Maitri books and stories free download online pdf in Marathi

मैत्री

            मित्र,सखा,सोबती,दोस्त असे कितीतरी समानार्थी शब्द मैत्रीसाठी आहेत. आपण लहानपणापासून मित्र बनवतो. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसा आपला मित्र परिवार वाढत जातो. त्यासोबतच काही बालपणीचे मित्र दुरावतात देखील. पण त्यांच्या आठवणी कधीच दुरावत नाहीत. आनंद व्यक्त करण्यासाठी मित्र आवश्यक आहे. दु:खावर फुंकर घालण्यासाठी मित्र आवश्यक आहे. योग्य दिशा दाखवण्यासाठी मित्र आवश्यक आहे. एवढेच काय आपल्या लग्नाच्या वरातील नाचण्यासाठी देखील मित्र आवश्यक आह. आपल्या आजारपणात मित्र आपलं औषध असतो. आपल्याला झालेल्या जखमेसाठी मित्र मलम असतो. जेथे आपण चुकत असतो तेथे आपल्या कानाला धरुन चांगल्या मार्गावर घेवून येणारा देखील मित्र असतो. आपल्या बद्दल ज्या गोष्टी आपल्या घरच्यांना माहित नसतात त्या सर्व गोष्टी आपल्या मित्राला माहित असतात. रक्ताचा नसला तरी रक्ताच्या नात्यापलीकडे जीव लावतो तो मित्र असतो.

            आपल्या आयुष्यात खूप मित्र येतात. पण त्यातील काहीच मित्रांच्या मनाशी आपले मन जुळते. त्याचे व आपले विचार काही प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात जुळतात.ते आपले जवळचे मित्र बनतात. एक वेळ पाहुण्यांना काही गोष्टी मागण्यास माणूस कचरतो पण मित्राकडून हक्काने एखादी वस्तू घेतो. शाळेत डबा नसला तरी आपल्या डब्यातला अर्धा डबा मित्र आपल्याला देतो. लहाणपणी लेमन गोळी शर्टामध्ये धरून दाताने अर्धी करुन खायला देणारा मित्र देखील कर्णापेक्षा जास्त दानशुर वाटायचा.

            कितीही दु:ख असले तरी मित्रांमध्ये गेल्यावर प्रसन्नता येते. मित्र म्हणजे प्रत्येक दु:खावर जालीम उपाय असणारं रामबाण औषध आहे. तसे सर्वच मित्र चांगले नसतात. काही मित्र वाईट देखील असतात. त्यामुळे कोणापासून किती अंतर ठेवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला मित्र परिवार जसा असतो तसेच आपण घडत असतो. त्यामुळे चांगल्या मित्रांमध्ये राहिलं पाहिजे. वाईट मित्रांमध्ये राहिलो तर आपल्यावरही वाईट संगतीचा परिणाम होतो. प्रत्येक माणूस परिपूर्ण नसतो. तसाच आपला प्रत्येक मित्र परिपूर्ण नसतो. त्यामुळे मैत्री टिकवण्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष देखील केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण मित्राकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो पण तो आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही. त्यामुळे आपण नाराज होतो. पण आपण त्याच्यावर नाराज होण्यापुर्वी त्याची मजबुरी लक्षात घेतली पाहिजे. तो आपली अपेक्षा का पूर्ण करु शकला नाही हे जाणून घेतलं पाहिजे.

            बऱ्याच वेळा आपल्याला क्रिकेटमधील एखादा खेळाडू किंवा सिनेमातील एखादा नट आवडत असतो. तो नट किंवा खेळाडू कधी आपल्याला भेटलेला देखील नसतो किंवा त्याने कधी आपल्याला पाहिलेले पण नसते. पण त्याच्या बद्दल आपला एखादा मित्र काही वाईट बोलला तर आपण त्या मित्राबरोबर भांडण करतो. खरं पाहिलं तर आपल्या अडचणीवेळी आपला मित्रच आपल्या कामी येणार आहे. तो नट किंवा तो खेळाडू नाही. हे आपल्या लक्षातच येत नाही. उलट आपण त्यांच्यापेक्षा आपल्या मित्राला गौण समजतो.

            आपला मित्र यशस्वी झाला. तर आपल्या मनात त्याच्याविषयी असूया निर्माण होते. आपण त्याचा द्वेष करु लागतो. पण हे लक्षात घेतलं पाहिजे आपला मित्र पुढे गेला म्हणजे तोच आपल्या कामी येणार आहे. त्यामुळे मित्र पुढे गेल्यावर त्याचा कधीच द्वेष करु नये.

            मैत्रीमध्ये एकमेकांना मदत करायलाच हवी. पण ती मदत करताना आपल्यामध्ये मतभेद होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण आपल्या मित्राला उसने पैसे देतो पण त्याच्या अडचणीमुळे ते पैसे आपल्याला वेळेवर परत येत नाहीत. त्यावेळी त्या पैशांवरून मैत्रीमध्ये भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैत्रीमध्ये आर्थीक व्यवहार करताना थोडा सांभाळूनच व्यवहार केला पाहिजे.

            आपण मित्रांकडून अपेक्षा ठेवतो. आपणही कधीतरी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. कोणतंही नांत टिकवायचं असेल तर त्याची गरज दोघांनाही असावी लागते तरच ते नाते टिकते. त्यामुळे एखादेवेळी मित्र चुकला तरी दुर्लक्ष करा. कारण त्याला मैत्री कळत नसेल पण आपल्याला तर कळते ना. मैत्रीमध्ये एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे असते.

            वाईट मित्रांपासून दूर रहा व चांगल्या मनाचे, चांगल्या विचारांचे, जिवाभावाचे मित्र बनवा व जीवन समृद्ध करा.

 

लेखक, कवी- संदीप खुरुद

           

इतर रसदार पर्याय