नागपूरचे ते पवित्र आत्म्ये - भाग 1 Ankush Shingade द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नागपूरचे ते पवित्र आत्म्ये - भाग 1

'नागपुरचे ते पवित्र आत्मे' या पुस्तकाविषयी

'नागपूरचे ते पवित्र आत्म्ये' या नावाची पुस्तक नागपूरच्या सर्व दिवंगत नागरिकांना व तमाम नागपूर विकासाला हातभार लावणाऱ्या लोकांना अर्पण करतो. कारण त्यांच्यामुळेच आज आपलं नागपूर शहर दिसत आहे. ते जर नसते तर आज जे नागपूरचं वैभव दिसतं ना, ते वैभव अतिसुंदर नसतं. नागपूर हे आजही इतर सामान्य गावासारखंच गाव राहिलं असतं.
बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं की आपण ज्या शहरात राहतो, त्या नागपूरविषयी लिहावं. परंतु जशी देशातील सोन्याला किंमत नसते आणि विदेशातील मातीला किंमत असते. तेच घडलं याही लिखाणाबद्दल. म्हणूनच ही या स्वरुपाची पुस्तक लिहायला वेळ लागला. तसं पाहिल्यास ही पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा थोडीशी वेगळीच आहे.
नागपूरला सांस्कृतीकच नाही तर इतर बर्‍याच स्वरुपाचा वारसा लाभला आहे. या वारस्यात प्रामुख्यानं नागनदीचा समावेश होतो. नागनदी जर आपल्या नागपुरात नसती तर नागपूर नावाचं आज जे शहर दिसतं. ते शहर वसवता आलं नसतं. ही यातील विशेष बाब आहे.
ही पुस्तक लिहिण्यामागं प्रेरणा माझ्या वडीलांचीच आहे. ते शाहीर होते त्या काळात गाजलेले. ते प्रसंग असा हुबेहूब सादर करीत की वाटायचं, ते पात्र जिवंतच आहेत की काय. आता ते या जगात नाहीत. परंतु म्हणायचे की आपलं नागपूर असं होतं, आपलं नागपूर तसं होतं. तीच प्रेरणा ठरली ही पुस्तक लिहिण्यामागे. तशी आईही माझी या पुस्तकाच्या बाबतीत महानच की ती बाकाबाई व अप्पासाहेबांच्या गोष्टी सांगायच्या त्यावेळेस. परंतु त्यावेळेस माझं बालपण होतं. त्यामुळंच की काय, त्या गोष्टी मला तरी समजायच्या नाहीत.
पहिलं वहिलं ही पुस्तक लिहिण्यामागं प्रेरणास्थान म्हटलं तर माझे आईवडील. तसे सर्वांचेच आईवडील त्यांचे त्यांचे प्रेरणास्थान असतातच याबद्दल वाद नाही आणि दुसरे प्रेरणास्थान म्हणजे ई साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक सुनीळ सामंत. ते माझ्या पुस्तकाला ऑनलाईन प्रकाशित करतात. अशा बर्‍याच पुस्तकांना ऑनलाईन प्रकाशित केलं आहे त्यांनी. त्यामुळंच पुस्तके लिहिण्याचा सपाटा वाढला.
या पुस्तकाचं कथानक सांगतो. यातील वास्तविकता अशी की यात काही असे ऐतिहासिक पात्र आहेत की जे यातील जिवंत पात्राशी संवाद साधतात. त्यानंतर यातील पात्र त्या संवादाचा उपयोग करुन नागपूर विकासासाठी प्रयत्न करतो. परंतु तो नेमकं काय करतो? हे मी याठिकाणी वर्णीत नाही. ती गुप्त स्वरुपाची माहिती आहे. शिवाय नागपूरच्या नागनदीबद्दल काय लिहिलं आहे. तिचं शुद्धीकरण होतं का? हाही प्रश्न अनाकलनीय आहे आणि त्याचं उत्तर याच पुस्तकातून मिळेल.
नागनदी व नागपूरच्या इतिहासावर आधारीत असलेली ही पुस्तक असून यात असलेली माहिती ही गुगलवरुन घेतलेली आहे. त्यासाठी पुस्तकं हाताळलेली नाहीत. माहिती तीच आहे, फक्त लेखांकन बदलवले आहे. ती माहिती प्राप्त करुन देण्याबद्दल गुगलवर माहिती देणाऱ्यांचं आभार मानतो व माफीही मागतो की त्यांना विचारुन ती माहिती घेतलेली नाही. तसा भ्रमणध्वनी क्रमांक नसल्यानं फोनही करता येत नव्हता. त्या लेखांकनाचा वापर मला संदर्भ म्हणून झाला.
ही माझी साहित्यातील एक्यान्नववी पुस्तक असून चौसष्टवी कादंबरी आहे. आपण ती वाचावी व नागपूर आणि नागनदीची संपुर्ण माहिती जाणून घ्यावी तेही मनोरंजन करीत. ही आपणास विनंती. त्यानंतर पुस्तक कशी वाटली याबद्दल एक फोन अवश्य करावा ही देखील एक विनंतीच.

आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०

नागपूरचे ते पवित्र आत्म्ये (कादंबरी)
अंकुश शिंगाडे

ती काशीबाईची समाधी...... ती समाधी म्हणून प्रसिद्ध नव्हती, तर ते एक देऊळ म्हणून प्रसिद्ध होती. त्या देवळालगत काही समाध्याही होत्या. त्या समाध्यांशी त्या काशीबाईचे हितसंबंध जुळले होते. ते सर्व आत्म्ये त्या काशीबाईच्या देवळात गोळा होत. त्यांच्यात सदैव चर्चा चालत असे. काहीजणं एक प्रकारची खंतही व्यक्त करीत असत. त्यांनाही एक खंत वाटत असायची. ती म्हणजे नागनदीच्या शुद्धीकरणाची. कारण अलिकडील काळात नागनदी अशुद्ध होती. जी त्यांच्या काळात नव्हती. त्यांनीच वसवलं होतं नागपूर आणि त्यांनीच नागपूरचा विकासही केला होता तेवढ्याच झपाट्यानं. त्यांच्यामुळंच नागपूरचं रुपांतर शहरात झालं होतं. ते जर झाले नसते, तर आजही नागपूर शहर झालं नसतं. ते आजही गावंच राहिलं असतं.
गणेश नागपूर शहरात राहणारा एक लहानसा मुलगा होता. त्याला नेहमी प्रश्न पडायचा. तो म्हणजे त्या नागनदीचा. जी नदी आज गढूळ झालेली होती व तिचं पाणी पिणंही योग्य नव्हतं. कारण तिच्यात कित्येक स्वरुपाचे जीवजंतू होते की जे अनेक सारे आजार पसरवीत असत. तसं पाहता गणेश हा नागनदीच्याच किनार्‍यावर राहायचा.
एकदाची गोष्ट. गणेश विचार करीत होता की ही नदी गतकाळात तरी शुद्ध असेल काय? तसा त्याला प्रश्न पडताच तो आपल्या आईला विचारु लागला. तिचं डोकं खावू लागला. परंतु त्याच्या आईलाच त्याची कल्पना नव्हती. ती काय सांगेल त्या नदीची माहिती. तिला एक दिवस गणेशचा राग आला व तिनं त्याला एका बेशरमच्या काठीनं धू धू धुतलं. मग काय, गणेशाची पुरती इच्छा मावळली व आता तो चूप बसला होता. परंतु तो प्रश्न काही त्याच्या मनातून गेला नव्हता. जात नव्हता. तो तर भुकंपातून लाव्हारस जसा बाहेर पडतो. तसा बाहेर पडायला पाहात होता. तसा गणेश हळूहळू मोठा झाला व तो शाळेत जावू लागला.
गणेश शाळेत जात होता. परंतु त्याच्या मनात तोच प्रश्न आकार घेत होता. त्याला सतावत होता तो प्रश्न. तसा एकदा त्यानं तोच प्रश्न आपल्या वर्गशिक्षकाला विचारला. म्हटलं की नागनदी पुर्वी गढूळ होती काय?
त्याचा तो प्रश्न. तसे ते काही जास्त शिकले नव्हतेच. शेवटी त्याचा तो प्रश्न ऐकताच त्यांनाही त्याचा राग आला व त्यांनीही त्याच्या आईप्रमाणेच त्याला चांगला चोप दिला व तो प्रश्न प्रश्नच राहिला.
गणेशला लागलेली प्रश्नांची ओढ. तसं पाहिल्यास त्याला त्याच्या शिक्षकांकडून उमेद होती. परंतु त्याच्या पदरी भ्रमनिराशा पडली होती. तो निराश झाला होता. शिवाय कोणालाही विचारता येत नव्हतं वा कोणाशीही बोलता येत नव्हतं. अशातच त्याला तो एक वयोवृद्ध व्यक्ती रस्त्यावर भेटला होता की ज्याच्यामुळं त्याला ऐतिहासिक गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या.
गणेश आज मोठा झाला होता. त्याला आठवत होता तो काळ. ज्या काळात त्याला ऐतिहासिक गोष्टींची माहिती झाली होती. त्या गोष्टी त्याला भुतांनी सांगतल्या होत्या नव्हे तर शिकवल्या होत्या हे त्याला आज माहीत झालं होतं. आज त्याला भुतांबाबत भीती वाटत नव्हती तर अधिकच आत्मीयता वाटत होती. ती भुतं नसून ते अमर आत्म्येच आहेत असं आज वाटत होतं त्याला. आज त्याचा इतिहास कमजोर नव्हता तर तो इतिहास अधिकच बलदंड झाला होता. त्याला त्या अमर आत्म्यांनी केवळ शिवाजी, रघुजीच नाही तर नागनदी, नागपूर आणि इतर तमाम ऐतिहासिक अमर आत्म्यांची माहिती दिली होती. जी त्याला शाळेतही शिकायला मिळालेली नव्हती. आज त्याला आठवत होते ते बालपणीचे जीवन व त्या अमर आत्म्यांनी शिकविलेल्या त्या अर्थपुर्ण गोष्टी.
गणेशला त्याच्या बालपणी इतिहासाची आवड होती. त्याचबरोबर आवडत होतं त्याला, इतिहासात गतकाळातील झालेले थोर महापुरुष. ज्यांनी इतिहास घडवला होता. तो रोज काशीबाईच्या मंदीरात जात असे व रोजच तिथं बसलेल्या वृद्ध माणसांशी संवाद साधत असे. ती वयोवृद्ध माणसं कधी त्याच्यासमोर शिवाजी बनून येत असत, तर कधी तीच वयोवृद्ध माणसं रघुजी बनून, तर कधी काशीबाई बनून. ती माणसं कुठं राहात व कुठं जात हेही काही त्याला माहीत नव्हतं.
गणेश हा आज शाळेत शिकत होता. तो बाळबोध स्वभावाचा होता. त्याला इतिहासाची केवळ गोडीच होती असं नाही तर तो इतिहास जाणून घ्यायचीही आवड होती. त्याची आई त्याला लहानपणापासूनच ऐतिहासिक गोष्टी सांगत असे. त्या त्याला फार आवडत असत.
महालचा तो भाग. त्याच भागात गणेश राहात होता. त्याला इतिहासाची आवड होती. तो घरी जसा इतिहासाबाबत प्रश्न विचारायचा. तसाच प्रश्न शाळेतही विचारायचा. ते पाहून एकदा त्याचे शिक्षक त्याचेवर रागावले होते व चूप बस म्हणाले होते. त्यावेळेस त्याला शिक्षकांचा फार राग आला होता. कारण त्याला नागपूर व नागनदीच नाही तर नागपूरसाठी ऐतिहासिक कामगीरी करणाऱ्या वीर योद्ध्यांची माहिती जाणून घ्यायची होती. तशी त्याची इतिहासाची आवड पाहून तसा तो दिवस उजळलाच. आजही त्यानं एक ऐतिहासिक प्रश्न विचारताच शिकविणारी बाई रागावली होती. त्यामुळंच त्याला त्या शिक्षीकेचा भयंकर राग आला होता. परंतु तो काही बोलला नव्हता आणि आज शाळेतील त्या शिक्षीकेचा राग आल्यामुळेच पोटात काहीतरी दुखतंय, याचाच बहाणा करुन तो शाळेतून लवकर निघाला होता व तो रस्त्यावरुन जात असतांना अचानक रस्त्यावर त्याला तो एक वयोवृद्ध व्यक्ती भेटला.
तो भेटलेला वयोवृद्ध व्यक्ती. त्याला मिशा पीळदार होत्या. राजषी कपडे त्यानं घातलेले होते. अंगावर दागदागीणे होते आणि जणू तोच वयोवृद्ध व्यक्ती राजासारखाच वाटत होता. तो त्याला म्हणाला,
"बाळ, का बरं रडतोस?"
गणेशनं त्याला पाहिलं. ती पीळदार मिशीही पाहिली. तसा तो क्षणभर घाबरला. तसा तो हिमतीनं म्हणाला,
"आपण कोण?"
"माझं नाव विचारु नकोस बाळ. परंतु तू का रडतोय ते सांग. त्यावर माझ्याकडं नक्कीच उपाय आहे. मी क्षणभरात तुझी इच्छा तृप्त करतोय."
"अगदी खरं बोलतोस की काय?"
"होय, शंभर प्रतिशत खरंच बोलतोय. मी कधी खोटंच बोललो नाही जीवनात."
"नक्कीच खरं सांगाल ना?"
"होय, नक्कीच खरं."
"आज की नाही. माझ्यावर बाई फार रागावली."
"का रागावली बाई? तू अभ्यास नीट केला नसेल?"
"नाही. ते कारण नाही."
"मग. मग कोणतं कारण आहे तर?"
"मला हवी होती इतिहासाची माहिती. मी विचारलाय तसा प्रश्न आमच्या बाईला, तर म्हणे........"
"काय म्हणे बाई?"
"बाई म्हणे, चूप बस. बोलायचंच नाही. नाही तर तुझ्या तोंडकाळात हाणीन."
"मग?"
"मग चूप बसलोय मी."
"काय हवंय तुला?"
"मला हवीय शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई महाराणी, छत्रपती शाहू महाराज, रघुजी राजे, जानकोजी राजे, काशीबाई आणि बख्त बुलंद शहा, खांडक्या बल्लाळ तसंच नागनदी, नागपूर व अंबाझरीची माहिती. आपण खरंच सांगू शकाल का यांची माहिती? आपणाला तरी आहे का माहीत त्यांची माहिती?"
"बाळ, मला तर त्यांची माहिती माहीत आहे. परंतु माझ्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात त्यांची माहिती त्या मंदीरातील वयोवृद्ध माणसांना माहीत आहे. तीच मंडळी तुला यथायोग्य माहिती सांगतील. परंतु तुला तिकडं जावं लागेल. परंतु तू चालशील काय तिकडे?"
"हो, का बरं नाही. मला जर ती माहिती तिथं मिळत असेल तर मी का नाही चालणार तिकडे?"
"परंतु तुझे बाबा? तुझे आईवडील ओरडणार नाहीत का?"
"नाही ओरडणार. तसेही ते माझ्याकडे जास्त लक्षच देत नाहीत."
"तर मग ठीक आहे. तू चल मग माझ्यासोबत. मी तुला दाखवून देतो आमची बैठक. तुला तिथं पुर्णच माहिती मिळेल." तो वयोवृद्ध व्यक्ती म्हणाला. तसा गणेश त्याचेसोबत त्याच्या मागं झपझप पावले टाकत चालू लागला. थोड्या वेळानं ते स्मशान लागलं होतं. तसा तो घाबरला. परंतु तो वयोवृद्ध व्यक्ती म्हणाला,
"घाबरु नगं. इथंच तुला समदी माहिती मिळेल. इथंच असते आमची बैठक. छान शांत वातावरणात. म्हाताऱ्यांना शांती हवी असते ना म्हणून. आम्हाला इथं कोणीच त्रास देत नाहीत. तुलाही शांतच वाटेल."
गणेश हा लहानच होता. त्याला भूत प्रेत या गोष्टी फारशा समजत नसतच. शिवाय तो वयोवृद्ध व्यक्ती माणसासारखाच दिसत होता. तो भूत वाटतच नव्हता. मग तो त्या माणसाला का बरं घाबरणार. तो त्याचेसोबत निर्धास्तपणे जात होता. थोड्याच वेळात ती स्मशानाची वाट चालू लागताच ते काशीबाईचं मंदीर आलं व तो वयोवृद्ध व्यक्ती म्हणाला,
"हेच ते काशीबाईचं मंदीर. याच मंदिरात दररोज आमची बैठक होते. मग सायंकाळचे तीन वाजलेच की आम्ही सगळेच तुझ्या शाळेत जशी सुटी होते, तसे घरी निघतो. कारण घरी आमच्या लेकरांची व नातवांचीही यायची वेळ होतेच." तो वयोवृद्ध व्यक्ती अर्थात प्रेतात्मा म्हणाला.
गणेशला म्हाताऱ्याची गोष्ट पटली. तसं त्यानं पाहिलं की त्या काशीबाईच्या मंदिरात काही वयोवृद्ध माणसं बसलेली होती. तो जेव्हा तिथं पोहोचला होता. तेव्हा तिथं आरती सुरु होती. तसं म्हाताऱ्यानं त्याला सांगीतलं,
"आज बराच वेळ झाला आहे. आज काही तुला जास्त ऐकायला मिळणार नाही. परंतु उद्या लगेच ये बाराला. शाळेत जातोस तसा. म्हणजे तुला बरोबर ऐकता येईल व समजून घेता येईल त्यांचा इतिहास."
गणेशनं म्हाताऱ्यानं म्हटल्यानुसार आपले हात जोडले. तशी आरती झाली. त्यानंतर म्हाताऱ्यानं त्याला त्या स्मशानाच्या दरवाज्याजवळ सोडून दिलं व त्याच्याकडून दुसऱ्या दिवशी येण्याचं आश्वासन घेवून तो परत गेला.
दुसरा दिवस उजळला होता व गणेशनं शाळेत जाण्याचा बहाणा केला होता व तो सरळ त्या स्मशानभूमीत पोहोचला. जिथं ते म्हातारे बसलेले होते. त्यांचं भजन किर्तन सुरु होतं. तसा तो तिथं पोहोचलाच. तिथं तो म्हाताराही उपस्थीत होताच. त्यानं गणेशची ओळख त्यांना करुन दिली. हळूहळू ओळख झाली व तो त्यांच्या वाणीनं भारावला आणि आता तो एक नवा अध्याय शिकू लागला होता. जो अध्याय त्याला शाळेत शिकवला जात नव्हता.
ते अमर आत्म्ये कधी शिवाजी बनून येत तर कधी शहाजी बनून आणि गणेशला काही ना काही माहिती सांगून जात असत. तशी माहिती सांगतांना आज काशीबाई आली होती. जी धार्मिक स्वरुपाची होती. ती नेहमीच पोथ्या वाचत असे व तिला धार्मिक ग्रंथाची बरीच माहिती होती. ती तशी म्हणाली,
"नागपूर हे नागनदीवर वसलेले होते. या ठिकाणी मोठं शहर नव्हतं तर एक लहानसं गाव होतं की ज्या गावातून एक लहानशी नदी वाहात होती. ह्या नदीचं नाव नाग वंशीय जातीच्या नावावरुन पडलं होतं. ती नदी पुर्वीपासूनच आदिवासी समुदायातील होती. त्या नदीकाठावर नागवंशीय समुदाय राहात होता व त्यांची मुलंही राहात होती, जी मानलं जात होतं की कश्यप ऋषींची मुलं होती.
पौराणिक ग्रंथानुसार प्राचीनकाळात नागवंशीय जनसमुदाय हा काश्मीरच्या भागात राहात होता. काही काळानंतर हा जनसमुदाय हिंदूस्थानच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचला. तो छत्तीसगड, झारखंड व इतर भागातही पोहोचला. त्या काळात त्याला दंडकारण्य म्हटलं जाई.
कश्यप ऋषींची पत्नी कद्रू होती व तिनं आठ मुलांना जन्मास घातलं होतं. त्यांची नावे होती. अनंतनाग, वासूकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख व कुलीक. याला नागवंशीयांचं अष्टकुल म्हटलं जातं. काही काही पौराणिक ग्रंथानुसार वासुकी, तक्षक, कुलक, कर्कोटक, पद्म, शंख, चूड, महापद्म आणि धनंजय तर काही पुराणानुसार अनंत, पिंगला, कर्कोटक, तक्षक आणि वासुकी हे पाच कुलं मानले जातात. म्हणतात की अनंतनाग उर्फ शेषनागनं भगवान विष्णू व वासूकीनं भगवान शिवाचे सेवक बनणं स्विकार केलं.
नाग व सर्प यामध्ये पुराणानुसार फरक मानला जातो. म्हणतात की सर्व सर्प हे क्रोधवशाचे मुलं आहेत व सर्व नाग हे कद्रूची मुलं. कश्यप ऋषीला ज्या दोन भार्या होत्या. त्यापैकी क्रोधवशा नामक पत्नीने सर्प, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांना जन्मास घातलं होतं.
हिंदुस्थानात सुर्यवंशी, चंद्रवंशी, अग्नीवंशी वंशाचे राजे झाले. तसाच एक नागवंशही झाला व नागवंशाचीही मोठी परंपरा झाली आहे. महाभारत काळात सर्वत्र नागवंश पसरला होता. नागालॅंड, मणिपूर व आसाममध्ये नागवंश पसरला होता. कारण ते लोकं सर्पपुजक होते. कोणी म्हणतात की नागवंशीय लोकं हे हिमालयाच्या पलिकडे राहात होते.
नाग वंशातील अनंतनाग हा अनंतनाग भागात राहात होता. आजही तिथं नाग वंशातील लोकं अस्तित्वात आहेत. नाग वंशातील शेषनाग याला प्रधान राजा मानलं जातं. त्याचबरोबर वासूकी, तक्षक व इतर सर्व राजे झाले असंही मानलं जातं.
वासुकी नावाच्या नागवंशी राजाचा राज्यकारभार कैलासजवळ होता. तक्षक नावाच्या नागवंशीय राजानं तक्षशिला हे शहर वसवलं.
नागवंशीयात प्रामुख्यानं कर्कोटक, ऐरावत, धृतराष्ट्र, अनंत, अहि, मनिभद्र, अलापत्र, कंबल, अंशतर, धनंजय, कालिया, सौंफू, दौंद्धिया, काली, तखतू, फाहल, काना इत्यादी जनजातींचा समावेश होतो. त्यांचे राज्य हिंदुस्थानातील वेगवेगळ्या भागात होते. याशिवाय आणखी काही नागवंशीय राजे हिंदुस्थानात अस्तित्वात होते. ज्यांचा उल्लेख अथर्ववेदात आहे. त्यात श्वित्र, स्वज, पृदाक, कल्माष, ग्रीव, तिरीचराजी, चितकोबरा पृश्ची, काला फणीयर करैत, गवताच्या रंगासारखे दिसत असलेले उपतुण्य, पीला ब्रम, असिता रंगरहित अलीक, दासी, दुहित, असति, तगात, अमोक, तवस्तू यांचा समावेश आहे.
हे नागवंशीय लोकं त्या काळात नागाची व सर्पाची पुजा करीत असत. त्यामुळंच त्यांनी आपल्या कुलाचं नाव देखील नागकुल ठेवलं. अनंत नागानं आपल्या कुणाचं नाव अनंतनाग ठेवून आपलं कुल चालवलं. पुढं शहरही वसवलं. तेच केलं तक्षक नागानं. त्यानंही तक्षशिला हे शहर वसवून आपलं कूल चालवलं. ज्या कुलातील एका व्यक्तीमत्वानं अर्जुनाचा नातू परीक्षीतची हत्या केली होती. त्यानंतर परीक्षीतचा मुलगा जन्मजेयनं तक्षक कुलाचा बदला घेतला व संपूर्ण पृथ्वीवरील नागवंशीय लोकांची कत्तल केली. त्याच भीतीनं नागवंशीय लोकं जिकडे वाट मिळेल तिकडे जायला लागले. त्यातच ते नागनदीच्या तटावर आले व तेथे अज्ञातवासात राहू लागले. संपूर्ण परिस्थिती निवळेपर्यंत. पुढं समाजात दोन गट तयार झाले. ज्यात नागवंशीय लोकांना आदिवासी समजल्या गेलं. त्यांची जाती पाडण्यात आली. ज्यात नागा जमाती हे विशेष विशेषण आहे. याच विशेषणावरुन त्याच नागवंशीय माणसाच्या विशेष कुलाचे नाव नाग योनीतील प्राण्यांना देण्यात आले. हे तत्कालीन नागवंशीय जातीसमुदायांना चिडविण्यासाठी.
नाग यांचा अर्थ होता, ताकदवान लोकं. नागवंशीय लोकं हे आधीपासूनच ताकदवान होते व त्यांनी आपल्या ताकदीच्या भरवशावर आपआपले राज्य स्थापन केले होते. ते आपल्या ताकदीच्या भरवशावर मोठमोठ्या राजांनाही ध्वस्त करीत. परंतु ते त्यांचं सामर्थ्यपण तत्कालीन लोकांना पटलं नाही वा ते स्विकार करणं असह्य झालं. त्यातूनच त्यांनी त्यांना दुषणं दिली. वेगवेगळी विशेषणं लावली व त्यांची नावं प्राण्यांना दिली.
आज प्राण्यांच्या प्रजातीपैकी सर्पयोनीतील प्रजातींना या नागवंशीयांची नावं आहेत. कोब्रा नावाचा त्यावेळेस एक भयंकर ताकदीचा व सामर्थ्यशाली मानवी समूह अस्तित्वात होता. आज कोब्रा हे नाव सापयोनीतील प्राण्याला आहे. तसंच मणियर नावाचा त्यावेळेस अस्तित्वात असलेला मानवी समूह. आज मण्यार नावाचा साप आहे. तसेच बाकीच्याही नागवंशीय मानवी समूहाचं झालं आहे. तीच नागवंशीय मानवी समुहाची नावं सर्पयोनीतील प्राण्यांना देण्यात आली असावीत हे सत्य नाकारता येत नाही.
नागा नागवंशीय जमात ही आदिवासी म्हणून गणल्या जाते. छत्तीसगड मधील बस्तरचा भाग हा नल व नागवंशीय तसेच फणी नाग वंशीय लोकांचा समूह म्हणून ओळखला जातोय. पौराणिक ग्रंथानुसार मध्यप्रदेशातील विदिशा नगरीत नागवंशीय राजे राहात होते असा उल्लेख मिळतो. त्यात शेष, भोगीन, सदाचंद्र, धनधर्मा, भूतनंदी, शिशूनंदी, यशनंदी या नावाच्या जमातीचा उल्लेख मिळतो. पौराणिक काळानुसार संपूर्ण हिंदुस्थानात नागवंशीय लोकंच पुर्ण हिंदुस्थानातील शासक होते. ज्याला आज आदिवासी असं संबोधन आहे. त्यांनी त्या काळात आपल्या विजयाची पताका केवळ हिंदुस्थानातच नाही तर हिंदुस्थानाच्या बाहेरही लहरवली होती. या नागवंशीयात आता जरी आदिवासी समुदायाचाच उल्लेख असला तरी त्या काळात नागवंशीयांमध्ये ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्यांचाही समावेश होता.
नागवंशीयांनी भारतातील अनेक गावांत व शहरात व प्रदेशात राज्य केले. त्यावेळेस त्यांची राज्य ज्या ज्या ठिकाणी होती. त्या त्या गावाचे वा शहराचे वा प्रदेशाचे नाव त्या त्या नागवंशीय समुदायाच्या नावावरुन पडले हे सत्य नाकारता येत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास नागपूरचं देता येईल. नागपूर या शहराला नागपूर नाव व या शहरातील नदीला नागनदी नाव हे त्याच नागवंशीय समुहाच्या नावावरुन देण्यात आले. त्याचं कारण म्हणजे नागवंशीय लोकं जन्मजेयाच्या भीतीनं आपला जीव वाचवून सैरावैरा पळाले होते. ते नागपुरातील नाग नदीच्या किनाऱ्यावर स्थिरावले होते. ते या नदीचं स्वच्छ पाणी व येथील सुपीक जमीन यावर मोहीत होवून स्थिरावले होते व त्यांनी येथेच आपली वस्ती बनवली. पुढं जन्मजेयाचं भय निघून जाताच त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं व आपणच नागा आहोत हे जगाला दाखवलं आणि आपल्या अस्तित्वावरुन नागपूरला नागपूर व नागनदीला नागनदी नाव दिलं."
नागनदीला नागनदी व नागपूर शहराला नागपूर हे नाव कसं पडलं याची माहिती आज गणेशला मिळाली होती. त्याचं कारण होतं जुनी मंडळी. तो त्याच ध्येयानं त्या लोकांना विचारत होता व त्याबद्दलची माहितीही विचारत होता. ते प्रेतात्मे अगदी निःसंकोचपणानं माहिती सांगायचे. तर काही काही जण ती माहिती देण्याला टाळाटाळ करायचे. कदाचीत त्या प्रेतात्म्यांना त्याबद्दल माहितीच नसावी. तसे काही म्हणायचे की त्या गोष्टीला बराच काळ झाला. ती माहिती कोणालाच नाही. जिथं आपल्या स्वतःला आपल्या पडआजोबाची माहिती नाही. तिथं ती नागनदी व नागनदीच्या काठावर वसलेली माणसं. ती माहिती कोणाला राहील? परंतु तो इतिहास होता. तो इतिहास प्रत्यक्ष माहीत असेलच असं गणेशला वाटत होतं. तसं पाहिल्यास काही लोकं म्हणत होते की ती माहिती खोटी असते व त्यात तथ्यही नसतं. तरीही तो नागनदीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवून ती संकलीत करायला लागला होता. तो जेथून मिळाली. तशी ती माहिती मिळवत असे व आपल्याजवळ एखाद्या वहीत संकलीत करुन ठेवत असे. अशातच त्याला नागनदीच्या उगमाची माहिती उपलब्ध झाली काशीबाईकडून. जी आज मरायला कित्येक शतके लोटली होती. तसा तो त्या माहितीचा चिकित्सक बुद्धीनं विचारही करु लागला होता. काशीबाई व ते तमाम शूर आत्म्ये नेहमी त्याला भेटत असत व त्याच्याशी संवाद साधत असत. त्याच्या मनात प्रश्न उद्भवताच तो त्या अमर आत्म्यांना प्रश्न विचारत असे व ते अमर आत्म्येही तेवढ्याच तोडीनं त्या प्रश्नांवर उत्तर देवून त्याचं समाधान करीत असत. अशातच काशीबाई त्याला पुन्हा म्हणाली,
"नागनदी.......या नदीला पुर्वीच्या काळात नागनाला देखील म्हणत तर कोणी नदी देखील म्हणत. नागनदीचं नाव नागनदी का पडलं असावं? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. कोणी म्हणतात की ह्या नदीचा विस्तार हा नागमोडी असल्यानं याला नागनदी असं नाव पडलं असावं आणि ते एकप्रकारे बरोबरही आहे. परंतु त्या काळात नागनदीचा विस्तार कोणं पाहिला होता? ना त्या काळात विमानाचा शोध लागला होता ना हेलिकॉप्टरचा. मग विस्तार कसा काय समजेल? परंतु त्या काळातील लोकं पायी चालायचे. तसं पायी चालत असतांना त्यांना नागनदीचं वळण समजत होतं व त्यावरुनच नागनदीचं नाव नागनदी पडलं असावं.
नागनदीचं नाव नागनदी पडलं. त्याचं कारण होतं, तिची रचना. तिची नागमोडी असलेली रचना पाहून नागनदी नाव पडलं असावं हे साक्षात खरं असलं तरी नेमकी नागनदी केव्हा अस्तित्वात आली याबाबत अद्यापही संशोधन नाही.
म्हणतात की नागनदी ही लाव्हा गावाजवळ असलेल्या महादगड नावाच्या डोंगरातून उगम पावली व ती नागमोडी वळणे घेत पुढे जावून कन्हान या नदीला मिळाली. तिच्या दोन उपनद्या आहेत. पहिली म्हणजे पियारो नदी व दुसरी पोरा नदी. पियारो नदीचा अर्थ पिवळी नदी असा होत असून तिचा नागनदीसोबत संगम पावनगाव इथं झालेला आहे व पोरा नदी ही विहीरगावाकडून वाहात असून तिचा नागनदीशी संगम तितूर इथे झालेला आहे. या नदीला हत्ती नाला, बुरड नाला, तकिया नाला, नरेंद्रनगरचा नाला, डोबीनगर नाला, बोरिया नाला, बाळाभाऊपेठचा नाला, गड्डीगोदामचा नाला व सत्ती नाला. इत्यादी नाले मिळतात. पुर्वीच्या काळात या नाल्यांना ओढे म्हटले जाई व या नाल्यांना विशिष्ट असे नाव नव्हते. परंतु जसजशी नगरं वसत गेली. तसतसे त्या ओढ्यांना नाव मिळालं. पुढं या नगरातील लोकांच्या सांडपाण्याचा समावेश या ओढ्यात झाल्यानं त्या ओढ्यातील पाणी घाणेरडं झालं व त्याचं ओढा हे शुद्ध नाव जावून त्याला नाला हे अशुद्ध नाव प्राप्त झालं.
नाग नदीबाबत सांगायचं झाल्यास कोणी लोकं म्हणतात की आधी या भागात नागनदी अस्तित्वात आली. मग लोकं राहायला आले तर काही लोकं म्हणतात की आधी लोकं राहायला आले, मग नागनदी अस्तित्वात आली. परंतु लोकांचं तसं म्हणणं चूकच आहे. कारण नदी ही आधी अस्तित्वात आली असेल व नंतर त्या ठिकाणी लोकं राहायला आले असेल. हं, या नदीला नाव मात्र लोकांच्या अस्तित्वावरुन दिलं गेलं असेल. म्हणतात की नागपूर शहर हे गोंड राजा बख्त बुलदशहा यानं वसवलं. त्यांच्याच मुलानं आपली देवगडची राजधानी नागपूर येथे आणली व नागपूर शहर वसलं. परंतु एक सत्य बाब अशी की या भागात आधीही लोकं राहातच होते की जे नाग वंशाचे होते.
इस सातव्या शतकातील गोष्ट. त्या काळातही नागपूर शहर अस्तित्वात होतं. याचा उल्लेख वर्ध्या जवळ असलेल्या देवळीतील उत्खननावरुन दिसून येतं. तिथं काही ताम्रपत्र सापडलेली आहेत की ज्यात नागपूर नगरीचा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा की नागपूर हे आज जरी शहर झालं असलं तरी हे शहर केवळ सातवेच शतक नाही तर त्याही पुर्वीपासून अस्तित्वात होतं. याचं एकमेव कारण आहे नागनदी.
तो एक प्रवाह होता पाण्याचा, नव्हे तर झराच. महादगड टेकडीवरुन उगम पावलेला झरा. बहुतेक त्या काळात महादेवाचीच जणू या झऱ्यावर कृपा व्हावी व झऱ्याच्या स्वरुपात तिचा प्रवाह वाहावा. तसं त्या झऱ्याचं झालं व तो झरा या महादगडच्या टेकडीवरुन वाहू लागला.
तो प्रवाह वाहात होता. जिकडे जागा मिळेल, तिकडे तो वाहायला लागला होता. अशातच त्या झऱ्याला काही इतर झरेही मिळत गेले व त्या झऱ्याचं रुपांतर एका मोठ्या ओहोळात झालं. पुढे या ओहोळाला अनेक ओहोळ मिळत गेले व त्यानंतर त्याचं रुपांतर ओढ्यात झालं. पुढं याच ओढ्याला अनेक ओढे मिळत गेले व त्याची एक नदी बनली. पुढं या नदीला दोन लहान नद्या मिळाल्या व त्या नदीची एक प्रमुख नदी बनली. मग काय, त्या नद्यात प्रतिस्पर्धा तयार झाली.
असाच नदीत रुपांतरीत झालेला हा झरा. त्याला आपल्या विशालकाय अस्तित्वावर हेवा वाटायला लागला. त्याच्यात अतिशय गर्व दाटून आला व तो आपलं अस्तित्व विसरला. विसरला की आपण पुर्वी कोण होतो. हे विसरताच त्याला पुढे एक मोठी नदी मिळाली. ती एवढी मोठी होती की तिच्यासमोर नदी बनलेल्या झऱ्याचं काहीच चाललं नाही. मग काय, तिचं अस्तित्वच त्या वळणावर भेटलेल्या नदीनं लुप्त करुन टाकलं.
नदी म्हणून कोणीच ओळखत नव्हते त्या नदीला. नाही उत्कृष्ट असा दर्जा होता त्या नदीला. दर्जा होता तो एका ओढ्याचा. जी नदी उत्तूंग भरारी घेत वाहायची. तिचं पाणी शितल होतं वा ते पाणी गोडही. अमृतासारखंच होतं.
ती नदी सुरुवातीला आपल्या अस्तित्वावर हेवा करायची. त्याचं कारण तसंच होतं. त्या नदीच्या आजूबाजूचा भाग हा सुपीक होता व त्या सुपीक जागेत पीक भरपूर व्हायची.
स्वच्छ सुंदर व तेवढंच शितल जल असलेली ही नदी. तिचं अमृतासमान असलेलं पाणी प्राशन करुन गुरंढोरं तृप्त व्हायची. शिवाय पांथस्थही. कोणाला थांबावं वाटायचं क्षणभर. परंतु ते थांबत नसत. वस्तीही कुणाला कराविशी वाटत नव्हती.
ती नदी आपली नागमोडी वळणे घेत वाहायची. आपल्या शितल पाण्यानं सर्वांना तृप्त करुन जायची. त्यातच अशी वळणे घेत जातांना त्या नदीत काही हिंस्र प्राणीही पाणी पिवून जात असत. त्यात काही सापासारखे विषारी प्राणीही असायचे. मात्र त्यांना कदापिही न घाबरता काही पांथस्थ तिच्या काठावरुन चालत असतांना त्यांना जेव्हा तहान लागायची. तेव्हा ते या ओढ्याचं पाणी पीत व तृप्त होत. परंतु आतापर्यंत कोणीही या ओढ्याकाठावर वस्ती करण्याचा विचारही केला नव्हता. मात्र पावसाळ्यात नेहमीच या नदीला पूर येत असे व ही नदी तुडूंब भरुन वाहात असे. तेव्हा तिला पूर आल्यानं ते पाणी आजूबाजूला पसरत असे आणि जमीन सुपीक होत असे."

**********************************************************
तो भव्यदिव्य राजवाडा आणि त्या राजवाड्यात सती गेलेली ती महाराणी. ती महाराणी खुप गाजलेली नव्हती तर तिला तिच्या पती निधनाचं दुःख झालं होतं. परंतु ती हारली नाही. ना विचारानं ती हारली होती, ना मनानं. ना तिला कोणी आत्महत्या करायला भाग पाडलं गेलं होतं, ना तिनं आत्महत्या केली होती, तर ती सती गेली होती.
कोण होती ती महाराणी आणि ती सती का गेली होती? ती सतीप्रथा म्हणजे एक आत्महत्याच होती. तसं पाहता आत्महत्येलाचाही एक इतिहासच आहे आणि तोच प्रश्न पडला होता त्याला. तसं गणेशनं काशीबाईला त्याचं उत्तर विचारलं. परंतु ती आता मौन बाळगून होती. तसा काही वेळ अवकाश होता. अशातच परसोजीचा अमर आत्मा म्हणाला,
"पुर्वीच्या काळात पती मरण पावताच बऱ्याचशा स्रिया ह्या सती जात. याचाच अर्थ आत्महत्याच करीत असत. पती निधनानंतर येणारं वैधव्य व त्या वैधव्याच्या आधारशिलेतून लोकांचं त्रास देणं. तो असह्य असणारा त्रास सहन व्हायचा नाही."
गणेशला माहीत झाली होती काशीबाईची कहाणी. ती रघुजी भोसल्यांच्या वंशातील राणी होती व पती मरण पावताच ती सती गेली होती. तसंच तिच्याचसाठी सतीप्रथा बंद म्हणून झालेली बंदी फक्त एका दिवसासाठी का असेना,ङ उठवण्यात आली होती. कारण ती एक धार्मिक स्री होती आणि तेवढीच सत्यवानही. तेच माहीत झालं होतं गणेशला व तो विचार करु लागला होता. त्यात परसोजी आणखी भर घालत होते. परसोजी सांगत होते व गणेश लक्ष देवून ऐकत होता. तो आता विचार करु लागला होता.
"आत्महत्या........अलिकडे आत्महत्येच्या सत्राला जास्त वेग पकडत आहे. कोणीही केव्हाही कोणत्याही कारणानं आत्महत्याच करीत सुटला आहे. आत्महत्येच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आत्महत्या करणं आज स्वस्त झालं आहे. तसं पाहता आत्महत्या करणारा व्यक्ती कोणत्याच बऱ्यावाईट गोष्टीचा विचार करीत नाही.
पुर्वीच्या काळात आत्महत्या होत नव्हत्या अशा नाही. पुर्वीच्या काळातही पती मरण पावताच बऱ्याचशा स्रिया ह्या सती जात. याचाच अर्थ आत्महत्याच करीत असत. पती निधनानंतर येणारं वैधव्य व त्या वैधव्याच्या आधारशिलेतून लोकांचं त्रास देणं. तो असह्य असणारा त्रास सहन व्हायचा नाही. कारण पती निधनानंतर घरातच असणारे कुटूंबाचे सदस्य बळजबरीनं अत्याचार करीत, बलात्कार करीत आणि तो कुटूंबाचाच होणारा अत्याचार बाहेर सांगता येत नसे. शिवाय एखादी महिला, ती जर सात्वीक व खऱ्या स्वरुपात पतीव्रता असेल, तर तिला तो बलात्कार वा अत्याचार पचवणे कठीण जायचे.
कधीकधी युद्धही होत व त्या युद्धादरम्यान पती मरण पावत. त्याहीवेळेस बऱ्याच स्रिया ह्या सती जात वा सामूहीक जोहार करीत. त्याचं कारण होतं पराभव होणं. एक राजाच दुसऱ्या राजाकडून पराभव झाल्यानंतर तो राजा त्या राजाला सन्मानानं वागवेलच असं नव्हतं. तो त्याला तुरुंगात टाकत असे जर तो जिवंत असला तर आणि त्याच्या पत्नीसह त्याच्या राज्यातील कित्येक विधवांवर दररोज बलात्कार करीत असे. त्या बलात्कार यादीत केवळ राजाच नसायचा तर राजदरबारातील बरेच मंत्री असायचे की जे वारंवार अशा प्रकारचे शारिरीक कृत्य करायचे की जे असहनीय असायचे. त्यावर उपाय म्हणून एकच पर्याय असायचा. तो म्हणजे आत्महत्या करणे वा सती जाणे."
परसोजी बोलून गेले. परंतु त्यानंतर पंजाबराव देशमुखांना विचार आला. विचार आला की आज तसं नाही. घटनेच्या कलम १९ ते २२ नुसार प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे. तसा स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार लोकं स्वतंत्र विचारानं स्वतंत्र्यपणे मुक्त विहारही करीत असतांना दिसतात. आत्महत्या हा व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार नाही. तरीही काही लोकं त्यालाच व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार समजून सर्रास आत्महत्या करतांना दिसतात. त्यात त्यांना भीती वाटत नाही.
पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्रातील एक शेतकरी नेते होते. ते नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासत असत. तसा तो पंजाबरावांचा विचार. त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा होता. तसे पंजाबराव म्हणाले,
"आत्महत्याबाबत सांगतांना आज शेतकरी आत्महत्या बऱ्याच दिसतात. कारण पीक होत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं. पीक काय आजच होत नाही काय? कालही पीक होत नव्हतंच. मग काल काय लोकं आत्महत्याच करायचे? असा प्रश्न केल्यास उत्तर मिळत नाही. काल तर एवढा दुष्काळ पडायचा की विचारता सोय नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका. तशीच तंत्रज्ञान साधनं उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना सावधही व्हायची संधी मिळायची नाही. तसंच काल जमीनदारी पद्धती असल्यानं लोकं शेतात पीक लावण्यासाठी कर्ज काढायचे. ते कर्जावर कर्ज वाढायचं. ते देत असतांना पैसा पुरायचा नाही. उपासमार तर नित्य पाचवीला पुजलेलीच असायची. तरीही आत्महत्या घडायच्या नाहीत. लोकं साधी अंबाडीची भाजी उकडून खायचे. त्यांना आत्महत्या ह्या बुजगावण्यासारख्याच वाटायच्या. त्या आत्महत्येला ते बाईलवेडे म्हणायचे. शिवाय खाणारी तोंड जास्त होती, तरीही शेतकरी आत्महत्या घडत नसत. याचा अर्थ असा नव्हता की आत्महत्या होत नव्हत्या. आत्महत्या ह्या व्हायच्या फक्त आपला सन्मान अबाधीत ठेवण्यासाठी. आपली अब्रू कोणीही लुटू नये म्हणून स्रिया वेळोवेळी आत्महत्या करीत. कारण समजा एखाद्या स्रिची अब्रू लुटलीच गेली तर तिला गावात आपलं तोंड दाखवायला जागा उरायची नाही. काल पुरुष कमी आणि स्रियाच जास्त आत्महत्या करायच्या. कधी तिचा पती मरण पावल्यानंतर आपली आपल्या पतीनिधनानंतर कोणीही अब्रू लुटू नये यासाठी, तर कधी परकीय राजेरजवाड्याच्या बलात्काराचे शिकार होवू नये या गोष्टीच्या सन्मानासाठी. यात राणी पद्यावती व महाराणी संयोजितांचे सामूहीक जोहार इतिहासात प्रसिद्ध आहेत.
अलिकडील काळात आत्महत्येचे स्वरुप बदलले आहे. आज महिला नाही तर पुरुष मोठ्या संख्येनं आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्येत जास्तीत जास्त पुरुष शेतकऱ्यांच्याच आत्महत्या घडलेल्या आहेत. तरीही आज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागलेला आहे. आता हवामानाचा अंदाजही घेता येतो. आज मुलंही जास्त नसतात. कुटूंब नियोजनातून घरातील सदस्यांचीही संख्या कमी झालेली आहे. सरकारी कर्ज सुविधा आहे. आज ना कुणाला अंबाडीची भाजी खावी लागत मजबुरीनं, ना कोणी कुकसाच्या कण्या खात. कारण आज मजबुरी कोसो दूरच गेली आहे. तरीही आज शेतकरी आत्महत्या घडत असलेल्या दिसतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये. कारण आज पुर्वीसारखी वेळ राहिलेली नाही व पुर्वीसारखी मजबुरीही राहिलेली नाही की शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल. आज शेतकऱ्यांनी आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी. हवामानाचा अंदाज घेवून आपल्या पिकांची पेरणी करावी व तेवढीच काढणीही. बाजारामध्ये काय चालते, काय नाही हे माहीत करुन पिकांची आखणी करावी. शिवाय तशी परिस्थिती उद्भवलीच तर विचलीत होवून जावू नये. आत्महत्या तर करुच नये. निर्माण झालेल्या त्या विपरीत परिस्थितीवर शांत राहून विचार करावा. शिवाय असा विचार करुनच शेतीविषयक ध्येयधोरणं ठरवावीत. जेणेकरुन आत्महत्येचे प्रसंग उद्भवणार नाहीत व तोडगा निघेल यात शंका नाही."
पंजाबराव देशमुखांचं बोलणं संपलं होतं. परंतु त्यावर त्या लहानग्या वयातही गणेश विचारमंथन करीत होता. सतीप्रथा बंदीची गोष्ट. ती माहीत होताच प्रत्यक्ष काशीबाईसाठी बंदी उठवून तिला सती जाण्यास परवानगी देणं हे गणेशला मनाशी पटत नव्हतं. परंतु ते सत्य होतं व ते सत्य त्याला स्विकारणं भाग होतं व ते त्यानं स्विकारलंही होतं. शिवाय त्याही घटनेची तो इत्यंभूत माहिती करुन घेत होताच. अशातच त्याला आणखी एक माहिती मिळाली. ती म्हणजे भोसले घराण्यातील राजघाट व ते प्रेताची विल्हेवाट कशी लावतात याच्या गोष्टी. अशातच त्याच्यासमोर रघुजी तृतीय येवून उभे राहिले. म्हणाले,
"मी असं ऐकलं आहे की सतीची चाल बंद झाल्यानंतर केवळ ज्यांच्यासाठी ही बंदी उठवून सती जाण्याची परवानगी देण्यात आली, त्या म्हणजे नागपूरच्या काशीबाई राणीसाहेब. जुनी शुक्रवारी भागात काशीबाईंची समाधी आहे. काही लोक त्याला काशीबाईचे देऊळ किंवा काशीबाई टेम्पल म्हणतात. नाग नदीच्या काठावर १४ फेब्रुवारी १७४४ रोजी या राजघाटची निर्मिती केली होती. भोसले घराण्यातील सर्व अंत्यसंस्कार आजही याच घाटावर होतात. पहिले रघुजी महाराज भोसले यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी घाट म्हणून खास नाग नदीच्या काठावरची ही जागा निवडण्यात आली. त्याकाळी हा घाट १२ ते १८ एकर परिसरात होता. नंतरच्या काळात तेथे अतिक्रमण झाले व आता तो चार ते पाच एकर जागेत आहे. दुसरे रघुजी महाराज, बाकाबाई, खंडोजी महाराज यांच्या समाधी याच ठिकाणी आहेत. फक्त दुसरे मुधोजी म्हणजे आप्पासाहेब महाराज भोसले यांची समाधी येथे नाही. कारण त्यांचे निधन उदयपूरला झाले व त्यांच्यावर अंत्यसंस्कारही तिकडेच झाले. दुसऱ्या रघुजी राजांचे चिरंजीव परसोजी महाराज यांच्या काशीबाई या पत्नी. पहिल्या रघुजी महाराजांना सात राण्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्या सातही राण्या याच घाटावर सती गेल्या होत्या. त्यानंतर ही सती जाण्याची परंपरा घाटावर सुरूच होती. परसोजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यावेळी नुकतीच ब्रिटिश सरकारने सतीप्रथेवर बंदी घातली होती. काशीबाई या अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. परसोजी महाराजांच्या पार्थिवासह सती जाण्याचा त्यांचा हट्ट होता. शेवटी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून विशेष परवानगी काढण्यात आली व सतीप्रथेवरील बंदी तात्पुरती उठविण्यात आली. काशीबाई सती गेल्यानंतर ही बंदी पूर्ववत झाली. त्यामुळे काशीबाई या नागपुरातील अखेरच्या सती ठरल्या. १ फेब्रुवारी १८१७ रोजी त्या सती गेल्या. त्यांच्या सती जाण्याचा प्रसंग ब्रिटिश राजवटीत घडला होता. त्यामुळे ब्रिटिशांनी या परिसराला काशीबाई टेम्पल हे नाव दिले व तेच नाव आजही कायम आहे. या घाटाच्या बाजूला सफाई कामगारांची वसाहत अहे. काशीबाई हे त्यांचे कुलदैवत असल्याचे ते मानतात. त्यामुळे त्या समाजात नवीन लग्न झाले की वर-वधू काशीबाईंच्या समाधीचे दर्शन घेतात.
राजघराण्यातील कोणाही व्यक्तीचा मृत्यू झल्यास त्याच्या पार्थिवाला विशिष्ट पद्धतीने समाधीस्थळी आणण्यात येते. त्यासाठी एक पालखी तयार करण्यात आली आहे. इतरवेळी ही पालखी राजघाटावरच असते. कुणाचा मृत्यू झाल्यास ते प्रेत राजवाड्यावर आणली जातात. तत्पूर्वी आज जिथे कल्याणेश्वर मंदिर आहे, तेथे आणून सजविली जातात. पूर्वी हा राजवाड्याचा कल्याण दरवाजा होता. बॅण्ड, उंट, घोडे, भालदार, चोपदार असा सर्व लवाजमा अंत्ययात्रेत सहभागी होत असतो. राजवाड्यातील प्रेताला अखेरचा सन्मान देण्याची ही पद्धत असते. ही अंत्ययात्रा कल्याणेश्वर दरवाजा, लहान वाडा, दसरा रोड, भुत्या दरवाजा या मार्गाने काशीबाई देऊळ भागात मागच्या दाराने जाते. एरवी मागचे दार बंद असते. अंत्यसंस्कारानंतरचे सर्व विधीही याच ठिकाणी होतात. शहरातील शेवटच्या सतीचे हे स्मृतिस्थळ म्हणजे नागपुरातील एक ऐतिहासिक ठेवा आहे. तिचं नाव आहे काशीबाई. काशीबाई ही रघुजी राजे द्वितीय यांची सुनबाईच आहे."
गणेशला जसजशी माहिती सुचत होती नागपूरच्या ऐतिहासिक वारसाबद्दलची. त्याचबरोबर तो संपूर्ण इतिहास शोधायचा प्रयत्न करीत होता. एकदा असाच त्याला प्रश्न पडला. तो प्रश्न होता शिवरायांच्या काळातील. त्याला वाटलं की शिवरायांचे आडनाव जर भोसलेच आहे आणि रघूजीचे आडनावही भोसलेच आहे तर शिवराय व रघुजी हे एकमेकांचे नातेवाईक नक्कीच असतील. त्याचाही गणेशनं शोध घेतला व कळलं की शिवराय व रघुजी हे एकमेकांचे नातेवाईक नव्हते. फक्त आडनाव एक होते. शिवाय शिवरायांच्या चाकरीत रघुजी भोसलेचे वंशज होते. त्याच्या वंशजांना शिवरायांच्या वडीलानं सांभाळलं होतं. गणेशला जशी शिवराय रघुजीचे नातेवाईक नाही ही माहिती मिळाली. तसं त्यानं ठरवलं की आपण आता शिवरायांचा व रघुजीचाच इतिहास हुडकून काढायचा. जेणेकरुन ती माहिती जनतेपर्यंत आपल्याला नेता येईल. याचाच ध्यास होता त्याच्या मनात. त्याच ध्यासाने पछाडले होते त्याला व आता तो तीच माहिती शोधत होता. तोच शिवाजी महाराज तिथं उपस्थीत झाले. सांगू लागले.
"सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती मला नाही. माझ्या राज्याभिषेकापासून म्हणजेच सन १६७४ पासून भोसले घराण्याचा उदयपूरच्या शिसोदिया राजपूत कुळाशी संबंध जोडण्यात आला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात जेव्हा वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले. असा इतिहास बखरीमध्ये मांडण्यात आला असला तरी शिसोदिया व भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा अजुनही प्रत्यक्षात उपलब्ध नाही.
मराठ्यांबद्दल लिहिलेल्या काही बखरीनुसार आमच्या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्यांचे दोन मुलं म्हणजे मालोजी व विठोजी. मालोजी सन १६०७ ला मरण पावले. विठोजी हे वेरुळ व घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपेची जहागिरी मालोजीकडे होती. मालोजीस दोन मुलं होती. शहाजी व शरीफजी. शहाजीची कारकिर्द सन १६०२ ते १६६४ आणि शरीफजीची कारकिर्द ॽ ते १६२४. त्यांपैकी माझे वडील हे प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास आला.
माझे वडील जेव्हा सर्वप्रथम आदिलशाहाच्या चाकरीत लागले. तेव्हा आदिलशाहाने त्यांची नेमणूक कर्नाटकात केली. त्यांनी बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्यांचे उर्वरीत आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, परंतु मोठ्या वैभवात गेले. राधामाधवविलासचंपू या समकालीन काव्यग्रंथावरून माझ्या वडीलांच्या योग्यतेची कल्पना येते.
माझे वडील म्हणजे शहाजीराजास तीन पत्नी होत्या. पहिली माझी आई जिजाबाई. जी सिंदखेडकर लखुजी जाधव यांची कन्या होती. त्यानंतर तुकाबाई आणि नरसाबाई अशा तीन भार्या होत्या. पहिला संभाजी आणि शिवाजी हे जिजाबाईचे दोन मुलं होते आणि तुकाबाईचा व्यंकोजी ऊर्फ एकोजी हा मुलगा होता. जो पुढे जावून तंजावर राज्याचा संस्थापक बनला. या तिघांनी पुढे इतिहासात आपले नाव कमावले.
शहाजीचा थोरला मुलगा म्हणजे माझा भाऊ पहिला संभाजी कर्नाटकात माझ्याच वडीलाजवळ म्हणजे शहाजीजवळ राहात असे. कनकगिरीच्या लढाईत तो सन १६५४ मध्ये वयाच्या पस्तीशीतच वारला. त्यानंतर एकोजी उर्फ व्यंकोजीने शहाजीनंतर तंजावर येथे नवी गादी स्थापन केली. तद्नंतर माझ्या वडीलाने मला सन १६४१ मध्ये जिजाबाई समवेत पुणे व सुपे ही आपली जहागीर संभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमचे पाठवून दिले. माझ्या दिमतीला दादोजी कोंडदेवसारखे इतर अनुभवी व हुशार कारभारी दिले. त्या मातब्बर सरदारांच्यामुळेच माझ्या स्वतंत्र कर्तृत्वास वाव मिळाला. त्यांच्या साहाय्याने वयाच्या बाराव्या वर्षांपासून मी जहागिरीचा कारभार पाहू लागलो. त्या निमित्ताने पुढे संधीचा लाभ घेत पुण्याच्या आसपासचे मोक्याचे किल्ले मी ताब्यात घेतले. त्यातच पहिला किल्ला जिंकला, तो म्हणजे तोरणागड. ज्याला पुढे प्रचंडगड हे नाव दिलं गेलं. शिवाय त्याचवेळेस संघटना करून मावळ्यांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध बंडच पुकारले. यातून मराठ्यांना स्वराज्य स्थापन करण्याची कल्पना सुचली. पुढे प्रसंगानुसार आदिलशाह व मोगल यांच्याशी राजकारण व प्रसंगोपात्त युद्ध करुन आम्ही स्वराज्याची कल्पना स्वतःचा राज्याभिषेक सन ६ जून १६७४ ला करवून जाहीरपणे सिद्ध केली आणि छत्रपतीपद धारण केले. त्यानंतर शिवराई व होन ही नवी नाणी सुरु केली. शिवाय अष्टप्रधान पद्धती स्थापिली. नवे पंचांग केले आणि राज्यव्यवहारकोश बनवून शासनातील फारसी शब्दांचे उच्चाटन केले. महत्वाचं सांगायचं झाल्यास देवगिरीच्या यादवांच्या पतनानंतर जवळपास तिनशे छप्पन वर्षांनी मराठ्यांचे स्वतंत्र्य राज्य स्थापन झाले. स्वराज्याबरोबर धर्मस्वातंत्र्य प्राप्त होऊन मुसलमानी राजवटीत हिंदूंचे खचलेले नीतीधैर्य त्यांना पुन्हा मिळाले. त्यामुळंच की काय, आज भोसले कुळाचे नाव माझ्यामुळे व या मावळ्यामुळे इतिहासात अजरामर झाले आहे."
शिवाजीचं बोलणं पुर्ण होत नाही, तोच शहाजी महाराजांचा अमर आत्मा म्हणाला,
"छत्रपती शिवाजीच्या आकस्मिक मृत्यूनंतर काही काळ अस्थिरता निर्माण झाली. पण नंतर रायगडावर युवराज संभाजी छत्रपतीने राज्याभिषेक करवून घेतला आणि १६८० मध्ये छत्रपतीची सूत्रे धारण केली. सुमारे नऊ वर्षें मोगल बादशाहा औरंगजेब, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी झुंज देऊन त्याने स्वराज्य टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण दुर्दैवाने दक्षीण कोकणात तो मुगल फौजेच्या हाती सापडला. त्यानंतर औरंगजेबाने त्याचा सन १७८९ मध्ये अतिशय क्रूरपणे वध केला. औरंगजेबाच्या रायगड वेढ्याच्या प्रसंगी संभाजीची राणी येसूबाई आणि अल्पवयीन पुत्र शिवाजी ऊर्फ शाहू यांना मुगलांनी पकडून आपल्या सोबत नजरकैदेत ठेवले. त्यानंतर संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम आपल्या कुटूंबियांसह विश्वासू सैनिकांबरोबर पन्हाळ्यामार्गे जिंजीकडे निसटून गेला. तिथे आठ ते नऊ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वराज्याची गादी राखली. संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांसारख्या रणशूरांनी गनिमी काव्याने मुगल फौजेस सळो की पळो करून सोडले. तथापि शत्रूचे पाशवी बळ ओळखून राजाराम शिताफीने महाराष्ट्रात निसटून आला व कारभार पाहू लागला. पण इथेही दुर्दैवाने त्याला घेरले व थोड्याशा आजारानंतर तो सन १७०० मध्ये सिंहगडावर अकाली निधन पावला.
राजारामानंतर त्याची राणी ताराबाईने आपल्या अल्पवयीन मुलास म्हणजे दुसऱ्या शिवाजीस पन्हाळ्यास गादीवर बसवले व ती स्वतः हिंमतीने कारभार पाहू लागली. औरंगजेब बादशाह या काळात मराठ्यांच्या राज्यात ठाण मांडून बसला होता. त्याने आज सर केलेला किल्ला मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी परत घ्यावा, हा क्रम सतत चालू होता. ताराबाई शर्थीने प्रतिकार करुन स्वराज्याचा लढा लढवीत होती. तिनं भद्रकाली हे तिचं नामाभिधान सार्थ ठरवले होते. वृद्ध औरंगजेब अखेर १७०७ मध्ये खुलदाबादेस मृत्यू पावला. त्यानंतर त्याच्या पुत्रांत बादशाहीच्या तख्तासाठी युद्धे झाली आणि मुगल सत्तेचा दरारा झपाट्याने ओसरू लागला. राणी येसूबाई आणि शाहू मोगलांच्या नजरकैदेत होते. आझमशाह याने दिल्लीच्या मार्गावर असतांना सन १७०७ मध्ये शाहूची सुटका केली.
शाहूच्या स्वराज्यातील आगमनामुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. जुने अनेक मातब्बर सरदार आणि मुत्सद्दी शाहूला मिळाले. त्यांच्या पाठबळावर शाहू अहमदनगरमार्गे सातारला येत असता, भीमेकाठी खेड येथे सन १७०७ मध्ये त्याची काकी ताराबाई त्याच्या विरोधात उभी राहिली. आपला नवरा राजाराम व आपण स्वतः लढून स्वराज्य टिकविले, त्यावर शाहू हक्क सांगू लागला. म्हणून तिने त्याला तोतया ठरविले व आपला मुलगा राज्याचा खरा वारस असल्याचे जाहीर केले. सामोपचाराने हा गृहकलह मिटेना, तेव्हा उभयपक्षी खेड येथे लढाई झाली व त्यामध्ये ताराबाईच्या फौजेचा पराभव झाला. यानंतर शाहू साताऱ्यास आला व त्याने छत्रपती म्हणून सन १७०८ च्या जानेवारी महिन्यात राज्याभिषेक करवून घेतला. त्या वेळी ताराबाईने पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. सन १७१२ मध्ये तिचा मुलगा शिवाजी वारला. तिची सवत, राजारामाची दुसरी बायको राजसबाई हिने आपला मुलगा तिसरा संभाजी यास कोल्हापूरच्या गादीवर बसवले. त्यानंतर ताराबाईची सत्ता संपुष्टात येऊन छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.
शाहू मोगली छावणीत सोळा ते सतरा वर्षे राहून आल्यामुळे त्याला राज्यकारभाराचा अनुभव नव्हता. पराक्रमाची ईर्षाही त्याच्या अंगी नव्हती. त्याचा स्वभाव ऐषारामी, नेमस्त, धार्मिक आणि प्रसंग निभावून न्यायचा असाच होता. त्याला तत्वज्ञान शिकवलं होतं औरंगजेबाच्या कैदेत. मराठेशाही कशी बुडेल याचा विचार करुन औरंगजेबानं छत्रपती शाहूंना त्याबद्दलच सांगीतलं होतं. मनुष्यस्वभावाची पारख मात्र त्याला उत्तम होती. बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या प्रयत्नामुळे पातशाहीकडून त्याला स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळाले असले, तरी त्या हक्कांची अंमलबजावणी करताना आरंभीच्या काळात त्याला अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले. आपल्या मर्यादा तो जाणून असल्यामुळे अनेक गुणी व पराक्रमी माणसे त्याने आपलीशी केली आणि सुमारे चाळीस वर्ष सातारच्या गादीचे ऐश्वर्य व दरारा सर्वत्र वाढवला. या कामी बाळाजी विश्वनाथ आणि त्याचा पराक्रमी पुत्र पहिला बाजीराव हे दोन पहिले पेशवे, चिमाजीआप्पा, प्रतिनिधी, फत्तेसिंग भोसले, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, रघूजी भोसले, दाभाडे पितापुत्र आणि पेशव्यांच्या हाताखाली तयार झालेले पिलाजी जाधव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पवार बंधू इत्यादी अनेक कर्तृत्ववान मराठे सरदारांनी निष्ठायुक्त सेवा करुन त्याचे राज्य विस्तारीत करुन वैभवास नेले. या सर्वांच्या पराक्रमामुळे मुगल, निजाम, पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज हे मराठ्यांचे शत्रू निष्प्रभ झाले. शाहूच्या मोगल साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे धोरण नांदा व नांदू द्या, या स्वरूपाचे होते. स्वतःचे अंगी कर्तबगारी नसली तरी शहाणपणाने पेशवा, प्रतिनिधी इत्यादींवर भिस्त ठेवून सर्वांच्या कर्तृत्वास तो संधी देत असे. पण या धोरणामुळे त्याच्या दरबारात एकवाक्यता व एकजूट राहिली नाही. पेशव्यांनी सर्वाना कर्तबगार केले व प्रायः तेच राज्याचे पुढील काळात खरे सूत्रधार झाले. छत्रपती शाहू हे सन १७४९ मध्ये मरण पावले. परंतु ते मरण पावतपर्यंत त्यांना मुलं नव्हती. त्यानंतर दत्तकपुत्र रामराजा ताराबाईचा मुहबोला नातू राज्यावर आला. पण रामराजापासून छत्रपतीपदाचे महत्त्व कमी होऊन सत्तेचे केंद्र पुण्यास गेले व खरे सत्ताधारी पेशवे बनले. त्यांचे महत्व वाढले व ते वाढविण्याला कारणीभूत ठरले छत्रपती शाहू महाराज.
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्याने सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या दत्तकाच्या मार्गाने एक करण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण या गोष्टीस खुद्द शाहूनेच विरोध केला होता. संभाजीचे नाव पुढे येताच ताराबाईने आपल्या नातावास शाहूच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिले. त्यामुळे नानासाहेबाची योजना फसली. शाहूनंतर राज्य छत्रपतींचे, पण सत्ता पुण्याचे पेशवे व त्यांच्या मुत्सद्यांच्या हाती, अशी पेशवाईची अखेरपर्यंत स्थिती होती. पेशवाई संपुष्टात आणल्यानंतर इंग्रजांनी सातारच्या प्रतापसिंह भोसल्यास अभय देऊन गादीवर बसविले व आरंभी ग्रँट डफसारख्या प्रशासकास नेमून एकूण मराठी राज्याची घडी नीट बसवण्यास आरंभ केला. ग्रँट डफचा मराठ्यांचा इतिहासविषयक महत्त्वाचा ग्रंथ त्याच्याच कारकीदींत लिहिला गेला. ग्रँट डफच्या शिकवणुकीने प्रतापसिंह कारभारात लक्ष घालू लागला. कालांतराने आपण इंग्रजांचे मांडलिक नसून स्वतंत्र राज्याधिकारी आहोत, अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनी बळावू लागली. इंग्रजांना ही गोष्ट खपली नाही. प्रतापसिंहावर बंडखोरीचा आरोप ठेवून त्यांनी त्याला पदच्युत केले व काशीला नजरकैदेत ठेवले. प्रतापसिंहानंतर त्याचा भाऊ शहाजी ऊर्फ आप्पासाहेब गादीवर आला. पण वर्षभरात तो मृत्यू पावला. भोसले घराण्यात औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी सातारा संस्थान सन १८४८ च्या मे महिन्यात खालसा केले.
सातारा संस्थान हे कोल्हापुरच्या भोसले घराण्याचे कट्टर वैरीच होते. छत्रपती संभाजी तृतीय राजसबाईचा मुलगा होता. राजसबाईनं आपला मुलगा छत्रपती संभाजीच्या कर्तबगारीने ताराबाईच्या सैन्याचा सन १७१३ मध्ये पाडाव केला होता. त्यामुळं तिचं महत्व कमी झालं होतं व तो राग तिच्या मनात खदखदत होता.
कोल्हापूरचे भोसले घराणे खऱ्या अर्थाने स्थिरप्रद झाले, ते राजारामाची द्वितीय पत्नी राजसबाई हिचा पुत्र संभाजी याच्यामुळे. ताराबाईचा पुत्र शिवाजी सन १७१२ मध्ये वारला. राजारामाची दुसरी पत्नी राजसबाई हिने आपल्या पुत्रास तृतीय संभाजीस सन १७१४ मध्ये कोल्हापूरच्या गादीवर बसवले. हा संभाजी मोठा महत्त्वाकांक्षी व हिकमती होता. शाहूच्या शत्रूंशी त्याने अनेक वेळा हातमिळवणी केली. अखेर दोघा बंधूंत वारणाकाठी सन १७३० मध्ये लढाई झाली व त्यात संभाजीचा पराभव झाला. वर्षभराने सन १७३१ मधील एप्रिल महिन्यात कराड येथे उभयतांत वाटाघाटी होऊन वारणेचा तह झाला व दोन्ही राज्यांच्या सीमा ठरवून काही वर्षतरी गृहकलह थांबला. छत्रपती संभाजीची कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे पंचेचाळीस वर्षांची झाली. आपले राज्य राखण्यासाठी त्याला सातारकर छत्रपतींच्या पेशव्यांशी अनेकदा संघर्ष करावे लागले. निजाम, हैदर अली, राघोबादादा या पेशव्यांच्या शत्रूंशी कोल्हापूरकरांनी प्रसंगी हातमिळवणीही केली.
पेशव्यांच्या दक्षिणेतील सरंजामदारांशी कोल्हापूर छत्रपतीशी सतत संघर्ष झाले. पण या संघर्षातून कोल्हापूरची गादी शाबूत राहिली. याचे श्रेय संभाजी आणि शिवाजी या दुसऱ्या व तिसऱ्या छत्रपतींना आहे. पेशवाईची इतिश्री झाल्यानंतर कोल्हापूरचे राज्य इंग्रजांच्या कृपेवर टिकून राहिले. १८५७ च्या उठावाच्या प्रसंगी कोल्हापुरात प्रायः शांतता नांदल्याने राज्य वाचले. संभाजीनंतर सन १७६० मध्ये छत्रपती शिवरायांचा औरस वंश खुंटला व पुढे दत्तकाची परंपरा सुरु झाली. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती म्हणजे राजर्षी शाहू महाराज. त्यांची कारकीर्द सन १८८४ ते १९२२ अशी होती. त्यांच्या कारकीर्दीत शैक्षणिक आणि सामाजीक बाबतींत कोल्हापूर संस्थानाने ज्या अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या, त्यामुळे भोसले घराण्याची प्रतिष्ठा खूप उंचावली. कोल्हापुरात मल्लविद्या आणि संगीतकला जोपासली गेली, तिही शाहू महाराजांच्या कारकीर्दीतच. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १ मार्च १९४९ रोजी कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांतात विलीन झाले. त्यावेळेस शहाजी महाराज दत्तक देवास घराणे, हे बारावे छत्रपती त्या वेळी गादीवर होते.
तंजावरचाही इतिहास असाच आहे. छत्रपती शिवाजींचा सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी याने तंजावरच्या नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करुन १६७५ मध्ये हे राज्य मिळवले. आदिलशाहीच्या अंकीत असलेले हे राज्य होते. शिवाजींच्या कर्नाटकावरील मोहिमेत एकोजीने मैत्रीऐवजी शत्रुत्वाची भूमिका घेतल्यामुळे त्याला शिवाजींविरुद्ध पराभूत होऊन पळून जावे लागले. तथापि शिवाजींनी उदार मनाने त्याचे राज्य अबाधित ठेवले. एकोजीच्या मृत्यूनंतर सन १६८४ मध्ये दुसरे शहाजी, दुसरे शरीफजी व दुसरे तुकोजी या तिघा भावांनी एकामागोमाग १७३६ पर्यंत राज्य केले, तुकोजीनंतर त्याचा पुत्र दुसरा एकोजी उर्फ बाबासाहेब गादीवर आला. पण तो वर्षभरातच मृत्यू पावला. पुढे तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह सन १७३९ मध्ये गादीवर आला व त्याने इंग्रजांशी सख्यत्व जोडून १७६३ पर्यंत सुमारे पंचवीस वर्षे राज्य केले. तुळजाजी हा त्याचा पुत्र. याची कारकीर्द भ्रष्टाचार, अनागोंदी, इंग्रजांचा चंचुप्रवेश, हैदरची स्वारी इत्यादी कारणांमुळे खिळखिळी झाली. अगतिक होऊन अखेर त्याने इंग्रजांकडे कारभार सोपविला आणि त्यांचे मांडलिकत्व पत्करले. त्यानंतर तुळजाजीनंतर दुसरा सरफोजी हा अल्पवयीन दत्तक पुत्र गादीवर आला. तो सज्ञान होईपर्यंत त्याच्या सावत्र काकाने म्हणजेच अमरसिंह याने कारभार पाहिला. त्यानंतर सरफोजीने पस्तीस वर्षे म्हणजेच सन १८३२ पर्यंत इंग्रजांच्या कृपेने राज्य केले. साहित्य, संगीत, नृत्य, वैद्यक, चित्र इत्यादी शास्त्रकलांचा तो भोक्ता असल्यामुळे त्याची कारकीर्द सांस्कृतीक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरली. जिर्णोद्धारीत बृहदीश्वर मंदिरातील भोसले वंशविषयक शिलालेख सन १८०३ मध्ये त्याच्याच कारकीर्दीत कोरल्या गेला. इंग्रजांनी त्याला राजा हा किताब देवून त्याचे अधिकार जवळजवळ संपुष्टात आणले होते. त्याच्या नंतर राजा शिवाजी १८३३ ते १८५५ पर्यंत गादीवर होता. पण प्रत्यक्षात कारभार पूर्णपणे इंग्रजांच्या हाती गेला. शिवाजी निपुत्रिक वारल्यामुळे १८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावर संस्थान खालसा केले. तंजावरचे बहुतेक राजे कलाभिज्ञ होते. चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य आणि ग्रंथनिर्मिती यांना त्या घराण्याचा मोठा आश्रय होता. तंजावरचा मराठा दरबार हॉल आणि अनेक भाषांतील हस्तलिखितांनी समृद्ध असे सरस्वती महाल ग्रंथालय या दोन वास्तू म्हणजे तंजावर भोसले घराण्याची मौलिक स्मारके आहेत. मराठी भाषेप्रमाणे तामिळ, तेलुगू आणि संस्कृत भाषांनाही या घराण्याचा चांगला आश्रय लाभला."
शिवाजीची माहिती शोधणारा गणेश. त्यानं शिवरायांची माहिती शोधली. त्यासाठी त्यानं विविध संदर्भग्रंथांचा वापर केला होता. काही जणलोकांचाही विचार घेतला होता. त्यानुसार त्याला शहाजी, शिवाजी, संभाजी, व्यंकोजी, राजाराम, ताराबाई, छत्रपती शाहू, पेशवे, रामराजे, संभाजी द्वितीय, तृतीय व शिवाजी तृतीय या सर्वांचीच इत्यंभूत माहीती मिळालेली होती. तशी पुन्हा त्याच्या माहितीत भर प्रत्यक्ष शहाजीच्या आत्म्यानं टाकली होती. मात्र अद्यापही त्याला रघूजीचीच माहिती मिळालेली नव्हती. ना त्याबद्दल पाहिजे त्या प्रमाणात संदर्भ ग्रंथही उपलब्ध नव्हते. अशातच त्यानं एकदा काशीबाईच्या देवळाला भेट दिली. त्याचबरोबर त्याला त्या देवळाजवळ आढळल्या त्या सर्वच भोसले राजांच्या समाध्या. ज्याचं बांधकाम हे कोरीव शिल्पाचं होतं. बांधकाम काहीसं पडलेलं होतं. दगडही घसरले होते. मात्र काही समाध्या आजही शाबूत होत्या आणि एकेठिकाणी मोठ्या आकारात फलक होता व त्या फलकावर संपुर्ण शिवाजीपासून तर शेवटचा भोसलेकालीन वंशज असलेल्या फत्तेसिंग व मुधोजीपर्य॔तचा वंशविस्तार होता. त्यानंतर त्यानं तेथीलच काही उपस्थित असलेल्या वयोवृद्ध लोकांना त्याबद्दल विचारलं व रघुजीची माहिती मिळायला मार्ग मोकळा झाला.
तो एक चमत्कारच होता की एकापाठोपाठ एक माहिती एखाद्या चित्रपटासारखी बाहेर येत होती. ती म्हातारी मंडळी बोलत होती आपल्यासोबत घडलेले एकेक किस्से सांगत होती. वाटत होतं की जणू ती वयोवृद्ध मंडळी स्वतः येवून आपलीच माहिती सांगत आहेत की काय?
गणेश रघुजीकालीन वंशजांची माहिती गोळा करायला गेला होता. तो एक सर्वेक्षकाची भुमिका पार पाडत होता. तसं ते म्हातारं मंडळ तिथं रोजच फिरायला येत असतं असं म्हणत होतं.
गणेश आता रोजच जात असे त्या काशीबाईच्या देवळात आणि रोजच त्या ठिकाणी दोनचार म्हाताऱ्यांची भेट घेत असे व त्यांच्याशी चर्चा करीत असे. त्या चर्चेत त्याचा वेळ कसा जात असे. तेही त्याला कळत नव्हतं. तशा त्याच्या शाळेला बुट्ट्याही होवू लागल्या होत्या. परंतु त्याची त्याला तमा नव्हतीच. कारण तो जे ज्ञान शिकत होता त्या पवित्र आत्म्यांकडून. जे त्याला कधीच शाळेत शिकायला मिळालं नसतं. आता त्याला रघुजी महाराजांचा इतिहास माहीत करुन घ्यायचा होता. तसा प्रश्न त्यानं विचारला. तोच रघुजी तृतीय म्हणाले,
"महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे म्हणजेच नागपूरकर रघुजी भोसले घराणे. यांच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती मला माहीत नाही. हे राजे स्वतःला उदयपूरच्या राजपूत राज्यांचे वंशज म्हणवीत. मुसलमानांचे दिल्लीस वर्चस्व वाढले, तेव्हा हे दक्षिणेकडे आले. हे प्रथम अहमदनगरच्या निजामशाहीत नोकरीस लागले. त्यांना अमरावती व भाम ही गावे इनामात मिळालेली होती. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष मुधोजी व त्याचा भाऊ रूपाजी. यांनी सध्याच्या पुणे जिल्ह्यातील हिंगणी येथील पाटीलकी खरेदी केली. म्हणून त्यांना हिंगणीकर या नावानेही संबोधीत. हे दोघे बंधू पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली फौजेत होते. मुधोजीस सात मुले होती, तर रूपाजीस संतती नव्हती. सात मुलांपैकी परसोजी व साबाजी हे पुढे शिवाजीच्या चाकरीत आले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीस गादी मिळू नये, म्हणून झालेल्या कटात परसोजीचा हात होता. पण संभाजी यशस्वी होताच तो खानदेशात पळाला. पुढे राजारामाच्या कारकीर्दीत रूपाजी व पुतण्या परसोजी यांनी स्वराज्याला वाचविण्यासाठी राजारामाला विविध स्वरुपाची मदत केली आणि गोंडवन व वऱ्हाड प्रांतात अंमल बसविला. त्याबद्दल राजारामाने जरीपटका व सेनासाहेबसुभा हा किताब देवून परसोजीचा सन्मान केला होता आणि गोंडवन, देवगढ, चांदा व वऱ्हाड हे प्रदेश त्याच्या अखत्यारीखाली दिले होते. ती घटना सन १६९९ मध्ये घडली होती. नागपूरकर भोसले घराण्यातील छत्रपतींची सनद मिळालेला हा पहिला पुरुष. परसोजीकडे वऱ्हाडातील चौथाई व सरदेशमुखी गोळा करण्याचे कामही सोपविण्यात आले होते. त्यानंतर शाहूची सन १७०७ मध्ये मुगलांच्या कैदेतून सुटका झाली, तेव्हा परसोजी आपल्या फौजेनिशी त्यास मिळाला आणि हा शाहू तोतया नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या ताटात जेवला. त्याच वर्षी शाहूने त्यास सेनासाहेबसुभा ह्या पदाची सनद दिली आणि सहा जिल्ह्यामधील १४७ महालांचा मोकासा वंशपरंपरागत सुरु केला. मात्र परसोजी वऱ्हाडात जात असतांना सन १७०९ मध्ये खेड येथे मरण पावले. त्यानंतर त्यांची पत्नी काशीबाई सती गेली.
परसोजीनंतर त्यांचा मुलगा कान्होजी यास शाहूने सेनासाहेबसुभा हा किताब व गोंडवन तसेच वऱ्हाडची चौथाई व सरदेशमुखी जमा करण्याचे सर्व अधिकार दिले. त्याने भाम हे आपल्या राहण्याचे प्रमुख ठिकाण बनवले. कान्होजीने निजामाविरुद्ध बाळापूरच्या लढाईत पहिल्या बाजीरावास मदत केली. परंतु त्यात मराठ्यांचा सन १७२० मध्ये पराभव झाला. पुढे १७२४ मध्ये मुबारिजखान व निजाम लढाईत कोणासही मदत न करण्याची सूचना देवून शाहूने त्या लढाईवर कान्होजीस धाडले. कान्होजीला माळव्याचा प्रदेश हवा होता. पण पहिल्या बाजीरावाने त्यास जरब देवून दूर ठेवले. सुमारे अठरा वर्षे त्याने वऱ्हाडचा कारभार चोख ठेवून शाहूजी मर्जी संपादिली. परंतु पुढे कान्होजी चौथाई व सरदेशमुखी मध्यवर्ती खजिन्यात वेळेवर भरेना व शाहूशी उद्दामपणे वागू लागला. त्यामुळंच त्याच्या पुतण्याचे पहिला रघूजी कारकीर्द १७३१ ते १७५५ व कान्होजी यांत वैमनस्य निर्माण झाले. तेव्हा कान्होजी सन १७२८ मध्ये निजामाकडे आश्रयास गेला. परंतु निजामाने त्यास आश्रय दिला नाही. त्यानंतर शाहूनेही त्याचे सेनासाहेबसुभा हे पद रद्द केले आणि रघूजीस देऊरगाव म्हणजे आताचे विद्यमान कोरगाव तालुका इनाम देवून सन १७२८ मध्ये त्याच्यावर पाठविले. यामुळे भोसल्यांना पुढे देऊरकर भोसले हे नाव प्राप्त झाले. शाहूने याशिवाय रघूजीस सेनासाहेबसुभा हे पद व वऱ्हाड आणि गोंडवन येथील चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार दिले. याबद्दल रघूजीने दहा हजार फौजेसह शाहूची नोकरी करावी व शाहूस सालाना दहा लाख रुपये द्यावे, असे ठरले. त्यानंतर रघूजीने कान्होजीचा पराभव केला.
रघूजी भोसलेच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. परंतु नागपूरकर भोसले घराण्यातील हा सर्वांत पराक्रमी व श्रेष्ठ पुरुष असून त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन त्यांची आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले. वऱ्हाडात स्थिरस्थावर झाल्यावर त्याने देवगढ, मध्यप्रदेशमधील गढा-मंडला व खंडाला, महाराष्ट्रातील चांदा उर्फ आताचे चंद्रपूर, ही गोंड राज्ये आपल्या आधिपत्याखाली आणली. याच वेळी शाहूने पुन्हा रघूजीस सन १७३९ ते १७४० या दरम्यान कर्नाटकात स्वारीवर पाठविले. त्यानंतर रघूजीने भास्करपंत या आपल्या सेनापतीस सन १७४१ मध्ये बंगालवर पाठविले. सुमारे दहा वर्षे त्याचे हे बंगाल लुटणे चालू होते. रघूजीने देवगढची विधवा राणी रतनकुंवर हिला सर्वतोपरी मदत करुन तिच्या अकबर व बुऱ्हान या मुलांना वारसाहक्क व राज्य मिळवून दिले आणि वलीशाहाचा पराभव केला. रतनकुंवरने रघूजीस आपला तिसरा मुलगा मानून राज्याचा तिसरा हिस्सा दिला. यानंतर रघूजीच्या रघूजी करांडे नावाच्या सेनापतीने गोंडवन काबीज केले. तेव्हा रघूजीने आपली राजधानी नागपुरास हलविली. या वेळेपासून पुढे भोसल्यांचे वऱ्हाडातील राहण्याचे प्रमुख ठिकाण नागपूर झाले. शाहूने १७३८ मध्ये रघूजीस बंगाल, बिहार व ओरिसा येथील चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार दिले. रघूजीने १७५१ मध्ये अलीवर्दीखान व मराठे यात तह घडवून आणला. या तहाद्वारे भोसले यांना बारा लाख रुपये चौथाई म्हणून मिळाले आणि कटक जिल्हा भोसल्यांच्या अंमलाखाली आला. या बंगालवरील स्वारीत रघूजीला वरील गोष्टींशिवाय रायपूर, रतनपूर, बिलासपूर व संबळपूर या संस्थानांवरही भास्करराम या सेनापतीमार्फत अधिराज्य प्रस्थापित करता आले.
रघूजीचा अनौरस मुलगा मोहनसिंग याच्या ताब्यात या संस्थानांची व्यवस्था असे. रघूजीच्या अखेरच्या दिवसांत त्याच्या ताब्यात वऱ्हाडापासून कटकपर्यंतचा प्रदेश व गढा-मंडला, चांदा व देवगढ ही गोंड राज्ये तसेच गाविलगढ, नरनाळा व माणिकदुर्ग हे महत्त्वाचे किल्ले एवढा प्रदेश होता. शिवाय बिहार व बंगाल यांची चौथाई व सरदेशमुखी आणि घासदाणा मिळून सुमारे ४० प्रतिशत उत्पन्नाचा भाग त्यास मिळत असे. शाहूने मरणापूर्वी आपल्यानंतर वारस कोण, याची चर्चा करण्यासाठी रघूजी भोसले यास साताऱ्यास बोलाविले. शाहूची राणी सगुणाबाई व रघूजीची पत्नी सुकाबाई या चुलत बहिणी होत्या. त्यामुळे रघूजीस छत्रपतींच्या गादीवर आपला मुलगा दत्तक द्यावा, असे वाटत होते. नानासाहेबांना पेशवेपद न देता ते बाबूजी नाईकास द्यावे, म्हणूनही त्याने पूर्वी खटपट केली होती. पण शाहूने त्याचे सर्व बेत अमान्य करुन पेशव्यांबरोबरचा वादही सामोपचाराने मिटवून दोघांना दोन स्वतंत्र विभाग दिले.
रघूजीने नागपूर आपली राजधानी बनविल्यानंतर नागपूर शहराचे सौंदर्य वाढविले. रामटेक येथे रामाची मूर्तीही त्यांनीच बसविली व रामाचे प्रशस्त मंदीरही बांधले.
रघूजीला दोन पत्न्या होत्या. त्यांपासून त्यास चार मुले झाली. मुधोजी, बिंबाजी, जानोजी व साबाजी. जानोजी व साबाजी हे दुसऱ्या पत्नीची मुले होती. पण जानोजी हा सर्वांत मोठा मुलगा होता. म्हणून रघूजीने आपल्यानंतर जानोजीस नागपूर संस्थानची गादी मिळावी व इतरांना आवश्यक तेवढे उत्पन्न द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. दुसरी गोष्ट जानोजी त्याच्या अखेरच्या दिवसांत त्याच्याबरोबर स्वारीत असे. सन १७४९ ते १७५० मध्ये कर्नाटक व बंगाल मधील स्वाऱ्या त्याने स्वतंत्र्यरीत्याही हाताळल्या होत्या. रघूजी १४ फेब्रुवारी १७५५ रोजी मरण पावला. त्याच्या मुलांत नागपूरच्या गादीबद्दल नंतर वाद सुरु झाले. रघूजीनंतर सन १७५५ ते १७७२ दरम्यान जानोजी नागपूरच्या गादीवर होता. त्याला वऱ्हाडचे सुभेदार कृष्णाजी गोविंदराव, नागपूरचे सुभेदार नरहर बल्लाळ रिसबुड, रघूजी करांडे, शिवाजी केशव टाळकुटे वगैरे मातब्बर सरदारांचे साहाय्य व सहानुभूती होती. मुधोजी थोरल्या बायकोचा असल्यामुळे वारसाहक्क मागत होता. यामुळे दोघांचे भांडण होत होते. अखेर तो वाद पेशव्यांकडे पुण्याला नेण्यात आला. पेशव्यांनी जानोजीस सेनासाहेबसुभा हे पद दिले आणि सेनाधुरंधर हे नवीन पद निर्माण करुन ते मुधोजीस दिले. मुधोजीस चांदा व छत्तीसगढ हे प्रदेश देवून त्यांची शासकीय व्यवस्था त्याच्याकडे सोपविली. बिंबाजीने छत्तीसगढ येथे आणि साबाजीने वऱ्हाडातील दारव्ह येथे राहावे, असे ठरले. सर्व भोसले बंधूंनी पेशव्यांना वीस लाख रुपये द्यावेत. प्रत्यक्षात सेनासाहेबसुभा ही सनद ताराबाईने पुढे पहिला माधवराव पेशवा झाल्यानंतर १७६१ मध्ये दिली. तथापि पुण्यास दोघा बंधूंमध्ये समेट घडून आला होता तरी नंतरही दोघे एकमेकांशी झगडत होते. अखेर १७५७ मध्ये दोघांनी लढाईने तंटा मिटविण्याचे ठरवले. रहाटगावजवळ लढाई झाली. मुधोजीचा पराभव झाला आणि तह होऊन काही काळ शांतता निर्णाण झाली. निजामाने जानोजी कर्नाटकात गेला आहे, हे पाहून वऱ्हाडावर स्वारी केली. त्या वेळी जानोजीने परत येवून सर्व वऱ्हाडचा प्रदेश सन १७५७ मध्ये पादाक्रांत केला. तेव्हा निजामाने पुढे जानोजीबरोबर एलिचपूर येथे सुलतान खापन्ही याच्या मध्यस्थीने मे १७५८ मध्ये तह केला. त्यानुसार निजाम व भोसले यांत वऱ्हाडच्या उत्पन्नाची विभागणी झाली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील पराभवानंतर सन १७६१ मध्ये जानोजी नानासाहेबास जावून मिळाला. पण पुढे जानोजी पुन्हा सन १७६२ मध्ये निजामाकडे गेला. दोघांनी मिळून पेशव्यांचा प्रदेश पुण्यासह जाळला. राक्षसभुवनच्या लढाईत सन १७६३ मध्ये जानोजी व मुधोजी पेशव्यांना पुन्हा मिळाले. त्याबद्दल रघुनाथरावाने त्यांना बत्तीस लाखांचा प्रांत दिला. यानंतर साबाजी रुसून माधवराव पेशव्यांकडे जात असतांना जानोजी व त्याची बायको दर्याबाई यांनी त्याचे मन वळविले. माधवरावाने नागपूर जाळून त्यांचा पुष्कळ प्रांत काबीज केला. जानोजी व मुधोजी या बंधूंवर गोपाळराव पटवर्धनास पाठविले. गोपाळरावाने मध्यस्थी करुन सन १७६९ मध्ये कनकापूर येथे माधवराव पेशवे व जानोजीत तह घडवून आणला. जानोजीस मूल नसल्यामुळे त्याने मुधोजीचा मुलगा रघूजी दुसरा यास दत्तक घेण्याचे ठरवले. दत्तकमंजुरीस पुण्यास जावून परत येत असताना पोटशुळाच्या व्यथेने तो बालेघाटात १६ मे १७७२ रोजी मरण पावला. त्याच्याबरोबर त्याच्या अनेक स्त्रिया सती गेल्या.
जानोजीच्या वेळी दिवाकर पुरुषोत्तम ऊर्फ देवाजीपंत चोरघडे हा नारखेडचा गृहस्थ जानोजीचा राजकीय सल्लागार म्हणून पुढे आला. जानोजीनंतरच्या भोसले घराण्यातील अनेक व्यक्तींना त्याचा सल्ला महत्त्वाचा ठरला. जे स्थान नाना फडणीसाचे पुणे दरबारात होते, तेच नेमके दिवाकरपंताचे नागपूरकर भोसले यांच्या दरबारात होते. जानोजीनंतर सन १७७२ ते १८१६ मध्ये दुसरा रघूजी भोसल्यांच्या गादीवर आला. पण तत्पूर्वी त्याचे दत्तकविधान झाले नसल्यामुळे पुन्हा भोसले घराण्यात कौटूंबीक कलहास सुरुवात झाली. मुधोजीचा धाकटा भाऊ साबाजी याने माधवरावाकडून सेनासाहेबसुभा ही सनद रामाजी बल्लाळ गुणे या मध्यस्थामार्फत मिळविली. कारण मुधोजी हा रघुनाथरावाच्या पक्षाचा होता. याच वेळी जानोजीची पत्नी दर्याबाई साबाजीस मिळाली व आपण गरोदर असून आपणास मुलगा झाल्यास त्यास गादी मिळावी, म्हणून तिने खटपट सुरु केली. मुधोजीने आपली सर्व कुटूंबीय मंडळी चांद्याच्या किल्ल्यात पाठविली आणि सुमारे पंचवीस हजाराची फौज जमविली. साबाजी व मुधोजी यांत कुंभारी येथे सन १७७३ मध्ये युद्ध होवून असे ठरले की, सेनासाहेबसुभा हे पद दुसऱ्या रघूजीस देऊन साबाजी व मुधोजी या दोघांनी संयुक्तरीत्या राज्यकारभार पाहावा. तथापि साबाजीस ही योजना पसंत नव्हती. त्याने पेशवा नारायणरावाची रघुनाथरावाविरुद्ध बाजू घेतली. निजामही नारायणरावाच्या बाजूचा होता. पण रघुनाथरावाने निजामाचा पराभव केला. अखेर हा तंटा सन २६ जानेवारी १७७५ मध्ये पंचगावच्या लढाईत साबाजी मरण पावल्यानंतर संपुष्टात आला. दर्याबाई व इतर साबाजीचे लोक साहजीकच मुधोजीस मिळाले आणि मुधोजी सन १७७५ ते १७७८ मध्ये काही काळ सत्ताधीश झाले व रघूजीस रितसर सेनासाहेबसुभा हा किताब सन १७७५ मध्ये सवाई माधवरावाकडून मिळाला. मुधोजी हा बारभाईविरुद्ध रघुनाथरावास मिळाले. मुधोजीने निजामाचा सरदार रूकन उद्दौला यासही रघुनाथरावाच्या पक्षात सामील करुन घेतले. पुढे भोसल्यांनी बंगालमध्ये चौथाईचा बहाणा करुन इंग्रजांवर स्वारी करण्याचे ठरले असतानासुद्धा दुसऱ्या रघूजीने दिवाकरपंतांच्या सल्ल्याने हा बेत रद्द केला. एवढेच नव्हे, तर जनरल गोडाई पुण्याकडे जात असतांना मुधोजीने आपल्या राज्यातून त्यास मार्ग दिला व पेशव्यांविरुद्ध त्याच्याशी तह केला. तेव्हा नाना फडणीसाने बिंबाजीच्या साहाय्याने मुधोजीविरुद्ध मसलत उभारली. त्या वेळी मुधोजी घाबरला व त्याने इंग्रजांचा पक्ष सोडला. तथापि त्याचे एकूण धोरण इंग्रजांना मदत करण्याचे होते, हे पुढे इंग्रजांनी टिपूवर जी स्वारी केली, त्यात स्पष्ट झाले. अखेर तो नाना फडणविसास टिपूविरुद्धच्या १७८६ मध्ये बादामीच्या वेढ्यात मदतीला आला. यानंतर तो नागपूरास परत गेला व तेथेच १९ मे १७८८ रोजी मरण पावला. तत्पूर्वीच त्याचा भाऊ बिंबाजी मरण पावला होता. मुधोजीस रघूजी, खंडोजी व व्यंकोजी असे तीन मुलगे होते. रघूजीने पेशव्यांची मर्जी संपादून व्यंकोजीस सन १७८९ मध्ये सेनाधुरंधरची वस्त्रे मिळविली. लगेच सन १७९० मध्ये खंडोजी एकाएकी वारला.
मुधोजीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या रघूजीच्या हातात सत्ता पूर्णतः आली. रघूजीचे व नाना फडणीसाचे संबंध मित्रत्वाचे होते. खर्ड्याच्या लढाईत सन १७९५ मध्ये रघूजीने विठ्ठल बल्लाळ या सुभेदाराच्या नेतृत्वाखाली फौज धाडली. यामुळे रघूजीस साडेतीन लाखांचा मुलूख व गंगथडी प्रदेशाचा घासदाणा मिळाला. निजामाने सुमारे २९ लाख रुपयांची बाकी रघूजीस देण्याचे कबूल केले. याशिवाय नवीन सनदेनुसार नर्मदेच्या दक्षिणेकडील मुलूख आणि नाना फडणीसाने पाच लाख रुपये व गढामंडल्याचा प्रदेश दिला. पुढे त्यास सागरच्या राजाने अमीरखानविरुद्ध मदत केल्याबद्दल काही मुलूख दिला. सन १८०० मध्ये रघूजीचे राज्य विस्ताराने इतर मराठी संस्थानिकांपेक्षा मोठे व समृद्ध होते. परंतु त्याचा ईस्ट इंडिया कंपनीशी संबंध आल्यानंतर अवनतीस सुरुवात झाली. सन १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर, त्याने तैनाती फौजेची पद्धत सुरु केली व हळूहळू ती एतद्देशीय संस्थानिकांवर लादली. मराठी संस्थाने हळूहळू त्याच्या कच्छपी जात होती. वेलस्लीच्या सैन्याने अखेर गाविलगढावर हल्ला केला. अडगावच्या लढाईत सन २९ नोव्हेंबर १८०३ मध्ये रघुजीचा पराभव झाला आणि देवगाव येथे तह होऊन युद्ध संपले. यावेळी इंग्रजांनी भोसल्यांवर अपमानकारक अटी लादल्या व मुलूख घेतला. वऱ्हाड प्रांत निजामास देण्यात आला आणि भोसल्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने सन १८०४ ते १८०७ मध्ये नागपूरास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेंट नेमण्यात आला. देवगावच्या तहानंतर तैनाती फौज ठेवावी, म्हणून रघूजीवर दडपण आणले. एल्फिन्स्टननंतर रेसिडेंट म्हणून आलेल्या रिचर्ड जेंकिन्सने आग्रह धरला. परंतु रघूजीने आपल्या हयातीत तैनाती फौज स्वीकारली नाही. रघूजीची संपत्ती दानधर्मात खर्च झाली. शिवाय उत्पन्नही कमी झाले होते. त्यामुळे अखेरच्या दिवसांत संस्थानला कर्ज झाले. रघूजी हा सन २२ मार्च १८१६ रोजी मरण पावला. रघूजीनंतर त्याचा दुबळा मुलगा परसोजी हा सन १८१६ मध्ये भोसल्यांच्या गादीवर आला. त्यामुळे रघूजीचा अनौरस मुलगा धर्माजी व व्यंकोजीचा मुलगा मुधोजी ऊर्फ आप्पासाहेब या दोघांमध्ये अधिकारांबद्दल तंटा सुरू झाला. रघूजीची पत्नी बांकाबाईचा ओढा धर्माजीकडे होता. मुधोजीकडे सर्व सरदारमंडळी होती. यामुळे मुधोजीने कारस्थान रचून बांकाबाईला नजरकैदेत व धर्माजीस कैदेत टाकले आणि परसोजीस राज्याभिषेक करून सर्व कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. धर्माजीचा ५ मे १८१६ रोजी खून झाला. त्यामुळे आप्पासाहेबाच्या हातात सर्व सत्ता आली. आप्पासाहेब चांद्यास गेला असता परसोजी एकाएकी अंथरूणातच १ फेब्रुवारी १८१७ रोजी मृत अवस्थेत आढळला. आप्पासाहेबावर परसोजीच्या खुनाचा आरोप करण्यात आला. पण इंग्रजांनी तो दूर करून आप्पासाहेबास अखेर तैनाती फौज स्वीकारावयास लावली आणि पुढे भोसल्यांच्या गादीवर सन २१ एप्रिल १८१७ मध्ये आप्पासाहेब आला. याच परसोजीच्या मरणानंतर त्याची पत्नी काशीबाई सती गेली. ती धार्मिक असल्यानं तिच्यासाठी सतीप्रथा बंद झाल्यानंतरही कायद्याची दरवाजे उघडण्यात आलीत व ती सती गेली.
अप्पासाहेबावर आपले वर्चस्व असावे, म्हणून इंग्रजांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. तैनाती फौजेनंतर त्यांनी हुशंगाबादेस वखारीकरिता परवानगी मागितली. ती त्याने नाकारली. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्धच्या लढाईत त्यात होळकरांप्रमाणे भोसल्यांचीही मदत मागितली. ती त्यांनी कबूलही केली. पेशव्यांनी आप्पासाहेबास सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे पाठविली. आप्पासाहेबाने थोडीशी फौज जमविली. या कामी मनभट, रामचंद्र वाघ, सुभेदार निंबाळकर, नारायण नगारे वगेरे मातब्बर मंडळी त्याच्या बाजूस होती. फौजेने सीताबर्डी व नागपूर शहर या दरम्यान नाकेबंदी करुन रेसिडेंसीवर तोफांचा भडीमार केला. त्यातच आप्पासाहेबास काही तरी निमीत्त काढून रेसिडेंसीत नेवून अडकविण्यात आले. भोसल्यांचा पराभव झाला व भोसल्यांच्या ध्वजाच्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीचा युनियन जॅक फडकला. आप्पासाहेबाने आपल्या आज्ञेशिवाय आपल्या सरदारांनी हे युद्ध केले, असा दावा इंग्रजांकडे मांडला. इंग्रजांनी आप्पासाहेबाबरोबर सन ६ जानेवारी १८१८ मध्ये तह केला. या तहानुसार इंग्रजांना गाविलगढ, नरनाळा हे किल्ले व काही प्रदेश मिळाला. तसेच नागरी व लष्करी व्यवस्था इंग्रजांच्या हातात गेली आणि आप्पासाहेब हा इंग्रज रेसिडेंटच्या देखरेखीखाली नागपूरात राहू लागला. यामुळे नागपूर व आप्पासाहेब यांचे स्वातंत्र्य पूर्णतः नष्ट झाले. सुमारे तीन महिने शांततेत गेले. आप्पासाहेबाने बाजीरावाशी पत्रव्यवहार सुरु केला. जेंकिन्सला हा पत्रव्यवहार उपलब्ध झाला. त्याने तत्काळ सन १५ मार्च १८१८ मध्ये आप्पासाहेबास कैद केले. त्याला रामचंद्र वाघ व नागोपंत यांसह प्रयाग येथे पाठविण्यात आले. चांद्याचा किल्ला काही दिवस गंगासिंग या किल्लेदाराने लढविला. तो पुढे मे १८१८ मध्ये पडला. आप्पासाहेब पळून गेला. त्याने प्रथम महादेव टेकड्यांत आश्रय घेतला. गोंड राजांनीही काही दिवस त्यास आश्रय दिला. पुढे तो भटकता भटकता अटक होऊन जोधपूर येथे तुरुंगात असतांना सन १८४० मध्ये मरण पावला. त्याच्या पारतंत्र्यात उमाबाई ही त्याची पत्नी त्यास द्रव्य-पुरवठा करीत असे तर त्याची दुसरी पत्नी सावित्रीबाई नागपूरात निवृत्तिवेतन उपभोगीत होती.
आप्पासाहेबानंतर नागपूरच्या गादीवर इंग्रजांनी मला म्हणजे या तिसऱ्या रघुजीला सन १८१८ ते सन १८५३ मध्ये दत्तक म्हणून गादीवर आणलं. मी तिसरा रघूजी हा दुसऱ्या रघूजीच्या बानूबाई या मुलीचा मुलगा. माझे जन्मनाव बाजीबा. माझे दत्तकविधान २६ जून १८१८ रोजी झाले. मी अज्ञान असल्यामुळे सर्व राज्यकारभार व राजवाड्यातील व्यवस्था रेसिडेंट आणि बाकाबाई पाहात असे. मी सज्ञान झाल्यानंतर इंग्रजांनी माझ्याबरोबर सन १८२६ मध्ये तह केला. मी इंग्रजांच्या तंत्राप्रमाणे वागत असे. कारण माझ्याकडे काही उपायच उरला नव्हता. सर्व उपाय माझ्या पुर्वजांच्याच काळात नष्ट झाले होते. त्यांनी चांगल्या शौर्यावर अंतर्गत भांडणातून पाणी फिरलं होतं. मी अनेक तीर्थांना भेटी दिल्या. मला आठ बायका होत्या. परंतु पुत्रसंतती नव्हती. एक मुलगा झाला, तोही लहानपणीच वारला. मी दत्तक घेण्याचे ठरवले होते. तशी अट १८२६ च्या तहामध्ये होती. मी सन ११ डिसेंबर १८५३ रोजी मरण पावलो. माझ्यानंतर बाकाबाईने यशवंतराव नावाच्या दुसऱ्या रघूजीच्या मुलीच्या अहिरराव घराण्यातील मुलास दत्तक घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे इंग्रज रेसिडेंट यास कळविले व माझे उत्तरक्रियाकर्म त्याच्या हस्ते केले. नंतर दत्तकविधान झाले. मुलाचे नाव जानोजी ठेवण्यात आले. तथापि गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर करुन नागपूर संस्थान सन १८५४ मध्ये खालसा केले. रघूजीच्या राण्यांनी चालविलेली कायदेशीर खटपट निरर्थक ठरली. पुढे सन १८६७ मध्ये इंग्रजांनी जानोजीस राजा ऑफ देऊर अशी पदवी देऊन सालाना ९० हजार रुपयांचे निवृत्तिवेतन दिले. त्याला सहा राण्या होत्या. त्यांपैकी अंजीराबाईस रघूजी व लक्ष्मण अशी दोन मुले झाली. रघूजीस पुढे फत्तेसिंह व जयसिंह असे दोन मुले झाली."
रघुजी तृतीयनं गणेशला आपला तसेच आपल्या राजपरीवाराचा इतिहास सांगतला होता. त्याला सत्य इतिहास माहीत झाला होता रघुजीसह त्याच्या घराण्यात झालेल्या होतकरु बऱ्याचशा राजांची माहिती. ज्यात रघुजी द्वितीय व तृतीय होते. ज्यात परसोजी व जानोजी होते. ज्यात काशीबाईही होती. तसंच त्यात बाकाबाई व अप्पासाहेबांचाही इतिहास होता.
गणेशला नागपूरमध्ये रघुजीच्या परीवारानं राज्य केलं हे माहीत झालं होतं. परंतु नागपूरचं नाव पुर्वीपासूनच नागपूर होतं काय? हेही माहीत झालं नव्हतं. त्यामुळंच नेमकं नागपूरचं पुरातन नाव कोणतं? ते काही त्याला माहीत झालं नव्हतं. अशातच एका ग्रंथात ती माहिती सापडली. माहिती होती की नागपूरचं पुर्वीचं नाव फणिंद्रपुरा होतं व हे नाव नागवंशीयांवरुनच घेण्यात आलं होतं. त्यातच त्याला त्या पुस्तकावरुन माहीत झाला होता नागपूरचा इतिहास. ज्या नागपूरला जवळपास तीन हजार वर्षापुर्वीचा वारसा लाभलेला होता. तसंच त्या पुस्तकावरुन कळलं होतं की नागपूरला एक वृत्तपत्रही निघत होतं. ज्याला नाव दिलं होतं फणिंद्रमणी. ज्याचा अर्थ होता, नागाच्या हुडाला लटकवलेला दागिना. तशी त्याबद्दल गणेशनं माहिती विचारताच प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब म्हणाले,
"राजसत्ता उपभोगत असलेला समाज आणि त्यांना स्थान देत असलेलं नागपूर. पुर्वी या नागपूरचं नाव ‘फणिंद्रपुरा’ असे होते. फणाचा अर्थ नागाचा हुड असा होतो. या मराठी शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली होती. तसेच नागपूरच्या पहिल्या वृत्तपत्राचे नाव फनिंद्रमणी असे होते, ज्याचा अर्थ असा आहे की कोब्राच्या हुडावर लटकवलेला दागिना. हाच दागिना अंधारावर प्रकाश टाकतो, म्हणून वृत्तपत्राचे नाव. या नागपूरबाबत मिही दावा केला होता की शहर आणि नदी या दोघांनाही इंडो-आर्यांचे विरोधक असलेल्या 'नाग' नावावरुन नावे देण्यात यावीत. कारण ब्रिटिश राजवटीत या शहराचे नाव "नागपूर" असे उच्चारले जात असे. त्यासाठीच मिही माझ्या वृत्तपत्राचं नाव फणिंद्रमनी ठेवलं होतं. शिवाय नागपूरचं नाव अजरामर व्हावं म्हणून मी नागपुरातच दिक्षा घेतली.
प्रारंभिक आणि मध्ययुगीन इतिहासात सध्याच्या नागपूरच्या आसपासचे मानवी अस्तित्व 3000 वर्षे इसवी सन पूर्व 8 व्या शतकात सापडते. औषधधामना म्हाडा कॉलनी येथील मेहीर दफन स्थळांवरून असे दिसून येते की नागपूरच्या आसपास मेगालिथिक संस्कृती अस्तित्वात होती आणि आजही ती पाळली जाते. "नागपूर" नावाचा पहिला संदर्भ शेजारच्या वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे सापडलेल्या दहाव्या शतकातील ताम्रपटातील शिलालेखात आढळतो. शिलालेख हा राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याच्या काळात नागपुरा नंदीवर्धनाच्या विसाया मध्ये वसलेल्या गावाला शक वर्ष ८६२ (९४०) मध्ये दिल्याची नोंद आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या अखेरीस, राजा विंध्यशक्ती याने नागपूर प्रदेशावर राज्य केले म्हणून ओळखले जाते. चौथ्या शतकात, वाकाटक राजघराण्याने नागपूर प्रदेश आणि आसपासच्या प्रदेशांवर राज्य केले आणि गुप्त साम्राज्याशी त्यांचे चांगले संबंध होते. असेही अंकीत केले गेले आहे. वाकाटक राजा पृथ्वीसेन पहिला याने आपली राजधानी अलिकडच्या नगरधन तसेच प्राचीन काळातील नाव नंदीवर्धन येथे हलवली. जे नागपूरपासून ३८ किमी म्हणजेच चोवीस मैल दूर आहे. वाकाटकांनंतर, हा प्रदेश बदामी चालुक्य, राष्ट्रकूटांच्या हिंदू राज्यांच्या अधिपत्याखाली आला. माळव्यातील परमार किंवा पनवारांनी अकराव्या शतकात नागपूर प्रदेशावर नियंत्रण ठेवलेले दिसते. नागपूर येथे परमार राजा लक्ष्मदेवाचा प्रशस्ती शिलालेख सापडला आहे. त्यानंतर हा प्रदेश देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात गेला. सन १२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी ताब्यात घेतल्यानंतर यादव साम्राज्यावर आक्रमण केले. त्यानंतर १३१७ मध्ये तुघलक राजवंश सत्तेवर आला. इसवी सनाच्या सतराव्या शतकात, मुघल साम्राज्याने हा प्रदेश जिंकला. तथापि मुघल काळात प्रादेशिक प्रशासन आधुनीक काळातील मध्य प्रदेश राज्याच्या छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडच्या गोंड राज्याद्वारे चालवले जात होते. अठराव्या शतकात, मराठा साम्राज्याच्या भोसलेंनी शहरात स्थित नागपूर राज्याची स्थापना केली.
नागनदी ही महाराष्ट्राच्या विदर्भातील एक नदी आहे. याच नदीवर नागपूर शहर वसलेले आहे. दिल्लीचे नागरीकरण पाहून अठराव्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहाने आपली राजधानी देवगड (मध्यप्रदेश), छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळी काढून, नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून नागपूर शहर वसवले. असे म्हटले जाते. परंतु नागपूर हे गाव पुर्वीपासूनच अस्तित्वात होते व या गावात जेही लोकं राहात होते, ती मंडळी आदिवासी होती नव्हे तर नागवंशीच. तसेच त्यांच्याशी बख्त बुलंदशहाचे हितगुज असल्यानं संपर्क होताच. परंतु पाहिजे त्या प्रमाणात नव्हता.
देवगड ही त्याची राजधानी असल्यानं एकदा फिरता फिरता तो नागपूर या ठिकाणी आला. त्याला येथील वातावरण आवडलं. तसेच येथील लोकंही आवडले. त्याचबरोबर त्यानं ठरवलं की आपण देवगडवरुन आपली राजधानी नागपूरला आणावी व नागपूरला आपल्या राजधानीचं शहर बनवावं.
त्यांचा तो विचार. तसा विचार मनात करुन त्यांनी नागपूर शहर वसवलं. त्याचा थोडासा विकास केला. परंतु नागपुरात राजधानी आणण्यापूर्वीच ते मरण पावले व त्यांचे नागपुरात राजधानी आणायचे जे स्वप्न होते. ते स्वप्न, स्वप्नच राहिले. ते स्वप्न पुर्ण झाले नाही. ते स्वप्न पुर्ण केले. त्याचेनंतर गादीवर आलेल्या त्यांच्या मुलानं. ज्याचं नाव चांद सुलतान होतं. नागपूरला आपली राजधानी आणली व आपल्या राजधानीचं शहर नागपूरला बनवलं.
बख्त बुलंदशहानं नागपूरला आपली राजधानी बनवताच नागपूरचा विकास झपाट्यानं होवू लागला. त्यानंतर नागपूरची विशेष म्हणजे भरभराट झाली होती व ते शहर झपाट्यानं वाढलं होतं."
डॉ. बाबासाहेबांच्या अमर आत्म्यांनी सांगीतलं होतं की नागपूर राजधानीचं शहर कसं वसलं. त्यांच्यामुळंच गणेशला नागपूरचं पुर्वीच नाव माहीत झालं होतं. परंतु त्याला कोणी म्हणत होते की अंबाझरीचं नाव अंबाझरी नव्हतं, तर ते बिंबाझरी होतं. ते त्याला मान्य नव्हतं. त्यामुळंच त्यानं तेही शोधायलाच सुरुवात केली व कळलं की त्यामागंही एक कहाणी आहे. ती कहाणी रघुजीच्या वंशात असलेल्या बिंबा राजाची होती. परंतु बिंबा राजे बोलले नाहीत. ते चूप बसले होते. तोच पुन्हा तृतीय रघुजी राजेच म्हणाले,
"प्राचीन काळी या नाग नदीच्या काठी नागवंशाचे लोक रहात असावेत. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बैद्ध धर्माची दीक्षा घेतली. दीक्षा समारंभासाठी नागपूरची निवड करण्यामागे नागवंशाचा महत्त्वाचा संदर्भ होता. नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. त्याद्वारे निर्माण झालेल्या तलावास अंबाझरी तलाव असं नाव देण्यात आलं. बिंबाझरी हे नाव जुने नाव होते व हे नाव बिंबा भोसले नावाच्या आमच्या वंशातील राजाच्या नावावरुन देण्यात आले. त्याचीही एक कथा आहे.
नाग नावाच्या या नदीचं पाणी स्वच्छ होतं. एकदा बिंबा राजे शिकारीसाठी निघाले. तसं पाहता शिकार करीत असतांना ते थकले व ते एका झाडाखाली थांबले. त्यांनी तिथं पाडाव टाकला. तो पाडाव या नदीकाठावर होता.
बिंबा राजा या नदीकाठावर आले व त्यांना लय तहान लागलेली आहे. त्यानंतर त्यांनी पाडावही टाकला व त्यांना तहान लागल्यानं त्यांनी शिपायाला आदेश दिला की त्यांना आता तहान लागलेली असून त्यांच्यासाठी पिण्यासाठी त्या नदीतील पाणी आणावं.
बिंबा राजानं सैनिकाला आदेश देताच सैनिक पाणी आणायला गेले. ते नदीत उतरले. परंतु नदीत बऱ्याच लांबपर्यंत फिरुनही नदीत पाणी सापडलं नाही. तसा शिपाही परत आला व म्हणाला,
"राजेसाहेब, आम्ही बऱ्याच लांबपर्यंत फिरलो. परंतु आम्हाला पाणीच नाही."
बिंबा राजानं परत पाण्याचा शोध घ्यायला लावला. तसे सैनिक पाण्याचा शोध लावायला पुन्हा बऱ्याच लांबपर्यंत फिरले. तेव्हा एके ठिकाणी एका खोलगट भागात थोडंसं पाणी सापडलं. सैनिकांनी ते पाणी आपल्या पखालीत भरलं व ते पाणी त्या पखालीत घेवून आले.
नागनदीतील पाणी. पुर्वी बऱ्याच लांबपर्यंत फिरल्यानंतरही पाण्याचा एखादा अंशही सापडला नव्हता. त्यासाठी बरीच कसरत करावी लागली होती. तसं ते पाणी आणताच ते पाणी राजानं प्राशन केलं. त्यांना ते पाणी गोड वाटलं व राजानं ठरवलं. आपण या ठिकाणी एक तलाव बांधावा.
तलाव बांधायचा विचार. तसा विचार मनात येताच राजानं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावं म्हणून एका हौदाची निर्मीती केली. त्यालाच पुढं तलाव असं नाव मिळालं व तो हौद बिंबा राजानं बांधल्याने त्याला बिंबाझरी असं नाव देण्यात आलं. बिंबा म्हणजे बिंबा राजा व झरी याचा अर्थ झरना अर्थात झरा. कालांतरानं इंग्रजांचं शासन आल्यानं इंग्रजांनी बऱ्याच ठिकाणाची पुर्वीच्या राजांची असलेली नावे बदलवली. तसं या तलावाचंही नाव बदलवलं व इथं आंब्याची झाडं जास्त प्रमाणात असल्यानं त्या तलावाला अंबाझरी असं नाव देण्यात आलं. तेव्हापासून हा तलाव अंबाझरी नावानं ओळखला जातो.
ती नदी. ती नदी तेवढी काही मोठी नव्हती त्या काळात. म्हणूनच त्या नदीचं पाणी उन्हाळ्यात आटून जायचं. कुठंतरी खोलगट भागात पाणी असायचं. म्हणतात की हा तलाव नागपुरातील तेलंगखेडी सोनेगाव मार्गावर आहे. बिंबाराजे हे रघुजीचेच वंशज होते. त्यांचा शासनकाळ इस १७३० ते १७५५ होता व त्याच काळात हा अंबाझरी तलाव बांधण्यात आला."
रघुजी राजे तृतीय यांनी माहिती पुरवली. आता त्याला माहीत झालं होतं अंबाझरीचं मूळ नाव. तसं पाहिल्यास त्याच्या मनात काही प्रश्न होतेच व तो विचार करु लागला होता. तसा बिंबा राजे स्वतः तिथं हजर झाले व आपली माहिती सांगू लागले.
"तलावाचे पूर्वीचे नाव 'बिंबाझरी' असे होते. कोणी म्हणतात की नागपूरच्या गोंड राजाच्या शासनादरम्यान या तलावाची निर्मिती झाली. परंतु अंबाझरीच्या झालेल्या बिंबाझरी नावावरुन तो तलाव भोसलेंनीच बांधला असावा हे सिद्ध होते. सर्व जनतेला उन्हाळ्यातही पाण्याचा वापर करता यावा, त्यासाठी नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. उत्तर भारतातून नागपुरात या कामासाठी आलेल्या 'कोहळी' समाजाच्या लोकांनी हा तलाव निर्माण केला. हा तलाव मी बांधला व आमच्या घराण्याच्या शासनकाळातच या तलावात सुधारणा केल्या गेल्या. नंतर सन १८६९ या साली पडलेल्या दुष्काळामुळे तलावाच्या बांधकामात अनेक बदल करण्यात आले. या तलावाची उंची १७ फुटाने व क्षमता तिपटीने वाढविण्यात आली. त्यानंतर सन १८७० साली नागपुरात म्युनिसिपालिटी आली. तिनं एक प्राथमिक कार्य म्हणून या शहरात तलावातून घरोघरी पाणीपुरवठ्यासाठी नळयोजना अंमलात आणली."
गणेशला आज नागपूरचं बदललेलं वैभव दिसत होतं. जुन्या लोकांच्या जुन्या आठवणी. त्या आठवणी त्याला कोणीतरी म्हाताऱ्यांनीच सांगीतल्या होत्या. त्या आठवणी त्याला त्याच काशीबाईच्या ओट्यावर कोण्यातरी वृद्ध व्यक्तींनी सांगीतल्या होत्या. जी माणसं वयोवृद्ध होती. त्याला त्याच वृद्धांकरवी त्या राजमहालातील राण्या व ती वयोवृद्ध माणसं कुठं कुठं अंघोळ करीत होती व नागनदी त्या काळात कुठून कुठून वाहात होती. हे सारं माहीत झालं होतं. तसा तोही प्रश्न विचारताच रघुजी राजे तृतीय म्हणाले,
"सन १८७० मध्ये भोसल्यांच्या काळात, मातीचे धरण बांधून निर्माण केलेल्या या कृत्रिम तलावातून त्याकाळचे सरदार, अधिकारीवर्ग इत्यादींना खापराच्या म्हणजेच माती भाजून तयार केलेल्या नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. या तलावासभोवताली आंब्याची झाडे होती. म्हणून यास अंबाझरी हे नाव पाडले गेले. असे म्हणतात की या तलावाने पूर्वी सलग सुमारे ३० वर्षे नागपूर शहरास पाणीपुरवठा केला आहे. मात्र आता यातील पाणी सध्या प्रदूषीत झाल्यामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यानंतर शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे व पाण्याचे इतर स्रोत उपलब्ध झाल्यामुळे या तलावातून पाणीपुरवठा करणे बंद झाले. मात्र येथून जवळच असलेल्या हिंगणा औद्योगीक परिसरास या तलावातील पाणी अजूनही पुरविले जाते. या तलावाशेजारीच आता एक बाग उभारली आहे. त्याचे बागेलाही अंबाझरी तलावाचंच नाव देण्यात आलेले असून तो बगीचा अंबाझरी बगीचा म्हणून प्रसिद्ध आहे. या बगिच्यात विविध प्रकारची झाडे आहेत. येथे पूर्वी तलावात बोटिंगची सोय होती. हे उद्यान सुमारे अठरा एकर जागेत आहे.
अठराव्या शतकात, नागपूरला जीवन देणाऱ्या या संजीवन नाग नदीचा पिण्याच्या पाण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी व धार्मिक कार्यांसाठी उपयोग होत होता. त्या काळात भोसले राजांनी नाग नदीच्या काठी सुंदर देवळे, राजवाडे, उद्याने, स्मशान, राजघाट आणि काशीबाईचा घाट, इत्यादी घाट निर्माण केले.
नागपूर शहरातल्या सीताबर्डी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे नाग नदीला एक ओढा येवून मिळतो. या संगमावर इ.स. १७७९ मध्ये दुसऱ्या रघूजीची आई व मुधोजीची पत्‍नी चिमाबाई हिने महादेवाचे देऊळ बांधले. या संगमावर दुसरे रघूजी आणि परिवार धार्मिक कार्यासाठी जात असत. भोसले राजे विजयादशमीला सकाळी घोडे, हत्तींना संगमावर आंघोळीसाठी याच ठिकाणी आणत असत. हत्ती बुडू शकेल इतके खोल पाणी या संगमावर होते. नदीच्या काठी शस्त्रपूजा आणि शमीची पूजा व्हायची. सायंकाळी भोसले परिवार सीमोल्लंघनासाठी नाग नदी ओलांडून राजाबक्षाच्या मारुतीला जायचे.
संगमावरील महादेवाच्या देवळाचे जोते पाच फूट उंच असून भोवती २२×२५ फुटाचा चबुतरा होता. दुसऱ्या रघूजीने इ.स. १७७२ च्या सुमारास नाग नदीच्या काठी वेणुगोपालाचे मंदिर बांधले. मंदिरातील शिल्पकाम कलात्मक व कोरीव स्वरुपाचे होते. त्या ठिकाणची देखणी शिल्प असलेल्या राधाकृष्णाच्या देवळासह इतर देवळे एकोणवीसव्या शतकात बुटींनी बांधली. काही देवळे ताराबाई बुटींच्या नावाने प्रसिद्ध आहेत. हा परिसर हल्ली बुटीची चाळ किंवा संगम चाळ म्हणून ओळखला जातो.
बँक ऑफ महाराष्ट्रकडून धंतोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा पूल तिसऱ्या रघूजीने इ.स. १८३७ मध्ये बांधला. तो पूल 'संगम पूल' या नावाने ओळखला जाई. त्यानंतर नाग नदी पटवर्धन मैदानाजवळून वाहते आणि सक्करदरामार्गे जाते. आज तो रस्ता ग्रेट कॅनॉल रोड या नावाने परिचित आहे. म्हणतात की इस १७५२ ते १७९१ मध्ये इंग्रज वकील जॉर्ज फॉस्टर याचे निधन नागपुरात झाले. त्याचे दफन रघूजीने शहराच्या पूर्वेस नदीच्या काठी केले होते. नाग नदीच्या पुराने स्मारकास नुकसान होऊ नये म्हणून पुढे १९१५ साली ती शवपेटी उकरून काढली आणि नागपूर कॅन्टॉन्मेन्टमध्ये, टायगर गॅप ग्राउंडला लागून असलेल्या प्रॉटेस्टन्ट सिमेट्रीत एक थडगे बांधून त्यात ठेवली गेली. त्यावरील शिलालेख रोमन, मोडी आणि फारसी लिपीत आहे."
गणेशला काशीबाई मंदीराबाबत माहिती मिळाली होती. परंतु तेथील ती एक आख्यायिका माहीत झाली नव्हती. जी प्रत्यक्ष त्याला त्याच मंदिरातील एका म्हातारीनं सांगीतली. ती म्हातारीही त्याच रघुजीच्या वंशातील होती. तिनं आपलं नाव गुप्त ठेवलं होतं. ती म्हणाली होती,
"नाग नदीच्या काठी डाव्या तीरावर ’शुक्रवारी’ पेठ विभागली गेली होती. हीच ती भोसलेकालीन स्मशानभुमी होय. एका विस्तृत आवारात भोसले घराण्यातील व्यक्तींसाठी एक स्मशानभूमी राखून ठेवलेली होती. त्या आवारात उत्कृष्ट शिल्पकलेने युक्त अशी भोसल्यांची समाधी मंदिरे आहेत. भोसले काळात शुक्रवारीतल्या या परिसराला थडगा नाग म्हणत. पहिले, दुसरे आणि तिसरे रघूजी यांच्या याच परिसरात समाध्या आहेत. दुसऱ्या रघूजीचे पुत्र परसोजी यांची पत्‍नी काशीबाई सती गेल्यामुळे इथल्या एका देवळाला काशीबाईचे देऊळ म्हणतात. या देवळावरील शिल्प अप्रतिम आहे. या देवळाला पुर्वी काशीबाईचं देऊळ म्हणत नसत. तिला थडगंच म्हणत असत. परंतु या काशीबाईच्या मंदीराबद्दल एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाची आहे. त्या आख्यायिकेनुसार म्हटलं जातं की त्या इंग्रजी अधिकाऱ्याच्या मुलाला बऱ्याच दिवसांपासून पुत्रसंतती नव्हती. त्यावेळेस त्यानं या काशीबाईच्या थडग्याजवळ नवश केला की त्याला त्या काशीबाईनं पुत्र द्यावा. म्हणजे तो तिला मानेल. त्यानंतर कावळा फांदीवर बसल्यागत व फांदी तुटल्यागत घटना घडली. ती काशीबाई नवसाला पावली व त्यानुसार त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाला एक पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यानंतर त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलानं त्या काशीबाईच्या थडग्याला काशीबाई टेंपल असं नाव दिलं. हा चमत्कारच होता."
त्या चमत्काराचं ऐकताच गणेशला थोडंसं आश्चर्यच वाटलं. तसं त्यानं विचारताच राजे रघुजी तृतीय म्हणाले,
"तसं आश्चर्यच वाटण्याचं कारण नाही. असे चमत्कार रोजच इथं होत असतात. परंतु त्याकडे लक्ष न देता तू फक्त माहितीकडे लक्ष दे.
काशीबाई मंदिरापासून वाहात वाहात नाग नदी तुळशीबागेजवळून जाते. या ठिकाणी म्हणजे आजच्या सी.पी. अँड बेरार कॉलेजसमोर डावीकडे मोगल शैलीतील मोठी तुळशीबाग आहे. तिची तशीच उजवीकडच्या बेलबागेची निर्मिती दुसऱ्या रघूजीने केली. आज संत्रीनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील पहिली संत्र्याची रोपे दुसऱ्या रघूजीनेच सियालकोट व औरंगाबादहून आणली आणि आधी तुळशीबाग परिसरात लावली. त्यानंतर सबंध जिल्ह्यात लावली. नाग नदीच्या काठी तुळशीबागेतच दुसऱ्या रघूजीने राजवाडा, नाट्यगृह आणि इतर इमारती बांधल्या. या राजवाड्यातच तो दुपारच्या विश्रांतीसाठी येत असे. दिवाळीत नाग नदीच्या तीरावर रोषणाई करण्यात येई, ती पाहण्यासाठी सबंध शहर याच तुळशीबागेजवळ गोळा होत असे."
रघुजीचं बोलणं संपलं होतं. त्यांनी सर्वात जास्त इत्यंभूत माहिती दिली होती गणेशला. तसं त्याचं बोलणं संपताच ते रवाना झाले आणि तो त्यांच्या पाठीमोऱ्या आकृतीकडं पाहातच राहिला. तशी काशीबाई म्हणाली,
"माहीत असावं तुला. इ.स. १९५६ पर्यंतच्या कालावधीपर्यंत नागनदी स्वच्छ होती. त्या नदीत कपडेही धुतले जात असत. महालातील स्त्रिया हरतालिकेच्या गौरी विसर्जनासाठी नदीवर जात. कारण नदी स्वच्छ होती.
१९५६ चाच तो काळ. या नदीच्या काठाने काही स्मशानभुम्या बांधल्या गेल्या तर याच नदीच्या काठी काही देखणे बंगलेही बांधल्या गेले होते. नदीच्या बाजूने डावीकडे अशोकाची झाडे होती. तशीच विविध प्रकारचीही झाडे होती. झाडांची सावली गारगार असायची.
नाग नदीला पुर्वी नागपूर शहराच्या हद्दीतच लहानमोठे नाले येवून मिळायचे. आता त्यात वाढ झाली आहे. आता जवळपास दोनशे पस्तीसच्याही वर नाले येवून मिळतात. तसं पाहिल्यास आज शहराच्या जनसंख्येत वाढ झालेली असल्यानं नाल्याच्या संख्येत साहजीकच वाढ झालेली आहे. आता त्या नाल्यांना शहराच्या पेठेची नावं आलेली आहेत. यात पिवळी नदी, हत्ती नाला, सत्ती नाला, गड्डीगोदाम नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबीनगर नाला, लाकडीपूल नाला, तकिया नाला, नरेंद्रनगर नाला या मोठ्या नाल्यांचा समावेश होतो. सर्व नाल्यांचे घाणेरडे पाणी नदीत सोडल्यामुळे नाग नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे आता शहरातील एकूण सतरा किलोमीटर लांबीची ही नदी आता जवळजवळ मृतप्राय झाली आहे. या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्‍न चालू असतात. आपल्या घाणेरड्या पाण्यासह नाग नदी ही भिवकुंड टेकडीजवळ कन्हान नदीला मिळते. या प्रदूषीत नदीमुळे वैनगंगेचं पाणी दूषित होत आहे व त्याचा प्रभाव गोसेखुर्द प्रकल्पावरही पडत आहे. नाग नदीतून सुमारे तिनशे पन्नास एमएलडी 'मिलियन लिटर पर डे' प्रतिदिन दहा लाख लिटर पाणी वाहून ते वरील नद्यांना मिळते. त्यापैकी फक्त दोनशे एमएलडी पाण्यावर प्रक्रिया झालेली असते."
आज नागपूरचं स्वरुप बदललेलं होतं. आज नागपूरात राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाने नाग नदी प्रदूषण निर्मूलनाचा आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाला नोव्हेंबर २०१९ मध्ये मान्यता दिली होती. नागपूर महानगरपालिकेने या प्रकल्पाची किंमत रु २४३४ कोटी सांगितली होती. नागपूरच्या मुख्यमंत्री जे पुर्वी महापौर होते. त्यांनी महापौर असताना प्रकल्पाची चर्चा झाली. नंतर हा प्रकल्प थंडबस्त्यात गेला. आघाडीच्या काळात एकशे सव्वीस कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली. त्याचे काम सुरु होऊ शकले नाही. प्रकल्पाला विलंब झाल्याने आता किंमत वाढली होती. नाग नदीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्याची योजना होती. नदीची लांबी अडुसष्ट किलोमीटर असून शहरात तिची लांबी अठरा किलोमीटर असल्याचं सिद्ध झालं.
नागनदीचा प्रकल्प आणि या प्रकल्पाचा केंद्र साठ टक्के, राज्य सरकार पंचवीस टक्के आणि महापालिकेला पंधरा टक्के भार उचलणार होते. परंतु तसा कोणीच भार उचलायला तयार नव्हते. त्याबरोबरच स्वच्छता अभियानात नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीन नद्यांची स्वच्छता होणार होती. नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाचा एकूण खर्च २४३४ कोटी रुपये होता. पंच्यांशी टक्के कर्ज जपान सरकार उपलब्ध करुन देणार होते. महापालिका पंधरा टक्के गुंतविणार होते. जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सी पंच्यांशी टक्के अर्थसाहाय्य करणार होते. त्यापैकी केंद्र सरकारला साठ टक्के आणि राज्य सरकारला पंचवीस टक्के अर्थसाहाय्य करणार होते. परंतु सर्व गोष्टी आज थंडबस्त्यात गोळा होत्या. अजुनही नागनदी स्वच्छ झाली नव्हती.
नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पानंतर फान्सच्या मदतीने नागनदी दर्शनी भागाचा विकास म्हणजेच नागनदी रिव्हर फ्रन्ट डेव्हलपमेंट प्रकल्प राबविला जाणार होता. १६०० कोटींचा हा प्रकल्प फ्रान्स सरकारच्या निधीतून राबविला जाईल अशी घोषणा झाली होती. फ्रान्सच्या ए. एफ. डी. तांत्रिक संस्थेने देशातील तीन शहरांची निवड केली होती. ज्यात नागपूरचाही समावेश होता. नदीला लागून पर्यटन स्थळ विकसीत करण्यात येणार होते. त्याचबरोबर त्या स्थळालगतच फूड फ्लाझा, कॅफेटेरिया व इतर सोयी राहणार होत्या. सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प व सौरऊर्जा निर्मितीचादेखील यात समावेश होता. परंतु बरीच वर्ष झाली होती. घोषणा घोषणाच होत्या. ती आश्वासनंच होती आणि अंमलबजावणी मात्र शुन्य होती.
गणेश बोलत होता त्या पवित्र आत्म्यांशी. तसा त्याचा शेवटचा प्रश्न होता. तो म्हणजे त्यांची एकमेकांची माहिती त्या एकमेकांना कशी? त्यावर त्या सर्वांनी आपआपल्या परीनं उत्तर दिलं. तसे शेवटी रघुजी राजे म्हणाले,
"आम्ही रोजच इथं भेटत असतो आणि रोजच काही ना काही चर्चा करीत असतो. रोजच आम्ही आमच्या पराक्रमाची चर्चा करीत असतो आणि आपल्याबद्दलची माहितीही आम्ही एकमेकांना अगदी सहजपणानं सांगत असतो. आज तीच आमची माहिती तोंडपाठ झालेली आहे. आमचं भेटण्याचं स्थळ हेच ते काशीबाईचं मंदीर असून इथं पंजाबराव देशमुख आणि कधी कधी खुद्द बाबासाहेबही येतात. ज्यांनी ज्यांनी नागपूर विकासासाठी प्रयत्न केले, ती सर्व मंडळी इथं येतात. त्यात बख्त बुलंद शहाही असतो. खांडक्या बल्लाळही असतो आणि चांद सुलतानही. आम्ही हिंदू, मुस्लीम वा बौद्ध शिख वा ख्रिश्चन हा भेदभाव करीत नाही. ना आम्हाला कोणत्या जातीचा भेदभाव असतो. आम्ही ना एस सी मानत. ना ओबीसी ना ओपन. आम्ही गरीब श्रीमंतीचा, उच्च नीचतेचाही भेदभाव पाळत नाही. आमची जात व आमचा धर्म एकच आहे. ना आम्ही एकमेकांशी भांडत तुमच्यासारखं धर्म व जातीवरुन. ना कोणत्या मालमत्तेवरुन. आम्ही एक आहोत व आमची जातही एक आहे आणि आमचा धर्मही एक. फरक एवढाच की तुम्ही मानव आहात आणि आम्ही प्रेतात्म्ये."
रघुजी राजे तृतीय बोलून गेले होते. त्यांनी आपली खंत व्यक्त केली होती. त्याचबरोबर गणेशच्या बाळबोध मनातील सुसंस्काराला योग्य ते खतपाणी मिळालं होतं.