त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 2 Meenakshi Vaidya द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 2

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग२सकाळी कृपा गेल्याचं कळल्यापासून मृदुलाचं मन जडशीळ झालं होतं. तिला अजीबात काहीच करायची इच्छा होत नव्हती. कृपा भेटून दोनच वर्ष झाली होती. या दोन वर्षांत मृदुला मध्ये खूप बदल घडला होता.कृपाच्या सानिध्यात राहून तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन खूपच व्यापक झाला होता.वैद्यकीय क्षेत्रात डाॅक्टर मृदुला हे नाव खूप विश्वासाने घेतल्या जाई. पेशंट, त्यांचे औषधोपचार, पेशंटचं काऊन्सलिंग आणि सतत असणारे सेमिनार यात मृदुला पूर्ण बुडालेली होती.आधी ती डाॅक्टर म्हणून पेशंटला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्याकडे कसं बघायचं या विचारांची रुजवण करायची पण कृपाला भेटल्यावर त्या दृष्टीकोनाला साहित्यिक तरल संवेदनांची झालर  मिळाली आणि मृदुलाच्या काॅऊन्सिलींग मधील रूक्षता कमी होऊन त्यात भावनिकता आली. यामुळे पेशंट तिच्या विचारसरणीने खूप प्रभावित होऊ लागले.आधी वैद्यकीय क्षेत्राशिवाय तिला दुसरं क्षेत्र माहितीच नव्हतं. कृपाशी ओळख झाली तेव्हा तिची प्रथम इतक्या जवळून साहित्य प्रकारांची ओळख झाली.सुरवातीला हे साहित्य प्रकार मृदुला कृपाला बरं वाटावं म्हणून वाचायची. कृपासाठी  उपचार पद्धती म्हणून करायची. एकदा कृपाने एक लेख आणि एक कविता इतक्या तन्मयतेने मृदुला समोर सादर केली आणि त्यातील भावार्थ तिला समजावून सांगितला की मृदुला मनोमन हरखून गेली. नंतर तिला या शब्दांचं वेडच लागलं.कृपाने सांगीतलेले सगळे कवी आणि कवयित्री यांचे काव्यसंग्रह मृदुलाने मनापासून वाचले. काही मर्म स्पर्शी लेख वाचून काढले. या वाचनामुळे मृदुलामध्ये अंतर्बाह्य बदल झाला. ती आता फक्त डाॅक्टर राहिली नव्हती तर एक भावनेच्या ओलाव्यात चिंब भिजलेली एक हळवी स्त्री झाली होती. ही हळव्या मनाची डाॅक्टर तरल भावनेतून पेशंटशी बोलू लागली. तिचा प्रत्येक शब्द आता पेशंटच्या मनापर्यंत पोहचू लागला होता.पेशंट आता जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे चटकन बरे होऊ लागले होते. मृदुलालाही पेशंटची कथा ऐकून पूर्वी सारखा थकवा येत नसे. तिची काम करण्यातील ऊर्जा वाढली होती.हळूहळू मृदुलाची किर्ती सर्व दूर पसरू लागली. तिच्या नावाचा वैद्यकीय क्षेत्रात दबदबा आधी ही होताच आता तो दुप्पट वाढला. यात एक तरल सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. अनेक सिरीयस पेशंट मृदुलाच्या सहवासात आले की आणखी दहा वर्ष सहज  जगत.डाॅक्टर संजय हे मृदुलाचे सिनीयर होते. ते एकदा मृदुलाला म्हणाले," डाॅक्टर मृदुला तुमच्या यशाचं रहस्य काय आहे ते एकदा सांगून टाका. कारण तुम्ही हुशार आहातच.  आणि तुम्ही सिनसियर आहात. या दोन गोष्टी तुमच्याकडे पहिल्या पासून आहेतच. पण आता कोणती जादुची कांडी तुमच्याकडे आली आहे ज्यामुळे सिरीयस  पेशंट ज्यांनी जगण्याची उमेद  सोडली आहे असे  पुढे पाच दहा वर्ष सहज जगतात. याचं मला रहस्य माहिती करून घ्यायचंय."डाॅक्टर संजय यांनी जादूची कांडी हा शब्द वापरल्यामुळे मृदुलाला हसायला आलं." काहो मॅडम तुम्ही हसता का?"" तुम्ही जादुची कांडी हा शब्द वापरला नं म्हणून हसायला आलं."" या शब्दात हसण्यासारखं काय आहे?"" हा शब्द माझ्या एका कॅंन्सर पेशंटने वापरला होता. तिला साहित्याची खूप आवड आहे. ती कविताही करते. या साहित्याच्या सहवासात ती कॅंन्सरची  वेदना विसरते. ती म्हणते मी साहित्याच्या साखरपाकात कॅंन्सरच्या वेदना विरघळवून टाकते."" बापरे! कॅंन्सरच्या वेदना सहन करणंच कठीण असतं त्यात ही एवढं साहित्यिक बोलते. कमाल आहे."" खरच कमाल आहे सर. तिने माझीही या साहित्य विश्वाशी ओळख करून दिली आणि मला पेशंटशी संवाद साधण्यासाठी हळुवार सूर सापडला. बस्स हीच आहे जादूची कांडी."" खरच मॅडम तुमची ती पेशंट खूप मोठी कलावंत आहे. इतक्या सहज एवढं मोठं दुखणं सहन करत हसत हसत जगतेय."" हो नं. मी तिला सकारात्मक ऊर्जा देण्याऐवजी मीच तिच्या कडून साहित्यिक ऊर्जा घेतली आणि माझ्या वैयक्तिक आणि वैद्यकीय आयुष्यात खूप बदल घडून आला."मागच्या वर्षी झालेलं  हे संभाषण मृदुलाला आज आठवलं. कृपा तिच्यासाठी अमृतमय शब्द झाली होती. आज तीच अनंतात विलीन झाली. मृदुलाचा अमृत शब्द आज काळाच्या पडद्याआड गेला.हे कधी तरी घडणार याची कल्पना सहा महिन्यांपूर्वी मृदुलाला आली होती. तिने हरीशला  तशी कल्पना दिली होती. पण…कल्पना येणं आणि ती घटना प्रत्यक्षात घडणं यात महद्अंतर असतं.प्रत्यक्षात कृपा गेली ही गोष्ट हरीश आणि मृदुला दोघंही पचवू शकले नाही.सकाळी हरीशचा मेसेज आल्या पासून मृदुला भान हरवून बसली होती. तिच्या सासूबाई दोनदा तिच्या खोलीत डोकावून गेल्या पण मृदुलाला कळलं नाही. शेवटी त्यांनी मृदुलाला हाक मारली," मृदुला…""अं.." मृदुला भानावर आली." काय झालं? तुझा चेहरा असा का झाला आहे? तुला बरं नाही का?"सासूने हे विचारताच मृदुलाला हुंदका फुटला.आणि ती सासुच्या कमरेला मिठी मारून ढसढसा रडू लागली. सासुबाईंना कारण कळेना पण त्यांनी काही न विचारता तिला रडू दिलं त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या. त्यांना माहीत होतं की मृदुला एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून रडणारी मुलगी नाही. म्हणूनच त्यांनी ती शांत होण्याची वाट बघायचं ठरवलं._________________________________मृदुला शांत होईल ?आपल्या सासूला सगळं सांगेल? बघू पुढील भागात.