Kisse Choriche - 1 books and stories free download online pdf in Marathi

किस्से चोरीचे - भाग 1

चोरी टळलेली...

बारावी पर्यंत माझे शिक्षण खेडेगावांत झाले होते. कॉलेज शिक्षणासाठी मी भावाकडे येरवड्याला पुण्यात आलो. बारावीत माझ्याबरोबर शिकणाऱ्या आम्ही काही मित्रांनी ठरवून एकाच कॉलेजला प्रवेश घ्यायचे ठरवले होते. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे आम्हा सर्वांना असलेला आमचा खेड्यातून आल्याचा न्यूनगंड! शहरांतल्या मुलांच्यात आम्हाला जर सामावून घेतले गेले नाही तर आपण एकटे पडू नये अशा भावनेतून केलेली ती कृती होती.
तर आम्ही गृपने पुण्यातल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला.
तर सदर कथा घडली त्यावेळी मी गरवारे कॉलेजात फर्स्ट इयरला शिकत होतो.
त्यावेळी आर्थिक परिस्थिती एकदम बिकट होती.येरवडा ते डेक्कन जिमखाना बसचा पासही खिशाला परवडणारा नव्हता शिवाय बसच्या वेळाही अनिश्चित असायच्या.
त्या काळी पुणे हे सायकलचे शहर होते.घरातल्या प्रत्येकाकडे सायकल असायचीच. सायकलची किंमतही फार तर अडीचशे तीनशे रुपये असेल! असे असले तरी अगदी सेकंड हॅन्ड सायकल खरेदी करणेही माझ्या आवक्यात नव्हते. त्या काळी रस्त्यावर अनेक सायकल भाड्याने देणारी दुकाने होती. तासावर, दिवसावर किंवा अगदी महिन्याच्या बोलीने सायकली भाड्याने मिळायच्या. भावाने मला येरवड्यातला असाच एक ओळखीचा सायकल दुकानदार गाठून दिला आणि मला कॉलेजला जाण्यासाठी पंधरा रुपये महिना या दराने एक जुनी का होईना सायकल उपलब्ध झाली.मी येरवड्यातील नागपूर चाळीत रहायचो आणि तिथे असणाऱ्या अल्बर्ट नावाच्या सायकल दुकानदाराकडून मी ही जुनी सायकल भाड्याने घेतली होती.
माझे कॉलेज नियमितपणे सुरु झाले. सायकल च्या कॅरियरला दोन वह्या अडकवून मी टेचात सायकल दामटत कॉलेजला जायचो...
दोन महिने सुरळीत गेले....
एक दिवस मी कॉलेजला पोहोचलो.त्या दिवशी कॉलेजात काही कार्यक्रम चालू होता. कॉलेजच्या सायकल स्टँडला सायकल लावायला मला जागा मिळाली नाही म्हणून तेथेच गेटच्या बाहेर लावलेल्या सायकलस् मधे घुसवून मी माझी सायकल लावली आणि घाई घाईने वर्गात गेलो.
कॉलेजची सुट्टी झाल्यावर मी बाहेर आलो तर माझी सायकल मी लावलेल्या जागेवर दिसेना.
इकडे तिकडे खूप शोध घेतला;पण सायकल काही सापडली नाही.सायकल चोरीला गेली हे पाहून मला एकदम रडूच कोसळले.
एकतर भाड्याने घेतलेली सायकल,त्यात दोन महिन्यांचे भाडे थकलेले.खिशात पाच पैसे सुध्दा नाहीत अशा अवस्थेत काय करावे ते मला काही सुचेना!
आपली सायकल चोरीला गेली याचा खूप रागही आला होता.भावनेच्या भरात मी आजूबाजूला असलेल्या सायकलच्या रांगेवर एक नजर मारली. मला दिसलें की तिथे एका सायकलला लॉक लावलेले नव्हते.
पुढचा मागचा विचार न करता सरळ ती सायकल स्टँड वरून काढली आणि टांग मारून मी निघालो!
माझी सायकल चोरी झाली याचा बदला म्हणून मी चक्क कुणाचीतरी सायकल चोरून ती घेऊन चाललो होतो!
आपण करतो आहे ते चुकीचे आहे याचा मनात सतत विचार चालू होता...
लकडी पुलापर्यंत पोहोचेपर्यंत माझी मानसिक उलाघाल चालू होती.शेवटी ' कुणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये' या सुविचाराने मनातल्या बदल्याच्या भावनेवर विजय मिळवला आणि मी परत वळून कॉलेज गेटवर आलो. माझ्याकडे असलेली ती सायकल होती तिथे पुन्हा लावली आणि आपल्या मनात चोरीचा हा विचार आलाच कसा, याबद्दल स्वतःला दोष देत चालत चालत गरवारे कॉलेज ते येरवडा हे अंतर मी चालत चालत पार केले.
मी सरळ अल्बर्ट नावाच्या त्या सायकल दुकानदाराकडे गेलो आणि सायकल चोरीला गेल्याचे त्याला सांगून टाकले....तो रागावणार हे मी गृहीत धरले होते; पण घडले वेगळेच ...
माझ्या प्रतिकूल परिस्थितीतही शिकण्याच्या धडपडीबद्दल अल्बर्टला माझ्याबद्दल खूप आदर होता...
तो म्हणाला...
" ठीक है दुधाळ, कलसे दुसरी सायकल लेके जाना, और ये सायकल का किमत दो सौ रुपया तुम्हारे उपर उधार रहा, जब नौकरी मिलेगी तब याद रखकर जरूर वापस करना..."
त्याचे ते बोलणे ऐकून कृतज्ञतेने माझ्या डोळ्यातून घळघळा अश्रू वहात होते...
पुढे एक संपूर्ण वर्ष मी त्याने दिलेली दुसरी सायकल वापरली.दुसऱ्या वर्षाला असतानाच मला सरकारी नोकरी मिळाली.नोकरी लागल्यानंतर मी चार हप्त्यात अल्बर्टचे माझ्याकडे उधार असलेले पैसे अगदी आठवणीने परत केले.ही सायकल चोरीची घटना आयुष्यात मला बरेच काही शिकवून गेली..
वेळीच सावध झालो म्हणून ठीक नाहीतर आयुष्यभर नकळत का होईना मी केलेल्या चोरीचे ओझे कायम मनात बाळगावे लागले असते!
©प्रल्हाद दुधाळ.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED