Nisarg - 1 books and stories free download online pdf in Marathi

निसर्ग - सर्वात शक्तिमान - भाग 1

जंगलामध्ये एक भलामोठा वृद्ध वृक्ष होता ज्यावर वीज कोसळल्यामुळे तो जळून गेला होता. वृक्षाच्या खोडावर वीज पडल्यामुळे तो खोडातून दोन भागात विभागला होता. त्याचा वरील भाग एका बाजूला कोसळला होता व त्याचे रुंद खोड जमिनीवर उभे होते जे जळल्यामुळे आतून पोकळ झाले होते. कालांतराने खोडाच्या चारही बाजूला वेलींनी विळखा घातला होता. त्याच्या वरील बाजूला वेलींचा पूर्ण विळखा होता ज्यामुळे सूर्यप्रकाशाला आत प्रवेश करण्यास मनाई होती. त्याच्या एका बाजूला भगदाड होते जिथे वेलींचा विळखा विरळ होता, तिथून खोडाच्या आत-बाहेर करणे शक्य होते. अबिद्युत (नर सिंह) व कार्मा (मादी सिंह) या सिंहाच्या जोडप्याने त्या खोडाला त्यांची गुहा बनवले होते ज्यामध्ये ते त्यांचे जीवन इतर सर्वांपेक्षा दूर व्यतीत करत होते.

“अबिद्युत! अबिद्युत!”, कार्मा म्हणाली. ती अतीव वेदनेत जमिनीवर विव्हळत होती. तीचा चेहरा सुकला होता, चेहऱ्यावर एकाही ठिकाणी मांस राहिले नव्हते फक्त कवटी राहिली होती, पोटातल्या एकूण एक बरगड्या दिसत होत्या, त्वचा हाडांना चिकटली होती, शेपटी काळी पडली होती. ती साडेतीन महिन्याची गर्भवती होती. तिचे फक्त पोट मोठे दिसत होते व काहीही खायला न मिळाल्यामुळे तिने भुकेने जणू मोठा दगडच खाल्ला असावा असे वाटत होते. कोणत्याही क्षणात प्रसूती होईल अशी तिची अवस्था होती.

“बोल ना काय झालं?”, अबिद्युत म्हणाला. अबिद्युत ची शरीरयष्टी एक नर सिंह असूनसुद्धा कार्मापेक्षा वेगळी नव्हती. त्याच्या अंगावरचे केस विरळ झाले होते, गळ्याभोवती आयाळ नावापुरती होती, हात-पाय कमकुवत होते आणि पाठीमध्ये बाक होता.

“अबिद्युत ऐक ना”, कार्मा म्हणाली.

“मी ऐकतोय पण तू काही बोलतच नाहीस. नुसतेच माझे नाव घेत आहेस.” अबिद्युत संथ गतीने एका बाजूने दुसऱ्या बाजूस ये-जा करत होता.

“सर्व ठीक होईल ना?” कार्मा म्हणाली.

अबिद्युत कार्माकडे पाहत एका जागेवर स्तब्ध उभा राहिला. “तुला मी कितीवेळा सांगितले कि सर्व ठीक होईल. तू उगाच काळजी करत बसतेस. जास्त काळजी करू नको. आता तू आई आणि मी बाबा होणार आहे.” तो परत एका बाजूने दुसऱ्या बाजूला फेऱ्या मारू लागला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित-हास्य होते. कार्मा त्याच्या चालीकडे पाहतच राहिली. तीच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची लाट पसरली होती. अबिद्युत एकटाच स्वतःसोबत बोलू लागला, “आता आपला वंश वाढेल. आपल्या विचारांचासुद्धा वंश वाढणार. आपली मुले तो विचार सर्व जगापर्यंत पोहोचवतील. मी संपूर्ण जगाला दाखवून देईल कि मी कसा बरोबर होतो आणि ते कसे चूक. माझे विचार सर्वात महान आहेत हे सिद्ध होईल.....” अबिद्युत त्याच्या काल्पनिक विश्वात बुडाला होता.

“मला खूप तहान लागली आहे”, कार्मा म्हणाली. अबिद्युतचे तिच्याकडे लक्ष नव्हते. त्याचे स्वतःसोबत बोलणे चालू होते.

“अबिद्युत जरा माझ्याकडे लक्ष दे.” कार्मा चा आवाज वाढला होता.

“काय? काय झालं?” अबिद्युत गोंधळून त्याच्या काल्पनिक विश्वातून बाहेर आला.

“तुझं लक्ष कुठे आहे? मी इथे आहे इकडे बघ.” कार्माने तिचे डोळे मोठे केले.

“काय झालं? मी पण इथेच आहे. पुढे काहीतरी बोलणार आहेस का?”

“माझ्यासाठी पाणी घेऊन ये. खूप तहान लागली आहे.”

“असं सांग ना मोठ्याने. आत्ता बाहेर जातो आणि पाणी घेऊन येतो, तू फक्त स्वतःची काळजी घे”, अबिद्युत म्हणाला. कार्मा काहीतरी बोलणार याच्या आत तो वेलींतून जागा करत खोडाच्या बाहेर निघाला. कार्मा जमिनीवर निपचित पडून होती. तीच्या मनात एकाच वेळी असंख्य विचारांचे काहूर माजले होते.

अबिद्युत एक तास होऊन गेला तरीही पाणी घेऊन आला नव्हता. कार्माला मरण यातना होत होत्या. तिला एकटेपणा असाह्य झाला होता. ती झोपून आजूबाजूचे निरीक्षण करत होती. वेली खोडाच्या आत व बाहेर, दोन्ही बाजूने उगवल्या होत्या व खोडालगद उंच वाढल्या होत्या. वेलींची मुळे खोडाच्या आरपार घुसली होती व त्यांची खोडावर जबरदस्त पकड होती. एका वेलीवर मोठी पिवळी फुले उमलली होती ज्यावर भुंगे फिरत होते तर एका वेलीच्या हिरव्या पानांचा अळ्या फडशा पाडत होत्या, एका वेलीला बारीक काटे होते. बाहेरून घुबडाचा आवाज, माकडांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. खोडावर बसून एक किडा कर्कश आवाज करत होता. हिवाळ्याचा हंगाम सुरु होता. सूर्य उगवून तीन तास झाले होते तरी कडाक्याची थंडी वाजत होती. खूप वेळ सखोल निरीक्षणानंतर कार्माच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या. तिने तिचे निरीक्षण चालू ठेवले.

अबिद्युत पाणी घेऊन पोहोचला. कार्माला पाहिल्यावर त्याच्या आनंदाला मर्यादा राहिली नाही. तिने तीन बछड्यांना जन्म दिला होता, दोन नर व एक मादी. कार्माच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जणूकाही तिची सर्व मरगळ दूर होऊन तिला एक नवी उमेद मिळाली होती. तिची तहान नाहीसी झाली होती व ती तिन्ही बछड्यांना मनसोक्त चाटत होती.

“हे घे पाणी. लवकर पिऊन घे”, अबिद्युत म्हणाला. कार्माने एका दमात सर्व पाणी पिऊन टाकले. ती परत तीच्या बछड्यांना चाटण्याच्या कामात व्यस्त झाली. अबिद्युतने सुद्धा बछड्यांना चाटण्यास सुरुवात केली.

काहीवेळ व्यतीत झाला. बछड्यांना मनसोक्त चाटून झाल्यानंतर कार्मा त्यांना दुध पाजू लागली.

“आज मी खूप आनंदात आहे”, अबिद्युत म्हणाला. “आपल्या प्रेमाची निशाणी आज या जगात आली आहे. मी त्यांना एक महान व्यक्तिमत्व बनवणार. ते माझ्या पावलांवर पाऊल ठेवतील, जगाला माझ्या विचारांचे महत्व पटवून देतील. ज्यांनी मला वेडं ठरवलं ते नंतर माझ्या विचारांचे पालन करतील. मी तुला सांगत होतो ना सर्वकाही ठीक होईल. कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आता मी त्या सर्वांना दाखवून देईल कि माझे विचार सर्वात महान आहेत.” अबिद्युत एका जागेवर उभा राहून आकाशाकडे एकटक नजर लाऊन बोलत होता. तो त्याच्या काल्पनिक विश्वात बुडाला होता. कार्माचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. ती बछड्यांना दुध पाजत होती, त्यांना अधूनमधून चाटत होती.

कार्माने बछड्यांना दुध पाजण्यास नुकतीच सुरुवात केली होती तोपर्यंत तीच्या पोटात दुखू लागले. ती बछड्यांकडे पाहते. बछडे दुध पिण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला दूधच येत नव्हते. कार्मा काहीवेळ तशीच निपचित पडून राहिली. जसे पोटात दुखायचे थांबण्याऐवजी वाढत गेले तशी कार्मा उभी राहिली. बछडे दुधासाठी जोरजोरात ओरडू लागले. कार्मा तीनही बछड्यांकडे एकटक पाहते. आनंदाच्या भरात तिने बछड्यांच्या शरीरयष्टीकडे लक्ष दिले नव्हते. तीनही बछडे कमकुवत जन्मली होती. त्यांची शरीरयष्टी नाजूक होती. ती त्यांना चाटू लागते. बछडे दुधासाठी आक्रोश करत होती. कार्मा परत त्यांना दुध पाजण्यास सुरुवात करते. जसे त्यांनी दुध पिण्याचा प्रयत्न केला तसे कार्माला असहाय्य वेदना होऊ लागल्या व ती परत उभी राहिली. तिने अबिद्युतकडे पाहिले. त्याचा मात्र त्याच्या जादुई दुनियेतील प्रवास काही केल्या संपत नव्हता. तो एकटाच बडबड करत होता. कार्मा मात्र तीच्या भूतकाळातील काल्पनिक विश्वातून पूर्ण बाहेर आली होती. तिला तिचे भविष्य समोर दिसत होते. बाहेर पडण्यास आपण खूपच उशीर केला का हा प्रश्न तीच्या मनात वारंवार येत होता. ती फक्त तीच्या बछड्यांकडे एका आशेने पाहत होती.

कार्माने काहीवेळ दुध येण्यासाठी वाट पाहिली व ती परत बछड्यांना दुध पाजू लागली. अबिद्युत एका कोपऱ्यात गाढ झोपला होता. यावेळी परत काही क्षण होत नाहीत तोपर्यंत कार्माच्या पोटात दुखू लागले. कार्मा ताडकन उभी राहिली.

“अबिद्युत”, कार्मा म्हणाली. “अबिद्युत उठ लवकर. अबिद्युत.”

“काय झालं?”, अबिद्युत म्हणाला. तो झोपून बोलत होता. “मला का उठवत आहेस?”

“अरे उठ ना? मला खूप भूक लागली आहे. जा आपल्याला काहीतरी खायला घेऊन ये.”

“थोडावेळ थांब ना. मी नंतर जातो. तोपर्यंत तू पण आराम कर. आपल्या बछड्यांना दुध पाजत बस.”

“मला दूधच येत नाहीये.”

“काय म्हणालीस?”, अबिद्युत म्हणाला. तो उठून उभा राहिला. “तुला दुध येत नाही? हे कसं शक्य आहे?”

“मला दुध आले पण फक्त नावालाच. लगेच संपून गेले. आपल्या तिन्ही पिल्लांची भूक कशी भागणार तेवढ्यात? जा आणि माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. आणि यावेळी मला आपले खरे जेवण पाहिजे.”

“खरे जेवण म्हणजे?”, अबिद्युत आश्चर्याने म्हणाला.

“तुला माहित आहे मी काय बोलतेय ते. जा आणि माझ्यासाठी शिकार करून आण. मला हरीण खायचं आहे.”

“काय? काय म्हणालीस?” अबिद्युत चा आवाज वाढला होता. “हे अशक्य आहे.”

“का अशक्य आहे?” कार्मानेदेखील तीचा आवाज वाढवला. “अरे आपल्या पिल्लांकडे बघ एकदा. त्यांचे शरीर बघ. त्यांना जर आपण नीट जपले नाही तर ते जगू शकणार नाहीत. आणि त्यांना जर जगवायचं असेल तर मला धष्टपुष्ट झालेच पाहिजे. मला काहीही माहित नाही. मला ताजे मांस खायचे आहे. तू आताच्याआता जा आणि हरणाची शिकार करून घेऊन ये.”

“तू शांत हो आणि मी काय बोलतो ते ऐकून घे.” अबिद्युत म्हणाला. त्याने स्वतःला शांत केले. “तू चार ते पाच दिवस पोटात दुखत असल्यामुळे काहीच खाल्ले नाही. आणि त्यामुळे तुला जास्त दुध आले नसणार. मी आत्ता जातो आणि आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खूप खायला घेऊन येतो. तू पोटभर जेवण केल्यानंतर तुला दुधाची कमी भासणार नाही.”

“नाही. मी आता तुझे काहीएक ऐकणार नाही. मला फक्त आणि फक्त मांस खायचे आहे.” कार्मा म्हणाली.

“आता मात्र हे जास्त होत आहे”, अबिद्युत म्हणाला. “हि गोष्ट मी करू शकत नाही हे तुला माहित आहे, आणि मी माझ्या विचारांवर ठाम आहे. तू माझ्यासोबत फक्त बोलण्यात वेळ वाया घालवत आहेस. तिकडे आपले बछडे भुकेने ओरडत आहेत. तू फक्त त्यांच्यावर लक्ष ठेव. मी आत्ता जातो आणि आपल्यासाठी जेवायला घेऊन येतो.” अबिद्युत वेलींतून वाट काढत झाडाच्या बुंध्यातून बाहेर निघायला लागला.

“अबिद्युत माझं ऐक”, कार्मा म्हणाली, “मला फक्त एकदा शिकार करून आणून दे. नंतर परत मी तुला कधीच शिकार करायला सांगणार नाही.” अबिद्युत मागे वळून न पाहता तसाच वेलींतून वाट काढत बाहेर निघाला आणि कार्माला दिसेनासा झाला. ती तो दिसेनासा झाला तरी एकटक त्याच दिशेला पाहत होती. तिन्ही बछडे भुकेने व्याकूळ होऊन तीच्या भोवती घिरट्या मारत होते.

अबिद्युत परत आला नव्हता. तिन्ही बछडे भुकेने ओरडून ओरडून, दमून एकमेकांना चिटकून झोपली होती. कार्मा बछड्यांपासून काही अंतर बाजूला बसून त्यांच्याकडे एकटक पाहत विचार करत होती. ‘आई बाबांनी मला सांगितले होते कि अबिद्युतसोबत जाऊ नकोस. माझे मित्र मैत्रीण हेच म्हणाले होते. पण मी कोणालाही जुमानले नाही. अबिद्युतवर प्रेम करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक तर नाही ना? नाही! मी असा विचार का करत आहे? अबिद्युतचे माझ्यावर प्रेम आहे. तो माझे नक्की ऐकेल. मी त्याला मनवण्यात नक्की यशस्वी ठरेल. पण तो त्याचे विचार माझ्यासाठी बदलेल? जर त्याने नकार दिला तर? नाही, असे होऊच शकत नाही. माझ्यासाठी नाही पण आपल्या बछड्यांसाठी त्याला त्याचे विचार नक्कीच बदलायला लागतील. तो माझे नक्की ऐकेल.’ कार्माच्या डोक्यात विचारांची घुसळण चालू होती.

अबिद्युत काहीवेळात परत आला व म्हणाला, “हे घे. मनसोक्त खा आता.”

“हे काय आहे?”, कार्मा म्हणाली. तिला तीच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती निराश झाली होती.

एक फांदी जी आतून एका बाजूने पोकळ होती, त्या फांदीमध्ये अबिद्युतने फळे आणली होती. ती सर्व फळे त्याने कार्मासमोर जमिनीवर पसरवली आणि म्हणाला, “आता तुला दोन दिवस तरी भूक लागणार नाही इतके पोट भरेल. चल लवकर खाऊन घे.”

“अबिद्युत हे काय आहे? मी तुला सांगितले होते ना कि फक्त एकदा, फक्त यावेळी मला मांस आणून दे म्हणून. हे आपले खरे जेवण नाही.”

“तू अशी विचित्र का वागत आहेस? आणि या खऱ्या जेवणाचा काय प्रकार आहे?”, अबिद्युत म्हणाला. त्याचा आवाज वाढला होता. “तू माझे विचार चांगलेच जाणून आहेस. हेच आपले जेवण आहे आणि हे तुला चांगल्या प्रकारे माहित आहे. आता पटकन जेवून घे, तुला उर्जा मिळणे आवश्यक आहे. आपल्या बछड्यांसाठी तुझे पोटभर जेवणे गरजेचे आहे, नाहीतर तुझ्यामुळे ती सुद्धा उपाशीच राहतील.”

“मी जे बोलत आहे त्यातील एक शब्द तरी तुला नीट समजत आहे का?”, कार्मा म्हणाली. “कृपा करून मी जे बोलत-” अबिद्युतने तिचे बोलणे मधेच तोडले व तो बोलू लागला, “हो तू अगदी बरोबर आहेस. तुझ्या तोंडातून बाहेर येणारा एकही शब्द माझ्या परिचयाचा नाही. तुझी शक्ती माझ्यासोबत बोलण्यावर वाया घालवू नको. तुझं तोंड आता बंद कर आणि समोर पडलेले सर्व निमुटपणे खाऊन टाक.”

“काय? तू आत्ता काय बोललास?”, कार्मा म्हणाली. तीच्या डोळ्यांत पाणी उतरले होते. “मी तुला इतके प्रेम दिले, तुझ्यासाठी सर्वांसोबत नाते तोडले. इतके केल्यानंतर तू माझ्यासाठी या प्रकारची भाषा कशीकाय वापरू शकतोस?”

अबिद्युत कार्माजवळ गेला, तीच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, “मला माफ कर. मला तसे बोलायचे नव्हते. मी फक्त थोडा रागवलो होतो.”

“नाही. मला वाटत आहे तू ते सर्व मनापासून बोललास.”

“खरंच नाही. मला त्यातले काहीही म्हणायचे नव्हते. मी तुझ्यावर प्रेम करतो. फक्त तू असे वागायला लागली आहेस कि तुझा माझ्यावर काहीच विश्वास राहिला नाही. म्हणून रागाच्या भरात माझ्या तोंडातून तसे शब्द निघाले. मला तसे काहीच म्हणायचे नव्हते. माझ्यावर जरा विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी काहीही करेल. सर्व काही ठीक होईल. आता कृपा करून घाई कर आणि पोटभर जेवण कर. आपल्या बछड्यांना जास्तवेळ वाट पाहायला लावू नको.”

“पण अबिद्युत, मला उर्जा मिळणे आवश्यक आहे. फळांनी मला काहीही मदत होणार नाही.”

“हीच गोष्ट मी केव्हापासून बोलत आहे.” अबिद्युतने कार्माकडे त्याची पाठ फिरवली व बोलू लागला, “तू असे कसेकाय बोलू शकते? आता जवळजवळ एक वर्ष झाले तू फळे खात आहेस. मी गेल्या दोन वर्षांपासून फळे खात आहे. तुला आतापर्यंत काय झाले? मला आतापर्यंत काही झाले का? काहीच नाही. मग तू असे कसे बोलू शकतेस कि आपल्याला फळे खाऊन उर्जा मिळत नाही? जर ते सत्य असेल तर आपण दोघे अजून जिवंत कसे आहोत? आपण पूर्णपणे तंदुरुस्त आणि-” कार्मा अबिद्युतचे बोलणे मधेच तोडते.

“अबिद्युत मला माहित आहे कि आपण दोघे पूर्णपणे ठीक आहोत आणि आपण फळे खाऊनच जगलो. माझ्यावर रागवू नको. तू फक्त कृपा करून माझे बोलणे ऐकून घे. आत्ताची वेळ वेगळी आहे. आता माझ्या शरीराला नेहमीपेक्षा जास्त उर्जेची गरज आहे. या स्थितीमध्ये माझे शरीर आपल्या तिन्ही बछड्यांना पुरेल इतके दुध तयार करण्यास असमर्थ आहे. मलातर असे वाटत आहे कि मला येणारे दुध एका बछड्यासाठी सुद्धा अपुरे पडेल. आणि इथेतर तीनजण आहेत. फळांनी माझी काहीही मदत होणार नाही.”

“आता तू माझे म्हणणे नीट ऐक. तुझ्यासमोर हि सर्व चांगल्या दर्जाची फळे आहेत. तुला माहित आहे ना चांगल्या दर्जाची फळे मिळवणे किती अवघड आहे? हि फळे झाडाच्या खोडाला नव्हती चिकटली. त्यासाठी मला झाडांच्या उंच फांद्यांवर चढायला लागले. काही फळे काढताना अशी स्थिती झाली होती कि माझ्या वजनामुळे फांदी तुटली असती आणि मी खाली पडलो असतो, माझे हात-पाय मोडले असते. कदाचित तू मला आता पाहू शकली नसतीस. मी ती जोखीम पत्करली. का?, तुला माहिती आहे? कारण मी खूप आनंदात होतो. मी आनंदात होतो कि आपला वंश वाढीला लागला, तू सुखरूपपणे तीन बाळांना जन्म दिला. मी विचार केला कि माकड, हत्ती किंवा पक्ष्यांमुळे जमिनीवर पडलेली फळे आपण नेहमी खातो. पण यावेळी तुझ्यासाठी मी स्वतः झाडावर चढून ताजी फळे घेऊन आल्यावर तू खुश होशील. म्हणून मी जोखीम पत्करली. मी हे तुझ्यासाठी केलं. आपल्या बाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी केलं. आणि तू काय करत आहेस? तू हि ताजी फळे न खाता तुझी उर्जा फक्त आणि फक्त बोलण्यासाठी वाया घालवत आहेस. त्यासोबत तू मोल्यवान वेळ वाया घालवत आहेस. आपली मुले भुकेली आहेत आणि प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. पण तू याचा जराही विचार करत नाहीयेस. वारंवार, पुन्हा-पुन्हा तू फक्त एकच गोष्ट बोलत आहेस कि फळे खाल्ल्यानंतर तुला उर्जा मिळणार नाही. जर तू अजिबातच काही खाल्ले नाही तर तुला उर्जा मिळणार कुठून, सांग मला? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या पोटात दुखत असल्यामुळे गेले चार-पाच दिवस तू काही खाल्लेले नाही. आणि त्यामुळेच तुला जास्त दुध आले नाही. मी तुला आधीच म्हणालो कि जर तू पोटभर खाल्लेस तर तुला दुधाची कमी भासणार नाही. आता आपल्या बछड्यांच्या आयुष्याचा विचार कर आणि हि फळे खा. आपण बाकीच्या गोष्टींचा नंतर विचार करू.”

कार्मा थोडा वेळ अबिद्युत कडे पाहत राहिली, एकही शब्द बोलली नाही. अबिद्युत आरामशीर फळांच्या बाजूला जमिनीवर स्वतःचे अंग झोकून देऊन लोळू लागला. त्याला पाहिल्यावर तो निश्चिंत वाटत होता, जसे कि त्याने मोठी कामगिरी पार पाडली होती व त्याला विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. कार्माने तीच्या बछड्यांकडे पाहिले, ते मेल्यासारखे झोपले होते. ती त्यांच्याजवळ गेली व त्यांना चाटू लागली. तिने चाटताच ते जागे झाले आणि आवाज करत दुधाच्या शोधात तीच्या जवळ गेले. कार्माला जाणीव झाली कि तिने अजून काहीच खाल्ले नव्हते. ती त्वरित बछड्यांपासून दूर झाली व फळे खाण्यास गेली. अबिद्युतने लोळत असतानाच खायला सुरुवात केली होती. कार्माला नवल वाटले. तिने त्याच्याकडे रागाने पाहिले.

“चल लवकर. नुसते पाहत बसू नको”, अबिद्युत म्हणाला. तो हसत हसत फळे खात बोलत होता जसे कि काही झालेच नाही. “पटकन खा नाहीतर मी ते सर्व खाऊन टाकेन. फळांचे रंग तरी बघ. सर्व ताझे आहेत. आणि त्यांची चव तर. स्वादिष्ट! तुला हा अनुभव नक्कीच चुकवू वाटणार नाही.”

कार्मा अबिद्युतला काहीही न बोलता एखाद्या वेड्यासारखी विचित्रपणे फळांवर तुटून पडली.

“हे हे हे, तू हे काय करत आहेस?”, अबिद्युत म्हणाला. “हळुवार पणे आस्वाद घेत खा.”

कार्मा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती फक्त तीच्या पिल्लांचा विचार करत होती. तिने समोर जी काही फळे दिसतील त्यातील सर्वातले थोडे थोडे घास तोडणे चालू ठेवले.

“ठीक आहे, ठीक आहे. असे खाल्ल्यावर अजून जास्त स्वादिष्ट लागतील”, अबिद्युत म्हणाला. त्यानेसुद्धा तिच्यासारखे खाण्यास सुरुवात केली.

कार्मा व अबिद्युतने सर्व फळांचा फडशा पाडला. अबिद्युत एका कोपऱ्यात जाऊन झोपला व घोरू लागला. कार्मा जिथे होती त्याच ठिकाणी बसून बछड्यांकडे पाहत होती. बछडे परत दमून झोपी गेले होते. त्यांचे पोट पूर्ण आकसले होते. कार्मा त्यांच्याकडे पाहून विचार करत होती.

एक तास निघून गेला. कार्माला समजले कि तिला दुध आले आहे. ती उठली, बछड्यांकडे गेली व तिने त्यांना चाटायला सुरुवात केली. बछडे जराही वेळ न दवडता जागे झाले व दुधाचा शोध घेऊ लागले. कार्माने त्यांना दुध पाजण्यास सुरुवात केली. ती त्यांना एकमागोमाग एक चाटत होती.

कार्माला परत आधीसारख्याच वेदना जाणवू लागल्या. फक्त पाच मिनिटे उलटली होती. तिला समजले कि तिला आता दुध राहिले नाही. बछडे भुकेने व्याकूळ झाले होते. कार्माला काय करायला पाहिजे काहीच समजत नव्हते. ती काहीवेळ वेदनेत तशीच पडून राहिली. तिन्ही बछड्यांचा मात्र दुधासाठी शोध चालू होता. काहीवेळ तसाच गेला. तिला समजून चुकले कि तिथे वेदनेत पडून राहून तिची किंवा बछड्यांची काहीही मदत होणार नाही. ती उठली आणि अबिद्युतकडे गेली. बछडे तिच्याकडे पाहत ओरडत होते, दुध पिण्यासाठी तिला बोलवत होते. अबिद्युत घोरत गाढ झोपला होता.

“अबिद्युत, अबिद्युत.” कार्मा त्याला जागे करण्याचा प्रयत्न करत होती. “अबिद्युत उठ. मला तुझी गरज आहे. एक तातडीचं काम आहे. अबिद्युत.”

“काय आहे?” अबिद्युत म्हणाला. त्याचे डोळे बंद होते.

“अबिद्युत अरे इकडे बघ. जागा हो. उठ लवकर अबिद्युत. मला तुला काहीतरी सांगायचे आहे.” कार्माने त्याला तीच्या पंजाने हलवले.

अबिद्युतने त्याचे डोळे किंचित उघडले. “आता काय? मला झोपू दे. मी दमलो आहे. तू सुद्धा जा आणि थोडा आराम कर.”

“अबिद्युत, मला जेवायला पाहिजे”, कार्मा म्हणाली.

“पण आपण आत्ताच तर खाल्ले होते. मला थोडा आराम करू दे. जा आणि झोप.” अबिद्युत म्हणाला. त्याने अजूनही त्याचे डोळे उघडले नव्हते.

“अबिद्युत अरे उठ”, कार्मा म्हणाली. तिने विचार करत थोडावेळ वाट पाहिली. अबिद्युतकडून तिला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. ती अस्वस्थ झाली आणि म्हणाली, “मला आपल्या नात्याचा पश्चाताप वाटेल असं वागू नकोस.”

“काय? तू काय म्हणालीस?”, अबिद्युत म्हणाला. तो त्याच्या जागेवर ताडकन उभा राहिला.

“मी हे तुला शेवटचे सांगत आहे. जा आणि कशाचीतरी मोठी शिकार कर. मला मांस पाहिजे.”

“तुला माहित आहे कि हे अशक्य आहे.”

“नाही. मला तुझ्या तोंडातून अशक्य हा शब्दच ऐकायचा नाही. नाहीतर हा आपल्या नात्याचा शेवट असेल.”

“तुला असे वाटत नाही का कि तू हे जास्त खेचत आहेस?”

“नाही. मी अजून खेचायला सुरुवात केली नाहीये. मला फक्त एवढेच सांग कि तू माझ्यासाठी मांस आणणार आहेस. मला आत्ता फक्त हि एकंच गोष्ट ऐकायची आहे.”

“जसे कि मी तुला याआधी सांगितले, हे शक्य नाही. माझी काही मुल्ये आहेत. मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही.”

“माझ्यासाठीही नाही?”

“तुझ्यासाठीही नाही.”

“जर मी म्हणाले कि हे आपल्या बछड्यांसाठी आहे तर?”

“त्यांच्यासाठीही नाही. मी माझ्या विचारांसाठी जगतो. माझे विचार माझ्यासाठी सर्वकाही आहेत आणि सर्वांपेक्षा मोठे आहेत. ते माझे जीवन आहेत, माझे सर्वस्व आहेत. त्यांच्याशिवाय मी काहीही नाही, फक्त एक साधारण प्राणी आहे.”

“हो तू बरोबर आहेस. तू काहीच नाहीस.”

“काय बोललीस तू आत्ता? परत बोल.”

“हो तू बरोबर ऐकले आहेस. तू कोणीही नसून फक्त एक मूर्ख आहेस. आई आणि बाबा बरोबर होते. त्यांनी मला तुझ्यापासून लांब राहायला सांगितले होते. पण मी त्यांच्यासोबत लढले. माझीच निवड चुकली. मी तुझ्या प्रेमात वेडी झाली होते ज्याने मी आंधळी झाले, मला माझे भविष्य दिसले नाही. पण ते बरोबर होते आणि ते का बरोबर होते ते आता मला समजत आहे.” कार्मा एका क्षणासाठी थांबली, एक मोठा श्वास घेतला आणि परत बोलू लागली, “तू तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे कि तू सर्वात श्रेष्ठ आहेस. पण तू फक्त एक असा प्राणी आहेस ज्याला स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्यायला येत नाही. अरे तुला स्वतःचंच पोट भरायला येत नाही, तू काय पूर्ण कुटुंबाची काळजी घेणार. स्वतःचे निरीक्षण कर. स्वतःकडे निरखून बघ एकदा, तुला तुझी चूक कळून येईल. असा प्राणी दुसऱ्याचा आदर्श कसा बनू शकतो? तुझे सर्व विचार अर्थशून्य आहेत. आता वेळ आली आहे कि तू तुझे हे अर्थशून्य विचार फेकून दे. आपले बछडे इथे मरणाच्या दारात आहेत त्यांचा विचार कर. मी तुला परत एकदा विचारत आहे, तू मला जे पाहिजे ते पुरवू शकतो कि नाही? उत्तर दे. ” कार्माने निश्वास सोडला. ती वेगात श्वास आत-बाहेर घेत होती. तिचे डोळे लालबुंद झाले होते. अबिद्युत कार्माचे बोलणे ऐकत वेगात इकडून तिकडे फिरत होता.

अबिद्युत कार्माचे बोलणे संपल्यानंतर एका जागेवर थांबला. तो काहीच बोलत नव्हता. त्याचेही डोळे लालबुंद झाले होते, पंजे जमिनीत धसले होते. तो खोडाच्या एका जागेवर एकटक पाहत होता.

“मी तुला काही विचारले आहे”, कार्मा म्हणाली. “मला उत्तर पाहिजे.”

“मला काहीच बोलण्याची इच्छा नाही”, अबिद्युत म्हणाला. “तू खूप काही बोलून गेलीस. माझा विश्वास होता कि तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस, माझ्या विचारांवर तू ठाम आहेस. पण आज तू माझा विश्वास मोडला. मला आज कळले कि तुझे माझ्यासाठीचे प्रेम किती क्षणिक होते. एक समस्या आली नाही तोपर्यंत तुझे माझ्यावरचे प्रेम संपले. आता मला-” कार्मा अबिद्युतचे बोलणे मधेच तोडते.

“काय म्हणालास?”, कार्मा म्हणाली. “माझे तुझ्यावरचे प्रेम क्षणिक होते. असे तू कसे बोलू शकतोस? मी तुझ्यासाठी माझ्या आई-बाबांना सोडून आली. माझ्या मित्र-मैत्रिणींना सोडून मी तुझ्यासोबत एकांतात राहणे पसंद केले. माझे विचार, राहणीमान मी तुझ्यासाठी बदलले. आणि तू आता असे बोलतोस?”

“हो. कारण मला वाटले होते कि तू माझ्यावर माझे विचार समजून घेऊन प्रेम केले. तू माझ्यावर जितके प्रेम करतेस तितकाच आदर माझ्या विचारांचा देखील करतेस असे वाटले होते. पण तू मला चुकीचे ठरवले. तू माझ्या विचारांची खिल्ली उडवली. आता बस्स. मी खूप सहन केले, खूप ऐकले. आता मला तुझ्या तोंडातून एकही शब्द ऐकायचा नाही. तुला भूक लागली आहे ना? ठीक आहे. मी तुझ्यासाठी तुला पाहिजे ती आणि पाहिजे तेवढी फळे घेऊन येतो. तू खूप खा आणि आराम कर. तू फक्त आणि फक्त आपल्या पिल्लांची काळजी घे, बाकी काहीही करू नकोस. पण कृपा करून मला शिकार करायला सांगू नको. कारण तू कितीही सांगितले तरी मी ते करणार नाही. मी मरून जाईल पण शिकार करूच शकणार नाही. मी आता इथे बाजूला बसत आहे. तुला जेव्हापण पाहिजे तेव्हा मला सांग, मी लगेच जाऊन तुला पाहिजे तेवढी, पाहिजे तशी फळे घेऊन येईल.” अबिद्युत इतके एका कोपऱ्यात जाऊन बसला.

कार्मा अबिद्युतकडे एकटक पाहत होती. तो तीच्या डोळ्यात डोळे मिळवणे टाळत होता. कार्मा बछड्यांजवळ गेली. त्यांचे पोट आत खचले होते व सर्व बरगड्या दिसत होत्या. तिने कशाचाही विचार केला नाही आणि वेलींतून मार्ग काढत बुंध्यातून बाहेर निघू लागली. तिने मागे वळून एक क्षण बछड्यांना पाहिले. तिन्ही बछडे एकमेकांना बिलगून झोपले होते. तिला बछड्यांना मनसोक्त चाटायची तीव्र इच्छा झाली. ती परत मागे वळून गुहेतून बाहेर निघाली.

कार्मा वेलींमधून वाट काढत खोडातून बाहेर आली होती. तिने तिच्याकडे होते नव्हते ते सर्व बळ शिकार करण्यासाठी एकवटले. ती एक क्षण जागेवर उभी राहिली, चहुबाजूला डोळे फिरवले, आणि पुढे चालायला लागली.

“कुठे चालली आहेस?” अबिद्युत कार्माच्या मागे आला होता.

“तू बाहेर का आलास?”, कार्मा म्हणाली. “आपले बछडे तिथे एकटे आहेत. तू लगेच मागे फिर. मी नसताना त्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे.”

“पण तू कुठे निघाली आहेस? तू जा ना आपल्या बछड्यांकडे. मी जातो आणि फळे घेऊन येतो.”

“नाही. मला फळे खायची नाहीत. मी शिकार करायला निघाली आहे. तू जा बछड्यांकडे.”

“तू हा मांस खायचा हट्ट का धरून बसली आहेस? मी फळे घेऊन येतो ना. तू परत जा. बछड्यांना तुझी जास्त गरज आहे.”

“तू माझ्यासाठी शिकार करणार का?”

“नाही.”

“म्हणजे तुला अजून काहीच समजले नाही. ठीक आहे. मी माझ्या बछड्यांचे भविष्य तुझ्या विचारांवर सोडू शकत नाही. माझा स्वतःवर विश्वास आहे. तू जा आणि मी येईपर्यंत त्यांना सांभाळ. मी शिकार घेऊन येते.”

“तू लवकरच मोकळ्या हाताने परत येशील, दमल्यावर”, अबिद्युत म्हणाला. तो मिश्किलपणे हसत होता.

“शिकार करण्याची हि काही माझी पाहिली वेळ नाही”, कार्मा म्हणाली.

अबिद्युत मागे वळून परत निघून गेला. कार्मा त्याच्याकडे तो वेलींमधून खोडात आत जाईपर्यंत बघत राहिली. तो दिसेनासा झाल्यावर कार्माने परत तीचा मोर्चा शिकार करण्याकडे वळवला.

कार्मा शिकारीच्या शोधात हळूहळू पुढे चालत होती. खडकांवर चालता चालता मधेच तीचा तोल जात होता. एका दगडावरून चालताना तोल जाऊन ती खाली पडली. तिचे पाय तिचे स्वतःचेच वजन पेलण्यात असमर्थ होते व थरथर कापत होते. ती उभी राहिली व परत दगडांमधून वाट काढू लागली.

कार्मा गुहेपासून काही अंतर दूर चालल्यानंतर एका ठिकाणी थांबली. तिने आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण केले. एका बाजूला उंच गवत वाढले होते. ती त्या गवतामध्ये जाऊन लपली. गवतातून काही प्राणी दिसत होते. ती त्यातील एखाद्या प्राण्याची जवळ येण्याची टक लावून वाट पाहू लागली. तिला एक प्रौढ हरीण गवत खात तीच्या जवळ येताना दिसले. तिने त्याच्यावर हल्ला करण्याची घाई केली नाही. हरीण गवत खाण्यात दंग होते. त्याचे आजूबाजूला लक्ष नव्हते. ते गवत खाण्याच्या नादात कार्माच्या अगदी जवळ पोहोचले. दबा धरून बसलेल्या कार्माने हरीण तीच्या कचाट्यात सापडल्याचे पाहताच त्याच्यावर एकदम झडप घातली. हरीण कार्माने झडप घालताना हालचाल झालेली समजताच सावध झाले व वेगात विरुद्ध दिशेला धावू लागले. कार्माने त्याचा पाठलाग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हरीण चपळ होते व तिला काही समजायच्या आत ते तिला दिसेनासे झाले. ती हरिणाला काहीच ईजा पोहोचवू शकली नाही.

कार्माने शिकार करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता. त्या एका प्रयत्नात तिला धाप लागली. तीच्या अंगात पूर्वीसारखी चपळता, ताकद, काहीच राहिली नव्हती. ती बाजूला जाऊन एका झाडाखाली बसली. तिला तहान लागली होती. पाणवठा तिथून दूर जंगलाच्या मध्यात गुहेच्या विरुद्ध दिशेला होता. ती तिथेच शांत बसून राहिली.

कार्मा काहीवेळ विश्रांती केल्यानंतर परत एकदा शिकार करण्यास सज्ज झाली. ती समोर जाऊन गवतात लपली व नवीन शिकार कधी येते याची वाट पाहू लागली. तिला समोरून एक रानडुक्कर येताना दिसले. एक वर्ष भूतकाळातील कार्माने रानडुकरावर हल्ला करण्याआधी जराही मागेपुढे पाहिले नसते. पण यावेळी परिस्थिती उलट होती. कार्मा जराही हालचाल न करता गवतामध्ये जमिनीला अलगद चिकटून बसली. रानडुक्कर गवताचे शेंडे खाण्यात मग्न होते. ते तसेच गवताचे शेंडे तोडत तिच्यापासून बराच अंतर दूर गेले. तिने सुटकेचा निश्वास सोडला. ती परत शिकार करण्यास सज्ज झाली. कार्मा गवतात एका जागेवर उभी राहून मान उंच करून शिकारीसाठी कोणते प्राणी दिसतात ते पाहू लागली. एका बाजूला कोल्ह्यांचा कळप पळत होता. तिने दुसऱ्या बाजूला पाहिले. झाडांवर माकडे धिंगाणा घालत होती. तिला काही अंतरावर हरणांचा कळप झाडाची पाने, गवत खाताना दिसला. कळपामध्ये काही नवजात हरीण होते. ती अजून सोपी शिकार दिसते का ते पाहू लागली. तिला एक ससा गवतातून पळताना दिसला. तिने ससा दिसेनासा होईल म्हणून लगेच त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. ससा लगेच एका बिळात जाऊन लपला. कार्मा बिळासमोर येऊन थांबली. तीच्या चेहऱ्यावर समाधान होते. ससा आकाराने मोठा होता व त्याला दुसरीकडे जायला जागा राहिली नव्हती, तो बिळात अडकला होता. तिने जराही वेळ न दवडता बिळाच्या बाजूची माती पंजाने बाजूला करण्यास सुरुवात केली. ती तीच्या बछड्यांचा विचार करत होती व जोरजोरात माती बाजूला काढत होती. काही क्षणातच कार्माचे शरीर तिची सोबत सोडू लागले. तीचा माती काढण्याचा वेग मंदावला. तिला दरदरून घाम फुटला व तिचे पंजे सुन्न पडले. ती जागेवर कोसळली. तिला प्रचंड तहान लागली होती. ती हालचाल करण्याचा, उठण्याचा मानसिक प्रयत्न करत होती पण तो निष्फळ ठरत होता. तिला तिचे शरीर जड झाल्याचे जाणवले. आता मरण निश्चित आहे याची जाणीव तिला झाली. ती हालचाल न करता डोळे मिटून तिथे तशीच निपचित पडून राहिली. तिने हार स्वीकार केली होती.

कार्माचे अंग घामाने भिजले होते व अंगाला माती चिकटली होती. अचानक तीच्या कानांवर बछड्यांचा आवाज आला, जणू तिचे बछडे तिला त्यांच्याजवळ बोलावत होते. तिने डोळे उघडले, अंगात उरलेले सर्व बळ एकवटून ती उभी राहिली. तिने आजूबाजूला काहीही न पाहता परत सस्याचे बीळ खोदण्यास सुरुवात केली. तिचे पंजे लवचिक झाले होते. ती बिळाची माती बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती परंतु त्याचा उपयोग होत नव्हता. तिचे पंजे मातीवर वरच्यावर फिरत होते, तसूभरही माती बाजूला होत नव्हती. तरीही तिने हळूहळू तीचा प्रयत्न चालूच ठेवला.

कार्मा एकावेळी एका पंजाने बिळाची माती बाजूला सारत होती. तो पंजा सुन्न झाला कि त्याला आराम देऊन दुसऱ्या पंजाने काम करत होती. माती बाजूला करत असताना तिला तीचा पंजा सस्याच्या शेपटीला लागल्याचे जाणवले. तसा सस्याने बिळात आणखी खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. तिने घाई न करता तीच्या पंजांची अदलाबदल चालू ठेवली. कार्माच्या कानावर तीच्या मागे कोणीतरी हसत असल्याचा आवाज आला. तिने त्या आवाजाकडे प्रथम दुर्लक्ष केले व स्वतःचे ध्यान लक्षावर केंद्रित ठेवले. परंतु कालांतराने कानावर येणारा हसण्याचा आवाज जसा मोठा झाला तसा तीचा जीव तीच्या गळ्यात येऊन अडकला. ती भीत-भीत मागे वळली. तीच्या समोर पाच तरसांचा कळप उभा होता जो तिच्याकडे पाहून हसत होता. त्यातील प्रत्येक तरसाची शरीरयष्टी कार्माच्या तिप्पट होती. त्यांच्या तीक्ष्ण दातांमधून लाळेच्या धारा वाहत होत्या. प्रत्येकाचे पोट गलेलठ्ठ जाड व दगडासारखे टणक दिसत होते. तरस कार्माला चहूबाजूंनी घेराव घालू लागले. कार्माने डरकाळी फोडली. तिची कमकुवत डरकाळी ऐकून तरस हसू लागले व तीच्या दिशेने वेगात कूच करू लागले. कार्मा तिचे सर्व बळ एकवटून गुहेच्या दिशेने धावू लागली परंतु ती तोल जाऊन जागेवर पडली. ती एकापाठोपाठ एक अबिद्युतला हाका मारू लागली. ती गुहेपासून जास्त अंतर दूर नव्हती. ती परत उठली आणि धावू लागली. तीचा धावण्याचा वेग तरसांच्या चालण्याच्या वेगापेक्षा कमी होता. कार्माच्या कानी तरसांचा तीच्या मागे हसण्याचा आवाज येत होता. तिने धावण्याचा वेग वाढवला तरीही तरसांचा हसण्याचा आवाज कमी झाला नाही. कार्माच्या मनात एक विचार आला कि जर तरस तीचा पाठलाग करत गुहेपर्यंत पोहोचले तर ते तीच्या बछड्यांना जीवे मारतील. कार्मा त्या विचारामुळे जागेवर स्तब्ध झाली. तिला मागे वळून पाह्ण्याचासुद्धा अवकाश मिळाला नाही तोपर्यंत तरसांनी तिच्यावर हल्ला चढवला. ती जमिनीवर कोसळली. ती तरसांवर नखांने वार करू लागली, त्यांना चावण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु त्यांची चमडी इतकी जाड होती कि तीच्या हल्ल्याचा त्यांवर काहीच परिणाम झाला नाही. तरस कार्माच्या अंगाचे सर्व बाजूंनी लचके तोडू लागले. कार्माने त्यांचा प्रतिकार करणे सोडून दिले.

कार्मा तरसांच्या हल्ल्यात पूर्णपणे जखमी झाली होती. तेवढ्यात तिला तिथे अबिद्युत आलेला दिसतो.

“अबिद्युत!” कार्मा जीवाच्या आकांताने ओरडते. तीच्या जीवात जीव येतो. अबिद्युत एका मोठ्या खड्कामागे उभा होता व थरथर कापत होता.

“अबिद्युत मला वाचव.” कार्मा हाक देत होती. अबिद्युतचे पाय आहे त्या ठिकाणी गोठले होते.

“अबिद्युत, अबिद्युत.” कार्माच्या डोळ्यात पाणी आले. ती डोळे मिटते. तिचे बछडे तीच्या डोळ्यांसमोर येतात. तरसांचे उतावीळ होऊन कार्माच्या पोटाचे, मांडीचे, तोंडाचे लचके तोडणे चालू होते. अबिद्युत खड्कामागे एका जागेवर स्तब्द उभा राहून सर्व दृश्य पाहत होता.

इतर रसदार पर्याय