हरिश्चंद्रगडावर - भाग 4 Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरिश्चंद्रगडावर - भाग 4

कोकणकडा म्हणजे सह्याद्रीतील एक सुंदर आविष्कार .सुंदर तेवढाच थरारक आणि रौद्र. साधारण अर्धा किलोमीटर परीघ असलेला हा कडा एखाद्या चंद्रकोरीच्या आकाराचा आहे. याचं सौंदर्य पाहायचे असेल तर पावसाळ्यानंतर धुकं नसताना जावे. इथून कोकणचे दर्शन होते म्हणून याला कोकणकडा म्हणत असावेत बहुतेक.

गडावरील मंदिरापासून अर्धा तास चाललो की आपण कोकणकड्यावर पोहचतो. ऐन पावसाळ्यात दाट धुकं आणि आजूबाजूचे घनदाट जंगल त्यामुळे सोबत गाईड असावा.

मी आणि अनिल अगदी रमतगमत बागेत फिरायला आल्यासारखं फोटो काढत व्हिडिओ बनवत चाललो होतो. तेवढ्यात आजूबाजूला कोणीच नाही हे आमच्या लक्षात आलं. सगळे पुढं निघून गेले होते. तसं काही आम्ही घाबरलो नव्हतो. पण आमचा चालण्याचा वेग सांगत होता आमची काय अवस्था झाली असेल😂😂. अक्षरशः धावत धावत आम्ही ग्रुपला गाठलं. ऐन पावसाळ्यात ही कपाळावर जमा झालेले घर्मबिंदू आम्ही अजिबात घाबरलो नव्हतो याची साक्ष देत होते.😅😅
इतकं असूनही एका ठिकाणी अनिलने मला थांबवलेच.

"अरे , चल आता नको फोटोज्"

"अगं फोटो नाही इथं बघ काय आहे ते"

आता तो एवढं पोट तिडकीने सांगत होता की मी पुन्हा पाठी गेले.

समोरचं दृश्य खरंच अध्दभुत आणि विस्मयकारक होतं. एका झुडपाच्या प्रत्येक पानावर एकेक गोगलगाय शांतपणे पहुडली होती. काही नुकतीच जन्मलेली पिल्ले असावीत तर काही पूर्ण वाढ झालेल्या गोगलगायी.
छोटी बाळ एका जागेवर सुस्तावलेली वाटली परंतु त्यांच्या बाप किंवा आया हळू हळू आपल्या संथ गतीने पुढं पुढं सरकत होते. जणू काय , माणसांसारखे हे ही आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी निघाले होते.

असं गोगलगायीचे झाड मी आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं.

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गात असे अनेक चमत्कार आहेत जे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या कुशीत यावेच लागते..

तृप्त मनानं आम्ही कोकणकड्यावर पोहचलो. इथपर्यंत आलो खर पण धुकं आणि पाऊस यामुळे काहीच दिसलं नाही. मी अगोदर सांगितलेल्या प्रमाणे पावसाळ्या नंतर आलं तर इथला मनमोहक नजारा आणि या कड्याचं रौद्र रूप आपण नक्कीच अनुभवू शकतो.

मनास आता परतीची वाट खुणावत होती. भरीस भर म्हणून पोटात कावळे ओरडत होते.
कितीही वेगात गड उतरलो तरीही अजून दोन तास कुठं नाही गेले.
मी पोटातल्या कावळ्यांना चहा बिस्किटे भरवून थोड शांत केलं.

मी अनुभवलं आहे की ट्रेकमध्ये परतीचा प्रवास नेहमीच लवकर संपतो.

खाली उतरल्यावर सर्वात आधी कपडे बदलून चुलीच्या बाजूची जागा पटकावली.

माझ्या अगोदर तिथं आमच्याच ग्रुप मधील एक मुलगी आणि आमच्यासाठी हातावर भाकरी थापत असलेल्या काकू यांच्यात काहीतरी संवाद चालू होता.

मुलीच्या बोलण्यावरून ती मराठी नाहीये हे समजत होते.

"ये चपाती चावल का है ना. The way you are making it on your hand. It will take yrs for me."

"आज चपात्या नाय केल्या. भाकऱ्या हायती. हिकडं गहू लय महाग मिळतोय. सणासुदीला असत्यात चपात्या , कदी पोळ्या " काकू तव्यावरील भाकरीला पाणी लावत तिला सांगत होत्या.

ती मुलगी माझ्याकडं पाहू लागली. तिला त्यातला ओ की ठो समजला नव्हता..

"आई , ती म्हणतेय , या तांदळाच्या आहेत का आणि तुम्ही ज्या पद्धतीनं हातावर भाकरी थापत आहात तिला खूप कौतुक वाटलं."

"अगं बया.. मंग ये आदी सांगायचं नव्ह.म्या बी येडी मला काय समजल नाय ती काय म्हणती ते."

"ठांकू ठांकू.. घे की खा, गरम गरम भाकर ब्यास लागती "

ते प्रेमळ आदरातिथ्य आम्ही नाकारू शकलो नाही.

चुलीशी शेकत शेकत , भाकरी भाजी खात खात मी ती मुलगी आणि त्या काकूंच्या संवादात दुभाषकाचे काम करू लागले.

तेवढ्यात लीडरने आज्ञा केली..सर्वांचे जेवण झालं असेल चला मंडळी बसमध्ये बसून घ्या आणि अनेक अविस्मरणीय आठवणी घेऊन आम्ही पाचनई गावाचा निरोप घेतला.