Kisse Choriche - 3 books and stories free download online pdf in Marathi

किस्से चोरीचे - भाग 3

किस्से चोरीचे भाग तीन

ते एकोणीसशे नव्वद साल होते. त्या आधी मी वडगावशेरीत रुके यांच्या चाळीत राहात होतो. तेथेच रहात असताना माझे नोकरीतले पहिले प्रमोशन झाले आणि आर्थिक बाजू सुधारल्याने मी पुण्यातल्या बालाजीनगर भागात एक छोटासा वन रूम किचन फ्लॅट विकत घेतला.चाळीतल्या भाड्याच्या घरातून छोट्या का होईना;पण बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये रहायला जाण्यातला आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता.
घरगुती पूजा करून मी ताबडतोब या नव्या घरी रहायला गेलो. त्याच्या काही महिनेच आधी मी माझी स्वतःची पहिली दुचाकी अर्थात लुना टी एफ आर प्लस कर्ज घेऊन घेतली होती.
एकंदरीत आयुष्याचा प्रवास थोडा थोडा गती पकडत होता.
मी बालाजीनगरला नव्या घरात रहायला जाऊन साधारणपणे एकच महिना झाला असेल,त्या दिवशी मी ऑफिसातून आल्यावर खाली पार्किंगमधे नेहमीच्या जागी माझी लुना पार्क केली आणि चौथ्या मजल्यावर असलेल्या माझ्या घरी गेलो. दिवसभर कामाच्या निमित्ताने भरपूर फिरणे झाले होते त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी माझे खाली येणे झाले नाही.
त्या नंतरच्या दिवशीही कसलीशी सार्वजनिक सुट्टी होती आणि खाली उतरण्याचे काहीही कारण नसल्याने मी पूर्ण दिवस घरीच होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी मी खाली आलो आणि पाहिले तर बिल्डिंगखाली पार्किंग केलेली माझी लूना तेथून गायब झालेली होती!
बिल्डिंगला त्यावेळी सिक्युरिटीसाठी कुणालाही नेमलेले नव्हते.आधी मला वाटले की बिल्डिंगमधल्या कुणीतरी माझी लुना घेऊन फिरायला गेले असेल,एकदा असेही वाटले की चुकून कोणीतरी माझी चेष्टा करण्यासाठी गाडी लपवूनही ठेवली असेल;पण लवकरच माझ्या लक्षात आले की या पैकी काहीही घडले नसून माझ्या गाडीची बिल्डिंग मधून चक्क चोरी झाली आहे!
मी ताबडतोब माझी लुना शोधू लागलो. आधी संपूर्ण पार्किंगचा कोपरा न कोपरा शोधला मग बिल्डिंगच्या बाहेरून जिथे जिथे शक्यता वाटली तिथे शोधाशोध केली;पण गाडी मिळेना.
आता मात्र मला पोलीस चौकीत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
मी पोलीस स्टेशन गाठले आणि तिथल्या पोलिसाला माझी लुना चोरी गेल्याचे सांगायला लागलो. माझी गाडी पहिल्यांदाच चोरीला गेली होती म्हणून पोलिसांनी माझ्याकडे लगेच लक्ष द्यावे असे जरी मला वाटत असले तरी तिथे बसलेल्या पोलिसांसाठी ती काही पहिली चोरीची तक्रार नव्हती. त्यांनी माझ्या तक्रारींकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले उलट मलाच सल्ला दिला.
" तुमच्या आजूबाजूच्या बिल्डिंग आणि एक दीड किलोमीटर परिसरातल्या सगळ्या रस्त्यांवर जाऊन शोधा.चोर गाडीतले पेट्रोल संपेपर्यंत तुमची गाडी फिरवेल आणि एकदा का पेट्रोल संपले तिथेच रस्त्याच्या कडेला गाडी फेकून जाईल बघा, उगाच कागदोपत्री तक्रार आत्ताच नका करू. चुकून गाडी सापडली तर उगीच कोर्टात हेलपाटे मारायला लागतील! मी काय म्हणतो....दोन दिवसांत तुमची गाडी नाही सापडली तर कागदपत्रे घेऊन आमच्याकडे या... मग आपण तुमची तक्रार दाखल करून घेऊ! आता या तुम्ही... "
माझ्या तक्रारीची अशा प्रकारे पोलिसांकडून बोळवण केली जाईल याची काहीच कल्पना नसल्याने मी चांगलाच वैतागलो होतो!
' आता आपली लुना काही पुन्हा मिळणार नाही' असा विचार करून पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे शोध घ्यायचे ठरवले.
मग मी दोन तीन शेजाऱ्यांना बरोबर घेऊन आजूबाजूच्या वस्त्यात शोध घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या बिल्डिंगची पार्किंग, आजूबाजूची गल्लीबोळे चाळून झाली. मग थोडा लांबचा परिसर शोधायला घेतला. आमचे काही शेजारीही वेगवेगळ्या भागात फिरून माझी गाडी शोधायला मला मदत करत होते. संपूर्ण दिवस आमची ही शोधमोहीम चालू होती;पण गाडी काही सापडली नाही. त्या दिवशी निराश होऊन मी घरी परत आलो.
आपण कर्ज घेऊन घेतलेली लुना चोरीला गेली यावर मनात उलट सुलट विचारांनी डोक्यात थैमान घातले होते. त्या रात्री माझा डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी लवकर उठून परत मी वेड्यासारखा रस्त्यानी माझी लुना शोधत निघालो. बाजूच्या हायवेच्या कडेकडेने मी चालत निघालो. चारपाचशे मिटर अंतरावर एक पेट्रोल पंप होता तिकडे मी रस्त्याच्या दोन्ही बाजूला शोधक नजर फिरवत पेट्रोल पंपा जवळ पोहोचलो.
माझी नजर तिथेच बाजूला असलेल्या कचरा कुंडीकडे गेली. तिथे एक लुना आडवी पडलेली मला लांबून दिसली. मी धावतच तिकडे गेलो. पाहतो तर काय माझी प्रिय लुना धुळीने माखलेल्या अवस्थेत अस्ताव्यस्त पडलेली होती!
मी ताबडतोब त्या कचऱ्यात घुसलो आणि माझी लुना उभी केली. नशीब दोन्ही टायर शाबूत होते!मी ढकलत ढकलत गाडी बाहेर काढली. पेट्रोलची टाकी उघडून बघितली तर ती संपूर्ण कोरडी होती. त्या पोलिसाने सांगितल्याप्रमाणे पेट्रोल संपेपर्यंत माझी गाडी त्या चोरट्याने फिरवली आणि इथे फेकून दिली असावी.
मला याचा जास्त आनंद झाला होता की माझ्या आयुष्यातली कष्टाने मिळवलेली पहिली स्वयंचलित गाडी हरवता हरवता सापडली होती....
©प्रल्हाद दुधाळ.
9423012020

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED