"चल ह्यावेळेस नीट नेम धरून मार बरं! आपल्याला हरायचं नाही ह्यावेळेस!",माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली.
मी बरोब्बर नेम धरून एकावर एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला. आम्ही जिंकलो.
"चला यार आता काही तरी वेगळं खेळू. ही बघ मी गिल्ली आणली आहे तुझ्या जवळ दांडू आहे न?",रक्षाने साक्षीला विचारलं.
"हो हा काय! मी घरून लक्षात ठेवून आणला",साक्षी जवळचा दांडू दाखवत म्हणाली.
"आण तो दांडू,आमची टीम जिंकलीय न मग आधी मीच खेळणार!",मी
"घे बाई! तू खेळ आधी",असं म्हणून रक्षाने मला गिल्ली दांडू दिलं.
"हे बघ असा स्ट्रोक मारायचा! हां! की गिल्ली अशी दूर.... जाऊन...... पडते",असं म्हणत मी गिल्ली ला दांडू ने जोरात फेकलं. आणि आम्ही दूरवर गिल्ली कुठे पडते हे बघत राहिलो. पण गिल्ली जमिनीवर पडलीच नाही ती जाऊन पडली जवळच एका कोपऱ्यात असलेल्या पडक्या वाड्यात.
"बापरे! ती गिल्ली तर त्या पडक्या वाड्यात पडली आता काय करायचं?",मी भीत भीत म्हंटल.
सगळ्या माझ्याकडे रागाने बघू लागल्या.
"तूच मारला न स्ट्रोक! आता जा आण तूच जाऊन",साक्षी म्हणाली.
"म म मी!! मी नाही जाणार! तशी घाबरत वगैरे नाही मी पण.... किंचित भीती वाटते!ही! ही!",मी केविलवाणे म्हंटल.
"ही ही काय ही ही? कोणी सांगितलं एवढ्या जोरात फेकायला? आता कोण जाईल तिथे? ती गिल्ली माझ्या भावाची आहे त्याला जर ती मिळाली नाही तर मला फालतू त्याचे बोलणे ऐकावे लागतील.",रक्षा म्हणाली.
"तरी आईने सांगितलं होतं त्या बाजूला जाऊ नका म्हणून. त्या दुसऱ्या मारुती मंदिराच्या मैदानावर खेळलो असतो तर बरं झालं असतं.",सुचिता म्हणाली.
"ऐ तुम्ही सगळ्या माझ्यावरच का ठेपर ठेवता? मी मुद्दामहून थोडीच केलं?",मी म्हंटल.
"आता ते सगळं जाऊ द्या! आधी गिल्ली कशी आणायची ते बघा",सीमा पोक्तपणे म्हणाली.
"हे बघा मी जायला तयार आहे पण माझ्यासोबत कोणीतरी आलं पाहिजे",मी
" दुसरं कोण येणार? माझी गिल्ली आहे तर मलाच यावं लागेल.",रक्षा म्हणाली.
"हे बघा दहा मिनिटात जर आम्ही आलो नाही तर लगेच माझ्या घरी कळवा म्हणजे आम्हाला कोणीतरी त्या वाड्यातून काढेल तरी. माहीत नाही त्या वाड्यात काय असेल",मी कपाळावरचा घाम पुसत म्हंटल.
"काहीही नको बोलू! पडका वाडा आहे म्हणजे त्यात भूत असलंच पाहिजे असं थोडीच आहे! ",रक्षा म्हणाली.
"चला आता जा! आणि पटकन गिल्ली घेऊन या म्हणजे पुढे खेळ आपण कंटिन्यू करू. टाईमपास बराच झाला!",साक्षी
"नक्की जायचंच मग!",मी घुटमळत म्हंटल.
"हो हो नक्की नाही तर काय! नक्कीच जायचं",रक्षा
"लक्षात ठेवा बरं! आम्ही दहा मिनिटात आलो नाही तर.....",मी चालता चालता मागे वळून म्हंटल.
"हो हो! आहे आमच्या लक्षात",सीमा आणि कीर्ती म्हणाल्या.
भीत भीत आम्ही एकेक पाऊल टाकत पडक्या वाड्याजवळ जात होतो. आमचं हृदय जोरजोरात धडधडत होतं.
चालता चालता आम्ही त्या वाड्या समोर जाऊन पोचलो.
आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि वाड्याच्या पायरीवर पाऊल ठेवलं. वाड्याचं दार लोटलेलंच होतं. आम्ही ढकलल्या बरोबर ते करकरत उघडलं. आम्ही दचकून थोडं मागे झालो. एक दोन पाकोळ्या फडफडत दूर निघून गेल्या.
मी समोर वाड्याच्या अंगणात बघितलं, आमची गिल्ली तिथेच पडली होती.
"जा ! पटकन जाऊन आण गिल्ली, मी इथेच थांबते दारात",मी रक्षाला म्हंटल.
"नाही! नाही! तू पण ये आत, मी एकटी नाही जाणार",रक्षा म्हणाली.
"अगं पण आत्ताच तू म्हंटल न की वाड्यात भूत असतेच असं नाही मग काय हरकत आहे तुला एकटीने जायला? आणि मी पळून थोडीच जातेय, मी इथेच दारात तू येईपर्यंत उभी राहणार आहे.",मी
"ठीक आहे पण तू इथेच थांब बरं!",रक्षा
"हो हो मी थांबते",मी
रक्षा गिल्ली जवळ गेली आणि तिला हात लावणार तेवढ्यात ती गिल्ली दूर गेली. ती आणखी पुढे गेली तशी ती गिल्ली सुद्धा पुढे पुढे जाऊ लागली.
"रक्षा जाऊदे ती गिल्ली चल पटकन घरी जाऊ आपण",असं मी म्हणते न म्हणते तोच वाड्याचा मुख्य दरवाजा धाडकन मला आत ढकलत माझ्या पाठीवर आदळून बंद झाला.मी आत अंगणाच्या मध्यावर ढकलल्या गेली.
"अरे बापरे! रक्षा आपलं काही खरं नाही. अरे रक्षा तर इथेच होती! कुठे गेली? माझ्या घशाला कोरड पडली.
तेवढ्यात डावीकडून मला धाडकन आवाज आला. त्याबाजूच्या खोलीचे दार लागले होते आणि त्या दाराच्या फटीत मला रक्षाच्या फ्रॉकचे टोक दिसले. हळूहळू ते टोक दिसेनासे झाले. म्हणजे कोणीतरी त्या खोलीत रक्षाला ओढले होते आणि दार लावून घेतले होते. आम्ही वाड्यात येऊन खूप चूक केली होती. बाहेर पडण्याची शक्यता दिसत नव्हती. सगळे बाहेर पडण्याची मार्ग बंद झाले होते.
बाहेर मैत्रिणी वाट बघत असतील. कसंही करून त्यांनी कोणाला तरी बोलावून आम्हाला इथून सोडवलं पाहिजे.
मी असा विचार करत असतानाच माझ्या डोक्यावर मागून फटका मारत एक वटवाघूळ फडफडत गेलं.
आणि तेवढ्यात डावी कडच्या त्याच खोलीतून मोठमोठ्याने ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आला. आवाज रक्षाचाच होता.
बापरे रक्षा कोणत्या संकटात सापडली असेल? मी तिला सोडवण्यासाठी काय करू शकते? ह्या विचारातच मी त्या खोलीच्या दाराजवळ जाऊन रक्षाला जोरजोरात आवाज दिला. "रक्षा ऐ रक्षा कोण आहे आत? दार उघडा! रक्षाला सोडा कोण आहे आत",असं ओरडत मी दरवाजा जोरजोरात ठोठावला.
मिनिटभर आवाज येणं बंद झालं आणि दरवाजा खाडकन उघडला. रक्षा दारातच उभी होती. तिला बघताच माझा थरकाप उडाला. तिची अवस्था खूप बिकट झाली होती. कोणी केलं हवं सगळं? तिचे केस पिंजारलेले डोळे रडून सुजलेले चेहऱ्यावर हातावर ओरखडे होते.
"अगं रक्षा! काय झालं हे तुला!",असं म्हणत मी तिच्या जवळ जाणार तेवढ्यात ती धाडकन खाली कोसळली.
तिला मी बाहेर व्हर्यांड्यात आणून झोपवलं. आणि आत कोण आहे हे पाहायला जाणार तेवढ्यात कोणीतरी आतून बंद केल्यासारखं ते दार धाडकन बंद झालं.
रक्षा बेशुद्धावस्थेत होती. आमच्याकडे पाणी सुद्धा नव्हतं. मी वाड्याचे प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला मैत्रिणींना जोरजोरात आवाज दिला जोरजोरात प्रवेशद्वार वाजवलं पण कशाचाच उपयोग झाला नाही. मी धावत रक्षा जवळ गेली तिचे अंग गार पडत होते मला काहीच सुचत नव्हते मी भराभर तिच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना ऊब निर्माण करण्यासाठी माझ्या हाताने घासत होती.
क्रमशः