वाढती बेरोजगारी;एक भीषण समस्या की शिक्षणाचा परीणाम
आज देशात बेरोजगारी वाढलेली दिसत आहे.जग चंद्रावर जरी जात असले तरी दुसरीकडे बेरोजगारीने आत्महत्या होतांना दिसत आहे.याला जबाबदार जर कोण असेल तर आपण सरकारवर दोष देवून मोकळे होतो.खरंच वाढत्या बेरोजगारीला सरकार जबाबदार आहे का?याचं उत्तर नाही असंच येईल.
शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे असं मानतात.खरंही आहे.मग जो हे दुध प्राशन करेल तो गुरगुरेल असंही म्हटलं जातं.तेही खरं आहे.मग अलिकडे हेच वाघिणीचं शिक्षणरुपी दुध प्राशन केलेले,दुध प्रेमी गुरगुरत का नसावे ते कळत नाही.वाटल्यास त्यांनी हे दुध प्राशन केल्यानंतर लाथ मारुन पाणी काढायलाच पाहिजे अर्थात बेरोजगारीवर मार्ग काढायलाच पाहिजे.पण तसे होत नाही.ही बेरोजगार मंडळी आत्महत्या करुन मरणे पसंत करतात.पण बेरोजगारीवर मात करीत नाहीत.
आम्ही शिकलो.लहानाचे मोठे झालो.उच्च शिक्षण घेतलं.पण नेमकं या शिक्षणातून आम्ही काय घेतलं?असं जर कोणी विचारल्यास याचं उत्तर असेल की या शिक्षणातून आम्ही लाज,भीती,गुलामी आळसपणा,लाचारी इत्यादी सा-या गोष्टी विकत घेतलेल्या दिसतात.आम्ही शिक्षण शिकतो.कशासाठी?तर स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच स्वतःला सक्षम बनविण्यासाठी.तसेच शिक्षणातून माणूस घडविण्यासाठी.....पण आम्ही स्वतःचा सर्वांगीण विकास तर करीत नाही.स्वतः माणसे घडवीत नाही तसेच स्वतःही माणुस बनत नाही.तसेच त्यातून स्वतः सक्षम बनत नाही.उलट या शिक्षणातून आम्ही गुलाम बनतो.शाळेचेच उदाहरण द्यायचे झाल्यास आज कित्येक खाजगी शाळेत कित्येक शिक्षक मंडळी लाचारी आणि गुलामीचं जीवन जगतात.संचालक मुख्याध्यापक म्हणेल तसं वागतात.संचालक लुट लुट लुटतात पैशाने नव्हे तर अनन्वीत अत्याचारही करतात.पण स्वतःवर संकट येवू नये म्हणून चूप बसतात.शाळेत ते कोणता इतिहास शिकवीत असतील देवजाणे.घरीही महिला गृहीणी कितीही शिकली असली तरी ती पतीचं ऐकतेच.स्वतःच्या पायावर धड उभी राहू शकत नाही.पण असो आमचा विषय बेरोजगारी आहे.जिथे शिकलेला आणि जगाला शिकविणारा शिक्षक आपल्या भीतीखातर संचालकाच्या विरोधात जात नाही.तिथे हा शिकलेला व रोजी रोटी नसलेला बेरोजगार तरुण खरंच भीती आणि लाजेपायी काम करु शकेल काय?ही विचार करायला लावणारी बाब आहे.
तरुण शिकतात.शिकायला पाहिजे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.पण या शिक्षणाचा जीवनात यथावकाश उपयोग करायला पाहिजे.जास्त शिकलेले असाल तर त्या ज्ञानाचा उपयोग करुन तुम्ही बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयोग करायला हवा.नव्हे तर जीद्दी आणि प्रयत्नांच्या जोरावर एखादा उद्योग उभा करायला हवा.तसेच इतर तरुणांना रोजगार दिला पाहिजे.भांडवल तर सरकार देते.आज देशात बेरोजगारांसाठी उद्योगाच्या अनेक योजना आहेत.त्यातून तुम्हाला उद्योग सुरु करायचा असेल तर मार्गदर्शनासह भांडवलांचीही मदत होते.पण आमची मानसिकता आम्हाला नोकरीशिवाय दुसरं करु देत नसल्याने आम्ही मागे आहोत.आम्हाला मेहनत आवडत नाही.आम्हाला सुख हवं आहे.उद्योग डुबण्यापुर्वी आमची मानसिकता आधी डुबते.आम्ही विचार करतो की आम्ही लावलेला उद्योग भविष्यात डुबला तर.......त्यापेक्षा नोकरी केलेली बरी.ही मानसिकता.म्हणूनच आज बेरोजगारी वाढली आहे.खरं तर या तरुणांनी संशोधन क्षेत्रात जावून नवनवे शोध लावायला हवे.पण आम्हाला वाटते की उद्योग काय कमी शिकलेलाही माणुस करतो.मी कसा करु?याही लाजेमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे.कामे आहेत पण आम्हाला ती कामे करायला लाजच पुष्कळ वाटते.
शेतक-यांच्या मुलाचं उदाहरण घेतल्यास शेतक-यांच्या मुलांनी शिकून शेती विकून नोकरीवर लागण्याची अपेक्षा करण्यापेक्षा त्याच शेतीत नवनवे प्रयोग करुन वाण शोधले पाहिजे.सध्या शेती पिकत नाही.रासायनिक खताने जमीनीचा पोत कमी झाला आहे.तेव्हा या बेरोजगारांनी लोकांना आपल्या शिक्षणाच्या जोरावर मार्गदर्शन करुन कंपोष्ट किंवा सेंद्रीय शेतीकडे वळवले पाहिजे.तसेच शेतकरी ज्या आत्महत्या करतात त्याही आपल्या शिक्षणाच्या व बुद्धीच्या जोरावर रोखल्या पाहिजेत.त्या शेतक-यांना पीक कसे जास्त प्रमाणात होईल याचा विचार करुन आपल्याला लागलेला बेरोजगारीचा दाग नष्ट केला पाहिजे.
सरकारकडे उद्योगाच्या योजना जरी असल्या तरी ते पाहिजे त्या प्रमाणात उद्योग उभारु शकत नाहीत.तसेच बेरोजगारीला आणि बेरोजगारालाही सरकार न्याय देवू शकत नाही.त्यांना काही एकच काम नाही.तेव्हा आपण सरकारला दोष न देता आपणच स्वतः होवून पुढं येवून बेरोजगारी संपवायला हवी.बेरोजगारी हा कलंक असून आपण जरी उच्च शिक्षण घेतलं असलं तरी ते उच्च शिक्षण लाजण्यासाठी आणि गुलामीसाठी घेवू नये.जर शिक्षण घेवून कोणत्याही कामाची लाज वाटत असेल तर असले शिक्षण न घेतलेले बरे.कोणतेही उद्योग हे हिन आणि उच्च दर्जाचे नाहीत.तुम्ही जर उद्योगाला श्रेष्ठ कनिष्ठच्या कसोटीत बसवत असाल तर तुम्ही जीवनात काहीच करु शकत नाही.उद्योगाला जास्त शिक्षण लागत जरी नसलं तरी जे जास्त शिक्षण घेतात,ते यशस्वी उद्योग करु शकतात.जे कमी शिकलेले असतात.ते मात्र तेवढी कर्तबगारी उद्योगात दाखवू शकत नाहीत.
खरंच बेरोजगारी एक गंभीर समस्या जरी असली तरी तिला कसं हाताळायचं हे आपण ठरवायला हवं.बेरोजगारीवर मात करण्यासाठी तुमच्यात हिंमत असायला हवी.जोपर्यंत तुम्ही बेरोजगारीवर मात करण्याची हिंमत करणार नाही,तोपर्यंत तुम्हाला कामाचं मुल्य कळणार नाही आणि तुम्ही जीवनात यशस्वी ठरणार नाही हे लक्षात घ्यायला हवं.तेव्हाच ख-या अर्थानं बेरोजगारीवर मात करता येईल.
अंकुश शिंगाडे
९९२३७४७४९२