रूरू - प्रमद्वरा Balkrishna Rane द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रूरू - प्रमद्वरा

रूरू - प्रमद्वरा एक पौराणिक प्रेमकथा
भाग-१


त्या निबिड अरण्यात एक ऋषीं निर्भयपणे वाट चालत होता.त्याच्या हाती एक लांब व दणकट असा दंड होता. गोरा वर्ण...रंद छाती...बलिष्ट शरीर... धारदार नाक रूंद कपाळपट्टी...त्यावर भस्माचे तीन पट्टे....निळसर तेजस्वी डोळे....भरगच्च मिशी...छातीपर्यंत पोहचलेली काळीभोर दाढी...केसांच्या गुंडाळ्या कपाळावर व्यवस्थीत बांधल्या होत्या. उजव्या खांद्यावरून कमरेच्या डाव्या बाजूला पोहचलेला शेला.कमरेला पांढर सुती धोतर....असा त्याचा वेष होता.सकाळच्या शांत व प्रसन्न वातावरणात तो मंगल अश्या ऋचा म्हणत चालला होता.त्याच्या आवाजाने वातावरण अधिकच पवित्र व प्रसन्न झाले होते. सोनसळी सूर्यकिरणे... किलबिणारे पक्षी...रानफुलांचा गंध..
फुलांवर रूंजी घालणार्या भ्रमरांचा आवाज....ह्या फुलावरून त्या फुलावर भिरणारी रंगबिरंगी फुलपाखरे...अगदी भावसमाधी लावणार ते दृश्य होत. होय तो ऋषी समाधी लावण्यासाठीच त्या अरण्यातील सरोवराकडे चालला होता.रोज सकाळच्या प्रहरी तो ह्या शांत वातावरणात .समाधी लावायचा..ईश्वर व निसर्गाची भक्तीने आराधना करायचा. चिंतन व...मनन करायचा...त्याला नव्या ऋचा...सुचायच्या....या ऋचांची तो मनातल्या मनात आवर्तने करायचा...त्या पाठ करायच्या.आपल्या कुटीत परतल्यावर तो या ऋचा आपल्या प्रिय पत्नीला...प्रमद्वराला ऐकवायचा.....ती त्या ऋचा भूजपत्रांवर...लिहून ठेवायची.अश्या अनेक भूजपत्राचे गठ्ठे त्यांच्या कुटीत व्यवस्थित बांधून ठेवले होते.रूरू ऋषी त्याच्या शिष्यांना त्या शिकवायचा..त्यांचा अर्थ सांगायचा.प्रमद्वराची आठवण होताच त्याचे डोळे गहिरे झाले .चेहर्यावर स्मित झळकले.
खरच प्रमद्वरा आपल्या आयुष्यात आली नसती तर आपल आयुष्य कुठच्या वळणार गेल असत कुणास ठाऊक अस त्याला वाटल.तिच्याशिवाय जगण्याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. दोघ एकमेकांवर अपार प्रेम करत होते. प्रमद्वरा भल्यापहाटे अलगद त्याच्या बलिष्ट बाहुपाशातून निसटायची. स्नान उरकून...पुजेच साहित्य रूरूसाठी तयार ठेवायची. गोठ्यातल्या गाईंच दूध काढायची....त्यांना ताजा चारा द्यायची.स्वयंपाकासाठी लागणारी लाकड गोळा करून ठेवायची.ही सगळी काम चालू असताना ती आपल्या मंजुळ आवाजात गात असायची.ही गाणी म्हणजे उषादेवीची स्तुती करणारी कवने असायची.यातली बरीच गीते तिला तीचे मानसपिता स्थूलकेल ऋषींनी लहानपणी शिकवलेली होती.रूरू पुष्करणीतून स्नान करून येईस्तोवर पूजाघरात...गंध-फूल...धुप...दुर्वा... शमी...चंदनकाष्टे...पेटवलेली धुनी सगळं तयार असायच.
रूरूची पूजा -अर्चा संपेपर्यंत प्रमद्वरा हात जोडून तिथे उभी राहायची.
प्रमद्वराच्या आठवणीत रमलेला रूरू अचानक वाटेतच थबकला. त्याला तो चिरपरीचित पण अप्रिय असा सरसरण्याचा आवाज आला.त्याचे डोळे आक्रसले...कपाळावर आठ्या पडल्या..
हातातला लांब व दणकट दंड त्याने सरसावला. पवित्रा घेत थो उभा राहिला.सावधपणे तो वाट पाहू लागला.अचानक त्या पाऊलवाटेवर....एक चार हात लांब व मनगटापेक्षा जाड असलेला काळाकभिन्न साप आला.त्या सापाला बघताच रूरूच्या संतापाचा कडेलोट झाला.समोरचा साप बिनविषारी दिसत होता तरीही रूरूने हातातला दंड उंचावून त्या सापाच्या डोक्यावर प्रहार करण्याची तयारी केली.आजपर्यंत त्याच्या या दंडाने सहस्रावधी सापांना यमसदनास धाडले होते.समस्त सर्पकूलाशी त्याच शत्रुत्व होत.रूरू कोणत्याही सापाला जीवंत सोडत नव्हता. तो सापांना शोधून दंडाने ठेचायचा.या पृथ्वीवरून सारी सर्पजात नष्ट करण्याचा त्याने चंगच बांधला होता.
" हे मुनीवरा...जरा थांब. मी एक निरुपद्रवी बिनविषारी असा साप आहे.माझ्या पासून मानवाला कोणताही धोका नाही. मग तू मला का संपवायला बघतो आहेस?" त्या सापाने रूरला विचारले.
" हे बघ तूझे कोणतेही तत्वज्ञान मला ऐकायच नाहीय.या पृथ्वीवर सर्पजातीला जगण्याचा अधिकार नाही. तुम्ही निरपराध मानवाला डसून त्याला संपवता.त्याच्या कुलावर मग संकटे येतात...मी तूला असा सोडणार नाही."रूरूॠषी अत्याधिक द्वेषाने उद्गारले.
" ऋषिवर तुम्ही चुकताय. पूर्वी पांडवाचा वंशज जनमेजयाने सर्पकुलाशी वैर धरले होते.कारण त्याचे वडील परीक्षित याचा मृत्यू तक्षक नावाच्या विषारी सापाच्या दंशाने झाला होता.त्याने सर्पयज्ञ केला होता.संपूर्ण सर्पकूल नष्ट होण्याच्या मार्गावर होते."
" मग बरच झाल असत की!...मग पुढे काय झाल?"
" तुझ्याच सारख्या अगस्ती नावाच्या महान ऋषिने जनमेजयाला...समजावल आणि सर्पयज्ञ थांबवला.नाहितर तक्षकासोबत इंद्रदेवही यज्ञात आहुतीच्या रूपात पडले असते .मुनीवर आम्ही तूझे शत्रू नसून मित्रच आहोत. तुम्ही शेती करता धान्य पिकवता....ते धान्य खाणारे मूषक हे आमच खाद्य....खर तर आम्ही तुम्हाला मदतच करतो."
रूरू ऋषी विचारात पडले.खरच आजवर त्यांनी अनेक विषारी व बिनविषारी सापांना या दंडाने ठेचले. केलेले कृत्य योग्य कि अयोग्य हे त्यांना ठरवता येईना.
" मुनीवर तुम्ही सर्पकुलाचा एवडा द्वेष का करता?"
एक सुस्कारा सोडत रूरू ऋषी म्हणाले..
"ऐक...अरे या पाठीमागे एक कथा आहे....माझी प्रिया..माझी पत्नी प्रमद्वारा हिच्याशी ती निगडीत आहे.
प्रमद्वरा ही देवलोकीची अप्सरा 'मेनका 'हिची मुलगी.
विश्वावसु नामक गंधर्वराजा व मेनका एकमेकांच्या प्रेमात पडले.त्या दोघांच्या प्रेमाचे फळ म्हणजे प्रमद्वरा!
प्रमद्वराचा जन्म झाला आणि मेनकेला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली.स्वर्गचे अधिपती इंद्रदेवांचा कोप होईल या भितीने तिने छोट्या बालिकेला जन्मताच स्थूलकेश ऋषींच्या आश्रमापाशी सोडल. मेनका निष्ठूरपणे स्वर्गलोकी निघूनही गेली.लहान बालकाच्या रडण्याच्या आवाजाने ऋषी बाहेर आले. त्यांच्या दृष्टीस नवजात मुलगी दिसली.त्यानी तिला उचलून घेतले.ती तिला वाढवले. तिच्या अवखळ वागण्याने ती सर्व ऋषी परीवाराची आवडती बनली. तिचे पिता गंधर्व व आई अप्सरा असल्याने ती विलक्षण सुंदर होती.स्थूलकेश ऋषींनी तिच्यावर छान असे संस्कार केले होते.ती रूपवान व गुणवान असल्यामुळे ऋषींनी तिच नाव प्रमद्वरा ठेवल. रूप आणी गुण यांची खाण म्हणजे प्रमद्वरा! प्रमद्वरा जशजशी यौवणात पाऊल ठेवू लागली तसतशी तीच रूप चंद्रकलेच्या प्रकाशाप्रमाणे अधिकच वाढू लागल.पण संस्कारामुळे ते दाहक न होता उलट अधिकच शितल होत गेल.तिच्या जन्माची कथा माहीत असल्याने तिचे मानसपिता, स्थूलकेश ऋषी अधिकच सावध होते.त्यांचे तिच्यावर लक्ष होते.पण तिच्यावर त्यांनी बंधने घातली नव्हती.त्यांनी तिला विविध कला...तसेच वेद..
गीता ...उपनिषदे...आदिंच शिक्षण दिल होत. आश्रमातली सारी व्यवस्था तिच बघायची.सर्वाची ती लाडकी...होती. सुकेशा...रसवंती....सुनेत्रा या परीसरातल्या ऋषीकन्या तीच्या जीवाभावाच्या मैत्रीणी होत्या.
एकदा प्रमद्वरा आपल्या मैत्रिणींसोबत अरण्यात...फिरायला गेली होती. अरण्यातल्या सरोवरात जलक्रीडा केल्यावर..ओलेत्या वस्रांनी त्या बाहेर आल्या.त्या अवखळ तरूणींनी चिखलांचे गोळे करून एकमेकांवर फेकायला सुरूवात केली.खेळता-खेळता त्या थोड्या दूर गेल्या.त्यांच लक्षच नव्हत की समोर एक तरूण ऋषी ध्यानस्थ पद्मासनात बसला होता .प्रमद्वराने सुकेशावर चिखलाचा गोळा फेकला पण तिने तो चपळाईने चुकवला.चिखलाचा गोळा सरळ त्या तरूण ऋषीच्या छातीवर बसला.गोळा छातीवरच स्थिरावला पण त्याचे शिंतोडे त्याचया चेहेर्यावर उडले.ध्यानभंग झाल्याने त्याने आपले डोळे उघडले. क्रोधित डोळ्यांनी त्याने समोर पाहिले. त्याचे डोळे विस्फारले...शब्द ओठांवरच थबकले.समोर प्रमद्वरा उभी होती.ओलेती...सलज्ज ...अपराधाची जाणीव झाल्यामुळे घाबरलेली....अधोवदन अशी ती तरूणी बघून तो सारच विसरला.
" ऋषीवर...मला..मला ..माफ करा. अनवधानाने....खेळता...खेळता हे घडल." त्या तरूणीने
विनवणी केली.
त्या लालसर ओठांतून आलेल ते शब्द म्हणजे.. स्वर्गीय संगीत होत. तो ऋषी म्हणजे रूरू होता.त्याच्या राग लोण्याच्या गोळ्याप्रमाणे कधिच वितळला होता.एकटकपणे तो तिच्याकडे बघत होता.
"अहहा... काय ते सौंदर्य...त्यात ती शालिनता.. जणू पौर्णिमेच शितल चांदण. " तो मनातल्या मनात पुटपुटला.
एकशिवडी बांधा....गोल चेहरा....चाफेकळी नासिका...रेखल्यासारख्या नाजूक काळ्याभोर भुवया ...अर्धवट मिटलेले धनुष्याकृती डोळे लालसर गोबरे गाल...कमरेपर्यंत पोहचलेल काळेभोर केस..गव्हाळ कांती...घाबरल्यामुळे धपापणारे वक्ष....!
"छे..छे..काय हे विचार येतायत माझ्या मनात !" रूरू शरमिंदा होत पुटपुटला. तरीही तो तिच्याकडे पाहत होता. त्याच मन धुंद झाल होत.एक वेगळी आणि विलक्षण भावना त्याच्या मनात अन् ह्रदयात निर्माण झाली होती.
प्रमद्वराची स्थितीही वेगळी नव्हती.समोरचा सुंदर रूपवान बलिष्ट तरूण तीला आवडला होता.त्याच्या बुद्धीमत्तेची..विद्वत्तेची जाणीव तिला त्याची रूंद कपाळपट्टी व वेध घेणार्या निळसर डोळ्यात दिसली होती.
दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या होत्या. तो एक क्षण दोघानांही एकमेकांच्या जवळ घेऊन गेला.एवड्यात प्रमद्वराच्या मैत्रिणी खळखळून हसल्या.तस दोघही भानावर आले.आपण एका ओलेत्या तरूणीला न्हाहाळत आहोत याची जाणीव होताच रूरू ओशाळला.आपला दंड उचलून तो उभा राहिला.प्रमद्वरा सुध्दा भानावर आली.स्वःताची अवस्था लक्षात ती मैत्रिणींच्या दिशेने धावत सुटली.
मंद स्मित करत रूरू सरोवराच्या पाण्यात उतरला.अजूनही प्रमद्वराची नजर रूरूचाच वेध घेत होती.
" आम्ही स्थूलकेशांच्या आश्रमातल्या..कन्या आहोत. होय ना प्रमद्वरा?" रसवंती रूरूला ऐकू जाईल अश्या आवाजात हसत म्हणाली.
" हे काय ग...रसवंती?" प्रमद्वरा लटक्या रागाने म्हणाली.
" बघा..बघा कसे गाल फुगले एका मुलीचे." सुनयनाने प्रमद्वराला चिडवल.
एव्हना रूरू चिखलाचे डाग साफ करून परतला होता.एकवार वळून त्याने त्यांच्याकडे पाहिले.प्रमद्वरेशी नजर भिडताच...नजरेने नजरेला सांगावा दिला.घडघडत्या ह्रदयाने एक सुस्कारा टाकत रूर आपल्या आश्रमाकडे चालू लागला.
------- भाग 1 समाप्त-----------
रूरू- प्रमद्वरा भाग 2

परतीच्या वाटेवर रूरू अनेकवेळा ठेचकाळला.त्याचे वाटेवर लक्षच नव्हत. सतत तो चेहरा नजरेसमोर दिसत होता.आश्रमात आल्यावरही त्याच मन स्थिरावल नव्हत.त्याच्या मित्रांच्या ते लक्षात आल होत. ते त्याला सारख त्याबद्दल विचारत होत पण तो काहीच बोलत नव्हता. मध्यान्ह भोजनावेळी तर खुपच गंमत झाली.रूरूने घास तोंडाकडे नेला व तो तसाच तोंडासमोर धरून ठेवला.सारे भोजन करून उठले तरी रूरू तशाच शून्यात बघत बसलेला.
" बाळ रूरू काय झाल ? प्रातःकालापासून तू अस काय करतोस ?" त्याचे आजोबा च्यवन ऋषी त्याला हलवून विचारत होते.
" अं..कुठ काय!" रूरू ओशाळून म्हणाला.
सायंकाळी सारे मित्र नौकाविहारासाठी गेले असता. ..त्याचा परममित्र श्रीशैलने त्याला अस्वस्थतेचे कारण विचारले.
रूरूने नाईलाजाने सारे त्याला सांगून टाकले.श्रीशैल खळखळून हसला.
" अरेच्या अस आहे तर...अरे वेड्या ती तूझ्यावर आसक्त झालीय. उद्याही ती व तिच्या सखी तिथेच त्याच वेळी येतील. आपण दोघे जाऊया."
" अरे हे कस दिसेल. तिला काय वाटेल?'" रूरूने विचारले.
" हे बघ, उगाच शंका घेवू नकोस.."
त्या रात्री रूरूला झोप येईना. तो या कुशीवरून त्या कुशीवरू वळत होता.आश्रमाच्या झावळांच्या मधून दिसणारे चांदणे त्याचा विरहदाह वाढवत होते.उत्तररात्री कधीतरी त्याला निद्रा आली. स्वप्नातही त्याला प्रमद्वरा दिसत होती.
पक्षांच्या किलबिलाटाने त्याला जाग आली त्यावेळी सोनेरी सूर्यकिरणे आश्रमात आली होती.तेवड्याच श्रीशैल
तिथे आला.झटपट स्नान करून ते दोघेही अरण्यातल्या सरोवराच्या दिशेने निघाले.सरोवराजवळ पोहचताच त्यांनी पाहिल की प्रमद्वरा सरोवराकाठच्या एका वृक्षाकाठी उदासवाणी बसली होती.तिच्या सख्या सरोवरात जलक्रीडा करत होत्या.
" पाहिलस, ती विरहणीसारखी एकटीच उदास बसलीय.मदनबाणांन तिलाही जखमी केलय ." श्रीशैल म्हणाला.
रूरूने एक सुस्कारा सोडला. श्रीशैल सावकाश प्रमद्वरा जवळ गेला.तिच लक्षच नव्हत....ती स्वतःतच हरवली होती.
" देवी...आपण ज्याची वाट बघताय...तो आलाय बर का !"
प्रमद्वरा दचकली....समोरच्या अनोळखी तरूणाला बघून ती घाबरली.
" कोण....कोण आपण ? इथ कसे आलात? अग...
सुनेत्रा..." प्रमद्वरा किंचाळली.
" देवी...जरा सावकाश...मी..मी ...श्रीशैल , रूरूचा मित्र...तो बघा तुमच्यासारखाच उदासवाणा बसलाय तिथे."
प्रमद्वराने वळून बघितल...रूरू नजरेला पडताच...
तिच्या गालावर रक्तीमा पसरला ...लज्जेने तिने मान खाली घातली.पण तिचे नेत्र अधिर झाले होते.
" हे बर आहे..माझ्यावर संताप अन् रूरू दिसताच...गालावर लाली...देवी, ..त्याला तुम्हाला भेटायचय...येवू दे त्याला..?"
" मी...मी ..काय सांगू.." तिने लज्जित होत आपल मुखकमल ओंजळीत लपवल.तेवढ्यात तिच्या सख्या तिथे आल्या.रूरू व श्रीशैल यांना बघताच त्यांनी आनंदाने...प्रमद्वराभोवती फेर धरला.
" हे बघा....दोन विरही जीवांमध्ये आमच काय काम. त्यांना एकांत हवा आहे नाही का?" श्रीशैल प्रमद्वरेच्या सयांकडे बघून उद्गारला. सार्या हसत वनात भटकण्यासाठी गेल्या .श्रीशैल सुध्दा एका वृक्षाखाली बसला.
बर्याच वेळाने रूरू व प्रमद्वरा तिथे आली.दोघेही आनंदात होती.प्रमद्वरेच्या सख्याही तिथे आल्या.
" आम्ही दोघांनीही एकमेकांना मनाने वरले आहे."
रूरू म्हणाले.
" पण तुम्ही माझ्या पित्यांना भेटून रितसर मागणी घाला ."
प्रमद्वरा म्हणाली.
" होय..ते तर करावच लागणार...आम्ही आजच पितामहांशी बोलतो." श्रीशैल म्हणाला.
" लवकरच...यांचा विवाह होवो...नाहीतर आमची सखी विरहाने कोमेजून जाईल." सूकेशा हसत म्हणाली.
" मला वाटत आपण आता निघाव उशीर झालाय."
रूरू म्हणाला.
सर्वांनी एकमेकाचा निरोप घेतला.रूरू व श्रीशैल त्यादिवशी पितामह च्यवनऋषींशी बोलले. च्यवनऋषीं हसले..." म्हणजे तूझी विमनस्क अवस्था यामुळे होती तर...!
मी याविषयी तूझ्या पित्याशी बोलतो."
झाल सार्या आश्रमात ही वार्ता पसरली.चर्चा सुरू झाल्या.अखेर एका मंगलदिनी च्यवनऋषीं...रूरूचा पिता प्रमत्त...श्रीशैल आणि आश्रमातील काही ऋषीपत्नी यांनी स्थूलकेश ऋषींच्या आश्रमाकडे प्रयाण केले.स्थूलकेशांनी त्यांचे स्वागत केले व आगमनाचे कारण विचारले. सारा प्रकार कळल्यावर ते आनंदीत झाले. आपली मानसकन्या आता विवाहयोग्य झाली याची त्यांना जाणीव झाली.प्रमद्वरा धडधडत्या अंतःकरणाने गुपचूप सार ऐकत होती.
" माझी काहीच हरकत नाही.." स्थूलकेश ऋषी म्हणाले.
" आमच्या रूरूला मोहात..पाडणारी...प्रमद्वरा आम्हाला पाहायचीय...."च्यवन म्हणाले.
सयांनी प्रमद्वरेला बाहेर आणल. प्रमद्वरेचा चेहरा लज्जेने लाल झाला होता. ती सर्वांसमोर अधोवदनाने उभी होती.
" अरे...वा..छान...तूझी निवड छान आहे.आम्हाला ही कन्या पसंत आहे." च्यवन रूरूच्या पाठीवर थाप मारत म्हणाले.
" पुढील मासात शुभ मुहूर्त आहे...त्यावेळी हे मंगलकार्य व्हाव अशी आमची इच्छा आहे." प्रमत्तऋषी म्हणाले.
सगळ्यांनाच आनंद झाला.त्यानंतर रूरू व प्रमद्वरा यांच्या भेटीगाठी होत राहिल्या.प्रत्येक दिवसागणिक त्यांचे प्रेम अधिकाधिक दृढ होवू लागले.पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
विवाहला काही दिवस उरले असताना....प्रमद्वरा वनात फुले गोळा करण्यास गेली असता एका भयंकर अश्या विषारी भुजंगावर तिचा पाय पडला. चिडलेल्या भुजंगाने तिच्या पायाला चावा घेतला.भितीने आणि वेदनेने कळवळत ति किंचाळली.तिच्या मैत्रिणी धावत आल्या.त्या भितीने थरथर कापू लागल्या.आरडाओरड करू लागल्या.कुणीतरी आश्रमात कळवल. सार्यांनीच धाव घेतली.स्थूलकेशऋषीनी सर्पविषावरची मूळी उगाळून घेतली.
पण सारे वनात पोहचेपर्यंत...प्रमद्वरा मूर्च्छीत झाली होती.तिच शरीर काळ निळ पडायला सुरूवात झाली होती. सारेच भयाने विलाप करू लागले.स्थूलकेश प्रमद्वरेला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करू लागले. पण हळूहळू तिचा श्वासोश्वास मंद होत गेला.ग्लानीत ती रूरूला हाका मारू लागली.
रूरूला हे समजल तेव्हा तो संतापाने बेभान झाला.समस्त सर्पकूलाशी आपले यापुढे वैर राहील अशी त्याने प्रतिज्ञा केली.तो या उन्मादा अवस्थेत धावतच स्थूलकेश ऋषींच्या आश्रमाकडे गेला.प्रमद्वरेला वेलींच्या झोळीतून आश्रमात आणले होते.आता तिच शरीर निळ पडल होत....तिचा श्वासोच्छ्वास बंद पडला होता.सारे शोकाकूल झाले होते.सारे प्रमद्वरेच्या आठवणीने अश्रू ढाळत होते.
" नाही हे शक्य नाही..प्रमद्वरा मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही...आता माझ्या जगण्याला काय अर्थ राहिल."तो ऊर बडवत विलाप करू लागला.
सारे आश्रमवासी त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागले.
" छे ...छे प्रमद्वरा आता उठेल..मला हाक मारेल...बघा..बघा ती हसेल." तो उन्मादाने बडबडू लागला.
" बाळ स्वःताला सावर...प्रमद्वरा आता देवलोकी गेलीय...देव सुध्दा किती कठोर आहे...एका सुकुमार उमलत्या कळीला त्याने उमलण्या आधिच खुडल." साश्रू नयनांनी स्थूलकेश ऋषी म्हणाले.
अचानक रूरू उठला अन् वनाच्या दिशेने धावत सुटला.त्याला कशाचेही भान नव्हते.तो नेहमीच्या सरोवराकाठी पोहचला व विलाप करू लागला.
" वृक्षांनो - वेलींनो....तुम्ही माझ्या प्रियेला पाहिलत..का? ती ..ती अती सुंदर व गुणवान आहे. वाराही तिच्या बाजूने जाताना थबकतो. भुंगेही कमलपुष्प समजून तिच्या भोवती रूंजी घालतात.."
तो असा भ्रमिष्टासारखा...भटकत असताना...तिथे वनविहारासाठी आलेला एक देवदूत त्याला भेटतो.रूरला तो भानावर आणतो पण त्याची कथा ऐकल्यावर तोही उदास होतो.दोन प्रेमी जीवांची मृत्यूमुळे झालेली ताटातूट त्यालाही खटकते.
" तुम्ही...माझ्या प्रियेसाठी...काही करू शकता का?"
रूरू देवदूतला साकड घालतो.
देवदूत रूरूला घेवून त्वरेने गंधर्वराजाकडे जातो.तो रूरूच्या वतीने प्रमद्वरेला जीवंत करण्याची विनंती करतो.
" तिचे प्राण यमाने हरण केले आहेत..तेच तीला पुन्हा जीवंत करू शकतात...आपण यमधर्माकडे जाऊया."
गंधर्वराजा, देवदूत व रूरू अखेर यमाकडे जातात..गंधर्वराजा यमाला रूरू व प्रमद्वरेची हकिकत सांगतो व प्रमद्वरेला जीवंत करण्याची विनंती करतो.
यमराज काही क्षण विचार करून म्हणतात...
" रूरू तू तूझ आयुष्य प्रमद्वरेला देत असशील तर मी तिला जीवंत करतो."
" होय..मी माझ सर्व आयुष्य तिला देतो. " रूरू संकल्प करत म्हणाला.
यमराज प्रसन्नपणे हसले.
" रूरू तुझ सर्व आयुष्य देण्याची गरज नाही...तू च्यवनऋषींप्रमाणे दीर्घायुष्यी आहेस....तूझ अर्ध आयुष्य तू प्रमद्वरेला दे."
रूरू यमाला प्रमाण करत म्हणाला..." मी माझ अर्ध आयुष्य प्रमद्वरेला देतो."
" जा..प्रमद्वरा आता जीवंत झाली असेल....आणि ती तूझी आतुरतेने वाट बघत असेल...."
यमराज देवदूताकडे पाहत म्हणाले....
" याला त्वरीत पृथ्वीवर स्थूलकेश ऋषींच्या आश्रमात ने."
रूरू हर्षभरीत झाला.यमराज...गंधर्वराज आणि देवदूताचे त्यांने आभार मानले.
पुडे रूरू व प्रमद्वरेचा विवाह ठरलेल्या शुभमूहूर्तावर झाला.पण या घटनेमुळे रूरू साप दिसला की त्याला आपल्या दंडाने ठेचायला लागला.


रूरूला हे सर्व आठवल.तो त्या सापाकडे बघून म्हणाला
" या घटनेमुळे माझ सापांशी वैर जडल...
पण मला माझी चूक कळलीय...
यापुढे मी सापांना इजा करणार नाही. माझ्या कर्मामुळे माझ्या जन्माला येणार्या बाळाला त्रास नको व्हायला. जा..तूला माझ्याकडून अभय आहे."
सापाला आनंद झाला तो रूरूला आशिर्वाद देत..सरसरत निघून गेला.आज रूरूला खूपच हलक- हलक वाटू लागल.
--------समाप्त---------------

( रूरू व प्रमद्वरेची कहाणी महाभारतात आली आहे.
थोडा वेगळा भाग म्हणजे मेनकेने पूर्वी शकुंतलेला जन्म दिल्यावर कण्वमुनींच्या आश्रमात सोडल होत.शकुंतला-दुष्यंताच्या प्रेमकहाणीत दुष्यंताने नंतर शकुंतलेला ओळखायला नकार दिला होता.पण रूरूने मात्र आपल्या प्रियेसाठी यमराजाकडे धाव घेतली