किस्से चोरीचे - भाग 2 Pralhad K Dudhal द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किस्से चोरीचे - भाग 2


किस्से चोरीचे...
त्यावेळी मी जेमतेम आठ नऊ वर्षांचा असेन.त्या वर्षीच्या उन्हाळ्यात आमच्या गावाच्या पंचक्रोशीत दरोडेखोर आणि किरकोळ चोरट्यांचीही बरीच हवा झाली होती.आजूबाजूच्या गावांत दररोज कुठे ना कुठे दरोडा पडल्याच्या बातम्या यायच्या.
"काल कांबळवाडीत चोर घुसले होते"
"परवा टोणपेवाडीत चोरट्यांनी मारहाण करून घर लुटले"
"पहाटे चोरटे आपल्या गावाच्या रस्त्यावर ट्रक घेऊन आले होते त्यांच्याकडे लाठ्या काठ्या आणि गोफणी होत्या" किंवा "ते चोरटे फक्त चोऱ्याच करत नाहीत तर लोकांना बेदम मारहाणही करतात." अशा बातम्या कुठून कुठून यायच्या आणि त्या बातम्यांमुळे गावात आणि वाड्या वस्त्यांवर सगळे लोक चांगलेच घाबरायला लागले होते.अंधार पडायच्या आत सगळे लोक घरी परतायला लागले होते. लोकांच्या बोलण्यात सतत चोरटे आणि दरोड्याच्या गोष्टी असायच्या.नशीब त्यावेळी आजच्यासारखे वाट्सआप नव्हते, नाही तर या बातम्या वाऱ्यासारख्या व्हायरल झाल्या असत्या!
एकंदरीत सगळे लोक मानसिक दडपणाखाली वावरत होते.आम्हा लहान पोरांच्या मनात चांगलीच भीती बसली होती...
अशातच एक दिवस संध्याकाळी नऊ वाजता आमच्या दुधाळवाडीतल्या एका घरावर चोरट्यांनी दगड फेकले आणि एकच पळापळ झाली. लोक जेवता जेवता खरकट्या हाताने रस्त्यावर आले. या प्रसंगाने आमच्या वाडीत ही दहशत अजूनच वाढली.
आमच्या गावात अजून विजेची सोय त्यावेळी नव्हती.
'खालच्या पांदीत चार आडदांड चोरटे लोक दिसले ' ,
'जोग मळ्यातल्या उसात चोर लपले आहेत '
'काल पहाटे चोरट्याचा एक ट्रक रोडवर आला होता '
अशा घबराट पसरवणाऱ्या अनेक वावड्या कानावर येत होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमच्या वाडीतल्या लोकांची तातडीने एक मीटिंग बोलावली गेली. प्रत्येक घरातल्या तरुणांची एक यादी बनवून पाच पाच लोकांनी रात्रभर गस्त घालायची असे ठरविण्यात आले.जास्त प्रकाशाच्या बॅटऱ्या आणि गॅस बत्याची सोय केली गेली.आठवड्यात कुणी कोणत्या दिवशी गस्तीला यायचे याचा एक ड्युटी चार्ट तयार झाला. ही मिटिंग चालू असतानाच आधी ज्या घरावर दगड पडले होते त्याच घराच्या कौलांवर पुन्हा दगड पडले.... मिटिंग मधेच संपवून हातात काठ्या कुऱ्हाडी टॉर्च घेऊन तरुण माणसे त्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेताकडे धावले....
या चोरांनी केलेल्या दगडफेकीच्या बातम्या लवकरच संपूर्ण पंचक्रोशीत पोहोचल्या आणि सगळ्या वाड्या वस्त्यांवर आमच्या सारखीच रात्रीची गस्त चालू झाली...
पुढे दोन तीन महिने चोरांच्या दगडफेक lआणि दरोड्याच्या बातम्या येतच होत्या.अफवांचे पीक वाढत चालले होते. दिवस पुढे पुढे सरकत होते हळू हळू घरांवर दगड पडायचे कमी झाले आणि दरोडेखोरांची भीतीही कमी झाली. चालू असलेली रात्रीची गस्तही एक दिवस बंद झाली...
माझ्या बालमनाला त्यावेळी सतत एक प्रश्न पडायचा...
'चोर चोरी करायचे सोडून घरांवर दगड का बरे मारत असतील? रात्री अचानक येऊन दरोडा टाकायचा सोडून ते चोरटे लोकांना सावध कशाला करतील?'
त्यावेळी माझ्यापेक्षा मोठ्या मुलांना मी तो प्रश्न विचारला तर ... त्यांनी सांगितले की
'एका घरावर दगड टाकले की सगळे लोक तिकडे जातील आणि दुसऱ्या घरात चोरी करणे सोपे होईल म्हणून चोर दगड टाकत असावेत!' माझे त्यावेळी समाधान झाले नव्हते;पण मी लहान असल्याने त्यावेळी गप्प बसलो...
पुढची आठ दहा वर्षे तो प्रश्न मनात तसाच होता...
आता मी मोठा झालो होतो...
एका वर्षी यात्रेला गेलो असताना ज्या घरावर सारखे दगड पडायचे त्या भावकीतल्या माणसालाच मी तो मनातला प्रश्न विचारला...
माझ्या प्रश्नावर तो माणूस खो खो हसत सुटला...
मला कळेना की माझ्या सरळ साध्या प्रश्नावर हसण्यासारखे काय आहे!
हसण्याचा बहर संपल्यावर तो हसून हसून डोळ्यात आलेले पाणी पुसत सांगू लागला ...
" काय आहे ना,त्या वर्षी गावात चोरट्यांची चर्चा सुरू झाली आणि मी घाबरलो,कारण त्याच्या आधी आठच दिवसापूर्वी मी माझी मुंबईची खोली विकून चांगले चाळीस हजार रुपये घरात आणून ठेवले होते!
न जाणो चोर आले तर? म्हणून मी माझ्या भावाला पटवले आणि माझी आयडिया त्याला सांगितली...
मग तो हळूच मागच्या बाजूला जाऊन घरावर दगड फेकायचा आणि 'दगड पडले ,चोर आले ' म्हणून बोंब मारत वाडीवर ओरडत सुटायचा! यामुळे झाले काय की वाडीवर चांगलीच दहशत माजली.मिटिंग झाली आणि रात्रीची गस्त सुरू झाली आणि यामुळे माझ्याकडे असलेल्या भरपूर पैशाची राखण आपोआपच झाली!
काय समजला?"
त्याचा तो बिलंदरपणा ऐकून मी डोक्याला हात लावला!
पुढे तो म्हणाला "सगळ्या गावाला कामाला लाऊन त्या वेळी मी मात्र मस्त बिनघोर झोपायचो!"
©प्रल्हाद दुधाळ
9423012020