लग्नाची गोष्ट - भाग 1 Pralhad K Dudhal द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नाची गोष्ट - भाग 1

लग्नाची गोष्ट

भाग १.

मी बी एस्सी च्या दुसऱ्या वर्षाला शिकत असतानाच काही कौटुंबिक कारणामुळे माझ्यावर नोकरी शोधायची वेळ आली.

खरं तर अशा अर्धवट शिक्षणावर नोकरी मिळणे दुरापास्त होते,पण त्याला पर्याय नव्हता.माझे मॅट्रिक आणि बारावीचे मार्क्स बरे असल्यामुळे त्या मार्कांचा विचार होईल अशीच एखादी नोकरी मी शोधू लागलो..

माझ्या नशिबाने काही दिवसांतच माझ्या वाचनात टेलिफोन खात्याची जाहिरात आली.मी तेथे अर्ज केला आणि निवडीसाठीची परीक्षा दिली.

सर्व सोपस्कार होऊन मला टेलिफोन खात्यात नोकरी मिळाली.

प्रशिक्षण पूर्ण करून मी नोकरीत रुजू झालो.ही नोकरी करता करता माझे बी. एस्सी. पर्यंत शिक्षणही मी पूर्ण केले.

अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मी येथपर्यंत पोहोचलो होतो.आता माझ्यावर असलेल्या कुटूंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. महत्वाचे म्हणजे सावकाराकडे गहाण पडलेली गावाकडची जमिन सोडवायची होती,गावाकडे दोन खणाचे का होईना साधेसे घर बांधायचे होते, पडत्या काळात अनेकांनी काही ना काही मदत केली होती,त्यांचे जमेल तेव्हढे उतराई व्हायचे होते,त्यामुळे लगेच लग्न वगैरे विषय माझ्या मनात मुळीच नव्हता.

नोकरी मिळून एव्हाना तीन वर्षे झाली होती.तसे तर त्यावेळी माझे केवळ चोवीस वर्षांचे वय होते,पण माझ्या ध्यानीमनी नसले तरी अनेक नातेवाईकांच्या दृष्टीने मात्र माझे स्टेटस आता ‘ एक बरे स्थळ' असे झाले होते! नातेवाईकांकडून आपापल्या माहीतीमधल्या सुयोग्य वधूचे माझ्या परस्परच संशोधन सुरू झाले होते. अर्थात हे काही माझी पर्सानिलिटी किंवा माझ्या घरची परिस्थिती बघून घडत नव्हते, तर मला मिळालेल्या सुरक्षित पेन्शनवाल्या सरकारी नोकरीची ही जादू होती!

सांगायची मजा म्हणजे माझे शिक्षण चालू असताना किंवा मला नोकरी नसताना कित्येकजण, हा चुकून आपल्याकडे पैशाची मदत तर मागणार नाही ना, असा विचार करत, कायम मला झुरळासारखे लांब झटकणारे,जवळचे लांबचे नातेवाईकसुध्दा आजकाल मुद्दाम जवळ येवून माझी चौकशी करत होते.आडून आडून पगाराचा आकडाही विचारत होते!

माझ्या भावाच्या ओळखीचे एक गृहस्थ नेहमी आमच्या घरी यायचे.ते आमच्या घरापासून थोड्या अंतरावर टिंगरे नगरला रहायचे.पूर्वी माझ्याशी फटकून वागणारे ते काका नंतर माझ्याशी हटकून स्वतः पुढे होऊन सलगी करून बोलू लागले.त्यांच्या घरी येण्याबद्दल पुन्हा पुन्हा आग्रह करायला लागले.मी मात्र माझ्या शिफ्ट ड्युटीमुळे त्यांना टाळत होतो.

एक दिवस मात्र ते खूपच मागे लागले त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन यायचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी ते माझी सकाळची ड्युटी संपल्यावर मी घरी येईपर्यंत मला घ्यायला थांबले होते.त्यांच्या त्या आग्रहाला मान देऊन नाईलाजाने मी माझी सायकल घेऊन त्यांच्या मागे मागे त्यांच्या घरी गेलो.

त्यांचे घर चांगले ऐसपैस होते.

मी घरात गेल्याबरोबर काकूंनी लगेच माझ्या हातात पाण्याचा ग्लास आणून दिला.आजपर्यंत असे आदरातिथ्य कधीच अनुभवले नसल्याने मी चांगलाच भांबावून गेलो होतो.ते काका मात्र मधून मधून माझी चौकशी करत मला बोलते करायचा प्रयत्न करत होते.

थोड्या वेळात आतल्या खोलीतून एक मुलगी ट्रे मधून पोह्याच्या डिश घेऊन आली आणि ट्रे माझ्यासमोर धरला.मी एक डिश उचलून घेतली.एक डिश त्या काकांनीही घेतली.आम्ही दोघे पोहे खाऊ लागलो.तिथे बाजूलाच ती मुलगी आणि काकू बसल्या.पोहे खाऊन झाल्यावर ती मुलगी चहा घेऊन आली.चहा झाल्यावर ती तिथेच माझ्या समोर खुर्चीवर बसली.

“तर बरं का ही माझी भाची,बघून घ्या,शिक्षिका म्हणून काम करते”

‘हे सगळं हे मला का सांगताहेत?’

मी बावळटासारखा चेहरा करून विचार करत असतानाच काका पुढे बोलले...

“आवडली का सांगा...लगेच बार उडवून टाकू लग्नाचा!”

आता कुठे माझी ट्यूब पेटली..,अरे यासाठी हे काका माझ्या मागे लागले होते तर!

मी प्रथमच त्या मुलीचा चेहरा नीट पाहिला...

मला त्या काकांचा हा आगाऊपणा मुळीच आवडला नव्हता.

मी कशीबशी तिथून सुटका करून घेतली आणि सायकल घराकडे दामटली!

~ प्रल्हाद दुधाळ. (9423012020)