*आपण मांसाहारी नाहीच?*
*आपण मांसाहारी नाही. कारण आपण तोंडानं पाणी पितो. जिभेनं नाही. जो जिंभेनं पाणी पितो, त्या प्राण्यांना मांसाहारी म्हणतात. जसे मांजर, वाघ, सिंह, कुत्रा वैगेरे वैगेरे. म्हणूनच आपण मांस खावू नये. तर वनस्पतीजन्य अन्न खावं. यात शंका नाही.*
समाजात आज मांसाहारी व शाकाहारी अशा गटाचे लोकं वावरत असतात. शाकाहारी आणि मांसाहारी लोकांचं वर्गीकरण करायचं झाल्यास समाजात शाकाहारी कमी व मांसाहारीची संख्या जास्त आहे. शिवाय ती वाढत चाललेली आहे ज्याप्रमाणे समाजात मांसाहारी लोकं आहेत. त्याचप्रमाणे मांसाहारी प्राणीही आहेत. परंतु कधीकधी आश्चर्य वाटतं जेव्हा ऐकलं जातं की शाकाहारी प्राणीही मांस खातात. होय. मानव हा मांसाहारी प्राणी नाही. परंतु तो मांस खातो. हरीणही अशीच प्रजाती की जी त्याच्या शरीरातील कॅल्शिअम कमी झाल्यास ते मांस खातांना दिसतात. त्या मांसात ते चक्कं सापही गिळत असतात. आहे ना आश्चर्याची बाब. परंतु जे प्राणी मांस खातात. त्याचा अंतही तसाच होत असतो. हे निर्विवाद सत्य आहे. काही मांसाहारी प्राणी त्यांचं पोट दुखत असेल तर दुर्वा खात असतात. आता दुर्वा म्हणजे शाकाहारी अन्न. समाजात असे मांसाहारी लोकांचे प्रमाण पाहिले तर भरपूर आहे. त्यामानानं शाकाहारी लोकांचे प्रमाण कमी आहे.
आजच्या काळात लोकं म्हणतात की कुक्कुटपालन वा बकरीपालन हा व्यवसाय केल्यानं माणसाच्या संपत्तीत वाढ होते. कारण हे प्राणी मांस जास्त देतात व विकल्यास लाखो रुपये मिळवून देतात. कारण अलिकडील काळात मांसाची मागणी पाहता बकऱ्याचं मांस जास्त भावाचं आहे व कोंबडीचं मांसही जास्त महाग आहेच. त्यामुळंच अलिकडील काळात कुक्कुटपालन व बकरीपालन वाढत चाललेलं आहे. म्हटलं जातं की बकरीपालन व कुक्कुटपालन हा शेतीला पर्यायीपुरक धंदा म्हणून एक चांगला व्यवसाय आहे. ज्या शेतीत काही मिळत नाही. त्याच शेतकरी माणसानं शेतीला पर्यायीपुरक कुक्कुटपालन वा बकरीपालन यासारखा जोडधंदा केल्यास भरपूर पैसा मिळतं असं लोकांचं म्हणणं. परंतु ते धांदात खोटं आहे. असं जर झालं असतं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून बकरीपालन वा कुक्कुटपालन जोड व्यवसाय म्हणून उभारला असता. परंतु तो पर्यायीपुरक व्यवसाय होवू शकत नाही. म्हणूनच लोकांनी असा व्यवसाय करणं बंद केलं आहे. त्याचं कारण तसंच आहे. ते कारण म्हणजे त्याला कापत असतांना त्यांनी दिलेला शाप.
शेतकरी असा घटक आहे की त्याला संबंध संसारच पाप करायला लावत असतं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. ज्याची फळं ही शेतकऱ्यांनाच भोगावी लागतात. जसे. शेतीतील माल ओला असतांनाच शेतकरी त्याच्यातून पीक मिळविण्यासाठी कधीकधी त्याच्या वाळण्याची अर्थात परिपक्व न होण्याची वाट पाहात नाहीत व उभं पीक कापून टाकतात. ही जीवहत्याच असते. कारण वनस्पतींनाही जीव असतो हे विज्ञानानं सिद्ध केलंय. तसं पाहिल्यास जीवहत्या हे पापच असते. मग ती कोणाचीही असो. वनस्पतीचीही का असेना. आता आणखी कुक्कुटपालन आणि बकरीपालन या धंद्याला पर्यायीपुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना ते प्राणी पाळायला लावत आहेत. त्यातच तो माल विकून तो निगरगट्ट करुन त्याचे पाप शेतकऱ्यांच्याच माथी मारायला पाहात आहेत आणि एकप्रकारे शेतकऱ्यांच्या दैनेवर, आत्महत्येवर हासत आहेत असे चित्र दिसत आहे. जणू शेतकऱ्यांनी जास्त पापं करावीत. त्यांनीच त्या पापाचा परिणाम म्हणून दुष्काळाचं जीणं जगावं आणि त्यांनी मस्त एसीच्या बंगल्यात विदेशी नाचगाणी लावून थिरकणाऱ्या तरुणीसमवेत रम आणि मटनाच्या ठुशावर ताव मारायला लावावा व स्वतःलाचिडविण्यासाठी त्यांना तयार करावं. स्वतः पाप करुन. यात त्यांच्यासाठी शेतकरी एवढा मेहनत घेतो व पीक पिकवून स्वतःला त्रास करुन घेतो. जणू कोवळ्या वयातील म्हणजेच पीक हिरवे असतांना कापून पाप करुन घेतो. तसेच पर्यायीपुरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन वा बकरीपालन व्यवसाय करुनही स्वतःच्या माथी पाप मारुन घेतो.
शाप अशी गोष्ट की त्या शापानं संपुर्ण मानवजाती बेचिराख होवू शकते. आपल्याला माहीतच असेल पुर्वीचा काळ. जे आपल्याच धर्मग्रंथात लिहिलं आहे. कोणी त्या धर्मग्रंथाला थोतांड ग्रंथ म्हणतात. असो, ते काहीही म्हणोत. परंतु त्यात दाखवलं आहे की एखाद्या साधूनं एखाद्याला शाप दिलाच तर तो शाप खरा ठरत असे. तेच घडतं आज. आज हे कसायाला विकलेले मुके प्राणी बोलत नाहीत परंतु ज्यावेळेस कसाई त्यांना कापतो. तेव्हा त्याला भयंकर वेदना होत असतात. ते जणू अक्षरशः रडतात. मग आपल्या मनातून ते शापवाणी उच्चारतात. जी शापवाणी त्या कसायाला लागत नाही. त्यामुळं त्यांची मोठमोठी घरं उभी राहतात. परंतु तो शाप लागतो त्याचं पालन करणाऱ्या लोकांना. त्यातच जी मंडळी असा कुक्कुटपालन वा बकरीपालनाचा व्यवसाय करतात. ते नेस्तनाबूत होतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास या प्रकाराची शहानिशा केल्यास असे दिसून येईल की काल ज्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर बकरीपालन व कुक्कुटपालन होतं. आज ते गर्भश्रीमंत नाहीत. तर आज ते भीक मागतांना दिसत आहेत. अर्थातच शेतकरी. आज शेतीला फार मोठी किंमत आली आहे. जर विकली तर. परंतु शेतकरी वर्गाला कवडीचीही किंमत नाही. एवढा मोठा व्यवसाय आणि ही गरीबी आली कशी? तर याचं उत्तर आहे. त्यांनी कसायाला विकलेल्या कित्येक निरपराध प्राण्यांचा कसायानं घेतलेला जीव व त्याचा शेतकऱ्यांना बसलेला शाप शेतकऱ्यांनी साधा बैल आणि गायही, ती गाय भाकड झाल्यावर तिला पोषलं नाही. पैसे येतात म्हणून कसायाला विकलं. बैलानंही एवढी शेतकऱ्यांच्या घरी मेहनत घेवूनही तो म्हातारा झाल्यावर बिनकामाचा होताच घरी मरण दिलं नाही. दोन पैसे पदरात पडतात. म्हणूनच त्याला कसायाला विकलं. तसंच आपल्याला पावसामुळं पीक भेटूच शकणार नाही. या हव्यासानं त्यानं जीवंत पीक कापलं. हे पाप घडत गेलं वर्षानुवर्ष व शेतकरी भोगत आला त्या पापाचाच परिणाम वर्षानुवर्ष. मदतीला कोणीच आला नाही. सर्वांनी मात्र मजा मारली. वास्तविकता ही की शेतकऱ्यांनी पुर्वी गारा, अवर्षण, दुष्काळ या स्वरुपात परिणाम भोगला आणि आता आत्महत्या स्वरुपात परिणाम भोगत आहेत. खरं तर हे प्राणी त्या व्यक्तीनं आपल्या लेकरागत सांभाळलेले असतात आणि आपल्याच या लेकरांना विकून त्यांनी आपल्या लेकराचा जीव घेतलेला असतो. यात तसूभरही असत्यता नाही.
गाय, शेळी, कोंबडी, बैल कसायाला विकणं ही वाईट बाब आहे. जीवनभर ज्या प्राण्यांनी स्वार्थ न पाहता ज्या शेतकरी माणसाची सेवा केली. ज्या बैलानं मेहनत करुन शेतकऱ्यांना जगवलं. त्या शेतकरी माणसानं तो बैल भाकड होताच त्याला कसायाला विकणं एक चांगली गोष्ट नाही. ज्या कोंबडीनं अंड दिलं, ज्या गाईनं दुध दिलं, अन् ज्या बकरीनं लेंडीखत दिलं. त्यांनाही शेतकऱ्यांनं त्यांचे उपकार मानून सन्मानानं वागवलं नाही. त्यांनं आपल्याला दोन पैसे मिळतील याचा विचार केला परंतु असा विचार केला नाही की मनुष्यप्राणी असो की एखादं जनावर. त्याला मरावंसं वाटत नाही. अशातच ज्या बैलाला किंवा गाईला आपण कसायला विकतो, तो कसाई त्या बैलाला किंवा गाईला चांगल्या प्रकारे कापत नाही. त्याचे हालहाल करुन त्याला कापतो वा ठार करतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आला होता. त्यात बैलाला कापतांना दाखवलं होतं.
बैल किंवा गाय ही ताकदवर असल्याचं मानलं जातं. तिला कापतांना कसाई आधी त्यांना पंगू बनवतात. याचाच अर्थ असा की त्या गाई किंवा बैलांना खुंटाला बांधलं जातं. त्यानंतर दुरुनच त्याचे मागचे पाय गुडघ्यावर वार करुन जखमी केले जातात. त्यानंतर तो बैल मागील पायावर उभा राहू शकत नाही वा पळूनही जावू शकत नाही. तो खाली बसतो. त्यानंतर कसाई त्याचे पुढील पाय जखमी करतात. ते एवढे जखमी करतात की ते जनावर चारही पायानं अंगूपंगू होतं. तसा रक्तप्रवाह वाहातच असतो व त्या रक्तप्रवाहातून त्या जनावराचा क्षीणपणा वाढत असतो. शेवटी त्याचा क्षीणपणा एवढा वाढतो की ते जनावर कोणतीच ताकदीची हालचाल करु शकत नाही. कसाई तेच पाहात असतो व जसं त्याच्या लक्षात येतं की ती गाय अथवा बैल क्षीण झालं. तेव्हा तो त्याच्या मानेवर वार करतो व करकर कापून टाकतो तो त्या मुक्या जीवास. शेवटी ते जनावर मरण पावतं. परंतु ते असं तडपत तडपत मरण पावत असतांना ते कसायाला शाप देत नाही. शाप देत असतं मालकांना. ज्या मालकाच्या घरी ते लहानाचं मोठं झालेलं असतं. ज्या मालकाच्या घरी त्यानं सेवा केलेली असते. अर्थातच याचा शाप लागतो शेतकरी वर्गाला. कारण ते प्राणी आपल्या अधिवासाचा जास्तीत जास्त काळ शेतकऱ्यांच्या घरीच जास्त घालवत असतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की कुक्कुटपालन वा बकरीपालन करावं. करु नये असं नाही. कोंबडीचा वापर अंडे मिळविण्यासाठी करावा. त्यांच्या विष्ठेचा वापर भरपूर उत्पन्न यावं यासाठी खत म्हणून करावा. तसं पाहिल्यास बकरीच्या लेंडीखताचा वापर शेतीला खत म्हणून केला जातो. तसाच वापर होतो तिच्यापासून मिळणाऱ्या दुधाचा. ते दूध फारच ताकदवर समजलं जातं. अशा बकरीच्या दुधाचा जर वापर आजच्या काळात होत गेला तर निश्चितच समाजातील लोकांची जी प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे. ती निश्चितच वाढवता येईल वा शेतात त्या लेंडीखताचा वा कोंबडी विष्ठेचा वापर करुन भरघोस उत्पादन मिळवता येवू शकेल. अलिकडील काळात शेतकरी लोकं आत्महत्या करीत आहेत. त्याचं कारण आहे शेती न पिकणं. शेतीचंही भाकड होणं. त्याचं कारण आहे. त्यांनी कसायाला विकलेली जनावरं. कुठंतरी त्यांनी आपली जनावरं कसायांना विकली असावीत. जेणेकरुन त्यांचा शाप लागला असावा व त्याचा परिणाम शेती पिकण्यावर झाला असावा? ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच शेतकरी मित्रांनी आतातरी सुधरावं. तसंच समाजानंही सुधारावं. मांस खाणं हे काही आपलं खाणं नाही. कारण आपण तोंडानं पाणी पितो. जिभेनं नाही. जे जिभेनं पाणी पितात ते मांसाहारी असतात. आपला गट त्यात मोडत नाही. आपण मुळातले शाकाहारी. हळूहळू आपण हरिणासारखे कॅल्शिअम कमी होताच मांस खायला लागलो. याचा अर्थ असा नाही की आपण मांसाहारी आहोत. ते जनावरं आहेत. त्यांना कॅल्शिअम कुठून मिळतं त्याचं ज्ञान नाही. म्हणूनच ते मांस खातात. परंतु आपल्याला तर कळते ना. कॅल्शिअम मिळविण्यासाठी चुन्याचाही वापर करता येवू शकतो. मांस खाण्याची तेवढी गरज नाही. मग आपण मांसच का खावं? ती जीवहत्याच. मग काय खावं की पाप घडणार नाही. आपण खावं विविध प्रकारच्या डाळी. ज्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते. आपल्याला प्रथिनं मिळतात. आपण खावं तुप, तेल. ज्यामुळं स्निग्ध पदार्थ मिळतात. अन् आपण खावं एकदल वाळलेले धान्य, ज्यानं आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळतात. क्षार हे पेयापासून मिळतात. तर जीवनसत्व आपल्याला फळापासून मिळतात. ती जीवहत्या नाही. कारण एक फळाचा भाग सोडला तर बाकी सगळे वाळलेले पदार्थ असतात. ते पदार्थ खाल्ल्यानं पाप घडत नाही. यात शंका नाही.
विशेष सांगायचं म्हणजे मांस खाणं म्हणजे पाप करणं होय. याचा शाप केवळ उत्पादकालाच बसतो असं नाही तर ते पाप कापणाऱ्यालाही बसतं. त्याचबरोबर खाणाऱ्यालाही तेवढंच बसतं. प्रत्येकाला थोडंफार प्रमाणात बसतंच. परंतु पापाची बेरीज वजाबाकी केल्यास उत्पादकाला जास्त पाप बसतं. हे तेवढंच खरं आहे. कारण उत्पादकानं उत्पादनच केलं नसतं तर पाप तरी घडलं असतं का? याचं उत्तर नाही असंच येईल. तेव्हा उत्पादकांनी याचा याबाबत सारासार विचार करावा. उत्पादीत झालेल्या मालाचा वापर कसा करावा? विक्री करावी की नाही? याचाही त्यानं विचार करावा. जेणेकरुन त्याच्या हातून कोणतंच पाप घडणार नाही व त्याला पुढील काळात पश्चातापाची वेळ येणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०