क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग १ला

'ती तहानलेली नदी आहे.जोविझवेल तिची तहान त्याच्या शोधात ती वाहते आहे.ही अनेक वर्षांपासून वाहते आहे.आणि वाहतं आली आहे.या कलियुगात आली तेंव्हा तिला हे कळलं की इथे प्रत्येकजणच तहानलेला आहे.एक तहानलेला दुसऱ्याची तहान शांत करू शकेल का?तो क्षण ती मिळवू शकेल का?तो क्षण मिळवण्यासाठी तिला प्रवाही राहिले पाहिजे.मला माहित नाही किती काळ जाईल यात ?नदीला थकणं आवडत नाही,त्यामुळे ती नदी तहानलेली असल्याने ती वाहतच राहील. '***आज मला काय झाले ते मला माहित नाही. मी असं कसं लिहिलं? माझ्या मनाची ही तळमळ काय आहे? मनात दडलेली ही भावना, किंवा ती भावना व्यक्त करणारी कविता?  मलाही तहान लागली आहे पण कशाची? मी आसूसले आहे बाळासाठी. मातृत्वाची मला ओढ लागली आहे.विचार करता करता अपर्णा भूतकाळात शिरली.***मी अपर्णा माधव रेवतकर. कुटूंबातील शेंडेफळ म्हणून लाडकी. मला दोन बहिणी आहेत. नितूताई आणि ईशा ताई. दोघीही संसारात रमल्या आहेत.माझं लग्नं ठरलं तेव्हा निशूताई आणि ईशाताई इतक्या स्वप्नात रंगल्या की बस्स…!

साखरपुड्याची तारीख ठरली तश्या दोघीं मला इतक्या दुकानात घेऊन गेल्या की शेवटी माझा साखरपुडा असून मीच कंटाळले.

" ऐ निशूताई किती फिरायच! मला कंटाळा आला.ऊद्या येऊ."

"ऐ ऊद्या काय येऊ.आज साडी घ्यायचीच.साडी घेतल्यानंतर त्यावर ब्लाऊज शिवायचय. "निशूताई चिडून म्हणाली.

"टेलर इतके शहाणे असतात का? तुझा साखरपुडा जवळ आल्यावर ब्लाऊज दिलं तरी खूप झालं. नाहीतर देतील लग्नाच्या वेळी. म्हणून साडी आत्ता घाईनी घ्यायची." ईशाताई फणका-यानी म्हणाली. माझ्या चेह-यावर इतकी नाराजी पसरली ते बघून..." अपर्णा गप्प बस. चुपचाप आमच्याबरोबर चल." निशूताईनी फर्मान काढलं.

"अगं तायांनो माझा साखरपुडा आहे लग्नं नाही. एक साडी घ्यायला दोघी किती पळायला लावताय मला. लग्नाच्या वेळी काय कराल देव जाणे.""हां... लग्नाच्या वेळी याहून जास्त वेळ लागणार.अपर्णा लग्नं तुझं आहे या गोष्टींची सवय कर आता."***

लग्नाच्या वेळी तर या दोघींच्या उत्साहाला उधाण आलं होतं.मेंहदीला काय मेनू ठेवायचा, मेहंदी साठी कोणाला बोलवायचं.संगीतच्या  दिवशी कोणती साडी घालायची हे ही या दोघींनीच ठरवलं. लग्नं माझं पण होतंय सगळं त्यांच्या आवडीचं.

पण त्या माझ्या ताईच आहेत.त्यांच्या चेहे-यावरचा आनंद बघून मी किती आनंदी झाले हे मलाच माहिती.***बघता बघता लग्नाची तारीख जवळ आली तशी घरच्यांची गडबड उडाली.मी आनंदी होते पण कधीतरी मन उदास व्हायचं. माहेरची आंगण सोडून जायचं आणि सासरच्या अंगणात पाऊल ठेवायचं होतं.माहेरून मुळासकट स्वतःला  ऊपटवून घेऊन सासर नावाच्या कुंडीत स्वतःला रूजवायचं होतं.एका दिवसात स्त्रीला हे अवघड काम करायचं म्हणजे किती त्रासदायक होत असेल.माझी मनस्थिती ओळखून ईशाताई म्हणाली,

"अपर्णा माहेरचं आंगण असं सुटत नसतं. ते आपल्या मनात असतं. सासरच्या सगळ्या लोकांच्या मनात त्या घरी जाणा-या नव्या सुनेला रूजावं लागतं. आपला जीवनसाथी त्या घरात असल्यामुळे ते खूप अवघड वाटत नाही. स्त्री दोन्ही घरच्या मनात, अंगणात राज्य करत असते.सुनेनी सुरवातीलाच आपलं स्थान ओळखून लागलं की सगळं सोपं होतं."

ईशाताईनी हळूच अपर्णाताई कुशीत घेतलं.

"ताई एक मिश्र भावना आहे ग माझ्या मनात.निखीलमध्ये जीव अडकला आहे पण सासरची एक अनामिक भीती मनात आहे."

"नको त्या भीतीला एवढं खतपाणी घालू. सासर काय... आपलं आयुष्यच एक परीक्षा आहे. प्रत्येकाला आलेला पेपर वेगळा असतो. तो कसा सोडवायचा हे प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार ठरवतो. सासर नावाच्या चॅप्टरची आत्तापासूनच का धडकी घेतेस? सासरी गेल्यावर बघ पेपर कसा आहे आणि मग तो कसा सोडवायचा ते ठरव.इतकं सोपं आहे."

ताईंनी हळूच अपर्णाचा गालाचा गालगुच्चा घेतला आणि तिला जवळ घेतलं. कितीतरी वेळ त्या दोघी तश्याच बसून होत्या.अपर्णा सासरी गेल्यावर असं तिला कडकडून मिठी मारून गालगुच्चे घेता येणार नाही हे लक्षात आल्याने ताईचे डोळे पाणावले.

----------------------------------------------------------क्रमशःपुढे काय झालं वाचू पुढील भागात'प्यासी नदी' भाग १लालेखिका... मीनाक्षी वैद्य.