देवकळा श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवकळा

देवकळा
खांद्यावर ठासणीची बंदूक आणि हातात भलामोठा दांडा घेऊन संध्याकाळच्या वेळेस भिवा टिपवण्याकडे निघालेला. बहुतेक सशाच्या पारधीला निघालेला असावा असेच बघणाऱ्याना वाटले असते. पण, आजची शिकार मोठी होती आणि वेगळीही होती. उभ्या रानात वाघ समोर आला तरी त्याला अंगावर घेण्याची हिंमत असलेला भिवा यापूर्वी एकदा याच शिकारीला जाऊन कच खाऊन माघारी फिरला होता, कारण सावज साधेसुधे नव्हते. खोत वकील म्हणजो काही डुक्कर नव्हता कि दिसला आणि घातली गोळी. दशक्रोशीत खोत वकिलाचा लौकीक. वकिली मुळे कोर्ट दरबारी,पोलिस स्टेशनवर त्याचे लागेबांधे. गोळी घालणे एकवेळ सोपे पण पचवणे अवघड गेले असते. काम मोठे जोखमीचे. उभ्या भाटलेवाडीत हाहाःकार माजला असता. शिवाय खोत म्हणजो गावदेवी माउलीचे मानकरी. यदाकदाचित गावकऱ्यानी एकत्र येऊन जाबसाल घातली असती देवीला तर पोलिस परवडले असे म्हणायची पाळी. कारण देवीचा लौकिक मुळी होताच तसा ! परशा घाडी हा देवीचा अवसर. देवीचे प्रमुख मानकरी आणि गावकरी एकत्र येऊन त्यानी देवीला जााब घातला आणि परशावर देवकळा आली की नजरेसमोर घटना घडत आहे असे तो वदायला लागला असता. तो जो सांगता ते कोर्टापुढे सिद्ध व्हायचीही गरज पडली नसती. भिवा नेस्तनाबूत झाला असता. म्हणून खोत वकिलाचा सावत्र भाऊ दादा खोत याने रोख रूपये पाच हजार आणि रेवाळीच्या मळ्यातली ५खंडी उत्पन्न देणारी जमिन एवढे आमिष दाखवूनही हिंमतबाज भिवा पहिल्या खेपी कच खाऊन माघारी फिरला.
दादा खोत भिवाच्या इशारतीची वाट बघीत ओसरीवर येरझारा घालीत असताना पाळंदीतून अचानक वकिलाचा आवाज आला आणि भिव्याने झक मारली हे दादा खोत मनोमन उमजला. एवढी मोठी रक्कम आणि सोन्यासारखा जमिनीचा तुकडा इतके दांडगे आमिष दाखवूनही भिवाने फसविले यामुळे दादा खोताच्या अंगाची लाही लाही झाली. शेवटी हे कुळवाडी जातीवरच जायचे.हे कसले मराठे ! दादा खोताच्या मनात येऊन गेले. अखेर रात्री उशीरा भिवाची हाक आल्यावर दादा खोत घुश्श्यातच बाहेर गेला.
मागिलदाराच्या उंबरठ्याजवळ कापऱ्या आवाजात भिवा म्हणाला,“दादानू रागाक येव नको, पण देवकळेच्या भयानं माजा मन घेयना. परशाच्या अवसरान खरा काय तां सांगल्यान तर माजी पुरी वाट लागात. ह्या मनात इला म्हणान मी पारद करूच्या शिवायच इलय.” भिवाचा खुलासा ऐकल्यावर दादा खोतसुद्धा थोडासा वरमला. “मगे बोलॉया” एवढेच सांगून तो घरात आला. ह्या वकिलाचा काटा कसा काढायचा या विचाराने दादा खोत एवढा हैराण आणि उतावळा झालेला की, भिवाने जी अडचण पुढे केली त्यादृष्टीने विचार करणेच त्याला सुचले नव्हते. गोष्ट खरी होती.वकिलाचा खून पचविण्यासाठी सरकार दरबारी कायतरी बांधिलकी करता आली असती. . ..त्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतता आला असता. कारण वकिलाचा काटा काढायला की, खोतांची गडगंजा इस्टेट एकटया दादाच्या हाती येती! या इस्टेटीमुळेच आपल्या वकिली करणाऱ्या सावत्र भावाचा काटा काढायला दादा खोत तयार झालेला !
दादा आणि वकिल यांचा बाप भाऊ अण्णा! त्याने दोन बायका केल्या. दोघीही खोतांच्या वाड्यात सुखासमाधानाने नांदल्या थोरलीचा मुलगा अनंता विद्येत रमला नाही. चार यत्ता शिकून त्याने खोताना शोभेल असे उद्योग करायला सुरूवात केली. धनगराची भागी, सुताराची काशी, घाड्याची सखू या अंतूच्या भानगडी निस्तरून भाऊअण्णा जेरीला आला आणि दांडेलीच्या प्रभूखानोलकरांच्या मुलीशी त्याने अंतूचे लग्न लावले. लग्नानंतर अंतू थोडासा निवळला आणि खोतीच्या कामात लक्ष घालू लागला. गावची पोलीस पाटीलकी आणि देवस्थानचा मानकरी म्हणून अंतू बामण हा दादा खोत या उपाधीपर्यत पोचला.
धाकटा लक्ष्मीकांत मात्र विद्येत चांगला निपजला. उच्च शिक्षण पूर्ण करून भाऊअण्णांच्या इच्छेप्रमाणे वकिलीच्या पदापर्यत तो पोचला. मात्र लक्ष्मीकांत वकिल झालेला पहाण्याचे भाग्य भाऊअण्णाला लाभले नाही. त्याला जलोदराची व्याधी झाली आणि मुंबई -पुण्यातला उपचार देऊनही लक्ष्मीकांतला वकिलीची सनद मिळण्यापूर्वीच भाऊअण्णा आटोपला. त्याच्या माघारी घरच्या कारभाराची सूत्रे अनायसेच दादा खोताच्या हाती आली. लक्ष्मीकांत एवढे शिकून देवगड कोर्टात वकिली चालवायला भाटलेवाडीत येऊन राहील अ शी दादा खोताला अटकळ नव्हती. पण कसलाही छंदफंद न करता एकमार्गी लक्ष्मीकांत वकील होऊन घरी आला. देवगड ते भाटलेवाडी रोजा ये-जा करणे जमणारे नसल्यामुळे त्याने देवगडलाच ऑफिस थाटले. पण रविवार आणि सुटीच्या वेळी न चुकता घरी येणे, घरचे कुलाचार, गाववाडा यात लक्ष घालणे सहे मात्र मात्र दादा खोताल रुचले नाही. त्यातच त्याचे सासरे दाजी खानोलकर हे महा बेरकी. त्यांनी जावयाच्या मार्गात आलेले त्याच्या सावत्र भावाचे हे विघ्न दूर करण्यासाठी दादा खोताचे कान भरायला सुरू केले. वकिल हा सगळ्यांशी मिळून मिसळून गोडीगुलाबीने वागून भाटलेवाडीत मानमरातब मिळवायला लागला तेव्हा मात्र दादा खोताने त्याचा काटा काढायचा पक्का निर्धार केला.
जनलौकीकात दादा खोत आणि वकील यांच्यात उघड वैमनस्य दिसत नसले तरी घरच्या व्यवहारात वकिलाने लक्ष घालणे हेच दादाला मान्य नसल्याचे वकिलालाही जााणवत होते. देवीच्या वार्षिकाच्या वेळी खोताना देवळात मानाची जागा. देवीची पंचारत घ्यायचा मान त्यांचा , देवीची पालखी गाव फेरीला बाहेर पडल्यावर पहिल्याने खोतांच्या दारात यायची. खोतांची मानाची पूजाा झाल्यावर मग तरंग गावात वाडीवाडीवर जाायचे अशी प्रथा. शिमग्याला होळी तोडडून आणल्यावर खोताने तिची पूजा केल्यावर होळी उभी करीत. पहिला मानाचा नारळ खोत फोडायचा. मग खेळे देवीच्या ओवरीत पहिली टिपरी मारून खोतांच्या वाड्यावर जायचे. तिथे खेळल्यावर मगच त्यांनी घरोघरी टिपरी मारायची.हे आणि असे अनेक कुळाचार दादा खोत सांभाळी.
वकिल आला त्या वर्षी देवीच्या उत्सावात पंचारत धरायला वकील पुढे आला आणि पहिली ठिगणी पडली. घरातला वडिल माणूस म्हणून हा मान फक्त आपणालाच मिळेल हे सांगून दादाने वकिलाचा सर्वांसमक्ष पाणउतारा केला. त्यानंतर नारळीचे पाडप, भाताचा खंड अशा घटनांमधून तेढ निर्माण व्हायला लागली. वकिलाने घरच्या उत्पन्नाचा नीट जमाखर्च ठेवायचा सल्ला दिला तेव्हा तर दादा खोत त्याच्या अंगावरच धावून गेला. वकिलाला कालावलच्या सामंताची मुलगी सांगून आली तेव्हा त्या कार्यातही विघ्न घालण्याचा हर प्रयत्न दादा खोताने केला. पण वकिलाचे तालेवार पाहुणे सामंत खमके निघाले. त्यांनी दादाला नाव ठेवायला जागा मिळणार नाही असे थाटामाटात कार्य करून दिले.
वकील तुल्यबळ व्हायला लागला. तो वकिल असल्यामूळे जनलोकात त्याचा दबदबा वाढायला लागला. आता विलंब उपयोगी नाही अशी ठाम खूणगाठ मनाशी बांधून दादा कामगिरीला लागला. दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी गाजवून आलेल्या भिवा परबाशी दादाने संधान साधले. अन् वकिलाला उडवायचा बेत पक्का झाला. व्यवहार ठरला, देवीचा बेलभंडारा उचलून दादा-भिवाच्या आणाभाका झाल्या आणि दिवस ठरला. योजनेप्रमाणे गवळदेवाच्या देवळाजवळच्या आडवणात काजू लागवड करण्यासाठी पहाणी करायला म्हणून दादाने वकिलाला आडबाजूला काढले. त्याच्यासोबत गंग्या धनगर ठरल्याप्रमाणे संध्याकाळी उशीर करूनच आला. वकील आणि गंग्या बाहेर पडले. आडवणात फिरून गंग्या परस्पर धनगर वाड्यााकडे आणि वकील घरी यायचा असे ठरलेले. ही संधी साधून वकिलाला वाघबिळा जवळच्या व्हाळातच गाडून टाकायचा. व्हाळा जवळच्या करवंदीच्या झाळीत खणलेल्या खड्डयात त्याला गाडायचे आणि गाववाल्यांना संशय नको म्हणून आदल्या दिवशी मारलेले दोन ससे घेऊन भिवाने दादाच्या घरी येऊन इशारत दयायची हा बेत पक्का झाला. सगळे काही मनाजोगते जमून आले. पण आयत्या वेळी देवस्थानच्या भितीने कच खाऊन भिवा रिकामाच परत फिरला.दादा खोत चरफडला, तरीही भिवाने केलेली अटकळ बरोबर आहे हे त्यालाही पटले.
दादा खोत मग सल्ला मसलतीसाठी सासरवाडीला गेला. दाजी प्रभूखानोलकर हे कोर्ट कज्जे खेळलेले, त्यानी कैक उन्हाळे, पावसाळे बघितलेले.वकिलाचा काटा अलगद कसा काढायचा याचा अचूक बेत त्यांनी जावयाला सांगितला. सांगितल्या गोष्टीत कानामात्रेचा बदल झाला तरी मान अडकेल आणि मग आपणही त्यातून तुझी सुटका करू शकणार नाही असे दादा खोताला त्यांनी स्पष्ट बजावले.
सासरवाडीहून आल्यावर दादा कामाला लागला.भिडू पहिल्याने होते तेच. गंग्या धनगर आणि भिवा परब, अन त्यांच्या जोडीला देवीचा अवसर परशा घाडी हा नवा भिडू! कारण खरी मदार त्याच्यावरच.“हे अवसर-बिवसर सगळा स्वांग आसा. तुमी भिया नको, माणसार जर देवकळा इली असती तर तेंका देवळात बसयले असतात मा! देवकळा नाय नी शिवकळा नाय, पैशाची कळा सगळ्या परास मोठी. रूपये शंभर खळखळावून दाकवलास लास काय परसो घाडी तुमी सांगशात तसा वदतलो.” हे नवीनच ज्ञान दादा खोताला सासऱ्याच्या मुखातून प्राप्त झालेले म्हणून दादा खोताने नव्या बेतात देवीचा अवसर परशा ह्याला सुद्धा सहभागी करून घेतला. शंभर रूपये हा आकडा ऐकल्यावर परशा घाडी नेसूची लंगोटी फेडून नाचायलाही तयार होता.
वकिलाचा घातवार उजाडला! नवरात्रात करायच्या देवीच्या उत्सवाचा बेत ठरविण्यासाठी अनंत चतुर्थीनंतर चार दिवसांनी कोर्टाचे काम उरकल्यावर संध्याकाळी वकिलाने भाटलेवाडीत यायचे असे ठरले होते. तरीचा भाग एकवशी, निर्मनुष्य. सिढ्या काळी चुकार माकार एखादा उतारू असायचा. म्हणून वकिल यायचा असेल तेंव्हा दिगू तेल्याची बैलगाडी त्याला आणायला मोंडतरीवर जायची. देवगडातून कोणाची तरी गाडी करून वकील मोंडतरीवर येत असे आणि तरीपलिकडे आल्यावर दिगू तेल्याच्या गाडीतून भाटलेवाडीत येत असे हा नेहमीचा शिरस्ता !
वकिलाची पारध ठरली त्या दिवशी दुपारी भिवा परबाचा भाऊ दिगू तेल्याच्या घराकडे गेला. तेल्याचे बैल घरापासुन जरा दूर अंतरावर मांगरात बांधलेले असायचे. भिवाचा भाऊ मांगरात गेला आणि रवंथ करीत बसलेल्या बैलाच्या डोळ्यात दाभण मारले अन त्याच पावली माघारी फिरला. जेवणखाण होऊन थोडावेळ झोप घेतल्यावर दिगू तेली जामानिमा करून गाडी बाहेर काढायला मांगराकडे निघाला. तो मांगरात गेला मात्र. बैलाचा डोळा सुजून रक्त ठिबकताना बघून त्याच्या तोंडचे पाणी पळाले.बैलाने थयथयाट करून शेणामुताचा नुसता राडा केलेला. काय करावे हे दिगूला समजेना.बैल तर दिगूला हारीमोरी घेईना. नुसता पायरव झाला तरी तो चवताळून मारायला धावायचा. आता वकिलाला आणायला जायचे कसे? मोठा पेच त्यालाही पडला. बैलाच्या डोळ्यापेक्षाही खोतांच्या कामाची खोटी झाली तर त्याला फार महागात पडले असते. म्हणून तो तसाच धाव मारीत खोताच्या वाड्यावर गेला. अशान अशी गोष्ट झाली म्हणून त्याने दादा खोताचे पाय धरले.आता आयत्या वेळी वकिलाला आणायला गाडीची सोय काय करायची हा दादा खोताला पेच पडला.मग कोणतरी गडी वकिलाला आणायला तरीपर्यत पाठवायचा ठरवला. त्याप्रमाणे परशा घाडी वकिलाला आणायला मोंडतरीकडे निघाला. परशा तरीवर पोचल्यावर अगदी फुटक्या तिन्हीसांजेला शेवटच्या फेरीने वकिल आला त्यावेळी होडीत आणखी कोणीच उतारु नव्हता.
भिवा परब दिवस मावळायच्या बेताला बंदूक घेऊन टिपवण्याकडे जायला निघाला. टिपपवण्यावर ठरलेल्या देवरण्याच्या आड गंग्या धनगर भिवाची वाट बघितच बसलेला त्याला दिसला. मग दोघेही मोंडतरीकडून गावाकडे येणाऱ्या वाटेला लागले. भाटलेवाडीच्या वेशीवर गवळदेवाच्या कोंडाळ्याजवळ ते दबा धरून बसले. कारण वकिल परशा घाड्याबरोबर त्याच रस्त्याने यायचा असे ठरलेले. त्यांना फार वेळ वाट बघावी लागली नाही. साधारण काळोख पडायच्या बेताला लांबून येणारे परशा आणि वकील गंग्याने अचूक ओळखले. ठरल्याप्रमाणे भेकऱ्याच्या ओरडण्यासारखा ‘ख्यॅक ख्यॅक ’आवाज गंग्याने काढला.आवाज ऐकल्यावर परशाने इशारा ओळखला!
गवळदेवाचे कोंडाळे येण्यापूर्वी तो इराकतीसाठी म्हणून बाजूच्या झाळीआड गेला अन परश्या येईपर्यंत दम खाण्यासाठी म्हणून वकील गवळदेवाच्या कोंडाळ्याजवळ थांबला. काय होते कळण्यापूर्वीच वकिलाच्या तोंडावर घोंगड्याचा बोखारा टाकून हुमदांडग्या भिवाने त्याच्या गच्च आवळून धरले. मग परशा आणि गंग्याने वकिलाला जाम बांधले आणि त्याचे बोचके घेऊन तिघेही गवळदेवापासून लांब असलेल्या टेंबाकडे निघाले. वकील ओरडायला लागला तेव्हा भिवाने त्याला आडवा पाडला. तशी गंग्या त्याच्या पोटाकर बसला नी भिवाने अंदाजानेच हातातल्या रशीचा फास वकिलाच्या नरड्याभोवती गच्च आवळला. त्याबरोबर वकील आचके द्यायला लागला.थोडा जोर काढल्यावर रक्ताचा थेंबही न सांडता वकील थंड झाला. पुढचे काम मग एकदम सोपे होते. टेंबावर आडबाजूला असलेल्या उक्षीच्या झाली मागे खणून ठेवलेल्या खड्ड्याजवळ पोचल्यावर परशा खोताच्या घरी जायला निघाला. गंग्या, भिवा ह्यानी वकिलाला गाडून त्याच्यावर दगड-माती टाकून पुरी होईपर्यत रात्र होऊन गेली.
साधारण जेवणवेळेला परशा घाडी दादा खोताच्या घरी पोचला. काळोख पडेपर्यंत वाट बघूनही वकिल आला नाही. होडीची शेवटची फेरी झाल्यावर मी माघारी फिरलो एवढे सांगून उजेडासाठी चुडती पेटवून परशा घरी गेला. काहीतरी कोर्टाचे काम निघाल्यामुळे वकील आला नाही.असा विचार करून दादा खोताच्या घरची जेवणे उरकली.बेत ठरल्याप्रमाणे पार पाडला असणार म्हणून दादा खोत निश्चिंत झाला असला तरी भिवा किंवा गंग्या भेटेपर्यंत त्याच्या जीवाला शांतता लाभणे शक्य नव्हते.

उजाडल्यावर गंग्या धनगर घोंगड्यातून भेंडे बांधून दादा खोतांच्या घरी आला. भेंडे दिलावर रात्री भिवा परबाला टिपवण्यावर ‘समंधाने’ धरले.त्याची बंदूक मोडली.भिवाला चांगले घोसळले. कसाबसा जीव वाचवून भिवा मध्यानरात्री घरी आला अशी बातमी त्याने दादा खोताला दिली. हे ऐकल्यावर काम फत्ते झाले हे ओळखून दादा खोत हरखून गेला. भिवाला समंधाने धरले याची मोठी चर्चा गावात सुरू झाली. भिवा अधून मधून आरडे-ओरडे,दात खाई. मग परशा घाड्याने त्याच्यावरून कोंबडे उतरून काढले., देवीला गाऱ्हाणे केले.
वकील ठरल्या दिवशी आला नाही यापेक्षा अधिक फिकीर खोतांनी केली नाही. नाही म्हणायला वकिलाची आई दोनतीन वेळा दादाला म्हणाली,“दादा वकील कित्या ईले नाय तेची चवकशी करूक देवगडाक गडी धाडूक व्हयो.” पण दादाने उडवाउडवीच केली. मात्र चौथ्या दिवशी वकिलाच्या बायकोने वकिलाची तब्बेत वगैरे बिघडली की काय? याची चौकशी करायला भाटलेवाडीत गडी पाठवला. गडी आल्यावर भाटले वाडीत येण्यासाठी बाहेर पडलेला वकिल चार दिवस कुठे दडी मारून बसला आहे? काहीच तर्क कोणाला करता येईना. आता मात्र धोतर कोट घालून दादा खोत जाातिनिशी देवगडात गेला. त्याने भावजयीची भेट घेतली. वकील देवगडातून कधी निघाला वगैरे चौकशी केली. वकील देवगडातून निघाला तो तरी पलिकडे झाला.त्याने तेल्याची गाडी येईल म्हणून थोडावेळ वाट बघितली. काळवं पडायला लागल्यावर मात्र उशीर व्हायला नको.म्हणून तो गाडीवाटेने चालत निघाला. इथपर्यंत माहिती त्याने भावजयीला दिली. मात्र तो पुढे कुठे गेला याबददल कोणालाच काही सांगता येईना असे भावजयीला सांगून वकिलाचा शोध लागेपर्यत तू घरी चल असे सांगून तिला घेऊन दादा खोत भाटलेवाडीत आला.
वकिलाचा शोध घ्यायला चारी दिशाना माणसे रवाना झाली. कालावलला सामंतांकडे, त्याच्या सासुरवाडीला निरोप गेला. सगळ्या पाहुण्या सोयऱ्यांकडे गडी जाऊन आले पण कुठेच काही पत्ता लागेना. वकिलाच्या सासऱ्यानी आपला शहाणपणा चालवून पोलिस स्टेशनला खबर द्यायचे सुचविले. मग पोलिस तपास वगैरे सोपस्कार पार पडले. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या अवसराने दिवाळीपर्यत वकील घरी येईल असे सांगितले. वकील कुठे आहे, काय करतो आहे हे देवी सांगणार नाही. मात्र तो नक्की परत येईल आणि तो परत आल्यावर सगळा उलगडा होईल, असा खुलासा देवीच्या अवसराने केला.
वकिलाचे बेपत्ता होणे ही घटना हळूहळू थंड पडत चालली. परशा भगताची बिदागी, गंग्या धनगर आणि भिवा परब यांची बिदागी बिनबोभाट मिळाली. पुढच्या मिरगापासून रेवाळीच्या मळ्यातली जमीन भिवाने खंडाने म्हणून कसायला घेतली. वकिलाची बायको वर्षभर खोतांच्या वाड्यावर राहिली. पण हाल जाच करायला सुरूवात झाल्यावर ती आपल्या माहेरी गेली. देवकळेपेक्षा पैशाची भीवकळा मोठी असते हे दादा खोताला उमगले. अन् वकिलाचे नाहिसे होणे ही पंचक्रोशीत एक आख्यायिका बनून राहिली.

*******