चाळीतले दिवस - भाग 3 Pralhad K Dudhal द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चाळीतले दिवस - भाग 3

भाग 3

   आमची नागपूर चाळीतली खोली खूपच छोटी होती.चारी बाजूनी पत्र्याच्या भिंती आणि वर मंगलोरी कौलाचे छत होते.एका बाजूला साळुंके नावाचे कुटुंब रहात होते. समोरच पाण्यासाठी सार्वजनिक नळकोंडाळे होते. नळ कोंडाळ्याला चार पाण्याच्या तोट्या होत्या. पाणी एकदा आले की आजूबाजूच्या सगळ्या बायका पाणी भरायला,धुणे धुवायला कोंडाळ्यावर जमायच्या. त्यांच्यातल्या गप्पा, एकमेकींच्या चुगल्या तर कधी कधी भांडणे पाणी बंद होईपर्यंत चालू असायची.मला खोलीत बसल्या बसल्याही बाहेरचे बोलणे ऐकू येत असे. यातूनही छान मनोरंजन व्हायचे. खोलीच्या समोर थोडया अंतरावर चारीबाजूनी बारदाणा लाऊन आडोसा करून आंघोळीसाठी मोरी केलेली होती. तिथेच पाण्याचा मोठा ड्रम भरून ठेवलेला होता.जवळ जवळ प्रत्येकाच्या खोलीसमोर अशीच व्यवस्थ्या होती.मी इथे राहायला आलो तेव्हा सध्याच्या हाउसिंग बोर्डच्या जागी काहीच नव्हते. दाट गाजरगवत आणि खूरटी काटेरी झुडपे अस्ताव्यस्त वाढलेली होती. याच मैदानावर वस्तीतले लोक आडोसा शोधून शौचाला जायचे.कुणीतरी आखून दिल्याप्रमाणे एका भागात महिला आणि दुसऱ्या भागात पुरुष विभाग तयार झाला होता. 

  पुढे महानगरपालिकेच्या गलीच्छवस्ती निर्मूलन विभागातर्फे सार्वजनिक शौचालय बांधले गेलें आणि या बाबतीतली रहिवाशांची होणारी कुचंबणा काही प्रमाणात कमी झाली. 

  नवीन बांधलेले शौचालय नेमके आमच्या खोलीतून दिसायचे त्यामुळे बसल्या बसल्याही इथे कोण कोण भेट देऊन गेले ते कळायचे! 

  शेजारचे साळुंके आणि त्याची बायको अनुक्रमे ससून आणि कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधे गृप डी कर्मचारी होते.आमच्या आणि त्यांच्या खोलीमध्ये पत्र्याचे पार्टीशन होते.अगदी हळू आवाजात बोलले तरी शेजारी ऐकू शकेल अशी ती घरे होती.साळुंकेला दम्याचा त्रास होता.त्रास वाढला की तो स्वतःचं स्वतःला इंजेक्शन द्यायचा.त्याला होत असलेला त्रास शेजारीपाजारी समजायचा.उजव्या बाजूला एक छोटी बोळ होती पलीकडे कळकुंबे नावाचे धर्मांतरीत ख्रिश्चन कुटुंब राहात होते.त्यातली बाई खूपच भांडकुदळ होती.महानगरपालिकेने जमेल तिथे उघडी गटारे बांधली होती.या नाल्यातली घाण दररोज काढली जाईलच याची शाश्वती नसायची.गटारातल्या घाणीची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली असायची.तशाही परिस्थितीत लोक आनंदाने रहात होते. इथे असणाऱ्या असुविधा लोकांनी आयुष्याचा एक भाग म्हणून लोकांनी स्वीकारलेल्या होत्या.

   संधी मिळाली की ज्याच्या खोलीसमोर मोकळी जागा असेल तिथे अतिक्रमण करून लोक खोली वाढवायचा प्रयत्न करत.भावाने केलेल्या सूचनेप्रमाणे आम्हीही आमची खोली पुढे सात फुटाने वाढवली.महानगरपालिकेचे अधिकारी अशा कामांवर नजर ठेऊन असायचे.शक्यतो थोडेफार पैसै खाऊन अधिकारी अशा कामांकडे दुर्लक्ष करायचे.आम्ही आमची खोली वाढवल्यानंतर महानगरपालिकेचे लोक येऊन नंतर केलेले काम काढून टाकावे असे वारंवार सांगू लागले.आजूबाजूला अशी भरपूर कामे झाली होती पण त्यांनी चिरीमिरी दिल्यामुळे त्याबद्दल ते काहीच बोलत नव्हते.एकदा मी महानगरपालिकेत गलिच्छ वस्ती निर्मूलन विभागात चिंचोरे नावाच्या अधिकाऱ्याला भेटून मी विद्यार्थी आहे आणि बाकीच्याप्रमाणे पैसे देऊ शकत नाही असे बजावले.त्याबरोबरच आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणांची यादीही त्या साहेबांकडे दिली.वरच्या साहेबाने कानउघडणी केल्यामुळे अर्थातच मला दिला जाणारा त्रास कमी झाला.

 वस्तीत राहून वेळ घालवायला मी शिवाजी मंडळात मनापासून सहभागी होत होतो त्या बरोबरच माझा अभ्यासही व्यवस्थित चालू होता.पहिल्या वर्षाचे दोन्ही सेमिस्टर मी पास झालो होतो.

   माझे बंधू कुवेतला गेले तेव्हा त्यांची लुना माझ्याकडे सोपवून गेले होते.खरं तर कॉलेजला लुना घेऊन जाणे मला नक्कीच आवडले असते,पण त्यासाठी पेट्रोलचा खर्च मिळवणे सोपे नव्हते.गाडी चालू ठेवण्यासाठी कधीमधी पैशाची सोय झाली तर एखादा लिटर पेट्रोल मी गाडीत भरून कॉलेजला घेऊन जायचो.मी त्यासाठी लर्निंग लायसन्स काढले होते.वयाच्या मानाने मी तब्बेतीने एकदम बारीक होतो त्यामुळे मी लुनावर कॉलेजला जाताना येरवडा ते  डेक्कन रस्त्यावरच्या जवळजवळ प्रत्येक चौकात मला ट्राफिक पोलीस अडवायचे.कॉलेजचे ओळखपत्र आणि लायसन्स दाखवून कशीबशी सुटका करून घ्यायला लागयची.

 नुसती कल्पना करून बघा..,

  अंगावर ढगळ कॉटनचा बिन इस्त्रीचा पॅन्टशर्ट, अस्ताव्यस्त हिप्पी केस,अर्धपोटी असलेला आणि तरीही लुनावर कॉलेजला चाललेला मी..ट्राफिक हवालदाराला माझे वय अठरापेक्षा जास्त आहे हे पटवतानाचे चित्र फार मजेशीर असायचे! आजही ते प्रसंग आठवले की मला हसू येते...

(क्रमश:)

- प्रल्हाद दुधाळ.