एक पडका वाडा - भाग 6 Kalyani Deshpande द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक पडका वाडा - भाग 6

मला त्यांच्या पंखांचे जोरदार तडाखे बसत होते कितीही चुकवण्याचा प्रयत्न करूनही मी स्वतःला वाचवू शकत नव्हती. मी किंचाळत धावत होती आणि वटवाघळे त्यांच्या पंखांचे फटके मारत होते.

आणि तेवढ्यात त्या खोलीचे दार उघडले मी दारात बघितलं आणि अवाक झाली. दारात एक काळ्या कफनीतील व्यक्ती होती लांब जटा गळ्यात कवट्यांची माळ कपाळावर चिता भस्म करडी तीक्ष्ण नजर. क्षणभर एक भीतीची लहर माझ्यामधून गेली.

आश्चर्य म्हणजे ते सगळे वटवाघळे आपापल्या कोपऱ्यात जाऊन लटकले. कोण आहे हा माणूस नक्की मांत्रिक असावा म्हणूनच सगळे हे पिशाच्च त्याला टरकून कोपऱ्यात गेले.

पण आणलं कोणी यांना बोलावून माझे आईबाबा कुठे आहेत? रक्षाचे आईबाबा कुठे आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्षा सध्या कुठे असेल? हे सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू असताना माझ्या एक धीरगंभीर आवाज कानी पडला.

"पोरी तू तात्काळ इथून बाहेर जा",मांत्रिक म्हणाले

क्षणभर मला अर्थबोधच झाला नाही पण पुन्हा त्यांनी तेच वाक्य उच्चारल्यावर मी तिरासारखी बाहेर धावत सुटली. बाहेर अंगण स्वच्छ होतं. किडे वगैरे काहीच नव्हतं. वाड्याचे मुख्यद्वार उघडलेले होते. आणि दारातच माझे आणि रक्षाचे आईवडील उभे होते. त्यांच्या मागे माझ्या इतर मैत्रिणी व त्यांचे आईबाबा वाकून बघत होते.

मी बाहेर आलेली बघताच रक्षाच्या आईने कळवळून विचारलं,

"बेटा रक्षा कुठे आहे? ती का बाहेर नाही आली?"

आता यांना कसं उत्तर द्यावे मला कळत नव्हतं.

मी सगळं त्यांना इतंभूत माहिती सांगितली. रक्षाची आई डोक्याला हात लावून मटकन बसली आणि रडायला लागली.

"कुठे गेली माझी पोर? काय झालं असेल तिचं? हे देवा काय परीक्षा बघतोय आमची"

काकूंनी देवाचं नाव घेतल्यावर मला एकदम जाणवलं की एवढ्या अडचणीत आम्ही होतो पण दुर्दैवाने एकदाही देवाचं नाव घेण्याची बुद्धी आम्हाला झाली नाही.

तेवढ्यात बाजूच्या खोलीतून 'जय माता काळभैरवी चंड मुंड मर्दिनी ओम फट स्वाहा' असा धीरगंभीर आवाज घुमला आणि त्यापाठोपाठ धाड धाड असे पाच वेळा मोठ्याने आवाज आले. आमच्या सगळ्यांच्या नजरा तिकडेच लागल्या होत्या. मांत्रिक ज्या खोलीत होते तिथूनच तो आवाज आला.

सगळे जण दारातून धावत अंगणात आले मी सुद्धा थोडं पुढे जाऊन त्या खोलीत बघण्याचा प्रयत्न केला. मांत्रिक आल्यामुळे मला जरा धीर आला होता.

पाचही वटवाघळे खोलीच्या मध्यभागी पडले होते आणि मांत्रिक काहीतरी मंत्र पुटपुटत त्यांच्यावर राख भुरभुरवत होते. ते वटवाघळे तडफडत होते. त्यांच्या पंखांची एकसारखी फडफड होत होती. सगळं दृश्य भयावह होतं.

बायका माझ्या मैत्रिणी भीतीने गारठून गेल्या होत्या.

"तुम्ही हे काही बघू नका बाहेरच थांबा तुम्ही सगळ्याजणी वाड्याच्या",माझ्या बाबांनी सगळ्यांना म्हंटल.

सगळ्या बायका आणि माझ्या मैत्रिणी बाहेर थांबल्या. मला तिथे थांबणं आवश्यक होतं तरच रक्षा कुठे असेल ह्याचा अंदाज लागू शकणार होता म्हणून मी तिथेच थांबली.

अखेर त्या पाचही वाटवाघळांची तडफड थांबली. मांत्रिक आमच्या कडे वळले.

"पोरी आणखी तुझ्यासोबत एक मुलगी होती ती कुठे आहे?",त्यांचा तो धीरगंभीर आवाज ऐकून मला थोडं दचकल्यासारखं झालं.

"ती आत्ता नेमकी कुठे आहे माहीत नाही पण मी तिला शेवटी बघितलं ती जर अजूनही तिथेच असेल तर तिथपर्यंत मी तुम्हाला नेऊ शकते",मी अडखळत उत्तर दिलं.

जिथे सांगाडेच सांगाडे होते त्या खोलीत मी त्यांना नेलं. त्यांना मी आम्हाला तिथे कसा अनुभव आला ह्याची माहिती आधीच दिली.

त्यामुळे त्या मांत्रिकांनी मला व बाकीच्यांना खोलीच्या दारातच थांबायला सांगितलं. त्यांनी ती खोली उघडली करकर दाराचा आवाज आला. तिथे चारही कपाटं पूर्ववत बंद होते आणि खोलीत कोणीही नव्हतं मी खोलीच्या छतावरही बघितलं कोणीच नव्हतं. मी त्यांना त्या तीन कपाटातून सांगाडे कसे बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यावर कसा हल्ला केला हे सगळं सांगितलं. त्यांनी ते ऐकून घेतलं आणि ते खोलीच्या मध्यभागी उभे राहिले आणि डोळे मिटून हातात राख घेऊन मंत्र पुटपुटू लागले. मिनिटभर मंत्र पुटपुटून त्यांनी ती राख मध्यभागी वर्तुळाकार टाकली. आणि काय आश्चर्य एकेक कपाटाचे दार खडाखड उघडले. तिन्ही कपाटातून दहा सांगाडे हळूहळू बाहेर येऊन उभे राहिले.

क्रमशः