प्रवासवर्णन - श्रीमान रायगड Pranav bhosale द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रवासवर्णन - श्रीमान रायगड

प्रवासवर्णन - || श्रीमान रायगड ||

दिवाळीच्या सुट्टीनिम्मित सर्व मित्र एकत्र जमलो होतो. सर्वांच्या गप्पा गोष्टी चांगल्याच रंगल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही फिरायला जायचा बेत ठरत चालेला, पण जायचं कुठे...? हा प्रश्न सर्वाना पडत होता. दिवाळी म्हणल कि गडकिल्ले आलेच, गडकिल्ल्यांच नाव निघाल आणि मन बालपणात हरवून गेल. दिवाळी म्हणल कि आठवतात फटाके, घरासमोर बनवलेला किल्ला, परीक्षा झाल्या म्हणल कि अगदी पहिल्या दिवसापासून किल्ला बनवायची तयारी चालूच. कोणता किल्ला बनवायचा,  काय काय करायचं, अगदी माती कुठून आणायची ते किल्ला कसा बनवायचा इथपर्यंत...!

आणि कानावर नाव पडल श्रीमान रायगड. तस बालपणात हरवलेलं मन पुन्हा वर्तमानकाळात आल. सर्वच मित्र रायगडावर जायला इच्छुक होते. सर्वांनी एकमताने रायगडावर जायला तयारी दर्शवली. आम्ही सर्वजण मिळून एकूण १३ मित्र सोबत जायचा ठरलेलं. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा निघायचं ठरलं होत. मी या पूर्वीही रायगड पाहिला होता. पण सर्व मित्रासोबत पुन्हा एकदा रायगडाला जायचा त्यामुळे मी खूप उत्साही होतो.

आमच्याइथून रायगडावर जायचं म्हणल कि सातारामार्गे महाबळेश्वर, पोलादपूर मार्गे महाड आणि रायगड असा एकूण २६० किमी चा प्रवास करावा लागतो. त्यामुळे आम्ही रात्रीच प्रवास करायचा अस ठरवल होत जेणेकरून आम्हाला सकाळी लवकर पोहचता येईल. आणि गड लवकर सर करता यावा. आमच्या मित्रांनी मिळून सर्व लागणाऱ्या गोष्टींचा पूर्वनियोजन करून ठेवला होता. आम्ही १३ लोक सोबत असल्यामुळे प्रवासासाठी २ गाड्या सोबत घेतल्या होत्या.

ठरल्याप्रमाणे रायगडला जायचा दिवस उजाडला. रात्री उशिरा जरी निघायचं असल तरी मनात खूप उत्सुकता होती. मन आताच रायगडावर जाऊन पोहचल होत. मी रात्री जेवण करून घेतलं, आणि सर्व bag भरून घेतली सोबत थोडा दिवाळीचा फराळ, आणि प्रवासादरम्यान लागणारे साहित्य सोबत घेतले. रात्री १ वाजता निघायचं होत म्हणून थोडी झोप घ्यावी म्हणल. पण जायच्या उत्सुकतेमुळे झोप पण येत नव्हती. माझ्याप्रमाणे माझे बाकीचे मित्र पण जागेच होते. शेवटी रात्री सर्वजण ठरलेल्या ठिकाणी जमा झालो. प्रताप आणि शुभम गाडी घेऊन आले आणि रात्री १ वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

प्रवासाला सुरुवात करून आता २ तास झाले होते.गाडी महाबळेश्वर पर्यत येऊन पोहचली होती. थंडीचे दिवस असल्याने हवेत खूपच गारवा होता. जवळपास पहाटेचे ३ वाजत आलेले आणि आता थंडीसोबत धुक्याचा खेळ पण चालू झाला होता. महाबळेश्वर मधून आता आम्हाला घाट उतरून रायगडाकडे जायचं होत. समोर धुके असल्याने गाडी एकदम सावकाश चालवावी लागत होती. एकदम असा थरारक अनुभव घेत आम्ही रायगडाच्या दिशेने चाललो होतो. अगदी १० पाऊले समोरचा दिसेल एवढाच रस्ता आम्हाला दिसत होता. अशाप्रकारे थंडी आणि धुक्याचा सामना करत आम्ही पहाटे ५ वाजता रायगडाच्या पायथ्याला येऊन पोहचलो. सर्वजण आम्ही पायीच गड सर करणार होतो. त्यामुळे सर्वांनी फ्रेश होऊन नाश्ता करून घेतला. नाश्ता मध्ये खूप छान असे पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला. आणि सकाळी ६ वाजता आम्ही गड सर करायला सुरुवात केली.

वातावरणामध्ये आता थंड असा गारवा होता. आमचे एक एक पाऊले रायगडाच्या दिशेने चालले होते. सर्वामध्ये खूप जोश आणि उत्साह होता. मी याधीही रायगडावर येऊन गेलेलो आज पुन्हा एकदा रायगडाच रूप अनुभवायला मिळणार यामुळे खूप खुश होतो. चार पायऱ्या चढताच रायगड किती भव्यदिव्य आहे याची जाणीव झाली. आजूबाजूला असलेल्या दऱ्या भले मोठे डोंगर, महाकाय बुरुज आणि ते लांबसडक आकाशात घुसलेले टकमक टोक आणि त्यावर अभिमानाने फडकत असलेला भगवा ध्वज...! ते पाहून छाती गर्वाने फुगून गेली आणि गड सर करायला अजून जोश आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत आम्ही महादारवाज्याचा दिशेने चाललो होतो. गडाच्या पायथ्याला वाजत असणारी थंडी आता नाहीशी झाली होती. भर थंडीच्या दिवसात सर्वांच्या अंगातून घाम निघत होता. तो दिमाखात उभा असलेला रायगड बगून अस वाटत होत कसे असतील महाराजांचे मावळे.. अरे चार पावले जरी चाललो तरी दम लागणारे आपण...! कसे लढले असतील महाराज आणि महाराजांचे मावळे..! रायगडाच विशाल रूप पुन्हा पुन्हा इतिहासात घेऊन जात होत. खूप विचार करायला भाग पडत होत. इतक्यात आम्ही महादरवाजापर्यंत येऊन पोहचलो. महादारवाजाच्या बाजूला असलेली तटबंदी आणि ते २ महाकाय बुरुज रायगड किती भव्यदिव्य असेल याची जाणीव करून देत होता.

महादरवाजा मधून थोडा पुढे आल्यावर दिसतो तो हत्ती तलाव, गजशाळेतून येणाऱ्या हत्तीना स्नानासाठी आणि पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. हत्ती तलावाच्या उजव्या बाजूने थोडा वरती गेल्यावर दिसतो तो गंगासागर तलाव. गाईड आता आम्हाला गंगासागर तलावाबद्दल माहिती देत होता. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते. त्यांनी सात नद्यांच आणि सात समुद्राचं पाणी आणि तीर्थ आणला होता, ते याच गंगासागर तलावात सोडलं होत. ते ऐकून मन खूप दाटून आले. आता फक्त रायगड पाहत नव्हतो तर ३५० वर्षापूर्वीचा रायगड काय असेल याचा अनुभव येत होता. गंगासागर तलावाच्या समोरच २ स्तंभ दिसत होते. ते उंच स्तंभ रायगडाची शोभा अजूनच वाढवत असतील यात काय शंकाच नाहीये. त्याच्या उजव्या बाजूने एक दरवाजा लागतो जिथून आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करू शकतो. त्याला पालखी दरवाजा असेही म्हणतात. पालखी दरवाजा वर चढून आलात कि उजव्या बाजूला राण्यांचे महाल आणि समोर मेणा दरवाजा. राणीच्या महालासामोरच राणीच्या दासींसाठी राहायला जागा, त्याच्या मागच्या बाजूला धान्यांचे कोठार, त्याच्या बाजूलाच प्रशस्त असे प्रधानांचे वाडे. ते पाहून थोडे पुढच्या भागात आल्यावर विजयस्तंभाच्या बाजूला एक छोटी रूम दिसते जि त्याकाळी राजमुद्रा छापायला तिचा उपयोग केला जायचा. तिला टांकसाळ असेही म्हणतात. त्याच्या थोडे अलीकडेच एक एल आकाराची रूम दिसते, भुयारी मार्गे आतमध्ये २ रूम आहेत, त्यास खलबतखाना असे म्हणतात. महाराजांच्या गुप्त मोहिमा, गनिमी कावा, तसेच गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्यासोबत इथेच चर्चा केली जायची. तिथूनच पश्चिमेस दिसतो तो हिरकणी बुरुज, ते पाहून आम्ही नगारखान्यात प्रवेश केला. आज आपण पाहतो इंडिया गेट ते अगदी याच नागारखाण्यासारख बनवल गेलाय. त्यावर कोरलेल्या सिंहाच्या प्रतिमा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहेत. गडावर या ठिकाणाहून नगारे वाजले कि मुख्य दरवाजे बंद होयाचे. राजांचा दरबार आणि दोन्ही बाजूला असलेली अष्टप्रधान मंडळाची बैठक व्यवस्था अजून पाहायला मिळते. नगारखान्यातून प्रवेश केल्यावर समोरच ३२ मन सोन्याच्या सिंहासनाची जागा. आज तिथ महाराजांची मूर्ती आहे. महाराजांचा दर्शन घेतलं. महाराजासमोर नतमस्तक होताच मन ३५० वर्षापूर्वी गेल. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. त्याकाळी भरलेला तो दरबार. तोची दिवाळी तोची दसरा....! काय भव्यदिव्य झाला असेल तो सोहळा..!

ते पाहून आम्ही आता टकमक टोकाकडे गेलो. भगवा ध्वज दिमाखात फडकत होता. बाजूला भली मोठी दरी. आणि पायथ्याला दिसणारे पाचाड गाव. जिजाऊचा वाडा. ते पाहून आम्ही आता जगदीश्वराच्या दर्शनाला निघालो. आता गडावर बरीच गर्दी वाढत चालेली. जगदीश्वराचे दर्शन घेतले. समोरच शिवरायांची समाधी आणि शिवरायांच्या वाघ्या ची समाधी आहे त्याच दर्शन घेतलं. ५ मिनिट शांतच त्या ठिकाणी बसून राहिलो. समोरच एक शिलालेख दिसला. त्याचा अर्थ असा होतो कि जोवर या पृथ्वीतलावर चंद्र सूर्य आहेत तोवर रायगडाची उभारणी कायम राहो..! बाजूलाच एका पायरीवर हिरोजी इंदलकराबद्दल चा शिलालेख आहे. त्याच दर्शन घेतलं. मन अजून इतिहासात च होत. आता जवळपास सकाळचे ११ वाजत आलेले जोराची भूक पण लागली होती. बाजूनेच थोडा पुढे गेल्यावर इंदुबाई चा घर आहे आम्ही तिथ जेवण करणार होतो. खूप छान अस घर, समोर अशी जागा, शेणाने सारवून घेतली होती, एका वेळी जवळपास २५ लोक जेवण करू शकतील एवढी छान आणि मस्त ठिकाण होत ते. आम्ही सर्वांनी पिठल आणि तांदळाची भाकरी आणि सोबत दही आणि साखर घेतली. स्वर्गसुख म्हणतात ते हेच काय..! स्वर्गासारखा रायगड आणि सोबत स्वादिष्ट जेवण. बस अजून काय हव.? मस्त जेवण करून आम्ही तिथच बाजूला थोडी विश्रांती घेतली.

विश्रांती करून झाल्यावर सर्व आम्ही फ्रेश झालो. आता गडाचा निरोप घेयाची वेळ आली होती. गडावर खूप सुखद अनुभव घेता आले. आम्ही सर्वांनी जड पावलांनी गडाचा निरोप घेतला. निरोप घेताना होळीच्या माळावर आलो महाराजांचे दर्शन घेतले. आता गडावरून जायची इच्छा होत नव्हती. मन गडावरच होत,गड सोडायचं काही नाव घेत नव्हत. आणि आम्ही सर्वांनी गडाचा निरोप घेतला...! ते पुन्हा गडावर येईन अस ठरवूनच...! आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.