मराठी शुद्धलेखन ह्रस्व - दीर्घ चे सोपे नियम. Abhay Bapat द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मराठी शुद्धलेखन ह्रस्व - दीर्घ चे सोपे नियम.

शुद्ध लेखन
आपल्या शालेय जीवनात आपल्याला शुद्धलेखनाची पहिली ओळख होते. त्यात सगळ्यात प्रथम आणि आपल्याला लक्षात न राहणारा आणि न समजणारा असा विषय म्हणजे ह्रस्व- दीर्घ चे नियम.
प्रत्येकाला आपल्या शालेय जीवनात जे शिक्षक लाभले त्यांनी त्यांच्या परीने हे नियम समजावून सांगितले परंतु आपल्या त्या वयानुसार ते नियम समजणे अवघड गेलं पुढे आपण मोठे झाल्यानंतर स्वतः लिखाण करायला लागलो त्यावेळेला ही नियम लक्षात राहत नाहीसे झाले.
शिक्षकांनी शिकवलेल्या ह्रस्व दीर्घ च्या नियमातला वाटायला साधा पण आम्हाला त्यांना अवघड असा नियम म्हणजे ज्या शब्दाचा उच्चार पटकन होतो तो ह्रस्व लिहायचा आणि या शब्दाचा उच्चार लांबवला जातो तो दीर्घ लिहायचा. परंतु प्रत्यक्षात एखादा शब्द आपण उच्चारताना त्याचा उच्चार पटकन करतो की लांबवून करतो हे लक्षात येत नाही. आणि मग आपल्या शुद्धलेखनात चुका राहतात. अगदी हल्लीच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा शुद्धलेखनच्या बऱ्याच चुका असतात.
टीव्हीवरच्या विविध चॅनेल मध्ये बातम्या दाखवताना त्याखाली येणाऱ्या मजकुरांमधील शुद्धलेखन पाहिलं तर कीव करावीशी वाटते. उदाहरणच द्यायचं झालं तर चिंचवड या शब्दांमधील चि ह्रस्व आहे तरीही ती चींचवड अशी लिहिलेली असते हे बघायला सुद्धा फार विचित्र वाटतं.
शुद्धलेखनाचे नियम लक्षातच ठेवायला लागू नयेत म्हणून माझा एक मित्र सर्वच अक्षरे दीर्घ लिहीत असे. त्याचं म्हणणं बरीचशी अक्षरे ही दीर्घच असतात म्हणजे चूक झाली तरी 50% चूक होईल. यातला विनोदातला भाग तात्पुरता सोडला तरी आपणही अनेक ठिकाणी लिखाण करतो. ते लिखाण शुद्ध असावं म्हणून त्याला सहाय्यक म्हणून माझी ही पोस्ट.

ह्रस्व -दीर्घ नियम सोपे आहेत.
पुस्तकाची गरज नाही.खालील नियम लक्षात ठेवा.

"गुरू" च्या आधीचे अक्षर ह्रस्व
"लघु" चे आधीचे अक्षर दीर्घ.

आता गुरू म्हणजे काय ?
१)काना, मात्रा,वेलांटी,आकार , उकार किंवा जोडाक्षर असलेले एक अक्षर
२)एका पेक्षा जास्त अक्षरांचा समूह

लघु म्हणजे काय?
१) पुढे कोणतेही अक्षर नसणे.
२)पुढे एकच अक्षर असणे आणि ते अकारांत असणे .म्हणजे त्याला काना, मात्रा,वेलांटी,आकार , उकार नसणे किंवा ते जोडाक्षर नसणे.
उदा. ऊन या शब्दात ऊ चे पुढे एकच अक्षर आहे(न) आणि ते अकारांत आहे म्हणून ते लघु आहे , म्हणून लघु चे अलिकडचे अक्षर ऊ दीर्घ झाले.पण ' उन्हात ' या शब्दातील उ हा ह्रस्व आहे
कारण उ पुढे एकापेक्षा जास्त शब्द आले आहेत आणि त्यात ही एक जोडाक्षर आहे म्हणजे गुरू आहे.गुरूच्या आधीचे अक्षर ह्रस्व असते

याला अपवाद तत्सम शब्दांचा. संस्कृत मधून किंवा अन्य भाषेतून जसेच्या तसे आलेले शब्द. त्या शब्दांना वरील नियम लागू नाहीत.त्यांना संस्कृत किंवा त्या भाषेचे चे नियम लागू.
उदा.मंदिर या शब्दात दि चे पुढे एकच अक्षर आहे (र) व ते लघु आहे म्हणजे त्या आधीचे अक्षर दि हे दीर्घ असायला हवे ,पण हा शब्द संस्कृत आहे म्हणून अपवाद आहे.

पूर्व सूर्य या शब्दाचेही तसेच. शेवटच्या अक्षरावर रफार असला तरी उच्चार अकरांत अक्षर असल्यासारखा होतो. म्हणून ते लघु आहे.म्हणून पू , सू हे अक्षर हे दीर्घ.
थोडक्यात रफाराच्या आधीचे अक्षर दीर्घ.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की चिंच, इंच, भिंत अशा सारख्या शब्दांमध्ये शेवटचे अक्षर लघु असताना त्याच्या अलीकडले अक्षर दीर्घ का नाही म्हणजे चिंच मधला चि हा दीर्घ ची का नाही. किंवा भिंत मधला भि हा दीर्घ भी का नाही?
याचे कारण म्हणजे आपल्याला वाटते तसे शेवटचे अक्षर हे लघु नाहीये म्हणजे दिसायला जरी ते लघु असले तरी प्रत्यक्षात चिंच = चि न्च असे जोडाक्षर आहे. भिंत= भि न्त
असे जोडाक्षर आहे म्हणजेच गुरु आहे म्हणून गुरु च्या अलीकडील अक्षर ह्रस्व या नियमात ते बसते.

वरील नियम आणि उदाहरणे अमलात आणली तर १००% नाही पण ९०% शुद्ध नक्कीच लिहिता येईल.!.