अस्पृश्य हे वीरच आहेत पुर्वीचे?
*अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या तत्सम जाती. या जातीत मुख्यत्वे चर्मकार, मातंग, महार व खाटीक यांचा समावेश होतो. ते सुरुवातीपासून शूरच होते. परंतु कालपरत्वे जेव्हा विदेशी आक्रमण झालं. तेव्हा राजांसह त्यांच्यासोबत लढणाऱ्या याच अस्पृश्य समाजातील सैनिकानाही गुलाम बनविण्यात आलं. त्यानंतर त्यांना दास्य प्रदान करण्यात आलं. यात विदेशी लोकांना ज्यांनी ज्यांनी बोलवलं व येथील राजांविरुद्ध फितूरी केली. त्यांनीच त्या तत्सम जातीवर विटाळ लादला व त्यांना अस्पृश्य ठरविण्यात आलं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.*
चर्मकार समाज. प्राचीन काळापासून आघाडीवर असलेला चर्मकार समाज. म्हणतात की याच समाजातून राजे रजवाडे झालेत. परंतु त्या समाजाचा अर्वाचीन काळ फारच दुःखदायक होता. त्याचं कारण होतं त्यांची राजेशाही.
दुसरा अस्पृश्य म्हणून गणल्या जाणारा समाज म्हणजे महार होय महार समाज हाही त्या काळात शुरवीरच होता. हा समाज शुरवीर असल्यानं त्या जातीतील एका वडीलधारी व्यक्तीला गावाचा प्रमुख बनवले जाई व त्याला कोतवालपद बहाल केलं जाई.
मांग किंवा मातंग समाजही शुरवीरतेत अग्रेसर होता. तसेच विश्वासूही तेवढेच होते. त्या समाजाला जे डावपेच यायचे. ते इतर जातीतील लोकांना जमत नसत. असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांनी या जातीतील लोकांना तिजोऱ्या सांभाळण्याचे काम सोपवले होते
खाटीक समाजही अगदी तसाच शुरवीर होता. या जातीतील लोकं वाममार्गी मंदिरात यज्ञप्रसंगी पशुबळी देण्याचे काम करायचे. या लोकांची गणना मुळात क्षत्रीय व राजपूत मध्ये येत असे असा इतिहास सांगतो. काही इतिहासकार लिहितात की या जातीतील लोकं हे ब्राह्मण वंशाचे होते.
हा सर्व समाज विश्वासू होता नव्हे तर शुरवीरही. तो समाज नेहमी राजाच्या बाजूनं युद्धात लढत असे व राजांना युद्धात मदत करीत असून मोठमोठे पराक्रम गाजविण्यात ते स्वतःला धन्य समजत असत.
समाजात असेही काही चमचे होते की त्यांना या अस्पृश्य लोकांना राजेरजवाड्यांनी जवळ केलेलं बघवत नव्हतं. शिवाय अशाच चमच्यांना राजेही आवडत नव्हते व नाही आवडत होती त्यांची राजेशाही. त्यांना फितूर म्हणता येईल. त्यांनी येथील राजेशाही संपविण्यासाठी येथील आक्रमणकारी विदेशी लोकांना मदत केली व येथील त्या सर्व अस्पृश्य लोकांना गुलाम बनवले. परंतु याचा अर्थ असा नाही की त्या चमच्यांना राजपद मिळालं? विदेशी लोकांनी त्यांनाही गुलामच बनवलं होतं. तसंच त्यांच्यावरही राज्य केलं होतं.
पुर्वीचा काळ पाहता या भारताला हिंदुस्थान म्हणत व हा हिंदुस्थान काही संकुचीत नव्हता. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, ब्रम्हदेश या सर्व मिळून बनलेला हा देश होता. त्यात अफगाणिस्तानचाही काही भाग होता. शिवाय ब्रम्हदेशात हत्ती जास्त असून ते हत्ती लढाऊ जातीचे होते. त्या हत्तीचा वापर हा युद्धामध्ये येथील राजे महाराजे करीत असत. कधीकाळी राजाची मिरवणूक काढायची असल्यास ती हत्तीवरुनच काढली जाई.
या समाजाचे काही असेही राजे होते की त्यांच्यावर विदेशी आक्रमण कर्त्या अरबांनी कितीतरी स्वाऱ्या केल्या. ज्यातून कितीतरी स्वाऱ्यात विदेशी आक्रमणकर्त्यांचा पराभव होत असे. त्यानंतर ते पळूनही जात असत. मग काही दिवसानंतर ते पुन्हा सज्ज होवून येत. परत युद्ध करीत. परत पुन्हा हारले की पळूनही जात. परंतु जेव्हा एखाद्या भारतीय राज्यकर्त्याचा पराभव होत असे. तेव्हा मात्र ते त्याला सोडत नसत. ते त्याला आपल्या देशात नेत व त्या राज्यकर्त्यांचा अनन्वीत छळही करीत असत. हे सर्व येथील चमच्यांच्या आग लावण्यानं होत असे.
विदेशी आक्रमणकर्ते पळून जात. ते कसे पळून जात आणि का जात? यामागे बरीच कारणमीमांसा असेल. त्यातील एक कारण म्हणजे भारतात हत्ती जास्त प्रमाणात असल्याने भारतीय लोकं हे हत्तीवरुन लढत आणि विदेशी लोकं हे घोड्यावरुन. त्यातच समस्या अशी निर्माण व्हायची की भारतीय राजांचा पराभव झाला तर ते हत्तीवरुन लढत असल्यानं व हत्ती घोड्यासारखा चपळ धाव घेत नसल्यानं त्यांना पकडणं सहज शक्य व्हायचं. मात्र विदेशी राज्यकर्ते हे घोडे वापरत व पराभव झालाच तर ते पळून जात. तसं पाहिल्यास घोडे चपळ असल्यानं पुणं सोपं जात असे.
विदेशी लोकं भारतात आक्रमण करायला येत. ते का येतात. याचं एकमेव कारण म्हणजे भारताची असलेली प्रसिद्धी. भारत आधीपासूनच सुसंप्पन्न असलेलं राष्ट्र. या भारतातील जमीन एवढी सुपीक होती की ती जमीन सोनंच पीकवायची. याचा अर्थ असा की भारतातील जमीन ही सुगंधीत मसाल्याचं उत्पादन करायची. ज्या मसाल्यानं भाजीची चव वाढायची. ती चव इतर भागात मिळायची नाही. ती याच भारतात मिळायची. शिवाय भारतात सोनं विपूल प्रमाणात असल्यानं तेही लुटायला विदेशी लोकं यायचे.
चांभार जात ही पुर्वीपासूनच शूरवीर असलेली जात. शिवाय त्यांच्या सोबतीची मंडळी म्हणजे खाटीक, मांग आणि महार. ही मंडळी देखील काटकच होती. गावाचं रक्षण म्हणून गावाच्या शिवेवर उभा राहणारा महार हा शुरवीर व काटक असल्यानं त्याला कोतवालाचा दर्जा मिळाला. शिवाय गावाचं संरक्षण व्हावं. ते शत्रूपासूनच नाही तर हिंस्र श्वापदापासून. म्हणूनच ही शुरवीर माणसं लढायची. युद्धप्रसंगीही हीच लोकं लढायची व युद्धात मोठमोठी पराक्रमं गाजवायची. त्यांना त्यात धन्यता वाटायची. हेच पाहिलं विदेशी आक्रमणकर्त्यांनी. मग काय, जेव्हा येथील इतर राजे रजवाड्यांचा पराभव झाला, तेव्हा त्यांनी राजासकट येथील या शुरवीर माणसांनाही गुलाम बनवलं व त्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक देणे सुरु केले.
सुरुवातीला ही माणसं गावालगतच राहात होती. परंतु जेव्हा येथील राजे युद्ध हारले. तेव्हा पराभव होताच येथील राजासकट गुलाम झालेल्या या लोकांना विदेशी आक्रमणकर्त्या लोकांनी गावाच्या लगतच्या वस्तीत अधिवाशी म्हणून ठेवले नाही. त्यांना दूर ठेवले. ते गावाच्या बाहेर वस्ती करुन राहात असत. शिवाय त्यांच्यावर जबरदस्तीनं विटाळही लादल्या गेला.
विटाळ लादल्या गेला. विटाळ कसा काय लादल्या गेला? याचं उत्तर येथील तथाकथीत चमच लोकांनी लावलेली आग. येथील चमच लोकांना वाटत होतं की ही जात अतिशय शुर असून गावात आपल्यावर भारी पडू नये. ती जर जात आपल्यावर भारी पडली तर उद्या आपलं जगणं कठीण करुन टाकेल. शिवाय येथील राजेही. मग काय, विटाळाचं जर बंधन त्यांच्यावर टाकलं. तर ती जात कधीच आपल्यावर भारी पडणार नाही. तसंच दुसरं महत्वपुर्ण कारण होतं, ते म्हणजे त्यांचं पोट. त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन नष्ट केलं. ज्या उदरनिर्वाहाच्या साधनातून त्यांचं पोट भरणार होतं. आता हा चालबाजपणा कोणी केला? असा प्रश्न उपस्थीत होवू शकतो. यासाठी शिवरायांचा इतिहास आठवणे गरजेचे आहे.
शिवरायांचा इतिहास आपल्याला माहीत असेल. म्हटले जाते की शिवराय हे फितूरांना कडक शिक्षा करीत असत. त्याचं कारण होतं फितूरीमुळं राज्याचं होत असलेलं नुकसान. फितूर आपल्याच देशातील माणसं असायची की जी गावात राहात. जी राजांविरुद्ध कुरघोडी करीत. जी विदेशी लोकांना मदत करीत आपल्याच राजांविरुद्ध. ज्यातून तेच विदेशी आक्रमणकारी यशस्वी होत. त्यानंतर तेच विदेशी आक्रमणकारी याच फितूर माणसांचे काही सल्लेही ऐकत असत. ज्यातून अशा शुरवीर असलेल्या चांभार, मांग, खाटीक व महार लोकांना अस्पृश्य बनवलं. ज्या अस्पृश्यतेच्या आगीतून ही शुरवीर जनता होळपळून निघत होती. अशाच फितुरांनी वा चमच लोकांनी विदेशी राज्यकर्त्यांच्या कानाशी लागून असे असे नियम बनवले की ज्यातून कितीतरी जीवघेण्या स्वरुपाच्या यातना अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना भोगाव्या लागल्या.
आजही तीच परिस्थिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून अशा अनुसूचित जातीला अधिकार दिले व आरक्षण दिलं. त्याचबरोबर संरक्षणही दिलं. ज्या अधिकारांतर्गत ते त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार सहन करीत नाहीत व त्याची तक्रार करतात. त्यातच काही खटले न्यायालयात जातात. परंतु सर्वच खटल्यात त्यांना न्याय मिळत नाही. त्याचं कारण आहे हाच चमचगिरीपणा. हाच चमच न्यायदान करणाऱ्या राज्यकर्त्याच्या कानाशी लागतो आणि प्रत्यक्षात न्यायच पालटवून टाकतो. त्यामुळंच काही काही खटल्यात अस्पृश्यांना न्यायच मिळत नाही. शिवाय स्थानिक पातळीवरही अस्पृश्य सुखी नाहीत. जरी आज संविधानानं त्यांना समानतेचे अधिकार दिलेत तरीही. अस्पृश्यांबाबतीत आज अशाच बऱ्याच घटना घडतांना दिसत आहेत की ज्या घटना ह्या विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. प्रत्येक घटना ह्या दाबल्याच जातात कालसारख्या. आपण म्हणतो की समाज सुधारला. आरक्षणानं वर गेला. परंतु मुठभरच अस्पृश्य लोकं वर गेल्यानं सर्व अस्पृश्य सुधारले असा त्याचा अर्थ नाही. जेव्हापर्यंत तळागाळातील अस्पृश्य बांधव सुधारणार नाही. तेव्हापर्यंत अस्पृश्य सुधरला असे म्हणताच येणार नाही.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आजही अस्पृश्यावर अत्याचार होत आहेत. त्यांना अस्पृश्य म्हणून काही ठिकाणी हिणवलं जात आहे. तर काही ठिकाणी त्यांच्या परीवारावर चाबकानं वार होत आहेत. काही ठिकाणी त्यांच्या मुलींवर बलात्कार. आज विटाळ संपला असला तरी काही ठिकाणी आजही विटाळ गेलेला दिसत नाही. सरकारी कार्यालयातही तो आहे आणि कार्यवाहीतही तो आहे. काही ठिकाणी तो पदोन्नतीतूनही स्पष्ट दिसतो आहे. परंतु खरं सांगायचं झाल्यास अस्पृश्य म्हणून गणली जाणारी कालची माणसं ही अस्पृश्य नव्हतीच. ते वीरच होते प्राचीन काळातले. त्यामुळं आजही त्यांना तोच दर्जा देण्याची गरज आहे. जर तसा दर्जा त्यांना आज मिळाला नाही व त्यांची पदोपदी हेळसांड होत गेली. शिवाय सतत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत गेला तर तो दिवस दूर नाही की हाच अस्पृश्य बांधव पेटून उठेल व काल जसा तो राजा होता. उद्याचंही राज्य त्याच्याच हाती असेल, हे विसरता कामा नये. कारण ते वीरच आहेत पुर्वीचे आणि उद्याचेही हे तेवढंच खरं. हेही विसरता कामा नये.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०