Sanjay - 2 books and stories free download online pdf in Marathi

संजय - भाग 2

संजय भाग दोन

आज ती कौरव मंडळी लहानाची मोठी होत होती. त्यांच्यावर कुसंस्कार पडत चालले होते शकुनीचे. शकुनी तसा बुडवायलाच लागला होता हस्तीनापुरला. तो षडयंत्र करीत होता हस्तीनापुरसोबत. परंतू ती बाब ब-याच हस्तीनापुरातील लोकांच्या लक्षात येत नव्हती. काहींच्या लक्षात येत होती. ते पर्यायानं धृतराष्ट्रला टोकतही असत. परंतू धृतराष्ट्र मी विवश आहे असा हवाला देवून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असे. अशाच टोकणा-यात होता संजय.
संजय क्रिष्णाचा भक्त होता. तसं पाहता तो धार्मीकही होता. त्यातच तो नित्यनेमानं धृतराष्ट्रला समजावीत असे. सांगत असे की शकुनी आपल्या बाळांवर कुसंस्कार टाकतोय. त्याला थांबवावं. परंतू त्यावर धृतराष्ट्र आपल्या मुलांना ताकीद न देता त्यांच्या चुकांवर पांघरुण घालत असे.
आज समुळ स्वरुपात कुरुवंशाचा नाश झाला होता. अधर्मावर धर्मानं विजय मिळवला होता. काय मागणी होती धर्माची. फक्त त्यांचा हक्क मिळावा. परंतू दुर्योधनानं म्हटलं होतं की ही माझ्या काकाची मुलं नसून वनात एका वेगळ्या पद्धतीनं झालेली मुलं आहेत. त्याला नियोग पद्धती मान्य नव्हती. त्यामुळंच दुर्योधन म्हणत होता की मी अगदी सुईच्या टोकावर मावेल एवढीही भुमी पांडवांना देणार नाही.
हस्तीनापुर अखंड राज्य होतं. त्याचा विस्तार भिष्मानं युद्ध लढून बराच केला होता. अनेक राजे भिष्माचा पराक्रम पाहून मांडलिक झाले होते. त्यातच अशा विस्तारीत केलेल्या अखंड प्रदेशाचे दुर्योधन दोन तुकडे करु पाहात नव्हता. शेवटी वडीलधारी मंडळींनी समजविल्यामुळं पांडवांना पाच गावं दिली गेली. त्यातील इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थ हा जो भाग पांडवांना देण्यात आला होता. तो बंजर झालेला भाग होता. तिथं कोणीही जीवंत राहात नसे. याच इंद्रप्रस्थला असाही एक भाग होता की ज्याला खांडववन म्हणत.
इंद्रप्रस्थ........इंद्रप्रस्थच्या बंजर भागावर मेहनत करुन पांडवानं त्याचं नंदनवन बनवलं. त्याचं स्वरुपही बदलवलं. त्यामुळंच त्याची चर्चा आजुबाजूच्या प्रदेशात पसरली. त्यातच इंद्रप्रस्थ नगरी बनून तयार झाल्यावर पांडवांनी राजसुर्य यज्ञ केला. त्यावेळी त्यांनी देशोदेशीच्या राज्याला आमंत्रणं पाठवली. त्यातच ते निमंत्रण दुर्योधनालाही आलं.
दुर्योधनाला राजसुर्य यज्ञाचं आमंत्रण मिळताच तो इंद्रप्रस्थला रवाना झाला. त्यावेळेस त्यानं इंद्रप्रस्थची भव्यता अनुभवली. त्यावेळेस त्यानं पाण्याच्या सजावटीच्या जागेला पाण्याची जाग न समजता जमीन समजल्यानंतर तो पाण्यात पडला. त्यावेळेस तिथं उपस्थीत द्रोपदी हसली. त्याची चीड आल्यानं व तो त्याला स्वतःचा अपमान वाटल्यानं भविष्यात त्यानं द्युतक्रिडेचं आयोजन केलं होतं.
चौसरचा खेळ रंगला होता. पांडव प्रत्येक डाव हारत चालले होते. शकुनी फासे फेकत होता. ते फासे त्याच्या वडीलाच्या अस्थीचेच बनवले होते. त्यामुळंच तो म्हणेल तेवढेछ आकडे यायचे व युधिष्ठीर बाजी हारायचा.
बाजी पुर्ण फसली होती. इंद्रप्रस्थ हातचं निघून गेलं होतं. तो स्वतःलाही गमवून बसला होता. आता डाव होता आपल्या भावाला डावावर लावण्याचा. युधिष्ठीरनं तेही केलं होतं. त्यानं एकएक करीत सर्व भावांना डावावर लावलं होतं व सर्वांना तो गमवून बसला होता. आता सर्व संपलंय असा विचार करीत युधिष्ठीर डोक्यावर हात ठेवून बसला होता. तो दुःशासन म्हणाला,
"आणखी एक वस्तू राहिली डावावर लावण्यासाठी."
ते बोलणं. तसं सर्वांनी ऐकमेकांकडं पाहिलं. तसं कोणीतरी विचारलं,
"कोणती वस्तू राहिली?"
"भाभी. द्रोपदी राहिली ना डावावर लावण्यासाठी."
"नाही. ती माझी भार्या आहे. मी तिला डावावर लावणार नाही."
ते युधिष्ठीरचे शब्द. तसा शकुनी बोलला,
"युधीष्ठीरा, तुझी पत्नी म्हटलं तर, साक्षात लक्ष्मी. जर तिचा आशिर्वाद मिळाला आणि तू डाव जिंकला तर सारं दुर्योधन परत करेल. हे राज्य आणि तुझ्यासह हे तुझे बांधवही. बोल काय वाटतं तुला? तुला हे सर्व पाहिजे की तुझी पत्नी. हो ना रे दुर्योधना."
"होय. ती एक वस्तू आहे तुमच्याजवळ. सारं परत करायला मी तयार आहे. हारशिल तर एकच वस्तू ना. सर्व तर गेलंच तुझं
आता तिलाच वाचवून का ठेवतोस? खेळून पाहा शेवटचा डाव. कदाचीत तुझा भागोदय होईल."
"नाही. मी तिला अजिबात लावणार नाही."
"पाहा.......विचार कर. विचार कर. सारं मिळवायचं की सारं समाप्त करुन वनात जायचं कायमचं."
युधिष्ठीर विचार करु लागला. त्याच्या लक्षातच येत नव्हता तो कुटील डाव. तो विचार करीत होता की मी बेकारच खेळलो हा कुटील डाव. खेळणार नव्हतोच मी. परंतू काय करु. खेळावा लागला. उकसवलं या शकुनीनं डाव खेळायला. आतं तर सगळंच गेलं. काही बाकी राहिलं नाही. राज्य गेलं. भाऊबंद गेले. आता शेवटची उरली ती माझी पत्नी द्रोपदी. तीच बाकी आहे. मग तिलाच कशाला उरवून ठेवू? कदाचीत तिच्या पायगुणानं जिंकलो तर........तर कदाचीत हे राज्य अन् माझे भाऊबंदही मला परत मिळतील. अन् हारलोच तर ती गेली तर गेली. तसंही पाहिलं तर, सारंच गेलं आहे ना. बाकी तर काहीच राहिलं नाही. मग द्रोपदीलाही का उरवायचं.
त्याचं मन. हे त्याचं मन त्याला खात होतं. तसं पाहता आता त्यानं स्वतः मनानं विचार केला. विचार केला की आपण द्रोपदीला डावावर लावायचं. जिंकलो तर सारं मिळेल. हारलो तर हारलो.
युधिष्ठीरनं मनात केलेला विचार. तो विचार गृहीत धरुन युधिष्ठीरनं त्या द्युतक्रिडेत द्रोपदीला डावावर लावलं. तसे शकुनीनं फासे फेकले आणि आश्चर्य. ते फासे फेकताच डाव गडगडला. युधिष्ठीर पुन्हा फाशात फसला व हारला.
युधिष्ठीर हारला होता द्युतक्रिडेत. त्यानंतर त्यानं मान खाली घातली. तसा त्याला पश्चाताप होत होता. त्यानं तसं मान खाली घालताच त्याचे सर्व भाऊबंदही मान खाली घालून होते.
द्युतक्रिडेत युधिष्ठीर द्रोपदीला हारुन बसला होता. तसा दुर्योधनाचा बदला पुर्ण झाला होता. कारण त्या द्रोपदीनं ती इंद्रप्रस्थला असतांना दुर्योधनाचा अपमान केला होता. ज्यावेळेस दुर्योधन इंद्रप्रस्थला पाहूणा म्हणून गेला होता. तेव्हा तेथील भुलभुलैयात तो फसला होता व त्या भुलभुलैयात फसून तो पडला होता. ते पाहात असतांना द्रोपदी हसली होती. ती केवळ हसलीच नव्हती तर ती आंधळ्याचा मुलगा आंधळाच अशी उपहासानं म्हणाली होती. त्यामुळंच ते उपहासाचं बोलणं. ते बोलणं त्या दुर्योधनाला अपमान वाटला होता. त्या दिवसापासूनच त्यानं ठरवलं होतं की आपण आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा. तसं पाहता त्याच प्रसंगाची तो वाट पाहात होता.
तो प्रसंग. तो प्रसंग आज चालून आला होता. आज युधिष्ठीर द्युतक्रिडेत द्रोपदीला हारल्यानं चालून आलेली संधी तो गमवू पाहात नव्हता. ती संधी येताच दुर्योधन दुःशासनाला म्हणाला,
"दुःशासना, जा. अन् द्रोपदीला घेवून ये. ही माझी मांडी तिला बसविण्यासाठी तयार आहे. तसं पाहता आता ती आपली दास आहे."
ते शब्द. ते शब्द ऐकताच युधिष्ठीरला दुर्योधनानं एक चापट गालपटात जोरात मारल्यासारखी वाटली. त्यानं मनोमन दातओठ खाल्ले. त्याचबरोबर त्याच्या भावांनीही. परंतू ते आता दास बनले होते. दास हे गुलामच असतात.
तेच ते शब्द. ते शब्द ज्याप्रमाणे युधिष्ठीरनं ऐकले. तसे ते शब्द दुःशासनानंही ऐकले. तसा तो म्हणाला,
"बंधू, ती नाही आली तर......?"
"तर ओढत आण. फरफटत आण. अन् तसंही नाही आणता आलं तर केसं पकडून फरफटत आण. कसंही करुन आण म्हणजे झालं."
"ठीक आहे बंधू. जातो मी आता आणि आणतोच तिला. अशी नाही आली तर ओढत आणतो एखाद्या जनावरासारखं. मलाही पाहायचं आहे त्या द्रोपदीला तुमच्या मांडीवर बसलेलं."
दुर्योधनानं आदेश देताच दुःशासन द्रोपदीच्या महालाकडे निघाला. तो गेल्यावर सारे दरबारी गप्प होते. परंतू संजय बोलत होता. म्हणत होता,
"महाराज, द्रोपदी तुमची पुत्रवधू आहे. जरा थांबवा हे कृत्य आपल्या मुलाच्या हातून घडणारं. कारण मला यातून हस्तीनापुरच्या विनाशाचे चिन्हं दिसत आहेत."
ते संजयचं बोलणं. तसं त्या बोलण्याकडं धृतराष्ट्रनं दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्या भरल्या सभेत द्रोपदीला दुःशासनानं केस धरुन ओढत फरफटत आणलं. त्यानंतर तिची विटंबनाही केली गेली. एवढंच नाही तर तिला आणि तिच्या पतींना बारा वर्षाच्या वनवासासाठी व एका वर्षाच्या अज्ञातवासासाठी पाठविण्यात आलं. त्यातूनच महाभारताच्या अठरा दिवस चाललेल्या युद्धाची बीजं रोवली गेली व संपूर्ण कौरव वंशाचा नाश झाला.
युद्ध सुरु होणार होतं. तसं पाहता ते युद्ध होवू नये म्हणून सर्वांनीच प्रयत्न केले. त्यात विशेष म्हणजे क्रिष्ण आणि वेदव्यासाचा समावेश आहे. क्रिष्णानं यासाठी प्रयत्न केला. कारण दुर्योधन हा त्याचा व्याही होता तर व्यासांनी यासाठी प्रयत्न केला. कारण व्यास हा धृतराष्ट्र आणि पंडूचा पिता होता. व्यासाला माहीत होतं की जर यात पांडव मरण पावले तर आपलीच नातवंड मरतील आणि कौरव मरण पावले तरही आपलेच नातवंड मरतील. याच हव्यासामुळं व्यास अडवत चालला होता. तो हस्तीनापुरला वाचविण्याचे प्रयत्न करीत होता. परंतू त्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले. त्याचं कारणही तसंच होतं. दुर्योधन हा शकुनीनं चढवलेला एक अजगर होता. तो सर्व परीनं हस्तीनापुरातील राजगादी गिळंकृत करु पाहात होता. तो शकुनीचंच ऐकत असे नव्हे तर शकुनीच्याच विचारानं चालत असे. मग तो शकुनीचं बरोबर आहे की नाही याचा विचार करीत नसे वा त्याची कोणत्याही स्वरुपाची शहानिशा करीत नसे.
सर्वांनी आपआपल्या पद्धतीनं सर्वांना समजावून पाहिलं. युद्ध टाळण्याचे बरेच प्रयत्न झालेत. परंतू युद्ध टळलं नाही. व्यास आणि क्रिष्णानंही प्रयत्न केले. परंतू ते सारे फोल ठरले. संजयनंही धृतराष्ट्रला बरेचदा समजावून सांगीतलं. परंतू तोही अपयशी ठरला. त्यातच संजय चूप बसला. त्यामुळंच की काय आता युद्धाला रोकता येत नव्हतं. ते सुरु होणारच होतं.
युद्ध सुरु झालं होतं. संजय एक बातमीदारच नाही तर एक योद्धाच होता. त्यानं युद्ध सुरु होताच आपणही कौरवाचे देणे लागतो असा विचार करुन त्यानं सुरुवातीस भाग घेतला आणि तो युद्ध लढू लागला. तोच त्या युद्धात त्याच्यासमोर सात्यकी आला.
सात्यकी समोर येताच त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले. एकमेकांचे बाण एकमेकांना लागायला लागले. तसे ते दोघंही रक्तबंबाळ झाले होते. तसा सात्यकी शूरच होता. त्याच्या बाण चालविण्याच्या कलेसमोर संजयचं काहीच चाललं नाही व थोड्याच वेळात सात्यकीनं त्याला बंदी बनवलं.
सात्यकीनं संजयला बंदी बनवलं होतं. तसा तो जीवंतच होता. सारे पांडव त्याला पाहात होते. तसं पाहात असतांना त्या पाच पांडवापैकी भीम म्हणाला,
"याला कशाला जीवंत ठेवता. तसं पाहता कौरवाकडील सारीच मंडळी आपले शत्रू आहेत. त्यामुळंच त्यांना ठार करणू हे आपलं आद्य कर्तव्य आहे."
भीम जे बोलायचं ते बोलून गेला. त्यानंतर ते बोलणं ऐकताच सात्यकीनं म्यानातून तलवार उपसली व आता तो संजयची मान कापणार. तोच तिथं व्यासांचं आगमण झालं.
व्यासानं ते वियोगी दृश्य पाहिलं. तसा ताबडतोब निर्णय घेत तो म्हणाला,
"सात्यकी थांब. त्याचा वध करु नकोस. त्याचा जन्म मुळातच ठार होण्यासाठी झालेला नाही. त्याचा जन्म फार मोठ्या वेगळ्याच कारणासाठी झालेला आहे. त्याला सोडून दे."
ते व्यासाचं बोलणं. ते बोलणं ऐकताच सात्यकीनं त्याला सोडून दिलं व तो दुस-यासोबत युद्ध लढण्यास निघून गेला.
व्यासानं संजयचा जीव वाचवला होता. त्यांचे उपकारच झाले होते संजयवर. तसा संजय आज उपकाराच्या छत्रछायेत होता. व्यासानं त्याला युद्धमैदानातून राजमहालात आणलं. त्यातच त्याला धृतराष्ट्रजवळही आणलं. त्यानंतर त्याला आपल्या युद्धमैदानातून झालेल्या जखमांवर उपचार करायला लावले.
संजय आपल्या कक्षात गेला होता. तोच एकांतवासात असलेल्या धृतराष्ट्रला व्यास म्हणाले,
"पुत्रा, माझ्याकडे दिव्यदृष्टीचं एक वरदान आहे. वाटल्यास त्याचा वापर करुन तू संपूर्ण युद्ध आपल्या स्वतःच्या डोळ्यानं पाहू शकतोस. बोल मी तुला दिव्यदृष्टी देवू काय?"
व्यासाचे ते शब्द. ते शब्द ऐकताच धृतराष्ट्र म्हणाला,
"नाही. मला दिव्यदृष्टी देवू नका. मला नकोय ती दिव्यदृष्टी. कारण मला माहीत आहे की या युद्धात बराचसा नरसंहार होणार आहे. पुत्र हेही माझेच आणि तेही माझेच. कारण माझा भाऊ.....माझा भाऊ पंडू आज काही जीवंत नाही. तो जर आज जीवंत असता तर काळजी नसती मला. त्यामुळं माझे पुत्र मरण पावले तर ते दुःख मलाच होईल आणि माझ्या बंधूचेही पुत्र मरण पावले तर तेही दुःख मलाच होईल. ते दुःख मी पाहू शकणार नाही. असं जर झालं तर मला अतिशय राग येईल व त्या रागाच्या भरात माझा संयम हारवेल व त्यानंतर माझ्यात असलेल्या दिव्य शक्तीच्या भरवशावर मी त्यांनाही नष्ट करेल यात शंका नाही."
व्यास काय समजायचं ते समजले. त्यांना माहीत होतं धृतराष्ट्रमधील अलौकिक शक्तीबद्दल. ती शक्ती तद्नंतरच्या काळात दिसून आली होती. जेव्हा युद्ध समाप्त झालं होतं व धृतराष्ट्रला भीमाला आलिंगण करायचं होतं. त्यावेळेस धृतराष्ट्रसमोर क्रिष्णानं सांगीतल्याप्रमाणे पाषाणी पुतळा नेला होता. तेव्हा त्या धृतराष्ट्रनं त्या पुतळ्याला आलिंगण देताच त्या पुतळ्याला पुर्णतः चकनाचूर केलं होतं.
व्यासांना धृतराष्ट्रनं म्हटलेले शब्द. तसा व्यास समजदारच होता. दिव्यदृष्टीचा दाता होता. तो म्हणाला,
"ठीक आहे पुत्रा, मी तुझी व्यथा समजतो. परंतू तुही या युद्धापासून अंधारात राहायला नको. मी संजयला दिव्यदृष्टी अर्पण करतो. जेणेकरुन तो तुला त्या दिव्यदृष्टीनं पुर्णतः युद्धमैदानातील हालचाल सांगू शकेल."
"ठीक आहे." धृतराष्ट्र म्हणाला.
व्यासांनी धृतराष्ट्रनं दिव्यदृष्टी नाकारताच संजयला दिव्यदृष्टी प्रदान केली. त्यानंतर संजयनं यथोचीत संपुर्ण युद्धभुमीतील वर्णन जसेच्या तसे धृतराष्ट्रला सांगीतले. त्यात त्यानं अगदी खरं खरं सांगीतलं. कोणताही भाग लपवून ठेवला नाही. मग त्या ब-यावाईट घटना का असेना. तोच जगातील पहिला बातमीदार ठरला. कोणी याला दिव्यदृष्टी म्हणतात तर कोणी त्याला वास्तविकता. वास्तविकता अशी की संजय सकाळीच अगदी पहाटेला युद्धमैदानावर जात असे व पहाटे पासून तर अगदी अंधार पडेपर्यंत युद्ध मैदानावरील वर्णन करीत असे. तो सभोवताल फिरत असे आणि ती माहिती हस्तीनापुरात येवून व्यासानं आदेश दिल्यानुसार धृतराष्ट्रला सांगत असे अगदी हुबेहुब. त्याच किंचीतही लहानशीही गोष्ट तो लपवीत नसे.
त्यानं संपूर्ण युद्धभुमीचं वर्णन केलं होतं. त्यात भिष्म कसे मरण पावले? द्रोणाचार्यला कोणत्या डावानं मारलं? कर्ण कसा मरण पावला? त्यानंतर अभिमन्यूला कसं मारण्यात आलं? जयद्रथ कसा पांडवांच्या जाळ्यात सापडला? वैगेरे वर्णन अगदी निःसंकोचपणे धृतराष्ट्रला सांगीतलं होतं. त्यातच शकुनी आणि दुर्योधन दुःशासनासह शंभर कौरव कसे यमसदनास पोहोचले? याचंही वर्णन केलं होतं. आज युद्ध समाप्त झालं होतं.
आज युद्ध समाप्त झालं होतं. परंतू संजयच्या दिव्य ज्ञानानं धृतराष्ट्रला युद्धाच्या ठिणग्या अनुभवता आल्या. तसा विचार केल्यास त्यावेळी हस्तीनापुर ते रणमैदान असलेलं कुरुक्षेत्र याचं जवळपास अंतर दिडशे किमी होतं. ते अंतर अतिशय त्रेधातिरपीट करुन संजय पार करीत असे व यथासांग त्या रणमैदानातील गोष्टी धृतराष्ट्रला सांगत असे. तो होता म्हणून त्या आंधळ्या धृतराष्ट्रला युद्धाचा थरार माहीत पडला. ते घोड्यांचे आवाज, ते योद्ध्यांचे किंकाळणे, तो हत्तीचा चित्कार. तसंच रोजचं त्या योद्ध्यांचं मरण तो धृतराष्ट्रला सांगत असल्यानं प्रत्यक्ष डोळे नसूनही धृतराष्ट्रला ते प्रसंग पाहता आले. तसं पाहता युद्ध समाप्त होताच ती व्यासाकडून संजयला मिळालेली दिव्यदृष्टी समाप्त झाली होती.
युद्ध समाप्त झालं होतं. सर्व कौरव संपले होते. शेकडो अश्व व हत्तीचा ढीग लागला होता. मृतदेह सडत होते. तिथं प्रत्यक्षपणे अगदी दूरपर्यंत दुर्गंधी पसरली होती. तसं पाहता रक्ताचा सडा पडला होता बराच लांबवर.
युद्ध समाप्त झाल्यानंतर त्या गादीवर धृतराष्ट्र जावून पंडू पुत्र युधिष्ठीर विराजमान झाला होता. तोच आता राज्यकारभार पाहात होता. सर्व प्रजा सुखी होती. मात्र धृतराष्ट्र सुखी नव्हता. संजय आजही त्यांची सेवा करीत होता.
संजय नित्यनेमानं त्या आंधळ्या धृतराष्ट्रजवळ राहात असे. त्याचं मन हलकं करीत असे. त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकवीत असे. तसं पाहता त्याचं मनोरंजन करीत असे. परंतू कितीही त्याचं संजय मनोरंजन करीत असला तरी धृतराष्ट्र दुःखी होता. कारण जरी त्याची युधिष्ठीर चांगली सेवाशुश्रृषा करीत असला तरी त्याची सख्खी मुलं आज जीवंत नव्हती. तेच शल्य आज त्याला टोचत असे.

आज त्याला करमत नव्हतं राज्यात. जरी अमाप प्रमाणात अपार सुख असलं तरी. म्हणूनच की काय त्यानं ठरवलं. आपण आता राज्यातून संन्यास घ्यायचा. तसा संन्यास घेवून आपण वनात निघून जायचं. तसा त्याचा निर्णय. तसा तो एकदाचा दिवस उगवला.
तो दिवस. त्या दिवशी धृतराष्ट्रनं युधिष्ठीरला दरबार भरवायला लावला व भरल्या दरबारात कैफियत मांडली. 'मला इथं करमत नाही. मला वनात राहायला जायचं आहे.'
ते धृतराष्ट्रचं बोलणं. तसा त्यावर युधिष्ठीर म्हणाला,
"पिताश्री, आपल्याला माझ्या राज्यात काय कमी आहे की आपण वनात राहायला जायला तयार झाले. वाटल्यास मी आपली याच महालात एक कुटी बांधून देतो."
ते युधिष्ठीरचे बोल. त्यावर धृतराष्ट्र म्हणाला,
"नाही. मला जावू दे युधिष्ठीरा. मलाही राहू दे काही दिवस वनात."
ते धृतराष्ट्रचे बोल. कधी युधिष्ठीर प्रश्न विचारायचा तर कधी धृतराष्ट्र. परंतू दोघंही काही ऐकत नव्हते. ते पाहून शेवटी युधिष्ठीर म्हणाला,
"ठीक आहे पिताश्री. तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा. परंतू कोणालातरी सोबत घेवून जा. तेवढं मात्र करा."
"ठीक आहे पुत्रा." धृतराष्ट्र म्हणाला व त्यावर विचार करु लागला.
तो धृतराष्ट्र त्यावर विचार करु लागला. तसा विचार करता करता तो वैतागला. कारण त्याला बोचत असलेलं शल्य आजही संपलेलं नव्हतं. ते शल्य संपणार नव्हतं.
त्यामुळंच त्यांनी तसा विचार करुन वनात राहायला जायचं ठरवलं व ते युधिष्ठीरला सांगून वनात गेला.
आज ते वनात गेले होते. तसंच वनात जातांना त्यानं कुंती, गांधारी, विदूर व संजयला सोबत नेलं होतं.
धृतराष्ट्र त्या सर्वांसोबत वनात कुटी बांधून राहात होता. संजय त्याची तिथं नित्यनेमानं सेवा करीत होता. सर्व कसे अगदी आनंदानं व गुण्यागोविंदानं राहात होते.
ते अगदी गुण्यागोविंदानं राहात होते. तसं ते जंगल. त्या जंगलात एक दिवस आग लागली.
धृतराष्ट्रचं तो वनात अधिवास. तशी एक दिवस त्या जंगलाला आग लागली व ती आग हस्तीनापुरातील त्या आंधळ्या महाराजांच्या कुटीतही पोहोचली.
धृतराष्ट्रच्या कुटीला आग लागली होती. तसं पाहता तो आंधळा होता. संजय कुठंतरी बाहेर गेला होता. मात्र तिथं गांधारी, कुंती व विदूर होते.
धृतराष्ट्रच्या कुटीला आग लागताच व ती आटोक्यात येत नाही हे पाहून धृतराष्ट्रला वाचविण्यासाठी कुंती व विदूरानं प्रयत्न केला. परंतू त्यात त्यांना यश आले नाही. प्रसंगी धृतराष्ट्रला वाचविण्याच्या प्रयत्नात कुंती व विदूर आगीत जळून मरण पावले. त्यातच गांधारीही. तिनं तर कितीही संकट आलं तरी आपण आपली पट्टी उघडणार नाही असा प्रण डोळ्याला पट्टी बांधताच केल्यानं तिनं ती जंगलाला प्रत्यक्ष आग लागूनही आपल्या डोळ्यावरील पट्टी उघडली नाही. त्यामुळंच तिही त्या आगीत भष्म झाली.
ती आग.......ती आग लागताच संजय वनातून परत आला होता. त्यानं पाहिलं की ती आग जशी जंगलाला लागलेली आहे तशी धृतराष्ट्रच्या कुटीलाही. तसा तो आंधळ्या धृतराष्ट्रचा वरदहस्त होता. कोणी म्हणतात की संजय आंधळ्या धृतराष्ट्रला वाचविण्याच्या प्रयत्नात आगीमध्ये धृतराष्ट्र, कुंती, गांधारी व विदूर यांच्याबरोबरच आगीत जळून भष्म झाला होता तर कोणी म्हणतात की त्याला धृतराष्ट्रनं निघून जा असा आदेश दिला होता.
ती आग....... ती आग लागली होती. तसा वनात गेलेला संजय वनातून परत येताच त्यानं धृतराष्ट्रला आधार देण्याचा प्रयत्न केला. तरीही तो ऐकत नव्हता. ते पाहून त्यानं आदेश दिला. तो आदेश मिळताच संजय तेथून निघाला. तसा तो रस्त्यानं चालत होता.
संजय रस्त्यानं चालत होता. तो विचार करीत चालला होता. त्याला करमत नव्हतं. तसा तो आधीपासूनच धृतराष्ट्रची सेवा करीत असल्यानं त्याला धृतराष्ट्रची आठवण येत होती. तशी त्याला विदूर, गांधारी व कुंतीचीही आठवण यायची. परंतू ती आठवण त्याला जगावंसं वाटत नव्हतं.
संजय चालत होता ती पायवाट. तसं चालता चालता तो हिमालयात पोहोचला. तेथील निसर्गरम्य वातावरणात तो रमला. संजय हिमालयात वास्तव्यास होता. तेव्हा त्याला आठवत होता त्याचा भुतकाळ. त्यानं केलेली पांडवांना मदत. त्यातच त्याला आठवत होती, त्यानं केलेली कौरवांना मदत. तो धृतराष्ट्रला सांगतो,
"कुरुक्षेत्रावर पांडवांनी पश्चिमेला तळ ठोकला तर कौरव सैन्य भीष्मांच्या अधिपत्याखाली पूर्वेच्या बाजूस आहेत. अगदी पहाटे पहाटे पांडवांना कौरवांच्या सैन्यात पांढरीशुभ्र छत्री दिसली. ते राजचिन्हं बघून पांडव वीरांची मने थरारून गेली आहेत. अर्जुन व श्रीकृष्णाने आपआपले शंख फुंकले आहेत. त्याचे प्रत्युत्तर कौरवांनी लागलीच दिले आहे. एकूणच युद्धभूमीवर चैतन्य सळसळत आहे. युद्धाचे नियम ठरविले गेले आहेत. दोन समान वीरांमध्येच युद्ध व्हावे, म्हणजे दोन रथी, दोन धनुर्धर, दोन गदाधर, असे झाले पाहिजे. त्यात एखाद्याने माघार घेतली तर त्याला अधिक छळू नये. जो तयार नसेल अथवा घाबरला असेल त्याला सोडावे. दोघांमध्ये तिसर्‍याने पडू नये. जर शाब्दिक युद्ध असेल तर शब्दांचाच वापर व्हावा. बाण वापरू नये. सेवक, सारथी, घोडे, वाद्य वाजविणारे वादक याच्यावर हल्ला करू नये. असे सर्व नियम ठरले आहेत."
आज धृतराष्ट्रही जीवंत नव्हता. तसंच संजयला फक्त हेच आठवत नव्हतं तर त्याला त्याचा गुरु व्यास व व्यासांनी सांगीतलेल्या गोष्टीही आठवत होत्या. महर्षी व्यास धृतराष्ट्राला म्हणजे आपल्या पुत्राला भेटले. म्हणाले,
"याचा शेवट कौरवांच्या विनाशात होईल. जर हे युद्ध आपल्या डोळ्यांनी बघायची इच्छा असेल तर मी तुला दिव्य नेत्र देतो." परंतू त्यावर धृतराष्ट्र म्हणाला,
’’माझ्या मुलांचे मृत्यू आपल्याच डोळ्यांनी पाहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. मला असा कोणीतरी माणूस द्या. जो युद्ध पाहून त्याचे प्रत्यक्ष वर्णन मला सांगेल. यातच मी समाधान मानेन.’’
त्यानंतर व्यासांनी संजयला अंतर्दृष्टी दिली. ते म्हणाले,
’’या दिव्य नेत्रांनी संजय युद्धभूमीवर काय चालू आहे ते सर्व पाहू शकेल, इतकेच नाही तर लढणार्‍याच्या मनात काय विचार चालू आहेत, हेही त्याला कळेल. रात्री, दिवसा त्याला सारे दिसेल. तो दिवसभर रणभूमीवर असेल आणि रात्री येऊन तुला सर्व सांगेल. तो कधीही थकणार नाही. मात्र, कौरवांचा पराभव अटळ असून तुझ्या सर्व पुत्रांचा मृत्यू होणार आहे आणि पांडव अंती विजयी होतील.’’
असे सांगून धृतराष्ट्राचे सांत्वन करून व्यास निघून गेले. मग संजय सांगू लागला धृतराष्ट्रला.
’’दुर्योधन सैन्याची व्यवस्था पाहण्यात गुंतला आहे. तो दु:शासनाला सांगतो आहे, उत्तम सारथी आणि उत्तम रथ पितामह भीष्मांना मिळतील असे पाहा. भीष्मांचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्या धृष्टद्युम्नाच्या सैन्याचा पराभव करण्याची ताकद त्यांच्यातच आहे. पितामह म्हणाले होते की, ते शिखंडीशी लढणार नाहीत. कारण, आधी तो अंबा नावाची स्त्री होता, नंतर लिंग बदलून तो पुरुष झालाय. तेव्हा पितामहापासून त्या शिखंडीला काही करुन लांबच ठेवले पाहिजे किंवा त्याला आधी ठार केले पाहिजे, पांडवांना ही गोष्ट माहिती आहे म्हणून अर्जुन स्वत: शिखंडीचे रक्षण करतो आहे. तेव्हा दु:शासना तू भीष्मांचे शिखंडीपासून रक्षण कर. कौरवांनी दहा अक्षौहिणी सैन्य चौरस व्यूहात उभे केले. अतिशय अभेद्य अशी ही रचना आहे. त्यात एक अक्षौहिणी सैन्य भीष्मांपाशी दिले आहे. ते सर्वात अग्रभागी आहेत. पांढरेशुभ्र अश्व आणि उत्तम चांदीचा रथ त्यांना दिला आहे. त्यांच्या ध्वजावर सोनेरी ताल वृक्ष आणि पाच तारे यांचे चित्र झळकत आहेत. पांढरेशुभ्र केस, शुभ्र वस्त्रे आणि शुभ्र दाढी यामुळे ते जणू उगवत्या चंद्रासारखे भासत आहेत. सूर्याच्या लाल सोनेरी किरणांनी पूर्व दिशा उजळली आहे. भीष्म आपल्या सेनेस म्हणत आहेत की हे वीरांनो, आज ज्याला रणांगणी मरण येईल, त्याला स्वर्गच मिळणार आहे. भविष्याचा जराही विचार न करता सर्वांनी प्राणपणाने लढा. तुम्हाला क्षत्रियाचे वैभवशाली मरण हवे की अंथरुणात आजारी पडून मरायचे आहे हे तुम्ही ठरवा. उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहात आहात ना. मग जिंकण्यासाठी तयार व्हा. त्यांचे शब्द ऐकून सैन्यात उत्साहाची एकच लहर सळसळली आहे. सर्वांच्या हाती शस्त्रे आहेत. फक्त एका माणसाकडे ती नाहीत. तो म्हणजे राधेय. जोवर भीष्म जिवंत आहेत, तोपर्यंत मी लढणार नाही, अशी शपथ त्याने घेतली आहे. भीष्मांच्या अनुयायांना अश्वत्थाम्याचे नेतृत्व आहे. शिवाय शल्य, भूरीश्रवा असे अनेक वीर भीष्मांच्या अवतीभवती आहेत.
सैन्याच्या मध्यभागी दुर्योधनाचा रथ आहे. त्याच्या सुवर्ण रेशमी ध्वजावर सर्पाचे चित्र झळकत आहे. त्याचे प्रचंड सैन्य पाहून युधिष्ठिर अर्जुनाला म्हणत आहे की अकरा अक्षौहिणी एवढे त्यांचे सैन्य आहे आणि आपले तर सातच अक्षौहिणी. भीष्मांच्या या प्रचंड सैन्यापुढे आपला निभाव कसा लागेल? यावर अर्जुन म्हणत आहे की दादा, ही चौरस व्यूहाची रचना ‘वज्रव्यूह’ म्हणून परिचित आहे. ती वज्रासारखी अभेद्य असते. अशी रचना इंद्राला आवडते म्हणूनच याला ‘वज्रव्यूह’ म्हणतात. पांडवांच्या आघाडीस धृष्टद्युम्न आहे. त्याला मदत म्हणून भीम सोबत आहे. मध्यभागी युधिष्ठीर आणि अर्जुन तसेच शिखंडी आहे. सात्यकी उजवीकडे आहे. अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान विराजमान आहे. रथास पांढरेशुभ्र घोडे आहेत, सारथी श्रीकृष्ण सुहास्यवदनाने त्याचे सारथ्य करीत आहे. कृष्ण-अर्जुन जोडी दृष्ट लागण्यासारखी दिसत आहे. द्रोण आणि कृप हे या जोडीला नर व नारायण यांची जोडी मानत आहे. त्यांनी मनातल्या मनात या जोडीला वंदन केले आहे.
कृष्णाने अर्जुनाचा रथ मध्यावर समोर आणला आहे आणि तो म्हणत आहे की अर्जुना, नीट पाहा, तू आता खंबीर राहा, हे भीष्म, कौरव वीरांतील ते सिंह आहेत. हाच वीर पुरुष तुझा पहिला बळी असणार आहे. या महायुद्धाला आता तयार हो. "
त्यानं हिमालयात तपश्चर्या केली. तशी तपश्चर्या करता करता तो एक दिवस मरण पावला.
संजय समाप्त झाला होता. तोच एकमेव साक्षीदार होता. संपूर्ण महाभारत त्यानंच अनुभवलं होतं. त्यानं आपल्या दिव्यदृष्टीच्या आधारावर क्रिष्णाचं दिव्य रुप पाहिलं होतं.
आज संजय हयात नव्हता. परंतू तो हयात असतांना त्यानं केलेलं कार्य आज हयात होतं. त्यानं केलेली धृतराष्ट्रला मदत आजही लोकांच्या लक्षात होती. तो होता म्हणून धृतराष्ट्रला राज्यकारभार चालवता आला. तो जर नसता तर त्याला कदाचीत राज्यकारभारही चालवता आला नसता.
संजयला आठवत होत्या सा-याच गोष्टी. तशा त्या गोष्टी तो आपल्या धन्यासमोर म्हणजेच धृतराष्ट्रसमोर बया करीत होता. संजयला त्या गोष्टी आठवताच त्याला कुठंतरी हरविल्यासारखं वाटत होतं. आज त्याला एकाकी वाटत होतं. कारण आज त्याला सोबत असलेले कोणीही जीवंत नव्हते. आंधळा राजा धृतराष्ट्र हा कौरवांच्या बाजूच्या प्रमुखांचा पिता होता. सारथी गवाल्गणाचा मुलगा संजय हा धृतराष्ट्राचा सल्लागार आणि त्याचा सारथी देखील होता . संजय हा कृष्ण द्वैपायन वेदव्यास ऋषींचा शिष्य होता आणि तो आपल्या गुरु राजाप्रती अपार भक्त होता.
संजय ज्याला धृतराष्ट्रसाठी दूरवरच्या घटना पाहण्याच्या दिव्य दृष्टीची आवश्यकता होती. व्यासाचा धृतराष्ट्र पुत्र असल्याने व्यासाने संजयला आपला आधार म्हणून ठेवले. त्यातच कधीकधी तो पांडवांचा व कौरवांचा संदेशवाहकही बनला. हे महायुद्ध सुरु होण्यापूर्वी संजय कौरवांचा राजदूत म्हणून युधिष्ठिराकडे त्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यासाठी गेला होता. व्यासांनी धृतराष्ट्रसाठी संजयला दिव्य दृष्टी दिली होती.
दैवी दृष्टी असणे हे केवळ सूक्ष्म दृष्टीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. ज्याच्याकडे सूक्ष्म दृष्टी आहे, तो त्याच्या मनात अदृश्य गोष्टींची प्रतिमा पाहतो, तर दैवी दृष्टीमध्ये, ती मनात असण्याऐवजी, ती व्यक्तिशः पाहण्यासारखी असते. तसेच ध्वनी भौतिक कानाने ऐकले जातात आणि विचारांच्या प्रवाहाप्रमाणे नाही.
संजय हस्तिनापूरमध्ये असताना, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर घडलेल्या घटनांची मालिका त्याच्यासाठी अगदी स्पष्ट होती. रणांगणावर असल्यासारखे त्याने डोळ्यांनी पाहिले. संजयाने पाहिले धृतराष्ट्राचे पक्षपाती धोरण, त्यांनी दुर्योधनाचे शब्द आपल्या कानांनी ऐकले, पितामह भीष्मांचे भयंकर युद्ध, कुरुंच्या नाशाची घोषणा करणारा पांचजन्याचा जोरदार आवाज आणि कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद. संजयनं गीताही ऐकली होती. संजयचे एका सामान्य व्यक्तीपेक्षा स्पष्टपणे वागणे यात दिसून येत आहे. कारण त्याला अशा गोष्टी ऐकू येत होत्या, ज्या सामान्य व्यक्तीला घाबरवतात.
महाभारत सुरु होण्यापुर्वी युद्धाच्या पूर्वसंध्येला, गीता बोलली गेली होती, गीतेच्या पहिल्याच श्लोकात, राजा धृतराष्ट्राने दैवी दृष्टीची देणगी प्राप्त केलेल्या संजयकडून युद्धाची माहिती मागितली.
धृतराष्ट्राचा सल्लागार म्हणून संजयचे काम तितकेसे कठीण नव्हते. जोपर्यंत त्याला धृतराष्ट्राला युद्धात वेगवेगळ्या वेळी भीमाच्या हातून आपल्या शंभर पुत्रांचा मृत्यू झाल्याची बातमी सांगावी लागली आणि दुःखी झालेल्या राजाला त्याच्या काळोख्या वेळी सांत्वन द्यावं लागलं.
संजय कुरुक्षेत्रातील युद्धाची प्रत्येक घटना सांगतो. त्यांनी विविध वर्णने देखील दिली आहेत. ते पृथ्वी, इतर ग्रह, आणि भारतीय उपखंडावर लक्ष केंद्रित करतात आणि शेकडो राज्ये, जमाती, प्रांत, शहरे, शहरे, गावे, नद्या, पर्वत आणि जंगले यांची विस्तृत यादी देतात. संजयनं प्रत्येक दिवशी प्रत्येक बाजूने आढावा घेतलेल्या लष्करी रचना, प्रत्येक वीरांचे मृत्यू आणि प्रत्येक युद्धाचे तपशील सांगीतले आहेत. व्यास बद्दलही तो स्पष्ट करतो. संजयने या युद्धातील घटनांचे कथन आणि त्यांची मते अतिशय स्पष्टपणे मांडली आणि त्यांनी कृष्ण आणि अर्जुन यांच्या हातून कौरवांच्या नाशाची भविष्यवाणी देखील केली होती.
संजय हा धृतराष्ट्राचा प्रामाणिक सल्लागारही होता. तो सल्ले देत असे आणि सल्ले देतांना धृतराष्ट्रला राग येईल व ते आपल्याला पदावरुन निष्काषीत करतील याचाही ते विचार करीत नव्हते.
संजय हे एक सद्गुणी पात्र होतं की जे अंतर्ज्ञानी ज्ञानाचे प्रतिनिधित्व करीत होतं. जे ज्ञान दैवी कृपा मिळविण्यासाठी तो अर्जुनासारखा भाग्यवान नसला तरीही, तो अजूनही भगवान कृष्णाकडून ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम आहे. कारण त्याने आपल्या शरीरावर आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास प्रवीणता प्राप्त केली आहे. तो जागरुकतेची भावना दर्शवितो. कारण तो लढाईत घडणाऱ्या सर्व तपशीलांचा साक्षीदार करण्यास सक्षम आहे.
संजय धृतराष्ट्रला सांगत होत्या त्या गोष्टी. अर्जुनाने आपले धनुष्य आणि बाण सोडले आणि रथाच्या आसनावर तो बसला. तेव्हा त्याचे मन दुःखाने भारावून गेले होते. हे संजयला दिसून आले. अर्जुनाला त्याचे शारीरिक रुपात थकलेला असतांना त्यानं अनुभवलं होतं. तोही प्रसंग सांगीतला होता त्यानं निःसंकोचपणे धृतराष्ट्रला.
आज ती सर्व त्याचे सखेसोबती व समवयस्क मंडळी त्याचेसोबत नव्हती. संन्यास घेतल्यानंतर तो हस्तीनापुरात जावू शकत नव्हता. म्हणून तो हिमालयात गेला होता.
आज तो अख्खा हिमालयही त्याला खायला धावत होता. कारण तो एकाकी होता. अशाच आठवणी काढता काढता तो आपल्या आयुष्याचे उर्वरीत आयुष्य जगत होता. त्या आठवणी काढून काढून त्याला चिंता सतावत होती. मात्र त्याच्या जीवनात मरणाशिवाय कोणताच मार्ग निघत नव्हता. असाच तो एकाकी, निराश आणि लाचार अवस्थेत जीवन जगत होता एखाद्या मायेने सोडलेल्या लेकरागत. आज त्याचे जवळचे सगेसंबंधी, हितचिंतक त्याच्या जीवनाच्या वाटेवर नव्हते. ते तर केव्हाच त्याला सोडून जंगलात लागलेल्या आगीत भष्मसात होवून निघून गेले होते. दूर.......कुठंतरी........कितीही शोधले तरी कधीच न सापडण्यासाठी.


****************************समाप्त************

इतर रसदार पर्याय