अळवावरचं पाणी श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अळवावरचं पाणी

अळवावरचं पाणी

अन् धुंदीच्या त्याक्षणी सुधानं प्रमोदला लग्नाचं वचन दिलं. बेल्ट पॉकेटमधून पॉलिथीन सॅक काढून प्रमोद म्हणाला, "या प्रसंगाची आठवण म्हणून ही छोटीशी गिफ्ट..." अधीर झालेल्या सुधानं सॅक उघडली. सोन्याच्या चमकीशिवाय अन्य दागिना आयुष्यात न घातलेली सुधा... टॉप्समधले लखलखणारे हिरे ती विस्फारीत नेत्रांनी पहातच राहिली. अनवधनाने ती बोलून गेली, "खूप कॉस्टली आहेत हे टॉप्स. केवढ्याला मिळाले?" प्रमोद बेफिकिरीने म्हणाला, "ओन्ली सेव्हन धाऊजंडस... तू नक्की होय म्हणशील याची खात्री होती मला..."
सात हजार हा आकडा ऐकूनच सुधा हवेत तरंगायला लागली. मूडमध्येच ती होस्टेलवर आली. रूम पार्टनर्स मेसवर गेल्या. सुधा त्या आरशासमोर उभी राहिली अन् टॉप्स कानात घालून स्वतःच्या छबीकडे मनसोक्त पाहून घेतलं. रात्री तिच्या स्वप्नात सळसळणारी रेशमी वस्त्र, चकचकीत गाड्या, आलिशान बंगले, दागिन्यांनी खचाखच भरलेलं कपाट हेच दिसत राहिलं. परीक्षा पार पडली आणि प्रमोदनं फोन केला म्हणून न्यायला त्याच मम्मी डॅडी आले. प्रमोदनं सुधाची त्यांच्याशी ओळख करून दिली. गर्भश्रीमंतीची तुकतुकी असलेले पॉलिश्ड बोलणारे त्याचे आई बाबा सुधाला खूप आवडले.
"प्रमोद तुझी चॉईस सुपरस्टिशस आहे." डॅडींनी निःसंकोचपणे प्रतिक्रिया नोंदवली. सोज्वळ, सात्विक सुधा मम्मीलासुद्धा खुप आवडली. सुधाला जवळ घेऊन मम्मीनं तिच्या केसांवरून हात फिरवला 'हॉलीडे होम' वा महागड्या हॉटेलमध्ये सगळ्यानी लंच घेतला. मम्मी-डॅडी टॅक्सी करून कोणा ओळखीच्या गृहस्थांकडे गेले. प्रमोद नि सुधा त्यांच्या कॉन्टेसामधून फिरायला गेले. चार वाजता प्रमोदनं तिला कॉलेजसमोर ड्रॉप केलं. सुधा उतरली तर समोर प्रिन्सिपॉल डॉ. दाणी येत आहेत. सुधाकडे पाहून मंदस्मित करीत ते निघून गेले.
प्रमोद सुधापेक्षा एक वर्ष सिनियर. सुधा मेडिकल कॉलेजमध्ये जॉईन झाली. त्या दिवशी नवीन बॅचसाठी स्वागत समारंभ झाला. आर.एम.ओ.नी सगळ्यांचं स्वागत केलं. मग प्रत्येकानं आपला परिचय करून दिला. सुधाचा टर्न आला. ‘सुधा दामोदर गोखले.... एस. एच. केळकर कॉलेज देवगड, पी.सी.बी.नाइन्टी टू परसेंट.’ एन्टरन्स एक्झाम ९५ परसेंट. तिचा अँपिअरन्स बघून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली असावी. हायेस्ट स्कोअरमुळेच फ्रीशीप मिळवून मेडिकलला आलेली असणार हे सगळ्यांनी ओळखलेलं... तरीही तिचे मार्कस् ऐकून सगळे चकित झाले. पिवळसर गौरवर्ण, तेजस्वी डोळे, धारदार नाक, लांबसडक केस, अत्यंत साधी वेशभूषा असलेली ‘काकूबाई’ छाप सुधा प्रमोदला त्याचक्षणी आवडली. काहीही करून ही पोरगी कटवीन असा पणच त्याने केलेला. फायनल इयर सुरू होऊन दोन महिने उलटले तरी कामचलाऊ चार दोन वाक्यांची देवाण-घेवाण यापुढे काही त्याची मजल जाऊ शकली नव्हती.
अर्थात सगळ्यांशी विशिष्ट अंतर राखून फटकून वागणारी सुधा प्रमोदशी ऑकेजनल कां होईना दोन चार वाक्य बोलायची ही सुद्धा मोठी जमेची बाजूच प्रमोदला वाटायची. तिच्या वागण्या बोलण्याचं सूक्ष्म निरीक्षण करून प्रमोदनं आपली वागण्याची स्ट्रॅटेजी फिक्स केलेली. श्रीमंतीचं प्रदर्शन, बेताल वागणं, बेमुर्वतखोर बोलणं आणि डीम परफॉर्मन्स या गोष्टी सुधाच्या प्राप्तीमध्ये हर्डल्स ठरतील हे त्याने ओळखलं. मग जाणीवपूर्वक आपलं वागणं कंट्रोल करून मित्रांच्या घोळक्यापासून तो दूर रहायला लागला. नियमित अभ्यास करून चांगला स्कोअर करायचा हे त्याने अॅसेट ठेवलं. तिचा जास्तीत जास्त सहवास लायब्ररीत मिळणार हे ओळखून तो सुद्धा लेक्चर्स, प्रॅक्टीकल्स झाल्यावर कायम लायब्ररीत रहायचा. त्याच्या या वागण्यामुळे इतरांपेक्षा प्रमोदबद्दल सुधाच्या मनातही सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत गेला. पण त्याच्या लक्षात येईल असं आपल्या भावनांचं प्रदर्शन करणं मात्र तिने कटाक्षाने टाळलेलं.
एकतर ज्या ओढ-घस्तीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात ती वाढली त्या तुलनेत प्रमोद हा तिला दुष्प्राप्यच वाटायचा. दादरसारख्या हार्ट ऑफ बॉम्बे एरियात त्याच्या डॅडींचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. प्रमोद त्यांचा एकुलता एक मुलगा, ही माहिती तिला मैत्रिणींकडून समजली. या उलट तिचे बाबा मुटाटसारख्या आड खेड्यात राहणारे प्राथमिक शिक्षक. मातीच्या भिंती असलेलं छोटेखानी घर. शेती कुळकायद्यात गेल्यामुळे नोकरी हेच चरितार्थाचं एकमेव साधन, सुधासह चार मुलं! संस्कार, बुद्धी, चारित्र्य, सौंदर्य हे मुलीचे विशेष सगळ्यांना अपेक्षित असतात हे सत्य, पण लग्नाच्या बाजारात केवळ एवढ्या गोष्टी एनकॅश करता येत नाहीत, हे सुधानं पक्क ओळखलेलं म्हणूनचं प्रमोदशी रिलेशन्स डेव्हलप न करण्याकडे तिचा कटाक्ष असायचा. हुषारी आणि कष्ट या बळावर एम.बी.बी.एस. पूर्ण करायचं हे तिनं आपलं अॅसेट मानलेलं.
दोन पंजाबी ड्रेस आणि दोन गाऊन्स यावर दोन वर्षे तिने पार पाडली. सुरूवातीला रूम पार्टनर्स तिची कुचेष्टा करायच्या. तिच्याशी फटकून वागायच्या. फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर मात्र त्या नरम पडल्या. सुधाचं कॅलिबर त्यांनी ओळखलं. आयडिअल स्टुंडटचं अॅवॉर्ड सलग दोन वर्ष सुधालाच मिळालं. कल्चरल अॅक्टिव्हीटीजमध्ये ती माफक भाग घ्यायची. मीरेची भजनं तालासुरात गोड आवाजात म्हणायची. वॉल पेपरला महिन्यातून एखादं तरी आर्टिकल द्यायची. लेक्चर सुरू असताना जीवाचा कान करून ती ऐकायची. तिच्या लेक्चर नोटस् हा सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय असायचा. कधी वर्गात गडबड झाली की लेक्चरर्स म्हणायचे की, ‘सुधासारखे स्टुडंटस् आहेत म्हणून काही शिकवावं असं वाटतं. अन्यथा सगळी खोगीर भरती आहे.'
सुधा लायब्ररीतून बाहेर पडली. तिच्या मागोमाग प्रमोद सुद्धा निघाला, “सुधा आज एवढी गडबड झाली की, सकाळी स्नॅक्स राहोच पण साधा चहासुद्धा घ्यायला मिळाला नाही. चल मस्तपैकी कॉफी घेऊ या.” प्रमोदनं मोठंच डेअरिंग केलं. सुधाला नाही म्हणणं जमलं नाही पण होकार देतानासुद्धा स्वाभिमानी सुधाने अट घातली, “बिल मी देणार, तरच येईन मी.” दोघंही कँटीनमध्ये सेफ कॉर्नर बघून बसली. प्रमोदने वेटरला स्नॅक्सची ऑर्डर दिली. दोघांच्या प्रॅक्टिकल स्टडी अशा गप्पा रंगल्या. वेटरने कॉफीचे दोन कप ठेऊन बिल लिहायला घेतलं. पन्नासची नोट त्याच्या हातात कोंबून प्रमोदनं चुटकी वाजवली. वेटर निघून गेला. “प्रमोद मी आधी सांगितलं होतं ना...” सुधा रूष्ट सुरात बोलली. तिला अर्ध्यावर तोडीतच प्रमोद म्हणाला, “सुधा मला काय एवढा कंगाल समजलीस? तुझ्याबरोबर कॉफी पिण्यावरून बेटिंग केलं असतं तर सहजपणे हजारभर रूपये कमावले असते मी. अर्थात तशी अॅपॉरच्युनिटी अजून आहे म्हणा. म्हणूनच पुराव्यासाठी बिल मला हवयं ...”
“गेली दोन वर्षे मी तुझं वागणं पाहतोय. सगळे डिटेल्स मला कळलेले आहेत. सुधा तू ज्या परिस्थितीत आहेस ना ती परिस्थिती मी भोगलेली नाही हे खरं असलं तरी माझे डॅडी त्याही पेक्षा कदान्न स्थितीत वाढलेले आहेत. तुला निदान तुझ्या बाबांचा तरी आधार आहे. डॅडींनी तरी संगमेश्वरला माधुकरी मागितली. मिरजेला देवीच्या देवळाजवळ धर्मशाळेत राहून ते शिकले. तिथलं आवार झाडण्यापासून देवस्थानातील पडतील ती कामं सांभाळून त्यांनी मेडिकलचा कोर्स पूर्ण केला, या गोष्टींचा मला अभिमान आहे. तू माझं वागणं बघितलं असशीलच. श्रीमंतीला शोभणारे कोणते फंद मी कधी केल्याचं तुझ्या कानावर तरी आलयं का? फर्स्ट इयरला असताना मी जरा छानशोकीत रहायचो. पण तू या कॉलेजला आलीस. तुझं वागणं बघितलं आणि माझ्या डोळ्यात चांगलं अंजन पडलं.”
“सुधा तुला कदाचित पटणार नाही पण तुला आदर्श मानून माझं वर्तन, वृत्ती कंट्रोल केली मी. माझी विनंती मानून तू कॉफी घ्यायला आलीस हा ऑनर समजतो मी." वेटर उरलेले पैसे द्यायला आला. “ठेव माझ्याकडची टीप म्हणून” प्रमोद म्हणाला. “सुधा तुला गिल्टी वाटत असेल तर बिलाचे अठ्ठावीस रूपये तू दे... मी घेईन ते...तुझ्या समाधानासाठी तरी मला ते घेतलेच पाहिजेत. माझ्या मूर्खपणामुळे तुला नाहक भुर्दंड पडला. मला ही रक्कम म्हणजे कचरा आहे. पण त्याचं मोल मला ओळखता येत नाही असं नव्हे. दिवसभर हमाली केली तर मुश्किलीने एवढी रक्कम कमवता येईल हे मला ठाऊक आहे. त्याही पेक्षा आता तू ज्या क्रिटीकल पोझीशनमध्ये आहेस, त्याचा विचार करता मी तुला केवढ्यातरी खड्डड्यात उतरवलं... माझ्या चोचल्यांसाठी.... ही जाणीव माझं मन खातं राहिल पण यापुढे डोसा आणि कॉफी या वस्तूंना आयुष्यात स्पर्श करणार नाही मी. चल दे बिलाचे पैसे.” प्रमोद उठायला लागला.
प्रमोदला बसण्याची खूण करीत सुधा म्हणाली, “सॉरी हं प्रमोद... तुला ओळखण्यात मी चूक केली. आय एम रिअली व्हेरी सॉरीऽऽ ... पण इथे वावरताना विशेषतः माझ्या गर्भश्रीमंत रूम पार्टनर्स, त्याचं वागणं, त्यांचे विचार यामुळे श्रीमंतांच्या मुलांकडे पहायची माझी दृष्टी बदललीयं. होस्टेलवरच्या मुलींनी सुरूवाती सुरूवातीला माझी केलेली कुचेष्टा, माझ्या परफॉर्मन्सची त्यांना वाटणारी जेलसी, त्यांचं श्रीमंतीचं प्रदर्शन अन् बेपर्वा वृत्ती, त्यांचा एवढा उबग आलाय ना मला...” तिचे डोळे भरू न आले अन् तिच्यानं पुढे बोलवेना. ती रूमालानं डोळे टिपीत राहिली. थोड्या वेळाने दोघंही उठून गेली. त्या दिवसापासूनमात्र प्रमोद-सुधाची रिलेशन्स डेव्हलप झाली. अधून मधून फिरणं, तास तास गप्पा मारणं हे नित्याचंच झालं. प्रमोदची टर्म संपत आली. लेक्चर्स बंद झाली.
प्रमोद- सुधा दिवस दिवस लायब्ररीत बसून परीक्षेच्या तयारीला लागली. सलग पाच-सहा दिवस अभ्यास करून डोकं आऊट व्हायची वेळ आली. त्यावेळी कुठेतरी फिरायला जाऊया असं प्रमोदनं सुचवलं. आजच्या खेपेला सुधाल स्पष्ट विचारायचं असं त्याने आधीपासूनच ठरवलेलं. पंधरा दिवसांपूर्वीच त्याने टॉप्स खरेदी करून ठेवलेले. पण संधीच मिळत नव्हती. फिरायला जाताना प्रमोदवर भलतच दडपण आलेलं. “सुधा आपण शंकराच्या देवळात जाऊया.” त्याने सुचवलं. दोघंही दर्शन घेऊन बाहेर पडली अन् देवळासमोरच्या पाराखाली निवांत जागा बघून बसली. जुजबी गप्पा झाल्या आणि प्रमोदने धीर करून म्हटलं, “सुधाऽऽआता परीक्षा झाली की मी निघून जाणार. पुन्हा कधी भेटू न भेटू. रागावणार नसलीस तर एक विचारायचं आहे." सुधाने फक्त मान डोलावली. तिच्याकडे पहाणं टाळीत प्रमोद म्हणाला, "आय विश टु मॅरी यू.”
सुधाने काहीच उत्तरं दिलं नाही. “सुधा तू डिस्टर्ब होऊ नकोस. परीक्षा झाल्यावर सवडीनं, शांतपणे विचार कर. तू काही प्लॅन्स केले असशील त्यात माझ्यासाठी बदलही करू नकोस. तुझ्यावर कौटुंबिक जबाबदारी आहे, ती पूर्ण करणं तुझं कर्तव्यच आहे. पण आज ना उद्या तुला हा निर्णय घ्यावाच लागेल, तोपर्यंत मी थांबेन. फक्त तुझा होकार मला कळला तरी पुरे." सुधा कदाचित उठून जाईल... नंतर विचार करून सांगेन असं म्हणेल अशी त्याची अपेक्षा. पण सुधा थोडा वेळ विचार करून म्हणाली, “मला फार मोठी संधी नियतीनं देऊ केली आहे. पण माझ्यावरच्या जबाबदारीची तुला कल्पना नाही. माझी तीन भावंडं अजून शिकायची आहेत. आईबाबांनी माझ्यासाठी किती खस्ता काढल्यात. त्यांचं ही ऋण मला फेडायच आहे.”
“प्रमोद, हे सगळं पूर्ण व्हायला किती वेळ लागेल ते कसं सांगावं? तू तोपर्यंत थांब असं मी कुठच्या तोडानं सांगू? शिवाय तुझे आईवडील... त्यांच्या काही अपेक्षा असतीलच की..." प्रमोद म्हणाला, “तुझ्या टर्म्स पूर्ण झाल्या की तू स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकशील. स्वतःच्या हिमतीवर तुझं अर्निंग सुरू होईल. तू कोणावरही अवलंबवून नसणार आहेस. माझ्या मम्मी डॉडींचा या संदर्भात काडीमात्र विरोध होणार नाही याची मला खात्री आहे. मुलीच्या बापाकडून हुंडा उकळून हॉस्पिटल बांधायचं ही आमची वृत्ती नाही अन् तशी गरजही नाही. तू कबूल असशील तर तुझी अर्थिक चिंता याक्षणी मी दूर करेन. कसलंही ऑब्लिगेशन न ठेवता. तुझा कधी निर्णय होईल तेव्हा मला सांग. मी वाट पाहीन तोपर्यंत. आय प्रॉमिस...” आता मात्र सुधाला त्याचा अधिक अंत पाहवेना. तिने प्रमोदला लग्नाचं वचन दिलं. दोघंही रिलॅक्स मूडमध्ये परत गेली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी होत. मनमोकळेपणी बोलणंही व्हायचं. पेपर्स संपल्यानंतर त्यांनी पुढची प्लॅन्ससुद्धा आखली.
प्रमोदचे मम्मी-डॅडी भेटल्यावर तर सुधाच्या सगळ्याच शंका दूर झाल्या. प्रमोद आधी म्हणाला होता तेच डॅडींनीही सांगितलं. मम्मी सुद्धा म्हणाली की, मुलगी सत्शील हवी, प्रमोदला शोभणारी हवी, तेवढीच तिची अट होती. देणं-घेणं ह्या त्यांच्या अपेक्षाच नाहीत. “तुझ्या कुटुंबाचा विचार करता असला हलकटपणा आम्ही करणार नाही,” असं मम्मी डॅडी दोघांनीही निक्षून सांगितलं. मम्मींनी तिला पंजाबी ड्रेस आणि पर्स भेट दिली. प्रमोदचे डॅडी म्हणाले, “तू आपल्या आई बाबांना या गोष्टीची कल्पना दे. जरूर तर मी ही त्यांची भेट घ्यायला येईन. तुझ्या टर्म्स पूर्ण होऊ देत. अन् हे बघ आता तू आमची आहेस. तुला कधीही कसली गरज भासली तरी निःसंकोच कळव. आम्ही पैशावर प्रेम करीत नाही.” सुधाने रूमवर जाऊन ड्रेसचा बॉक्स उघडला. गुलाबी रंगाचा महागडा असा तो ड्रेस... एवढा उंची ड्रेस तिला आयुष्यात प्रथमच मिळालेला. तिनं पर्स उघडली. आत पाच हजार रूपयांच बंडल आणि प्रमोदची चिठ्ठी मिळाली.
“तू मला प्रॉमिस केलंस त्या क्षणापासून तुझी जबाबदारी माझ्यावर आहे असं मी मानतो. आतापर्यंत खूप हलाखीत दिवस काढलेस तू. इथून पुढे तरी तुला आर्थिक चणचण भासणार नाही याची खबरदारी मी घेईन. तुझ्या बाबांवरचा भार जरा कमी होईल याचं समाधान मला वाटेल. आता आमच्या कुटुंबियातच आम्ही तुझं स्थान गृहित धरतो. समक्ष धाडस झालं नाही म्हणून पर्समध्ये पैसे, चिट्ठी ठेवली. तुझ्या आईबाबांची परवानगी मिळाली की जरूर कळव. मी गाडी घेऊन तुझ्या घरी येईन.” सुधाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आपली आजवरची तपश्चर्याच जणू फळाला आली असं तिला वाटलं.
टर्म पूर्ण करून सुधा घरी जायला बाहेर पडली. रातराणी सकाळी सहा-साडेसहा पर्यंत तरळ्याला पोचली असती. तिथून पुढे मुटाटपर्यंत जेमतेम तासाभराचाच प्रवास. गाडीत रात्रभर तिच्या मनात प्रमोदचेच विषय सुरू. गाडीत अजिबात गर्दी नव्हती. टू सीटवर ती एकटीच होती. तरीही संपूर्ण प्रवासभर तिला झोपच आली नाही. सकाळी सहा वाजताच गाडी तरळ्याला पोहोचली. पिशवी, पर्स सुटकेस घेऊन सुधा स्टॅण्डवर उरतली. घरी जाणारी गाडी यायला अजून तासभर अवकाश होता. सुधाने आज पहिल्यांदाच पेपर घेतला. पेपर वाचतानाही तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. तिला आपलं घर, आई बाबा दिसायला लागले. ही गोष्ट आईबाबांना कशी सांगायची याची मनात जुळणी सुरू झाली. आता मात्र तिला अनंत अडचणी दिसू लागल्या.
विजयदूर्ग गाडी लागली. सुधा गाडीत बसली. तिकिट काढून झालं आणि पुन्हा विचारांची आवर्तन सुरू झाली. तत्वनिष्ठ जीवन जगणारे स्वाभिमानी बाबा... शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच आपण प्रेमप्रकरणात गुंतलो हे त्यांना कितपत रूचेल? आईसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणारी. प्रेमविवाह ही कल्पनाच मुळात त्यांना रूचणं अवघड आहे. ऐपत नसतानाही पोटाला चिमटा काढून सुधाला डॉक्टर करू पहणारे आईबाबा... त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या अनुमतीची पर्वाही न करता आपण वचन दिलं प्रमोदला. ही त्यांना प्रतारणा वाटली तर? श्रीमंत पैसेवाल्यांबद्दलचा आजवरचा अनुभव काही चांगला नव्हता. अशा लोकांबद्दल सूक्ष्म अढी, तिरस्काराची भावना त्यांच्या मनात असायची. संपत्तीमुळे माणसाला मद येतो. दुसऱ्याच्या भावनांची तो पर्वा करीत नाही हे त्यांचं ठाम मत. महत्वाची अडचण म्हणजे प्रमोद चित्तपावन नव्हता. तो होता देवरूखे या पोटशाखेतला. हे बाबांना मान्य होणं शक्यचं नव्हतं. आपण मात्र प्रमोदला सांगून बसलोय की, आई- बाबांची परवानगी मिळाली की कळवीन, नि तू त्यांना भेटायला ये. पण हे साध्य होणं अवघड आहे असंच तिला वाटायला लागलं.
सुधा घरी पोहोचली तेव्हा तिचा चेहरा पार उतरलेला डोळे खोल गेलेले दीर्घ मुदतीच्या आजारातून उठलेल्या माणसाप्रमाणे तिची रयाच गेलेली! ‘सुधा अभ्यासाचा भारी ताण पडलेला दिसतोय तुला. त्यात रात्रभराचा प्रवास. तोंड किती उतरलंय बघा पोरीचं.’ आई म्हणाली. बाबा बोलले, “सुधा आंघोळ करून घे. गरम-गरम आटवल खा आणि तू जरा झोप काढ. अभ्यासाचा केवढा ताण असतो याची कल्पना आहे मला. आता सुट्टीत चांगला आराम कर आणि पालवी धर.” सुधा आंघोळीला गेली. बहिणींनी तिची बॅग उघडली. आतला भारी ड्रेस बघून त्या वरमल्याच. बॅग बंद करून त्या बाहेर गेल्या. सुधा आंघोळ करून आली. आटवल खाऊन ती माजघरात झोपली. सुधाला येऊन चार दिवस झाले तरी ती मोकळेपणी वागेना. सतत दडपणाखाली असल्यासारखी वावरायची. भावंडांशी गप्पा, दंगामस्ती नाही, गाणी म्हणणं नाही. आवारात फिरून येणं नाही. एवढंच काय झोपाळ्यावर बसून झोके घ्यायची तिला भारी आवड. पण ती झोपाळ्याकडे फिरकली सुद्धा नाही. तरीही काही गंभीर कारण असेल असं मात्र तिच्या आईबाबांना वाटलं नाही.
खूप दिवस अभ्यासाच्या ओझ्याखाली ती कंटाळलेली असणार. हळूहळू रूळेल असचं त्यांना वाटलं. भावंडं, बाबा बाहेर गेलेले, घरात ती अन् आई तशा दोघीच. तो मोका साधून आईकडे आपलं मन मोकळं करायचं सुधानं ठरवलं. "आई तू रागावणार नसशील तर एक गोष्ट सांगायची आहे तुला." तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवीत आई म्हणाली, "हं ऽऽ नाही रागावणारं. काय ते मोळकेपणाने सांग." आईच्या नजरेला नजर न देता सुधानं प्रमोदबद्दल सगळं सांगितलं. आपण दिलेलं लग्नाचं वचन, त्याच्या मम्मी डॅडींची भेट, त्यांच्याशी झालेलं बोलणं, कोर्स पूर्ण झाल्यावर लग्न करायचं, देण्याघेण्यावरून अडवणूक होणार नाही, आपल्या कमाईतून भावंडांना शिक्षणासाठी मदत करण्याचा बेत. सुधा सविस्तर सगळं सांगत सुटली. आई नुसती हूं 55 हुं ऽऽ करीत राहिलेली. सुधाचं बोलून झालं. आईनं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आता मात्र सुधाला रहावलं नाही. आईचे हात हातात घेत सुधानं विचारलं, "आई तुला पसंत नाही कां हे? माझं काही चुकलं का ? बोल ना गं आई ऽऽ"
आईच्या घशात हुंदका दाटून आलेला पण रडू दाबीत आवंढा घोटून ती म्हणाली, "ह्यांचा स्वभाव तुला माहिती आहेच. अजून शिक्षण पूर्ण व्हायचं आहे अन् मध्येच हे काय करून बसलीस पोरी. जरा थांबली असतीस तर फार फार बरं झालं असतं. व्हायचं ते झालं. मी ह्यांच्या कानावर घालते. त्यांना समजवण्याची होईल तेवढी शिकस्त करते." आता मात्र सुधा रडायलाच लागली. तिला थोपटीत आई म्हणाली, "जा तोंड धू. मुलं येण्याची वेळ झाली. तिन्ही सांजेच्या वेळी असं रडू नये. हेसुद्धा येतील इतक्यात. रडणं आवर आता. तोंड धू आणि देवाचं काही म्हण बघूऽऽजा."
रात्री सगळ्यांची जेवणं झाली. मुलं अंथरूणावर आडवी झाली. आई बाबा झोपळ्यावर बसलेली. मध्यरात्रीपर्यंत त्यांचं दबक्या आवाजात बोलणं सुरू असलेलं सुधाला कळत होतं. काय बोलतात ते मात्र ऐकू येत नव्हतं. आता बाबा आपल्याला हाक मारतील, तडातडा बोलतील, जाब विचारतील असं त्याचं बोलणं सुरू असल्यापासूनच सुधाला वाटत राहिलं. पण तसं काही झालं नाही. बहुतेक बाबांची समजूत पडली असावी. त्यांना पटलेलं असावं असा अंदाज करीत सुधा झोपली. सकाळी खूप उशीरा तिला जाग आली. तोंड धुऊन ती स्वयंपाक घरात गेली. तिची चाहूल लागताच चुलीपुढे बसलेल्या आईनं मागे वळून बघितलं. तिचा चेहरा भकास झालेला. एका रात्रीत एवढी अवकळा तिच्या तोंडावर आली की आई चक्क म्हातारी दिसू लागली. सुधा दूध प्यायली आणि कप विसळून ठेऊन झोपळ्यावर जाऊन बसली.
दहाच्या सुमाराला बाबा आले. टोपी खुटीला अडकवून शर्ट काढला आणि पाय धुवायला न्हाणीघराकडे गेले. सुधाकडे त्यांनी बघितलं सुद्धा नाही. पाय धुऊन आल्यावर ते स्वयंपाक घरात गेले. "सुधा जरा आत ये. अरूण तू बाहेर झोपाळ्यावरच बसून रहा. मला सुधाशी महत्वाचं बोलायचं आहे. कुणी आलंच तर मला कळव." सुधा स्वयंपाकघरात जाऊन बाबांसमोर उभी राहिली. "सुधा तो पाट घे नी बैस. काल रात्री हिने मला सगळं काही सांगितलं. तू त्या मुलाला लग्नाचं वचन दिलसं ना?" सुधाने 'हुं' म्हटलं. "त्याने तुला वचन दिलयं ना?" सुधा परत 'हुं' म्हणाली. "त्यांच्या आईवडिलांशी ही तुमचं बोलणं झालेलं आहे. त्यांना पसंत आहे म्हणजे सगळं ठरल्यात जमा आहे. तू मोठी आहेस. आता कायद्यानेही सज्ञान झाली आहेस. तू सुविद्य आहेस. आपलं बरं-वाईट तुला कळंत म्हणून तर तू हा निर्णय घेतलास. ठीक आहे."
आईनं चहाचा कप पुढ्यात ठेवला. चहा पिऊन झाल्यावर बाबा पुढे बोलायला लागले, "सगळं काही परभारे ठरवून तुम्ही मोकळे झालात त्या अर्थी आम्ही हो-नाही म्हणण्याच्या प्रश्नच येत अनाही म्हटलं तरी ते निरर्थक आहे. मोठी गडगंज पार्टी आहे. मी कुठला त्यांच्या पासंगाला पुरणार? डॉक्टर होणारी मुलगी, दिसायला सुंदर, त्यांना जसं घबाडच मिळालं. पैसेवाली मानसं पूर्ण फायदा बघूनच निर्णय घेतात. त्यांची प्रत्येक गोष्ट पैशाचा जीवावर कशी योजनाबद्ध आणि पद्धतशीर होत असते! ते असू दे! मुलगा देवरुखा आहे. मी स्थळ शोधलं असतं तर देवरुखा, कऱ्हाडा कधीच पत्करला नसता, पण ठीक आहे. मुलगा ब्राह्मण आहे हे सुद्धा काही कमी नाही. तूच पसंत केलास म्हटल्यावर आम्ही आक्षेप घेणारे कोण?" आईला राहवेना ती म्हणाली, " सुधा, तुझं काय वय होत चाललं होत म्हणून आमचा विचारही न करता तू परस्पर निर्णय घ्यावास? की आमच्यावर तुझ विश्वास नाही. आम्ही का तुझं अकल्याण केलं असतं? लग्न न करताच वाढू दिली असती? तिला पुढे बोलवेना. तिने डोळ्यांना पदर लावला.
बाबा म्हणाले. "तू रडू नकोस. सुधाचा निर्णय आताझालेला आहे. आता ते उगाळण्यात आणि बोल लावण्यात काही अर्थ नाही. आपण आई-बाप आहोत न तिचे? मग मान अपमान आपणच गिळायला पाहिजे. त्रयस्थाच्या दृष्टीने बघितलं तर सुधाने ठरविलं त्यात तसं वावगं काय आहे.? आम्ही तिला काय मोठी गुळात धरली आहे? सांगायचं दोन वर्षात नवीन ड्रेससुद्धा आम्हाला तिच्यासाठी शिवता आला नाही. तिच्या बरोबरीची मुलं मी बघितली आहेत. ते आता राहू दे. सुधा तू ठरवलंस म्हणजे आम्ही ते मान्य केलं असा अर्थ नव्हे. आम्ही आडकाठी नाही करणार तुला, पण मी माझ्या हाताने देवरुख्याला मुलगी नाही द्यायचो आणि हे बघ मुलाकडच्यांनी कितीही सांगितलं की त्यांच्या काही अपेक्षा नाहीत तरीही हा व्यवहार इतका सतल होत नसतो. अगोदर असंच सांगायचं असतं. मग ठरावाच्या वेळी कुणी काका, मामा, आप्त, मित्र उपटतो. तो रीत शिकवतो. हळु हळू एक एक गोष्ट पुढे येते. मुलीच्या बापाला नाही म्हणणं शक्यच होत नाही. मान-पान, हुंडा हे टाळलं तरी लग्न करून देणं ही तरी नैतिक जबाबदारी रहाते. मी ती मानतो. मुलीच्या बापाचं ते कर्तव्यच आहे. पण सुधा आता ह्या वेळेला अगदी शंभर माणसांचा खर्च झेपवून कार्य करून देणंही माझ्या अवाक्याबाहेर आहे."
सुधा धीर करून म्हणाली, "बाबा, या बाबतीत बोलणं झालयं आमचं. कोर्स पूर्ण होईपर्यंत लग्न करायचं नाही असं प्रमोदचे डॅडीही म्हणाले. मला सुद्धा ते योग्य वाटत नाही बाबा मी शपथ घेऊन सांगते. पूर्ण कोर्स होईपर्यंत पाहिजे तर आम्ही एकमेकांना भेटणार सुद्धा नाही. मी प्रमोदच्या डॅडींना इकडे बोलावून घेते. ते नक्की येतील. नाहीतर आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यांच्याशी बोलूया. फार मोठ्या मनाची माणसं आहेत ती. एकदा त्यांचं तुमचं बोलणं झालं ना की तुमचे सगळे गैरसमज दूर होतील अशी माझी खात्री आहे. इथे काय परिस्थिती आहे ते का मला समजत नाही? खर्चाची तोंडमिळवणी करताना तुमची, आईची काय परवड होत असेल हे कळतंय ना मला. मला निदान तुमचा तरी आधार आहे. मी तिकडे निश्चिंत राहू शकते. ज्यांना कोणाचाच आधार नाही. त्यांची काय अवस्था होते हे मी बघितलेलं आहे."
"सुधा आता स्पष्टच सांगतो. तुला डॉक्टरकी शिकायला मी पाठवली. माझीही काही धोरणं होती.... योजना होत्या... आता कुठे तुला एकविसावं वर्ष लागलं. मागची एक-दोन भावंडे रांगेला लागतील असे माझे मनसुबे होते..... सुनिता यंदा एफ.वाय.ला आहे. तिला शहात्तर टक्के मार्क्स आहेत. अरूण बारावी होईल. तो सुद्धा ऐंशीच्या खाली येणार नाही. मंजु दहावीत गेली...... सुधा तू फक्त पंचविशीपर्यंत थांबली असतीस तरी सगळं कुटुंब शून्यातून वर आलं असतं..... जाऊ दे! शेवटी कन्या हे परक्याचं धन तुझा मार्ग तुला मोकळा आहे. पण आणाभाका झालेल्या असताना लग्न लांबवणं मात्र मला अजिबात मान्य नाही."
"कामातुराणाम् न भयम् न लज्जा... तू एवढी सोज्वळ असतीस तर आई-बापाला अंधारात ठेवून वचन देण्याएवढं धारिष्ठ्य तुला झालंच नसतं. तुझे संस्कार तुला वाह्यात वागायला द्यायचे नाहीत हे खरं पण कधी? तू त्या फंदातच पडली नसतीस तर! तरच ठीक होतं....! इथून पुढे तशी खात्री देण्याचं धाडस कोणता मुलीचा बाप करील?"
"सुधा, त्यांनी मोठा धूर्त डाव टाकलेला आहे. आताच लग्न करून पुढच्या वर्ष दीड वर्षाचा खर्च कोणता व्यवहारी मनुष्य बोकांडी मारून घेईल? सुधा प्रमोदचे मम्मी डॅडी वाईट कशाला असतील? ते चांगलेच असणार.....तसा मनुष्य कोणताच वाईट नसतो. मुळात तो तसा वाईट नसतोच मुळी, मी हे तत्त्वतः मान्य करतो. पण वाईट असतात त्याचे विचार आणि कृती.... आणि ह्या गोष्टीसुद्धा शेवटी परिस्थिती सापेक्षच असतात ना? प्रमोदचे आई-बाप म्हणून, तुझे सासू-सासरे म्हणून ते चांगले असतीलही. पण व्याही विहीण म्हणून ते कितपत चांगले वागतात हे वेळ येईल तेव्हाच... अनुभवाअंतीच पटेल. आताच्या परिस्थितीत तशी खात्री देण्याचे धाडस कोण करील? करावे तरी का म्हणून? काही गोष्टींच्या बाबतीत झाकली मूठच बरी असते. घटना कशीही असो, चांगली वाईट... ती घडून जाते पण मागे पडसाद उठतात. या संबंधामध्ये तसे ते उठू नयेत अशी दक्षता मी घेणार आहे."
"सुधा, समुद्र मंथनातून अमृताबरोबर विषही बाहेर आलं देवांना ते पचवावंही लागलं. घटना आता सुरू झाली आहे. तिचे परिणामही आता अटळ आहेत. ते उभयपक्षी भोगावे लागणार आहेत. सूज्ञ पावले टाकून त्यांची तीव्रता तरी कमी होईल. कटूता आलीच तरी तिचे वेगळे असते. कालांतराने तरी परस्परांची बाजू परस्परांना पटेल अन् संबंध स्वच्छ, निर्लेप होतीलही पण ते आता याक्षणी घडणे अशक्यचं. बी रूजत घालताना ते स‌द्भावनेने घातले आहे. त्याचे फळ वाईट कसे येईल? तू सुविद्य आहेस. तू चांगल्या हेतूनेच हा निर्णय घेतला आहेस तेव्हा तो योग्यच असणार पण ते केवळ तुमच्या पुरतेच. तुम्हा उभयंताना या क्षणी परिस्थिती लवचिक आहे. माझी कुवत नाही म्हटल्यावर प्रमोद बापाच्या नकळत कदाचित मला पैसेही देईल. त्याच्या जीवावर पैशाचे सोंग आणून मला आपले दैन्य कदाचित झाकताही येईल. पण सुधा, तो माझा तत्वनिष्ठेचा, निस्पृहतेचा पराभव असेल. माझे असे कृत्य ही प्रमोदच्या आई-बाबांची माझ्याकडून झालेली प्रतारणा असेल."
"कदाचित निस्पृहपणे काही देऊ नका. लग्न खर्चाप्रीत्यर्थ मी मदत करीन अस त्याचे वडीलही म्हणतील. पण म्हणून मी ते मान्य करणे हे भूषणावह ठरेल का? सुधा ऐश्वर्य भोगणाऱ्या माणसाला मुळातच दैन्यावस्थेची कल्पना कशी यावी? आलीच तरी किती तीव्रतेपर्यंत ही सुद्धा कल्पनेपलिकडचीच गोष्ट आहे. मी शिक्षक आहे. माझ्या मिळकतीची मोजदाद केली तर आज मितीला मी अमूक एवढी रक्कम बाळगून असणार असा अंदाज कोणीही करेल. तसा करणे इष्टही ठरते. पण वस्तुस्थिती काय आहे हे ती प्रत्यक्ष भोगणाऱ्या तुम्हां मुलानांच ज्ञात असणार. मात्र खर्चाचा विचार करताना श्रीमंत माणसं चांगला कल्पनाविलास लढवतात. साम-धाम परिस्थितीतल्या माणसांना काटकरीची सवय असते. त्यांच्या गरजा कमी असतात. असं निर्लज्ज समर्थन द्यायलाही ती कचरत नाहीत. सुधा, कदाचित तुझ्या सासुसासऱ्यांनी न जाणो... माझ्या परिस्थितीबद्दल तसं त्रैराशिक मांडलं तर त्याचं काय चुकलं?.
"सुधा, मी त्यांना वाईट म्हणत नाही. पण साकल्याने विचार कर. माझी लग्न करून देण्याइतकी ऐपत असूनही मी परिस्थितीचा, त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतोय असा ग्रह त्यांनी करून घेतला तर? ही गोष्ट कदाचित ते कधीही बोलूनही दाखविणार नाहीत पण माझ्याकडे पाहताना त्यांची नजर स्वच्छ नसेल हे निर्विवाद. सुधा आताच्या परिस्थितीतून काहीही चांगलं निष्पन्न होणार नाही हे नक्की. मग तूच सांग. विपरित परिणामांची शक्यता दिसत असतानाही मी हात दाखवून अवलक्षण केल्यासारखी त्यांची भेट घ्यावी अन् प्रचिती पहावी. असं तू आता सांगू धजावशील का? नाही सुधा, ते शक्य नाही. आम्ही परस्परांना न भेटण्यातच सगळ्या गोष्टी भरल्या राहतील. चांगलेपणा, वाईटपणा राहू दे. निदान परस्परांची मतं, दृष्टीकोन निर्विकल्प तरी राहतील."
"सुधा, आम्ही पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय तो नीट ऐक. तुम्ही रजिस्टर लग्न करा. तुला मणी वाटी म्हणून मंगळसूत्रासाठी तोळाभर तरी सोनं आम्ही देऊ. हिने जीव-जीव म्हणून तोळाभर सोनं गाठीशी ठेवलेलं आहे. ते आम्ही पुढे करू. तेवढंही नाही केलं तर अधर्म घडेल माझ्या हातून... मणी-वाटी घातली नाही तर मुलीचा बाप जावयाच्या ऋणात राहतो असं धर्मशास्त्र आहे. हे ऋण मी ठेवणार नाही. तुझं शिक्षण पूर्ण होइतो पर्यंतचा दीड वर्षाचा खर्च... पूर्वी झालेल्या खर्चाच्या अंदाजाने तो सोळाशे रूपयापर्यंत जाईल, तो मी देणार आहे. तसेच लग्नखर्च म्हणून पाचशे रूपयेपर्यंत मला झेपतील तेही मी देईन. येत्या दोन-तीन दिवसांत तशी तजवीज होईल. शिक्षक बँकेकडे कर्जासाठी अर्ज दिलाय मी. तुम्ही रजिस्टर लग्न करा. आम्ही कुणीही लग्नाला येणार नाही. तू आजच सविस्तर प्रमोदला पत्र लिही. त्याला स्पष्ट लिही. शक्य तितक्या लवकर लग्न व्हायला हवं."
"सुधा, मी सांगतोय ते पूर्ण विचार करून. त्यात काडीमात्र बदल होणार नाही. जर प्रमोदकडून प्रतिसाद आला नाही तर मात्र तुला पुढच्या वर्षी मेडिकल कॉलेजला जायला मिळणार नाही. शिक्षण थांबवून इथेच रहावं लागेल. प्रमोद तुझा स्वीकार करीपर्यंत... तस्मात लग्नही करायचं नाही अन् शिक्षण थांबवून इथेही रहायचं नाही असा तुझा निर्णय असेल तर तुझा मार्ग तुला मोकळा आहे. अगदी या क्षणीसुद्धा तू घर सोडून जाऊ शकतेस. अर्थात बाप म्हणून जबाबदारी मी टाळणार नाही. सोनं, रक्कम जे मी बोललो ते घेऊन जा." बाबा उठून उभे राहिले. सगळ्यांना बजावलं, "सगळ्यांनी एक लक्षात ठेवा. झाल्या प्रकाराची वाच्यता चर्वित चर्वणं करायची नाहीत. लग्नापर्यंत गोष्टी येतील तेव्हा लोकांना काय सांगायचे ते पाहू." बाबा बाहेर जाऊन झोपाळ्यावर बसले.
दुपारची जेवणं झाली. पानावरून उठताना बाबा म्हणाले, "सुधा संध्याकाळपर्यंत पत्र लिही. उद्या अरूण तरळ्याला जाऊन तिथल्या पोस्टातून ते रजिस्टर करील. उगाच गावभर बभ्रा नको. प्रमोदला तू सुद्धा कळव की, पत्रावर त्याने आपलं नाव लिहू नये." संध्याकाळी सुधाने पत्र लिहून पूर्ण केलं. अन् बाबांच्या हातात दिलं. बाबांनी ते वाचताच पाकीटात घालून पाकीट चिकवून टाकलं. दुसऱ्या दिवशी अरूण पत्र रजिस्टर करून आला. त्यानंतर आठ-दहा दिवस गेले. या काळात आई, भावंड तिच्याशी कारणापुरतं बोलत. बाबा तर तिच्याकडे पहाणं सुद्धा टाळत. दहाव्या दिवशी प्रमोदचं पत्र आलं. सुधानं ते आईकडे आणि आईनं ते बाबांकडे दिलं. लगेचच लग्न करायला त्यांची हरकत नव्हती. मात्र तत्पूर्वी बाबांनी मम्मी डॅडींची भेट घ्यावी. पाहिजे तर ती दोघं बाबांना भेटायला येतील असं कळवलेलं होत त्या पत्रात. बाबांनी पत्र वाचून सुधाकडे दिलं. सुधानं पत्र वाचलं.
बाबा म्हणाले, "त्यांना भेटायची माझी इच्छा नाही. त्यामागे माझा काय हेतू आहे तो मी यापूर्वीच सांगितलाय तुला. रजिस्टर लग्नाऐवजी वैदिक पद्धतीने लग्न लावून द्या असं कदाचित ते म्हणतील. त्यांच्याकडे परिस्थितीची रड करून त्यांच्याकडे खर्च कसा मागू मी? तुझा निर्णय मुळातच पूर्णतः माझ्या इच्छेविरूद्ध आहे. असं असताना मनात किंतू ठेऊन तोंड देखलं नाटक करणंही माझ्याच्याने होणार नाही. तेही एकवेळी केलं असतं मी... पण माझे हात तोकडे पडताहेत गं सुधा! आता या परिस्थितीत तोंड वेंगाडण्याशिवाय त्यांच्यापुढे मला काही बोलता यायचं नाही. अस्थाई निर्णय घेऊन मला भलत्याच धर्म संकटात टाकलंस ग पोरी." अगतिक झालेले बाबा... परिस्थितीशी टक्कर देतानाही ताठ कण्याने रहाणारा तो निग्रही माणूस स्थळ काळाचं भान सोडून रडू लागला. बाबांचे पाय धरीत सुधा ओक्साबोक्शी रडू लागली. "बाबा खरचं माझं चुकलं. माझं कर्तव्य, माझी जबाबदारी कशाचंही भान न ठेवता मी मोहाला बळी पडले. माझ्या निर्णयाचे किती दूरगामी परिणाम होतील याचा विचार करण्याचंही तारतम्य मला राहिलं नाही. निर्णय घेण्यापूर्वी निदान आईला तरी विश्वासात घेणं हे माझं कर्तव्यच होतं. बाबा माझ्या चुकीचं प्रायश्चित मला घेऊ द्या. मी अविवाहित रहायचं ठरवलयं. देवाच्या साक्षीने मी तशी शपथ घेईन."
सुधाला जवळ घेऊन थोपटीत बाबा म्हणाले, "थांब पोरी थांब... असा अविवेकी निर्णय घेऊ नकोस. वचनभंगाचं पाप प्रायश्चितानं धुतलं जात नाही. तुम्ही पोरं अशीच खुळी असता. आधी मोहाला बळी पडून चूक करायची अन् मागाहून तिचं परिमार्जन करण्यासाठी दुसरी चींक करायची. लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला तुला? वाटतं काय तुला? वाटलं की ठरवलं, वाटलं की मोडलं? या जन्मजन्मांच्या गाठी असतात. म्हणूनच या बाबतीतले निर्णय साकल्यानं दूरगामी दृष्टीने घ्यायचे असतात. समजलं?"
"तू प्रमोदशी संबंध तोडलेस, अविवाहित राहिलीस म्हणजे काय बाबांच्या लौकिकात भर पडेल असं वाटतं तुला? आता मी सांगतो ते ऐक. तेच तुझ्या भल्याचं आहे. प्रमोदला पत्र लिही. म्हणावं माझा निर्णयच बाबांना मान्य नाही. तस्मात ते मम्मी डॅडींना भेटणं अथवा मम्मी डॅडींनी त्यांना भेटणं आता असंभव आहे. आता रजिस्टरलग्नाशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही. तू, मम्मी, डॅडी यांनी या संदर्भात प्रतिसाद दिलात नाही तर शिक्षण बंद करून मला कायमचं घरी बसावं लागेल. याविवाह संदर्भात एकही गोष्ट त्यांच्या तत्वात बसणारी नसल्यामुळे मला माझा मार्ग मोकळा आहे असा निर्णय त्यांनी दिलेला आहे. अमुक अमुक दिवशी विजयदुर्ग-मुंबई गाडीनं मी येत आहे. शक्यतो त्याच दिवशी विवाह विधी पार पडावा अशी व्यवस्था कर."
"सुधा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. सगळया गोष्टी माझ्या मनाविरूद्ध असल्यामुळे याक्षणी तरी तुला क्षमा करण्याच्या मनःस्थितीत मी नाही. तशी अपेक्षाही तू करू नकोस. पूर्ण विचार केलास तर माझं म्हणणं तुलाही पटावं. सगळं काही तुझ्या मनासारखं होऊ दे. अर्थात आता माहेर हा विषय तुझ्यापुरता संपलाय हे ही लक्षात ठेव." डोळ्याला पदर लावीत आई म्हणाली, "हे काहीही म्हणू देत सुधा, तसं एखादा दिवस तुला यावंस वाटलं आणि तू आलीस तरी चालेल. पण सध्या दोन तीन वर्ष तरी तुझ्या नवऱ्याला मात्र इकडं आणू नकोस. कितीही झालं तरी तो जावई आहे या घरचा. त्याची नीट संभावना नको का करायला? आताच आम्ही गळ्यापर्यंत बुडालोय. मनात ढीग आहे पण नन्नाजी हवेत ना? आणि ध्यानात ठेव, तुझी पडती बाजू आहे. मनाविरुद्ध झालं काही तरी तोंड उघडायचं नसतं. शेवटी केलेलं दिसत नाही पण बोललेलं रहातं नी तेच हयातभर पुरतं."
बाबा म्हणाले, "काही झालं तरी पाण्याची धार काठीनं तोडता येत नाही. थोडे दिवस पडसाद उमटतात नी विरूनही जातात. उद्या तुझी भावंडं मोठी झाली की त्यांना रूचतील, पटतील तसे त्यांचे संबंध राहतील. तोपर्यंत माझी सत्ताही संपलेली असेल. अन् हे बघ माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. त्याबाबतीत तरी उदंड श्रीमंती आहे माझ्याकडे. किती झालं तरी शेवटी मी तुझा बाप आहे. मी सांगतो त्या मार्गानेच तुझ्या चुकीचं परिमार्जन होईल. तेच तुझं प्रायश्चित आहे असं समजून तू सामोरी जा. सोन्याचा कस सुद्धा अग्निपरीक्षा दिल्यावरच सिद्ध होतो ना?'