भीती Krishnashuchi द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

भीती

महत्त्वपूर्ण निवेदन :-

● सदर कथेचा उद्देश हा निव्वळ शुद्ध-मनोरंजनासाठी असून त्याद्वारे समाजात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा गैरसमज पसरविण्याचा लेखकाचा उद्देश नाही, हे कृपया वाचकांनी जाणावे.
● कथेतील सर्व पात्रे, स्थळे आणि घटना या पूर्णतः काल्पनिक असून केवळ कथेची आवश्यकता म्हणून त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे, त्यांचा वास्तवातील कोणतीही जीवित किंवा मृत व्यक्ती, स्थळे अथवा घटना यांच्याशी संबंध नाही. तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
● कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव असून, लेखकाच्या परवानगीशिवाय सदर कथा-
१) अन्य व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहांच्या नावे प्रकाशित केल्यास,
२) गैर अथवा अनधिकृत वापर केल्यास,
३) अन्य प्रकाशनीय माध्यमांमार्फत प्रदर्शित केल्यास,
संबंधित व्यक्तीवर/व्यक्तीसमूहांवर अथवा संस्थेवर कठोर कार्यवाही करण्यात येईल याची कृपया वाचकांनी दखल घ्यावी, ही नम्र विनंती.
◈◈◈

 

रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते. मेनरोडवरच्या दिव्यांचा पिवळसर मंद प्रकाश सभोवतीच्या अंधाराला दूर लोटण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होता. दिव्यांच्या परिघाबाहेर साकाळलेला गर्द अंधार मात्र दबा धरून बसलेल्या श्वापदाप्रमाणे स्तब्ध बसून होता..

मेनरोडपासून आत वळणाऱ्या 'ढवळे' गल्लीत किर्र शांतता पसरली होती. तिथे मात्र दुर्दैवाने एकच दिव्याचा खांब आपल्या सर्व ताकदीने सभोवताली उजेड पाडण्याचा प्रयत्न करीत होता...

वाढत जाणाऱ्या रात्रीच्या प्रहरात गल्लीतला जो-तो आपापल्या घरात दडून झोपेच्या अधीन झाला होता. रात्रीच्या पसरलेल्या नीरव शांततेत वाहणारी वाऱ्याची झुळूक रस्त्यालगतच्या झाडांना हलकासा स्पर्श करून जात होती. पानांच्या सळसळीने होणारा हलकासा आवाजाच काय तो शांततेच्या गडद पडद्याला छेदून जात होता. 

मकरंदने वळण ओलांडलं आणि ढवळे गल्लीत प्रवेश केला. गल्लीच्या अगदी शेवटच्या टोकाला असणाऱ्या सोनावणे चाळीत त्याचं घर होतं. तिशी-पस्तीशीच्या आसपास वय असणारा मकरंद एका कापड दुकानात सेल्समन महणून कामाला होता.

त्याचं झालं असं, की आज दुकानाचे मालक शहा शेठजी यांच्याकडे पूजा होती अन् त्यानिमित्त मकरंद आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांच्या बंगल्यावर जेवायला गेला होता.
मालकाच्या श्रीमंतीचा थाट बघून थक्क झालेले मकरंदसारखे गरीब तरुण, 'साला आपलं नशीबही हे असंच उजळलं पाहिजे!' असा विचार करीत तिथल्या चमचमीत जेवणावर ताव मारत होते.
गप्पा हसी-मजाक करता करता वेळ कसा निघून गेला त्याला समजलंही नाही. साडेदहा होत आले तसं त्याने शेठजींचं घर सोडलं आणि पायी तो आपल्या घरी निघाला. कालच त्याची सायकल दुरस्तीसाठी टाकली असल्याने बिचाऱ्याला ही एवढ्या रात्रीच्या वेळी पायपीट करत घरी जावं लागणार होतं...

आज त्याला स्वतःचा अभिमान वाटला कारण शेठजींच्या घरची रग्गड मेजवानी दाबून बाकीचे त्याचे सहकारी पुढे मदीरादेवीच्या दर्शनाला जाणार होते पण याने मात्र त्या सर्वांना नकार दिला. घरी बायको एकटी असल्या कारणाने त्याला घरी जाणं भाग होतं!

साडेदहा... पावणे-अकरा... साडे-अकरा.. होत आले तशी रस्त्यावरची वर्दळ बरीच कमी झालेली मकरंद बघत होता.
ढवळे गल्लीत पाय टाकताच त्याच्या पोटात एकदम गोळा आला ! नाही अंधाराला तो भीत होता असं नाही पण तिथली शांतता त्याला एकदम बेचैन करून सोडत होती. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली लांब अंधारी निर्मनुष्य गल्ली बघून त्याच्या मनात थोडा का होईना पण भीतीने प्रवेश केला होता !

एक मोठा श्वास घेऊन अन् सोडून त्याने ती लांब गल्ली चालायला सुरुवात केली. चालता चालता मकरंद आजुबाजूच्या घरांचं निरीक्षण करत होता. सगळ्या इमारती आणि त्यात राहणारी लोकं आपापल्या घरात शांत निजली होती. काळोखाने मंतरलेल्या त्या घरांच्या गूढ सावल्या रस्त्यावर एखाद्या पिशाच्चाप्रमाणे मुक्त संचार करीत होत्या. आजुबाजूच्या झाडांचीही तीच तऱ्हा, चंद्राच्या क्षीण निळसर प्रकाशाची झालर ओढून बसलेल्या डेरेदार झाडांच्या त्या फिकट करड्या प्रतिमा रात्रीच्या पार्श्वभूमीवर आणखी गुढतेचे वलय निर्माण करीत होत्या.. मकरंद पाहत होता.

'या झाडांना, या निर्जीव घरांना सुद्धा या अंधाराऱ्या रात्रीची भीती वाटत असेल का? का या अंधारने त्यांनाच आंधळं करून टाकलं असेल?' चालता चालता मकरंद मनात विचार करत होता.

पायी एवढा रस्ता चालत आल्यामुळे आता तो बऱ्यापैकी थकला होता. ढवळे गल्ली तशी लांबच लांब पासरलेल्या निम्न प्रतीच्या बंगल्यांची आणि ठेंगण्या इमारतींची गल्ली होती. दोन्ही बाजूला वसलेल्या या बंगल्यांची आणि इमारतींची संख्या मिळून २५-३० च्या आसपास असावी त्यामुळेच या गल्लीचा घेर लांबच लांब पसरला होता. नावात 'गल्ली' असलं तरी या भागाला बरंच मोठं रूप प्राप्त झालं होतं..

पाच मिनिटं झाली असतील.. आपल्याच विचारांत चालणाऱ्या मकरंदला कसला तरी आवाज आला. तो आवाज त्याच्या कानात शिरला अन् त्या आवाजाने त्याच्या विचारांची तंद्री भंग पावली. मकरंद गपकन चालायचा थांबला !
चहूबाजूंनी शांततेने वेढलेल्या त्या परिसरात अचानक हा कशाचा आवाज आला? त्याच्या मनाने दिशेचा वेध घेतला. आवाज नक्कीच मागून आला होता, पण त्याची तीव्रता बऱ्यापैकी क्षीण होती. इतकी की आवाज कशाचा होता हे ही सांगता यायचं नाही.

मकरंद चपापला..
आवाज?... आपल्या मागून?...मानवी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे तो मागे वळून बघणार तोच त्याने स्वतःला थांबवलं. नको... आधी कानोसा घे! त्याचं मन म्हणालं. तसाच मिनिटभर उभा राहून त्याने आवाजाचा पुन्हा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण आता मात्र त्याच्या कानांवर कोणताही आवाज आला नाही..

'आपल्याच मनाचे खेळ...' स्वतशीच म्हणत त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली पण मागे वळून बघायला त्याची हिम्मत धजावेना ! 
आता मात्र त्याने पावलांची गती वाढवली. चालता चालता त्याच्या लक्षात आलं की आपल्या मस्तकाच्या डाव्या कोपऱ्यातून घामाचा एक थंड ओघळ जडावून खाली वाहायला लागणार आहे. आता त्याच्या मनाला भीतीचा हलका हलका स्पर्श होऊ पाहत होता !

पाच-दहा पावलं चालून जातो की तोच पुन्हा तो आवाज ! आता मात्र तो आवाज त्याला अगदी स्वच्छपणे ऐकू आला !

छुन् sss.... छुन् sss.... छुन् sss....

पायातल्या नाजुक पैंजणांचा आवाज ! घुंगरं एकमेकांवर वाजून झालेला अत्यंत नादमाधुर आवाज !
अगदी जवळून नाही पण पंधरा-वीस फुटांवरून आलेला, शांततेला चिरून टाकत कानात शिरणारा पैंजणांचा तो गूढ आवाज !

मकरंद एकाएकी गपकन आपल्या जागेवर थांबला..

त्याच्या मानेवरून भीतीची एक शीत लहर तूफान वेगात सरसरत निघून गेली. आता मात्र मागे वळून पाहणं भाग होतं.., खरंच भाग होतं का? मागे काय उभं असेल याची त्याला कल्पना करता येत होती पण त्याला ती मुळीच करायची नव्हती. लहानपणापासून गावाच्या मातीत कसलेलं त्याचं मन, पक्कं ओळखून होतं की अश्या 'गोष्टी' आपण मागे पहिलं की क्षणात आपलं मानगुट धरतात अन् मग मात्र आपली खैर नाही !
पण काय शक्यताय की 'तसलं'च काहीतरी असेल म्हणून ? कुणी बाईमाणूस असलं तर ? त्याच्या मानत विचार आला.
'छेss... इतक्या रात्रीचं बाईमाणूस काय, साधं माणूसही इथं कसं असू शकेल? (हां आता आपली गोष्ट  वेगळी! आपलं घरच आहे जवळ!) त्याच्या मनात विचार आला. 

पाहावं का मागे वळून ? 
जाऊदे मरुदे, कशाला नसतं लचांड !..

त्याने झटक्यात तो विचार मनातून काढून फेकला आणि आधीपेक्षा दुप्पट वेगात पुन्हा चालायला सुरुवात केली !
पाच-दहा पावलं चालून जातो की तोच...

परत... तो आवाज..!
छुन् sss.... छुन् sss.... छुन् sss.... !

आता मात्र मकरंद पुरता घाबरला. पुन्हा चालायचा थांबला. झालं.. तो थांबला की आवाजाही थांबला.. मकरंदला काय करांव कळेना! पुढेच पाहून ओरडून विचारवं का? कोण आहे म्हणून?.. नको... काही विचित्र-वंगाळ असलं तर मागूनच झडप घालून नरडीचा घोट घेईल !
नुसत्या विचारानेच त्याच्या पायातलं त्राण गेलं. हातपाय लटपट कापायला लागले !

प्रेक्षकांसमोर उभ्या जादूगाराने आपली जादूची कांडी फिरवावी आणि साऱ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकावं तशी भीतीची कांडी हळूहळू आपल्याभोवती कुणीतरी फिरवतंय असा भास मकरंदला होऊ लागला ! भोवताली वाहणाऱ्या वाऱ्याची मंद झुळूक्, त्याच्या अंगाला मात्र काट्यांसारखी टोचू लागली. आभाळात स्थिरावलेला चंद्र म्हणजे एखाद्या सैतानाचा अक्राळविक्राळ डोळाच वाटू लागला. दशदिशात विरघळलेला अंधार म्हणजे एखाद्या पिसाळलेल्या चेटकिणीच्या लांबच लांब जटा वाटू लागल्या. दोन्ही बाजूंना उभ्या इमारती, खांब, अजगरासारखा पसरलेला हा रस्ता म्हणजे एखाद्या राक्षसाची महागुहा वाटू लागली...

मकरंदची भीतीने पार गाळण उडाली होती. पुढच्याच क्षणी सुसाट वेगात पळून जायचा विचार त्याच्या मनात आला पण ती कृती करायला त्याचं शरीर मात्र निष्ठुर झालं होतं, भीतीच्या जख्खड अंमलाखाली सुस्त पडलेल्या त्याच्या शरीरात विचारांची चेतनाच निर्माण होत नव्हती ! 

दोन मिनिटं झाली. सगळीकडे कसं शांत स्तब्ध निश्चल होतं. मकरंद अजूनही तसाच उभा होता. ना मागे वळून बघत होता ना पुढे चालत होता..

काही क्षण गेले आणि हळूहळू त्याच गेलेलं त्राण त्याच्या शरीरात, मनात पुन्हा एकवटून यायला सुरुवात झाली. भीतीची तीव्रता जराशी कमी झाली आणि त्याने ठरवलं.. 'आता काहीही होवो, ना चालणं थांबवायचं ना मागे वळून बघायचं..!' आणि त्याच निश्चयाने त्याने पुढचं पाऊल टाकलं आणि तो परत चालायला लागला..

झालं... परत तोच पैंजणांचा नाजुक, छुन् sss .. छुन् sss .. असा आवाज...!
पुन्हा तेच...

मनाने कितीही विरोध केला तरी मकरंद थांबायचा तो थांबलाच !
अन् त्याची चाल थांबल्याक्षणी मागून येणारा तो आवाजाही पुन्हा थांबला !

मकरंद एका प्रकारे वैतागलाच ! 'साला कसली बिलामत मागे लागली आहे आपल्या!', मनातल्या मनात तो म्हणाला.

'च्यामारी बघतोच एकदा कोण आहे मागं! नक्कीच चाळीतली पोरं नसत्या खोड्या नाहीतर वात्रटपणा करत असतील.. बघतोच एकेकाला !".. गुश्शात तो वळणार की तोच त्याच्या मनाने त्याला धोक्याची सूचना दिली !
'वळू नकोस..! मागे असणारी ती मुलं.. मुलं नसली तर ? काहीतरी दुसरंच असलं तर ?' विचारासरशी त्याच्या अंगावर सरसरून काटा आला !
 
मान वळवता वळवता त्याने स्वतःला थांबवलं...
स्तब्ध होऊन त्याने आवाजाच्या व्यतीरिक्त इतर काही चाहूल लागते का हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण त्याच्या ज्ञानेंद्रियांना मात्र कसलीच जाणीव झाली नाही.. ना कसली हालचाल, ना गंध, ना दूसरा कुठला आवाज.. पुसटशीही जाणीव नाही...
मकरंदचा जीव कासावीस होऊ लागला. भीतीने त्याला नीट श्वासही घेता येईना...

इतकावेळ त्याच्या अवतीभोवती घडत असणारं ते सगळं प्रकरण त्याला आता कुठेतरी ओळखीचं, आठवणीतलं वाटू लागलं.. भूतकाळात घडून गेलेल्या घटना आणि ते प्रसंग पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहू लागले...
***


दहा वर्षांचा मकू आपल्या दोस्तांसोबत नदीवर मासे पकडायला, आंघोळीला जायचा. लहानपणीची मजाच काही और होती.. ना कसली चिंता ना कुठल्या जबाबदरीचं ओझं ! बस्स स्वैर आणि स्वछंदी जगणं...

मकू अनू त्याचे दोन मित्र, बाळ्या आणि गणू तिघे मिळून दिवसभर अख्या गावत फिरत धमाल करत असायचे. दुपारी शाळा सुटली की, ही तिकडी गावच्या पारावर बसून टवाळक्या करायची! त्यात भरिस भर म्हणून दुपारची जेवणं उरकून आजुबाजूच्या घरातली दोन-चार म्हातारी टाळकी गप्पा मारायला म्हणून पाराखाली जमायची आणि मग या तिघांच्या मौजमजेला उधाणच यायचं..
याचं मुख्य कारण म्हणजे रघोबा ! गावतलं सर्वांत जून आणि अनुभवी खोड ! गावात घडणाऱ्या तमाम गोष्टींची इत्यंभूत खबर रघोबाला असायची. गावात साधं गवताचं पातं जरी हललं तरी त्याची कानोकान खबर रघोबाला कळायची. असा हा रघोबा या पोरांसाठी वेगवेगळ्या चटकदार गोष्टी, कहाण्या, किस्से यांनी भरलेली सोन्याची पोतडीच होता !

अशीच एक पावसाळी संध्याकाळ होती...
पावसाच्या गर्द थेंबांनी गच्च भरलेलं आभाळ, काळ्या रंगाची चादर ओढून निवांत पहुडलं होतं अन् एकदा का त्याच्या उदरातल्या मेघांची आपापसात टक्कर सुरू झाली की झोपमोड झालेल्या जनावराचं ते आभाळ, अवघ्या धरणीवर बरसणार होतं.!
सगळीकडे कसं अंधारून आलं होतं... ओल्याकंच कातरवेळेने मनावर मळभ साचवायला सुरुवात केली होती...

रघोबा आपल्या सवयीनुसार पारावर विडा चघळत बसले होते.. कुठूनशी ही तिकडी त्यांच्या समोर हजर झाली..
मकू, बाळ्या आणि गणू..!

"काय रं पोरांनो इथं काय करताय? घरला जावा की, तिन्ही सांजा झाल्या आता", पोरांकडे आश्चर्यांनं बघत रघोबा म्हणाला. 

"अण्णा, आत्ता आमच्या घरला कोनी बी नाई, बाळू अन् गनूचे आईबाप तालुक्याला गेलेत आणि माझ्या आई अन् बा ला घरी यायला देर आहे !" मकूने सांगितलं.

"बर.., पोरांनो बसा हीथं माझ्याजवळ ! तुमचं आईबाप आलं की निमूटपणे घरला जा!", रघोबाने तिन्ही पोरांना आपल्या जवळ बसून घेतलं. डोक्यावर छप्पर देणाऱ्या डेरेदार वडाच्या झाडाखाली ही चौघं संध्याकाळच्या गावाची हालचाल बघत बसली होती...

कुठूनसा गण्याच्या डोक्यात तो विचार आला ! 

"रघोबा, आरं आता बसलो हाय इथं तर, एखादी भुताची नाईत हाडवळीची गोष्ट सांग की!..", खट्याळ हसत गणू रघोबाला म्हणाला.
ते ऐकून मकू आणि बाळ्या घाबरले !

"ए नको ये आधीच अंधार पडाय लागलाय, भूत-बीत तसलं नको काय, भ्या वाटतंय आम्हास्नी..!" ते दोघं म्हणाले.

गण्या खदाखदा हसायला लागला.

"काय भित्री भागुबाई हाय रं तुम्ही दोघं बी, काय त म्हणे भीती वाटती!! ", गण्या हसत हसत म्हणाला. त्यावर बाळ्या चिडला !

"अय गण्या, दात काढू नग, आम्ही बी काय भूताला भीत नाय.., पन काय हाय, सांजच्या टायमाला हे असलं अभद्र काय तर नग! ...", बाळ्याने आपली बाजू मांडली.
या सगळ्यात मकू मात्र गप्प बसून होता. या गाढवांच्या नादी लागण्यात अर्थ नाही हे त्याला माहीत होतं. पण खरं सांगायचं झालं तर या भूता-खेतांची त्यालाही मनातून भीतीच वाटत होती..!

गण्याने मात्र आपली री ओढूनच धरली. 'गोष्ट सांग म्हणजे सांग..', तो रघोबाच्या खनपटीलाच बसला!
पोरांची आपापसातली वादावादी बघून रघोबा मध्ये पडला..

शेवटी नाईलाजाने रघोबाने आठवून आठवून एक खुसखुशीत, जळजळीत भुताटकीची गोष्ट सांगायला सुरुवात केली...
गोष्टीचं नाव होतं -
'पाठलाग !'....
***


अरे ! तीच की ही गोष्ट ! मकू म्हणजेच मकरंद- त्याच्या मनात विचार चमकला !
अंधाऱ्या रात्री एक माणूस रस्त्यावरून चालत असतो, हळूच त्याला मागून कशाचा तरी आवाज येतो, तो चालायचा थांबतो आणि कानोसा घेतो, परत चालायला लागतो तेव्हा पुन्हा तो आवाज येतो, तो असतो पैंजणांचा आवाज !, मग तो आवाज सारखा त्याच्या मागून येतच राहातो, तो चालला की सुरू होतो, थांबला की तो आवाजाही थांबतो, अन् मग शेवटी तो माणूस भीतभीत मागे वळून पाहतो, आणि.....

कथेच्या अंतामध्ये आता, त्याला आपलाच अंत जवळ आल्यासारखा दिसू लागला !

हेच तर घडतंय आपल्यासोबत ! लहानपणी ऐकलेली ती भुताची गोष्ट खरोखरीच आपल्या अवतीभोवती घडतीय..!
मकरंद पुरता घाबरला.!
रघोबाने सांगितलेल्या गोष्टीचा शेवट त्याला आठवत होता. तो शेवट डोळ्यांपुढे येताच त्याच्या काळजाचं पणीपाणी होत होतं !

 मागे वळून बघायची हिम्मत तर तो केव्हाच गमावून बसला होता. भीतीनं त्याच काळीज अक्षरशः थडथड उडत होतं !

दोन मिनिटं झाले - पांच मिनिटं झाले.... अंधाराने दाटलेल्या, निर्मनुष्य अश्या त्या गल्लीत मकरंद बर्फाने गोठलेल्या एखाद्या पुतळ्यासारखा, निश्चल उभा होता. त्याच्या विचारांची संवेदनाच जणू नाहीशी झाली होती. मागे उभं 'ते' नक्कीच त्याचा घास घेणार!, हा विचार जिवाचा पार थरकाप उडवीत होता.!

ना मागे वळून पाहण्याची त्याची हिम्मत होत होती ना पुढे पाऊल टाकायची... रघोबाच्या गोष्टीतला शब्द न् शब्द सत्यात उतरतोय याची त्याला पक्की खात्री झाली होती!
भूतकाळातली कलंकित कथा भीतीचा हासूड बनून त्याच्याच पाठीत खुपसली गेली होती... !!

अन् त्याच क्षणी त्याच्या काळजाला भीतीने चीर पडणारी ती घटना घडली!!..

पैंजणांचा तो आवाज एकाएकी पुन्हा त्याच्या कानांवर पडू लागला ! तो तर उभाच होता मग आता मागे उभं 'ते' कोणत्याही क्षणी त्याच्यावर झडप घालणार होतं का?..!
मकरंदच्या कानांवर पडणारा तो पैंजणांचा आवाज आता विलक्षण रित्या वाढू लागला !

छुन् sss... छुन् sss.... छुन् sss... छुन् sss.... छुन् sss... छुन् sss.... !!

तो आवाज आता अगदी त्याच्या जवळ येऊन पोहोचला ! जसं की मागून येणारं ते जे कोणी होतं ते आता धावत धावत मकरंदच्या दिशेने येत होतं.. त्याचा साक्षात काळ बनून येत होतं!!

वाढत जाणाऱ्या पैंजणांच्या आवाजात भीतीने मकरंदच्या काळजाची होणारी धडधड ऐकून येईनाशी झाली.. भीतीच्या अत्युच्च तडाख्याने त्याच्या डोळ्यांसमोर काळीकाळी वर्तुळं फिरायला लागली.. डोळ्यांची दृष्टी सैल झाली.. कानावर पडणारा तो घुंगरांचा धडकी भरवणारा आवाज हळूहळू क्षीण होत गेला.. डोळ्यांसमोर एक विलक्षण ग्लानी पसरली.. त्यातच त्याने डोळे मिटले.. उरातली धडधड शिगेला पोहोचली आणि धडधणाऱ्या त्याच्या काळजात एकच जोराची कळ आली..
त्याच्यापर्यंत एव्हाना पोहोचलेल्या 'त्याने' मागून हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला !

अन् बस्स् ssss....
पुढच्याच क्षणी, निश्चल देहाचा मकरंद धाडकन रस्त्यावर कोसळला...!!
.....


 "भाऊजीsss ओ, मकरंद भाऊजी?! काय झालं तुम्हांला ? उठा की ! आत्ता तर धड होते ! काय झालं ?..", रखमा, मकरंदची शेजारीण त्याला हलवून हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होती. 

खरंतर तिला त्याला हात लावायला सुद्धा भीती वाटत होती. तिच्या नवऱ्याची, केशवची तिला सक्त ताकीद होती ! चाळीतल्या एकाही परक्या पुरुषाशी तोंड वर करून बोलायचं नाही !

मकरंद वळला त्याच्या विरुद्ध वळणावरून ती गल्लीत यायला वळली तेव्हा तिच्या पुढेच मकरंद चालत होता. गावावरून उशिरा मिळलेल्या बसने तिला घरी पोहोचायला पार रात्र झाली होती..
या एवढ्या रात्रीच्या वेळी, गल्लीच्या तोंडापर्यंत घ्यायला तिचा दारुड्या नवरा केशव काही यायचा नाही हे तिला चांगलं माहीत होतं,.. त्यामुळे ही एवढी पायपीट तिलाच करावी लागणार होती !

एका हातात पर्स अन् दुसऱ्या हातात जडबदक बॅग घेऊन रखमाने गल्लीत पाय ठेवला, तेव्हा पुढेच चालणाऱ्या मकरंदला पाहून तिला एक क्षणभर वाटलंही, की त्याला जाऊन मदत मागावी...
पण तिने तो विचार मनातून झटकून टाकला.., कारण या मेल्या मकरंदचीही नजर काही चांगली नव्हतीच मुळी ! येता-जाता ती दिसली की मकरंद तिला खालपासून ते वरपर्यंत अगदी घाणेरड्या नजरेने न्याहाळायचा ! किळस अन् भीतीने तिच्या जीवाचा अगदी थरकाप व्हायचा !

'आत्ताही या एवढ्या रात्रीच्या वेळी त्याला मी अशी एकटी घावले, तर देवच जाणे तो लांडगा माझ्या शरीराचे कीती अन् कसे लचके तोडील !', मनात आलेल्या विचारांच्या भीतीने तिच्या जीवाचा अगदी थरकाप उडाला !

तसं बरंच अंतर ठेऊन ती त्याच्यापापासून मागे चालत होती... अचानक मध्येच तो थांबला ! त्याला असं थांबलेलं बघून तीही जागच्या जागीच गपकन थांबली ! त्याला बहुतेक तिची चाहूल लागली असावी, आता तो कुठल्याही क्षणी मागे वळून पाहील, या विचाराने तिच्या उरत धडकी भरली! पण त्याने तसं केलं नाही..
एक दोन क्षण आजुबाजूला बघून तो परत चालायला लागला हे बघून रखमाचा जीव भांड्यात पडला...

पुढे एक-दोन वेळा परत असंच झालं. मकरंद पुन्हा थांबायचा आणि त्याला थांबलेलं बघून भीतीने हिची ही पावलं जिथल्या तिथे गोठली जायची.!

काहीवेळाने तर तो बऱ्याच वेगात आपली पावलं उचलायला लागला. परत काहीतरी होऊन थांबला. मग मात्र दुरूनच तिने नीट निरखून बघितलं.. तो लटलट कापत होता ! थरथरत होता !
त्याच्याकडे बघता बघता रखमाच्या एक गोष्ट लक्षात आली ! तो कदाचित कोणत्याही क्षणी कोसळेल या भीतीने रखमा त्या क्षणाला मनातले सगळे विचार पार विसरली अन् हातातली बॅग खाली टाकून त्याच्या दिशेने जोरात धाऊ लागली..!
ती त्याच्याजवळ पोहोचेपर्यंत तो जवळजवळ कोसळलाच होता !
की तोच...
तिने पटकन जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यासरशी तो धाडकन जमिनीवर कोसळला !

रखम पुरती घाबरली ! भीतीने तिने आवंढा गिळला !!...

तिने त्याला हलवून हलवून उठवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो मात्र जागचा हलला सुद्धा नाही...
'रात्रीच्या ह्या अश्या भयाणवेळी हे कसलं आक्रीत घडलं ?!' या विचाराने रखमाच्या कपाळावरून घामाचे थेंब ओघळू लागले..
काही क्षण गेले अन् मग मात्र तिला वेगळीच शंका येऊ लागली ! भीतभीत थरथरत्या हाताने तिने त्याचा श्वासोच्छवास तपासला...
अन् बस्स! sss....

काळोख्या अंधाराला चिरत जाणारी तिची एकच कर्कश किंकाळी संबंध आसमंतात घुमत राहिलीsss...!!

 

*********************************************************************

समाप्त