चांगल्या स्वरुपाचं लेखन व्हावं
लेखनात दम असतोच. लेखणी अशी गोष्ट आहे की ते लेखन चांगल्या चांगल्या लोकांना धराशायी करीत असते. तसंच लेखन चारचौघात बसवीत असते तर कधी कधी लेखन चारचौघातून उठवत असते.
लेखकाचं लेखन म्हणजे एक विचारच असतो. मनातून आलेलं व कागदावर प्रतिबिंबीत झालेलं. लेखक लेखन करतो, त्याला खुशी होते म्हणून नाही तर तो एक समाजाचे देणं लागतो म्हणून. ते आपल्या लेखनीतून समाजाचक एक प्रकारे सेवाच करीत असतात. तो ऋणकर्ताच असतो समाजाचा आणि आरसाही. त्यानुसार तो लोकांना चांगुलकीची वाट दाखवीत असतो. त्याच्यासमोर शब्द हात जोडून उभे राहतात. म्हणत असतात की माझा वापर करा. परंतु लेखक प्रत्येक शब्दाला वापरेल तेव्हा ना. त्याच्यासमोर बंधन असतं शब्द मांडण्याचं. तो शब्द मांडतो. परंतु ते शब्द मांडत असतांना कोणते शब्द त्या ठिकाणी योग्य बसतात. याचा विचार करुनच तो शब्द मांडत असतो. ते शब्द चपखल बसताच तो पुढची वाट धरतो.
लेखन केल्या जातं हे अगदी विचार करुनच. लेखनाचे दोन भाग पडतात. एक माग म्हणजे चांगलं लेखन. चांगलं लेखन म्हणजे सुवाच्य हस्ताक्षर असलेलं लेखन नाही तर चांगल्या विचारांचं लेखन. यात धार्मीक विचारांना जास्त महत्व दिलं जातं. संस्काराची भाषा यात कुटकूट भरलेली असते. ते लेखन मनातून आलेलं असतं. हे लेखन लपूनछपून केलं जात नाही.
लेखनाचा दुसरा भाग म्हणजे वाईट विचारांचं लेखन. ह्या लेखनात क्रांतीकारी विचार असतात. वात्रटही लेखनाचा समावेश होतो यात. हे लेखन लपूनछपून करावं लागतं. कारण या लेखनातून केव्हा उद्रेक होईल याची शाश्वती नसते. जसं लेखन भारताला स्वातंत्र्य मिळवीत असतांना केल्या गेलं.
लेखन दोन्ही प्रकारचं सरसच असतं. त्या लेखनाला अर्थगर्भतेचा साज असतो. दोन्ही लेखनात श्रृंगाराचीच भाषा असते. त्यामुळंच ते लोकांना आवडतं. जर भाषा श्रृंगार व शब्द श्रृंगारीक नसेल तर ते लेखन निरस व कंटाळवाणं वाटत असतं. वाचायला अवघड होवून जातं. असं लेखन गेल्या काही दशकात अजिबात झालेलं नाही. अलीकडील काळात तर विभत्स स्वरुपाचं लेखन झालेलं दिसून येत आहे. ज्यात किंचीतही अर्थगर्भता दिसून येत नाही.
सामान्यतः बरेच लोकं लेखन करतात व त्या लेखनातून लेखक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू अशा चांगल्या संदेशाच्या संस्करणानं त्या लेखकाची अनुभूती वाढते. त्याचबरोबर त्या लेखकांच्या लेखनाचं मोलंही वाढतं. तसंच लेखनाचं महत्वही. जेव्हा असं वाढलेलं त्या लेखकाचं महत्व समाजाला दिसतं. तेव्हा आपोआपच त्या लेखकांचे आणि त्या लेखकांच्या लेखनीचे शत्रू तयार होतात. काही समाजकंटक त्याच्या लेखनीला जळत असतात. मग काही लपूनछपून विरोध करतात तर काही खुल्यापणानं विरोध करतात. काही लोकं तर असे असतात की जे मनातून जळतात. परंतु गोड गोड बोलत असतात. काहींचा विरोध दिसून येत असतो. काहींचा विरोध दिसून येत नाही.
लेखकांची लेखनी जेव्हा चांगले चांगले विचार प्रस्तुत करीत असते. तेव्हा निर्माण झालेली व द्वेष करणारी मंडळी, ते त्यांच्या लेखनीबाबत कुरघोडी करतात व वेळप्रसंगी त्यांच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न करतात. अशी हत्या करतांना ते संबंधीत लेखकाचीही हत्या त्यात होईल याचाही विचार करीत नाहीत.
काही लेखन खरंच चांगलं असतं. पण लोकांना संस्कार देणारं असतं. परंतु ते लेखन बाजारात येत नाही वा त्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत नाही. परंतु अशा स्वरुपाचं लेखन जेव्हा बाजारात येतं, तेव्हा ते चिरकाल टिकतं. त्याची समाजाला नेहमीच गरज भासत असते. ते लेखन पाहिजे त्या प्रमाणात संपुष्टात येत नाही. मात्र वात्रट स्वरुपाचं लेखन लवकर बाहेर येतं व त्याला प्रसिद्धीही लवकरच मिळते व ते लेखन लवकर संपुष्टातही येते. महत्वाचं सांगायचं झाल्यास चांगली वस्तू ही कधीच बाजारात खपत नाही. तसं पाहता एका कवीनं म्हटलं की चिंध्या पांघरुन जो सोनं विकतो. त्याचं सोनं खपत नाही. तसं साहित्याचं आहे. साहित्यही चांगलं असेल, परंतु ते चांगलं साहित्य खपत नाही. तसंच एखादी माती जर एखादा सोनं पांघरुन विकत असेल तर ती खपते. तसंच साहित्याचं आहे. आज असं वात्रट साहित्यही बाजारात खपत आहे व चांगलं साहित्य बाजारात प्रसिद्धीस नाही. असंच चित्र दिसून येत आहे. विशेष बाब अशी की आज चांगलं साहित्य बाजारात उपलब्ध होत नसल्यानं नक्कीच वाचकांची संख्या रोडावली आहे. शिवाय येणारे वात्रट स्वरुपाचे साहित्य बाजारात टिकत नसल्यानं त्यावर चिंतन करण्याची आज गरज आहे. लेखकानंही त्याचं चिंतन करुन चांगलं साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. तसे काही लेखक करतातही. परंतु ते चांगलं साहित्य बाजारात खपत नसल्यानं बाजाराचा कल पाहून जे लेखक चांगलं लेखन करतात. तेही चांगलं लेखन करणं सोडून व चांगलं साहित्य निर्माण करणं सोडून वात्रट साहित्य निर्माण करण्याकडे कल झुकवत आहेत. तसेच प्रकाशकही चांगल्या साहित्याला भाव नसल्यानं असं वात्रट स्वरुपाचंच साहित्य प्रकाशित करीत आहेत. यातूनच चांगले साहित्य, चांगले साहित्यीक व चांगलं लेखन संपते की काय? ही भीती आज निर्माण झाली आहे. होत आहे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की चांगले लेखन करणारे लेखन संपू नये. चांगले साहित्य संपू नये. चांगल्या साहित्याची आजच नाही तर भविष्यातही गरज आहे. अशा प्रकारचं साहित्य नक्कीच निर्माण व्हावं. जेणेकरुन भविष्यात त्याच विचारावर आधारीत समाजाची घडी बसविण्यास या साहित्याचा उपयोग होवू शकेल. तसंच आज साहित्यीकांनी याच साहित्याचा वापर करुन भविष्यात चांगला समाज निर्माण होवू शकेल नव्हे तर करता येईल याचा विचार करुन लेखन करावं. तशाच लेखनाची आज गरज आहे यात शंका नाही. जेणेकरुन त्यातून भविष्यातील चांगले विचारवंत निर्माण करता येतील. वात्रट स्वरुपाच्या लेखनातून अशा चांगल्या स्वरुपाचे विचारवंत निर्माण होणार नाहीत. यासाठी तरी चांगल्या स्वरुपाचं लेखन व्हावं. वात्रट स्वरुपाचं लेखन नाही. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०