प्राक्तन - भाग 2 अबोली डोंगरे. द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्राक्तन - भाग 2

प्राक्तन-२


दोन तीन दिवस उलटून गेलेले... ती शांतच होती, मनानेही शांत. यशचं म्हणणं सिरियसली घेतलेलं तिने. आता मनात काहीच ठेवावंसं वाटत नव्हतं. कारण मन रितं करायचं ठरवलेलं तिने. ना कसली काळजी, ना नवर्याच्या प्रकरणांची इनसिक्यूरिटी,ना जास्त विचार, ना कसली चिडचिड... तिच्या वागण्यातला अचानक झालेला बदल मयुरेशच्या म्हणजेच तिच्या नवर्याच्या लक्षात आलेला.. पण त्याला आता तिला विचारण्याचं किंवा सामोरं जाण्याचं धाडस राहिलं नव्हतं. तो फक्त पाहत होता त्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता.

आज रविवार ऑफिसला सुट्टी असल्याने दोघेही घरातच होते. पण ती मात्र लवकरच उठलेली, आज ती ट्रेकिंगला जाणार होती एकटीच... तिची आवराआवर चालु होती. ते बघून त्याने न राहवून विचारलं,

" आज रविवारी एवढं आवरून कुठे जातेय तू?"

" बाहेर.." तिचं मोजकं उत्तर.

" बाहेर कुठे ते तरी सांग, म्हणजे आय मीन तू तुला बरं वाटत नव्हतं ना मग जाऊ नको, आराम कर असं वाटतं मला___" तो चाचरत म्हणाला. तिने शांतपणे त्याच्याकडे एकवार बघितलं आणि दुर्लक्ष केलं.

" अनिशा मी तुला विचारतोय, तेही काळजीपोटी... " तो तिचा हात धरत त्याच्याकडे वळवत म्हणाला.

" मी माझी काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. मागच्या अडीच वर्षांत हे सगळं शिकलेय मी. आणि हो थॅन्क्यु मला आयुष्यातला अनमोल धडा तुझ्यामुळे शिकायला मिळाला. येते मी" ती अगदी सहज हसत म्हणाली. आणि गेलीही...

तो मात्र आता ती गेली त्या दिशेने अवाक् होऊन बघत तसाच उभा होता. तो तिला वेळ देत नाही यासाठी ती बरेचदा त्याला बोलायची, भांडायची, चिडायची आणि उपहासाने टोमणेही मारायची. पण आज मात्र तिच्या आताच्या बोलण्यात उपहास नव्हता, राग किंवा रूसवाही नव्हता. मग काय होतं, आनंद समाधान.. पण कशाचं.. तिला सत्य कळल्यावर तर ती चिडलेली ना मग अचानक असं काय घडलं की ती हे सारं क्षणात विसरून गेली... तो विचार करत दारात तसाच उभा होता. तेवढ्यात अमेयने त्याला भानावर आणलं.

" बाबा उद्या स्कूलमध्ये पॅरेन्ट्स प्रोग्राम आहे. तर त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. आणि हे मेंन्डेटरी आहे." त्याचा १४ वर्षाचा मुलगा त्याला म्हणाला.

" आई येईल तुझी. कारण हे सगळं दरवर्षी तिच अटेंन्ड करते ना... " तो म्हणाला.

" हो पण मला वाटतं यावर्षी तुम्ही यावं. कारण तुम्ही कधीच माझ्या कोणत्याच स्कूल प्रोग्राम किंवा पॅरेन्ट्स मीटिंगमध्ये फारसा इंटरेस्ट दाखवत नाही. " नुकतंच मिसरूड फुटू लागलेलं त्याचं पौगंडावस्थेतील पोर सहज त्याला आरसा दाखवत म्हणालं. ते ऐकून त्याला ओशाळल्यासारखं वाटलं.

" ठीके मी येईन. मला टाईमिंग सांग आणि इतर डिटेल्स सांग. " मयुरेश म्हणाला.

" स्कूलमधून मेल्स आलेत ते चेक करा. त्यात सगळी माहिती आहे. आता मी निघतो मला उशीर होतोय. " एवढं बोलत अमेय तिथून निघाला.

तो गेल्यानंतर मयुरेशने मोबाईल चेक केला. खरंच त्याच्या स्कूलमधून आतापर्यंत दोन तीन मेल आलेले. पण हे सगळं अनिशा बघते असं गृहित धरून त्याने याकडे दुर्लक्ष केलेलं. आणि अमेयच्या रूममध्ये जाऊन विचार करत होता. किती मोठा झालाय अमेय आता... मुलं मोठी झाली की बापाला टक्कर देतात. पण आईचे लाडोबाच राहतात. अमेय पण तसाच होता. अनिशा आणि मयुरेश यांच्या प्रीतीच्या हिंदोळ्यावर झुलणारा हा त्यांचा अंश.. अगदी नावही दोघांच्या नावावरूनच ठेवलेलं त्याचं.. अनिशा आणि त्याच्या भांडणात तो लहानपणापासून नेहमी तिचीच बाजू घ्यायचा. मग शेवटी मयुरेशला शरण जाण्याशिवाय गत्यंतर नसायचं. हे सगळं आठवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

दुसरीकडे अनिशा जवळपास तीन तास ट्रेक करून नुकतीच एका ठिकाणी बसलेली. इतका वेळ चढाई करून दमलेली ती. म्हणून बॅगेतून थोडंसं काहीतरी खाऊन पून्हा निवांत बसली. समोरचं हिरवंगार निसर्ग सौंदर्य ती डोळ्यात टिपत होती. खूप बरं वाटत होतं. मनावरचा सगळा भार अलगद उतरल्यासारखा वाटत होता. पण तेवढ्यात तिला अचानक त्यादिवशी रात्री भेटलेल्या व्यक्तीची आठवण आली. हे सगळं फक्त त्याच्यामुळे शक्य झालेलं. त्याला पून्हा एकदा भेटुन त्याचे मनापासून आभार मानायची इच्छा तिच्या मनात कुठूनतरी प्रकट झाली. पण त्याला आता परत भेटायचं कसं हे कळत नव्हतं. पण तेवढ्यात आठवलं तो दररोज पहाटे तिथे त्याठिकाणी फिरायला येतो हे त्याने बोललेलं तिच्या लक्षात आलं. आणि त्याचं नाव त्याने यश सांगितलेलं तेही आठवलं. उद्या पहाटे त्याला त्या पुलाजवळ भेटून त्याचे आभार मानायचेच हा तिने निश्चय केला. आणि रात्री घरी परतली. रात्रीचं जेवण झाल्यावर लवकरच झोपली. पण का कुणास ठाऊक झोपच येईना. पहाटे त्यावेळी जाग येईल की नाही या विचाराने ती अधूनमधून सारखं टाईमिंग बघत होती. अखेर अडीच नंतर पावणे तीनचा ठोका पडला आणि ती उठली. ते थेट चालत पुलाकडे जायला निघाली. काय काय नि कसं बोलायचं याची उजळणी मनात चालता चालता सुरू होती.

विचाराच्या ओघात ती कधी तिथपर्यंत येऊन पोहोचली तिचं तिलाही कळलं नाही. पण लगबगीने तिने हातातल्या घड्याळात बघितलं तर तीनला पाच कमी होते. तसं तिने सुस्कारा सोडला आणि तिथेच त्या कट्ट्यावर बसली, त्याची वाट बघत... तीन, साडे तीन वाजून गेलेले, आता पहाटेचे पावणे चारही वाजत आले. पण तो काही अजून आला नव्हता. तिचा जीव आता कावराबावरा झालेला... का कुणास ठाऊक पण अनामिक भेटीची आस लागून राहिलेली... त्यादिवशीचा घटनाक्रम तिच्या डोळ्यासमोरून तरळून जात होता. तोच तिचं लक्ष त्या पुलाच्या टोकाकडे गेलं. तिथेच तर उभारून जीव द्यायला गेलेली ती.. नकळत तिची पावलं त्या दिशेने वळली. खाली रेल्वेचं रूळ आणि त्याला लागूनच शहरातील मोठा तलाव होता. दिवसा तिथून जाताना अनेकांच्या हद्याचा थरकाफ उडायचा. त्यात त्या गडद रात्रीत ते कितीतरी भयंकर वाटत होतं. तिने सहज तिथून खाली डोकावून पाहिलं. आणि मागून कुणीतरी जोरात ओढलं. वरखाली होणार्या श्वासांचा आणि त्या धडधडत्या हद्यातील ठोक्यांचा आवाज तिच्या कानापर्यंत येत होता. तिने मान उचलून समोरच्या व्यक्तीकडे बघितलं. आणि चटकन तिच्या डोळ्यांतून पाणी टपकलं. ते अश्रू आनंदाचे होते की दु:खाचे हे कळत नव्हतं. पण तिचे डोळे बरेच तेजस्वी वाटत होते त्या रात्रीच्या अंधारात... होय तो तोच होता. ज्याची ती वाट बघत होती, ज्याच्यासाठी ती आज तिथे आलेली, ज्याच्यामुळे ती आज जीवंत होती... तोच यश होता तो...

पण त्याचा चेहरा मात्र नाखुशीने संभ्रमित झालेला होता. दूरून तिकडे येत असताना कुणीतरी खाली झुकतंय म्हणजे आत्महत्या करत असेल असा त्याचा समज झालेला. त्यामुळे तो धावतपळत त्या व्यक्तीला वाचवायला आलेला. पण समोर पून्हा तीच आठवडाभरापूर्वीची व्यक्ती बघून त्याला धक्का बसला...

" पून्हा आत्महत्या करायचा प्रयत्न केला? का?" त्याने नाराजीने विचारलं. तिला त्याचा झालेला गैरसमज लक्षात आला.

" नाही नाही. आज मी आत्महत्या करण्याच्या हेतूने इथे आलेली नाही. मी तर आभार मानायला आलेय तुमचे... " ती म्हणाली.

" आभार... ? मग खाली का वाकला होतात ? किती डेंजर आहे हे सगळं, जरासाही तोल गेला असता तर काय झालं असतं याची कल्पना आहे का?" तो घाम पुसत म्हणाला. तिच्या डोळ्यात करूणा दाटून आली त्याच्या बोलण्याने...

" ते मी खूप वेळ झालं इथे येऊन, तुमची वाट बघत होते तेवढ्यात त्यादिवशीचा प्रसंग आठवला. म्हणून सहज पहायला गेले मृत्यूचं दार कसं असतं याचा अनुभव घेतला. " ती शांतपणे म्हणाली. तसा तो वरमला.

" ओके सॉरी, मी जरा जास्तच रिअॅक्ट झालो... " तो बोलला.

" मिस्टर यश, मागच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी मी इथे आत्महत्या करायला इथे आलेले... पण तुम्ही मला वाचवलंत. फक्त वाचवलं नाही तर खरं आयुष्य जगण्याचं सुत्र सांगितलंत. आणि माझे डोळे उघडले. इतरांच्या अन्यायाविरुद्ध बोलणारी मी आजपर्यंत मात्र माझ्यावरच अन्याय करत आले. आणि त्याच विवंचनेतून स्वताला संपवायला निघालेले. पण मागच्या चार दिवसांत मी माझ्याच आयुष्यात कमबॅक केलं. आणि आता मी ज्या गोष्टीतून मला आनंद मिळेल तेच करायचं ठरवलंय... हे शक्य झालं ते फक्त तुमच्या मुळे. म्हणूनच मी तुमची आभारी आहे. खूप मोठा गुन्हा करण्यापासून वाचवलंत मला. आणि नवी दिशा दाखवली त्यासाठीही खरंच खूप धन्यवाद... " ती हात जोडून नम्रपणे कबुली देत म्हणाली. त्याला मनोमन समाधान वाटलं.

" हे बघा आभार वगैरे मानू नका. माझ्या जागी दुसरं कुणी असतं तरी त्यानेही हेच केलं असतं. तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मी फक्त निमित्त ठरलो यासाठी, नियतीच्याही मनात हेच असावं कदाचित म्हणूनच...... " तो तिला समजावत म्हणाला. त्याच्या मनाच्या मोठेपणाचा वेध घेता आला तिला यावरून...

" आणि हो मी काही ज्येष्ठ नागरिक किंवा कुणी मोठा नाहीये. त्यामुळे हे तुम्ही तुम्ही बोलू नका. माझं नाव यश आहे. हे मागेही सांगितलेलं तुम्हाला. म्हणून सरळ यशच म्हणा. " तो परत म्हणाला.

" मग हे तुम्हालाही सेम लागू पडतं. मीही कुणी वयोवृद्धा नाहीये. माझं नाव अनिशा आणि अनिशाच म्हणलं तरी चालेल. " ती अगदी सहज म्हणाली. यावरून ती स्पष्टवक्ती आहे हे त्याच्या निदर्शनास आलं.

क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.