दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीचा दिनक्रम आटोपून अभिमन्यू कॉलेजमध्ये येतो. तो त्याची बुलेट पार्क करत असतानाच तिथे विनिता येते.
विनिता : गुड मॉर्निंग सर...
अभिमन्यू : गुड मॉर्निंग...आज चक्क तू लवकर आली आहेस कॉलेजला...गुड...अशीच वेळेवर येत जा...
विनिता : हो सर, मला तुम्हाला विचारायचं होत सर की तुम्ही शिकवणी घेता का ?
अभिमन्यू : मी खाजगी शिकवणी घेत नाही...माझ्याकडे तेवढा वेळ नाही... तुला काही अडचण असेल तर वर्ग सुरू असताना विचारत जा किंवा मग कॉलेज संपल्यावर ये... पण मी २ पर्यंतच असतो इथे...
विनिता : पण सर शिकवणीचा चांगला पर्याय आहे ना...पैसे ही अधिक मिळतात... आणि विद्यार्थ्याला नीट शिकून घेता येतं...
अभिमन्यू : मला अधिकच्या पैशांची हाव नाही...आणि विद्यार्थ्याला शिकायचे असेल तर त्याने मला कॉलेज संपल्यावर भेटायला यावे...चल मी ऑफिसमध्ये जातो....आधीच १० मिनिट्स उशीर झाला आहे....वर्गात भेटू...
विनिता : ठीक आहे सर...
अभिमन्यू गेल्यावर एका गाडीच्या मागे लपलेली शलाका बाहेर येते.
शलाका : विनी, हा तर तुझ्या जाळ्यात फसायला तयार नाही वाटतं...
विनिता : फसेल तो अग... जरा थांब ना...आपण आता काही तरी वेगळं ठरवूया...
शलाका : आपण थेट त्यांच्या घरी जायचं का ? म्हणजे त्यांच्या आईचं मन जिंकायचं आणि मग त्याच्याकडे काही पर्यायच राहणार नाही...
विनिता : तशी कल्पना काही वाईट नाहीयेय... आपण हेही करून बघू...
शलाका : चल वर्गात जाऊन बसून यावर विचार करू...
विनिता : चल...
------------------------------------------------------------------------------------------------------
अभिमन्यू वर्गात शिकवत असतानाच विनिता त्याला एकटक पाहत असते आणि हे अभिमन्यूलाही जाणवतं. मात्र त्याला ही गोष्ट यावेळी दुर्लक्ष करावीशी वाटते. तास संपल्यावर अभिमन्यू निघत असतानाच त्याला सुरज नावाचा विद्यार्थी हाक मारतो.
सुरज : सर, तुम्ही ते शिंदे सरांना असिस्ट करता ना..?
अभिमन्यू : हो, का रे ...
सुरज : सर, ते मलाही यायचं होत..म्हणजे मला आवड आहे इतिहासाची...तुम्ही त्यांना विचारून कळवाल का मला ?
अभिमन्यू : हो मी त्यांना विचारतो आणि मग तुला कळवतो....
सुरज : थँक्यू सर...
सुरजसोबत बोलून अभिमन्यू त्याच्या दुसऱ्या वर्गात जातो. मात्र विनिता अभिमन्यूच्या जवळ कसं राहता येईल याचा विचार करत असते. काहीही करून तिला अभिमन्यूला आपलंस करायचं असतं.
--------------------------------------------------------------
इथे शिंदेच्या घरी, माधव साधिकाची नाश्त्यासाठी वाट पाहतात. काही तरी घडलं आहे किंवा घडणार आहे असं त्यांचं मन त्यांना सतत सांगत होत. याचा विचारत त्यांना रात्री झोप लागली नाही आणि त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर ते ध्यानाला उठू शकले नाहीत. खूप अस्वस्थता जाणवल्यावर ते दत्तगुरूंच्या तसबिरीपुढे डोळे बंद करून बसले. एक दहा मिनिटांनंतर त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना काही चित्र दिसू लागली. त्यातला एक चेहरा मात्र त्यांना ओळखीचा वाटला. काही वेळाने मन शांत झाल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि बाजूला पाहतात तर काय साधिकाही ध्यान लावून बसली होती. तिचे ध्यान मोडू नये यासाठी ते हळूच उठून बाहेर बागेत येतात. मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. उद्या ब्रह्म मुहूर्तावर उठून या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावायचा हे त्यांनी मनोमन ठरवून टाकले होते. ते विचारात हरवलेले असताना साधिका त्यांना हाक मारते.
साधिका : बाबा.... बाबा....बाबा...
माधव : अं.. हो...
साधिका : कुठे हरवलात?
माधव : काही नाही...तू बोल...
साधिका : बाबा, यावेळी मी ज्या कार्यासाठी गेले होते ना...त्या ठिकाणी ध्यानात बसल्यावर मला तुमचा जो सहाय्यक आहे, अभिमन्यू तो मोठ्या अडचणीत सापडणार आहे, असं मला जाणवलं...त्याला सावध राहायला सांगा आणि कोणताही निर्णय घेताना तो विचार करून घ्यायला सांगा. तुम्ही कसला विचार करत होतात? ते सांगा.
माधव : आज तो येणार आहे तर आज त्याच्याशी बोलूनच घेतो आणि अग मगाशी जेव्हा मी मन शांत करण्यासाठी दत्तात्रेयांसमोर डोळे मिटून बसलो तर अभिमन्यू आणि काही चित्रे दिसली ग..पण त्याचा अर्थ उमगेना... त्याचाच विचार करत होतो.. एक तर तो काल कारंडेला भेटायला गेला होता. त्यामुळे मी जरा जास्तच चिंतेत आहे...
साधिका : बाबा, हे कारंडे शाक्त पंथीय आहेत ना ?
माधव : आहे नाही...होता..आणि आता तो वाममार्गाला लागला आहे...
साधिका : वाममार्ग ?
माधव : हो... त्या राजवाडेच्या नादाला लागून...त्या राजवाडेच्या डोक्यात काही तरी सुरू आहे हे नक्की...शोधून काढायला हवं...
साधिका : तो अभिमन्यू आला की त्याला विचारा कारंडेने कोणतं काम दिलं आहे आणि त्यावर त्याने काय उत्तर दिलं...आणि मला कळवा.
माधव : अगं मला त्याची आणि तुझी ओळख करून द्यायची आहे... तू थांब इथे तो आला की...
साधिका : सध्या आम्ही अनोळखी राहिलेले बरे आहोत...आणि नंतर त्याला माझी ओळख होणारच आहे...त्याला शक्यतो ध्यान करायला आणि काही तारक - मारक असे मंत्र शिकवा ते वापरायचे कसे हेही सांगा...पुढे मोठ्या दृष्ट चक्रात अडकल्यावर हे कामी येईल त्याला...त्याला जितकं तयार करता येईल तेवढं करा...त्याच्या परीक्षेचा काळ सुरू झाला आहे.. आणि त्याच्यासोबत एक मुलगा येईल त्याला तुमच्यासोबत काम करण्याची परवानगी द्या...
माधव : म्हणजे नक्कीच काही तरी भयंकर घडणार आहे...
साधिका : हो...आपण विचार करतोय त्यापेक्षाही जास्त भयंकर... चला आपण नाश्ता करून घेऊन मग मी मंदिरात जाऊन येते...
माधव : हो...चल...
-------------------------------------------------------------
एका मोठ्या गुहेत काळी वस्त्रे परिधान केलेला एक व्यक्ती देवीच्या एका रुपाची पूजा करतो आणि एकीकडे कारंडे बळीची तयारी करतो. पूजा पूर्ण होताच एका बकऱ्याचा बळी दिला जातो. ती व्यक्ती उठून उभी राहताच कारंडे त्याच्यासमोर मान झुकवून उभा राहतो.
"तुला सांगितलेलं काम तू पूर्ण केलंस का कारंडे?"
"सरकार, त्या मुलाने विचार करायला वेळ मागितला आहे." कारंडे.
"काहीही करून तो मुलगा मला माझ्या हातात हवा आहे."
"हो सरकार, माझे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि त्यात मी यशस्वीसुद्धा होईन."
"तिच्याबद्दल तुला काही माहिती मिळाली का?"
"माफ करा सरकार, पण कोण ती?"
"मूर्खा, तारिणी"
"माफ करा सरकार, पण अजून काहीच माहिती मला मिळाली नाही."
"एक लक्षात घे तीच आपल्या मार्गात अडथळा आणू शकते. तेव्हा तिचा शोध घे.."
"हो सरकार...मी पुन्हा नव्याने तिच्या शोधाचे कार्य सुरू करतो."
कारंडेने आश्वस्त करताच ती व्यक्ती तिथून निघून जाते. कारंडे मात्र तारिणीच्या विचारात गुंग होतो.
-----------------------------------------------------------
दत्तात्रेयांच्या मूर्तीकडे एकटक पाहत असतानाच साधिकाच्या डोळ्यांसमोर एक तेजःपुंज असा चेहरा येतो. हा तिच्यासाठी एक प्रकारचा संकेत असल्याने ती तात्काळ घरी जाण्यास निघते. मात्र तेव्हाच एक आजी तिला हाक मारते.
आजी : साधिका, बाळा कशी आहेस ?
साधिका : मी बरी आहे... पण आजी मी तुम्हाला ओळखलं नाही... कोण आपण आणि मला कश्या काय ओळखता?
आजी : तू मला ओळखत नाहीस मुली...पण मी तुझ्या घराण्यातील सर्वांना ओळखते..खासकरून तुझे आजोबा...माझं जाऊ दे...मी इथे एका कामासाठी आले होते... मला तुझी मदत हवी होती...
साधिका : बोला ना आजी काय मदत करू?
आजी : ही चिठ्ठी तू तारिणीपर्यंत पोहोचती करशील का?
साधिका : हो करते...तारिणी संपर्क साधेल तुमच्याशी...येऊ मी...मला जरा घाई आहे...निवांत रहा..आणि काही मदत लागली तर नुसती हाक मारा... मी येईन मदतीला...
आजी : सुखी रहा...मुली...
साधिकाने घड्याळात वेळ पाहिली. तिच्याकडे फक्त एक तास शिल्लक होता. तिने तिची बाईक काढली आणि सुसाट वेगाने घरी पोहोचली. तिला आलेले पाहून माधव तिला काही विचारणार इतक्यात ती इशाऱ्याने त्यांना अडवते आणि थेट खोलीत जाते.खोलीत आल्यावर हातपाय धुवून ती लगेच ध्यानाला बसते. बराच वेळ झाल्यावर ती खोलीतून बाहेर न आल्याने माधव हॉलमध्ये येरझाऱ्या मारतात. साधिकाला गुरूंकडून इतक्या लवकर संकेत मिळाल्याने ते जास्त अस्वस्थ झाले होते.
उल्का : बाबा, काय झालं...अशा येरझाऱ्या का मारत आहात ?
माधव : अगं साधिका मंदिरातून आल्या आल्या तडक खोलीत निघून गेली आहे...बहुतेक नेहमीप्रमाणे संकेत मिळाला आहे... उल्का : इतक्या लवकर कसं शक्य आहे?
माधव : हो..मगाशी ती काही न बोलता खोलीत गेली आहे...एक तास झाला ती अजून खोली बाहेर आली नाही..
उल्का : म्हणजे काही तरी गंभीर प्रकरण दिसत आहे...ती बाहेर आली की सांगेल तुम्हाला...तुम्ही एका जागी बसा बघू...मी पाणी आणते तुमच्यासाठी..तिच्या तयारीलाही लागायला हवं...
माधव : जेवण झालंय ना ग...
उल्का : हो बाबा, ताई आली की आपण जेवायलाच बसू...
माधव : बर... अभिमन्यू पण यायची वेळ झाली आहे...
उल्का : हे पाणी प्या आधी...
तेवढ्यात दारावर एक पोस्टमन येतो.
माधव : अरविंदा तू ? ये आत बस...
अरविंद : काय रे कसा आहेस?
माधव : मस्त... उल्का पाणी घेऊन ये काकांसाठी...तू इतक्या वर्षाने कसं येणं केलंस...आणि हा पोस्टमनचा वेश म्हणजे अजून कार्यरत आहेस की लेका...
अरविंद : हो... एक मदतीचं पत्र आलंय...
माधव : हो का ? दे बघू...
अरविंद : हे घे...पण मला कळत नाही आपला मदत मागण्याचा हा मार्ग कोणाला माहिती असेल...कारण ही अशी मदत आपणच एकमेकांना करतो..साधिका आली का ?
माधव : कालच आली... आणि आज पुन्हा जाईल बहुतेक...
अरविंद : इतक्या लगेच कसं?
माधव : समजेल तेही थोडा वेळात... अरविंद हे पत्र तर सुदामाच आहे...
अरविंद : काय? इतक्या वर्षांनी ? काय लिहिलं आहे पत्रात...
माधव : शोध घ्या माझा... इतकेच...
अरविंद : हे एवढंच...बाकी काही नाही...
माधव : हो तेच...
हे दोघे बोलत असतानाच साधिका खोलीतून बाहेर येते आणि तेव्हाच अभिमन्यू व सुरजही येतात. साधिका आता कुठे नीट अभिमन्यूचे निरीक्षण करते. गव्हाळ रंग, चॉकलेटी डोळे, काळे केस, गळयात एक चैन, हातात काळा धागा आणि एक कड असा उमदा तरुण त्या चक्रात अडकायला नको असं तिला मनोमन वाटतं मात्र विधितलिखित कोणाला टळलं आहे. ती आल्यावर अरविंद आणि माधवही शांत होतात.
माधव : ये अभिमन्यू...अरविंद हा माझा सहकर्मी आहे बर..मला माझ्या शोधकार्यात मदत करतो आहे...आणि अभिमन्यू हा माझा मित्र अरविंद...पोस्टमन आहे...
अभिमन्यू : नमस्कार काका, सर हा सुरज. तुम्हाला सकाळी मी यांच्याविषयी सांगितलं होत ना...
माधव : हो हो .... आलं लक्षात...
साधिका : बाबा, आधी आपण जेवून घेऊया का? मला भूक लागली आहे...
माधव : हो हो...अभिमन्यू आणि सुरज तुम्ही हातपाय धुवून या...उल्का...
साधिका : बाबा, मी जातेय तिच्या मदतीला... तुम्ही आता तिला हाक मारू नका...
सगळेजण जेवायला बसले असतानाच अभिमन्यू हळून तिरप्या नजरेने साधिकाला पाहायचा प्रयत्न करतो. सूरजही जेवताना सगळ्यांच निरीक्षणं करत असतो. काही वेळातच जेवणे आटोपल्यावर माधव, अरविंद, सुरज आणि अभिमन्यू गप्पा मारत बसतात. साधिका उल्काला स्वयंपाकघर आवरण्यात मदत करते.
उल्का : ताई तुला आता यावेळी काय सामान लागणार आहे आणि तू कधी निघणार आहेस हे सांग. म्हणजे मी तयारीला लागेन...
साधिका : मी इतक्यात जाणार नाहीयेय... इथलीही काम आहेत मला...आणि तुझ्यासोबत खूप गप्पा मारणार आहे मी...
उल्का : खरच ताई...मी तुझ्यासाठी नेहमी एक नवीन पदार्थ बनवेन...
साधिका : एक काम कर... सगळ्यांसाठी सरबत बनव आणि त्यातल्या एका सरबतात ही औषधी गुटिका टाक...आणि तो ग्लास अभिमन्यूला द्यायचा..
उल्का : अग पण का ?
साधिका : याची फोड मी लवकरच करेन... चल सरबत बनवू आणि बाहेर घेऊन जाऊ...
थोडा वेळाने त्या सरबत घेऊन येतात आणि सगळ्यांना देतात. साधिका मगाशी आलेले पत्र माधवकडे मागते. ती त्या पत्राचे निरीक्षण करत असताना सर्वजण तिच्याकडे टक लावून पाहतात.
साधिका : बाबा, हे पत्र सुदामा काकांचं आहे...आणि आपल्याला त्यांचा शोध घ्यायचा आहे... अरविंद काका हे पत्र तुम्हाला नेहमीच्या मार्गाने मिळालं आहे ना ?
अरविंद : हो...
माधव : पण इतक्या वर्षांनी कशी काय मागितली...मी इतकं शोधलं त्याला...पण त्याचा ठावठिकाणा काही लागला नाही मला...
साधिका : एका चक्रात अडकले आहेत ते...आणि कुणी तरी नकळत का होईना त्या चक्राचा भाग सैल केला आहे...त्यामुळे कदाचित ते आपल्यापर्यंत पोहोचले आहेत...
सुरज : चक्र? पण कसलं...
साधिका : एका पिंजऱ्यात किंवा नजरकैद किंवा बंदिस्त करून ठेवलं असेल... आणि त्या भोवती एक गोलाकार रिंगण घालुन त्यांच्या शक्तींना पण आरेखन घातलं असेल... त्यामुळे ते आपल्याला संपर्क करू शकत नव्हते...एक तर तिथल्या लोकांच्या दुर्लक्षामुळे ते आपल्याशी संपर्क साधू शकले आहेत किंवा आपल्यापैकी कोणीतरी त्यांची मदत केली असेल...
माधव : आपल्यापैकी कोणी केली असती तर आपल्याला समजलं असत ना..
अरविंद : हो तेच...
साधिका : ठीके...आता आपण यावर चर्चा नको करूया...त्यांना शोधायचं कसं हे ठरवू...
सुरज : पण कसं?
साधिका : बाबा, तुम्हाला हा सुरज जरा जास्तच चौकस वाटतं नाहीयेय का ?
सुरज : म्हणजे ताई ?
साधिका : म्हणजे तुला या सर्व गोष्टींमध्ये स्वारस्य आहे...नाही का ? आणि आजच आपली ओळख झाली ना...मग ?
माधव : हो... अग मगापासून मी विचार करतो आहे की याच्या सारखा चेहरा मी कुठे तरी पाहिला आहे... पण कुठे ते आठवत नाही... अरविंद तुलाही तसच वाटत का ?
अरविंद : हो रे...
साधिका : सुदामा काकांचा मुलगा आहे हा...
साधिकाच्या या वक्तव्यावर सगळेच स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहू लागतात. साधिका पुढे काय सांगतेय याकडे ते लक्ष देतात.
----------------------------
प्रणाली प्रदीप