मैत्री Sudhanshu Baraskar द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मैत्री

"मैत्री" हा शब्द दिसायला फार छोटा आहे पण या शब्दामध्ये ईतकी मोठी ताकद आहे की, त्याला शब्दाची गरज नाही...गरज आहे ती भावनेची....

मैत्री ही एक अतिशय सुंदर भावना आहे. खरंतर आजकालच्या जगात खरे मित्र/मैत्रिणी मिळणं खूपच कठीण आहे पण ज्या व्यक्तीला खूपच चांगले मित्र-मैत्रिणी आहेत माझ्या दृष्टीने ती व्यक्ती जगातील सर्वात भाग्यवान आहे. एकमेकांसाठी वाटेल ती संकटं झेलण्यासाठी तयार असलेले लोक सोबत असणं म्हणजे जीवनाला एक प्रकारचा आधारच.

सध्याचे युग हे "सोशल मीडियाचे" युग आहे. सोशल मीडियाचा कधी कधी आपल्या मैत्रीवर चांगला तर कधी खूपच वाईट प्रभाव पडतो. चांगला प्रभाव या अर्थाने की, त्यामुळे आपल्यापासून दूर ठिकाणी राहणाऱ्या लोकांसोबत नेहमीच संपर्कात राहता येत आणि वाईट प्रभाव या अर्थाने की आपल्या जवळ असलेले लोक त्या सोशल मीडियामुळे दुरावले जात आहेत. आपल्यापासून दूर असलेल्या दोस्तांच्या संपर्कात राहण्याच्या इच्छेमुळे जवळ आणि सोबत असलेले दूर होतील तर मग अश्या मैत्रीचा काय उपयोग!! जो व्यक्ती या दोन्ही गोष्टी अगदी सम प्रमाणात हाताळतो तो किंवा ती व्यक्ती आपल्या सर्व मित्र मैत्रिणींच्या सोबत कायम राहतो किंबहुना त्या व्यक्तीसोबत सर्व साथी अगदी प्रेमळ भावनेने राहतील.

मैत्री म्हणजे भांडणं ही होणारच ...आणि ज्यांच्यामध्ये भांडण होत नाहीत; माझ्या मते त्यांची मैत्री फार काळ टिकणारी नसते. मैत्रीमध्ये भांडणं झाली तरच आपली मैत्री टिकू शकते असे माझे स्पष्ट मत आहे. एक छोटंसं उदाहरण.....आपली पण आपल्या मित्रासोबत/मैत्रिणीसोबत छोटी मोठी भांडण होतात. रागाच्या भरात आपण बराच काही बोलून जातो नंतर आपल्याला कळत की तो/ती नाराज आहे तेंव्हा आपल्यालाच जास्त वाईट वाटतं की आपण हे काय करून बसलो आणि का!!!! पण खरं सांगायचं तर त्यावेळी मित्राची/मैत्रिणीची समजूत काढण्यात जी मजा आहे ना, ती दुसरीकडे कुठेच नाही त्यामुळे मैत्री घट्ट होण्यास खूप मदत होते मैत्री ही "तुझ माझं जमेना तुझ्यावाचून करमेना!!!" या म्हणीप्रमाणे असते.....नाही; ती आहेच.......

लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत कुणाशीही घट्ट मैत्री होऊ शकते. मैत्रीला काळाची, वेळेची आणि वयाची बंधने आजिबात नसतात. मैत्री जितकी दणकट असते तितकीच नाजूक ही असते मैत्रीतून केवळ आनंद आणि समाधान मिळत नाही तर यापासून बरच काही शिकायला मिळत. दृष्टी विस्तारित होते विचारांच्या कक्षा रुद्रावतात.

खरंच या जगात कधी कुणाशी मैत्री होईल काहीच सांगता येत नाही. बरेच जण पुस्तकांशी, प्रण्यांशी मैत्री करत आपल्या मैत्रीमध्ये आपण कुणाला आनंद देऊ शकलो नाही तरी दुःख ही देऊ नये. एक सुंदर पंक्ती माझ्या नजरेखालून गेली.....

 

"जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,

दुःख दाखवायला आश्रृंची गरज नसते, न बोलताच ज्यामधे सारे समजते,

ती म्हणजे मैत्री असते."

 

मैत्रीला कोणत्याही "डे" ची गरज नसते आपल्या मित्र मैत्रिणी मध्ये रोजचा दिवस हसत खेळत घालवत असू तर रोजच "फ्रेंडशिप डे" असतो. मैत्रीची व्याख्या समजून घेणं जितकं अवघड आहे तितकंच मैत्री निभवण कठीण आहे, ज्याला खरंच मैत्री कळली तो खरंच भाग्यवान असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही. मैत्री ही जीवनाची रंगात वाढवते सध्याच्या घडीला आपण आपल्या मित्रांसोबत जी मस्ती करतो, तीच मस्ती आयुष्यभर लक्षात राहते. मैत्री ही एक भावना आहे, लक्षात ठेवली तर आपली आहे आणि विसरलात तर फक्त आणि फक्त स्वप्नच आहे.......

                                                                                                                                     

                                                                                                                                                                     - सुधांशू संजय बारस्कर