वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 Balkrishna Rane द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1

वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा : भाग 1

आजच्या युगात कोण कुणाशी आपल्या फायद्यासाठी कसा संबंध जोडेल ते सांगता येत नाही. अगदी ओढून-ताणून असे नातेसंबंध तयार करतात की, ज्यामुळे आपले काम पार पडेल. अशा ओढून ताणून आणलेल्या संबंधांना 'बादरायण संबंध' म्हणतात. ह्या म्हणीशी निगडित एक मजेदार कथा आहे.
एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहात होता. त्याच्या घरी लग्नकार्य होते. त्या निमित्ताने असंख्य पाहुणे मंडळी घरी जमली होती. अनेक परिचित येत-जात होते. त्या व्यापाऱ्याचे व त्याच्या घरातील मंडळींचे अनेक मित्रमंडळी होते. अगदी लग्नाच्या दिवशी एक बैलगाडी त्यांच्या घरासमोर थांबली. गाडीवान खाली उतरला. त्याने बैल मोकळे केले. तिथल्या बोरीच्या झाडाला बांधले. गाडीही व्यवस्थित झाडाखाली ठेवली. कुण्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे पाहून तो अगत्यशील व्यापारी धावत बाहेर आला. त्याने गाडीवानाचे स्वागत केले. तसेच बैलांना चारा-पाणी देण्याची व्यवस्था आपल्या नोकरांना सांगून केली. गाडीवान पाहुण्याची राहण्याची व्यवस्था केली. हा नवा पाहुणा चांगला दोन दिवस राहिला. या दोन दिवसांत व्यापाऱ्याच्या मनात अनेक

वेळा प्रश्न आला, हा नेमका कुठचा पाहुणा ? पण सरळ सरळ विचारणार
कसे म्हणून तो गप्प राहिला.
अखेर जाताना गाडीवानाने बैलगाडी जोडली, व्यापाऱ्याला नमस्कार केला. न राहवून व्यापाऱ्याने विचारले, “आपण कोण ? कुठच्या गावचे
आपण आमचे पाहुणे कोठून लागता ?"
गाडीवान यावर हसून बाजूच्या बोरीच्या झाडाकडे बोट दाखवून म्हणाल
“यजमान, आपल्या घरासमोर बोरीचे झाड आहे व माझ्या गाडीचीचाक पण बोरीचीच आहे. या दृष्टीने आपण एकमेकांचे पाहुणे झालो. बिचाऱ्या व्यापाऱ्याने कपाळावर हात मारून घेतला. मुलांनो याला, 'बादरायण संबंध' म्हणतात. अशा मतलबी लोकांपासून सावध राहायला पाहिजे. आपल्या अवती-भोवती असे अनेक मित्र असतात, जे आपले काम साध्य करण्यासाठी गोडगोड बोलत असतात. या संस्कृत वाक्प्रचाराला मराठीत 'कामापुरता मामा' अशी म्हण आहे.
बऱ्याच वेळा आपण अनेक काम एकाच वळा करण्याचा अट्टहास करतो व मग एकही काम धड होत नाही. सगळाच गोंधळ होतो. यालाच मराठीत 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी म्हण आहे. बरेच विद्यार्थी वर्षभर गाफील राहतात व परीक्षा जवळ आली की धावपळ करतात. अनेक विषयांचा अभ्यास करावयाचा असतो. मग मराठी पुस्तक हाती घेतात. थोडावेळ गेला ना गेला, इंग्रजी विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करतात. पुन्हा थोड्या वेळाने जाणीव होते की, अरे आपली गणितं सोडवायची राहिली आहेत. याचा परिणाम होतो की, परीक्षेत कुठल्याच विषयात व्यवस्थित मार्क पडत एक मजेदार गोष्ट प्रचलित आहे. नाहीत. यालाच म्हणतात 'एक ना धड भाराभर चिंध्या.' या म्हणीशी संबंधी
एका गावात एक शिंपी होता. त्याला एका परिचिताने एक कापड भेट दिले. स्वतः शिंपी असल्याने त्याने त्या कापडाचा स्वतःसाठी सदरा शिवायचे ठरवले. त्याने सदऱ्याचे माप घेऊन कापड कापले. पण तेवढ्यात त्याची पत्नी तिथे आली. तिने ते कापड पाहिले. त्याच्या पत्नीने हट्ट धरला की, त्या

कापडाची तिच्यासाही एक छानशी चोळी शिवावी. झाल बिचार्या शिष्याने सदर्यासाठी कापलेल्या कापडाला पन्हा कापले. चला आता चोळी... चोळी तर चोळी. त्याने चोळी शिवायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याचा छोटा मुलगा तिथे आला. त्याने ते कापलेले कापड पाहन भोकाड पसरले. त्याने हट्ट धरला की, त्या कापडाची त्याच्यासाठी बंडी शिवावी, शिंप्याने पुन्हा कापड कापले. आता त्या कापडाचे छोटे छोटे तुकडे झाले होते. मुलासाठी छोटी बंडी शिवण्यासाठी त्याने कापलेले कापड हातात घेतले. पण त्याच वेळी त्याची चार वर्षांची छोटी मुलगी आली. ती म्हणाली की, तिला तिच्या बाहुल्यांसाठी या कापडापासून बनवलेले कपडे पाहिजेत. झाले, पुन्हा कापड कापले गेले. आणि त्याचे चिंध्यांएवढे तुकडे झाले. एका सुंदर कापडाचे चिंध्याएवढे तुकडे झाले. म्हणून म्हणतात 'एक ना धड भाराभर चिंध्या,
गराठीत आणखी एक म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे 'कोंबडं झाकलं तरी उजाडायचे ते उजाडतेच.' याचा सरळ अर्थ म्हणजे एखादी गोष्ट कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती उघड होतेच, एखादी गोष्ट लपवण्यासाठी आपण खोटे बोलतो. मग खोट्याची मालिका सुरू होते. मग केव्हातरी सत्य उघड होते व आपण खजिल होतो. 'सत्यं शिवम सुंदरम्' असे म्हणतात. पण सत्य कठोर असते... सत्याला कधी ओरडून सांगावे लागत नाही की मी सत्य आहे. ते आपोआपच कळते. वरून सत्य हे कितीही कठोर-विदारक असले तरी अंतिमत: ते चांगले फळ देते. त्याचा परिणाम सुंदर होत असतो. म्हणून मुलांनो, नेहमी सत्य बोलावे...जे असेल ते सांगून टाकावे... लपवू नये. त्यामुळे गुंतागुंत कमी होते. मनाला टोचणी लागत नाही. असो. या संदर्भात एक सुंदर लोककथा प्रचलित आहे. ती पुढीलप्रमाणे
एका राज्याचा राजपुत्र खूप लाडावलेला, परंतु स्वप्नील असतो. सतत नव्या नव्या कल्पनांचा शोध घेत असतो. त्याला जगभरातले सुंदर सुंदर पक्षी गोळा करण्याचा छंद असतो. त्याच्या पक्षीसंग्रहालयात देश-विदेशातील असंख्य पक्षी होते. त्यांच्या देखभालीसाठी खास तज्ज्ञ माणसांची नेमणूक त्याने केली होती. चांदीच्या... सोन्याच्या पिंजऱ्यात पक्ष्यांना ठेवले होते.



त्यांच्या खाण्या-पिण्यासाठी विविध प्रकारची फळे बाहेरून मागवली होती. पण एके दिवशी एका फिरस्त्याने राजपुत्राला सांगितले की, दूर देशी कुणी एक पक्षी आहे त्याला सत्यपक्षी म्हणतातआणि तो असा एकमेव पक्षी आहे.त्याला अन्नपाणी गोड लागेना. स्वप्नातही त्याला तो सत्यपक्षी दिसू लागला झाले, राजपुत्राने पण केला की, हा सत्यपक्षी त्याच्याकडेच असला पाहिजे. अखेर त्याने दवंडी दिली की, जो कुणी हा पक्षी घेऊन येईल त्याला सोन्याच्यी थैली देण्यात येईल.पण कुणालाच तो पक्षी सापडला नाही. अखेर तो स्वतःच सत्यपक्ष्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला. त्याने अनेक देश पालथे घातले.अनेक घनघोर अरण्ये तुडवली.अखेर अशाच एका जंगलात तो पोहचला त. तिथे एका साधूने त्याला सांगितले की “याच जंगलात एका वृक्षावर असंख्य पक्षी बसलेले दिसतील, त्यातच तो सत्यपक्षी आहे.

जर तो त्या पक्ष्याला अचूक ओळखू शकला तरच तो पक्षी त्याच्यासोबत येईल! यासाठी राजपुत्राला एकच संधी मिळेल."
• झाले... तहानभूक विसरलेला तो राजपुत्र धावतच जंगलात पोहोचला. • जसा तो जंगलाच्या मध्यावर पोहोचला तेव्हा त्याला एक प्रचंड वृक्ष दिसला. तिथले दृश्य पाहून तो देहभान विसरला. अक्षरशः तिथे हजारो पक्षी नाचत- बागडत होते. विविध रंगांचे, विविध आकाराचे पक्षी मंजुळ आवाजात गात होते. त्यांच्या विलोभनीय नृत्यामुळे मन मोहून जात होते. राजपुत्राला बघताच सारे पक्षी ओरडू लागले, मीच तो सत्यपक्षी आहे. राजपुत्र गोंधळला. सत्यपक्षी तर एकमेव होता. मग हे सारे पक्षी मीच सत्यपक्षी आहे म्हणून का ओरडतायत ? अर्थात... सोन्याचा पिंजरा, मखमली गादी, सुंदर ताजी फळे यांचा मोह यामुळेच सारे ओरडत होते. पण यातला खरा सत्यपक्षी कोण असावा याचा विचार राजपुत्र करू लागला. त्याचे लक्ष एका सुकलेल्या फांदीवर बसलेल्या एका पक्ष्याकडे गेले. तो गुपचूप शांतपणे बसलेला होता. कापसासारखा पांढरा शुभ्र रंग होता त्याचा ! असे वाटत होते की, धुळीचा कण जरी त्याला लागला तरी तो चटकन नजरेत भरेल. त्या पक्ष्यात कसलेच सौंदर्य नव्हते. राजपुत्राने

त्याला विचारले, “सारे पक्षी मी सत्यपक्षी म्हणून ओरडतात, तू गप्प का?" तो पक्षी शांत सुरात म्हणाला,
“सत्याला ओरडावे लागत नाही की, मी सत्य आहे म्हणून ते आपोआपच कळते... जाणवते.'
राजपुत्राने ओळखले हाच खरा सत्यपक्षी आहे. तो म्हणाला,
“चल ये मित्रा. आपण परत जाऊया.” सत्यपक्षी हसून म्हणाला, “आजपासून आपण एकमेकांचे सोबती झालो. पण लक्षात ठेव... सत्याला सोन्या-चांदीचा, मखमलीच्या श्रीमंतीचा मोह नाही... मला कुणीच बंधनात अडकवू शकत नाही. ज्याक्षणी तू चुकशील त्या क्षणी मी तुझ्यापासून दूर जाईन.” राजपुत्राने मान डोलावली. त्याचे अंतरंग सत्याच्या सुंदर अस्तित्वाने झंकारत होते.

मुलांनो, नेहमीच सत्याचा मार्ग धरा. प्रवासात अडी-अडचणी निर्माण होतील. पण अंतिम यश तुमचेच असेल. ज्याक्षणी तुम्ही सत्याची साथ सोडाल तेव्हा आयुष्य तुमच्यासाठी ओझे बनेल. सहज. निकोप, हसत- खेळत जगा. शिक्षणाची कास धरून यशस्वी व्हा.

वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा: भाग 2

आपण रोजच्या जीवनात पदोपदी मराठी किंवा संस्कृत म्हणींचा वापर करत असतो. म्हणी छोट्या असतात. पण त्यांचा आशय फार मोठा असतो, ह्या म्हणी बोधप्रद असतात. त्यातून एखादा उपदेश, एखादे जीवनमूल्य मनात रुजवण्याचा प्रयत्न केलेला असतो. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो. या म्हणीच्या आड दडलेला अर्थ आपण जाणला की आपल्या व्यवहारज्ञानात भर पडते. विद्यार्थ्यांसाठी या म्हणी खूपच महत्त्वाच्या असतात. रोजच्या जीवनातील अनुभवांवरून निर्माण झालेल्या या म्हणी मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडतात. यातील गमतीचा भाग हा की, प्रत्येक म्हणीशी एक बोधकथाही जोडलेली असते. मुलांनो, अशाच काही म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा आज आपण पाहूया.
सर्वच माणसांना थोडाफार लोभ असतो. या लोभासाठी तो जगत असतो... सतत प्रयत्नशील असतो. परंतु लोभाचा अतिरेक होऊ देऊ नये. खरे म्हणजे कुठल्याच गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. संस्कृतमध्ये अशी एक म्हण आहे की, अतिलोभ झाला की मस्तकावर चक्र भ्रमण करू लागते मूळ संस्कृत म्हण अशी आहे.


अतितृष्णा न कर्तव्या चक्रं भ्रमती मस्तके।
या म्हणीशी निगडित पंचतंत्रात एक गोष्ट आहे ती पुढीलप्रमाणे : एका गावात चार मित्र होते. खूप कष्ट करूनही त्यांची गरिबी काही दूर होईना. आपले नशीब काढण्यासाठी त्यांनी दूर देशी जायचे ठरवले. भटकताभटकता ते खूप दूर घनदाट जंगलात पर्वतावर पोहोचले. चालता-चालता त्यांना तांबसर रंगाची माती व तांबूस दगड दिसतात. एक मित्र म्हणतो, "अरे, ही तर तांब्याची खाण आहे. आपण येथेच थांबू, आपली पैशांची चणचण मिटेल." पण इतर तिघांना वाटले, पुढे याहीपेक्षा अधिक मौल्यवान वस्तू आपल्याला सापडतील. ते तिघे पुढे निघाले. पहिला मित्र तिथेच थांबला. थोडे पुढे गेल्यावर एका दरीत रूपेरी दगड दिसू लागले. ही चांदीची खाण होती. दुसरा मित्र म्हणाला, “अरे वा, या खाणीवर आपण श्रीमंत होऊ. पुढे कशाला जाता ? येथेच थांबूया.' पण उरलेले दोघे मित्र आणखी पुढे गेले. त्यांना वाटले, पहिल्याला तांबे, नंतर चांदी सापडली. याचा अर्थ पुढे याहीपेक्षा अधिक काहीतरी सापडेल. पुढे जाता-जाता एका गुहेत त्यांना सोन्याचा भला मोठा साठा सापडला. तिसरा म्हणाला, “आपण येथेच थांबूया. सोन्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही बरं का? या सोन्याच्या खाणीवर आपण एखाद्या राजाप्रमाणे श्रीमंत होऊ.' पण चौथ्याला वाटलं, यात काही अर्थ नाही. यापुढे याहीपेक्षा काहीतरी मोठा लाभ होईल. कदाचित पुढच्या टप्प्यात हिरे-मोत्यांची खाण लागेल. तो तसाच पुढे गेला. पर्वत संपून वाळवंटासारखा भाग सुरू झाला. पाण्यासाठी इकडे तिकडे बघता बघता त्याला एक विलक्षण प्रकार दिसला. एक माणूस वाळूत उभा होता. त्याचे सर्वांग करपलेले होते व त्याच्या डोक्यावर एक भले मोठे चक्र फिरत होते. चौथ्या मित्राने त्या चक्रधारी माणसाला विचारले, “येथे पाणी मिळेल का? आणि हे काय तुमच्या डोक्यावर हे चाक का फिरत आहे?"
त्याने असे विचारताच त्या माणसाच्या डोक्यावरील चाक सटकून त्या चौथ्या मित्राच्या डोक्यावर बसले व गरगरा फिरू लागले. त्याने ते चाक

झटकण्याचा व तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे पाय जमिनीत घट्ट चिकटले होते व चाक डोक्याला!
मोकळा झालेला तो मूळचा चक्रधारी माणूस म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच तांबे, चांदी व सोने धुडकावून अतिलोभाने इथपर्यंत पोहोचलो होतो व माझ्या डोक्यावर हे चक्र बसले होते. मी, तुझ्यासारख्याच लोभी माणसाची वाट पाहात गेली काही वर्षे या वाळवंटात उभा होतो. तूही असाच दुसरा कोणी अति लोभी इथे येईपर्यंत उभा रहा. मी चाललो."
म्हणून अतिलोभ किंवा अतिरेक हा नेहमी वाईट असतो बरं का! मराठीत दुसरी म्हण बऱ्याच वेळा आपण ऐकतो ती अशी, तेलही गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे
याचा अर्थ असा की, आपण एखादी गोष्ट राखायच्या नादात त्या गोष्टीही गमावून बसतो व हाती काहीच राहात नाही. याच आशयाची दुसरीही म्हण आपण वापरतो ती म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणे. हितोपदेशात वरील म्हणीवर आधारित एक विनोदी गोष्ट आहे, ती पुढीलप्रमाणे
एका खेडेगावात एक गरीब बाई राहात होती. तिला रत्नाकर नावाचा एक मुलगा होता. नाव रत्नाकर असले तरी बुद्धीने तो कोराच होता. सांगकाम्या होत्या व त्यातही गोंधळ करायचा. असेच एकदा त्याच्या आईने सांगितले की, “बाळ रत्नाकर, जरा वाण्याकडे जाऊन तेल व तूप घेऊन ये. हे पैसे घे." रत्नाकर म्हणाला, “हा असा जातो व झटकन घेऊन येतो."
आई म्हणाली, "अरे, असा जातो व असा येतो काय? बाबा, भांडी घेऊन जा तेल व तूप आणण्यासाठी."
रत्नाकर देवघरात गेला. कोणते भांडे घ्यावे असा विचार करता-करता त्याला धुपाटणे दिसले. कधीही विचार न करणाऱ्या रत्नाकरन पहिल्यांदाच विचार केला की दोन स्वतंत्र भांडी नेण्यापेक्षा धुपाटणे बरे. कारण त्याला वर व खाली अशी दोन खोलगट भांडी आहेत. धुपाटणे घेऊन तो बाहेर पडला व आईला म्हणाला, “आई, येतो गं!"
आईने खात्री करण्यासाठी विचारले, “काय आणशील?"


रत्नाकर म्हणाला, “तेल व तूप. भांड पण घेतलंय."
जाईपर्यंत तो दोघांना धडकलासुद्धा. वाण्याकडे गेल्यावर त्याने रुपयाचे तूप व आठ आण्याचं तेल मागीतले. वाणी म्हणाला, "तुला माझ्याकडे फक्त तेल मिळेल. तूप पलीकडच्या दुकानावर घे."
रत्नाकरने धुपाटणे पुढे केले. धुपाटण्याच्या वरच्या खोलगट भागात तेल घेतले व पुढच्या दुकानात गेला. दुसरा वाणी म्हणाला, “तूप घ्यायला भांड आणलंस?" रत्नाकरने धुपाटणे उलट केले. तेल सगळे सांडून गेले... धुपाटण्यात तूप घेऊन तो सावधपणे घरी गेला. आईने सांगितलेले काम आपण बिनचूक केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. घरी गेल्या-गेल्या आईने विचारले, "वस्तू आणल्यास बाळा?" रत्नाकर म्हणाला,
"होय, हे काय तूप?" आईने विचारले,, “तेल कुठे गेले?" -
रत्नाकरने त्वरित धुपाटणे उलटे केले. “हे हे काय!” तेल तर आधीच सांडून गेले होते. पण धुपाटणे उलट केल्याने तूपही जमिनीवर सांडून गेले होते. आईने कपाळावर हात मारून घेतला. थोडक्यात तेलही गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे अशी स्थिती झाली. एकाच वेळी अनेक गोष्टी न करता नियोजनपूर्वक काम करून एक एक गोष्ट हातावेगळी करावी. ___ आणखी एक म्हण आपण ऐकतो ती अशी 'असंगाशी संग म्हणजे प्राणांशी गाठ'. थोडक्यात आपण आपला मित्र परिवार नेहमी पारखून घ्यावा, नाहीतर एखाद्या खट्याळ व वात्रट मित्रामुळे आपला जीव धोक्यात येईल किंवा आपण एखाद्या संकटात सापडू. याच अर्थाची संस्कृतमध्ये म्हण आहे.

एकरात्रिप्रसंगेन काष्ठघष्टाविडम्बना
फक्त एका रात्रीच्या प्रसंगाने एका गाईच्या गळ्यात लोढणे पडले व विटंबना प्राप्त झाली. ही म्हण पुढील गोष्टीवरून वापरण्यात येऊ लागली
एका माणसाकडे एक गाय होती. साधी भोळी व गरीब अशी होती. ती चरून झाल्यावर वेळेवर संध्याकाळी घरी यायची. कुणालाही त्रास द्यायची नाही. पण एके दिवशी ती घरी न येता दुसऱ्या नाठाळ गुरांबरोबर एका

वाटेवरच्या शेतात शिरली. शेतात शिरल्यावर गुरांनी पोटभर खाऊन घेतले व पिकाची नासधूस करून ती गुरे तिथेच विश्रांती घेत बसली. इतक्यात शेताचा मालक हातात सोटा घेऊन धावत आला. नाठाळ गुरांना नेहमीची सवय असल्याने मालकाला फसवत ती पसार झाली. परंतु त्या गरीब गाईला अशी सवय नसल्याने तिला पळता येईना. मालकाने तिला बराच चोप दिला व फाटक उघडून तिला बाहेर काढले. कशीबशी ती पहाटे गोठ्यात आली. तिच्या पाठीवरचे वळ बघून तिच्या मालकाला त्या वळाचे कारण समजले. त्याने तिच्या गळ्यात भलेमोठे लोढणे अडकवले व घंटाही बांधली.
एका सद्गुणी गाईला नाठाळ गुरांच्या एका रात्रीच्या संगतीनं गळ्यात लोढणे बांधून घेण्याची विटंबना प्राप्त झाली. असंगाशी संग धोकादायक असतो तो असा. याच संदर्भात हंस व कावळा किंवा कोल्हा व उंट या गोष्टी पंचतंत्रात आहेत. मुलांनो अशा या म्हणी, सुभाषिते व बोधकथा संग्रहित करा, त्यांचा उपयोग तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेत, कथाकथन स्पर्धेत, निबंध स्पर्धेत व परीक्षेतही होईल. तसेच समाजात कोणत्या प्रसंगी कसे वागावे हे सुद्धा कळेल. प्रसंगावधान प्राप्त होईल.

बाळकृष्ण सखाराम राणे
सावंतवाडी
*