चाळीतले दिवस - भाग 7 Pralhad K Dudhal द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

चाळीतले दिवस - भाग 7

चाळीतले दिवस भाग 7

 दिवसेंदिवस माझे नागपूर चाळीतले मित्र संख्येने वाढत होते.अशोक शिर्केच्या खोलीत त्याच्या चुलत्याच्या ऑफिसात काम करणारा एक मळ्याली तरुण रहायला आला होता.शशीधरण नावाचा तो तरुण बॅचलर होता आणि माझ्यासारखाच स्वतः स्वयंपाक करून खायचा.

  या शशी ला वाचनाची आवड होती,जास्त करून इंग्रजी पुस्तके  तो वाचायचा.त्याला थोडेफार हिंदी बोलता येत होते.माझे आणि त्याचे बऱ्यापैकी सूर जमले होते.तो तांदळाचे विविध पदार्थ करायचा.आपल्याकडची भाजी भाकरी त्याला आवडायची. वेळ असेल तेव्हा दिलीप आणि अशोक शिर्के बंधू यांच्याकडची तांदळाची भाकरी आणि सुकी मासळी,शशीचा केरळी स्वयंपाक आणि माझी भाजी भाकरी आम्ही एकत्र येऊन मस्त गोपालकाला करून खायचो.सणासुदीला बाळू नितनवरेची आई मला हमखास पुरणपोळी खायला बोलावायची.त्या चारपाच वर्षात मी अनेकदा बाळूच्या घरी जेवलो आहे .मधून अधून लोणंदहून वहीनी पुण्याला यायच्या.त्यावेळी आठ पंधरा दिवस तरी माझा स्वयंपाक करायचा त्रास वाचायचा.

  चंदन-माझा पुतण्या त्यावेळी खूप लहान होता.मी वहीनी आणि चंदन येरवड्यातल्या गुंजन थिएटर मधे सिनेमा पाहायला जायचो.त्यावेळी गुंजनला नवे नवे सिनेमा यायचे.जास्त करून रणधिर कपूरचे पिक्चर गुंजनला लागत,चंदनला कडेवर घेवून नागपूर चाळ ते गुंजन थिएटर चालत जाऊन आम्ही बरेच सिनेमे बघितले आहेत.

  माझे बी एस्सी चे पहिले वर्ष संपत आले होते.आमच्या कॉलेज लायब्ररीतून एका वेळी एकच पुस्तक मिळायचे त्यामुळे आप्पा बळवंत चौकातून राजू नाईक जिथे काम करायचा तेथून मिळालेल्या कुलकर्णी नोट्सवरच अभ्यासाची भिस्त होती.पहिल्या वर्षासाठी माझे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स स्टॅट आणि बायालॉजी असे विषय होते.लेक्चर्सला जरी नियमितपणे मी हजेरी लावत असलो तरी इंग्लिशमधून शिकवलेले कित्येकदा डोक्यावरून जायचे. 

  मुश्किलीने मिळालेल्या नोट्सवर जमेल तेव्हढा सेल्फ स्टडी मी करत होतो.मला मुख्य अडचण येत होती ती अभ्यासासाठी पूरक नसलेल्या वातावरणाची! खोली समोर बायकांची सतत वर्दळ असलेले नळ कोंडाळे, तिथे सतत चालू असलेल्या तार स्वरातल्या गप्पा,वादविवाद झोपडपट्टीतले काहीसे भडक मोकळेढाकळे वातावरण,सतरा अठराचे संगतीने बिघडू शकणारे वय,शिस्त लावायला किंवा लक्ष ठेवायला जवळपास कुणीही वडीलधारे नाही अशा परिस्थितीत नाही म्हटले तरी अभ्यासात मन रमवणे अवघड होत होते.आपली एकंदरीत आर्थिक परिस्थिती,परावलंबी आयुष्य,मार्गदर्शनाचा अभाव यावर त्या वयात मी अतिविचार करत बसायचो.महिन्याकाठी खर्चायला वीस पंचवीस रुपये मिळावायलाही करावा लागणारा जीवाचा आटापिटा मला आतून खूप छळायचा.गावाकडे जाऊन आल्यावर तर थोरल्या भावाचे दारूचे व्यसन आणि त्यामुळे एकंदरीत कुटुंबाचे होणारे हाल पाहून ही मनाची उदासी आणि निराशा खूपच वाढायची.पोटाची उपासमार आणि मानसिक आंदोलने याचा माझ्या प्रकृतीवर खूप वाईट परिणाम दिसत होते.

   वेळेत जेवण न मिळाल्याने अनेकदा मी घेरी येऊन पडायचो,तीन चार वेळा सार्वजनिक शौचालयात मी बेशुद्ध होऊन पडलो होतो,काही वेळाने शुद्ध आल्यावर पटकन कुणाला समजले तर नाही ना,यावर विचार करत बाहेर यायचो.मला नक्की काहीतरी शारीरिक आजार असावा असे वाटायचे,पण मनमोकळेपणाने हे कुणाला सांगावे असे कुणीही नव्हते.आईला सांगून आधीच त्रासात असलेल्या तिला अजून त्रास द्यावासा वाटत नव्हते.मनाची ही मरगळ विसरण्यासाठी मी जास्तीत जास्त वेळ मंडळाच्या मुलांच्यात रहायचो.अवांतर वाचनासाठी जी मिळतील ती पुस्तके वाचत राहायचो.

  कॉलेजला गेल्यावर विकास लोंढे,राजेंद्र ढवळे, माझा प्रॅक्टिकल पार्टनर कुलकर्णी यांच्याबरोबर वेळ घालवायचो.

 एकदा आम्ही- मी आणि माझा मित्र कुलकर्णी यांनी लेक्चर बुडवून अलका टॉकीजला The Spy who loved me हा  जेम्स बॉण्डचा सिनेमा बघायला जायचे ठरवले.सिनेमा फक्त प्रौढासाठी होता.आयुष्यात प्रथमच मी इंग्रजी सिनेमा आणि तोही A टाईपचा बघणार होतो.कुलकर्णीने तिकिटाची व्यवस्था केली होती.

  आपापली तिकिटे घेवून मी कुलकर्णीच्या मागे मागे जात गेटकिपरला तिकीट दाखवले.कुलकर्णी आत गेला मात्र मला गेटकिपरने आडवले.मी दिसायला एकदम बारीक आणि हडकुळा होतो.थोडेफार मिसरूड फुटले होते,पण माझे वय अठरापेक्षा जास्त आहे हे गेटकिपरला पटेना.माझे कॉलेज आय कार्ड दाखवले तरी त्याने मॅनेजरला बोलावले.माझी व्यवस्थित चौकशी करूनच त्याने मला आत सोडले. जेम्स बॉण्ड 007 रौजर मूर चा तो बराचा बोल्ड सिन्स असलेला सिनेमा मी प्रथमच पाहिला!

(क्रमश:)

- प्रल्हाद दुधाळ.