मर्डर वेपन - प्रकरण 10 Abhay Bapat द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मर्डर वेपन - प्रकरण 10


प्रकरण १०
ऑफिसात आल्यावर पाणिनी बराच विचारात पडला होता. बेचैन होऊन इकडून तिकडे फिरत होता.
“ सौंम्या, पद्मराग रायबागीनेत्याच्या आयुष्यात दोन रिव्हॉल्व्हर खरेदी केल्या.एक रती शी लग्न होण्यापूर्वी आणि एक लग्न झाल्यावर. आता असा विचार करुया की त्याने मैथिलीला सुद्धा रिव्हॉल्व्हर दिली असेल का?शक्यता आहे कारण ती खूप प्रवास करायची.तिची मित्र मंडळी सुद्धा होती खूप.तिच्या संरक्षणासाठी त्याने रिव्हॉल्व्हर दिली असावी. ”
“ पण सर,त्याने एक रिव्हॉल्व्हर रतीला दिली होती.” सौंम्या म्हणाली.
“ बरोबर आहे,एक रतीला दिली होती,पण तिला त्याचा नंबर माहिती नाहीये.म्हणजे तिच्या दृष्टीने विचार केला तर तिला एक रिव्हॉल्व्हर मिळाली, नंबर बघायची गरजच तिला कधी भासली नाही.” पाणिनी म्हणाला.
“ रायबागीने रतीला म्हणजे दुसऱ्या पत्नीला रिव्हॉल्व्हर दिली असेल तर पहिली पत्नी मैथिलीला पण दिली असेल हा तर्क बरोबर आहे. आणि तसं असेल तर मैथिलीला दिलेली रिव्हॉल्व्हर ही त्याने प्रथम खरेदी केलेली रिव्हॉल्व्हर असेल.” सौम्या म्हणाली.
“ अगदी बरोबर.” पाणिनी म्हणाला.
“ आणि त्या पहिल्या रिव्हॉल्व्हर नेच खून झालाय?” सौंम्या ने विचारलं.
“ आपल्याला ते कळायचंय अजून.” पाणिनी म्हणाला. “ पण तारकरने ड्रॉवर मधून घेतलेली रिव्हॉल्व्हर ही प्रथम खरीदलेली आहे. रती ची पर्स चोरल्यानंतर रायबागी ला ठार मारणे मैथिली ला सोप्प होतं.खुनी हत्यार ती रती च्या पर्स मधे ठेऊन,गॉगल घालून इथे येऊन, ती पर्स आपल्या ऑफिसात ठेऊ शकत होती.नंतर काहीतरी बहाण्याने ऑफिसातून बाहेर जाऊन विलासपूर ला जाऊन रती च्या फ़्लॅट ची डुप्लीकेट किल्ली वापरून तिच्या घरात ठेवलेली रिव्हॉल्व्हर घेऊ शकत होती.यामुळे तिच्या ताब्यात रती ची रिव्हॉल्व्हर असणार होती. ”
“ ती चतुर असेल तर तिच्या ताब्यात असलेल्या रिव्हॉल्व्हरची तिने काहीतरी विल्हेवाट लावली असेल. ” –सौंम्या.
“ उलटपक्षी ती हुशार असेल तर तिच्या ताब्यात असलेल्या रती च्या रिव्हॉल्व्हर काहीही विल्हेवाट न लावता ते तिने स्वत:कडेच ठेवले असेल,म्हणजे कोणी जर विचारलं,की पद्मराग रायबागी ने तुला रिव्हॉल्व्हर दिल होतं का,तर ती रती कडून चोरलेले रिव्हॉल्व्हर दाखवून म्हणू शकेल, हो दिलंय त्याने मला रिव्हॉल्व्हर.हे पहा.” पाणिनी म्हणाला.
“आणि ती खोट बोलत असेल हे सिद्ध करणारा काहीही पुरावा कोणाकडेच नसेल.” सौंम्या म्हणाली.
“सौंम्या, कनक ला फोन लाव आणि विचार पार्किंग लॉट मधे त्याने ज्या गाड्या तपासल्या त्यात एक गाडी उत्क्रांत उद्गीकर नावाच्या माणसाची होती आणि एक मृगा गोमेद हिच्या नावाने असं कनक म्हणाला होता. तेव्हा मी म्हणालो होतो की मृगा वर जास्त लक्ष केंद्रित कर आणि तिची माहिती काढ. पण नंतर झालेल्या घडामोडीवरून मला वाटतंय की आपण आपलं लक्ष्य बदलावं. त्याला म्हणावं मैथिली आणि उद्गीकर यांचा काही संबंध आहे का? ” पाणिनी म्हणाला.
सौंम्याने फोन करून कनक ओजसला पाणिनी चा निरोप दिला. तेवढ्यात पाणिनीचा फोन वाजला. फोन वर भोपटकर होता.
“ मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की रायबागी च्या मृत्यू पर्यंत मी मैथिली चं वकील पत्र घेण्याचा विचार केला नव्हता.”
“ ठीक आहे ना , मी तुला कायद्याने विचारू शकत नाही की तू का घेतलास तिचे वकीलपत्र.” पाणिनी म्हणाला.
“ मला कायद्यापेक्षा वेगळा मार्ग दिसतोय.आपल्या दोघांच्या अशिलांनी परस्पर समझोत्याने मालमत्ता विभाजन करायचं का?”
पाणिनी पटवर्धन काही बोलला नाही.
“ तुम्हाला माहित्ये की कायदेशीर दृष्ट्या माझ्या अशीलाचा पत्नी या नात्याने रायबागी च्या मालमत्तेवर हक्क आहे. ही वस्तुस्थिती दोघांनी स्वीकारली की आपली चर्चा पुढे जाईल.”
“ मी ही गोष्ट वस्तुस्थिती म्हणून स्वीकारायला तयर नाही.” पाणिनीने आपली भूमिका स्पष्ट केली.
“ माझ्या सेक्रेटरीला मी इथे पद्मरागच्या इच्छापत्राची प्रत घेऊन बोलावतो.” भोपटकर म्हणाला.
“ शेवटचं इच्छापत्र? ” पाणिनीनं विचारलं
“ माझ्या माहितीनुसार तरी. मैथिलीशी लग्न झाल्यावर त्याने लगेचच ते तयार केलं होतं. सगळी मालमत्ता त्याने पत्नी या नात्याने तिच्या नावाने केली होती.म्हणजे तिला लाभार्थी केलं होतं.”—भोपटकर
“ तसं असेल तर रती शी लग्न झाल्याबरोब्बर हे विल रद्द होणार आपोआपच. ”
“ नाही होणार तसं पटवर्धन. कारण रती शी झालेला विवाह हा कायदेशीर नव्हता. मैथिलीने घटस्फोट दिलेला नसतांना त्याने रती शी लग्न केलंय.”—भोपटकर
“ पण माझी माहिती आहे की रती शी लग्न झाल्यावर त्याने वेगळ विल केलं होतं. त्यामुळे मैथिलीच्या नावाने केलेलं विल आपोआप रद्द होतं.” पाणिनी म्हणाला.
“ मी तुम्हाला मोकळेपणाने सांगतो पटवर्धन, त्याने मला रती शी लग्न झाल्यावर खरोखरच आधीचं विल रद्द करून नवीन विल करायला सांगितलं होतं.म्हणजे त्याचा मसुदा करायला सांगितला होता. पण मधेच त्याचा विचार बदलला.तो म्हणाला त्या दोघांत जो पर्यंत मिळकतीच्या वाटणी बाबत नक्की ठरत नाही तो पर्यंत थांब.”त्याच्या डोक्यात होतं की रती बरोबरच्या घटस्फोटाची तडजोड म्हणून तिला पुढची दहा वर्षं ठराविक रक्कम दरवर्षी द्यायची शिवाय विल मधे एका मोठ्या रकमेची तरतूद करून ठेवायची.पण त्यानुसार अंतिम विल प्रत्यक्षात तयार झालं नाही.”—भोपटकर.
“ म्हणून तुला वाटतंय की मैथिलीला ज्या विल द्वारे पत्नी म्हणून सर्व काही देण्यात आलं आहे ते त्याने केलेले शेवटचे विल आहे?” पाणिनीनं विचारलं
“ हो.म्हणूनच माझ्या सेक्रेटरीला मी तुमच्याकडे त्या विल ची प्रत घेऊन पाठवतो.तुम्ही त्यावरच्या सह्या, तपशील, तारखा, साक्षीदार,सगलं काही नजरेखालून घाला.नंतर मला परत फोन करा. ”—भोपटकर.
“ विल वर साक्षीदार म्हणून कुणाच्या सह्या आहेत?” पाणिनीनं विचारलं
“ मी आणि माझी सेक्रेटरी सूज्ञा पालकर.”
“ तुमच्या समोर रायबागी ने सह्या केल्या?” पाणिनीनं विचारलं
“ नुसत्या सह्याच केल्या असं नाही,तर तो आम्हाला म्हणाला सुद्धा की हे माझे शेवटचं विल आहे.त्यानेच सुचवलं की साक्षीदार म्हणून आम्ही दोघांनी सह्या कराव्यात. सूज्ञा पालकर बरोबर सांगेल तुम्हाला नेमक्या कुठल्या परिस्थितीत सह्या झाल्या विल वर ते. ते ऐकल्यावर तुम्हाला पटेल की खुनी माणूस विल मधे लाभार्थी असला तरी त्याला पैसे मिळणार नाहीत.” भोपटकर म्हणाला.
“ आणि मैथिली ही खुनी ठरली तर तिलाही पैसे मिळणार नाहीत या विल मधून.” पाणिनी म्हणाला.
“ तिचा काही संबंध नाही या खुनामध्ये.” भोपटकर ओरडला.
“ उलट काही पुरावे हे तिचा थेट संबंध आहे असंच दर्शवताहेत.” पाणिनी म्हणाला.
“ कोणते पुरावे?” भोपटकर ने विचारलं
“ मी फोनवर बोलणे योग्य नाही. तू मला विल पाठव तुझ्या सेक्रेटरी बरोबर ” पाणिनी म्हणाला. आणि फोन बंद केला.
“ सौंम्या, भोपटकर ची सेक्रेटरी इथे एक विल घेऊन येणार आहे.तिला जरा बाहेर बसुडे.आल्याआल्या आत अनु नकोस तिला.तुझ्या नजरेखालून घाल तिला.सकृत दर्शनी ती मिर्लेकर शी खूप चांगले संबंध ठेऊन आहे.त्याच संबंधातून मिर्लेकर ने रायबागी नसतांना भोपटकर ला कंपनीत घुसवलं आणि मग प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत रायबागी हा भोपटकरवर कसा अवलंबून राहील असं पाहिलं.त्यामुळेच आपली अशील रती आणि भोपटकर चे संबंध बिघडले.आणि तिच्याशी खुन्नस धरून भोपटकर आता मुद्दामच मैथिली चं वकीलपत्र घेतोय.” पाणिनी म्हणाला.
“ दिसायला कशी आहे ही सेक्रेटरी,सूज्ञा? ” सौंम्या ने विचारलं.
“ स्मार्ट आहे. छान आहे. ”
“ मग तिच्यावर विशेष लक्ष ठेव हे मला सांगायची गरज नाही. तुमच्या कडे येणाऱ्या सगळ्याच सुंदर मुलींकडे माझं खास नजर असतेच.” –सौंम्या.
पाणिनी ने हसून सौंम्या कडे पाहिलं.
“ तुमचं जे भोपटकर शी बोलणं चाललं होतं, त्यावरून मला वाटतंय तो तुम्हाला असं भासवायचा प्रयत्न करत होता की त्याच्या हातात हुकमाची पानं आहेत.” –सौंम्या
“ पण हे तो माझ्यावर इतके वेळा ठसवायचा प्रयत्न करत होता की जणू काही त्याच्यात काहीतरी कच्चा दुवा आहे आणि तो माझ्या लक्षात येऊ नये या साठी तो प्रयत्न करतोय.”
“ मैथिली हे जे नाटक करते आहे किंवा केलं आहे त्यातून ती निभाऊन जाईल?” सौंम्या ने विचारलं.
“ काय नाटक?” पाणिनीनं विचारलं
“ रायबागी पासून घटस्फोट घेते आहे असं भासवणं, त्यासाठी त्याच्या कडून पैसे उकळणं,नंतर घटस्फोट मिळालंय असं त्याला सांगणं,त्या नावावर त्याच्याकडून मोठी रक्कम मिळवणं,नंतर हळूच जाहीर करणं की घटस्फोट झालाच नाही त्यामुळे रती शी झालेला विवाह कायदेशीर नाही.त्यामुळे रायबागी ची विधवा म्हणून त्याच्या संपत्तीवर माझाच हक्क आहे. ” –सौंम्या
“ सौंम्या, यात जरा कायदेशीर बारकावे आहेत.ती हक्क सांगते आहे तो फक्त रायबागी ची विधवा म्हणून नाही तर त्याच्या विल नुसार असलेल्या तरतुदी प्रमाणे. असं विल,जे कधी बदललं गेलं नाही असं तिचं म्हणणं आहे.”
“ रती ला काहीच संरक्षण नाही का कायद्याने?” –सौंम्या
“ विल केल्यावर माणसाने लग्न केलं तर त्याच्या जोडीदाराच्या दृष्टीने विचार केला तर आधीचं विल रद्द ठरत.अर्थात याला काही अपवाद आहेत.” पाणिनी म्हणाला. तेवढ्यात इंटरकॉम वाजला.सौंम्या ने घेतला.
“ तुम्हाला भोपटकर ची सेक्रेटरी अपेक्षित होती इथे पण त्या ऐवजी स्वत: भोपटकरच आलाय.” –सौंम्या
“ आत यायला सांग त्याला.”
भोपटकर आत आला. “ रायबागीच्या घरात जो तमाशा झाला त्या बद्दल सॉरी, पटवर्धन.पण काय आहे, मैथिली आणि अंगिरस खासनीस यांचं कधीच पातळ नाही त्यामुळे ती एकदम आक्रमक झाली.” भोपटकर म्हणाला.
“ तुमची सेक्रेटरी येणार होती ना, विल घेऊन?” पाणिनीनं विचारलं
“ मी म्हणालो ना, ती तुमची खूप फॅन आहे, त्यामुळे तिला भीती वाटत होती की तुम्ही तिला विल वर सह्या कशा झाल्या ,त्यावेळेची परिस्थिती कशी होती यावर उलटतपासणी घ्याल.तिने मला अक्षरशः पाया पडून सांगितलं की मी नाही जाणार पाणिनी पटवर्धनांकडे.मग मीच आलो शेवटी. ” भोपटकर म्हणाला.आणि त्याने पाणिनीच्या हातात आपल्या बरोबर आणलेली विल ची प्रत दिली.
“ मूळ विल मी कोर्टात सादर केलंय,पटवर्धन, त्यांचे कडून अधिकृत होण्यासाठी.” भोपटकर म्हणाला. “ हे अगदी मोजक्या आणि नेमक्या भाषेत लिहिलेलं इच्छापत्र आहे.त्यात एवढंच म्हंटलंय की हे विल करतांना रायबागी याने ते उत्तम मानसिक आणि शारीरिक अवस्थेत असतांना केलंय. आधीची सर्व विल या विल द्वारे रद्द करण्यात आलेली आहेत आणि रायबागीची सर्व मालमत्ता त्याची पत्नी मैथिलीच्या नावाने केली आहे.अन्य कोणाच्याही नावाने नाही.जर कोणी एखादा माणूस या विल वर हक्क सांगून किंवा त्यात काही तृतू काढून हे विल अवैध आहे असं दाखवून संपत्तीवर हक्क सांगू लागला तर अशा व्यक्तीला एक हजार रुपये एवढी रक्कम देण्याची तरतूद या विल मधे केली आहे.हे विल माझ्या आणि माझी सेक्रेटरी सूज्ञा पालकर हिच्या समोर करण्यात आलाय आणि साक्षीदार म्हणून आमच्याच दोघांच्या सह्या आहेत. ” भोपटकर म्हणाला. “ तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा पटवर्धन.”
“ विल वर जी तारीख टाकली आहे,त्याच तारखेला ते केलंय?” पाणिनीने विचारलं.
“ होय मिस्टर पटवर्धन.त्याच तारखेला केलंय,माझ्या ऑफिसातच केलंय ते.रायबागीनेच आमच्या समोर सह्या केल्या आहेत आणि साक्षीदार म्हणून आम्ही दोघांनी सह्या कराव्या म्हणून त्यानेच सुचवलं,त्यानुसारच आम्ही केलंय.पटवर्धन, हे अत्यंत पद्धतशीर आणि कायदेशीरपणे केलं आहे.”
“ मैथिली आणि रायबागी चं लग्न झाल्यावर हे किती दिवसांनी केलं गेलं आहे?” पाणिनीने विचारलं.
“ अठ्ठेचाळीस तासातच. त्याने मला फोन करून सांगितलं की तो लग्न करतोय मैथिलीशी आणि तिच्यासाठी त्याला विल करायचंय.”
“ त्याआधीच्या विल चं काय? त्याने ते केलं असणारच.” पाणिनीने विचारलं.
“ त्या विल मधल्या तरतुदी मला नाही माहिती,कारण मी तेव्हा त्याचा वकील नव्हतो.” भोपटकर म्हणाला.
“ याचा अर्थ रायबागी ने ज्या दिवशी मैथिलीशी लग्न केलं,त्या दिवसापासूनच तू त्याचा कायदेशीर सल्लागार बनलास?” पाणिनीने विचारलं.
“ असं कुठे म्हणालो मी? खर तर हे विल बनवण्यापूर्वी अनेक महिन्यापासून मी त्याला छोट्या मोठ्या कायदेशीर बाबबीत मदत करत होतो.पण हे विल केल्यापासून तो माझ्यावर बराच अवलंबून राहायला लागला. ”
“ नंतर हळूहळू त्याचं आणि मैथिलीचं बिनसायला लागलं?” पाणिनीने विचारलं.
“ मैथिलीचं म्हणणं आहे की रती नेच त्याच्यात आणि मैथिली मधे वितुष्ट निर्माण केलं.त्यानेच नंतर मैथिलीला स्पष्ट सांगितलं की त्याला रती शी लग्न करायचं आहे. मैथिलीने केरशीला निघून जावं, तिथेच घर घेऊन राहावं आणि त्याला घटस्फोट द्यावा.”
“ या गोष्टीला मैथिली तयार झाली?” पाणिनीने विचारलं.
“ नाही.तिने इथेच रायबागी विरुद्ध दावा लावला कोर्टात. पण रती ला सुद्धा त्यात प्रतिवादी म्हणून गुंतवलं.रायबागी कडून खूप मोठी रक्कम पोटगी म्हणून मागितली,तिच्या देखभालीसाठी वेगळी रक्कम मागितली.रायबागी च्या संपत्तीचा ताबा घेण्यासाठी कोर्टाने अधिकारी नेमावा अशी मागणी केली.यासाठीचा सर्व खर्च सुद्धा रायबागी ने द्यावा अशी मागणी केली.” भोपटकर म्हणाला.
“ या दाव्याचं काय झालं?” पाणिनीने विचारलं.
“ मी स्वत: खात्री केल्ये,पटवर्धन, तो दावा काढून टाकलाय.”
“ काय कारण घडलं दावा काढून घेण्याचं?” पाणिनीने विचारलं.
“ मला समजल्यानुसार रायबागी आणि तिच्यात तडजोड झाली.तिने दावा काढून घेतला त्या बदल्यात त्याने तिला काही रक्कम दिली.ती घेऊन तिने केरशी ला जाऊन घर घेतलं आणि रायबागी ला घटस्फोट देण्याचं वाचन दिलं.”
“ पण प्रत्यक्षात दिला नाही?” पाणिनीने विचारलं.
“ रायबागी च्या घरी काय झालं ते पाहिलंत न तुम्ही. मैथिलीनेच सांगितलं की तिने रायबागी ला नुसतं भासवलं की तिने घटस्फोट घेतला म्हणून पण खर म्हंजे ते खोटं होतं.तिने ते भासवण्यासाठी कोर्टाची खोटी ऑर्डर पाठवून दिली.तो फ्रॉड होता हे मान्य पण त्यामुळे ही वस्तुस्थिती बदलत नाही न पटवर्धन, की तिने वास्तवात घटस्फोट दिलाच नाही त्यामुळे झालं काय की आधीच्या बायकोला घटस्फोट न देता रायबागी ने रती शी लग्न केलं असं झालंय,त्यामुळे ते अवैध ठरतंय.” भोपटकर म्हणाला.
“ मैथिली आणि रायबागी यांच्यात मालमत्तेबाबत कधीच तडजोड झाली नाही?” पाणिनीने विचारलं.
“ माझ्या माहिती प्रमाणे तरी नाही.त्याने तिला सांगितलं की तिच्या मागे त्याने गुप्तहेर लावले होते आणि तिचा कुठल्यातरी स्कँडल शी संबंध आहे.”
“ काय होतं ते?”
“ माहित नाही.” भोपटकर म्हणाला.
“ माहित नाही की तू सांगत नाहीयेस?”
“ प्रामाणिकपणे सांगतो मला माहित नाही नेमकं काय ते पण रायबागी ला मैथिलीच्या भूतकाळातलं काहीतरी माहिती होतं, ते लोकांसमोर आणायची भीती तिला दाखवून त्याने तिला दावा मागे घ्यायला लावला आणि तडजोड करायला लावली. ती त्याच्या म्हणण्याप्रमाणे केरशीला गेली. घटस्फोट द्यायचं मान्य केलं.पोटगी साठीचा हक्क सोडला.”
“ पण त्याच वेळी तिने त्याच्याशी डबल क्रॉस करायचं ठरवलं? ” पाणिनीने विचारलं.
“ मला नाही वाटत तसं.म्हणजे सुरुवातीला तिने सर्व रायबागी इच्छेप्रमाणे करायचं ठरवलं होतं पण रती ने ज्या प्रकारे रायबागी वर वर्चस्व प्रस्थापित केलं त्या नंतर तिने त्याला डबल क्रॉस करायचं ठरवलं.”
“ तू नक्की तपासलं आहेस की रायबागी आणि मैथिली यांची घटस्फोटाची ऑर्डर कोर्टाने दिली नाही?” पाणिनीने विचारलं.
“ तपासाल्यावरच मी मैथिलीचं वकीलपत्र घेतलं.”
“ पण तिने कोर्टाच्या ऑर्डर ची खोटी कॉपी रायबागी ला पाठवली?” पाणिनीने विचारलं.
“ नाही.” भोपटकर म्हणाला.
“ एक मिनिट, मैथिलीने ऑफिसच्या स्टाफ समोर ते कबूल केलंय ! ” पाणिनी उद्गारला.
“ एक बारकावा आहे त्यात, पाणिनी पटवर्धन. ती ऑर्डर खोटी नव्हती, फोर्ज्ड नव्हती.”
“ म्हणजे? काय म्हणायचंय काय तुला नेमकं?” पाणिनीने विचारलं.
“ म्हणजे तिने त्या ऑर्डर वर त्या कोर्टाच्या न्यायाधीशाची सही केली नव्हती.तिने एक जनरल सही केली होती.म्हणजे तो एक फ्रॉड होता पण तिच्या आणि रायबागी मधला होता.तो हयात असता तर त्याला तिच्या विरुद्ध तक्रार करता आली असती. पण काही झालं तरी तिने रायबागी पासून घटस्फोट घेतला नाही ही वस्तुस्थिती आहे.”—भोपटकर
पाणिनी काही बोलणार तेव्हढ्यात दार उघडलं गेलं आणि इन्स्पे.तारकर अचानक आत घुसला.
“ मी काही तुझं अशील नाही पटवर्धन, बाहेर थांबून तू बोलावल्यावर आत यायला. मी कामगिरीवर असतो तेव्हा असाच आत येतो. या क्षणी मी तुझ्या अशिलाला रतीला, खुनाच्या आरोपावरून अटक करायला आलोय.” तारकर म्हणाला.
“ काय पुरावा आहे?” पाणिनीने विचारलं.
“ ते रिव्हॉल्व्हर शेवटी खुनात वापरलेलं निघालं. आम्हाला त्यावर ठसे मिळालेत.” तारकर म्हणाला.
“ रतीचे?”
“ माहित नाही मला ,पण आम्ही तिचे ठसे घेणार आहोत अत्ता आणि तपासणार आहोत.”
“ पण हे रिव्हॉल्व्हर खासनीस, आणि तिच्या सेक्रेटरीने पण हाताळलंय” पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी, तुला सांगतो,की रिव्हॉल्व्हर वरून ठसे मिळवणे सोपे नसते पण या बाबतीत आम्ही नशीबवान ठरलोय कारण ज्याचे ठसे आहेत ती व्यक्ती एखादे चॉकलेट खात असावी किंवा नेल पेंट, या दोन पैकी कशाचे तरी डाग पडलेत ”
“ ठीक आहे, सौंम्या, रती ला इथे बोलावून घे.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १० समाप्त. )