देवाचं देवपण
ऐन उन्हाच्या कारात चिरगुटं धुवून हैराण झालेला भग्या परीट आणि त्याची मागारीण जनी....भिकशेट तेल्याला सहा चेडवांच्यापाठीवर कळंबेश्वर मुळवसाच्या नवसाने झालेला झील....भिकशेट म्हणजे गाव ऱ्हाटीतली तालेवार असामी... पिढीजात सावकारी नी सात खण्डी भाताचा मळा. पण त्याच्या बायकोला हारीने सहा चेडवंच झाली.सहाव्या खेपी चेडूच झालं तेंव्हा तेल्याच्या म्हातारीने असा गळा काढला की शेजारच्या घाडी वाडीतले बापये काय झालं म्हणून समाचाराला तेल्याच्या खळ्यात जमले. म्हातारी भलतीच कातावलेली. सून अवलक्षणी म्हणून नातू झाला नाही अशीच तिची धारणा. चिरक्या आवाजात करवादत म्हातारी बोलली, “ दाजी गावकरा, आता माजा आयक्. ह्या इदरकल्याणी सुनेक काय झील होवचो नाय, मज्या भिक्याक दुसरां लगिन करूक सांग. मी पिकला पान... कवा गळात काय भरवसो नाय... नातवाचा मुख बगून मी सुकान डोळे मिटीनऽऽ.... भिको तुजा आयकात ...”
दाजी घाड्याने म्हातारीची समजूत काढली. “ ह्या बग गंगाय ऽऽ लेकरा म्हंज्ये द्येवाचा देणां . मेघाचा नी गर्भाचा मान्साच्या हातात नाय. झिलाचा दुसरा लगिन क्येलस नी नया सुनेकव पुन्नाचेडूच झाला मग्ये? त्ये पेक्षा मी काय सांगतय तां नीट आयक्.... कळंबेश्वर मुळवसाक गाराणां घालुया.... पंचवीस नाराळ नी सोन्याची पुतळी बोलॉया.” मग शिवरात्रीच्या दिवशी बारा पाचाच्या मेळात दाजीने भिकशेटीला मुलगा होण्यासाठी कडकडावून गाऱ्हाणं घातलं. नवसाला पावणारं जागृत देवस्थान म्हणून अख्या कोकणपट्टीत कळंबेश्वराला दक्षिण काशी म्हणत . शेकडो वर्षांपूर्वी गाव वसला त्या वेळच्या आख्यायिका नी वदंता जुने जाणते अगदी रंगवून रंगवून सांगत. देवाच्या वार्षिकोत्सवात हरभट बोंडाळे बुवा शिवरात्रीच्या कीर्तनात कदंबेश्वराची आख्यायिका हमखास सांगायचे.
कांदळगाव वसला तेव्हा जुन्या जाणत्यानी क्षेत्रपालम्हणून मूळवसाच्या पाषाणाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर तीनपिढ्या सुखासमाधानाने नांदल्या. चौथ्या पिढीत मुळवसाच्या मानकऱ्यांपैकी बाळंभट गोडबोले ह्यांची ढवळीगाय अकस्मात दूध देईनाशी झाली. दोनचार दिवस आत-बाहेर शोध चौकश्या करण्यात गेले. गाय कासेच्या पाडीलाही आचळ तोंडात धरायला देईना. पाडीला दुसऱ्या गायीचं दूध पाजून कशीबशी तगवलेली. खरं म्हणजे ही गुणी गाय. मागच्या दोन-तीन वेताना वासराला एक पाखल देवूनही वेळेला अडीचशेरी भरून दूध द्यायची. गाईला दृष्ट लागली की काय व्याधी आहे काहीच कळेना. मग बाळं भटजीनी शक्कल लढवली. सगळी ढोरं चरायला सोडली पण ढवळीला टांगलवून ठेवली. धवळीने नुस्ता थयथयाट केला. दोन-तीन वेळा वासरू सोडून बघितलं पण गाय लाथांचा असा काय सडाका सुरू करी की वासरू भिऊन माघारी वळे. रागाने बेभान झालेल्या बाळंभटाने दात ओठ खात निगडीच्या काठीचे दोन तडाखे गायीच्या पाठभर ओढले मात्र.... भटीण हंबरडा फोडीत गोठ्यात धावली. “झाले तरी मला मारा.... पण गोमातेला मारून पापाचे धनी नका होवू...”
एरव्ही नवऱ्याच्या डोळ्याला डोळाही न भिडवणारी ती साध्वी...! पण गाईच्या कळवळ्याने तिने नवऱ्याच्या हातातली काठी काढून घेतली. याच दरम्याने नाचानाच करून ढवळीच्या गळ्यातलं दावं करकचलं. गाईने जीवाच्या कराराने हिसडा मारल्यावर दावं तुटलं नी गाय चौखूर उधळून गोठ्याबाहेर पडली. बाळंभटाला काय वाटलं कोणास ठाऊक ...पण गाईच्या पाठलागावर तो सुद्धा धावत सुटला. गाय पाळंदीतून सुसाटत घाटीला लागली. घाटी उभी शूळ ....पण गाय चौक धरून उधळत निघाली. बाळंभटही जिद्दीला पेटलेला. जीवाची तमा न बाळगता तो ही गाईच्या मागोमाग धावत सुटला. मोडणाकडे पोचल्यावर गाय उगवतीच्या दिशेला वळली. मूळवसाच्या देवळाजवळून सुसाटत ती कळंबाच्या राईत शिरली. भटजीनी माग सोडला नाही. आत शिरल्यावर उजव्या बाजुच्या झाडकळीजवळ गाय उभी राहिली . अन् क्षणार्धात तिच्याचारही आचळांमधून दुधाच्या धारा स्त्रवू लागल्या. कास पूर्ण रिकामी झाल्यावर तिने डोळे उघडून कान फडफडावले नी संथ गतीने आडीच्या दिशेने चाल धरली.
गाय लांब गेल्यावर बाळं भटजीनी पुढे जाऊन बघितले ... पान्हा सोडल्याजागी खुणेसाठी दगड ठेवला नी ते माघारी वळले. हा काहीतरी अद्भूत प्रकार आहे हे ओळखून त्याचा उलगडा करण्यासाठी त्यानी बोंडाळे शास्त्रींचे घर गाठले. घटकाभरातच संपूर्ण गावात बोलवा झाली नी बारा-पाच मूळवसाच्या देवळात जमले. बारा-पाचानी जाबसाल घातली नी मानकऱ्यांपैकी एकाच्या अंगात मुळवसाचा संचार होवून तो वदायला लागला .“ लेकरानूं भिया नुको.... गाईन पानो सोडलो त्ये जागी सावचितीन खणती घेवा.... जांभ्या दगडाची स्वयंभू पिंडी मिळात... ह्या गावकुसात म्हादेव प्रकट होतलो हा... ही गाय मागच्या जल्माची शिवाची भगतीन आसा... ती पर्तेक्ष कामधेनू! तिना म्हदेवाचो ठिकाणो वळाकलान नी अमृताचो अभिषेक करून द्येवाक समाधीत्सून जागो केल्यान... म्हाई शिवरातीक हय पर्वणी असतली. ह्या कळंबेश्वराचा स्थान म्हंजे दक्षिण काशी .... पर्वणीच्या टायमाक जो कोन हय दर्यात न्हायत तेचा सात जल्माचा पातक फिटतला... ”
लोकानी अन्नपाण्याची तमा न करता पिकावं, कुदळी, खोरी ,फाट्या घेवून गाईने पान्हा सोडल्या ठिकाणी खणती सुरु केली, सुर्यास्तापूर्वी पुरुष-दीड पुरुष खोल खोदकाम करून महादेवाची स्वयंभू पिंडी मोकळी केली. ही वार्ता राजाच्या कानी गेली आणि त्या देशीचा राजा सगळा लवाजमा घेवून गावरहाटीत हजर झाला. त्याने मंदिराच्या व्यवस्थेची निर्गत लावली. मानकरी सालकरी मुक्रर झाले. या स्थानावर काशी विश्वेश्वराच्या मंदिरासारखी देखणी वास्तु उभारायचा आपला मनसुबा राजाने व्यक्त केला.आठवडाभरातच द्रविडी कारागिर आले नी मंदिर उभारणीचं काम वेगाने सुरु झालं. दोन तपांच्या कालावधी नंतर मंदिराची देखणी वास्तू साकार झाली. कदंबाच्या वनात प्रकटलेला देव म्हणून तो कदंबेश्वर नामे ख्यात झाला. कोकणभागात कदंब वृक्षाला कळंब म्हणतात म्हणुन कदंबेश्वराचा कळंबेश्वर झाला अशी मंदिर निर्माणाची कथा बोंडाळे बुवांच्या तोंडी फार खुमासदारपणे रंगायची.
अशा जागृत कळंबेश्वराने बारापाचांचे गाऱ्हाणे ऐकले आणि सहा चेडवांच्या पाठीवर भिकशेट तेल्याला मुलगा झाला. तेल्याच्या घरचा सुवेर काढून चिरग़ूटं धुवायला भज्ञा परीट नी जनी वेशीवरच्या तळीवर आलेली. गोरगरीबाच्या घरातली चिरगूटं घटकाभरात धुवून व्हायची.पण तेली म्हणजी घरंदाज सावकार, त्यात नवसाने झालेला झील....कौतुकाला पारावार नव्हता आणि बिदागीपण सज्जड मिळणार या आशेने दोघानी कमरेचा काटा ढिला होईतो काम केलेनी. “मी जरा विडी वडून येतेय... ” असं म्हणत भग्या तळीबाहेर आला. कमरेच्या रुमालाची गाठ सोडून त्याने आतला सरंजाम काढला. कुड्याच्या पानाचा तुकडा मांडून त्यावर चिमूट्भर तंबाकू टाकून घटमुट विडी वळून ती ओथात पकडली . कापसाचा बोळा नी गवताचा चग़ाळा आंगठ्याने जमवून धरीत त्यावर चकमक झाडली. कापूस धुमायला लागला नी वाऱ्याबरोबर गवत पेटून ज्वाळ धरल्यावर विडी पेटवून दोनतीन दमदार झुरके मारल्यावर मेंदूत झिणझिण्या उठल्या नी परटाला जरा तरतरी आली. आणखी तीनचार झुरके मारून त्याने विडी विझवली नी आळस मोडीत तो उठून उभा राहिला.
तळी समोरून गावकुसाकडे तोंद केलं की क्षितिजा समांतर निळीशार दर्याची वेळा दिसायची. क्वचित प्रसंगी धुळप किंवा आंग्रे यांचा गुराबा नजरेला पडे. म्हणजे हातभर लांबीची काळी रेषा नी तिच्या वरच्या टोकाला चार हात अंतरावर फडकणारा भगवा जरी पटका.... त्यावरून तो गुराबा किंवा जहाज सरदार मंडळींपैकी आहे हे ओळखता यायचं. एरव्ही गाबता -भंडाऱ्यांच्या मच्छिमारी करायला गेलेल्या डुकमी,पडाव नायतर बलाव नी बारक्या होड्या दिसत. चिरगूटं धुवायला तळीवर आलं की दर्या न्याहाळीत बसायचं भग्याचं वेड तसं जुनं... थोडावेळ दर्या देवाचं दर्शन घेतळं की त्याचा शीणभाग कमी व्हायचा. आज दर्या न्याहाळताना अचानक आक्रित घडलं.... क्षितिजा लगत उंच हौद्याचा गुराबा नी त्याच्या वरच्या टोकाला भगव्या रंगाऐवजी हिरवा ठिपका. हळू हळू त्याच्याभोवारी आणखी हिरवे ठिपके उमटायला लागले नी भग्या अंतर्बाह्य चरकला.
हिरवा बावटा म्हणजे त्या देशीच्या राजाचा दुष्मन अमीन.... दिल्लीच्या जुलुमी मुसलमान राजाचा क्रूर सरदार.... शंभू राजाना गाफील असता जेरबंद करून पकडून नेणारा दगाबाज मोंगल सरदार,शंभू राजानी मुस्लीमधर्म स्वीकारावा म्हणून त्याचे हालहाल करणारा, तापल्या सळीने भोकसून त्याचे डोळे फोडणारा अत्याचारी धर्मांध आलमगीर.... मराठी मुलुखात त्याच्या मुर्दाड सरदारानी चालवलेल्या अत्याचारांच्या कथा भग्याच्या कानी आलेल्या... इथल्या भागात हल्ले करून गावकुसात लुटालुट करून जाळपोळी करणारा बायाबापड्यांवर जुलुम करून त्याना नासवणारा म्हणून उभ्या किनारपट्टीत अमीनाची दहशत असायची. बोंडाळे शास्त्री, बावडेकर इनामदार , नीळकंठपंत अमात्य ही गावातली बुजुर्ग मंडळी मुस्लीम राजकर्त्यांच्या जुलुम जबरदस्तीच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कथा सांगायचे. हिरवे ठिपके गावकुसाच्या दिशेने पुढे पुढे सरकत आहेत याची खातरजमा झाली. म्हणजे इथल्या देवस्थानावर स्वारी करायला अमीनाची क्रूर टोळधाड येणार हे उमजल्यावर भीतीने भग्याच्या पोटात खड्डा पडला. त्याने ही बाब परटिणीला सांगितली अन् या अस्मानी सुलतानीची खबर द्यायला तो चावडीच्या दिशेने तीरासारखा पळत सुटला. गावदरीत पोचल्यावर “ होश्शाऽऽर .. सावध होवा....दर्यात्सून अमिनाचे गुराबे येतत .... तेंचे हिरवे बावटे म्या सवता बगलय....” असे ओरडत तो खोतांच्या वाड्यासमोर आला.
भग्याचा होरा खरा ठरला. खोतांच्या अंगणात माणसांचा कालवा सुरु झालेला दिसला. भग्या येण्यापूर्वी दर्यात मच्छी पागायला गेलेले गाबीत लांबवर दिसणारे हिरव्या बावट्याचे गुराबे बघितल्यावर पाग तिथेच टाकून प्राणभयाने किनाऱ्याकडे परतले. अर्ध्या घटकेतच गावातल्या मातब्बर असामी खोतांच्या वाड्यासमोर आल्या. येणाऱ्या अरिष्टाला कसंतोंड द्यायचं याच्या मसलती सुरु झाल्या. गावातल्या चारपाच मतब्बर घराण्यां व्यतिरिक्त हत्यारं कोणाकडेच नव्हती. मुसलमान नंग्या तलवारी परजीत, भाले, बर्च्या नी दांडपट्टे फिरवीत समोर दिसतील त्यांच्या गर्दना मारीत सुटणार....या मग्रूरांना तोंड देण्याचं सामर्थ्य कांदळगावातल्या कष्टकरी लोकांमध्ये नाही , म्हणजे क्रूर मुस्लीम आक्रमक रयतेची खांडोळी करून गाव बेचिराख करणार, देवस्थान उध्वस्थ करणार नी पुऱ्या मुलुखावर गाढवाचा नांगर फिरवणार ... ह्या विचारानी लोक हबकले.
शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या नारो चिंतामणी ह्या जाणत्या गावातल्या नामजद मुत्सद्यानी यावर अचूक मसलत आखली. या टोळधाडी कडून कत्तल करून कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा गावात नेमस्त पंचवीस बापयानी मरण कडोसरीला बांधूनच गावात थांबायचं नी बाकीच्या सग़ळ्यानी मूल्यवान चीजवस्तू घेवून गाव सोडायचा नी चारपाच कोसाच्या पलिकडचा टप्पा गाठायचा. धान्यधुन्य भरलेल्या कणग्या घरासमोर पेटवून टाकायच्या. गुरं-ढोरं कानी काढून गावकुसाबाहेर हाकलायची. आता लवकरात लवकर गावखाली करायचा अशी द्वाही फिरली. मातब्बर सावकारांच्या ठेवरेवी त्या काळात जमिनीतल्या पेवांमध्ये ठेवलेल्या असायच्या.अगदी देवस्थानच्या मालकीची ठेवसुद्धा अशीच सड्याच्या धारेवर कातळात खोदलेल्या पेवात ठेवायची प्रथा होती. त्यामूळे मातब्बर चीजवस्तू कसलीच अमीनाच्या हाती लागणार नाही नी हा कंगाल मुलुख आहे अशी समज होऊन यापुढे मुस्लिम अंमलदार इकडे फिरकण्याची तकस घेणार नाही. अशी आत्मबचावाची नामी युक्ति मुत्सद्यानी योजली. नारो चिंतामणी म्हणाले , “ जावा बाबानो! हा मुलुख सोडून दूर परागंदा व्हा... हे सुलतानीचे अरिष्ट जावूदे...मग जगतील वाचतील ते तुमचा शोध घेतील...!”
काळजावर धोंडा ठेवूनच माणसं बाहेर पडली. गाव झपाट्याने रिकामा व्हायला लागला. नुकताच सुवेर फिटलेली भिकशेटीची बाईल कानाला टापरी बांधून वंशाचा दिवा दुपट्यात गुंडाळून छातीशी कवटाळून पोरी नी सासू यांस ह सारवट गाडीत बसून तिकडेलांब मुणग्यात तिच्या माहेराकडे रवाना झाली. बरीचशी गुरं चरायलाच सोडलेली होती. गोठ्यात व्यायला जवळ आलेली, म्हातारी नी हौशीने बांधावळीला घातलेली गुरं आणि लहान वासरं तेवढी होती.मालकानी त्यांच्या कान्या काढल्या नी घरटी एकेकजण त्याना गाव कुसाबाहेर हाकीत निघाला. मुसलमानांच्या तावडीत सापडून अब्रूची लक्तरं होण्यापेक्षा रानावानात उपाशीतापाशी मरण परवडलं. सिंहाच्या छातीचा शास्ता गेला नी रयतेचा वाली कोणी उरला नाही. एवढा जागृत देव कळंबेश्वर ... इथे त्याच्या नावाने काशी वसली...पण देवाचं देवपणही हरपलं. जीव जगवण्यासाठी भर दिवसा घुबडागत तोंड लपवून रानावनात दडून रहायचं दुर्भाग्य नशिबी आलं. पण प्राप्त परिस्थितीत जीव नी अब्रू तरी शाबूत राहिल... ही टोळधाड जशी आली तशी टळेल....पुन्हा गाव वसेल या आशेवर माणसं परागंदा झाली.
गावखाली होवून दीडप्रहर उलटला. जे गेले ते अमीनाच्या कचाट्यातून बचावले म्हणावे इतक्या सुरक्षित टप्प्या पलिकडे पोचले. कुणी मुंबरीच्या खाडी पलिकडे, कुणी जांभळीच्या साण्या जवळ, कुणी दाभोळ्यात मकाण मारलेलं. कांदळगावच्या दिशेने येणारी जहाजं आता नुक्ती नजरेच्या टप्प्याबाहेर रेंगाळलेली. गनीम सावध आणि धूर्त होता. शिबंदी तशी बेताचीच होती. इथलं देवस्थान प्रसिद्ध.. इथला शास्ता संभाचा उजवा हात.. न जाणो हत्यारबंद मावळे मोका साधायला टपून असतील... घेरियातून आंग्रे धुळप यांच्याकडून कुमक आलेली असायची. म्हणून काळवंपडायची वाट पहात अमीन थांबून राहिला. एकदा काळोख पडला कि तरफ्यावरून गुपचुप किनारा गाठायचा नी दाणादण उडवाची असा बेत त्याने आखलेला. एकदा काळोख पडला कि तरफ्यावरून गुपचुप किनारा गाठायचा नी दाणादण उडवाची असा बेत त्याने आखलेला.गावात थांबलेली माणसे कमरेला आकडी कोयता बांधून खोतांच्या वाड्यासमोर अंगणातच तळ ठोकून बसलेली. तिथून दर्या हाकेच्या अंतरावर. शत्रू कसा येतो, काय करतो याचा होरा बांधित ताटकळत बसलेली. काळवं पडलं दुपार पासून दम धरून राहिलेल्या माणसांच्या छातीत आता मात्र धडधडायला लागलेलं. जो तो मनोमन कळंबेश्वराचा धावा करू लागलेला, “द्येवा म्हाराज्या ...तुजो चमत्कार दाकव. मुसड्यांचे बलाव दर्यात डुबौन टाक... नायतर गडारच्या आग्र्यांक हकडे येवची बुद्ध्या होवने... नायतर प्रलय भवने नी आमचो कांदळ गाव दर्यात बुडोन जावंदेत..”
पण लोकांच्या प्रार्थनेने सांब सदाशिव मुळवसाची भंग पावली नाही .... कळंबेश्वर म्हणजे साक्षात रुद्र...बोंडाळे बुवा कीर्तनात सांगायचे... धर्मो रक्षति रक्षित: समर्थांची शिकवण लक्षात ठेवा...बलशाली हनुमंताची आराधना करा.. सबळ व्हा... शक्तिसंपन्न व्हा...दुर्बळ हे सबळांचं भक्ष्य असतं...त्यांचे जीवीत वित्त इतरांकडून नष्ट होण्यासाठीच असतं...दुर्बलाला जगण्याचा अधिकार नाही...जीवो जीवस्य जीवनम् हा सृष्टिचा नियम आहे. ज्याच्या समशेरीला शिवप्रभुच्या समशेरीची धार नाही त्याने बलिवेदीवर मान ठेवून निमुटपणे आक्रमकाचा घाव सोसायला सदैव तयार रहायला हवे. बलम् सर्वत्र पूज्यते,महा प्रतापी प्रलयंकारी रुद्र सुद्धा निर्बलाच्या रक्षणासाठी येत नाही. नाकर्त्या शक्तिहीन भेकडांची प्रार्थना आणि साधना सुद्धा त्याच्यापर्य&त पोहोचत नाही...
फुटक्या तिन्हीसांजेला किरीव अंधाराचा मोका साधून गनिमाने तराफा सज्ज केला. पंचवीस हत्यारबंद हबशी घोड्यांवर स्वार होवून किनाऱ्यावर पोचले. थोड्याच वेळात जहाजांवर पहाऱ्यासाठी नेमके गडी ठेवून दीड दोनशे हबशांची फौज किनाऱ्यावर सुखरूप उतरली. नायकाने इशारत करताच धडाधड मशाली पेटवून दीनऽऽ दीऽन करीत हबशी दौडत गावाकडे निघाले. दूरवर अंधारात कळंबेश्वराच्या गाभाऱ्याबाहेर पेटणाऱ्या कडूतेलाच्या ज्योतीच्या दिशेने हबशानी कूच केले. दीनदीनच्या आरोळ्या नी घोड्यांच्या टापांच्या आवाजानी खोतांच्या अंगणात थांबलेली माणसं थिजून गेली. काही जणानी भान न राहून भयार्त किंकाळ्या फोडल्यावर हबशांची तुकडी वाड्याच्या रोखाने निघाली नी काही क्षणातच अंगणात येवून पोचली. मशालीच्या उजेडात भिंतीच्या आसऱ्याला थर थर कापत उभ्या असलेल्या गड्याना पुढे खेचून चाबकाचे फटके मारीत त्याना दोरीने जखडबंद केल्यावर काळा कभिन्न टोळीचा सरदार पायौतार होत ओरडला....“कडी भूख लगी है कुछ खानेका इन्तजाम करो...” मुर्दाड हबशी पायीच्या पैजारासह खोताच्या वाड्यात शिरले. आत सगळीकडे सामसूम ... तलवारीने ढोसून फडताळांची झडपे उघडली.... लाकडी मांडण्यांवर ठेवलेल्या गाडग्या मडक्यांची सांड लवंड करून खाणे वस्तूचा कसोशीने शोध घेवूनही तीळ थेंबही हाती लागला नाही.
वाड्यातून बाहेर येवून नायकाला कुर्निसात करीत हबशी म्हणाले “ मेरे आखां अंदर ना कोई आदमी नाही खानेलायक कुछ चीज मिली. ” त्यानंतर उजाडेपर्यंत पुरा गाव धुंडाळूनही खाद्यापदार्थ सोडाच चिमटीभर धान्य की कडदणाचाएक दाणाही मिळाला नाही. आसूडाचे फटके मारमारून कैस्यांच्या पाठीच्या चामड्या लोंबू लागल्या... पण घरेदारे सगळी ओस पडलेली..... कैदीतरी कोणाचा नी काय कसला ठिकाणा सांगणार... ते आपले धापा टाकीत एकच वदत “सग़ळे ल्वॉक गाव सोडून चार दिशा भायरे झाले... खाण्यापिण्याची चीज वस्तू नायशी करून लोका गेली ....” मुर्दाड आक्रमकांना हा अनुभव नवीनच होता. हे मोठे प्रसिद्ध धर्मस्थळ .....मोठमोठे वाडे ... अमाप सोनेनाणे, खाण्यापिण्याची लयलूट नी मीनाबाजार झक मारला अशा खुबसूरत लौंड्या असतील ह्या कल्पना विश्वात रमलेल्या हबशी नी सिद्दी यांची तोंडे कांडेचोरासारखी काळी ठिक्कर पडली.
कैद केलेली इनी गिनी माणसं सोडता गावात एक चिटपाखरूही आढळलं नाही. कैद्यानी केलेल्या कथनातून टोळीत असलेल्या काही बुजुर्ग हबशांच्या एक लक्षात आलं की , सकृतदर्शनी तरी गाव नी देवस्थान फारसं सधन नाही . गावात तीनचार वाडे आणि काही मोठी घरे सोडली तर बाकी सगळी दरिद्री..... कोलव्याची घरे... , समृद्धीचा वास-वाराही नाही. ज्या अपेक्षेने ही मोहीम आखली ती मातीमोल झाली. मिळकत दूरच मोहिमेचा खर्च उलट अंगावर पडणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर अकाशावेरी गेलेले मंदिराचे गोपूर ..त्याची भव्यता आणि समृद्धि मात्र नजरेत भरणारी! कांदळगाव वसून मंदिराचे निर्माण झाल्यापासून आज पहिलीच सकाळ अशी उजाडली की घण्टेचा नाद, शंखध्वनी गाजला नाही कि नगाऱ्यावर टिपरी पडली नाही.
गावच ओस पडल्यामूळे त्या नरराक्षसांची खुमखुमी भागली नव्हती. नेभळट काफिराच्या औलादीची मनमुराद कत्तल करायची, बायाबापड्यांवर अत्याचार करायचे, दो दो हातानी लूट गोळा करायची या मनसुब्यांची राखरांगोळी झाल्यामूळे आक्रमक भलतेच चवताळलेले होते. मग त्यानी देवस्थांच्या दिशेने मुसंडी मारली. घोडेस्वार मंदिराकडची घाटी चढायला लागताच देवस्थानच्या ओवरीत निवांतपणे रवंथ करीत बसलेली सुटार ढोरे सजग होत ताड ताड उठली नी शेपट्या वर करून चौखूर उधळली. मुर्दाड सिद्दी हबशी चढे घोडियानिशी मूळवसाच्या,कालभैरवाच्या,कुणकोबाच्या सभागृहात तर कोणी लगतच्या धर्मशाळेत घुसले. त्या मंगल वास्तूंचे पावित्र्य भंग करणारी निर्घृण अमंगल कृत्ये त्या धर्मभंजकानी केली. शिवशिवलेल्या हातांची रग रग जिरवण्यासाठी कुणी घण्टा खेचल्या, कुणी भिंतीत आणि सभामंडपाच्या स्तंभांवर खोदलेल्या,लाकडी बहालांवर आणि तक्तपोशीवर कोरलेल्या अप्सरा ,यक्षिणींच्या आकृती, सर्प युग्मे, गंधर्वांची चित्रे यांचे भंजन आणि विद्रूपीकरण करायचे नराधमी विकृत चाळे सुरु केले.
उंदरा सारखाय: कश्चित प्राणीसुद्धा सुरक्षे साठी आपल्याबीळाला सतरा मार्ग करून ठेवतो . तीच नीती आक्रमकांपासून दैवते बचावण्यासाठी हिंदूनी अवलंबिली. शिवलिग म्हणजे नुसता उभा पाषाण. उलट इतर मूर्ती दुय्यम असल्या तरी आकर्षक असल्यामूळे भंजक त्या उध्वस्त करीत. कुणकोबाच्या देवस्थानात मुळवसाची शीळा आणि जांभ्या दगडाचे ओबडधोबड शिवलिंग यात आक्रमकांची अशीच गल्लत झाली . तसेच भंजन करायला लागणारी पहारी, पिकाव,कुऱ्हाडी अशी नामांकित हत्यारे गावकरी विहिरींमध्ये टाकून परागंदा झालेले, त्यामुळे पुरा गाव धुंडाळूनही असली चुकार दोनतीन हत्यारेच भंजकांच्या हाती लागली. मंदिरात गाय कापण्याचे परम कर्तव्य पार पाडण्यासाठी गाय पकडून आणायला सात आठ हबशी रवाना झाले. हबशांचा पायरव लागताच गायगुरे चौखूर उधळत नी आडवणात नाहिशी होत. मोठ्या प्रयासाने जगशेट सोनाराच्या घरामागे त्याची काळु गाय हबशांच्या तावडीत सापडली.
आदल्या दिवशी जीव वाचवण्यासाठी परागंदा झालेली मंडळी निर्विघ्नपणे सुस्थळी पावलेली. गावसोडून जाताना वाटेतच काही मंडळीनी गुपचुप काय काय बेत केले होते. भट,बामण, भंडारी,न्हावी,तेली, सोनार सुतार, धनगर,परीट, वाणी, महार,चांभार, गाबीत सग़ळ्या जातीच्या लोकानी एकविचाराने धर्मा नी शिवा , सूरशेट .संभु नी गोपी , भिवा, कुणक्या, धोण्डी, म्हाद्या, म्हाकू, विठ्या, सखल्या , रोंग्या, बाबल्या, दाजी,बळी ,मायबा, रावजी ,झिलू, बोंबड्या, रोवळ्या, झमन्या, डिकल्या नी परसू , जटया, येशा, परशा, तातू, आणि दगड्या, जग्या, सुब्या, भग्या, भिक्या, जगन लुक्या , किसन, बाबु , हरचन असे तरणे ताठे पोर गावावर नजर ठेवायला मागे थांबवलेले . त्यानी चार टोळ्या केल्या नी टेंबाचे काप, रानतळी, धारतड , रानकोंड या भागात दडी मारून राहिले.
जटया सुतार नी भग्या परीट हे हे खरे हिकमती नी उलट्या काळजाचे. जीवाची तमा न बाळगता आडकुशीच्या वाटेनी पुढे पुढे सरकत त्यानी कळंबेश्वराची राई गाठली. तिथे कळंबाची नी गोड्या कांदळाची आकाशावेरी गेलेली अजस्त्र झाडे ! मोक्याच्या जागा धरून ते टेहेळणी करीत बसले. कळंबेश्वराच्या देवळात चाललेला गलबला खड्यान खडा उमगत होता. गायीला काढण्या बांधून खेचित नेणारे हबशी त्यानी बघितले.भग्याने जनावर ओळखले. “ही जगशेट सोनाराची गाय...” तो जटयाच्या कानात पुटपुटला. “हे मुसडे मायझये देवासामनी हिका कापणार बव्हतेक.....माजा कायव व्हवने पन गाय माउलीक मी वाचवनार ” जटयाने त्याला आवरण्याची शिकस्त केली .पण त्याला न जुमानता भग्या खाली उतरला नी मंदिराच्या दिशेने पळत सुटला.
देवाच्या पोवळीत जेरबंद होवून कण्हकुथ घालणारी गावकरी मंडळी बघून भग्याचे मन हेलावले. क्रूर हबशानी भयाने हंबणाऱ्या गायीच्या पाठीवर तोब्याचे सणसणीत रट्टे मारीत तीला सभा मंडपात खेचले. एक जण कुऱ्हाड घेवून सांबाची पिंडी भंग करायला गेला. तरटी जांभ्या कातळाच्या त्या पिंडीवर कुऱ्हाडीचा घाव बसताच अग्निच्या ठिणग्या पडल्या. सलग चारपाच घाव घातल्यावर पिंडीचा आंगठ्या एवढा कळपा उडाला नी कुऱ्हाडीची धार वळली नी तिचा दांडा नेढ्यातून मोडला. तिकडे दमगीर झालेल्या गाईने तिथेच जी बसकण मारली ती काही केल्या उठेचना. मग त्या निर्दयी राक्षसानी “ छल् रण्डी ” म्हणत गाईचे कान शेपटी नी शिंगे धरून तिला उठवले आणि लाथा मारीत गाभाऱ्याच्या दिशेने चढत जाणाऱ्या पाय ऱ्यांवरून बळेबळे ढकलित दिंडी दारातून आत लोटून दिली. गायीने पुन्हा बसकण मारली. आता साताठ हबशानी तिची शिंगे ,कान,शेपटी नी गळ्यातली रशी धरून तिला ओढीत ओढीत पिंडीसमोर आणले.
या गदारोळात मंदिराच्या उत्तर द्वारातून सुरमत सुरमत जाणाऱ्या भग्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. हबशांचा म्होरक्या दाढी कुरवाळीत समशेर परजीत गायीची मुण्डी छाटायला पुढे येत असता तो गाई जवळ पोचण्या आधीच भग्या चपळाईने पुढे धावला. हबशी भग्यापेक्षा हातभर उंच होता पण छलकाट्या परटाने हवेत छलांग मारून त्याचा समशेरीचा हात पकडून मागे ओढला. त्याबरोबर बेसावध हबशी तोल जावून उताणा पडला नी त्याच्या हातातली समशेर सूटून खण खण आवाज करीत बाजुला पडली. भग्याने निमिषार्धात दोन्ही हातानी समशेर पेलीत उताण्या पडलेल्या हबशाच्या मानेवर घाव घातला . तेवढ्यात हबशी मान फिरवून जरासा बाजुला सरकला नी वार त्याच्या उजव्या खांद्यावर झाला. खांद्याच्या हाडात अडकलेली समशेर उपसून भग्या बाहेर जायला वळला. आता गायीला जखडून धरणारे हबशी भग्याच्या दिशेने धावले .
दरवाजाच्या दिशेने मागे जाणाऱ्या भग्याने त्याच्या रोखाने येणाऱ्या हबशाच्या पोटार समशेर घुसवली. आर्पार घुसलेली समशेर तशीच टाकून भग्या मागे वळला नी पोवळीतल्या खांबावर चढून त्याने छप्पर गाठले. “दगा ...पकडो .. कातील भागने ना पाये ” असे ओरडत काहीजण भग्याच्या मागावर सुटले. या गदारोळात गाय मोकळी सुटताच ताडकन् उठून ती दक्षिण द्वारातून बाहेर पडली. त्या दाराबाहेर कोणीच नव्हते. काढणीच्या रशीसकट गाय चौखूर उधळली उभ्या चढणीला लागून मंदिरामागच्या आडवणात नाहिशी झाली. गाय गेली त्याच दिशेने आडवणात रिगायचा बेत करून भग्याने छपरावरून खाली उडी मारली . गाईच्या मागावर धावणारे सिद्दी ट्प्प्यात आलेले बघून भग्याने बेत बदलला.तो माघारी वळून प्रवेश द्वाराकडे धावू लागला. पण त्या दिशेनेही चारपाचजण तलवारी परजीत येताना दिसल्यावर त्याने प्रवेशद्वारा जवळच्या चबुतऱ्या वर उडी मारली नी तो दीपमाळेवर चढला.
सरसरत चढत त्याने दीपमाळेचा शेंडा गाठला खरा पणआता तो गनिमाच्या पुरा कबजात आला. पंधरा-वीस हबशी दीपमाळे भोवती कोंढाळे करून उभे राहिले. “ लौंडे ....सुव्वरके बच्चे नीचे आव” त्यांचा ओरडा सुरु झाला. बिचारा भग्या.... दिवसभर पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. रात्रभर आलोचन जाग्रण. आतापर्यंत केलेल्या अतीव कष्टांमुळे घशाला कोरड पडलेली. आता पाणी नाही प्याले तर तासाभरात आपण झीट येवून खाली पडणार ... जिवंतपणे ह्या मुर्दाडांच्या हाती लागलो तर हे शंभूराजांसारखे हालहाल करणार नी दुर्दशेला पारावार्च रहाणार नाही हे त्याने पुरते ओळखलेले. त्याने मंदिराच्या दिशेला तोंड करून कळंबेश्वराला नमस्कार केला नी खालच्या अंगाला नजर टाकली. माडभर खोल कडा तुटलेला नी पायथ्याला धारदार कालथराने भरलेल्या अनगळ रुजीव जांभ्या दगडाच्या शीळा. दीपमाळेच्या मुळाशी आरडा ओरडा करणाऱ्या हबशांच्या दिशेने पचकन थूंकत त्याने हात जोडले अन् ‘जय कळंबेश्वरा ’ म्हणत खालच्या दरीत उडी मारली.
सगळे लोक स्तिमित होऊन पहातच राहिले. भग्या परीट हवेत उंच उसळला नी गरगरत जावून खालच्या अजस्त्र शीळेवर आपटला. त्याच्या देहाच्या चिंधड्या झाल्या नी रुधिराने शीळा न्हाऊन निघली. काही क्षणातच जोरगतीच्या भरतीच्या लाटानी भग्याच्या देहाची लक्तरे स्वाहा केली नी रुधिराने माखलेली शीळा ही स्वच्छ झाली. अर्ध्या घटके नंतर तिथे घडलेल्या महानाट्याचा अंशमात्र पुरावाही शिल्लक राहीला नाही. भग्याच्या वज्रघावाने मोहिमेचा म्होरक्या जायबंदी झाला. पोटात आरपार समशेर घुसलेला सिद्दी त्याच वेळी थंड झाला. आक्रमकानी देवाच्या पालखीतली गादी काढून त्याचा मृतदेह त्यावर ठेवला. आपापसात विचारविनीमय करून मंदिराच्या प्रवेश द्वारच्या मुळवसाची शीळा खणून सोबत्याचा मृतदेह तिथेच दफन करून मुळसाची पूर्वी उभ्या स्थितीत पुरलेली शीळा आडवी पुरली. मंदिराच्या प्रांगणातले नेटके पाषाण उचकटून कबर बांधली .मंदिरा सभागृहातले कोरीव लाकडी खांब नी तक्तपोशीला आग लावली. मंदिराच्या प्रांग़णातले भैरव मंदिर आणि धर्मशाळेला आग़ लावल्यावर त्यांचा मोर्चा आजुबाजूच्या घरांकडे वळला.
मग मृत सिद्याच्या साथीदाराने जेरबंद केलेल्या कैद्यां पैकी पाचसहा जणांच्या माना छाटल्या. खरेतर सगळ्याच कैद्यांच्या माना तो छाटणार होता पण गावातली ठावठिकाणे सांगणारे कोणी उरले नसते म्हणून बाकीच्यानी त्याला थोपवले. कैद्यांची मुंडकी लाथेने उडवून दिले आणि त्यांचे मृतदेह भग्याने उडी मारली तिथूनच खाली दर्यात भिरकावून दिले. मग एकेका घरात शिरून झडती घेऊन मुल्यवान सामान बाहेर काढायचे नी घर पेटवून द्यायचे सत्र सुरु झाले. पण काही क्षणातच अवचित सोसाट्याचे वारे सुटले. आभाळ भरून आले नी अवकाळी पर्जन्य सुरु झाले . ऐन पावसाळ्यातही पडत नाही अशी संततधार भीषण वृष्टी सुरु झाली. वाऱ्याच्या जोरदार कावट्यानी मंदिरा जवळचे आकाशावेरी गेलेले कदंबाचे नी गोड्या कांदळाचे महाकाय वृक्ष उन्मळून पडले.
म्होरक्याच्या खांद्यावर भग्याने केलेला वारही एवढा मर्मघातक होता की तो क्रूरकर्मा वेदनानी किंकाळ्या मारीत होता. म्हणून खोतांच्या वाड्यातच हबशानी तळ ठोकला. ओसरीवर खोताच्या पलंगावर म्होरक्याला झोपवून पडवीत पावसाळी घोंगड्या नी चिरगूटे सुकवायला बांधलेल्या परशा खाली जडशीळ लाकडी टवण्या पेटवल्यामुळे वातावरणातला गारठा कमी झाला. त्याच्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव तर थांबत नव्हता. कैद्यांपैकी चौघांनी आपसात खाणाखुणा करून त्याच्यावर उपचार करण्याच्या मिषाने जेरबंदीतून सुटणूक करून घ्यायची मसलत योजली. त्यानी तशी पृच्छा करताच त्याना मोकळे करण्यात आले. त्यांच्या पैकी उम्या नी सख्या तेली यानी हबशांच्या पहाऱ्यात जाऊन जीवा तेल्याच्या घाण्यावरून कडूतेल आणले. कापडाची घडी ठेवून त्यावर कडूतेल ओतल्यावर थंडावा आला नी रक्तस्त्रावही कमी झाला. चौघेही वैदू जखमी म्होरक्याचे हात पाय चेपणे . जखमेवर कडूतेलाच्या घड्या बदलीत राहाणे करीत राहिले.
भग्याने केलेल्या गोमातेच्या सुटकेचे नी आत्मसमर्पणाचे इत्थंभूत वृत्त गावकुसात दडी मारून राहिलेल्या सवंगड्याना जटयाने सांगितले. मात्र त्याने टोळीच्या नायकाचा खांदा तोडला नी एका हबशाचा कळंबेश्वराला बळी दिला हे त्याला ज्ञात नव्हते. अकस्मात आलेल्या अस्मानी संकटामुळे हबशांच्या जाळपोळीला प्रतिबंध झाला ही साक्षात कळंबेश्वराची कृपा यावर सगळ्यांचेच एकमत झाले. आक्रमकाना धडा शिकवायची नामी युक्ती गाबतानी सांगितली. नांगरलेल्या जहाजाना रूम चालवून सुरल्या मारल्या तर शत्रूचा परतीचा मार्गच बंद झाला असता. सध्या सुरु असलेल्या निसर्गाच्या थैमानाचा फायदा घेवून हे कृत्य बिनबोभाट उरकता येणारे होते. मग सुताराचे जटया, परशा नी पट्टीचे पोहोणारे नी बुडये बोंबड्या, संभू नी रोंग्या कामगिरीवर रवाना झाले. परशाची घर वाडीच्या टोकाला एकवशी... शत्रूला पत्ताही लागू न देता घटकाभरातच घर गाठून वेगवेगळ्या आकाराचे सात रूम तो घेवून आला. पुढच्या कामात सुतारांची गरज नव्हती.त्याना माघारी रवाना करून बोंबड्या,संभू नी रोंग्या दर्याच्या रोखाने निघाले.
मध्यरात्र होत आलेली आणि वाऱ्या पावसा चा जोरही जरा मंदावलेला असताना तिघेही छोटे होडकूल घेवून हबशांच्या जहाजांच्या रोखाने निघाले. जहाजावरचे जागले वा ऱ्या वादळामुळे हैराण होवून थंडी वा ऱ्या त बेसूर निजलेले. संभूला होडकूलात ठेवून बोंबड्या नी रोंग्या रूम घेवून सुरल्या मारायला बुडाले. रोंग्याला तर ‘ बुडया रोंग्या ’ म्हणत . एक सुरली मारून बोंबड्या बसला नी संभू बुडाला. त्या दोघानी तीन सुरल्या मारल्या. रोंग्याची दम छटण्याची क्षमता भल्याभल्याना चकित करणारी होती. त्याने एकट्याने पाच सुरल्या मारल्या. काम फत्ते करून त्रिकूट परत फिरले तेंव्हा अकाशाकडे बोट दाखवीत संभू म्हणाला, “सुक्र उगावलो ..... पयल्या कोंबड्याचो टायम् झालो. सुक्राच्या होऱ्यात केलेला काम यशावर जाता असो माजो अनभव हा... ” संभू दीड तपाहून अधिक काळ दर्यात वावरलेला जातीवंत मच्छीमार . त्याचा अनुभव नी अंदाज संशयातीत असायचा.
अजूनही बारीक बारीक पर्जन्य सुरूच होते नी वाऱ्याचा जोरही कमी झालेला असला अधूनमधून जोरदार कावटी येतच होती. वातावरण कमालीचे सर्द झालेले. खोताच्या वाड्यात वेदनानी तळमळणाऱ्या म्होरक्याची कण्ह कुथ कमी होवून त्याचा डोळा लागला. सेवेकरी बसल्या जागीच आडवे झाले. पहाऱ्या वरच्या हबशांची पाळी बदलली . नव्याने दाखल झालेल्यानी मेखळ्यातले निखारे चाळवून दोन चार नवीन टवण्या टाकल्या. आग प्रखर होवून गारठ्याचा जोरकमी झाला नी पहारेकरी पेंगुळून आदवे झाले. सेवेकऱ्यांपैकी भांब्या धनगर तल्लख़ होता. त्याने साथीदाराना चाळवले. ते सावध होवून भांब्याकडे पाहू लागताच पहारेकऱ्यांकडे अंगुलीनिर्देश करीत तो उठला. एवढा इशारा त्याना पुरेसा होता. मांजराच्या पावलानी चौघेही उघड्या पडवीतून अंगणात आले नी बोलबोल म्हणताना नाहिसे झाले. आख़्खा परिसर भांब्याच्या पायाखालचा. घटका भरातच चौघेही धारेजवळ पोहोचले. भांब्या किलकिल्या डोळ्यानी आजुबाजुचा परिसर न्याहाळित असता शुक्राच्या चांदण्यात गावदरी कडून तीन गडी चालसूर येताना दिसले. त्याने साथीदारांसह बाजूला दडी मारली. आता गडी नजरेच्या टप्प्यात येताच बुडया रोंग्याला त्याच्या फेंगड्या चाली वरून चौघानीही अचूक ओळखले. “मी भांबो धनगर” त्याने दबक्या आवाजात इशारत केली. मग सातही जण एकामेळाने आडवणाकडे मार्गस्थ झाले.
झोपलेल्या म्होरक्याला लघवीची कळ लागली नी , “अबे सुव्वर मुझे पेशाब लगी ...” म्हणत त्याने ढोपरं दुडून घेत पांघरूण बाजुला केलं. पण बराच वेळ झाला तरी सेवेकऱ्यानी परात ठेवली नाही म्हटल्यावर , “अबे काफ़िरो सुनाई नहीं दिया क्या ? कमिनो , मुझे जोरसे पेशाब लगी है ” असे जरबेच्या सुरात ओरडल्यावर पहारेकरी खबडून जागे झाले नी त्यांच्यापैकी एकाने लगबगीने पुढे होवून परात सरकवली. सरदार पेशाब करीत असताना चौघांपैकी एकही सेवेकरी दिसत नाही हे लक्षात येताच तो चपापून आपल्या साथीदाराना म्हणाला, “वो लौंडे कहाँ मरा गये देखो तो..... ” शोधाशोध करूनही चौघांपैकी एकाचाही मागमूस लागेना तेंव्हा ते पळाल्याचं लक्षात येवून पाचही पहारेकऱ्यानी शरमेने माना खाली घातल्या.
आता फटफ़टीत उजाडले , पण बारीक बारीक पावसाची रिप रिप सुरुच होती. म्होरक्या उठून बसला तेवढ्यात वाऱ्याच्या कावटी बरोबर गारठ्याची शिळक आली म्हणून पांघरूण सारखे करण्या साठी वळता वळता म्होरक्या तोल जाऊन आडवा पडला तो नेमका दुखऱ्या खांद्यावर..... प्राणांतिक वेदनानी त्याने अशी जोरदार किंकाळी मारली कि वाड्याबाहेर तोंड धुवीत असलेले हबशीही धाव मारीत आत गेले. जखमेतून पुन्हा रक्तस्त्राव सुरु झाला. जथ्यातला एक बुजुर्ग हबशी काळजीच्या सुरात म्हणाला, “ सुबेदार को जल्दसे जल्द हकीमके पास ले जाना चाहिये... मुझे तो मियाँ साबकी हालात देखकर बहोत डर लगता है.....यहाँ और ठहरनेसे कुछभी हासिल होनेवाला नहीं ....बारिश भी जरा कम हुवी है ...” म्होरक्या क्षीण आवाजात म्हणाला , “अब जल्दसे जल्द यहाँसे निकलनेका इंतजाम करो.... बाहर निकलतेही इस मकानको आग लगादो और काफिरोंको अंदर फेक दो ... ” हबशानी तत्काळ हुकुमाची तामिली सुरु केली . म्होरक्याला पलंगासकट बाहेर काढल्यावर सगळ्या कैद्याना ओसरीवर ओढीत आणून खांबाना जखडबंद करून वाड्याला आग लावायची तयारी चालू झाली . वाड्या शेजारच्या गोठ्यात बेगमीचे गवत भरलेले असल्यामुळे पडत्या पावसातही आग भडकली. पण रहाता वाडा पेटवण्यासाठी रचलेली लाकडे सर्दावलेली असल्यामुळे पेट घेईनात .... दरम्याने म्होरक्याला घेवून एक जहाज सुटले आणि दुसऱ्या जहाजावरून इशारतीचे कुकारे यायला लागल्या वर राहिलेले सहा-सातजण वाडा पेटवायचा नाद सोडून बंदराकडे धावत सुटले.
जहाजांवर पहारा देणाराना सकाळी उठल्यावर हौद्यात ढोपरभर पाणी तुंबलेले दिसले. एकजण किनाऱ्यावर येवून वाड्याजवळ गस्त घालणाऱ्या साथीदाराना मदतीला घेवून गेला. हौद्यातले पाणी उसपून छिद्रात लाकडी खुट्या ठोकल्यावर पाणी येणे बंद झाले. दोन्ही जाहाजांमधले पाणी उपसून गळती बंद करीतो निघालचे फर्मान आले नी पाठोपाठ म्होरक्याला पलंगासकट घेवून साथीदार आले सुद्धा... म्होरक्याला लौकरात लौकर हकीम गाठायची घाई असल्यामुळे त्या जहाजात अती भरताड न करता नेमके हत्यारबंद हबशी आणि फक्त पाच धोडे चढवून ते जहाज सुटले. दुसऱ्या जहाजात मात्र प्रमाणाबाहेर भरवण झाल्या जहाज सुटल्या सुटल्या दोन ढोबळ्यांना मारलेल्या गाबड्या सुटल्या. जोरगतीच्या वाऱ्यावर जहज सुसाटत निघाले. बघता बघता आणखी दोन गाबड्या सुटल्या. रुम चालवून पाडलेले छिद्र पाण्याच्या वेगा बरोबर मोठेमोठे होत जाते. सुरवातीला छिद्रे पायाच्या आंगठ्या एवढी होती. पण वाऱ्या वर जहाजाचा वेग वाढल्यावर अती भरताडीमुळे क्षणा क्षणाला छिद्रे मोठी व्हायला लागली नी हौद्यात पाणी वाढायला लागल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून हबशानी घोड्याना दर्यात ढकलून दिले. पण आता फार उशिर झालेला होता . हौद्यात भराभर पाणी चढू लागताच तांडेलाने शीड पाडले नी “अब तो अल्लाही बचाएगा” म्हणत जहाजाचे भवितव्य जाहीर करून टाकले .
घटकाभरातच जहाज बुडाले. म्होरक्याला घेवून निघालेले जहाज त्यानंतर बराच वेळ तग धरून राहिले पण ते सुद्धा जंजिऱ्याचा पल्ला गाठू शकले नाही. हबशानी खोतांचा गोठा जाळल्यावर टेहळे सजग होवून निरखित राहिले. घटकाभरातच बंदराकडे चाललेली टोळी दिसली नी थोड्याच वेळात एक जहाज मार्गस्थ झालेले दिसल्यावर जटया संभूला म्हणाला, “ तुमी फाटपटी रुम मारून ढोबळे पाडून इलासना? मग बालाव आजून शाबूत कसो काय? ” संभू म्हणाला, “ आता ढोबळे न्हान हत.... तेनी खुटयो मारून बुजवलानी हत... पन येकदा झाज चालिक लागोने...मग्ये बग.... पाण्याच्या चालीर गाबड्यो टिकणार नाय... एकव बलाव आता किनारो गाटीत नाय..” अर्ध्या घटकाभरात दुसरं जहाज सुटल तशी हात जोडीत बोंबड्या म्हणाला, “चला किलेस ग्येलो...”
आता पावसाची धुंदरुक मोडली नी दिशा उघडल्या. शत्रू निघून गेल्याची खात्री झाल्यामुळे त्यानी साथिदाराना जोरजोरात हाकारायाला सुरुवात केली. “अमीन ग्येलोरे....आता धोको नाय....” हळूहळू एकेक जण हाकाऱ्या च्या देशेने यायला ला गला. दिशा उघडल्यामुळे जाणारं जहाज स्पष्ट दिसू लागलं .... नी सगळेजण ज्याची वाट पहात होते ते आक्रित घडलं . तिरकं तिरकं होत जहाज अथांग दर्याच्या पोटात गुडुप झालं. सणसणित शिवी हासडून थुंकत संभू म्हणाला, “जटया बगलस ना सोयन...? मीतुकापैजेर सांगतय, आमका दिसॉने नुको पन अगोदर फुडे गेलेलो बलाव पन तड गाटीत नाय....सुक्राच्या होऱ्यार केलेला काम कदी पन येश घेनारच.... ” मग एकमेकाना हाकारीत सगळे गावदरीच्या रोखाने निघाले. सगळेजण खोताच्या वाड्याकडे पोचले तेव्हा गोठा पुरा भस्मसात झालेला दिसला. वाड्याच्या पडवीचा एक खांब धुमत होता. जेरबंद केलेल्यांपैकी चौघे निजधामाला गेलेले पण दहाजणांच्या अंगात अजून धुगधुगी होती. त्याना मोकळे करून पाणी पाजल्यावर दोघे तिघे ब ऱ्यापैकी सावध झाले. पावसामुळे वाडा पेटवायला हबशाना भलतेच सायास झाले. किनाऱ्यावरून निर्वाणीची इशारत आल्यावर इथे माघारी राहिलेल्या हबशांचा धीर सुटला नी “ जल्दी भागो नहीं तो यहीं रहना पडेगा” असेम्हणत दोघे जण बंदराकडे धावत सुटल्यावर बाकीचेही त्यांच्यामागून पळत सुटले नी या गडबडीत कैद्यांचे प्राण वाचले.
त्या दिवशी संध्याकाळी उधानाच्या वेळी पाणी खावून पोटे टम्म फुगलेल्या घोड्यांची प्रेते एकेक करून किनाऱ्या ला लागली. दुसरे दिवशी मुंबरीच्या नस्तात तराफा ,घोडे नी दोघा तिघा हबशांचे मुदडे तरंगताना दिसले. अवकाळी वारा पावसात पडलेली झाडे तोडून कळंबेश्वराच्या मंदिराचा मार्ग लोकानी मोकळा केला. सभागृहाची तक्तपोशी, धर्मशाळा, भैरवाचे मंदिर अर्धवट जळल्या स्थितीत होते. देवस्थानाची दैना बघून लोकांच्या डोळ्याचे पाणी खळेना. हळू हळू मंदिरात घडलेल्या नाट्याची उकल व्हायला लागली. कळंबेश्वराने सत्व राखले ..... भग्याने आत्मसर्पण करून गोमातेला वाचवलेच आणि मंदिराचे पावित्र्य भंग करणाराचा बळी घेवून देवाचे सत्व जागवले म्हणून वारा पाऊस आला नी जाळपोळ वाचली नी आक्रमकांचा नामोनिशान राहिला नाही. यावर सगळ्यांचेच एकमत झाले.
हप्ताभरात गाव पूर्ववत भरला. गावात दवंडी पिटून जाणत्याना एकत्र केल्यावर मंदिराच्या जाळपोळीची पहाणी करायला नारो त्रिंबक गोपूरावर चढले. “ मंडळी, मी काय सांगतो ते ऐका..... आम्ही देवस्थानचे राखणदार! रयतेच्या जीवीत वित्ताचे ताबेदार. आमच्याकडून आमचे कर्तव्य निभले नाही. मंदिराची नासधूस झाली.... कित्येकाना जीव गमवावा लागला.... या चुकीचे उत्तरदायित्व स्वीकारून आम्ही प्रायश्चित्त घेत आहोत....तुम्ही धीर सोडू नका ,एक दिलाने कामाला लागा नी देवस्थानला पुन्हा वैभवाच्याशिखरावर न्या....आमचे आशीर्वाद आहेत.... जय कदंबेश्वर ” एवढे बोलून हात जोडीत त्यानी गोपूरावरून देह झोकून दिला. माणसं अवाक् होऊन बघितच राहिली. पोवळीतल्या काळ्याकरंद फरशीवर पंतांच्या रक्तमांसाचा चिखल झाला. हरभट धीर गंभीर आवाजात म्हणाले, “पंतांच्या आत्मसर्पाणाने हे देवस्थान आता पवित्र झाले आहे.सगळा विटाळ धुवून गेला. इथे पंतांच्या मृत देहाला साक्ष ठेवून वचनबद्ध होवूया, देवस्थान पुन्हा उभे करू! चला पंतांच्या देहावर अग्निसंस्कार करून उद्यापासून मंदिराच्या पुनर्निर्माणाचा आरंभ करूया!”
अॅदुसऱ्या दिवशी माणसं कामाला लागली. आवर स्वच्छ करून राखेचे ढिगारे बाजुला करण्यात आले. आवार झाडोपोन लख्ख करण्यात आला. आगीमुळे चढलेली काजळीची पुटे घासून धूवून भिंतीस्वच्छ करण्यात आल्या. सांबाच्या पिंडीचा एक टवका उडून त्याठिकाणी असलेली घावाची खूण वगळता निर्भंग राहिलेली दिसली. पिंडीच्या बाजुला हिरवेगार टकटकीत बिल्वदल सापडले. तेउचलून दाखवीत हरभट म्हणाले,“लोकहो नीट पहा एवढ्या आगीच्या कारातही हे बिल्वदल रसरशीत राहिलेले आहे. आपल्या स्वयंभू शिवलिंगाचे महात्म्य आणि पावित्र्य निर्भंग राहिले आहे.” सर्वानी ते बिल्वदल मस्तकीटेकले आणि माणसे हुरुपाने कामाला लागली.
जीर्णोद्धाराची योजनाबद्ध आखणी झाली. मुळवसाच्या पाषाणा खालचा मृतदेह उकरून काढण्यात आला. महिषासूर मर्दिनीने जसे आपल्या पायाशी महिषासूराला स्थान दिले तद्वत देवा समोर मृत्यू पावून पावन झालेल्या यवनाचे मंदिराबाहेर प्रवेश द्वाराजवळ थडगे बांधून त्याला पीराचे रूप देण्यात आले. दूरदर्शी जाणत्यानी साकल्याने विचार करुन ठरवले की सांप्रतकाळी हिंदूंचा बलशाली शास्ता राहिलेला नाही. यावनीसत्तेचे प्राबल्य वाढलेले आहे. साक्षात दत्तवतार नृसिंह सरस्वतीनीही अवतार कार्य समाप्त केले. देवस्थान यावनी तडाख्यातून वाचवायचे असेल, तर इथे घडलेला प्रकार ,म्होरक्यावर झालेला हल्ला , यवनाचा वध, जहाजाला मिळालेली जल समाधी या गोष्टींची फार चर्चा न करता त्या गुप्त ठेवणेच बरे.
न जाणो सगळे सुलतान धर्माच्या नावाखाली एकत्र होवून चाल करून आले केवळ देवस्थानच नव्हे तर पुरा कोकण प्रांत बे ची राख होईल. म्हणून झालेल्या हल्ल्यात देवस्थानची पडझड झाली गावातल्या घरांची जाळपोळ झाली ..... शेकडो हिंदुंच्या माना उडवल्या नी प्रचंड लूट घेवून हल्लेखोर दक्षिणेकडे निघून गेला. त्यानंतर दोन दिवसानी वारा वादळ झाले त्यात एक मुस्लीम व्यापारी या बंदरात आश्रयाला आला. देवस्थानाची पडझड पाहून जीर्णोद्धारा साठी मोठे द्रव्यसहाय्य केले, अशी हूल उठवूया. म्हणजे मुसलमान सत्तेचा आकसही थोडा सौम्य होईल. ही मसलत सगळ्यानाच पटली.
आसमंतातले कारागीर, दाते सहाय्याला आले. पाचसहा वर्षात देवस्थान पुन्हा मूळ रुपात उभे राहिले. त्या वर्षापासून सहा वर्षे बंद पडलेले वार्षिक पुन्हा सुरु करण्यात आले. आता वार्षिक कीर्तनात हरदासबुवा मुस्लीम व्यापाऱ्याचे मिथक सांगू लागले. पूर्वीच्या मिथकाला आणखीही एक पुष्टी जोडण्यात आली. मंदिर पूर्ण झाल्यावर तो व्यापारी आला असता मंदिराचे काम पाहून झाल्यावर सद्गदित होवून तटावरून खाली उडी मारून आत्म समर्पण केले. म्हणून मंदिराच्या प्रवेश द्वारापाशी त्याच्या नावाने पीर बांधलेला आहे.
धोरणी बुजुर्गानी त्याही पुढे जावून त्या पीराची व्यवस्था पाहण्या साठी मुस्लीम दांपत्याला जमिन-जुमला नी वर्षासन देवून कायमचे बाळगले. त्यामुळे हे देवस्थान हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाले. मंदिराच्या प्रांगणातला पीर.... तो तर हिंदूंच्या परम सहिष्णू तेचा ज्वलंत पुरावा! असे आगळे वेगळे महत्व कदंबेश्वर देवस्थानाला प्राप्त झाले . हिंदवी स्वराज्याची पडझड झाल्यानंतर अनेक सत्तांतरे झाली. महाराष्ट्रात असलेल्या अगणित हिंदू देवस्थानाना यावनी आक्रमकांचा फटका बसला, काही ठिकाणची देवस्थाने पूर्णपणे नामशेष झाली . पण कदंबेश्वर देवस्थान मात्र अनाघ्रात राहिले.
※※※※※※※※