मर्डर वेपन - प्रकरण 16 Abhay Bapat द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मर्डर वेपन - प्रकरण 16



प्रकरण १६
न्या. फडणीसांनी दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू होताच विचारलं, “ या सर्वांचा काय खुलासा द्याल तुम्ही खांडेकर?”
“ सूज्ञा पालकर ला गर्दीच्या ठिकाणी येऊन एखादी गोष्ट करायला भीती वाटते.म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजार आहे तिला.पाणिनी पटवर्धन यांनी तिची ही कमजोरी हेरून तिला मुद्दामच कोर्टात गर्दीसमोर यायला लावलं आणि आपल्या अशिलाला कसा फायदा करून घेता येईल हे पाहिलं. ” खांडेकर म्हणाले.
“ मिस्टर पटवर्धन, तुमचं काय म्हणणं आहे? काही थेअरी आहे?” फडणीसांनी विचारलं.
“ रायाबगी झोपेत मारला गेला, बरोबर? ” पाणिनीने विचारलं
“ बरोबर.”
“ मी माझी थेअरी या गृहितकावर आधारभूत ठेवली आहे की माझी अशील निर्दोष आहे.” पाणिनी म्हणाला.
“ पुढे बोला.” न्यायाधीश म्हणाले.
“ तो रात्री मारला गेला नसणार.कारण तसं असतं तर रती ला गोळ्या झाडल्याचाआवाज आला असता.म्हणूनच रती सकाळी जेव्हा अंगिरस खासनीस ला भेटायला गेली तेव्हा तो मारला गेला असावा.म्हणजे सकाळी ६ ते ८ या वेळेत.माझ्या ऑफिसात मर्डर वेपन ठेवलेली बॅग ठेवण्यात आली ती दुपारच्या वेळेत.विलासपूरला जी व्यक्ती विमानाने गेली ती सोमवारी संध्याकाळी साडेपाचला. भोपटकर अॅडव्होकेट त्याचं ऑफिस साडेचारला बंद करतो.थोडक्यात एकूण तीन कालावधीत हालचाली झाल्या. पहिली हालचाल, सकाळी ऑफिस उघडले जाण्यापूर्वी. दुसरी दुपारच्या जेवणाच्या सुमारास आणि तिसरी ऑफिस पुन्हा बंद झालं तेव्हा.या हालचाली अशा व्यक्तीच्या आहेत, जी व्यक्ती त्या ऑफिसात नोकरीला होती पण रजा घेण्याचं किंवा ऑफिसात अनुपस्थित राहाण्याच धैर्य दाखवू शकत नव्हती. ” पाणिनी सांगू लागला.
“या खटल्यात एकूण दोन रिव्हॉल्व्हर गुंतल्या आहेत.एक पद्मराग रायबागी कडे होती.रती कडे दुसरी होती. रतीने तिच्या कडच्या रिव्हॉल्व्हर वरचा नंबर कधीच पहिला नव्हता, म्हणजे तशी वेळच आली नव्हती.पण तर्काने विचार केला तर,पद्मराग रायबागी ने जे रिव्हॉल्व्हर नव्याने घेतले तेच रतीला भेट दिले असणार हे गृहीत धरणे अत्यंत स्वाभाविक आहे. पण खून झाला तो जुन्या रिव्हॉल्व्हरने म्हणजे जे रिव्हॉल्व्हर पद्मराग रायबागी ने प्रथम खरेदी केलं होतं त्या रिव्हॉल्व्हरने.आणि ते रतीच्या पर्स मधे होतं.याचा अर्थ असा की,कोणाला तरी,पोलिसांच्या आधी तिच्या अपार्टमेंटमधे जाऊन तिच्या रिव्हॉल्व्हर ची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. ”
पाणिनी बोलताना किंचित थांबला, त्याने अंदाज घेतला, फडणीस आणि खांडेकर दोघेही त्याच बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते.
“ रती चैत्रापूरला आली होती तेव्हा तिची पर्स चोरली गेली.त्या आधी ती कुंभावे ला गेली होती. ठरलेल्या भेटी नुसार आपल्या नवऱ्याला भेटायला जात असतांना वाटेत काहीतरी घ्यायला ती कारमधून उतरली आणि आणि अगदी समोरच्या दुकानात गेली. गाडी लॉक करायचे कष्ट सुद्धा तिने घेतले नसावेत कारण दुकान समोरच होतं आणि तिला एखादी वस्तू घेऊन लगेचच यायचं होतं. ही संधी चोराने साधली आणि तिची पर्स चोरली. ती अशा व्यक्तीने चोरली असावी जिला रतीची डार्क गॉगल घालायची सवय महिती असणार आणि त्याच बरोबर जिला तिच्या अपार्टमेंटची किल्ली हवी असणार. ” पाणिनी म्हणाला.
“ नाही पटवर्धन, पण मग ती व्यक्ती, आपल्या जवळच्या किल्लीने, रतीचे अपार्टमेंट उघडून रिव्हॉल्व्हर घेण्यासाठी आदल्या दिवशी,रविवारी रात्रीच विलासपूरला का गेली नाही?” न्या.फडणीसांनी विचारलं.
“ कारण, युअर ऑनर, नियोजनानुसार खून होईलच याची खात्री त्या व्यक्तीला नव्हती.” पाणिनी म्हणाला. “ त्याला ही खात्री नव्हती की, रती आणि अंगिरस खासनीस सकाळी लौकरच एकत्र नाश्ता करण्यासाठी भेटणार आहेत.म्हणजे त्याला तसं वाटलं असेल पण खात्री नसेल. ”
फडणीसांना ते पटल की नाही हे पाणिनी ला समजायला मार्ग नव्हता.तो पुढे बोलू लागला, “ त्या व्यक्तीने रती ची बॅग चोरली, त्यातल्या किल्ल्यांची डुप्लीकेट करून घेतली, रविवारी संध्याकाळीच.आणि सकाळी रती बाहेर जाई पर्यंत वाट पहिली,ती जाताच ती व्यक्ती त्याच्या फ़्लॅट मधे शिरली, तो पर्यंत पद्मराग रायबागी झोपलाच होता.त्या व्यक्तीने सरळ दोन गोळ्या त्याच्या डोक्यात घातल्या आणि ते मर्डर वेपन रतीच्या पर्स मधे ठेवलं आणि ती पर्स माझ्या ऑफिसात ठेवायची व्यवस्था केली, आणि ते ही अशा प्रकारे की माझी रिसेप्शनिस्ट अगदी खात्री देईल की ही पर्स घेऊन स्वत: रती रायबागीच ऑफिसला आली होती. ”
“ पण मग त्या व्यक्तीने हे सर्व दुपार पूर्वीच का नाही केलं?” न्या.फडणीस म्हणाले.
“ याचं कारण असं आहे युअर ऑनर, की दुपार पूर्वी हे करणे त्या व्यक्तीला अशक्य होतं.माझ्या संपूर्ण केस मधला हाच मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. खुनी कसा असणार होता लक्षात घ्या, पहिलं म्हणजे त्याला धंद्याची माहिती होती, दुसरे म्हणजे त्या व्यक्तीला घरातल्या माणसांच्या सवयी माहिती होत्या, तिसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती नोकरी करणारी होती. ” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही मगाशी ज्या तीन कालवधीचा उल्लेख केलात,त्या वरून हे अनुमान काढताय का? ”
“ होय.”
“ ओह! पटवर्धन पुन्हा काहीतरी थातूर मातूर ......” खांडेकर
“ थांबा जरा, खांडेकर, तुमचं म्हणणं मी नंतर ऐकून घेईन. मला आधी पटवर्धन यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेऊ दे.”
“ माझ्या ऑफिसात ज्या पद्धतीने बॅग ठेवली गेली, त्यावरून मला वाटतंय की खुनी माणसाची साथीदार स्त्री असावी, पण खुनी व्यक्ती पुरुष असावा. हा तर्क मान्य केला तर स्त्री साथीदार कोण असणार हे आपल्या लक्षात येतं. एक तर,भोपटकर ची सेक्रेटरी सूज्ञा पालकर, दुसरी, अंगिरस खासनीस ची सेक्रेटरी निवेदिता नंदर्गीकर, किंवा पद्मराग ची पूर्व पत्नी मैथिली अथवा अजून पर्यंत कोणासमोर न आलेली पण माझ्या माहितीतून बाहेर आलेली हिमांगी उत्क्रांत उदगीकर.उदगीकर हा माणूस केरशी या गावात राहतो.त्याचं बंगलेवजा घर आहे.आपले आउट हाउस तो गरजूंना भाड्याने देतो. सूज्ञा पालकर,मैथिली या दोघींनी घटस्फोट प्रक्रियेत असतांना,किंवा घेण्यापूर्वी नवऱ्यापासून वेगळे राहावे लागते म्हणून उदगीकरचे आउट हाउस भाड्याने घेतले होते. हिमांगी ही उत्क्रांत उदगीकर ची मुलगी. या तिघी मैत्रिणी झाल्या होत्या.” पाणिनी म्हणाला.
न्या.फडणीसांनी आपल्या उजव्या हाताची तर्जनी ओठाला लावली.पाणिनी च्या लक्षात आलं की त्यांना आपलं म्हणणे पटतंय.
“मला या पैकी प्रथम संशय आला तो अंगिरस खासनीस ची सेक्रेटरी निवेदिता नंदर्गीकर हिचा.कारण मर्डर वेपन मधे आदलाबदल करायची उत्तम संधी तिलाच होती.पण नंतर अॅडव्होकेट हृषिकेश भोपटकर मला म्हणाला की तो माझ्या ऑफिसात विल संदर्भात काही कागदपत्र पाठवेल , त्याची सेक्रेटरी सूज्ञा पालकर ते घेऊन येईल.प्रत्यक्षात स्वत:भोपटकर ते घेऊन आला. मी मोकळे पणाने कबूल करतो की त्यावेळी मला त्यात वावगे असे काहीच जाणवले नाही पण नंतर जेव्हा विल च्या खरेपणा बद्दल इथे कोर्टात साक्ष देतांना तो आणि त्याचे सेक्रेटरी दोघेही येणे अपेक्षित असूनही ती आलीच नाही तेव्हा मला एकदम जाणीव झाली की ती माझ्या ऑफिसात का आली नसावी.माझी रिसेप्शानिस्ट गती आपल्याला ओळखेल अशी भीती तर तिला वाटत नव्हती?म्हणून मी एक शक्कल लढवली. रिसेप्शानिस्ट गती ला आणखी एका मुली बरोबर इथे कोर्टात हजर राहायला सांगितलं. तिला प्रश्न विचारतांना बोलण्यात गुंतवून मी म्हणालो की तुला गॉगल घालून साक्ष द्यायची नसेल तर तू तुझा गॉगल काढून माझ्या रिसेप्शानिस्ट कडे दे. आणि मी तिच्याकडे पाठ वळवून माझ्या खुर्चीत येऊन बसलो आणि तिने गती च्या हातात गॉगल नेऊन दिला.” पाणिनी म्हणाला.
“ बर मग?” न्या.फडणीस गोंधळून म्हणाले.
“ मुद्दा हा आहे युअर ऑनर,की तिला माझी रिसेप्शानिस्ट गती आहे हे कसं कळल? ती माझ्या ऑफिसात आलीच नसती तर तिने गती ला बघितलंच नसत. तिने कोर्टात नकळतच गतीकडे गॉगल दिला ही कृती सिद्ध करते आहे की तिची आणि गतीची आधी भेट झाली होती,माझ्या ऑफिसात.” पाणिनी ने बॉम्ब फोडला.
“ ओह!” खांडेकर उद्गारले. “काल्पनिकतेला तर्काच्या निकषावर सिद्ध करायचा प्रयत्न. म्हणजे खुनी म्हणून तुम्ही रती ऐवजी सूज्ञा आहे असे भासवताय. ”
“ नाही ती फक्त खुन्याची साथीदार आहे.” पाणिनी म्हणाला.
“ या सर्वाच्या मागचा सूत्रधार भोपटकर नसेल असं का वाटतं तुम्हाला?” न्यायाधीशांनी पाणिनीला विचारलं.
“ कारण भोपटकर असता तर सूज्ञाला सोमवारी ऑफिसात येताना एवढा धोका पत्करण्याची गरजच भासली नसती. माझ्या ऑफिसात रती ची बॅग ठेवल्यावर ती सरळ विलासपूरला विमानाने निघून जाऊ शकली असती..” पाणिनी म्हणाला.
“ पण खुनाच्या हेतूचे काय?” न्या.फडणीसांनी विचारलं.
“ खुनी व्यक्ती बद्दल माझ्या मनात जेवढी ठाम खात्री आहे तेवढी अजून खुनाच्या हेतू बद्दल नाहीये.पण सूज्ञा पालकर इथे परत आली की तिच्या कडून अधिक माहिती घेणे शक्य होईल. त्यातून खुनाचा हेतू काय त्यावर प्रकाश पडेल.” पाणिनी म्हणाला.
“ मिस्टर खांडेकर, मला वाटतं तुम्ही पोलिसांना.......” न्या.फडणीस म्हणाले,पण खांडेकरांनी त्यांना मधेच तोडत म्हंटले, “ नाट्यमय घडामोडी घडवून आणण्यात पटवर्धन अॅडव्होकेट माहीर आहेत. आपल्या अशिलाला, सोडवण्यासाठी,ते नेहेमीच दुसऱ्यावर संशय निर्माण करतात,त्यासाठी काय काय युक्त्या,नाटके करतात.इथेच बघा ना, कोर्टाच्या बेलीफला त्याने सूज्ञा पालकर च्या मागे असे काही पिटाळलं की एखादी निष्पाप मुलगी घाबरून पळून जाईल.आणि सूज्ञा पालकरच्या बाबतीत असंच झालं.” --खांडेकर
“सूज्ञा पालकरच्या अटकेचे मी पोलिसांना आदेश देतोय. तिला अटक करून कोर्टात हजर करावं.मी त्याच बरोबर खांडेकरांनी मैथिली रायबागी ची पण चौकशी करावी, ते करणार नसतील तर तारकर यांनी ते काम करावं.” फडणीस म्हणाले.
“ ठीक आहे कोर्ट पटवर्धन यांच्या म्हणण्यानुसार वागत असेल तर माझा नाईलाज आहे,तुमचे आदेश मला मानावे लागतील पण मी पुन्हा सावध करतो कोर्टाला की वेळकाढूपणा करण्यासाठी पटवर्धन ......” खांडेकर थकून म्हणाले पण न्यायाधीशांनी त्यांना मधेच अडवलं.
“ तुमच्या आवाजावरून तुम्ही भोळे आणि भाबडे असल्याचा आव आणताय पण कोर्ट तसं नाहीये लक्षात ठेवा.मी आजचं कामकाज थांबवतोय.उद्या मला कोर्टात सूज्ञा हजर हव्ये.” फडणीस म्हणाले.
न्यायाधीश आपल्या चेम्वर मधे जाताच पाणिनीने कनक ओजस ला फोन लावला.
“कनक मला कणाद मिर्लेकरने अपहाराची रक्कम कुणाच्या खात्यात वर्ग केली याचा तपशील हवाय. म्हणजे बँकेचे नाव आणि ज्याच्या खात्यात जमा झाली ते नाव. हा रोखीने केलेला व्यवहार असणार नाही कारण बँका मोठ्या रकमा काढूनही देत नाहीत किंवा खात्यात भरूनही देत नाहीत.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १६ समाप्त)