सायलेन्स प्लीज - प्रकरण 3 Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सायलेन्स प्लीज - प्रकरण 3प्रकरण तीन
पाणिनी पटवर्धन फोन वर डॉ.खेर यांच्या शी बोलत असतानाच ओजस आत आला.
“ तू माझी वाट बघतोयस असं सौम्या म्हणाली.”-
पाणिनी ने फोन वर बोलता बोलताच मान डोलावली आणि ओजस ला बसायला खुणावलं.
“ झोपेत चालण्याच्या सवयी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे डॉक्टर त्रिगुण खेर ? ” पाणिनी म्हणाला . “ तुमच्या साठी माझ्याकडे एक रुग्ण आहे.रात्री हातात चाकू घेऊन झोपेत चालतो तो.घरा भोवती फिरतो,अनवाणी. आपण आज भेटणार आहोत त्याला रात्री. मी तुम्हाला साडेसातला फोन करतो.तुम्ही त्याला तपासावं.त्याच्या बायकोचे म्हणणे आहे ,तो वेडा आहे. ठीक ,ठीक. मी तुम्हाला क्लब मधून घेतो.आपण एकत्रच जाऊ. ”
“ झोपेत चालण्याची भानगड दिसत्ये ! ” ओजस पुटपुटला.
“ तू कधी झोपेत चालालायस कनक ? ” पाणिनी म्हणाला .
“ तू मला एवढ कामाला लावतोस दिवस रात्र, की झोपतोच कुठे मी रात्री? ” ओजस म्हणाला.
“शेफाली खोपकर नावाच्या खांडवा ला राहणाऱ्या एका बाई ला बघून ठेवायला तुझ्या माणसांना सांग. लगेच अत्ता पाठलाग करायचा नाहीये , कारण खूप चतुर आहे ती.पण तिच्या भूतकाळाबद्दल माहिती हवी आहे.तिचे मित्र-मैत्रिणी,तिचे भविष्यातील नियोजन,निवासस्थान सर्व काही खणून काढ.तसचं सिहोर च्या ब्रिजेश मरुद्गण बद्दल माहिती काढ सध्या तो या शहरात आहे.आणखी एक ,एपी ८३९७ ही गाडी कुणाच्या मालकीची आहे ते शोधून काढ.” पाणिनी ने भरभर सूचना दिल्या.
“ हे सगळ तुला कधी हवय ? ” ओजस ने विचारलं ,पण त्याला पाणिनी काय म्हणणार याचा अंदाज आला होताच.
“ कालच हवय ” पाणिनी म्हणाला
“ खांडवा प्रकरणात तिला न कळता माहिती काढायची आहे?” ओजस ने विचारलं
“ हो.तिला किंवा तिच्या संबंधित लोकांना कळता कामा नये.” पाणिनी म्हणाला
ओजस उठून बाहेर निघाला.तो जाताच सौम्या आत आली.
“ सुकृत कुठाय? मगाशीच बोलावलं होत त्याला आत.” पाणिनी म्हणाला .
“ तुमच्या मनात काय होतं ते ओळखून मी त्याला खांडवा ला जायची तयारी करायला सांगितलं होत.शेफाली आणि विहंग यांच्या घटस्फोटाच्या खटल्याची अद्ययावत माहिती घेण्यासाठी. त्याच्या साठी गाडीची सुद्धा जय्यत तयारी करून ठेवली आहे.” सौम्या ने उत्तर दिले.

“ या तुझ्या मनकवडे पणा बद्दल तुझा पगार वाढवायचा विचार माझ्या मनात आलाय.” पाणिनी म्हणाला “ अर्थात माझ्या मनात हा विचार आल्याचं सुद्धा तुला समजलच असेल.! ” पाणिनी तिच्याकडे कौतुकाने पहात म्हणाला.

*****************************
त्या घरात ते चार जण बसले होते.घड्याळात नऊ वाजलेले दिसत होते.दुर्वास बोलत होता.त्याच्या अशीलाची स्थिती काय आहे या बद्दल तो गेली पंधरा मिनिटे भाष्य करत होता.त्याच्या शेजारी मरुद्गण आपली नखे खात बसला होता.उजव्या हाताला सेक्रेटरी प्रांजल वाकनीस बसली होती.
“ शेवटचा परिच्छेद कुठपर्यंत आला होता? वाच जरा पुन्हा.” पाणिनी म्हणाला
प्रांजल ने तो वाचून दाखवला.
“ मला एक मुद्दा मांडायचाय ” एका विशिष्ट वाक्याकडे पाणिनी पटवर्धन चे लक्ष वेधून दुर्वास म्हणाला. “ या वाक्यामुळे, माझं अशील विहंग खोपकर ला सर्वच हक्कातून मुक्त करत आहे असा अर्थ निघतो. आम्ही फक्त त्याला भागीदारीच्या व्यवहारापोटी उद्भवलेल्या आणि उद्भवणाऱ्या जबाबदारीतून मुक्त करू इच्छितो.
“ भागीदारी व्यतीरिक्त अन्य काय येणे आहे ?” पाणिनी ने विचारलं.
“ मला नाही माहिती काही असेल तर. ” दुर्वास म्हणाला.
“ तर मग सर्व जबाबदारीतून मुक्त असा शब्द प्रयोग वापरायला काय हरकत आहे? तस काही असेल तर तुमच्या अशिलाला अत्ताच पुढे येऊन सांगू द्या. मला सर्वच बाबींचा आजच निपटारा करायचाय ” पाणिनी म्हणाला
“ उत्तर देऊ नकोस.” दुर्वास मरुद्गण ला म्हणाला. “ बोलायचे काम मी करीन.”
पाणिनी ने उसासा सोडला.शांतपणे टेबल वर ठेवलेल्या फाईल मधून एक पत्र बाहेर काढून दुर्वास समोर टाकलं. “मरुद्गण ने खोपकर ला सही करून दिलेलं हे पत्र आहे. तुमच्याच अशीलाची सही तुम्ही नाकारणार नाही ना? ” पाणिनी म्हणाला .
दुर्वास ने चष्म्यातून ते पत्र वाचलं. “ माझ्या अशिलाला त्याच्या कायदेशीर हक्कांची कल्पना नसताना त्याने हे पत्र लिहिलंय ” तो म्हणाला.
पाणिनी उठून उभा राहिला. “ ज्या पद्धतीने तुम्ही हा जमत आलेला विषय फिसकटवून टाकायचा प्रयत्न करताय ते मला आवडत नाहीये. तुमच्या अशिलाने माझ्या अशिलाला ठरलेली रक्कम स्वीकारून केवळ भागीदारीच्याच नाही तर सर्वच जबाबदारीतून मुक्त केल्याचे लेखी दिले पाहिजे.नाहीतर विहंग खोपकर तुमच्या अशिलाला, म्हणजे मरुद्गण ला एक छदाम ही देणार नाही.” पाणिनी ने खडसावले.
मरुद्गण ने आपली नजर वर करून दुर्वास कडे पाहिलं. थोडी चुळबुळ केली. काहीतरी बोलायला गेला पण गप्प बसला.
दुर्वास पाणिनी च्या वक्तव्याने प्रचंड दुखावला. रागाने बोलायला उठला पण त्याच्या नजरेने मरुद्गण ची अस्वस्थ हालचाल टिपली आणि स्वतः ला शांत करत तो म्हणाला, “ मी माझ्या अशीलाशी खाजगीत बोलू इच्छितो.”
ते दोघे उठून दुसऱ्या खोलीत गेले. डॉक्टर खेर विहंग च्या हालचाली बारकाईने टिपत होते.अचानक विहंग चे ओठ वाकडे झाले.क्षणभरात तो कंप चेहेऱ्या पर्यंत ओढला गेला.त्याने खिशातून रुमाल काढून आपला चेहेरा पुसला.महत्प्रयासाने आपल्याला आलेल्या आकडी वर ताबा मिळवला. “ त्यांना एकही दमडा देऊ नका ! ” तो ओरडला. “ मला आयुष्यातून उठवायला बघताहेत हे लोक.”
एवढ्यात पाणिनी ला फोन आला. सौम्या बोलत होती.
“ कनक ने सिहोर मधून तुम्हाला हवी ती माहिती काढल्ये. तसचं सुकृत पण आलाय खांडवा वरून. प्रथम कनक शी बोला नंतर सुकृत शी.”
कनक ओजस चा आवाज पाणिनी च्या कानावर आला .
“ पाणिनी , मोठ घबाड हाती लागलंय.वीरभद्र मांजरेकरनावाच्या एका माणसाच्या विधवा पत्नीने मरुद्गण विरुध्द दोन महिन्यापूर्वी दावा लावलाय.तिच्याशी म्हणणे आहे की व्हॉल्व्ह घासण्याचे यंत्र जे स्वतः बनवल्याचा दावा मरुद्गण ने केलाय आणि त्याचे पेटंट घेऊन त्याच्या जिवावर मोठी कंपनी काढली, ते मूळ पेटंट तिच्या नवऱ्याच्या नावाने होते.वीरभद्र क्षय रोगाने आजारी होता तेव्हा मरुद्गण ने त्याच्याशी मैत्रीचे नाटकं करून धंद्यात मदत देऊ केली.आणि त्याला अंधारात ठेऊन, फ्रॉड करून त्याच्या नावाचे पेटंट स्वतःच्या नावाने केले.तिला हे कळल्यावर तिने त्याच्या विरुध्द दावा लावला.कोर्टाने त्याला समन्स काढला पण मरुद्गण सापडलाच नाही कुठे. अनेक वेळा असं घडलं तेव्हा तिने गुप्त हेर एजन्सी नेमून त्याचा पत्ता शोधायचं काम त्यांना दिले,सुदैवाने मी त्याच एजन्सीची मदत घेतली होती. ” ओजस म्हणाला.
“ तू त्यांना सांगितलस का, मरुद्गण सापडलाय म्हणून ? ” पाणिनी म्हणाला .
“ अजून नाही सांगितलं , पण सांगावे लागेल. चालेल का ? ”-ओजस.
“ आवडेल मला ते.” पाणिनी म्हणाला
“ दुसरी बातमी, तू दिलेल्या गाडी च्या नंबर वरून मी तपास काढला. मालकीण बाईच नाव आहे, शेफाली खोपकर ! ” ओजस म्हणाला.
त्या नंतर सौम्या ने सुकृत कडे फोन दिला .
“ सर, शेफाली खोपकर ला बरोब्बर गेल्या वर्षी याच महिन्याच्या तेरा तारखेला घटस्फोटाचा अंतरीम आदेश मिळालाय. ” तो म्हणाला.
“ तुला शेफाली खोपकर कुठे राहत्ये ते समजलं आहे ? ” पाणिनी म्हणाला .
“ हो, समजलाय पत्ता.” सुकृत म्हणाला.
“ तू एक काम कर, तिच्या घरापासून थोड्या अंतरावर तुझी गाडी पार्क कर आणि तिच्या घरावर लक्ष ठेव.तिचा गाडी चा नंबर एमपी ८३९७ आहे.ती गाडी घेऊन घरातून बाहेर पडली तर पाठलाग कर.तिच्या कडे कोणी भेटायला आले तर त्यांच्या गाड्यांचे नंबर टिपून घे.” पाणिनी म्हणाला आणि पुन्हा आत आला तेव्हा दुर्वास त्याचीच वाट बघत होता.
“ पटवर्धन, बोलणं झालं आमचं. तुमच्या अशीलानी माझ्या अशिलाच्या म्हणजे मरुद्गण च्या परवानगी शिवाय भागीदारी फर्म च्या मालकीच्या काही मालमत्ता परस्पर विकल्या. पेटंट ची किंमत ही........” दुर्वास म्हणाला. त्याला मधेच तोडत पाणिनी म्हणाला, “ विसरा आता हे सर्व.दहा वेळा सांगून झालंय .”
“ मला तुमची बोलायची पद्धत बिलकुल आवडलेली नाही.” दुर्वास म्हणाला. “ विहंग ला सर्वच जबाबदारीतून मुक्त करायचं असेल तर आधी ठरवलेल्या रकमेपेक्षा दहा लाख जास्त रकमेची मागणी आम्ही करतोय.”
खोपकर हे ऐकून अस्वस्थ होवून काहीतरी बोलायला गेला पण पाणिनी मधेच म्हणाला, “ मिस्टर दुर्वास , मला आधी विहंग शी बोलावे लागेल. आज लगेच निर्णय नाही होणार.उद्या रात्री पुन्हा भेटू.”
“ मला अपेक्षा नव्हती की आपला निर्णय लांबेल. पटवर्धन, तुम्हीच म्हणत होतात ना की आजच्या आज सर्वच विषयाचा निपटारा करायचा आहे म्हणून? ” दुर्वास म्हणाला.
“ उद्या रात्री.” पाणिनी म्हणाला
दुर्वास मरुद्गण ला घेऊन बाहेर पडला.
“ मला आज सगळ पूर्ण करायचं होत.पैसे कमी जास्त , फरक नसता पडला मला.”विहंग खोपकर म्हणाला.
“ ते सगळ विसर.आपण मरुद्गण विरुध्द दावा लावणार आहोत.तो फ्रॉड आहे.त्याने व्हॉल्व्ह ग्राइंडिंग च्या मशीन चा शोध वगैरे काहीही लावलेला नाही.वीरभद्र नावाच्या माणसाने तो लावला.त्याच्या आजारपणात त्याच्याशी मैत्रीचे नाटकं करून त्याला फसवून मरुद्गण ने त्याचे पेटंट हस्तगत केले.वीरभद्र आता हयात नाही त्याच्या पत्नीच्या ही गोष्ट लक्षात येताच तिने कोर्टात मरुद्गण विरुध्द दावा लावलाय पण मरुद्गण चा ठाव ठिकाणा न समजल्यामुळे कोर्ट त्याच्यावर समन्स बजाऊ शकलं नाही.आपल्याला मात्र मरुद्गण आयताच सापडलाय.त्यामुळे त्याच्या बरोबर करायचा करार आपण काहीतरी थातूर मातूर कारण दाखवून लांबवू दरम्यान तू वीरभद्र च्या बायकोला मरुद्गण कुठे आहे याची टिप दे. ” पाणिनी म्हणाला
विहंग हे ऐकून अवाक झाला..काहीतरी बोलायला गेला पण पटवर्धन ला अजून काहीतरी बोलायचं आहे हे लक्षात आल्यावर थांबला.
“ तुझ्या बायकोने, शेफाली ने खांडवा मधे घटस्फोटासाठी केलेल्या अर्जावर अंतरीम आदेश कोर्टाने दिला होता त्याला बरोबर आजच एक वर्षं झालंय.पण तिला आता घटस्फोट नकोय म्हणून तिने इथे इंदूरमधे वेगळे वकील नेमून घटस्फोटाचा अर्ज रद्द व्हावा म्हणून कोर्टात दावा लावलाय.मी उद्या सरळ इथल्या इंदूरच्या कोर्टात जाऊन घटस्फोट मिळण्याची अंतीम आदेश द्या म्हणून जाऊ शकतो.तो मिळाला की तुम्ही तुम्हाला जिच्याशी लग्न करायचं आहे तिच्याशी करू शकता.पण हे सगळ तातडीने करायला हवं. शेफाली ने इथल्या कोर्टात कागदपत्र दाखल करण्यापूर्वीच मी रुटीन मॅटर म्हणून डिक्री मिळवीन ती मिळाली की लगेचच तुम्ही लग्न करा.एकदा का शेफाली ने कागदपत्र सादर केली की तुम्हाला कोर्टाचा आदेश येई पर्यंत काहीही करता येणार नाही.आणि तो आदेश कोणाच्या बाजूने असेल ते ही सांगता येणार नाही.” पाणिनी म्हणाला
विहंग तातडीने उठला. “प्रांजल , चल, आमचे दोघांचे विमानाचे तिकीट बुक कर.आम्हाला परदेशात म्हणजे हवाई ला जावून लग्न करायचं आहे, जिथे आम्हाला लग्नाची नोटीस न देता लग्न करता येईल.”
विहंग खोपकर गेल्यावर पटवर्धन डॉक्टर खेर नं म्हणाला. “ तुम्हाला काय वाटतंय विहंग बद्दल ? तो वेडा असेल?”
“ मला नाही सांगता येणार अत्ताच पण ,पटवर्धन, चेहेरा वाकडा झाल्याची आणि शरीर कंप पावत असल्याचा मात्र त्याने अभिनय केला होता.” डॉक्टर म्हणाले.
“ तो स्वतःला सामान्य माणसा सारखा सिध्द करायचा प्रयत्न करतोय.मग तो मुद्दाम असा अभिनय कशाला करेल?” पाणिनी म्हणाला .
“ मला सांग, पाणिनी , मी, म्हणजे कुठल्यातरी डॉक्टरांनी त्याला तपासावे असे त्यानेच तुला सुचवले का?” खेर नी विचारले.
“ त्याच्या भाची कडून तसे सुचवले गेले.” पाणिनी म्हणाला
“ एखाद्या डॉक्टर ला तो फसवू शकला असता पण मानसोपचार तज्ज्ञा ला नाही. ” डॉक्टर म्हणाले.
“ झोपेत चालायच्या सवयी बद्दल काय सांगाल? मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे का ते? ” पाणिनी म्हणाला .
“ दुर्बलता नाही म्हणता येणार. अंतर्मनाने दिलेल्या सूचना असतात.”
“ पौर्णिमेला हे लोक जास्त जोरात असतात का?” पाणिनी म्हणाला .
“ हो.” डॉक्टर म्हणाले.
“ कारण काय त्याचे?”
“ नाही सांगता येणार.”
पटवर्धन स्वतः शीच हसला. “काय मजा झाल्ये पहा, स्वत:ला वेड लागलं नाही हे सिध्द करण्यासाठी माझं अशील मला डॉक्टरांकडून तपासून घ्यायला सांगतंय आणि त्यांच्या समोर वेड्यासारखे चाळे करतंय. ”
“ रात्री चाकू घेऊन झोपेत चालायच्या सवयीचा उल्लेख केलं जाऊ नये म्हणून.” डॉक्टर म्हणाले.
( प्रकरण 3 समाप्त.)