ब्लॅकमेल - प्रकरण 14 (शेवटचे प्रकरण) Abhay Bapat द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ब्लॅकमेल - प्रकरण 14 (शेवटचे प्रकरण)

प्रकरण १४
दोन्ही धारवाडकर आणि युक्ता बेहेल तिघांच्या चेहेऱ्यावर तणाव आला आहे हे स्पष्ट जाणवत होतं.
“ युक्ता, तुला हे जर्किन बसते का पहा.” पाणिनी म्हणाला तिने ते जर्किन हातात घेतलं आणि अंगात घालायचा प्रयत्न केला तिला ते खूप सैल झालं.
“ शुक्लेंदू, तुम्ही या पुढे.” पाणिनी म्हणाला
“ अशा प्रकारे खुनी ठरवण्याची पद्धत चुकीची आहे.” तो ओरडून म्हणाला.
“ ते कोर्टाला ठरवू दे, तुम्ही फक्त ते घालून दाखवा.” पाणिनी म्हणाला नाईलाजाने शुक्लेंदू ने ते जर्किन अंगावर चढवले.त्याला ते खूप घट्ट झालं. म्हणजे अंगातून आत जाईना.
“ आता तुम्ही ” शाल्व ला उद्देशून पाणिनी म्हणाला आणि काही कळायच्या आत शाल्वने कोर्टाच्या दाराकडे झेप घेतली.
“ पकडा त्याला ! ” न्यायाधीश ओरडले. आणि दारात उभ्या असलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
त्याच रात्री प्रचिती, युक्ता, कनक, सौंम्या आणि शुक्लेंदू धारवाडकर पाणिनी सह एका छानशा हॉटेलात जेवण घेत बसले होते. प्रचिती ची सुटका झाल्यामुळे तिने पार्टी जाहीर केली होती.
“ सरकारी वकील म्हणाले तसं खरंच तुम्हाला सर्व माहित असल्यासारखं कसं काय कोर्टाला सांगितलंत?” प्रचिती म्हणाली.
“ कनक ने जेव्हा सांगितलं की विवस्वान फक्त बायकांच्या बाबतीत कोणी लफड्यात अडकला असेल तरच त्याला ब्लॅकमेल करतो त्याच वेळी माझ्या विचारांची दिशा बदलली.त्यातून मला युक्ता ने चिट्ठी दिली आणि मी योग्य तऱ्हेने तर्क करतोय हे लक्षात आलं.सुरुवातीला प्रचिती ने सांगितलं होतं की कंपनीत पाच लाखांची तूट आली आहे. त्यानंतर ऑडीट करून घेतल्यावर ही तूट एकदम २० लाखावर गेली आहे असं कळल.पण शाल्व ने दहा लाख नेले होते ते परत भरले त्यामुळे ही तूट दहा लाखावर राहिली तेव्हा मी विचार केला की पहिली तूट पाच लाख होती ती दहा लाख झाली म्हणजे पाच लाखाच्या किमान दोन विथड्रॉवल असणार.प्रयंक मेल्यामुळे फ्रॉड करणाऱ्याला पहिल्या पाच लाखाचा खुलासा द्यायची गरज नव्हती.त्यासाठी प्रयंक जबाबदार असल्याचे दाखवण्यात आले.प्रयंक मेल्यामुळे त्याने पाच लाख घेतल्या ऐवजी दहा लाख दाखवण्यात काहीच अडचण नव्हती. पण शुक्लेंदू, तुम्ही आणि युक्ता दोघेही कोर्टात एकत्र नसतात तर शाल्व ने गुन्हा कबूल केला नसता. ” पाणिनी म्हणाला
“ खर म्हणजे माझे काका असं काही करतील ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही.” शुक्लेंदू हताश होऊन म्हणाला. “पण युक्ता, शाल्व काका आणि तुझं अफेअर होतं आणि तू त्यांच्या बाळाची आई झाली होतीस तर पटवर्धन यांना चिट्ठी का लिहिलीस तू? म्हणजे तुझं जर काकांवर प्रेम होतं तर त्या चिट्ठीमुळे काका पकडले जाऊ शकतील हे लक्षात कसं नाही आलं तुझ्या?” शुक्लेंदू ने विचारलं.
“शाल्व वर माझं प्रेम नव्हत पण त्याने मला नोकरी लावली असल्याने मी त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली होते. एका बेसावध क्षणी माझ्या हातून चूक घडली.शाल्व ने मला नोकरीतून काढायची धमकी दिली होती म्हणून मी गप्प बसले. मला नोकरीची फार गरज होती.पण मला प्रयंक आवडत असे. पण शाल्व ने माझ्याशी केलेल्या उद्योगाचा आळ तो प्रयंक ला स्वत:वर घ्यायला लावतोय, विवस्वान सारख्या ब्लॅकमेलर ला भेटायला,त्याच्याशी तडजोड करायला प्रयंक ला पुढे करतोय आणि सर्वात वाईट म्हणजे आपण केलेल्या खुनाचा आळ प्रचिती वर आला तरी गप्प राहतोय हे सर्व मी सहन करू शकले नाही आणि मी पटवर्धन ना चिट्ठी लिहिली.” युक्ता म्हणाली.
“ शाल्व ने अशी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त केली होती की युक्ता आणि त्याचे संबंध चव्हाट्यावर येणे त्याला परवडण्यासारखे नव्हते.हीच गोष्ट विवस्वान ने हेरली आणि त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ” पाणिनी म्हणाला
“ जर्किन ची काय भानगड आहे?” कनक ने विचारलं
“ ते शाल्व चेच आहे. रिव्हॉल्व्हर झाकण्यासाठी त्याने ते हातावर टाकले. आणि विवस्वान ला मारल्यावर त्याच्याच कपाटात ठेऊन दिले.ओळख पटवता येऊ नये म्हणून त्यावरची सर्व लेबल्स त्याने उपटून फाडून टाकली. विवस्वान चे सगळे कपडे टेलर मेड होते हे एकच जर्किन वेगळे होते त्यामुळे मला संशय आला आणि काय झाले असावा याचा तर्क मी कोर्टासमोर मांडला. ” पाणिनी म्हणाला
“ पण मुळात शाल्व ने ते जर विवस्वानच्या कपाटात ठेवले नसते आणि खून झाल्यावर पळून जातांना ते आपल्या बरोबर नेले असते तर? ” सौंम्याने विचारलं.
“ भर उन्हात दुपारी बारा- एक च्या सुमाराला उन्हातून जर्किन घालून बाहेर पळून जाणे शक्य नव्हते, दमछाक झाली असती त्याची.शिवाय ते पिवळ्या रंगाचे होते, बघणाऱ्याला सहज दिसले असते ते. त्यामुळेच त्याने विचार केला असावा की ते कपाटात ठेऊन द्यावे.” पाणिनी म्हणाला
“ आणि मी विवस्वान ला देण्यासाठी प्रयंक ला दिलेल्या पैशांचं काय?” शुक्लेंदू ने विचारलं.
“पटवर्धन सरांनी मला ते पैसे बँकेत भरून त्याचा ट्रस्टी या नात्याने माझ्याच नावाने ड्राफ्ट खरेदी करायला सांगितलं होतं.पण त्यांचं न ऐकता मी विवस्वान कडे रोख रक्कम घेऊन गेले. पण मी जाण्यापूर्वी तो मेला होता म्हणून मी ते पैसे बँकेत भरून त्याचा ड्राफ्ट खरेदी केला. ” प्रचिती म्हणाली.
“ मला वाटतंय अॅडव्होकेट पटवर्धन यांनी तुझ्यासाठी फार धोका पत्करलाय आणि खूप खर्च ही केलाय.त्यांची फी म्हणून तू हा ड्राफ्ट त्यांच्या नावाने एनडोर्स कर.” शुक्लेंदू म्हणाला आणि त्याने आपले महागडे पेन प्रचिती ला सही करण्यासाठी दिले.
समाप्त