कठोपनिषद - 2 गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कठोपनिषद - 2

कठोपनिषद २
यमराज म्हणाले, चांगली वस्तू (कल्याणकारक वस्तू) व आवडणाऱ्या वस्तू (सुखकारक वस्तू) या भिन्न असतात.
हुशार माणूस चांगले ते निवडतो अज्ञानी माणूस सुखकारक वस्तू निवडतो.
हे नचिकेता ! तूं योग्य ते निवडले आहेस. गुरुशिवाय हा विषय समजणार नाही.

तुझ्या सारखा शिष्य मला नेहमी मिळावा.
आत्मज्ञान देणारे कमी असतात पण योग्य गुरुकडून ज्ञान प्राप्त करणारे खूप कमी असतात.
अनेकांना हे श्रवण करण्याची संधी मिळत नाही, काही दुर्देवी लोकांना ऐकून पण समजत नाही. पण सांगणारा कुशल शिक्षक व ऐकणारा बुद्धिमान व योग्य असे क्वचितच घडते.
तू मोहाला बळी न पडता ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार झाला आहेस.

भोगाची आसक्ती सोडून दिली पाहिजे.

आनंद झाला तर माणूस कर्तव्य भ्रष्ट होतो, दुःखामुळे तो कर्तव्य करू शकत नाही.
मी तुला आता आत्मतत्त्वाबद्दल सांगणार आहे. मी तुला आता मोक्ष मिळण्यास पात्र समजतो.
आत्म्याचे वर्णन शब्दाने होऊ शकत नाही. स्पर्शाने त्याचे ज्ञान होऊ शकत नाही, त्याचे कोणतेही रुप नाही, त्याला चव अथवा वास नाही की जीभेने चव घ्यावी किंवा नाकाने वास घ्यावा.
सर्व इंद्रिये ज्याचा अनुभव घेतात तो आत्मा आहे. इंद्रिये, मन, बुद्धि या सर्वांचा एकत्रित अनुभव म्हणजे आत्मा.
इंद्रिये बहिर्मुख आहेत, ती आत बघू शकत नाहीत. इंद्रियामूळे बाहेरचे जग दिसते पण अंतरात्म्याचे दर्शन होत नाही.
मानवाचे उद्दीष्ट परमगती अथवा परमात्मा आहे.
त्यासाठी शरिर, इंद्रिये, मन, बुद्धि निरोगी असली पाहिजे. तसेचं आपण बाहेरील ज्या विषयांचे सेवन करतो ते पण चांगले असले पाहिजे.
पाणी आवश्यक आहे पण ते पाणी शुद्ध नसेल तर अनेक रोग होतात. तसेचं इतर सर्व इंद्रियाबाबत आहे. म्हणजेच संयम राखला पाहिजे.विषयांचे सेवन हे मर्यादित व योग्य झाले पाहिजे.

आत्मा जेव्हा मनाने युक्त होऊन डोळ्याशी जोडला जातो तेव्हा तो रुप पाहतो, कानाशी जोडला जातो तेव्हा ऐकतो तसेच इतर इंद्रियाशी संबंधित गोष्टींचा उपभोग घेतो.

मन नियंत्रणात नसते तेव्हा त्याची अवस्था नाठाळ घोड्यावर स्वार झाल्याप्रमाणे असते व तो इच्छित स्थळी न पोहोचता घोडा व घोडेस्वार खाली पडतात.
असंयमी मनुष्य संसार चक्रात अडकतो. जो ज्ञानी व संयमी असतो तो जन्म मृत्यू च्या चक्रातून मुक्त होतो.
जो आचरण चांगले ठेवत नाही, संयम ठेवत नाही तो दुःखी होतो. संयमी व चांगले आचरण ठेवतो तो परमपद प्राप्त करतो. (भगवद्गीता चौथा अध्याय हेच सांगतो.)
शरीररुपी रथ चांगल्या अवस्थेत राहिला पाहिजे. बुद्धि चांगली व मन संयमी पाहिजे. भोगांमध्ये फसू नये. शरीराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करावे असे नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग साधना केली पाहिजे.
इंद्रियांची तृप्ती करणारे विषय इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत, मन हे इंद्रिय विषयापेक्षा श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धि श्रेष्ठ आहे, बुद्धि पेक्षा अहंकार श्रेष्ठ, आत्मा त्यापेक्षा श्रेष्ठ व परमात्मा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून साधकाने मनाला बुद्धिचा वापर करून बळकट केले पाहिजे व अहंकारावर विजय मिळवला पाहिजे
आत्मा कशातुनही उत्पन्न होत नाही, त्याच्यापासून कांहीं उत्पन्न होत नाही.
तो नित्य, शाश्वत आणि क्षय किंवा वृद्धी रहित आहे. हे नचिकेता, परमात्मा जीवाच्या हृदयात अणुपेक्षा सूक्ष्म रुपात राहतो. निष्काम कर्म करणारा साधकचं त्याला जाणू शकतो. दुष्कर्मे करणारा, भोग, सांसारिक मोहात फसलेल्या माणसाला आत्मतत्व समजु शकत नाही. जीवात्मा, परमात्मा यांना सावली व प्रकाश म्हणतात. प्रकाशाने सावली बनते, प्रकाश नसेल तर सावली नसते. सावली म्हणजे अंधार नव्हे.
सावली म्हणजे जीवात्मा व प्रकाश म्हणजे परमात्मा. शरीर जीवात्म्याचा रथ आहे, बुद्धि सारथी आहे व मन लगाम आहे. आत्मा जेव्हा इंद्रिये व मनाशी जोडला जातो तेव्हा तो भोक्ता होतो. जसा सारथी घोडे नियंत्रणात ठेवतो तसे ज्याचे मन संयमी आहे तो इंद्रियांना नियंत्रणात ठेवतो.
नचिकेत व यमराज यांचा संवाद ऐकल्यास मनुष्याला ज्ञान प्राप्त होते.