Laxman Gita, Guru Gita books and stories free download online pdf in Marathi

लक्ष्मण गीता - गुरु गीता

लक्ष्मण गीता.
निषादराज गुह वनवासात श्रीरामांना भेटायला आले. त्यांना श्रीराम व सीतादेवी जमीनीवरती चटई वर बसलेले बघून त्याना वाईट वाटले. ते म्हणाले कैकेयीच्या कुटिलपणामुळे या दोघांना किती दुःखात टाकले आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणाले कोणी कोणाला सुख देत नाही की दुःख देत नाही. हे सर्व आपल्याच कर्माची फळे असतात. एखाद्या माणसाच्या मनात दुसऱ्याला काठी मारावी अशी इच्छा होते ती त्याच्या मनातील राग, द्वेष या संस्कारातून निर्माण होते. काठी मारण्यापासून तो स्वताला थांबवू शकतो पण त्यासाठी मनावर संयम असणे जरुरीचे आहे. पण त्याने जर मारले तर त्याच्या मनात मी याला काठीने मारले हा अहंकार उत्पन्न होतो व तो पापाचा धनी होतो. ज्याला मारले त्याला मार किती लागेल हे प्रारब्धावर अवलंबून आहे. त्याच्या प्रारब्धात काठी लागणे नसेल तर तो मार चुकवेल. कोणी कोणास सुख अथवा दुःख देऊ शकत नाही. फायदा नुकसान, जीवन मरण, यश अपयश हे नियतीच्या हातात आहे. नियती बलवान असते.
संचित- संचित म्हणजे निरनिराळ्या जन्मातील कर्माचे फळ असते. माणसाला या जन्मात मिळणारे सुख, दुःख अथवा चांगल्या वाईट कर्माचे फळ हे फक्त या जन्मात करत असलेल्या कर्माचे फळ असत नाही.
ही गोष्ट ध्रुव सत्य आहे की, पापाचे फल दुःख आणि पुण्यांचे फल सुख. आपण पाहतो की, जो सदाचाराने वागतो तो त्रास भोगतो व पापी श्रीमंत होत असतात. पण पापाने सुख व पुण्यांने दुःख मिळत नसते. असत्य मार्गाने मिळवलेली संपत्ती मुळे प्रगती होत आहे असे वाटले तरी मानसिक अशांती असते आणि एक ना एक दिवस विनाश होतो.‌ पण जेथे सत्याचा मार्ग आहे, धार्मिक वृत्ति आहे तिथे त्रास आहे आहे असे वाटत असले तरी मानसिक शांती असते आणि वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असते. माणूस जे कर्म करीत असतो त्याचे फल साठत असते व संचित रुपाने दिसते. जर खुप चांगले कर्म असेल तर त्याच जन्मात किंवा पुढील जन्मात फल मिळते. संचित ही जन्मोजन्मीच्या कर्म व संस्कारांची पेटी आहे. त्यानुसार जन्म मिळतो. आणि प्रारब्ध म्हणजे हेच संस्कार असतात. हा माझा शत्रू आहे, हा मित्र आहे इतरांशी काही देणे घेणे नाही हा पण एक भ्रम आहे.
आपल्या प्रारब्धात जे सुख, संपत्ती,यश‌ आहे ते कोणीही थांबवू शकत नाही, तसेच जे दुःख, त्रास होणार असतील ते भोगावे लागतात. यात मित्र, शत्रू हे निमित्तमात्र आहेत आणि या मान्यतांमुळेच आपल्या मनात राग वगैरे उत्पन्न होऊन‌ आपण त्याप्रमाणे वागतो व शुद्ध अशुद्ध कर्मात गुंतत जातो.
प्रवासात बरेच लोक एकत्र असतात पण वेगळे असतात कारण त्यांचा परिचय नसतो. एका देशाचे लोक एकमेकांना भेटत पण नाहीत तरीही राष्ट्र भावनेने एकत्र जोडलेले असतात.
माणसाला मिलन, विरह होत असतो. कधी सुख तरी कधी दुःख मिळते. कधी चांगली व्यक्ति मिळते तर कधी वाईट. कधी हितचिंतक भेटतात तर कधी अहित चिंतणारे तर कधी अलिप्त राहणारी माणसे भेटतात. या घटनांशी आपण स्वताला जोडतो व या जाळ्यात अडकतो.
हे जन्म व मरण यामधील एक जाळे आहे व त्याचे सहा दोर आहेत मिलन, विरह, भोग, हित, अहित, मध्यम.
लक्ष्मण म्हणाले कर्ता आणि भोक्ता या भावना आपल्यामध्ये प्रबळ असतात. जसे प्रवासात माणसे एकमेकांना भेटतात व अलग होतात तसेच जगातील संयोग व वियोग आहे. कर्मानुसार जीवाला जन्म मिळतो व संयोग वियोग चालू होतो. एखादा माणूस मिळावा अथवा न मिळावा, यांच्यापासून आपल्याला दूर व्हायचे नाहीये हे सगळे भ्रम आहेत.

गुरुगीता
एके दिवशी कैलास पर्वतावर पार्वती देवी नी महादेवाना विचारलें हे कृपासागरा, मला गुरु दीक्षा द्यावी. जीवांना ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी कोणता उपाय आहे ते सांगावे. महादेव म्हणाले, तूं माझाच अवतार आहेस, तरी लोकोपकारासाठी विचारित आहेस. महादेव म्हणाले, सद्‌गुरु शिवाय कोणी थोर नाही. देव आणि गुरु वेगळे मानु नये. गुरु प्राप्तीसाठी सर्व ते करावे. गुरु मिळाल्यास सर्व अज्ञान दूर होते. गुरु चरणी जो गेला तो सर्व तीर्थांना गेल्यासारखे आहे. गुरु मूर्ति चे स्मरण करावे, आज्ञेचे पालन करावे. काया, वाचा, मनानें गुरुशी एकनिष्ठता ठेवावी. गुरु विना तारक कोणी नाही. गुरु बुद्धिदाता आहे. गुरु काल, मृत्यू भयापासून रक्षण करतात. हे पुण्य आख्यान जे पठण, श्रवण करतात व दाने करतात त्यांना सकल दानाचे फल मिळते. अन्नदानाचे फल मोठे आहे. ही गीता ऐकली असतां अरिष्टांचे निवारण होते. दुष्ट ग्रहांचे निवारण होते. नारीला सौभाग्य लाभतें. आरोग्यमय आयुष्य लाभते. गुरु माउली मोक्षदायक आहे. गुरु माता, गुरु पिता आहे. गुरुचं ईश्वर आहे.

इतर रसदार पर्याय