लग्नगाठ (एक अनोखा प्रवास) - भाग १ Bhavana Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नगाठ (एक अनोखा प्रवास) - भाग १

लग्नगाठ (एक अनोखा प्रवास): भाग १.


"आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा । गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता, दोघे करावी उभी।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान ।",भटजी शेवटच मंगलाष्टक बोलतात ,तसे सर्वजण अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावर टाकत असतात. त्या दोघांमधील अंतरपाट दूर होऊन जातो.


"एकमेकांना हार घालून घ्या!", भटजी दोघांना पाहत म्हणाले. तसा नवऱ्याच्या वेषात असलेला तो आपल्या हातातील हार पुढे असणाऱ्या त्या मुलीच्या गळ्यात काहीसा रागवून घालतो. ती तर आधीच कावरीबावरी झाली होती. लग्न काय असते? हे काही तिला माहीतच नव्हते! थोडी कापत होती.


"आता तू घाल विनिता!",अस तिच्या आईने बोलताच ती थोडी घाबरतच त्याच्या गळ्यात आपल्या हातातील हार घालून मोकळी होते.


यांचे लग्न संपन्न होत होते. तर हॉल मध्ये असलेल्या जेवणाच्या ठिकाणी पंगती बसवल्या जात होत्या. आपापसात काही जण चर्चा करत होते नवरा नवरी विषयी. तर काही जण जेवणाचे कौतुक करत होते.


"झालं लग्न ना आता? आम्ही जाऊ शकतो का बाबा?",एकजण तिरसट पणे समोर असलेल्या वयस्कर माणसाला विचारते.


"हो झालं आहे लग्न सविता. आता नवरी घरी येणार आपल्या तर तिच्या गृहप्रवेशाची तयारी करायला घे! काय आहे ना वरात आपली तिथच येणार आहे. आजपासून ती तुझी लहान जाऊबाई आहे.",ते ही अगदी चेहऱ्यावर समाधानाने हसत म्हणाले. त्यांच्या अश्या बोलण्याने सविता तोंड वाकड करत तिथून तणतणत निघून जाते.


"किती काळी बायको भेटली ग त्याला? काळी काळी घुसच म्हणा. मला वाटले होते लग्न बहुतेक त्या सविता वहिनी आहेत ना? त्यांच्या लहान बहीण सोबत ठरते असे! पण अचानक मामाची मुलगी त्याची बायको झाली. दिसायला सुंदर ही नाहीच आहे. काय पाहिले असेल हीच्यात काय माहिती? नाईकांची म्हातारी बघ कशी रागात नववार घालून पाहत आहे तिला.",एक बाई चेअर वर बसून आपल्या मैत्रिणी सोबत बोलत असते.


"ती म्हातारी खूप भयानक आहे बाई! तिच्याबद्दल बोलू नको. ऐकले तर आपल काढत बसेल. रंग पेक्षा माणसाचे मन मोठे असते. अस समजून लग्न केलं असेल. छान जोडी दिसत आहे. नवरा काही गोरा नाही आहे सावळाच आहे. सविता वहिनी काय कमी आहे का डोकं खायला इतरांच? ती आणखीन एक तिची बहीण आली असती तर मग बघायला नको! नाईकांचे घराचे वासे पालटले असते हे नक्कीच!",तिची मैत्रीण म्हणाली.


"ते ही आहेच. चल आपण जाऊन आहेर पाकीट देऊ या! आईस्क्रीम खायला जाऊ!",पहिली वाली हसून बोलते. ती हातात आणलेलं पाकीट एक नवऱ्याच्या हातात देते आणि दुसर पाकीट नवरीच्या हातात देऊन त्यांना लग्नाच्या शुभेच्छा द्यायला स्टेज वर येते. दोघी जणी उभ्या राहून नवरा नवरी सोबत एक फोटो काढतात.


फोटोसेशनचा कार्यक्रम हळूहळू उरकतो. आता वेळ येते पुढील लग्नाच्या विधीची. नवरा नवरीला कपडे बदलण्यासाठी त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये पाठवले जाते.


"आम्ही सांगत होतो तुला त्या गौरांगी सोबत लग्न कर म्हणून पण तू काही ऐकल नाही. अचानक चार दिवसांत निर्णय कसा बदलला अभय तू?",त्याचा मित्र शुभम काहीसा चिडत त्याला विचारत असतो. तो मात्र काहीसा दुःखी असतो. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्या दोन जिवलग मित्रांना मात्र काही कळत नव्हते. कॉलेज मध्ये अभयला बरेच प्रपोझर येत होते. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. सविता वहिनीची लहान बहीण दिसायला चांगली होती. घरात असल्यापासून, सविता वहिनी अभयच्या मनात तिच्या बद्दल चांगल चांगल भरवत होती. आपसूकच त्याचे ही मन तिच्याकडे जात होते. अभय २८ वर्षाचा होता. तर गौरांगी सोळा वर्षांची होती! शहरात वाढलेली होती. घरात येणं जाणे तिचे असायचे. अभयच्या आईच्या मनात ही भरलीच होती. पण ऐन लग्नाच्या वेळी अभयच्या वडिलांना जेव्हा कळल घरातील लोकांनी त्या मुलीला निवडले आहे. तसे त्यांनी एक निर्णय घेतला, जो अभयच आयुष्य बदलवून टाकणारा होता. त्यामुळे घरातील नात्यांमध्ये बऱ्याच अंशी मोठी दरी निर्माण झाली होती. काही जण आनंदी होते तर काही जण राग राग करत होते.


"ऐन वेळी बाबांना गौरांगी आवडली नाही! त्यांच्या मनात कधीच तिच्याबद्दल विचार नव्हता. आई , वहिनी, दोन नंबर दादा आम्ही बोलायला गेलो विषय तर त्या क्षणी बाबांनी सरळ नकार दिला तिच्यासोबत लग्न करायला. त्यांनी सांगितलं लग्न केलं तर विनिता सोबत करायचं. तसे जर नाही झालं तर तुझा बाप तुझ्यासाठी मेला! जे ऐकून मी काहीच बोलू शकलो नाही! माझ्या तीन नंबर दादा वहिनी ला आणि मोठ्या दादा वहिनीला देखील गौरांगी पटली नाही म्हणून त्यांनी ही लग्नाला येणार नाही असे सांगितले. मग मला माझा निर्णय बदलावा लागला. त्या मुलीशी लग्न करावे लागले. तरीही मी लग्न मोडण्यासाठी प्रयत्न केले सविता वहिनीच्या मदतीने पण फरक नाही पडला. चांगल पाच तोळे सोन घेतल सविता वहिनीने त्यांच्याकडून.", अभय शांतच सगळ काही बोलत असतो. ते ऐकून दोन्ही मित्र आश्चर्याने त्याला पाहत असतात. वडील त्याचे स्ट्रीक होते. त्याच्या आईला बरोबर झुकवत असायचे. दोघांची भांडण झाली तरी देखील त्याच्या बाबांची बाजू नेहमी चांगली आणि विचारपूर्वक असायची! जी सगळ्यांना मान्य करावी लागत असायची. अभयसाठी त्याचे वडील जीव की प्राणच होते!


"आता तू काय करणार आहेस?",अशोक विचारतो.


"काहीच नाही. सगळ येणाऱ्या वेळेवर सोडलं आहे. आई आणि बाबा दोघेही मला प्रिय आहेत. त्यांचे निर्णय कधीच मी नाकारू शकत नाही!", अभय उसासा टाकत तयार व्हायला निघून जातो. त्याचे मित्र तर विचारच करत असतात. नाही म्हटले तरीही गौरांगी सोबत लग्न करण्यासाठी त्यांनी ही थोडे फार कष्ट या सविता वहिनीच्या सांगण्यावरून घेतले होते. पण अचानक अभयच लग्न ठरलं आणि ते ही वेगळ्याच मुलीशी ते पाहून ते शॉक झाले होते. खर कारण काही त्या मागचे कळल नव्हते. आता कळले तर मन मानत नव्हते!


अभय तयार होऊन बाहेर येतो. चेहऱ्यावर खोटं खोटं हसू होते. विनिताच्या चेहऱ्यावर मात्र खरा आनंद होता. लग्नाच्या विधी ती एक एक आनंदात करत असते. लहान होती ती. आताच अठरावे पूर्ण केले होते तिने. वडीलांच्या हट्टामुळे लग्न केलं होत.


विनिता भोसले दिसायला सुंदर नसली तरीही मनाने स्वच्छ होती. जन्माला आल्यापासून वडिलांचे दुष्न होतेच तिच्या मागे मागे. पहिली मुलगी झाली म्हणून वडील लहान होती तेव्हापासून तिला खूप काही सुनवत असायचे. त्यात दारू पित असायचे. तर सगळ काही मनातील राग तिच्यावर निघत असायचा. आई मात्र तिची तिला खूप जपत असायची. परिस्थिती गरीब होती. गावातील चार पाच काम करून पैसा तिची आई कमावत असायची. विनिताच्या वडीलांच्या काकांची स्थिती चांगली होती. तर ते यांना मदत करत असायचे! मरते वेळी त्यांनी विनिताच्या वडिलांना आपली जमीन, व्यवसाय दिला त्या सोबत दारू सोडून द्यायचं वचन ही घेतल. तेव्हापासून त्यांनी दारू सोडून दिली! कधीच दारूला स्पर्श ही केला नाही. मुलगी वयात आली तसे तसे त्यांना मुलीची किंमत कळायला लागली. लग्न ठरल्यापासून तर खूपच जीव ते लावत होते. शिवाय मुलगा आपल्या बहिणीचा असल्याने, कुटुंब चांगल आहे याची खात्री होती त्यांना. त्यात अभय सरकारी नोकरी वाला मिळाला म्हणून वेगळच कौतुक होत त्यांना. गावभर चर्चा ही झालीच होती. अभयला मुलगी चांगली बारावी झालेली होती. त्याने याच कारणाने किती तरी मुली नाकारल्या होत्या. पण म्हणतात ना, गाठी या स्वर्गातून बांधून येतात. तसेच काहीसे इथ झाले होते.
विनिता नववी पास होती. शिक्षण घेण्यासाठी गावापासून सात आठ किलोमीटर चालत जावे लागत होते. त्यात मुलीने एकटीने चालत जाणे म्हणजे जीवाला घोर लावणारे होते. तितकी अशी वर्दळ रस्त्याला त्यांच्या नसायची! जितके विनिता शिकली होती तितकंच ज्ञान तिने चांगल्याप्रकारे आपल्यात आत्मसात केलं होत. आठवी पर्यंत पास करणे असा नियम नव्हताच. जो मेहनत घेईल तो पास होत होता. नापास झालेल्या मुला मुलीला त्याच वर्गात ठेवले जात होते. विनिता मात्र आपल्या परिस्थितीची जाण ठेवून पास होत असायची. पण पुढे शिकण्याची स्थिती नव्हती आणि त्यात तिच्या मागे दोन भाऊ ही होतेच. त्यांचं शिक्षण होतच. या कारणाने ती पुढे शिकत नाही!


"विनिता, तुझी पाठवणी आहे. विसरू नको आम्हाला फक्त! मोठ्या शहराला जाणार आहेस तू आता.",तिची मैत्रीण तिच्या जवळ येत म्हणाली. पाठवणीचे ऐकताच आपसूकच तिचे डोळे भरतात. आता इथून ती शहराला जाणार होती. तिथं तिचे भविष्य कसे असणार होते? हे तिचं तिला ठाऊक नव्हते. सासू आधीच तिच्यावर राग धरून होती. त्यात सविता वहिनी आणि तिचा नवरा होताच छळ करायला. बाकीचे चांगले आहेत याचा विचार करून ती शांत राहत गाडीत बसते. तिच्या बाजूला अभय ही बसतोच! नवीन प्रवास सुरू होणार होता इथून. तो कसा होता? हे येणारी वेळ ठरवणार होती.


क्रमशः
*****
कथेचा काळ १९९५ पासूनचा असेल. तेव्हाचा काळ खूपच वेगळा होता. मुलीचे वय पाहिले जात नव्हते. मुलगा चांगला असला घराणे चांगले असेल की लग्न लावून दिले जात होते. आपल्या आसपास असे जोडपे पाहायला मिळतील. कथा वेगळी आहे. पहिल्यांदा नवीन प्रयत्न करत आहे. दुःख, सुख हे सगळ ही पाहायला मिळेल कथेत.