ओढ - प्रेमकथा - भाग 2 Nikhil Deore द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ओढ - प्रेमकथा - भाग 2

' मी लिहलेले हे डायलॉग किती बनावटी आणी फसवे वाटतात.. याला खरेपणाची किनार असेलही पण मला असं का वाटत की ही भावना, हे असे मर्मबंधी संवाद म्हणजे चित्रपटांमूळे मनाच्या आम्रतरुला मुद्दाम बहरवलेला आल्हाददायी पिवळसर आम्रबहर आहे. तो आम्रबहर तर खरा आहे परंतु अवाजवी मानवी हस्तक्षेपामूळे फुलेलेला तो बहर मुळीच प्राकृतिक नाही. नैसर्गिक छटेच विलोभनीय सौंदर्यही त्याला नाही. मन म्हणजे द्रव्यजनक वस्तू असावी ज्याला कुठलाही विशिष्ट आकार नाही, ज्याला कुठलंही विशिष्ट रंग,रूप नाही.. कुठल्याही साच्यात टाकला की त्याच रूप तो धारण करून घेतो. स्वतःला बदलून त्याच्याशी एकरूप होऊन जातो. ही भावनाही अशीच काहीशी असावी.. रोज रोज नेत्राच्या पडद्यावर चालणाऱ्या फिल्मी जगताच्या चित्रफीतामूळे मनाचा आकारही तसाच होऊ लागत असेल. नकुलच्या मनाचा वारू विचारांच्या वायुतून सुसाट वेगाने धावत होता.
" नकूल ईथले काही संवाद काढून टाकले आहे वाटते तू.. बरोबर ना?" नजरेचा कटाक्ष नकुलच्या डोळ्यात फेकून रागात डायरेक्टर प्रभास म्हणाले.
" ना... ना.. नाही सर.. काहीच तर नाही बदललंय मी " नकुलची भीतीने गाळण उडली.
" खरंच ना?" डायरेक्टरांच्या क्रोधीत स्वरकक्षा अधिकच रुंदावल्या होत्या.
" हो.. हो.. सर जरा बदल केलाय" नकुल तर पार भांबावून गेला होता. आता काय कराव आणी काय नाही असं झालं होत. डायरेक्टर प्रभास सर फार कधी चीढत नसे... या विरुद्ध जर कधी ते चिढले तर फार अनावर होऊन जायचे म्हणून कुणीही त्यांना राग येईल असं काही करण्याच मुळीच धाडस करत नव्हत.
" काय बदल केलाय.. कुठले संवाद काढले आहे तू .. स्क्रिप्ट कुठे आहे?". नकूलने थरथरत्या हाताने स्क्रिप्ट दिली. त्याची नजर जमिनीवर खिळून होती. आता पुढे काय होईल याचा धूसर अंदाज त्याने बांधला होता. डायरेक्टरांनी स्क्रिप्ट पहिली एकक्षण टकमक नकूलकडे पाहिलं आणी खळखळून हसले.
" अरे मुर्खा एवढे सुंदर संवाद तू काढून टाकले.. खरंच कमाल वाटते तुझी. बर यात काय चूक वाटत एवढ तरी सांग" नकूलच्या पाठीवर हात ठेवत प्रभास सर म्हणाले. ज्या परिणामाचा नकूलने धूसर अंदाज लावला होता तस काहीही घडल नव्हतं. उलट प्रभास सरांना गंम्मत वाटली.
" सर मला अस वाटत की हे संवाद फार अनैसर्गिक आहेत.. यात जिवंतपणा नाही.. अस काही खऱ्या आयुष्यात घडत असेल यातही मला शंका आहेच" आपल परखड मत मांडत नकुल म्हणाला.
" Thats my boy! नकूल तूला माहीत आहे.. मी जेव्हाही तूला पाहतो ना तेव्हा माझ्या तरुणपणातला मूर्तिमंत प्रभास पुन्हा पाहतोय की काय अस वाटत. जेमतेम तुझ्या वयाचा असेल मी तेव्हा मिसुद्धा असाच होतो. तुझ्यासारखीच विचारसरणी.. तोच जोश.. तीच आपल्या दुर्गम ध्येयाला वाकवण्याचे पोलादी सामर्थ्य बाळगण्याचा दृढ निश्चय. त्या वयात प्रेमाप्रती माझीही अशीच भावना होती. पुढे जस जस वय वाढत गेल तस तस माझ मत परिवर्तीत होत गेल. ज्याप्रमाणे आगगाडी समोर चालतांना स्टेशन मागे पडतात अगदी त्याचप्रमाणे आयुष्याची ही आगगाडी पुढे चालतांनाही प्रीतीचे काही स्टेशन मागे सुटून जातात. त्यामुळे आपला दृष्टिकोन बदलतो. प्रेमाच्या भावनेप्रती आपल्या मनाचे गृह फिरतात. असो ही गोष्ट तूला वयानुसार कळेलच म्हणा. फक्त एकच सांगण आहे तुझ्या आयुष्यात जर तूला एखाद अस स्टेशन लागल ना तर ते स्टेशन सोडू नकोस. चल पुढचा शॉर्ट घेऊया " प्रभास सर तेथून निघून कॅमेरामॅनजवळ गेले. पुढचा शॉर्ट घेण्यात आला. नकूल त्या शॉर्टमधल्या संवादाने फारसा काही खूश नव्हता. तो अजूनही आपल्या मनात आपणच खरे या शब्दावर ठाम होता.

सलग तीन दिवस तिला न पाहल्यामुळे त्याच्या मनाचा झोपाळा विविध विचारांनी झुलत होता.. हेलकावे घेत होता. वास्तवीक सांगायच झाल्यास नकुल आणी ती फार कधी ऐकमेकांशी बोलले नव्हते. ती म्हणजे अमृता.. नावाप्रमाणेच गोड गुणी..शारीरिकदृष्ट्या जरा कृश होती..पाणीदार डोळे, धनुष्यासारख्या रेखीव भुवया, गालावर पडणारी खळी, गुलाबी ओठ, कमरीएवढे लांबसडक केस आणी या सर्वाला साजेल असा गहूवर्णीय रंग..नकूल आणी तिच्यात अबोलपणा ही गोष्ट समान होती. दोघेही आपण भल आणी आपल काम भल या विचारांचे होते. ती मेकअप टीममध्ये होती. मेकअप assistant म्हणून. तिने नवीनच मेकअप टीमला जॉईंट केलं होत. यातला तीचा पहिलाच अनुभव असावा. जुनिअर असल्यामुळे वेळप्रसंगी कलाकारांचे कपडेही प्रेस करावे लागायचे परंतु तिला याच काहीच वाटायच नाही. ती मिळेल ते काम करायची अगदी आनंदाने. यामुळेच कदाचित नकूलला तिच्याप्रती एकप्रकारच कुतूहल वाटत होत.

नकूलकडे भविष्यातला येणारा फार मोठा दिग्गज डायरेक्टर या नजरेने पाहिल जायच.. त्याच कामही तसच होत. कामाप्रती कसलाही हलगर्जीपणा त्यात नव्हता. यामुळेच नवीन कलाकारांची त्याच्याजवळ रांग लागलेली असायची. कितीतरी नट्या नकुलशी आधीच जवळीक साधत होत्या. प्रॉडक्शन टीमची कसलीही पार्टी असली की या क्षेत्रात येण्यास उत्सुक असलेला प्रत्येकजण नकूलशी ओळख करून घेण्यासाठी धडपडत असे. अमृता मात्र याला अपवाद होती. ती कधीच या रांगेत नसायची. प्रॉडक्शन टीमची कसलीही पार्टी असली तरीही एखाद्या कोपऱ्यात एकटीच बसून राहायची..हे सर्व रंग तिला नको होते. तीच जग सीमित होत. त्यात असल्या बेरंगी गोष्टींना थारा नव्हता. नकूलही जरा याच प्रकारातला होता. त्याचही जग सीमित होत परंतू ज्या क्षेत्रात तो भविष्यात काम करणार होता तिथे अस वागण साजेस नव्हतं. तुमचं संवाद कौशल्य त्यातली सुसूत्रता, परिस्थिती हाताळण्याचा कुशलपणा हेच भविष्यात सामान्य माणसाला यशस्वी दिग्दर्शक बनवतात म्हणून या सर्व गोष्टींशी जुळवून घेण नकूलला अनिवार्य होत. नकूल आणी अमृता मोजून ऐकमेकांशी दोन - तीन वेळा बोलले असेल. मागच्या महिन्यात नकूलचा वाढदिवस होता तेव्हाच त्यांचा अल्प संवाद झाला. त्या संवादातही Happy Birthday sir एवढंच होत. त्यापेक्षा कसलीही शब्दांची देवाण घेवाण झाली नाही.

शॉर्ट संपला त्या दिवसाच पॅकिंग झाल. सुर्य पश्चिमेकडे वळला..सूर्यदेवांच्या रथाची पिवळसर धूळ सर्वत्र पसरत होती.
नकूल आपल्या रूमवर पोहचला.. त्याच्या मनात आज फार अस्थिरता वाटत होती. राहून राहून तिला भेटाव असंच वाटत होत. तिच्या ओढीतला अनामिक प्रवाह बलाढ्य होत चालला होता. ही कुठली भावना आहे? का मन एवढ चलबिचल होत आहे? तीची एवढी का आठवण येतेय मला? असे अनेक प्रश्न तो स्वतःलाच विचारत होता. याच उत्तर त्याच्याकडे होतंही आणी नव्हतंही.. तो मध्येच कुठेतरी अडकून होता असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.. नकूलने मेकअप टीमकडून तिची माहिती काढली.. तेव्हा त्याला समजलं की तीचा जेव्हा त्यांना शेवटचा कॉल आला तेव्हा ती फार आजारी होती.. घरची परिस्थिती फार जेमतेम आहे म्हणून हे शहर सोडून ते पून्हा त्यांच्या मूळ गावी जात आहे. उद्याच दुपारी ते निघणार आहे.
" मला तिचा नंबर मिळू शकेल का ? " नकूलने सोनाली मेकउप आर्टिस्टला विचारले.
" सॉरी सर तीचा कॉल unknown नंबर वरून आला होता आणी माझा मोबाईल फॉरमॅट केल्यामुळे कॉल हिस्टरी डिलीट झाली आहे. तीचा नंबर तर बऱ्याच दिवसापासून स्वीच ऑफ येतोय जर तुम्हाला तीचा नंबर हवा असेल तर मी लगेच सेंड करते " तिकडून सोनाली बोलत होती.
" ओके चालेल.. लगेच सेंड कर " नकूल अधीर स्वरात म्हणाला. सोनालीने अमृताचा नंबर whatss app केला. नकूलने तो नंबर बराच वेळ ट्राय केला तरी हा नंबर स्वीच ऑफ आहे हेच वाक्य त्याला ऐकायला मिळत होत.
नकूलच्या मनात एक एक विचार पुढे येऊन फुलत होते.. उद्या अखेरच्या कथेचा शेवटचा शॉर्ट आहे..ज्या कथेच्या शेवटच्या शॉर्टवर एवढं काम केलंय तो शॉर्ट सोडून भलतच कुठेतरी जावं? ज्या क्षेत्रात अजून आपलं पदार्पण झालं नाही त्यासाठी एवढा त्याग करावा का? या ओढीत वाहून जाव की स्वतःला सावरून आपल्या करियरकडे पाहावं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात थैमान घालत होते. वरून उद्याचा शॉर्ट संपला की की तो तीन - चार महिन्यासाठी अमेरिकेला जाणार होता.. काही ग्राफिक्स शिकण्यासाठी.. त्याच्यापुढे फार मोठा प्रश्न उभा होता.. एकीकडे फक्त ओढ होती तर दुसरीकडे कॅरिअर.. अमाप पैसा, नाव, रुतबा आणी संपत्ती होती.

क्रमश..

अखेरचा भाग काही तासात