मरीमाय - भाग 1 Sanjay Yerne द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मरीमाय - भाग 1

मरीमाय

भाग १

 

   अंगणात कोंबडी पचकन हागली. तसाच शामराव तिच्या पिवळ्या-पातळ हगवणीकडे पहात विचारात गढला गेला होता. समध्या अंगणात कोंबड्या पचपच हागून चिचळ्यानं अंगण सप्पा भरवून ठेवलं होतं. त्याला कोंबडी पोसण्याची आता किळस आली होती. पण याच कोंबड्यांनी त्याला जगवलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे जमेल असाही त्याला विचार आला. त्यांची मुलाबाळाप्रमाणे तो देखभाल करीत राहिला होता.

   त्याचं कोंबडीकडे एकसारखं लक्ष गेलं. त्याला ती कोंबडीची झुरणीला आलेली वाटत होती. उकाडा प्रचंड वाढल्याने कपाळावर येणारा घाम त्याने आपल्या दुप्पट्याने पुसला होता. तरीपण सहन न झाल्याने अंगातली बन्यान काढून बाजूला फेकून दिली. पुन:श्च त्याने ती बनियान हलकेच उचलून शरीराला पंख्यागत गरगर फिरवत हवा घेऊ लागला. त्याला या वैशाखाच्या उन्हाती थोडी दाहकता कमी झाल्याचा भास झाला. थोडसं त्याला बरं वाटलं. बाजूच्या सपरीतल्या माठातील ग्लासभर पाणी पिलं. पाणी आपल्या घशात कोंबताच त्याला थोडे पुन्हा बरे वाटले. एवढ्यातच त्याची बायको निर्मला आतल्या खोलीतून बाहेर तरातरा चालत आली.

   “का करावं काय पण समजत नाय? हे तलंग तं लाईलाई करते.”

   “अवं माणसाचचं जगणं येवढं कठीण झालयं तं ह्या कोंबड्या कशा काय राहतील.”

   “काऊन वं काय झाला आता?”

   “आता काय सांगू निर्मले तुले. पाह्यना आता कोंबड्या कशा झुरल्यावाणी करतेत. पाह्यना हिची चिचळी.”

   “हो नं बाप्पा... झुरणी तं नाय लागल्या.”

   “माले पण तसंच वाटत हाय. आता का करून तं..?”

   शामरावच्या प्रश्नाने निर्मला पण विचाराच्या तंद्रीत गेली. वरणीच्या सावलीत आता कोंबडी अंग चोळून बसली होती. आता तिला पकडाले गेले तरी ती सापडणार नव्हतीच. पण शामरावने तिला पकडायचा प्रयत्न केला होता. तशीच ती झपकन उडी मारून कोरकोर करत दूर पराली होती.

   “आता राहू द्या नं वं. एवढ्या दुपारले ते तुमले कोठं सापडणार आहे. मग पाहू सांजच्याले....” निर्मलेनं त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणलं.

   शामराव कोंबड्याकडं पाह्यतच राहिला. चांगल्या वीस-पंचवीस कोंबड्या आता तयार झाल्या होत्या. एक-एक, दीड किलो वजनाच्या कोंबड्या चारशे रुपयाच्या भावाने विकल्या जाणार होत्या. पण एकाएकी अशा कोंबड्या झुरू लागल्याने त्याला काहीपण धन आरजणार नव्हते म्हणूनच तो चिंतेत होता.

   त्याने पुन्हा सपरीत येत ग्लासभर पाणी पिलं आणि वराण्यावर मगाशी काढून ठेवलेली बन्यान अंगात घालत तो तरातरा पायात वाहणा घालत समोरच्या गल्लीतून जाऊ लागला.

   निर्मलाला वाटलं होतं, नेहमीच्या सवयीप्रमाणे वडाच्या झाडालगत गंजीबा खेळत असलेल्या लोकांत जाऊन गप्पागोष्टी करत राहील. म्हणूनच गेला असेल. पण दुपारची चहाची वेळ झाल्याने त्यांनी ‘चहा बनव.’ असं काही न म्हणताच तसच निघून गेल्याने ती पण विचारात गडली होती.

   काही वेळाने निर्मलेनं बाजूच्या तुराट्या, काळ्या काढून घेऊन सपरीतली चूल पेटवली. आगडब्बीची काडी लावताच तुराट्या जळून त्याचा धूर होऊ लागला. चुलीवर लहान गंज मांडून त्यात पाणी घातलं. साखर-पत्ती टाकत तपवायला ठेवलं.

   तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि लगेच तिने आपल्या पोरी लक्ष्मीले आवाज देल्ला.

   “लक्ष्मे, जा पाह्यं बरं, तुह्या बा वडाच्या झाडाकडं तरातरा गेला. जा आण त्यास्नी बोलावून. त्यानले चहा पेवले ये म्हणा....”

   लक्ष्मी आईचे सांगणे ऐकून घराबाहेर समोरच्या गल्लीतल्या वडाकडे बापाला बोलवायला धावतच पळाली. तेवढ्यात निर्मलेने घरातून मूठभर कन्या-कुक्कुस आणून कोंबड्यांना टाकले होते. आनं लगेच वीस-पंचवीस कोंबड्या कोरकोर करत भुकेने दाणे खायला एकावर एक झुंडत आल्या होत्या.

   शामरावले एक एकर शेती होती. पण वर पाण्याची. शेती कधी साथ देवाची तर कधी कोपाची. दोघंही नवरा-बायको मिळेल त्यावर रोजीरोटी करून आपलं घर चालवीत राहिली. पण दोन सालापूर्वी निर्मलेनं आपल्या माहेरून एक कोंबडी आणली. तिची पिलावळे होऊन आता भरपूर कोंबड्या झाल्या होत्या. यंदाच्या वर्षात तीन-चार हजाराच्या कोंबड्याचे विकून झालेल्या होत्या. यामुळे त्यांनी कोंबडीपालन यावरच लक्ष केंद्रित केलं होतं. पण घरच्या घरी कोंबडी पोसताना तरास होवाचा. कोंबड्या याच्या त्याच्या घरात घुसाच्या. जागोजागी हागून ठेवाच्या आनं जागा उकरून पण ठेवाच्या. कोंबड्या जागा उकरतात म्हणून अनेकदा भांडण व्हायचे. कधी-कधी वाटायचं नको ह्या कोंबड्या. पण त्याले पर्याय नव्हता.

   कुणीतरी सांगितलं होतं. शहरात शेड तयार करून कोंबडीपालन करतेत. तसं करा. पण घरात हे जागेमुळे शक्य नव्हतं आणि शेत तर फार दूरवर होतं. शेतात पाणी, लाईट व्यवस्था पण नोहती. तरीपण शामरावच्या मनात यायचं. आपण तालुक्याले जाऊन कोंबडीपालन समजून घ्यावं नं तसंच करावं. थोडेफार कर्ज काढून शेड तयार करावा आनं अमदा याचाच अनुभव घ्यावा. शेतीपेक्षा हा धंदा बरा हाय. निव्वळ गावठी कोंबडीला लई भाव आहे. चांगली मागणी पण आहे. पण त्या दोघा नवराबायकोचा नुसता विचारच राहिला होता. कृती होणं दुरच होतं.

   शामराव वडाच्या झाडात न मिळाल्यानं पोरगी घराकडे परत आली होती.

   “कुठं गेला का बाप्पा? दिसलाच नाही तिथं. त्या वडात पण नाह्यं.”

   “राहू दे नायतर..! आल्यावर पेईल. तू पेऊन घे...”

   निर्मलेनं हातात फडका घेत चुलीवरील गरम चहा उतरवत फुटक्या कपात काढला होता. तिने एक कप लक्ष्मीले दिला. दोघीही चहा पिऊ लागल्या. तेव्हा पुन्हा एक कोंबडी जवळ येत पचकन दरवाज्यात हागली. पिवळी-पांढरी हागल्याने निर्मलेच्या तोंडातला चहा किळसतेने घशातून बाहेर गेला होता.

   शामराव बन्या बापूच्या घराकडे गेला होता. बन्या बापूचा पोरगा विनोद ढोरांचा डॉक्टर कोर्स करून गावात आलेला. त्याच्याकडे जाऊन शामरावने कोंबड्याचे झुरण्याबाबत विचारलं होतं.

   “अरे शामराव, माणूसच एवढ्या उन्हात लहाकते तं या गर्मीत कोंबड्या कसं काय राहणार? त्यांना थंड हवेची गरज हाय. त्या उन्हा-तान्हात जगू शकत नाही. तव्हा तुम्ही त्यांना लगेच विकून टाकलेलं बरं! नाहीतर त्या जगणं कठीण हायेत.”

   विनोदने त्यांना सटरफटर माहिती दिली. त्यांना कोंबड्या झुरण्याचं कारण पटलं होतं. तालुक्यावरून आणलेली औषधी विनोदने देत त्याला कणकीत चारायला सांगितले होते.

   शामराव घराकडे परत आला. त्यांच्या डोळ्यासमोर आता कोंबड्या वं त्यायचे झुरणे दिसत होते.

   “घ्या न वं चहा.... कुठं गेलत्या तं पोरगी हाका माराले आली तर कुठे गायब होते का?”

   “हं त्या बन्याबापूच्या घराकडे त्याच्या डॉक्टर पोराले विचाराले गेलो होतो. तो म्हणला कोंबड्याले सावलीत थंड ठिकाणी ठेवा नाही तं विकून टाका. सध्या त्याने चारायला औषध देल्ली.”

   चहाचा घोट मारतच तो बायकोशी बोलत राहिला. एवढ्यातच शेजारची मैनाबाई आली. त्यायचं म्हणणं आयकून ती म्हणाली, “काय झालं निर्मले? कोंबड्या झुरत आहेत का?”

   “पाह्यं नं वं बाई, कोंबड्या कशा करून राहिल्या तं... या उन्हाची लाईलाई...”

   “हो नं बाप्पा का करशीन वं आता..? अवं म्या उसनी साखर मागाले आलती. दे नं व वाटीभर साखर, घरात एकपण नाय.... चहाची तलफ पण आली हाय.”

   “जा नं वं लक्ष्मे दे बरं वाटीभर साखर...”

   “उद्या वापस करीन...”

   “करशीन घे कवापण...”

   लक्ष्मीने मैनाच्या हातातली वाटी घेत घरातून साखर आणायला गेली.

   “पण म्या काय म्हणतो, कोंबड्यायले मरी आली असन... त्या अगोदर तू मरीमायेले पाणी काऊन नाही घेऊन जात...” मैनाबाईने निर्मालास म्हणाली.

   “व्ह्यं का? पाहा लागल बाप्प्पा...”

   लक्ष्मीने साखर वाटी तिच्या हातात दिली. मैनाबाई आपल्या घराकडे वाटी घेऊन निघाली. आणि निर्मला तिच्या बोलण्याकडे लक्ष देत विचार करीत, कोंबड्याकडे पाहू लागली. पुन्हा एक कोंबडी झुरायला लागली होती.

   “आवं कणकीचा गोळा तरी बनव, त्यात हे विनोद नं देलेली दवाई तरी घालून चारू.” शामरावने तिला म्हटले.

   “बरं बाप्पा! तेपण करून पाहू....”

   दोघंपण कोबड्यांना कणकीचे गोळे करून चारू लागले होते. पण उष्णतेने लहाकणाऱ्या कोंबड्या आता चांगल्याच झिमेजल्याने त्यांना चारा खाणेही कठीण जात होते. शामरावचे  कोंबड्याचे धन आता वाया जाणार होते, विचाराचे चक्र पुन्हा सुरु झालेले.

   आनं मैनाबाईने सांगितल्या प्रमाणे गावातल्या टोकावरील असलेल्या मरीमायेच्या मंदिराची आठवण.... डोळ्यासमोर मरीमाय दिसू लागलेली...