वाघजाईतले दिवस श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वाघजाईतले दिवस

वाघजाईतले दिवस
दादांची वाघजाईच्या शाळेत बदली झाली. त्यांचा शेती-शिक्षणाचा कोर्स झालेला अन् वाघजाईच्या शाळेत शेती विषय सुरू केलेला असूनही शेती शिक्षक नव्हता. भांबेडात दादा खुप कंटाळलेले. एकतर घरापासून बराच लांबीचा पल्ला,दुर्गम गाव आणि शाळेत मुले खुपच कमी. दुसरे म्हण जे भांबेड शाळेत फक्त चारच यत्ता असल्यामुळे शेती विषय नव्हता, म्हणून कोर्स करूनही दादांना भत्ता मिळाला नाही. तसेच वर्षभरात राजाची चौथी पुरी झाली की त्याच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्नच निर्माण झाला असता. मराठी शाळा मास्तराला काय मागितल्यावर लगेच बदली मिळणार थोडीच? म्हणून दादांनी वर्षभर अगोदरच डिस्ट्रिक्ट स्कुल बोर्डाकडे बदली मागणीचा अर्ज केला. कर्मधर्म संयोगाने अर्ज केल्यावर महिनाभरातच बदलीचा हुकूम आला. वाघजाई सगळ्यादृष्टिने सोईस्कर. विजयदुर्ग खारेपाटण लाँच सर्व्हिसची लाँच वाघजाईच्या बंदरात थांबायची. तिथून पुढे अर्ध्यातासाच्या अंतरावर वाघोटण बंदर. तिथे उतरले की दीड तास मकाण मारून पडलेला घर गाठणे सोईचे पडणार होते. सगळा नीट विचार करूनच दादांनी वाघजाई मागितली.
बदलीच्या हुकूमात तळाशी गिजबीज अक्षरात टीप लिहीलेली, “मागणीवरून बदली. सबब भत्ता मिळणार नाही. हुकुमदेखत वाटचाल न भोगता वाघजाई शाळा नं. १ येथे हजर होणेचे आहे. ” हुकूम वाचून दादा मोठ्या पेचात पडले. भत्त्याचे एकवेळ ठीक पण वाटचाल भोगायची नाही म्हणजे मोठाच पेच होता. या तळ टीपेच्या टीपेच्या शेऱ्याचा अर्थ असा होता की, आज संध्याकाळी साडेपाच वाजता कार्यालयीन वेळानंतर म्हणजे शाळा सुटल्यावर भांबेड शाळेतला चार्ज सोडायचा आणि उद्या सकाळी साडेसात वाजता शाळा उघडण्यापूर्वी तिथे हजर राहावयाचे. (त्या काळी मराठी शाळा सकाळी साडेसात ते साडेदहा आणि दुपारी अडीज ते संध्याकाळी साडेपाच अशा दुवक्त भरत) बदलीच्या नियमाप्रमाणे खरे तर वाटचालीसाठी म्हणून दोन दिवसांची सवलत द्यायची असा नियम होता. पण दादांनी स्वेच्छेने बदली मागितली होती. शिक्षण खात्याने प्रशासकीय पातळीवर केलेली ती बदली नव्हती. म्हणून प्रवास भत्ता देणे किंवा न देणेची मुभा बदली हुकूमावर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला होती.
अक्षरावरून दादांनी ओळखले की हे शिक्षण खात्यातल्या नाटेकर कारकूनाचे डोके! नाटेकर म्हणजे भारी तिरकम शेट आणि खत्रूड. तो फडतुस कारकुंडा होता खरा पण त्याचा मेहूणा डिस्ट्रिक्ट स्कुल बोर्डात होता. त्या वगीवर नायटेकर मूत जाळायचा. तो बदलीचे टेबल सांभाळायचा. तो हुकूम लिहिल त्यावर डिकेसाहेब डोळे मिटून सह्या करी. शेफारून गेलेल्या नाटेकराला असल्या फुसकुल्या सोडायची नी शाळा मास्तरांवर कुरघोड्या करायची खोडच ! म्हणून शिक्षक मंडळी त्याचा उल्लेख “विघ्नसंतोषी / पोटदुख्या किंवा नायटेकर” असा करीत. हा बदली हुकूम म्हणजे मोठेच गंडांतर आले असे दादांना वाटले. कारण भांबेड ते वाघजाई म्हणजो आठ तास चालीचे मकाण! भांबेड ते राजापूर,राजापूर ते खारेपाटण आणि खारेपाटणपासून लाँचने अगर लांबच्या पाय वाटेने वाघजाई असा दीर्घसूत्री प्रवास. नायटेकराला हे माहिती होते पण दादानी शेती कोर्स चे कारण नोंदल्यामुळे खात्याला झक् मारून त्यांची बदली करणे भाग पडले होते तो डूख धरून नायटेकराने असा वचपा काढला होता.खरेतर वाटचाल न भोगता ही अट बेकायदेशीर होती . पण बदली हुकूमावर साहेबाने सही केल्यावर मागाहून तळटीप घालून नायटेकराने डाव साधला होता. सकाळी आठच्या दरम्याने हुकूम आला आणि दादांची पळापळ सुरू झाली.
बारीक शोध-तपास केल्यावर भांबेडच्या सरदार पाताडे यांच्या वखलातला तानाजीराव पाताडे याची सासुरवाडी वाघजाईत असल्याची माहिती मिळाली. तो अधूनमधून वाघजाईत जाऊन यायचा. त्याच्या परिचयाचा मार्ग आणि चोरवाटासुध्दा त्याला पाठ. मग दुपारी दादा त्याला भेटले. तानाजाीराव यायला तयार झाला. एरवी तर राजापूर ते खारेपाटण सर्व्हिस मोटारने जाता आले असते पण शाळा सुटल्यावर निघायचे म्हणजे सगळा प्रवास पायी आणि रात्रीच्या वेळेत पुरा करायचा होता. वाटेत खायला म्हणून सांज्याच्या पोळ्या, लसणीचे तिखट,कंदील,काड्या पेट्या आणि बाटलीभर जाादाचे रॉकेल अशी सगळी जय्यत तयारी झाली. चार्ज सोडून संध्याकाळी शाळा सुटण्यापूर्वी तासभर तानाजीराव नि दादा यांनी भांबेड सोडले. राजापूर दस्तूरी नाका येईतो काळोख पडला. मग कंदील पेटवून पूढची चाल सुरू झाली.
दादा नि तानाजी हातिवल्यात धनगराच्या मांगराजवळ पोहोचले तेव्हा धनगर निजायच्या तयारीलाच लागलेला होता. तिखट-पोळी खाऊन झाल्यावर त्यांनी पुन्हा चालायला सुरूवात केली. आता वाटेत कुठेही न थांबता थेट वाघजाई गाठायची असाच त्यांचा बेत होता. पहिल्या कोंबड्यापर्यंत वाघजाई गाठून तिथेच उजाडेपर्यंत विश्रांती घ्यायची असा त्यांचा विचार होता. पण हे मकाण अपेक्षे इतके जवळचे नव्हते. दोघेजण कुणकवणात पाहोचले तेव्हा शुक्र उगवला नि पहिला कोंबडा झाला. अजूनही तास दीड-तास मकाण मारायचे होते. दमछाक झाली होती तरीही दोघांनी वेग वाढवला. ते वाघजाई शाळेच्या व्हरांडयात बसले तेव्हा दुसरा कोंबडा झाला. कंदील विझवून दोघेही व्हरांड्यातच लवंडले. सूर्य उगण्यापूर्वीच दादांना जाग आली. त्यांनी तानाजीरावाला हलवून हलवून उठवले. शाळेजवळच असलेल्या घाड्यांच्या घरी चौकशी करून दोघेही हेडमास्तर मांगले यांच्या घरी गेले.
दादांना मांगल्यांच्या बिऱ्हाडी पोहोचवून तानाजीराव सासरवाडीला गेला. आंघोळ करून, धोतर धुवून वाळत घालून दादा मांगले मास्तरांबरोबर शाळेत गेले. दुपारी शाळा सुटल्यावर दादा मांगल्याच्याच बिऱ्हाडी गेले. काल बरोबर घेतलेल्या पैकी फक्त दोन पोळ्याा उरल्या होत्या. त्याच खाऊन ऱ्हायचा दादांचा बेतहोता. पण मांगले ऐकेनात. मग त्यांच्या पडवीतच पिठले - भात रांधून दादा जेवले. खरे तर मांगले हे जैन समाजााचे मांसमच्छी न खाणारे. पण तो काळच वेगळा होता. जैनांकडे जेवणे दादांना पटले नसते अन् मांगल्यांनीही ब्राह्मण माणसाला आपल्याकडे जेवायचा आग्रह केला नसता. जेवून झाल्यावर दादांनी जरा झोप घेतली. दुपारी सव्वादोनला ते मांगले गुरूजीं बरोबर पुन्हा शाळेत गेले. मग मांगले गुरूजींनी गावचे पोलीस पाटील तात्या देसाई यांना निरोप पाठवला.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर दादा वस्तीला तात्या देसायांकडे गेले. तात्यांच्या दोन मुली नि दोन मुलगे शाळकरी होते. शाळेत ब्राह्मण मास्तर आले याचा तात्यांना आनंदच झाला. मास्तर तुम्ही बिऱ्हाडकरीपर्यंत निःसंकोच पणे आमच्याकडे रहा. इथे बिऱ्हाडाला घरांचा तोटा नाही. चार-पाच ब्राह्मणांची घरे ओस पडलेली आहेत. जो उठतो तो मुंबई गाठतो. दोन-चार दिवसांत बिऱ्हाडासाठी घर ठरवा. रात्री दोघांच्या मनमुराद गप्पा झाल्या. दादांना लवकरात लवकर भांबेडचे बिऱ्हाड हलवायचे होते. म्हणून दुसऱ्या दिवशीच बिऱ्हाडासाठी घर बघायची पृच्छा दादांनी केली. त्यांचे तात्यांशी बोलणे सुरू असताना देसाईकाकू पुढे येऊन म्हणाल्या, “गुरूजी,आमच्या घराजवळच बबन मिराशाचे घर रिकामे आहे. तुम्ही तिथेच बिऱ्हाड करा. आम्हाला तरी शेजार आहे कुठे ? तुमची मंडळी आली तर मला जरा हाक मारायला, बसा-उठायला संगत मिळेल. ”
बबन मिराशाचे घर अण्णांच्या घरापासुन हाकेच्या अंतरावर . तो मुंबईत स्थायिक झालेला. वर्षातून एखादी खेप तो वाघजाईत घालायचा.त्याच्या घर- घरभाटा पलीकडे अण्णा मिराशाचे घर. ते बबनचे चुलत चुलते. बबनच्या घराची चावी त्यांच्याकडेच असायची संध्याकाळी दादा नि तात्या अण्णा मिराशाना भेटले. अण्णांनी बबनचे घर उघडून दाखविले. घर चांगले प्रशस्त. माजघर, स्वयंपाकघर, देवखोली,बाळंतणीची खोली, पुढची मागची पडवी नि ऐसपैस अंगण. मागील दारी गोठा अन् घडीव दगडांनी बांधलेली विहिर. स्वतंत्र परडे परसू. दादांना घर पसंत पडले. भाड्याची वगैरे चर्चा झाली.
अण्णानी लगेचच घराची चावी दादांकडे देत म्हटले, “मास्तऽर आता ही किल्ली ठेवा हो तुमच्याकडेनच . घर जरा झाडून सारवून बरी घेयस् हवें.” थोडा वेळ थांबून हां ऽऽहां करून अण्णा पुढे म्हणाले,“तुमची लेकरें बाळें फिरणार. कुटे किरडू काटा असेल. त्यापक्षी आदीच सावध ऱ्हायलेलें बरें. तुमी तुमचे सोई सवडीन् कसे काय ते जामवा. तो तुमचा वेव्हार. तेचेत मी कशा दकल देयची? हांऽऽ बबन माजेशी बोलून गेलेला आहे. नायतरी घरात राबता नसला तर घर कोसळायस् कितीसा वेळ हो? पण बबन्यान् भाडें मत भलतेंच ताट सांगितलेन् आहे . वर्षास बारा रूपये. तो शहर बाजार फिरणारा, भाडें काय कमी करीलसे दिसत नाय् मज. भलता हिमटा माणूस.अवो, हा मनूक्ष म्हंजे धुवून कडी, उरलेल्याची वडी करणारा नी चुराची रेवडी करून खाणारा. बरें तो असो. तो कदी सटी सहामाशी चतुर्थी शिगमेस कदीतरी तो पावेल न पावेल. तेच्या मंडळीस काय इतें गोड लागत नाय. तो एकटाच येतो, ऱ्हातो, माजेकडेच दुवक्त पुख्खा झोडतो तो नि जातो झालें....भाडे आपले परभारी तेचेच कडे मनयार्डरीन पाटवा तुमी. उगाच माजेवर ती जोकमदारी कशा हो?”
दादा नि तात्या माघारी आले. रात्री जेवणे आटोपल्यावर घर झाडणे,साफसफाई आपण पाहतो असे तात्या म्हणाले. त्यांची माली,सुंदरी, विद्याधर, गोपाळ चौघे शाळेत जाणारी मास्तरांचा शेजाार लाभला तर पोरे अभ्यासाला लागतील या विचाराने तात्यांना समाधान वाटले. दुसऱ्या दिवसापासून बबनच्या घराची साफ सफाई सुरू झाली. देसायांनी उत्साहाने सगळे करून घेतले. अगदी भिंती सारवणे, जमिनींचे खड्डे भरून आटेकोपर सारवण, परड्यातले वेलदोर कापून लखलखीत बेणणी व्यवस्थित पार पाडली. शनिवार सकाळी शाळा सुटल्यावर दादा लाँचीने खारेपाटण,तिथून दस्तूरी नाक्यापर्यंत सर्व्हिस मोटारने आणि पुढे चालत असा प्रवास करून दुपारी तीनच्या दरम्याने भांबेडला पोहोचले.
पुढच्या गुरूवारी बिऱ्हाड -बाजले हलवायचा बेत करून दादा रविवारी वसतीला वाघजाईत आले. ठरल्याप्रमाणे गुरूवारी संध्याकाळी चार वाजता लाँच वाघजई बंदरात थांबली. आई,आक्का,विजू,राजा आणि सोबत आलेले तानाजीराव, भिवा बाणे लाँचीतून उतरले. देसाईणकाकू, गडी -पैरी घेऊन मास्तरांच्या मंडळींना आणायला बंदरावर थांबलेली होती. सगळी माणसे,सामानसुमान बबनच्या घरात डेरेदाखल झाले. पोरे घरभर धावायला लागली. ऐसपैस घर बघून आई भलतीच खुश झाली. तेवढ्यात देसायांच्या पोरांची फटावळ डोक्यावर टोपल्या घेऊन आली. मंडळीसाठी लाडु- चिवडा आणि तांब्यातून चहा देसाईण काकूंनी पाठवलेला. चहाफराळ सुरू असताना सुंद्री म्हणाली,“काळेमाई,आज रात्री सगळ्यांचेच जेवण आमच्याकडे करायचे आहे असा आईचा निरोप आहे.”
खाणेपाणी उरकल्यावर मुलांच्या गप्पा सुरू झाल्या. आईने सामान सोडून मांडामांड सुरू केली. माली-सुंदरी आपण होऊन आईच्या मदतीला वाकल्या. आई स्वयंपाक घरात गेली. तिथे घडवंचीवर चार-पाच डबे नि दोन टोपले झाकून ठेवलेले. आईने उघडून बघितले तर तांदूळ,डाळ,भाकरीचे पीठ, साखर,चहापुड, कांदे -बटाटे, मिरच्या आमसोले, गुळ, तेल, कुळथाचे पीठ, दगडी पेल्यात मीठ अशा वस्तू ! आई चक्रावून गेली. माली पुढे येऊन म्हणाली. “काळेमाई,आमच्या आईनेच हे जिन्नस पाठवून दिलेंनहेत. तुम्ही आल्या आल्या लगेच दुकानावर कुठे जाणार?” सामान लावून झाले. रात्री आयत्या वेळी देसायांकडे जाऊन आयते जेवायला बसायचे आईला परवडले नसते. काही मदत करता आली तर वेळेवारी गेलेले बरे असा विचार करून आई तयारीला लागली. तोंड धुऊन केसावरून फणी मारून तयारी करून आई मालीला म्हणाली, “मी जरा तुझ्या आईषी गप्पा मारायला जााते. तुम्ही काय करता ?” माली सुंद्री म्हणाल्या, “तुम्ही जावा माई. आम्ही इथेच खेळतो. आम्ही नीट लक्ष ठेवतो. काळोख पडण्यापूर्वी इथे कंदील लावून ठेवू आणि दार बंद करून सगळ्यांना घेऊन येऊ. जवळ तर आहे आमचे घर. तोपर्यंत आम्ही इथेच खेळतो. इथे कोणी मोठे माणूस नाही ओरडायला. आम्हाला हवा तसा धुडगूस घालायला मिळेल.”
आईने भांबेडातून येताना करून आणलेल्या रव्याच्या वड्या घेऊन ती देसायांच्या घरी गेली. देसाईणीशी तिचे चांगलेच सूत जामले. दादासुध्दा संध्याकाळी नेमाने तात्यांच्या ओसरीवर बसायचे. देसायांची सगळी मुले तर कायम माईच्या घरी असायची. मुला - मुलांचे चांगले जमायचे. भांडण-तंटा नाही धुसफूस नाही. संध्याकाळी पाढे,परवचा म्हणून झाल्यावर देसायांची मुले नाइलाजाने घरी जायची. माली-सुंद्री थोडया जाणत्या. त्यांनी आईला चांगलाच जीव लावला. दादांना मनाजोगती शाळा - गाव मिळाला. शाळेभोवती तीस-पस्तीस गुंठे जमीन. भोवती पक्का गडगा घातलेला. भरपूर पाणी असलेली विहिर. दादा उत्साहाने कामाला लागले. जामिनी नांगरून नीट मोामापाने 'दळे' पाडून घेतले. मास्तर कष्टाळू - हौशी आहेत म्हटल्यावर गावातली हौशी -घरंदाा माणसे मदतीला सरसावली. दळ्यांमध्ये भात, नाचणी, वऱ्या, भुईमुग,कारली,नवलकोल, मुळा, बावच्या, मिरच्या, अशी हंगामाप्रमाणे आलटून-पालटून पिके घ्यायचे दादांनी योजले. शाळेसमोर आणि कुंपणाच्या कडेने पध्दतशीर फुलझाडे,फळझाडे लावायची योजना आखली. लागवड सरळ रेषेत,पध्दतशीर,खड्डे मारून,नीट निगा राखून शास्त्रशुध्द असल्यामुळे लवकरच बाग दिसू लागली.
वाघजाईसारख्या आडगावात पोरांना मुद्दाम होऊन शेती शिकवायची गरजा नव्हती. ती कामे त्यांच्या अंगवळणी पडलेलीच होती,अभ्यासापेक्षाही त्या कामात त्यांना रसही होता. फक्त करून घेणारे कुणीतरी हवे होते. महिनाभरात सगळी पूर्वतयारी पूर्ण होत आली. त्याच सुमारास घरमालक बबन मिराशी याचे मुंबईहून पत्र आले. दादा घर उघडून राहायला लागल्याचे पत्र अण्णांनी त्याला लिहिले होते. ते मिळाल्यावर बबनचे ते उत्तरादाखल पत्र आले.
॥ श्री कुलस्वामिनी प्रसन्न ॥
श्रीयूत रा. रा. काळेमास्तर यांस
सप्रेम वंदे विनंती विषेश
मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण तुम्ही आमचें घरात बायको मुलांसह ऱ्हाईल्यांचे आण्णा मिराशाचे पत्र पावलें. गेली ८वरसें घर बंदच होते. पोटासाठी मुंबईत ऱ्हाईण्याचा प्रसंग माजेवर आला. वडील होते तों पावत ते रांधून खात पण वडलार्जित घर त्याणी राखले. त्यांच्या माघारी ब्राम्हण बिऱ्हाड ठेवा असें मी आण्णा मिराशांस कित्तेंक वेळा सांगितले.पण काय करणार हो ? येऊन-जाऊन भाऊबंदच ते. आमचे घर कोसळले तरी त्यांचे काय खरचणार होघ? त्यांस तेच हवे. पण कुळस्वामिनी माजें हाकेस धावून आली. कारण तिनेच तुम्हांस आमचे घरात राईण्याची बुध्दी दिली. आमचे देवस्थान बाधते, समंध आहे असे काहितरी तुम्हांस सांगून फितवण्याचा प्रयत्न कोण्ही करतील तर ते मनावर घेऊ नये. आमच्या घरभाटात काही बाधीकार नाही. तुम्ही ऱ्हाणारच आहात तर आमचे काही कुळाच्यार माज्या वतीने फुडे चालविलेंत तर मला तेवढेच बरे भोगेल . एक नंबर मुदां - प्रतिवरसी फाल्गुनात महापुरूषाचा भट वाढाईचा. त्यास आगरातच जेवायास वाढायचें. पाच पानें नेवेद्दाची ठेऊन पाणी सोडईचें. एक गोग्रास, दुस्रें ठिकाण बंद्यास, तिस्रे मुळ पुरूषांस, चौथे गुरवास आणि पाचवें अंबेजोगाई कुळस्वामिनीस ते नैवेद्द म्हणून तुम्ही खावयाचे. ब्राम्हण कऱ्हाडे वखलाताच सांगावा. कोकणस्थ आम्हांस पाळणार नाई. दोन नंबर मुदां - नवरातरात आमचें देवाऱ्ह्यात देवीची मुर्त आहे ती पायघडीवर ठेऊन नऊ दिवस नंदादीप लावायचा. रोज मंडपीस माळ बांधायची. दर दिवशी येक माळ वाढवीत जााणेची येणे प्रमाणे नववें दिशीं नऊ माळा बांधाईच्या. देवीला रोज कुर्डूचे फुल वहायचे आणि मंडपीस आंब्याच्या टाळा बांधायचा. नऊ दिवस पुजा करणाराने घटी बसायचे. तुम्हास सवड नसेल तर आमच्या वखलातला भट बसविलात तरी चालेल. त्यास दक्षिणा साहा आणे द्यावी (महापुरूषाचें भटास एक आणा देयचा). लळिता पंचमीस खिरीचा नेवेद्द करून देवीस दाखवाईचा. दुसरे एक,तीन वरसानी एकदा ब्रम्हनदेवास समाराधनेचा आमचा पालट येतो. तेव्हा ब्रम्हन देवाच्या देवळातच नेवेद्याचे जेवण रांधाईचे. दोन भट नि घाडी गुरव यांस जेवण वाढायचे. ब्रम्हन देवास नारळ ठेऊन तो सांगणे करून वाढवायचा. एक कवड गुरवास देयची,एकीची खिराफत करून वाटायची. ब्राम्हणास एक एक आणा दक्षणा देयची . आमचे घरभाटात सहा माड जिते होते. पोफळी दोन होत्या. त्या बव्हतेक मेल्या असतील. त्यांस आळे करून नित्यनेम पाणी वोतायचें. निमें नारळ तुम्ही कष्टाबदल घेयचे. निमे विकून उत्पन्न मज देयचें. देव कार्यास नारळ आमचे माडाचेच वापरायचे. शिगम्यात देवाचे निशाण खेळे टिपरी मारून जातात. त्यास नारळ नि सवा आणा देऊन आम्हास सुख भोगावे असे गाऱ्हाणे नावनिशीवार करायस् सांगावे. दोन पुरातन आंबे साखरम् बिटकी, धोदांबा आहेत. ते धरले काय मला कळवावें. हाल्ली कयरीला दर बरा येतो. कयरी पाठवून उरतील ते आंबे पिकून खाली पडल्यावर तुमच्या लेकराबाळांनी पुंजावून खावे. त्यास माजी हरकत नाय. परसू परडे साफ ठेवावे. ठिकाणास वई करावी. वईस जितारू खुंट घालावेत. काठ्या आठ वईस लागतील त्या मलकी बेटातल्या तोडणेच्या. आवती काठीस हात लावूं नये. मागच्या खेपेला बावीस आवती काठ्या, सहा कोंब शिलक होते ते मी मोजले आहेत. आता किती शिलकी आहेत ते मोजून कळवावे. घर,ठिकाण तुमचे समजून देखभाल करा. रक्षण करून भक्षण करावे. धाकू बाण्याने दोन वरसें खंडाचे भात घातलेले नाही. त्यास जारा हडसून खडसून विच्यारावे. आठ मण भात त्याणें देणे लागते. ते तुम्ही घेऊन वापरलेत तरी चालेल. मी आल्यावर गावात दराची चवकशी करून भाताचे पयसे ठरवीन. दुस्रें एक मत्वाचे म्हंजे, रोजा सोवळयाने देवपुजा करावी. देव्हाऱ्यात शितळादेवीची मुर्त चांदीची आहे. तिस खरें शंभर नंबरी सोन्याचें मंगळसुत्र दोन मणी वाट्या असे आहे. देवाची पुजाा करताना ते निर्माल्यातुन गहाळ व्हायला देऊ नये. आणखी एक मत्वाचें म्हंजे भाडयाचे मी बारा रूपये आण्णा मिराष्यांस बोललो होतो खरें,पण महर्गता फारच झालेली आहे तरी विचार करिता भाडें बारा अयवजी पंधरा रूपये करून मला मनयार्डरीन वरसाचें भाडे आगावू पाठविलेत तरी चालेल. इथे आम्ही च्यार खोल्यांचे म्हयना अडीच रूपये भाडें ठोकून देतो. तुम्हाला आख्खे घर आमचें वापराईला आयतें मिळाले आहे. सध्या मला जरा निकड आहे तेव्हा भाडें लवकर पाठवाल तरे बरें होईल. देवकत्या चे दहा आणें,मनयार्डरीचं कमिशन भाडे रकमेतून कापून घ्यावे. उगाच तुम्हाला तरी तोशीश कशास देयची हो. आणि एक महत्वाचे पथ्य म्हणजो घराच्या भिंती, खांड बारें,बारें,खांब यांजवर खिळे चुका ठोकू नयेत. पत्राचे उत्तरी खुलासा साद्यंत कळवावा. तुमच्या मुलालेकरांस आशीर्वाद. तुमच्या सौ. मंडळीस सा. नमस्कार.
आपला कृपाभिलाषी,
रा. रा. बबन. धोंडो मिराशी ,बॉम्बे.
दादा-तात्या यांनी पत्र वाचले. बबनच्या खडूसपणाचे त्यांना हसू आले. त्यांनी उत्तरी कळविले- त्याच्या अपेक्षा आपल्याच्याने पुऱ्या होणार नाहीत. फक्त रोजची देवपुजा आपण करू. बाकी त्याची वार्षिके कुळाचार आपल्याला जमायचे नाही. ठिकाणाची साफसफाई,देखभाल कृतज्ञता बुध्दीने करू. नारळ पडलेले जमवून देवखोलीत ठेवू. बबन येईल तेव्हा त्यानेच काय ती निर्गत लावावी. भाडे वर्षाचे सहा रूपये परवडेल, इकडे सार्वत्रिक तेवढाच दर आहे. जमत असेल तर बघावे अन्यथा आपण दुसरे घर बघू. दादांचे पत्र वाचल्यावर बबनचे तात्काळ पत्र आले. तो काय समजायचे ते समजला. दादांचे म्हणणे कबूल आहे. त्यांनी खुशाल रहावे. सहा रूपये भाडे चालेल असे त्याने कळविले होते. त्याचे उत्तर आले आणि दादा निर्धास्त झाले. त्यांचे वाघजाई पर्व खऱ्या अर्थाने सुरू झाले.
शेती कामाची मुळात आवड असलेली शाळेतली पोरे मनापासुन राबायला लागली. दादांनाही शेतीची खरी आवड. त्यांना भेट कलम, खुंटी कलम, गुटी कलम, डोळे भरणे या कलाही चांगल्या अवगत होत्या. त्यांचा हातगुणही असा की त्यांनी लावलेले झाड सहसा मरायचे नाही. शाळेच्या प्रवेशव्दारात काठ्यांचे कायमस्वरूची तोरण करून त्यावर कृष्णकमळीचा वेल वाढायला लागला. कुठून कुठून पैदा करून दोन-तीन प्रकारच्या कण्हेरी, जास्वंदी, कोरांटया, सदाफुल्या, अबोल्या, दोन रंगाचे सोनचाफे, पांढरा-तांबडा चाफा,चार रंगाच्या गुलबक्षी, अनंत, तगर, गुलछडी, पारिजातक, तुळशी, गुलाब, बोगन वेल,रातराणी,तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे त्यांनी लावली. तसेच चिक्कु, फणस, पेरू, आंबा, काजू, आवळा, रायआवळा, बिंबल, जांभुळ, पोपणशी, लिंबू, साखरलिंबी, कडूलिंब, कढीपत्ता, हरतऱ्हेची कमी पाण्यात होणारी फळझाडे योजनापूर्वक लावली. शाळेच्या मागे एक जुनाट रायवळ आंबा होता त्याला हापूस, पायरी, माणकुर, पावशी आंबा, तोतापुरी आंबा अशा पाच प्रकारच्या खुंट्या भरल्या. एकाच झाडाला पाच प्रकारचे आंबे असलेल्या या कलमाला दादा 'पंचगुणी कलम' म्हणत.
शाळेसमोर चार माड, दोन पोफळी लावल्या. झाडांना पाणी घालायच्या पाळ्या ठरवून दिल्या. अगदी सुट्टीत सुध्दा मुले पाळीप्रमाणे पाणी घालायची. शाळेतली शेती हा लोकांच्या कौतुकाचा विषय झाला. गावात कुणी पै-पाहूणा आला की ग्रामस्थ त्याला मुद्दाम शाळेची बाग दाखवायचे. आई-दादांचा लोकसंग्रह वाढत चालला. कृष्णा गुरव,दादू धुवाळी,आण्णा मिराशी,दाजीकाका रानडे,भलुभाऊ साठे,दत्तु घाडी, दुकानदार दात्ये,नानू पेंढारकर ही माणसे चार दोन दिवसांनी मुद्दाम आढळून जायची. तर म्हातारी गुरवीण, येशी काकू,सुमा वहिनी,काशीबाणी,भागी परबीण, रानडीण,दात्ये वैनी अधून मधून दुपारी गप्पाष्टकांना आईकडे टेकायची. देसायांचे घर म्हणजो आईदादांचे हक्काचेच. तात्यां देसायांचा रोज सकाळचा चहा मास्तरांकडे हा जाणु रिवाजच झाला. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर कृष्णा गुरव नि दादू धुवाळी म्हैस बाळगण्यासाठी दादांच्या मागे लागले. कृष्णा बोलणारा मोठा पक्चंदन, “मास्तऽऽर ! गाबतास तारू नि भटास गुरू हे हवेंच. बबन मिराशाचा गोठा आहेच. झालेतर त्याचे भाडें द्या. गोठ्यास गवत ठेवायला माळा आहे. तुम्ही म्हैस बाळगा.”
दादू धुवाळी गुरांचा वैद्य. तो वैद्यगिरी करीत आसमंतात फिरायचा. “मास्तर,मी तुमका म्हस घेवन् देतंय. अडनड आमी सांबाळताव. गवत काडयेची जोकम मी बगतय्. कदितरी वयच् ताकाचा पांढरा पानी दिलास पुरे. तुमी फकस व्हय म्हना,मगे मी कायता बगतय्...” आईदादांनी त्यांच्या सांगण्याचा विचार केला, नाहीतरी चारदोन वर्षे कशीच काढायची होती. मग म्हैस घेतली तर काय बिघडले ? हो-नाही करत बेत ठरला. आठवडाभरात दादू नि कृष्णा एक उत्तम म्हैस घेऊन आले. कृष्णा गुरवाने स्वतः दावे वळून दिले, गताडी घातली, गवत आणून टाकले. म्हैस विऊन दुध द्यायला लागली. वाघजाईचा मळा दुपिकी. उन्हाळ-पावसाळ कायम हिरवा चारा म्हशीला मिळे. कुळथाचे गुळी, शेंगदाण्याचे गुळी, मुबलक मिळे . पोराबांळाना मनमुराद दुभते मिळायला लागले. कृष्णा-दादू नित्यनेम ताजे ताक, दही घेऊन जात. फक्त दुध काढायचे काम आई-दादांवर पडे. बाकी सगळी उस्तवारी दादू-कृष्णा दोघेही आपुलकीने करीत. त्यांच्या मदतीचा उच्चारसुध्दा करण्याची सोय नव्हती.,ती माणसे आई दादांशी जीव जोडून होती. दुधा - तुपाचे चार पैसे आईच्या शिलकीत पडू लागले. जनावराची बडदास्त कशी ठेवायची हे त्यांना कृष्णा गुरवाने शिकवले असे दादा वाघजाई सोडल्यावरही आम्हांस सांगायचे.
पाच वर्षे कधीच मागे पडली. राजा फायनल होऊन आठवीच्या शिक्षणासाठी खारेपाटणला ऱ्हायला. देसायांची मालू लग्न होऊन सासरी नांदायला गेली. देसायांच्या विद्याधराला तर स्कॉलरशिप मिळाली. रत्नागिरी केंद्रात तो पहिला आला. फायनलच्या परीक्षेचे निकालही सुधारले. फायनलच्या मुलांचे रात्रीच्या वेळी जादा तास दादा घ्यायचे. त्यांच्या कामाची तारीफ ग्रामस्थ करायचे. वाघजाई शाळेभोवती तर जसे नंदनवनच उभे राहीले. गावात येणारे अपरिचित दादांना वाघजाईचेच समजत.सगळे गुण्या गोविंदाने सुरळीत चाललेले असले तरी दादांना मात्र घरचे वेध लागले. सुशीआत्ते लग्न होऊन सासरी गेली आणि तात्या आजोबा एकटे राहिले . पडेलचे घर त्यांना खायला येई. सुन -मुलगा-नातवंडे सगळे गोकुळ आपल्या भोवती हवे असा धोशा त्यांनी लावला. “तु हेकडा बदली करनी घेऽऽ” दर खेपेला ते दादांना विनवू लागले. बहिणींनी सुध्दा पत्रे पाठवून घरी राहायला जा असे निक्षून कळवले. गप्पांच्या ओघात दादा ही गोष्ट तात्यांना बोलेले. “डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्डात माझी ओळख आहे. तुमच्या बदलीचे काम मी करतो. ” तात्यांनी शब्द दिला.
नेमके त्याच वेळी डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर गायतोंडे वाघजाईच्या व्हिजिटला आले. जिल्हा एज्युकेशन इन्स्पेक्टरच्या वरचे कुणीतरी साहेब शेती शाळांना भेटी देण्यासाठी रत्नागिरी जिल्हयाच्या दौऱ्यावर येणार असल्याने त्याची योजना ठरविण्यासाठी गायतोंड्यानी मुद्दाम वाघजाई शाळेला व्हिजिट दिलेली. दादांच्या कामाचा लौकिक गायतोंडे ऐकून होते. समक्ष पाहून खात्री झाल्यावर वाघजाई शाळा त्यांनी निवडली. मंडणगड,दापोली,संगमेश्वर, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी , बांदा असा साहेबांचा १०/१२ दिवसांचा दौरा ठरला. पाऊण महिन्या नंतरची तारीख वाघजाई भेटीसाठी ठरली. दादांची गडबड उडाली. एवढे मोठे साहेब येणार. काहीतरी नावीन्यपूर्ण त्यांना बघायला मिळाले पाहिजो. तशी बाग बघता आली असती. पेरू- चिकू, अननसे धरलेली होती. मिरच्या, वांगी, भेंडी, कारली,काशी भोपळे,लाल भाजी, मुळा अशा भाज्याही बहरलेल्या होत्या. त्यासाठी काही वेगळे करण्याची जरूरी नव्हती.
दादांनी सगळा परिसर साफसुफ करून झांडाच्या फांद्या छाटून सगळे नीटनेटके केले. नव्याने आळी बांधून घेतली. पोरे राबायला लागली. ग्रामस्थांची सभा घेऊन मोठ्या साहेबांच्या भेटीची माहिती देऊन त्यांच्या आगत स्वागताची जंगी तयारी ठरली. शाळेसमोर मातीत भारताच्या नकाशाचा आकार दादांनी कोरला. नकाशाच्या सीमा,घटक राज्यांच्या सीमा,बोट दीड बोट वर खोदून दाखवल्या. त्यात आळीव नी मेथी पेरली. इतर राज्यांच्या जागी वेगवेगळी कडधान्ये मोड ती काढून नीट पसरली. नकाशाच्या शीर्षस्थानी 'कृषि प्रधान भारत' ही अक्षरे कोरून त्यात लाल भाजी पेरली. रोज सकाळ -संध्याकाळ जातिनिशी पाणी देऊन दादांनी हिरवा भारत बनवायला सुरूवात केली. आठ दिवसांत शाळेच्या प्रवेशव्दाराच्या कमानीत उभे राहिल्यावर भारत आणि वरची अक्षरे ठळक नजरेत भरू लागली. साहेबांच्या भेटीचा दिवस जवळ येऊ लागला. दादा निर्धास्त झाले. आपल्या वरिष्ठानी आपले काम पहावे अशी त्यांची सुप्त इच्छा नशिबानेच फलद्रुप व्हायचा योग आला म्हणा ना !
सगळा लवाजमा घेऊन साहेब एकदाचे वाघजाई बंदरात उतरले. तिथून ढोल-ताशे वाजवीत त्यांना समारंभ पूर्वक शाळे पर्यंत आणण्यात आले. मुख़्य प्रवेशव्दारा पासून शाळेच्या दरवाजापर्यंत मुले रांगेंत उभी राहीली. साहेब प्रवेशव्दारात थांबले. कृ ष्णकमळीच्या फुलांनी बहरलेली कमान नीट निरखून बघितली. चार फुलेही खुडून घेतली. साहेब मंद पावले टाकीत नकाशासमोर येऊन थांबले. त्यांच्या मागोमाग डिके साहेब,गायतोंडे,सीनि. ए. डी. आय. सावंत, मुरकर आणि नाटेकर,जोग हे कारकून आणि शिपाई असा वीसेक माणसांचा लवाजमा आलेला. शाळेच्या दारा समोर मांगले गुरूजी हात जोडून स्वागताला उभे राहिलेले अन् पाठीमागे दादांसह सगळे शि क्षक. नायटेकर बाजूला होऊन गुरूजींकडे आला. दादांजवळ जाऊन तो फुसफुसला, "काळे मास्तर,सगळे व्यवस्थित आहे ना ? हा साहेब खोलात शिरणारा आहे. तुम्ही इथे काय केलेत त्याचे माप आज पदरात पडेल तुमच्या. ठीक तर ठीक,नायतर काय खैर नाही तुमची."
दादांना आधीच नाटेकराचा राग. ते चटकन म्हणाले, श “नाटेकरभाऊ,सायबांची भीती मला नाय. माझे काम कसे आहे. ते आता कळेलच तुम्हालाही. " तेवढयात बाहेर उभे असलेल्या मोठया साहेबांनी विचारले, शाळेतले शेती शिक्षक कोण आहेत ? त्यांना जरा बोलवा.” दादा साहेबांसमोर जाऊन उभे राहिले.
दादांच्या खांद्यावर थोपटीत साहेब म्हणाले, “गुरूजी, हा तुमचा नकाशा म्हणजो आम्हाला दिलेली खरी मानवंदना. हे उभे करायला,टिकवायला किती सायास पडले असतील याची किंमत मला कळते. ” तेवढ्यात कोणीतरी पाणी,सरबत घ्यायला आत चला....अशी विनंती साहेबांना केली. साहेब म्हणाले, “आधी नको ! कमानीवरची कृष्णकमळे बघुनच तहान भागली. आधी या गुरूजींचा शेतीफार्म बघुया. चला गुरूजी,तुम्ही काय काय केले आहे ते पहायचे आहे मला.” मग दादांनी सगळा भाग त्यांना फिरून दाखवला. बागेतल्या पेरूवरचे दोन-तीन पेरू,लिंबावरची लिंबे, चिकु, वांगी साहेबांनी तोडून घेतली. घडाने भारावलेल्या केळी अगदी जावून निरखल्या. काशी भोपळा बघून तर साहेब खुष झाले. “गुरूजी, तुम्ही मला भेट म्हणून काही देणार असाल तर एक जून झालेला भोपळा द्या. इतका लहान भोपळा आम्ही प्रथमच बघतो आहोत.”
मग पंचरंगी कलम दादांनी दाखविले. त्यावर नुकता मोहोर येऊ लागलेला. फार्म फिरून बघितल्यावर ऑफिसकडे जाता जाता साहेब सांगू लागले. “गुरूजी,मी इथे येण्यापुर्वी चारपाच शेती शाळा बघितल्या. अहो काय सांगायचे ! एका शाळेत गेलो तर जेमतेम दहाबारा दिवसांपूर्वी लावलेली चार झाडे, फुलझाडे आणि फक्त एकच पेरूचे झाड. झाडावरचे पेरू एकजात सगळे पिकलेले. म्हणून सहज झाडाजावळ गेलो तो काय आश्चर्य ! पेरू दोऱ्याने बांधून ठेवलेले. आयत्या वेळी ते तरी काय करणार म्हणा. नशीब आमचे. तिथल्या मास्तरांचा भुगोल तरी पक्का होता. पेरूच्या झाडाला सफरचंदे नाही बांधली. शिक्षकांनी असे ताळतंत्र सोडले तर समाज का नाही रसातळाला जाणार? गुरूजी,तुम्ही या आडगावात जो करून दाखविलेत त्याचा कित्ता इतरांनी गिरवावा एवढे आदर्श काम आहे तुमचे.”
मग डिके साहेबांकडे वळून ते म्हणाले,“मिस्टर डिके, जिल्हयातल्या शेती शाळांना ऑर्डर काढा. सगळ्या शेती शिक्षकांनी एकदा वाघजाई शाळेतला शेती फार्म बघावा. शिक्षक काय काय करू शकतो, त्याने काय करावे? हे बघू दे एकदा सगळयांना! आणि या गुरूजीना,काय हो तुमचे नाव?” दादा म्हणाले, “विनायक रामकृष्ण काळे.”मोठे साहेब म्हणाले, “तर या काळे गुरूजींना एक खास प्रशस्तिपत्र आणि एक इन्क्रिमेण्ट द्या. आमच्या भेटीचा,आमच्या रिपोर्टचा उल्लेख करा. ”
मग साहेबानी दप्तराची जुजबी तपासणी केली. भात, नाचणे, भाजीपाला, केळी, विकून आलेल्या रक्कमा तालुका शाळेत जमा केल्याच्या नोंदी असलेल्या रजिस्टरवर तेवढी साहेबानी सही केली नी विजिट बुकात शेरा लिहिला. सगळी मंडळी जेवली. नायटेकराचे तोंड तर खेटर मारल्यासारखे झालेले.जेवणखाण उरकल्यावर डिकेसाहेब शाळेच्या शेरे बुकात शेरा लिहीत असताना देसाईं आणि मांगले गुरुजीनी दादांची कौटुंबिक अडचण कानावर घालून त्यांची बदली करण्याची विनंती केली. तसेच भांबेडातून बदली करताना त्याना वाटचाल सुद्धा भोगू दिली नव्हती असे म्हटल्यावर डिके साहेब बोलले,“ हे काय भलतेच सांगताहात तुम्ही, कुठे भांबेड नी कुठे वाघजाई. एकाच गावात एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली असेल तर वाटचाल नाही मिळत.” त्यावर तो हुकूम मांगले गुरुजीनी साहेबाना दाखवला.डिके साहेबांनी कपाळावर हात मारून घेतला.मग नाटेकराला बोलावून घेतले आणि बदलीच्या हुकूमावर त्याने आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या शेऱ्याकडे निर्देश करीत ते म्हणाले, “असले कुकर्म पुन्हा नका करू. हे धसाला लागले तर सस्पेंड व्हाल. ”
मग डिके साहेबानी दादाना बोलावून घेतले. “काळे गुरूजी, आज तुम्ही आमची अब्रु राखलीत. तुमची अडचण आम्ही नाही तर कोणी दूर करायची फक्त शाळा कोणती हवी तेवढे सांगा. अरे नाटेकर” तशी नायटेकर गडबडीने पुढे झाला. डिकेसाहेब म्हणाले, “काळे गुरूजींची बदलीची ऑर्डर घालायची आहे. त्यांना शाळा कुठली हवी ते लिहून घ्या.” दादा म्हणाले,“पुरळ कसबा,तालुका देवगड.” डिकेसाहेब म्हणाले, “नाटेकर, चार दिवसानी साहेबांचा दौरा पूर्ण करून रत्नागिरी गाठल्यावर दुसऱ्या दिवशी काळे गुरूजींच्या बदलीची ऑर्डर आणि विशेष वेतनवाढ दोन्ही हुकूम नोट करा नि आमच्या सहीला ठेवा.” दादांनी सुटकेचा निश्वास सोडला.

साहेबांनी व्हिजिट झाल्यावर पंधराव्या दिवशी दादांना खास बाब म्हणून एक वेतन वाढ दिल्याचा हुकूम, प्रशस्तिपत्र आणि बदलीची ऑर्डर आली. या वेळची बदली खात्याने केलेली असल्यामुळे प्रवास भत्ता, वाटचाल दादांना मिळायची होती. सामानसुमान आवरून दादांनी जाण्याची तयारी केली. इष्टमित्रांचे निरोप घेणे, कुठे चहापाणी, कुठे जेवण यांत चार दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. मोठ्या थाटामाटात दादांचा निरोप समारंभ पार पडला. त्या कार्यक्रमाला तालुक्यातले सीनियर ए. डी. आय. जातीनिशी हजर राहीलेले होते. चार दिवसानी वाघजाई सोडायचा दिवस उजाडला. तात्या देसाईंकडे जेवण उरकून आई-दादा मुले, सामान यांसह बंदराकडे निघाले. सगळा गाव दादांना निरोप द्यायला बंदरावर जामलेला. दादू धुवाळी, कृष्णा्ंणा गुरव, दत्तु घाडी सामान पोहोचवायला पडेल पर्यंत यायचे होते. लाँच आली. मंडळी लाँचीत बसली. लाँच सुरू झाली आणि आईने डोळ्यांना पदर लावला. दादा घट्ट मनाचे, पण त्यांनीही बाजूला तोंड फिरवले. आई - दादांच्या आयुष्यातले अविस्मरणीय पर्व आता संपले होते.
काही काळ मायेखातर वाघजाईची माणसे पडेलला यायची. आई-दादा वर्ष दोन वर्षानी वाघजाईत जायचे. पण हळूहळू हेही बंद झाले. वाघजाई फक्त स्मृतीत उरली. मुलांना पुसट पुसट थोडे स्मरते. कधीतरी गप्पांच्या ओघात विषय निघाला की आई रसभरीत वर्णने सांगते. तिथला ब्रह्मदेव, तिथली माणसे यांचे आई जे वर्णन करते ते आम्हाला स्वल्प विरामासह तोंडपाठ आहे. आई रंगात येऊन सांगत असताना आम्ही भांवडे एकमेकांना खुणा करतो,सुना तोंडावर पदर घेऊन खुसखुसतात पण आईचे लक्ष असते कुठे ? ती आपली वाघजाईच्या आठवणीत आकंठ बुडून गेलेली !
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙