्गल ला ताब्यात घ्यावं आणि त्यांच्यावर रीतसर खटला चालवावा. मायरा कपाडिया ला हे कोर्ट खुनाच्या आरोपातून मुक्त करत आहे.” न्यायाधीश म्हणाले.

( प्रकरण २५ आणि संपूर्ण कादंबरी समाप्त )