बुद्धिमान बायको
भाग २
भाग १ वरुन पुढे वाचा ........
“मी स्टोअर चं ट्रेनिंग घेणार आहे चार दिवस. मग बघा स्टोअर कसं अप टु डेट करतो ते.” – वैशाख.
“अरे पण तुझं डिपार्टमेंट कोण सांभाळेल?” – साहेब.
“चिंता करू नका साहेब, सगळे ट्रेंड आहेत. आणि मी आहेच अव्हेलेबल तशीच जरूर पडली तर. मी काही बाहेर गावी जात नाहीये.” – वैशाख.
“ओके” – साहेब.
“तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहात? कुठे? आधी बोलला नाही?” – ललना.
“ट्रेनिंगच घेणार आहे, पण घरीच. आणि तूच देणार आहेस.” – वैशाख.
“शेवटी बायकोच सापडते ना चेष्टा करायला? नसेल सांगायचं तर नका सांगू.”-ललना
“नाही नाही, तू समजते आहेस तसं काही नाहीये. मला तुम्ही लोकं किचन मॅनेजमेंट कशी करता ते नीट समजाऊन सांग. म्हणजे माझी नवीन जबाबदारी मला समर्थ पणे पेलता येईल असा माझा विश्वास आहे.” – वैशाख.
अहो, काही तरीच काय? किचन वरुन तुम्ही फॅक्टरी सांभाळणार? लोकं हसतील तुम्हाला.” – ललना.
“त्यांची चिंता तू करू नकोस, ते मी बघेन.” – वैशाख.
“ठीक आहे. काय सांगू तुम्हाला? मला असं सांगता येणार नाही. तुम्ही विचारा, मग मी सांगते.” – ललना.
“ओके, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तू बोल. मला काही शंका असतील तर मी विचारेन.” – वैशाख.
“ओके,
नंबर १ रोजच्या रोज लागणारे पदार्थ किंवा वस्तु.
महिन्या भरात लागणारा अंदाज घेऊन त्याप्रमाणे भरून ठेवायच्या. म्हणजे गहू, तांदूळ, निरनिराळ्या प्रकारच्या डाळी, ज्वारीचं पीठ, तांदुळाचं पीठ, हळद तिखट, मोहरी, जीर आणि नेहमी लागणारे मसाले. चहा, कॉफी, दूध दही पूजेचं साहित्य साबण, साबण पाऊडर वगैरे.
नंबर २ अधून मधून लागणाऱ्या वस्तु.
म्हणजे पोहे, रवा, मैदा, चीज, पनीर, सावजी मसाला, दाणे, साबुदाणा, सुका मेवा वगैरे.
नंबर ३ सण वार किंवा वर्षातून एकदा किंवा चातुर्मासातच लागणाऱ्या वस्तु.
नंबर ४ भाज्या, फळं, आणि तशाच लवकर खराब होणाऱ्या वस्तु.
आणखीही बऱ्याच गोष्टी असतात की ज्या अगदी थोड्या प्रमाणात लागतात आणि वर्षातून केंव्हा तरी एकदाच लागतात. उदा.- पूजेच्या सुपाऱ्या, जानवी जोड, श्राद्धाला लागणाऱ्या वस्तु,
काही काही गोष्टींची अकस्मात जुळणी करावी लागते. उदा.- लग्नाचं, मुंजीचं किंवा वाढदिवसांचं प्रेझेंट. यांच्या साठी आधीच आर्थिक तरतूद करून ठेवावी लागते.
“बापरे, घरात एवढं सगळं पहायचं असतं, आणि तू ते करतेस?” – वैशाख.
“मी एकटीच नाही, सर्वच बायका संसाराची गाडी अशीच कौशल्याने चालवतात. तुमचं लक्षच नसतं. तुम्ही काय करता? स्पीडब्रेकर वरुन सुसाट गाडी नेता, आणि आमची डोकी छताला आदळतात. आणि आम्ही, संसारात कोणालाही दुखापत होणार नाही याची काळजी घेतो. संसार रथाचं मेंटेनन्स पण आम्हीच करतो. तुम्ही काय करता? फक्त या रथाच्या पेट्रोल चे पैसे देता.” ललनाचा फणकारा स्पष्ट दिसत होता.
“ओके ओके, अशी चिडू नकोस, आता मी तुला गुरूचा दर्जा दिला आहे, माझं शिक्षण अर्धवट नको टाकुस. सॉरी म्हणतो न मी तुला. प्लीज.” – वैशाख स्वरात शक्य तितका आर्जवी पणा आणून बोलला आणि ललना विरघळली.
सगळं तर सांगितलं तुम्हाला आता अजून काय राहिलं आहे?” – ललना
“सगळ्या सामानाची लिस्ट कशी करायची ते तर कळलं. आता काय कुठे ठेवतेस ते सांग. यांच्या मागे पण काही गणित असतं का?” – वैशाख.
“असतं तर. हे बघा, गहू, तांदूळ डाळ यांच्या मोठ्या कोठया असतात, त्या सर्वात खाली. वरच्या खणात, कणिक, ज्वारीचं पीठ तांदूळ आणि डाळीचे छोटे आठवड्या भरात लागणारे डबे. शेजारी चहा आणि साखरेचे डबे. रोज लागणारी चहा आणि साखर ओट्यांच्या ड्रॉवर मधे.
वरच्या खणात, हळद, तिखट, मसाले, मोहरी जिरं तूप, तेल वगैरेच्या मोठ्या बाटल्या. रोज लागणार सामान मिसळण्याच्या डब्यात आणि तो ओट्यांच्या ड्रॉवर मधे. कधी कधी लागणारं सामान, म्हणजे पापड, पोहे, बिस्किटं वगैरे वरच्या खणात. असंच गरज आणि फ्रीक्वेंसी प्रमाणे सामान लावायचं. जरूर भासल्यास जागेची आदला बदल करायची. या दुसऱ्या कपाटात क्वचित आणि अचानक मागणी होणारे पदार्थ ठेवायचे. उदा. आंबे हळद, तुरटी, वेखंड लहान बाळाच्या गुटी चं सामान, मेणबत्त्या, रांगोळी वगैरे. जसं आज मी मिरपूड काढून दिली. आंब्याच्या मोसमात ती नेहमी लागते, तेंव्हा ती ओट्याच्या ड्रॉवर मधे असते..
वैशाखला आता संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं होतं. तो खुशीत होता. मग ललनाने अनेक खाचा खोंचा समजाऊन सांगितल्या. आता गरज आणि सामानाची आंपूर्ती कशी करायची ते सांगितलं कशी चार दुकानं हिंडायची आणि सर्वात विश्वासार्ह दुकान कसं निवडायचं ते सांगितलं.
“सामान घरी आल्यावर, जसं असेल तसं लगेच लावून ठेवायचं नाही.”- ललना.
“मग काय करायचं?” – वैशाख.
“प्रत्येक सामान उघडून बघायचं. आपल्याला हवं तेच आलं आहे यांची खात्री करून घ्यायची.” – ललना.
“अग, जे मागवलं तेच दुकानदार पाठवेल ना, मग बघायचं कशाला?” – वैशाख.
“आता हे बघा, छोले, हे तीन प्रकारचे असतात. छोटे, माध्यम आणि मोठे. आपण साधारण माध्यम आकाराचे खातो, जर त्याने मोठे पाठवले तर वापस करावे लागतील. म्हणून बघायचं. साबुदाणा दोन प्रकारचा असतो, तुम्हाला बारीक आवडत नाही. बारीक आला तर काय करायचं? वरतून ब्रॅंड. आपल्याला काही काही ब्रॅंड ची सवय झाली असते. त्या लोकांना धंदा करायचं असतो, एवरेस्ट च्या ऐवजी बादशाह मसाला पाठवला की लगेच तुमची कमेन्ट असते, “आज भाजी नेहमी सारखी झाली नाहीये.” त्यामुळे हे सगळं बघावच लागतं. कोल्हापुरी च्या ऐवजी अंकापल्ली किंवा पतंजलीचा गूळ आला की पदार्थांची सगळी चवच बदलते.” – ललना.
“लले मला तुझा अभिमान वाटतो. कसली बुद्धिमान आहेस तू!” – वैशाख कौतुकाने म्हणाला.
“ते ठीक आहे हो, पण या सगळ्यांचा तुमच्या कामाशी काय संबंध आहे?” – ललना.
“ते तुझं गहू, तांदूळ गूळ वगैरे तपशील सोडून दे, प्रिन्सिपल महत्वाचं. याच प्रिन्सिपल वर मी आमच्या कंपनीच्या स्टोअरची उभारणी करणार आहे. एकदा ते झालं, की सर्व सुरळीत होईल.” वैशाख म्हणाला. “बोल काय गुरुदक्षिणा देऊ तुंला. आज तू म्हणशील ते.”
मग दोघ शॉपिंगला गेले, वैशाखच्या मते ते अतिशय बोरिंग काम होतं, आणि साधारण पणे तो टाळाटाळ करायचं, पण आजची गोष्ट वेगळी होती. ललना साठी त्याने पूर्ण वेळ चेहरा हसरा ठेवला होता, तिच्या बरोबरीने साड्या बघितल्या, चर्चा पण केली. मग बाहेर हॉटेल मधे जेवण. ललना एकदम खुश. आणि ती खुश म्हणून वैशाख पण खुश.
दुसऱ्या दिवशी वैशाख फॅक्टरीत हजर. साहेबांना जरा आश्चर्यच वाटलं.
“अरे तू चार दिवस सुट्टी घेतली होती ना? मग आज कसा काय आलास?” – साहेब.
“मला वाटलं होतं, चार दिवस लागतील, पण एकाच दिवसांत सर्व समजलं.” – वैशाख
“मग आज पासून स्टोअर चा चार्ज घेतो आहेस?” – साहेब.
“हो पण मला काही दिवस द्या, आधी परिस्थिती बघतो आणि मग काय बदल करायचे ते करतो. अजून काही दिवस तरी त्रास सहन करावा लागणार आहे”- वैशाख
साहेब काही बोलले नाहीत, नुसतेच थंबस् अप करून चालले गेले.
वैशाखने पूर्ण दिवस स्टोअरचं निरीक्षण करण्यात घालवला. दुसऱ्या दिवशी तो प्रॉडक्शन मॅनेजर बरोबर बसला. निरनिराळ्या बॅच ला लागणाऱ्या सामाना बद्दल माहिती घेतली, कोणच्या प्रॉडक्शन साठी कोणचं रॉ मटेरियल आणि किती प्रमाणात लागतं यांची यादी बनवली. मग प्लॅनिंग मॅनेजर बरोबर बसून पुढच्या दोन महिन्यांची लिस्ट घेतली. एवढं झाल्यावर, स्टोअर मधे जुन्या प्रॉडक्शन प्रोग्राम प्रमाणे जे प्रमाणाबाहेर सामान मागवलेलं होतं ते एका बाजूला काढल, त्यांच्या मुळे जागा अडत होती आणि कामात अडथळे पण येत होते. ते सर्व स्क्रॅप म्हणून विकून टाकलं. त्याचेच ५ लाख रुपये आले. स्टोअर आता बरंच मोकळं झालं होतं. मग व्हाइट पेंट आणून स्टोअरचे भाग पाडले. प्रत्येक भागावर बॅच चं नाव लिहून जड सामान जमिनीवर आणि बाकी रॅक् मधे लावून ठेवलं आणि प्रत्येक सामानावर लेबल लावले. एवढं झाल्यावर अत्यावश्यक आणि नेहमी मेंटेनन्स ला लागणारं सामान यांची विभागणी करून ते नीट लावून ठेवलं.
आता प्लॅनिंग प्रोग्राम प्रमाणे जे जे सामान हवं होतं त्या प्रमाणे परचेस डिपार्टमेंटला मागणी नोंदवली. हे सर्व करतांना त्याने आपल्या एका सहकाऱ्याला बरोबर घेतलं होतं, त्याला मटेरियल कसं तपासायचं त्याला ट्रेनिंग दिलं. तो आलेल्या मटेरियलचं क्वालिटी इन्सपेक्शन करणार होता, त्याने अप्रूव केल्यावरच मटेरियल स्वीकारल्या जाणार होतं आणि पेमेंट क्लियर होणार होतं.
ही सगळी व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित व्हायला जवळ जवळ तीन महीने लागले. त्यांच्या नंतर मात्र स्टोअर बद्दल कुठलीच तक्रार आली नाही. वैशाख ला एक कौतुकाचं सर्टिफिकेट मिळालं आणि प्रमोशन पण मिळालं. त्याचा सत्कार करण्यात आला. त्या दिवशी वैशाख ललनाला पण घेऊन आला होता, आणि या सत्काराची खरी अधिकारी ललना आहे आणि हे सर्व ललना मुळे शक्य झालं अशी जाहीर कबुली वैशाखने सत्कार समारंभात दिली.
समाप्त
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद
दिलीप भिडे